जलसंवर्धनासाठी पूरक असलेली आपली पारंपरिक शेती काळाच्या ओघात नष्ट होत असल्यामुळे आता आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष *पाण्याचीच शेती* करण्याची वेळ आली आहे. 'पेरलंत तरंच उगवेल' हा पारंपरिक शेतीचा मंत्रच ह्या पाण्याच्या शेतीलादेखील लागू होतो. *"पाण्याची शेती"*, जी करण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, ती करणे सर्वसामान्यांसाठी सोपे कसे होईल हे संगण्यासाठीच हे *"पागोळी वाचवा अभियान".*
आम्ही लोकांपुढे ठेवलेल्या *"पागोळी वाचवा अभियानाला"* लोकांनी खूप सकारात्मक आणि कृतिशील प्रतिसाद दिला. दरम्यान लोकांच्या मनातल्या काही शंकादेखील समोर आल्या ज्यांचे समाधान होणे आवश्यक आहे.
हा विषय लोकांपुढे ठेवताना आम्हालाही पूर्ण कल्पना होती की आम्ही लोकांना नवीन असं काहीही सांगत नाही आहोत. तरीही लोकांना ती संकल्पना आवडली आणि लोकांनी तिला चांगला प्रतिसाद दिला ह्याचे आमच्या दृष्टीने एकमेव कारण म्हणजे लोकांच्या मनातील जलसंवर्धनाची तळमळ पूर्ण करण्याचे साधन *"पागोळी"* च्या साध्यासुध्या आणि अत्यंत सोप्या स्वरुपात त्यांच्या समोर आले. पाण्याविषयीची त्यांची संवेदना व्यक्त करण्याचे साधन त्यांच्या ओंजळीतच आहे याची जाणीव त्यांना ह्या अभियानाने करून दिली.
आजच्या घडीला पाण्याचे दुर्भिक्ष, त्याचे संवर्धन आणि त्यासाठीची जमीन/विहीर पुनर्भरण, खंदक, बंधारे इत्यादींसारखी साधने ह्यांचा विचार करत नसेल अशी क्वचितच कोणी व्यक्ती असेल. त्याचाच परिणाम म्हणून जल संवर्धनाचे अनेक पर्याय सातत्याने लोकांच्या समोर येत राहतात. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याच्यावरचा उपाय सांगण्याचा प्रयत्न करतो. ते सर्व उपाय सुचवण्यामागचे उद्देश निश्चितपणे अत्यंत प्रामाणिक असतात ह्यामध्ये शंका घ्यायचे काहीच कारण नाही. परंतु समोर येणाऱ्या अशा नानाविध पर्यायांमुळेच जे लोक जलसंवर्धनासाठी काही करू इच्छितात त्यांच्या मनाचा गोंधळ उडत आहे हे ह्या *"पागोळी वाचवा अभियान"* च्या निमित्ताने लक्षात आले. जल संवर्धनासाठी समोर येणारे सर्वच उपाय हे त्यांच्या परीने प्रामाणिक असले तरी ते आमलात आणताना थोडे तारतम्य ठेवण्याची गरज आहे हेदेखील लक्षात आले. विचार करता, उपलब्ध सर्व उपायांचे मोजमाप करून, काही निकष निश्चित करून सर्वसामान्यांना सहजपणे आमलात आणता येईल असा एक सर्वंकष आणि प्रभावी उपाय लोकांपुढे ठेवावा असे वाटले. ह्या विचाराने पुढीलप्रमाणे त्याचे काही निकष ठरविण्यात आले.
*सर्वसाधारण निकष -*
1. *साधेपणा आणि सहजपणा -* तो अत्यंत सहज, साधा आणि करायला सोपा असावा. तो मनावर कोणतेही दडपण निर्माण करणारा नसावा. तो मनाला आनंद आणि समाधान देणारा असावा
2. *कमीत कमी साधने -*
तो पूर्ण करण्यासाठी कमीतकमी आणि स्थानिक पातळीवर सहजपणे उपलब्ध होतील अशा साधनांचा वापर करता येईल असा असावा.
