जगातले काही शोध असे आहेत, ज्यामध्ये पूर्ण समाजाला बदलूंन टाकायची शक्ती असते. कम्प्युटरचा शोध या महत्वाच्या शोधांपैकीच एक. कम्प्युटर जेव्हा प्राथमिक अवस्थेत होते तेव्हा कोणी विचारही केला नसेल, कि येत्या काही दशकांत तुम्ही घरबसल्या दुसऱ्या खंडातल्या लोकांशी संवाद साधू शकाल, खिशात १००० गाणी ठेवून फिरू शकाल. खरं तर तेव्हा अशी कोणी कल्पना असती तर त्याला अगदी वेड्यात काढलं असतं, पण म्हणतात ना वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात. अगदी तसंच एका वेड्या सॅन फ्रॅन्सिस्को इथे जन्मलेल्या पण पॉल जॉब्झ कडे दत्तक गेलेल्या एका मुलाने 'स्टीव्ह जॉब्झ' ने असं स्वप्न पाहिलं आणि आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर यशस्वी करून दाखवलं. तो आपल्या कामाबद्दल जेवढा झपाटलेला होता, तितकंच वॉल्टर आयझॅकसन ने लिहिलेलं त्याचं चरित्र सुद्धा विलक्षण आहे. या चरित्रलेखनाची सुरवात कशी झाली ? हे सांगताना आयझॅकसन सांगतो, जॉब्झ ने त्याला चरित्रलेखनासाठी फोन केला तेव्हा त्याने बघू कधीतरी म्हणून त्याला कटवलं. पण जेव्हा २००९ मध्ये जॉब्झच्या बायकोने 'लॉरीन पॉवेल' ने त्याला स्टीव्ह जॉब्झ च्या स्वादुपिंडाच्या कॅन्सर बद्दल सांगितलं आणि म्हणाली, "जर तू स्टीव्हवरचं पुस्तक कधीकाळी लिहिणार असला तर ते आताच लिहिलेलं उत्तम राहील" !
या चरित्राचे आणि स्टीव्ह जॉब्झच्या संपूर्ण आयुष्याचे साधारणपणे चार (४) भाग करता येतील.
* बालपण, वॉझ बरोबरची मैत्री आणि ऍपल ची स्थापना.
* स्कलिची एण्ट्री आणि स्वतःच्या कंपनीतून बेदखल होणे.
* पुरागमन
* शेवटची खेळी
हे चार भागात जरी असलं तरी पुस्तकाच्या प्रत्येक पानावर त्याच्या लढवय्येपणाची प्रचिती येते, मग तो लढा जॉन स्कलीशी असो, डिझ्नी सोबत असो कि त्याला हरवणाऱ्या कॅन्सर सोबत. पहिल्या काही प्रकरणांत त्याच्या लहानपणाविषयी, शिक्षणाविषयी कळतं. तो आयुष्यभर इतरांपेक्ष इतरांपेक्षा कायमच वेगळा वागला. काही काही वेळेस या वागण्याला विक्षिप्तपणासुद्धा म्हंटलं गेलं पण या सर्वांचं मूळ त्याच्या लहानपणीच दत्तक जाण्यात होतं. त्यामुळेच कि काय त्याच्या स्वभावात एकप्रकारची बंडखोरपणा, एक प्रकारचे बंदिस्त वृत्ती होती, आणि हेच पुढे ऍपल मध्येसुद्धा दिसुन येते. आजही तुम्ही ऍपल च्या कुठल्याही प्रॉडक्ट मध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. पुढे वॉल्टर आयझॅकसन लिहितो "वास्तवाचा विपर्यास करणं हे त्याचं क्षेत्र होतं !". याच कलेच्या जोरावर त्याने पुढे कित्येक लोकांना प्रभावित केलं आणि अगदी त्यांच्याकडून अशक्य असं काम करवून घेतलं. याच गोष्टीचा त्याला त्रास झाला आणि त्याने स्वतः ऍपल आणलेल्या स्कलिकडून बोर्डासमोर अपमानित होवून बाहेर पडावं लागलं.
