"जमीन पुनर्भरण केंद्र" - विडिओ - https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448
स्थळ - गजानन महाराज नगर, मु. गिम्हवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी - 415 712.
दिनांक - 28 जून 2019
छपराचे क्षेत्र - 1500 चौ. फू.
खड्डयाचा आकार - 4 फूट लांब × 3 फूट रुंद × 3.5 फूट खोल
जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण - पाच लाख पंचवीस हजार लिटर.
पाहूया कसे ते -
संपूर्ण वर्षाऋतुमध्ये कोकणात पडणारा एकूण पाऊस - 350 सें. मी.
त्या हिशोबाने 1500 चौ. फू. च्या एका छपरावरून एका ऋतूमध्ये जमिनीवर पडून वाहून जाणारे पाणी - 5,25,000 लिटर (पाच लाख पंचवीस हजार लिटर.)
त्याच छपरावरचे संपूर्ण पावसाळ्यात पडणारे सर्व पाणी जर पुनर्भरण खड्ड्यामध्ये सोडले तर जमिनीत जिरणारे एकूण पाणी - 5,25,000 लिटर ( पाच लाख पंचवीस हजार लिटर.)
केवळ एका घराच्या 1500 चौ. फू. छपराची आणि 4' × 3' × 3'.6" खड्डयाची ही कमाल आहे, जी आपल्याकडून दुर्लक्षित आहे.
येणारा खर्च - रुपये शून्य ते दोन हजार फक्त. तोही आयुष्यभरासाठी एकदाच.
कोकणातील एक घर म्हणजे साधारणपणे दोन लाख ते सहा लाख लिटर पाण्याचे उत्पन्न देणारं साधन आहे. पाण्याच्या बाबतीत असलेली आपली ही श्रीमंती आपण दुर्लक्षिल्यामुळेच पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आपल्या सर्वांवर आली आहे.
अवाजवी अपप्रचार -
कोकणातील जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. त्यामुळे जमिनीमध्ये जिरलेले पाणी जमिनीमध्ये टिकून न राहता ते जमिनीखालून वाहून जाते, त्यामुळे ते मुरवण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे, असा अवाजवी प्रचार केला जातो. ह्या अपप्रचाराचा परिणाम म्हणून आपल्याकडे पाणी जीरवण्याच्या प्रयत्नांकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही.
परंतु जमिनीच्या पाणी जीरवण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक असलेले अतिरिक्त पाणी जमिनीखालून वाहू देण्याचा हा गुणधर्म सर्वच प्रकारच्या जमिनींमध्ये आढळतो. जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीखालून पाणी वाहण्याचा वेग कमी जास्त असतो एव्हढेच. अतिवृष्टी होणाऱ्या प्रदेशांमध्ये आपल्याकडे आहे तशा प्रकारची छिद्रयुक्त ( poros) जमीन तयार होते, जी laterite प्रकारात मोडते. अतिवृष्टीमुळे जमिनीवर पडलेले आणि जमिनीत जिरलेले अतिरिक्त पाणी जमिनीवरून आणि जमिनीखालूनदेखील वाहून जाण्यासाठी निसर्गानेच केलेली ती व्यवस्था आहे.
पाणी जिरवून घेण्याचा कोणत्याही जमिनीचा वेग हा तीच्या प्रकारानुसार एका तासाला साधारणपणे पाव इंच ते दोन इंचापेक्षाही जास्त असा असतो. मऊसूत जमिनीचा ( loam soil ) वेग सर्वात कमी असतो आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असते. त्याउलट रेताड ( sandy ) जमिनीचा वेग सगळ्यात जास्त असतो आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी असते. कोकणातल्या जमिनीचा पाणी जिरवून घेण्याचा वेग साधारणपणे एका तासाला दोन इंच आहे आणि तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आपण मानतो तशी निकृष्ट नसून ती मध्यम स्वरूपाची आहे आणि रेताड जमिनीच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे. तिच्या छिद्रयुक्त रचनेमुळे जमिनीखालून पाणी वाहून जाण्याचा वेग इतर काही जमिनींच्या तुलनेने जास्त आहे. म्हणूनच तिच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी जिरवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून हे अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठीचा कालावधी वाढेल आणि पाण्याची उपलब्धता जास्त काळासाठी राहील. त्यामुळे वरील प्रकारच्या अपप्रचाराच्या आहारी जाऊन निष्क्रिय राहण्यात काहीच अर्थ नाही.
-------- -------- -------- --------
आता आपल्या दापोली तालुक्याचे गणित मांडूया
------------------- ------------------- ------------------
पडणारा एकूण पाऊस 350 सें. मी.
तालुक्यामध्ये एकूण ग्रामपंचायती - 106
तालुक्यातील एकूण गावांची संख्या - 177
तालुक्यामधील एकूण घरांची संख्या - सुमारे 5000 ( 2011 च्या गणनेप्रमाणे)
सर्व घरांच्या छपरांचे सरासरी क्षेत्र 1000 चौ. फू.
1000 चौ. फू. च्या एका छपरावरून संपूर्ण पावसाळ्यामध्ये 350 सें. मी. ह्या हिशेबाने जमिनीवर वाहून जाणारे पाणी 3,50,000 लिटर.
तालुक्यामधील 35% घरांच्या, म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी आपण ठरवलेल्या किमान पातळीएव्हढया, म्हणजे सुमारे 1750 घरांच्या प्रत्येकी सरासरी 1000 चौ. फू. च्या छपरावरून संपूर्ण पावसाळ्यात जमिनीवरून वाहून जाऊन समुद्राला मिळणारे एकूण पाणी (1750 घरं × 350000 लिटर) 61,25,00,000 लिटर (एक्सष्ट कोटी पंचवीस लाख लिटर).
म्हणजेच अत्यंत सहजपणे आपण एकदाच केलेल्या व्यवस्थेद्वारे दरवर्षी जमिनीमध्ये विनासायास किमान 61,25,00,000 लिटर मुरवू शकतो.
जर आपल्या तालुक्यातील 50% म्हणजे 2500 घरांनी जर ही साधीशी, सोपीशी, अल्पखर्चीक आणि सहजसाध्य अशी गोष्ट केली तर आपण दरवर्षी किमान ( 2500 घरं × 350000 लिटर) 87, 50,00,000 (सत्याऐंशी कोटी पन्नास लाख लिटर) पाणी जमिनीमध्ये जिरवू शकू. तेही शून्य किंवा अत्यल्प खर्चामध्ये आणि कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता.
1000 चौ. फू. चे छप्पर किंवा टेरेस असलेले कोकणातले एक घर सुमारे 350000 (तीन लाख पन्नास हजार लिटर) पाणी जमिनीमध्ये जिरवू शकते.
आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःच्या घराची केवळ पागोळी वाचवायची, असे जरी ठरवले तरी पाण्यासाठी आपल्याला कुणाच्याही तोंडाकडे आशेने पाहण्याची गरज राहणार नाही.
इथे उदाहरण म्हणून जरी दापोली तालुका घेतला असला तरी महाराष्ट्रात सर्वत्र आणि देशामध्ये देखील त्या त्या ठिकाणच्या पावसाच्या प्रमाणात ही गोष्ट लागू पडते.
सुनील प्रसादे.
8554883272.
https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448
-------- -------- -------- ---------
प्रतिक्रिया
16 Jul 2019 - 6:30 pm | मुक्त विहारि
धन्यवाद. ..
16 Jul 2019 - 11:50 pm | सुनिल प्रसादे
धन्यवाद !
16 Jul 2019 - 6:50 pm | मुक्त विहारि
धन्यवाद. ..