3. *अल्प खर्चिक -* तो करण्यासाठी येणारा खर्च नगण्य किंवा कमीतकमी असावा.
4. *तंत्रज्ञान विरहित -* तो करण्यासाठी कसल्याही तंत्रज्ञानाची गरज पडू नये. सर्वसाधारण माणसाला देखील स्वतःच्या बळावर तो करता यावा.
5. *पर्यावरणस्नेही -* पर्यावरणाला घातक अशी कोणतीही कृती त्यामध्ये अंतर्भूत नसावी आणि पर्यावरणद्रोही साधनांचा वापर नसावा, अटळ असल्यास तो कमीतकमी असावा.
6. *गुंडाळण्यायोग्य (फोल्डेबल) -* एका वर्षातले चार महिनेच त्याचा वापर आपण करू शकतो. इतर वेळी त्यासाठी वापरलेली साधने पुढील वर्षासाठीच्या वापरासाठी काढून ठेवता येतील असा असावा.
7. *कमी जागा व्यापणारा -* तो कमीत कमी जागेत आमलात आणता येईल असा असावा.
8. *सुरक्षितता -* तो सर्व दृष्टींनी सुरक्षित असावा, विशेषतः लहान मुलांच्या दृष्टीने.
9. *आरोग्यदायी (hyginic) -* सर्वात महत्वाचे म्हणजे तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने प्रदूषण निर्माण करणारा किंवा अनारोग्य पसरवणारा नसावा.
10. *शाश्वत/चिरस्थायी -* त्याचे स्वरूप शाश्वत आणि चिरस्थायी असावे. एकदा तो आमलात आणला की वर्षानुवर्षे तो टिकायला हवा. पुन्हा जोडण्याव्यतिरिक्त नव्याने त्याच्यावर काम करण्याची गरज पडू नये.
11. *किमान निगराणी-* त्याच्या निगराणीसाठीचे (maintainance) श्रम, वेळ आणि खर्च नसावेत किंवा नगण्य असावेत.
12. *प्रभावी परिणाम -* सर्वात शेवटी, उपलब्ध इतर उपायांच्या तुलनेत पाणी जमिनीमध्ये जीरवण्याच्या बाबत तो अधिक प्रभावी परिणाम देणारा असावा.
ह्या सर्व निकषांमध्ये बसेल असा एक उपाय आम्ही सर्वांना दिला आहे आणि सगळीकडूनच तो मोठ्या प्रमाणावर मान्यता पावत आहे.
*उपायाचे स्वरूप -*
*"आपल्या घराच्या छपरावर पडणारे पावसाचे पाणी पन्हळीद्वारे किंवा पीव्हीसी पाईपद्वारे एकत्र करून आपल्या घराच्या आवारामध्ये खणलेल्या 1मीटर लांबी × 1मीटर रुंदी × 1मीटर खोलीच्या खड्ड्यामध्ये जिरण्यासाठी पाईप किंवा इतर कोणत्याही उपलब्ध साधनाने नेऊन सोडणे".* बस्स, एव्हढंच ! ( किती सहज आणि सोपा उपाय आहे, फक्त एका ओळीमध्ये राहील एव्हढाच.)
*उपाय करण्यामागचा उद्देश -*
आकाशातून पडणारे पाणी जमिनीवर पडून वाहू न देता ते जागच्या जागी जमिनीत जिरवणे आणि जमिनीखाली असलेले आणि आता रिकामे झालेले पाण्याचे साठे पुन्हा समृद्ध करणे.
*लागणारे साहित्य -*
पीव्हीसी पन्हळ, त्याचे ब्रॅकेट्स, पीव्हीसी पाईप, विटा आणि थोडसं सिमेंट किंवा माती.
*प्रत्यक्ष मॉडेल -*
अभियानांतर्गत त्याचे एक 'मॉडेल' तयार केले आहे, जे फेसबुक/व्हाट्सअप्प इत्यादी समाजमाध्यमांवर पाहिले जात आहे आणि त्याबाबत आमच्याकडे मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे. ह्यापुढे सदर उपायाचा उल्लेख आपण 'मॉडेल' म्हणूनच करूया. अशाप्रकारचे मॉडेल तुम्ही तुमच्या आवारामध्ये घराजवळ अगदी सहजपणे उभे करू शकता.