जॉब्झ च्या जागी एखादा असता तर हार मानून गप्प बसला असता, पण तसं करणं त्याच्या रक्तातच नव्हतं त्यामुळेच तो तरला आणि ऍपल मधल्या पुरागमनाने त्याच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा कालखंड सुरु झाला. संकटात सापडलेल्या ऍपल च्या जहाजाला त्याने योग्य दिशा दिली. आधीच परिपूर्णता, सुंदरता यांबद्दल आग्रही असणारा त्याचा स्वभाव आता अजूनच कठोर होत गेलेला दिसतो. ऍपल मध्ये पुनरागमन झाल्यावर 'थिंक डिफरंट' तत्वज्ञानाचा वापर करत त्याने 'आयपॉड', 'आयट्यून' अश्या एका पेक्षा एक सरस उत्पदनांची मालिका कश्या बाजरात आणून यशस्वी करून दाखवल्या, त्यांचे विस्मयकारक लाँच इव्हेंट्स याच्या कथा मुळात वाचण्यासारख्या आहेत. २००३ मध्ये त्याला अत्यंत दुर्मिळ असा स्वादुपिंडाच्या कॅन्सरचं निदान झालं. आणि आयुष्यातली अखेरची लढाई लढायला तो सज्ज होतो, असा प्रवास आहे. या शेवटच्या कालखंडात त्याचं कुटुंब त्याचबद्दल किती हळवं होतं आणि त्यांच्यातल्या परस्पर नातेसंबंधाचा उहापोह केलेला आहे.
हे पुस्तक वाचणं म्हणजे एखादी रोलर कोस्टर राईड अनुभवण्यासारखं आहे. ज्यात तुम्ही त्याच्या आयकॉनिक टर्टलनेक टि शर्ट, ब्लु जीन्स आणि स्पोर्टशूज घातलेल्या स्टीव्ह बरोबर त्याच्या सोबत चालत चर्चा ऐकत असता, ऍपलच्या ऑफिस मध्ये त्याच्या गोपनीय अश्या डिझाईन लॅब मध्ये आयफोनची विविध डिझाईन हाताळता. पुनरागमन करताना विंगेतून त्याच्यावर लोकांचं असणारं प्रेम अनुभवता. प्रत्येक प्रसंगामध्ये जणू तुम्ही तिथे आहात असं जाणवतं. चरित्रांमध्ये साधरणपणे स्तुती केलेली असते. त्या व्यक्तीच्या चुकीच्या बाजूंवर अलगद पण पडदा टाकला जातो. पण जॉब्झ च्या या चरित्रात त्याने काहीही भीडभाड न ठेवता प्रसंगी जॉब्झच्या वागणुकीवर टिका केलेली दिसते, हेच या पुस्तकाचं यश आहे. या आधी मी ऍपल च्या प्रॉडक्ट्स ते बंदिस्त असतात त्यात दुसरं काही चालत नाही म्हणून शिव्या घालायचो, स्टीव्ह जॉब्झ कडे आपल्या बोलण्यातून माणसाला स्वतःकडे वळतं करून घ्यायची अद्भुत ताकद होती. हे पुस्तक वाचतांना मी सुद्धा त्याच्या असाच प्रेमात पडलोय. मी आतापर्यंत अनेक चरित्र वाचलीत, ती इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्तींची होती. पण स्टीव्ह जॉब्झ माझ्या पिढीचा माणूस होता. त्याच्या आयुष्यातले चढउतार रोजच्या बातम्यातून, इंटरनेट द्वारे कळत होते, त्यामुळे त्याचं हे चरित्र अधिकच प्रामाणिक आणि जवळचं वाटतं.
प्रतिक्रिया
14 Jun 2019 - 6:37 pm | आनन्दा
वाचायला हवे
14 Jun 2019 - 7:13 pm | जॉनविक्क
पण छान आहे.
14 Jun 2019 - 7:52 pm | तुषार काळभोर
अगदी मनापासून लिहिलंय ,
तुमच्यावर पडलेला प्रभाव जाणवतोय.
14 Jun 2019 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
थोडक्यात पण सुंदर परिक्षण.
मी आतापर्यंत अनेक चरित्र वाचलीत, पण ते इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्तींची होती. पण स्टीव्ह जॉब्झ माझ्या पिढीचा माणूस होता. त्याच्या आयुषयातले चढउतार रोजच्या बातम्यातून, इंटरनेट द्वारे कळत होते, त्यामुळे त्याचं हे चरित्र अधिकच प्रामाणिक आणि जवळचं वाटतं.
+१००, असेच वाटेल वाचताना.
15 Jun 2019 - 7:38 am | कुमार१
छान परिचय !
15 Jun 2019 - 9:37 am | जेम्स वांड
तुम्ही परीक्षण पण भरभरून केलं आहे, मनसोक्त माणसावर लिहिलेल्या मनसोक्त पुस्तकाचे मनसोक्त परीक्षण.
16 Jun 2019 - 5:29 am | कंजूस
छान!
एक जाडजुड पेपरब्याकमध्ये आहे तेच ना?
हिस्ट्री चानेलची फिल्म पाहिली आहे.
5 Oct 2020 - 1:31 pm | महासंग्राम
आज स्टीव्ह चा स्मृतिदिन म्हणून थोडीशी झैरात