सेवाभावी (भाग १)

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in जनातलं, मनातलं
6 Nov 2008 - 2:03 am

भाऊसाहेबांचा पंधरा वर्षाचा दबदबा मोडीत काढून अशातच मिसरुड फुटलेला तरणाबांड गोकूळ सरपंच झाला. चांगलं कमावलेलं शरीर, *सटीच्या जत्रात मागच्या पाच दहा वर्षात हमखास कुस्त्या मारलेल्या गोकूळचं बोलणं मोठं भारदस्त पण लाघवी. कुस्तिच्या आखाड्यात तसेच कबड्डीच्या संघात खास दोस्त बनलेले त्याचे मित्र ग्राम पंचायतीत उर्वरीत गटांमधून निवडून आणलेले. आठ पैकी सात जागा घेऊन पॅनलनं भाऊसाहेबाला चांगलाच लोळवला होता. आता गावालाही या तरण्या पोरांकडून चांगल्या अपेक्षा होत्या. तशी गावात ग्रामसभेची दंवंडी झाली.

"आरं शिवा, हे ग्रामसभा काय हाय रं?", तमाकू चोळत चोळत घरातून बाहेर पडत नानांनी ग्राम पंचायतीवर निवडून आलेल्या आपल्या लेकाला प्रश्न टाकला.
"नाना, गावातल्या सगळ्या लोकांनी मिळून ठरवायचं आपल्याला काय काय करायचं ते. आन मग आमी गोकूळसंग जाऊन तहसीलमधून त्या कामाच्या मंजूर्‍या आणायच्या," शिवाने उत्साहाने उत्तर दिले.

या नव्या आणी हव्या हव्या बदलाने सगळेच गावकरी आनंदले होते.

"खंडोबाच्या तसंच गावातल्या सगळ्या वडीलधार्‍या मंडळींच्या आशिर्वादानं आन संवगंड्यांच्या प्रयत्नानं आपण आज आपल्या गावात इतिहास घडवलाय", नवीन सरपंच गावाकर्‍यांना सांगत होता, "आजपर्यंत ह्या अशा ग्रामसभा झाल्याचं कुणी कधी बघितलय का? नाही. कारन ह्या सभा व्हायच्या त्या आपल्या भाऊसाहेबांच्या चमच्यांच्या दप्तरात. तर आता बोला मंडळी आपल्याला काय सुधारणा करायच्या आहेत येत्या वर्षात?"

सुरुवातीला संकोच कराणारे गाववाले एकाने सुरु करताच एका नंतर एक बोलू लागले. कोणी म्हणत होता आधी बोरेवेल घेऊन दोन्-चार हापशे बसवून पाण्याचा प्रश्न सोडवायला हवा तर कोणाला आपल्या घराच्या बाजूची हगणदारी हटवायची होती तर कोणाला पाटाच्या पाण्याच्या आळी-पाळीत आपल्या गावचा नंबर आधी लावायचा होता. पण पुन्हा सगळे शांत झाले ते शांताबाईच्या मागणीवर, "मपल्या धोंट्याचा बाप मपली रोजंदारी उचलून दररोज ढुंगण उताणा करुन बेंदाडात पडतोय. गोकूळा, बा आता तूच सोडव मला ह्याच्यातून. एक तर हातभट्टी बंद कर न्हायतर प्यानार्‍यायला उचलून कुटं तरी गाडून ये".
धोंड्याच्या बापाप्रमाणे पिण्याची सवय असणार्‍या सर्व जणांच्या चेहर्‍यांवरचा उत्साह येव्हाणा मावळला होता.

"शांता काकी म्हणती ते बराबर हाये पण तिचं ऐकलं तर समदे पिदडे आपल्या विरोधात जातेल", रमेश शिवाच्या कानात कुजबुजला.

"ठीकय मंडळी, आता हे सगळेच विषय घेऊन आमी सगळे सदस्य तहसीलात जातो. एक एक करुन सगळ्याच गोष्टी करु आपण. पण जरा धीर धरा", गोकूळने वेळ मारुन घेतली अन सभा पण आटोपती घेतली.

आता ग्राम पंचायतीच्या आठ पत्र्याच्या त्या उजाड कार्यालयात नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांव्यतिरिक्त भिंतीवर लटकलेले गांधी आणि नेहरु ते काय उरले होते. बाकी ग्रामस्थांनी आपापल्या शेताकडे, गुराढोरांकडे आपला मोर्चा वळवला होता.

"गोकूळ, आपल्यला सालाकाठ किती फंड मिळणार हाये? आन त्याच्यात हे सगळं कसं भागणारे? आन मर्दा, आपलं ते सेवाभावी संस्थेचं कधी सुरु करणार?" रमेशला काही केल्या हे प्रश्न पोटात ठेवणे भाग नव्हते.

"जरा चड्डीत र्‍हा ना भौ! बुळकांडी लागल्यागत यवढा कामून घायी करायला तू?" शिवानं त्याच्या भाषेत प्रेमाचा सल्ला दिला.

"आरं गड्या शिवा, रम्या मनतोय ते पन बराबर हाये. आपण आतापसून ठरविलं तरच हे जमणार हाये. नाईतर पाच वर्षे कसे निघून जातेन कळायचे बी न्हाईत," गोकूळने दूरवच्या पिंपळाच्या उंच शेंड्याकडे बघत शिवाला बुचकळ्यात टाकले.

"रम्या, तू एक काम कर. मी तुला गायकवाड सायबानी दिल्याले पॉम्प्लेट देतो. त्याच्यात सरकारी योजना आन त्याला मिळणारे फंड ह्यांची रितसर लिश्ट हाये. त्या योजना आपल्याला कशा महत्वाच्या हायेत हे तू एका कागदावर लिहून काड. आन मग आपण संस्था रजिस्टर करायचा फार्स उरकून घेऊ." रमेशला त्याच्या आवडीचे काम देऊन गोकूळ आता शिवाकडं वळला, "गड्या शिवा, तुला गावात लयी सज्जन मानत्येत. आन तू बी तसा हाईस. तवा तू कनाय हे हापशे, हाणदारी, दारु भट्टी असल्या गोष्टीत लक्ष घाल. उपसरंच हायेस लेका तू."

"मंजे तुमी सगळे गावचे काम करणारे सज्जन आन मी मंजे संस्था टाकून तिच्यात चरायला सोडल्याला कठाळ्या व्हय रं? मायला म्हंजे पुडच्या टायमाला माझा पत्ता कट करायचा हाय का काय तुमा दोघांना," रम्यानं बरोबर हेरलं होतं. तसा गोकूळ त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला, "आरं पाच वर्षात तू संस्था टाकून दुसरा भाऊसाहेब झालास तर लोकं तुला निवडून थोडेच देणार हायेत. तवा तुझ्या एखाद्या भावाला तिकीट देऊ. आता रेंद्यात हात घालायचा मनल्यावर जरा लांब र्‍हावा लागन का न्हाई. पन मनून आपन सगळ्यांनी तेच केलं तर कसं जमायचं? आन तूच तर मनीत व्हतास की आपल्याला एक टर्म दिली तरी बास पण संस्था काढाय मिळाली मंजी झालं. काय बराबर का न्हाई?"

क्रमशः

टीप - ही कथा सत्य घटनेवर आधारित असली तरी काल्पनिक आहे.
*सट: चंपाषष्ठी. खंडोबची जत्रा असते या दिवशी.

कथासमाजजीवनमानलेखअनुभव