सदर मॉडेलचे फक्त तीन टप्पे आहेत. पहिला म्हणजे छपरावरचे पाणी पन्हळीद्वारे एकत्र करणे, दुसरा म्हणजे ते पाईपने खड्ड्यापर्यंत वाहून नेणे आणि तिसरा म्हणजे ते पाणी जिरवण्यासाठी खड्डा तयार करणे.
*थोडेसे खड्डयाबाबत -*
1. आवारामध्ये जर वापरातील विहीर किंवा कूपनलिका असेल तर तिच्यापासून दोन ते तीन फूट अंतरावर खड्डा खणावा, जेणेकरून खड्डयामध्ये जिरणाऱ्या पाण्याचा थेट फायदा त्या विहीर किंवा कुपनलिकेतील पाण्याची उपलब्धता जास्त काळ टिकण्यासाठी होऊ शकतो.
2. अन्य परिस्थितीमध्ये सदरचा खड्डा घराच्या इमारतीपासून आठ ते दहा फूट दूर आणि इतर कोणत्याही बांधकामापासून (कंपौंडची भिंत, पंपशेड वगैरे) किमान दोन ते तीन फूट दूर आवारामध्ये आपापल्या सोयीप्रमाणे कोठेही करावा.
3. एक मीटर लांबी, रुंदी, खोलीचा खड्डा खणून झाल्यावर त्याचा तळ आणि चारही बाजू मोकळ्या ठेऊन जमिनीच्या वर चारही बाजुंनी केवळ सहा इंच उंचीचे वीटबांधकाम करून घ्यावे. ते शक्य नसेल तर आजूबाजूचे दगड धोंडे खड्ड्याच्या चारही कडांवर ठेऊन खड्ड्यातून काढलेली माती त्यावर सर्व बाजूनी दाबून बसवावी आणि साधारण आठ ते दहा इंच उंचीचा उंचवटा तयार करावा. त्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी खड्ड्यातील पाणी जमिनीच्या पातळीपर्यंत आले तरी ते त्यापेक्षा वर येऊन इतस्त: पसरणार नाही. उलट वरून पडणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा दबाव खड्ड्यामध्ये तयार होऊन पाणी जमिनीत जिरण्याचा वेग वाढेल. सततच्या मोठ्या पावसातदेखील व्यवस्थित बंदिस्त केलेल्या खड्डयातील पाणी जमिनीच्या पातळीवरच खेळत राहते, जमिनीच्या वर ते येत नाही असे निरीक्षण आहे.
4. खड्डा पूर्णपणे मोकळा ठेवावा. त्यामध्ये दगड, धोंडे, खडी, वाळू इत्यादींसारखं काहीही टाकण्याची आवश्यकता नाही. खड्डयाची क्षमता कमी होईल असे काहीही करू नये. काही वेळा खड्ड्यामध्ये प्लॅस्टिकचं भोकं पाडलेलं पिंप उभं केलेलं दाखवतात. तसे केल्याने खड्डयाची पाणी जिरवण्याची क्षमता आपणच कमी करतो. पावसाचे प्रमाण कमी असेल त्या भागात खड्डयाचा आकार यापेक्षाही कमी घेऊन चालेल, परंतु अनावश्यक गोष्टींचा वापर करून आपले श्रम आणि खर्च वाढवू नये. जमीन स्वतःच एक उत्तम फिल्टर आहे.
5. खड्ड्यामध्ये जमिनीपासून किमान एक फूट उंचीवरून पाणी पडायला हवं. त्यापेक्षा जास्त उंचीवरून पडलं तर ते दिसेलही चांगलं आणि पाहताना तुमच्या मनाला आनंदही होईल.
6. सुरक्षेच्या दृष्टीने तो खड्डा तिथे उपलब्ध असलेल्या लाकूड, झाप, जुना लोखंडी/सिमेंटचा पत्रा इत्यादींनी झाकायचा की नाही हे तुम्ही ठरवू शकता.
*लोकांच्या मनात घर करणारे इतर पर्याय -*
ह्याच पद्धतीने पागोळीचं पाणी थेट कुपनलिकेमध्ये किंवा विहिरीमध्ये सोडणे ह्याचं थोडं जास्तच आकर्षण लोकांच्या मनामध्ये आहे, असं लक्षात आलं आहे. साडेतीन फूट खोलीच्या खड्ड्यामध्ये पाणी सोडण्याऐवजी ते जर थेट विहिरीमध्ये सोडलं तर साधारणपणे तीस ते पन्नास फूट आणि कुपनलिकेमध्ये सोडलं तर थेट दोनशे ते तीनशे चारशे फूट खाली जाऊन अधिक प्रभावीपणे जमिनीमध्ये जिरेल असं लोकांना वाटणं हे तार्किक दृष्ट्या बरोबरदेखील आहे. परंतु काही निकषांवर हे दोन्ही पर्याय अभियानांतर्गत सुचवलेल्या मॉडेलच्या मागे पडतात. त्यातील सर्वात महत्वाचा निकष म्हणजे पर्याय "आरोग्यदायी" असण्याचा. पिंपाला दुपदरी/ चौपदरी साडी गुंडाळून किंवा तेच पिंप भोकं पाडून खड्ड्यात उभं करून भोवताली दगड, धोंडे, खडी, वाळू इत्यादींचा वापर करून जे एकप्रकारचे 'गाळणे' तयार होते त्यामध्ये पाण्यातला फक्त दृश्य कचराच विहिरीमध्ये किंवा कुपनलिकेमध्ये जाण्यापासून रोखला जातो.
घराच्या छपरावरून जे पाणी वाहते त्यामध्ये दृश्य आणि अदृश्य असे दोन्ही प्रकारचे घटक असतात. जरी सुरवातीचे पावसाचे पाणी आपण बाहेर सोडून दिले तरी पुढील तीन साडेतीन महिन्यांच्या कालावधीमध्ये छपरावरून जे पाणी वाहते त्यामध्ये पशु पक्षांची विष्ठा, त्यांच्या अंगावरचे जंतू, मेलेल्या कीड मुंगीसारख्या सूक्ष्म कीटकांचे अवशेष, सडलेल्या पानांचे, फुलांचे, फळांचे अवशेष आणि हवेत मिसळलेल्या प्रदूषणकारी वायूंचे अदृश्य स्वरूपाचे मिश्रण असू शकते. जे आपल्या आरोग्याला अपायकारक ठरू शकते. वर उल्लेख केलेली गाळणी ह्या गोष्टींवर मात करण्यास असमर्थ आहेत. त्यासाठी बाजारामध्ये मिळणारे रुपये 5000/- ते 25000/- किंमतीचे खर्चिक फिल्टर्स आवश्यक आहेत, जे सातत्याने वापरात न राहिल्याने एकाच वर्षात खराबदेखील होऊ शकतात. तेव्हा मुख्यत्वे उपाय आरोग्यदायी आणि अल्पखर्चीक असावा ह्या दोन आणि तद्नंतर इतरही काही निकषांवर हे दोन्ही उपाय मागे पडतात. तरीही ज्यांना ते अवलंबायचे असतील त्यांनी आवश्यक त्या सर्व काळज्या घेऊन जर ते अवलंबले तर ते निश्चितपणे जास्त प्रभावी ठरू शकतील.
जलसंवर्धनाचे इतरही अनेक मार्ग उपलब्ध आहेत, परंतु सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या भवितव्यासाठी जलसंवर्धनाचा सहज, सोपा आणि तात्काळ आमलात आणता येईल असा स्वावलंबी मार्ग प्रात्यक्षिकासह सुचवणे हा "पागोळी वाचवा अभियानाचा" मुख्य उद्देश असल्याने त्याची चर्चा इथे अनावश्यक ठरेल.
*लक्षात घ्याव्यात अशा काही गोष्टी -*
1. आपल्या देशाचे सरासरी पर्जन्यमान 300 मी.मी (30 सें. मी.) ते 650 मी.मी. (65 सें.मी.) आहे.
2. आपल्या महाराष्ट्र राज्याचे सरासरी पर्जन्यमान 1000 मी.मी (100 सें.मी) आहे.
3. आपल्या राज्यामध्ये जमिनीच्या दर एक गुंठा (सुमारे 1000 चौ.फू) जमिनीवर एका वर्षात सरासरी एक लाख लिटर पाणी आकाशातून पडते.
4. आपल्या राज्यातील 1000 चौ.फुटाचे केवळ एक घर वर्षाला सरासरी एक लाख लिटर पाणी "पागोळी वाचवा अभियाना" अंतर्गत एकही थेंब वाया जाऊ न देता जमिनीमध्ये जिरवू शकतं.
5.आपल्या राज्याच्या पाण्याच्या गरजेच्या कितीतरी अधिक पटीने निसर्ग आपल्याला दरवर्षी पाणी देत असतो.
6. आपल्या राज्यातल्या धरणांची साठवण क्षमता त्यामध्ये साचणारा गाळ आणि वाढत्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन ह्यामुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. कदाचित पुढील काही वर्षांमध्ये त्यांना मृत म्हणून घोषित करण्याची पाळी आपल्यावर येऊ शकते, किंवा प्रचंड खर्च करून त्यांना पुनर्रजीवीत करण्याचा उपाय योजावा लागू शकतो.
7. बाष्पीभवनाचे सध्याचे प्रमाण धरणाच्या क्षेत्रानुसार सुमारे तीन ते बारा टक्के असे आहे. मोठ्या धरणांचा बाष्पीभवनाचा वेग मोठा असतो. वाढत्या उष्णतेमुळे हा वेग अधिकाधिक वाढत जाणार आहे.
8. सातत्याने वाढणाऱ्या उष्णतेमुळे जमिनीच्या वर पाण्याचा साठा करण्याचे मार्ग हळूहळू कालबाह्य ठरणार आहेत. त्यामुळे जमिनीच्या खाली पाण्याचा साठा करण्याव्यतिरिक्त आपल्यासमोर कोणताही पर्याय राहत नाही. त्याची सुरवात आतापासूनच व्हायला हवी.
9. पाऊस आपला स्वभाव बदलत आहे. ह्यावर्षीचा अर्धा पाऊस केवळ आठ ते दहा दिवसांत पडला आहे, आणि आपल्या हाती काहीही लागू न देता वाहून समुद्राला मिळाला आहे.
10. अशा काम उरकण्याच्या स्वभावाकडे वाटचाल करणाऱ्या पावसाच्या पाण्याला केवळ "पागोळी वाचवा अभियान" सारखे उपायच रोखू शकतात.
11. *"राजकारणात लोकांचे कल्याण असा काहीही प्रकार नसतो. राजकारण हे निव्वळ राजकारणच असते"* असे जगभरच्या राजकारण्यांच्या विचारांची दिशा निर्देशित करणारे जाहीर विधान रशियाचे अध्यक्ष श्रीमान व्लादीमीर पुतीन ह्यांनी अलीकडेच केले आहे.
*आवाहन -*
खरंतर "पागोळी वाचवा अभियान" हा एका ओळीचा केंद्रबिंदू आहे आणि त्याभोवती फिरणारे बाकी सर्व त्याचे पदर आहेत. अमच्यापरीने ते उलगडवून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. "समाजकारणात ह्यापेक्षा अधिक काहीही नसते" असे काही पुतीन साहेबांच्या चालीवर म्हणणे आम्हाला मान्य होणार नाही. कारण 'अंतिम समाधान' हेच समाजकारणाचे 'अंतिम उद्दिष्टही' असते. तेव्हा तुम्हा सर्वांचे नेहमीच स्वागत आहे. सुरवातीलाच आमची फेसबुक लिंक दिली आहे. अभियानांतर्गत बनवलेला मॉडेलचा व्हिडीओ, इतर माहिती, लेख तिथे पहायला मिळतील. शेवटी जलसंवर्धनाच्या पालखीचे भोई तुम्हा आम्हालाच व्हायचे आहे आणि त्यासाठी खणल्या जाणाऱ्या खड्ड्यांमध्येच आपल्या पुढच्या पिढ्यांचे भवितव्य सामावले आहे ह्याचे भान न हरवू देण्याचे आवाहन करून आत्तापुरते थांबतो.
सुनिल प्रसादे.
दापोली.
8554883272
दिनांक - 23, जुलै 2019.
अधिक माहिती -https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448
प्रतिक्रिया
24 Jul 2019 - 2:06 pm | कुमार१
अभिनंदन व शुभेच्छा !
24 Jul 2019 - 6:04 pm | सुनिल प्रसादे
धन्यवाद !
24 Jul 2019 - 2:19 pm | आंबट चिंच
खूप छान प्रकल्प
जी तुमची तळमळ दिसून येते ती लोकांनी अंमलात आणायला हवी.
24 Jul 2019 - 6:11 pm | सुनिल प्रसादे
बोली प्रतिसाद चांगला मिळत असला तरी साधं आणि सोपं ह्यापेक्षा अद्भुत आणि अप्राप्याची असलेली माणसाची ओढ अनाकलनीय आहे. त्याच्यामागे धावण्यात आपले नुकसान होत आहे, हे माणसांना ज्या दिवशी कळेल तो सगळ्यांच्या दृष्टीने सुदिनच म्हणायचा ! शुभेच्छांबद्दल धन्यवाद !
24 Jul 2019 - 6:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत उपयोगी आणि व्यावहारीक माहितीचा लेख.
तुम्ही लिहिलेल्या तपशीलावरूनच स्प्ष्ट होत आहे की, केवळ काहीतरी करायचे म्हणून नाही तर काही एक घ्यास घेऊन व सांगोपाग विचार करून तुमचा प्रकल्प बनवलेला आहे. तुमच्या या लोकोपयोगी सामाजिक प्रकल्पाला उत्तरोत्तर अधिकाधिक यश मिळो हीच शुभेच्छा !
25 Jul 2019 - 8:03 pm | सुनिल प्रसादे
डॉक्टर, शुभेच्छांसाठी धन्यवाद !
विचार पोहोचतोय, काही ठिकाणी रुजतोयदेखील. पाहूया, शेवटी सर्व काही लोकांच्या सहभागावर अवलंबून आहे.
25 Jul 2019 - 9:40 pm | सस्नेह
असेच म्हणते
25 Jul 2019 - 4:37 am | मिसळपाव
काही शंका;
१. निव्वळ १ मिटर पाण्याच्या दबावाने पाणी जिरण्याचा वेग कितीसा वाढतो?
२. समजा १० स्क्वेअर मीटरच्या छपरावरचं पाणी अशा १ क्युबिक मीटरच्या खड्यात सोडलं तर, पाउस अगदीच झिमझिम असला तरच सगळं पाणी जिरू शकेल असं वाटतं. मुंबईत जो बदाबदा पाउस पडतो ते सगळं पाणी ईतक्या सहजासहजी जिरेल? तुम्ही फेसबुकवर व्हिडिओ दाखवलाय पण सगळ्याना तसा अनुभव येईल? सगळीकडची माती ईतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी जिरवून घेऊ शकेल?
३. सोसायट्यांच्या आजूबाजूला बहुतांश ठिकाणी डांबर/सिमेंट असतं. एका बाजूला असे एक-दोन खड्डे केले (तिकडे नीट बोर्ड वगैरे लाउन की जेणेकरून तिथे काही अपघात होणार नाही) की काम भागेल?
४. मुंबई काय, चेन्नई काय, सगळ्या मोठ्या शहरातनं पावसाळ्यात पाणी साठतं. #३ चा उपाय शहरभर शंभर ठिकाणी केला, पाणी साठतं तिथे, तर तिथल्या विहिरींमधे पाणी जास्त उपलब्ध होईल? आणि खड्डे नाही खणले तरी पाणी शहरातल्या मोठ्या भागात साठत असल्यामुळे, कमी प्रमाणात, पण पाणी मुरत असेलच. पण भूजलाची पातळी तर पार खालावत चालल्येय.
५. पाणी निदान एक फुटावरनं तरी पडायला हवं त्याचं कारण काय?
६. "हा उपाय गेले तीन/पाच वर्ष १०० ठीकाणी करतोय. यातल्या ९०% ठीकाणी पूर्वी परसातल्या विहीरीचं पाणी फेब्रू-मार्चमधे आटायचं. आता तशा ८०% ठीकाणी मे पर्यंत तरी टिकतं" अशा स्वरूपाच्या अभ्यासाचे रीझल्टस् आहेत का? म्हणजे माझ्यासारख्या छिद्रान्वेषी लोकाना ते दाखवता येतील!! मग १ मीटर खोल खड्डा पुरतो का, माती सगळीकडची सारख्या प्रमाणात पाणी शोषून घेईल का वगैरे प्रश्न निकालात निघतील. भले नक्की कसं ते कळंत नाही, पण हे करून बघितलं आणि हे त्याचे रिझल्टस् हा फार प्रभावी मार्ग असतो अशा बाबतीत.
पाणी जमिनीत मुरवायला हवंय हे नि:संशय. पण हा उपाय किती परिणामकारक आहे शंका वाटते. अक्विफर्स रिचार्ज होणं हा फार मंदगतीने होणारा प्रोसेस आहे. ईथे अति-सुलभीकरण केलंय असं वाटतंय. अर्थात काहीही न करण्यापेक्षा हे करून बघणं नक्कीच श्रेयस्कर. तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा.
25 Jul 2019 - 4:40 am | मिसळपाव
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
25 Jul 2019 - 10:06 pm | सुनिल प्रसादे
नमस्कार !
आपण छिद्रान्वेषी आहोत असे स्वतःलाच म्हणायला मन खूप मोठं लागतं. परंतु तसं म्हणताना किंचित कमीपणाची भावना जाणवली, ती अनाकलनीय आहे. छिद्रान्वेषी असणं तसं सोपं काम नाही. जे इतरांना दिसत नाही ते पाहण्यासाठी अभ्यास, ज्ञान आणि जाणिवा इतरांपेक्षा तीव्र असाव्या लागतात. असो.अशाप्रकारच्या शंकांचे निरसन व्हावे, म्हणून बऱ्याच दिवसांची वाट पाहून संधी मिळताच तो व्हिडीओ शूट केला आहे. आपल्या शंका रास्त आहेत असं म्हणणं जर जडच जाईल. जरा अधिक बारकाईने आजूबाजूला पाहिलंत तर अशा प्रकारच्या कामाच्या परिणामांचे तुम्हाला हवे असलेले पुरावे निश्चितपणे सापडतील. तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद !
25 Jul 2019 - 5:26 am | कंजूस
सर्व मुद्दे पटलेले आहेत. फक्त लोकांनी ( घरमालक,सोसायट्यांनी ) ते करायला हवेत. पण कुठे खर्चाचा प्रश्न आला की भयानक विरोध होतो. सोसायटीत राजकारणही. क्रेडिट कुणाला द्यायचे यावरही खल होतो. शिवाय याचा सोसायटीला परतावा काय हे पटवणे कठीण असते.
25 Jul 2019 - 10:09 pm | सुनिल प्रसादे
बरोबर आहे. त्यासाठी कर्तव्याची भावना जागृत होणे गरजेचे आहे. धन्यवाद !
25 Jul 2019 - 10:53 pm | जॉनविक्क
अशा सोसायटीतल्या लोकांना आयकरामध्ये सूट आहे असे ऐकुन आहे जाणकारांनी प्रकाश टाकावा.
25 Jul 2019 - 8:40 am | यशोधरा
वाचते आहे.
27 Jul 2019 - 11:53 pm | मुक्त विहारि
लिहीत रहा, ही विनंती आहे....
किमान एकाने जरी हा प्रयोग केला तरी चालेल.