एकच प्याला !!!

Primary tabs

किल्लेदार's picture
किल्लेदार in जनातलं, मनातलं
7 Dec 2018 - 10:25 pm

एकदा वाचण्यात आलं होतं की तुमचा आवडता मद्याचा प्याला तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडेफार सांगू शकतो... आणि मला एक जुना किस्सा आठवला.

मित्राला खोकला झाला म्हणून त्याला घेऊन एकदा ब्रँडी आणायला वाईनशॉप मध्ये गेलो होतो. काउंटरवर ब्रँडी मागतांना, खुद्द गांधींनी केली नसती एवढी याची चुळबुळ चाललेली. बाटली घेऊन पैसे चुकते केल्यावर चेहऱ्यावर जमेल तितकी अजीजी आणून "हमे नशा नही करना है, दवा के लिये ले रहे है" असा डायलॉग जेव्हा त्याने दुकानदाराला मारला, तेव्हा मी मात्र स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला.

तस्मात...ब्रँडी हे जरा पापभिरू लोकांचं मद्य असावं. इतरांसारखी ही सहसा कधी कुठल्या ग्लासात विसावत नाही. हिचे मोजमाप झाकणानं नाहीतर चमच्यानं. फारच वाटलं तर कधीतरी प्रवासात असताना हिप-फ्लास्क मधून घोटभर. औषधी गुण असल्यामुळे दारू न पिण्याऱ्यांच्या कपाटात सुद्धा हिला कुठेतरी कोपऱ्यात जागा मिळते. नातवाला खोकला झाला की पूर्वी आजीच्या बटव्यातून कुठलीतरी औषधं निघायची पण ब्रँडीचा उगम हा मात्र आजोबांच्या कपाटातून व्हायचा. पावसाळ्यात शाळेमधून भिजून घरी आलो की कधीतरी एक दोन झाकणं ब्रँडी मिळायची. शरीरभर हळूहळू पसरत जाणारी ती ऊब मस्त वाटायची. अर्थात मद्याचे हे बाळकडू मला ब्रॅंडीमधूनच मिळाले. खरं तर बाळ-कडू असं म्हणणं म्हणजे ब्रॅंडीवर अन्यायच, कारण मुळात वाईन पासून उगम पावलेली ब्रँडी (म्हणजेच बर्न्ट वाईन) ही चवीला निश्चितच मधुर असते.

सर्व वारुणींमधे सगळ्यात मोठी (?) बहीण म्हणजे वाईन (? कारण वाईन मोठी का बिअर हा एक वादाचा मुद्दा आहे). वाईनप्रेमी सहसा गोष्टीवेल्हाळ असतात असा समज आहे. घोळवून घोळवून किस्से सांगणे, गॉसिपिंग करणेआणि त्याच प्रकारे ग्लासमध्ये घोळवून घोळवून वाईन (रक्तवर्णी) पिणे हे या लोकांचे ठळक वैशिष्ट्य. यामधूनच कदाचित Grapevine (अफवा पसरवणे) हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा.

6b038e74a793e00a939ab74e28c6d2f0

हिची सक्खी धाकटी बहीण (म्हणजेच व्हाईट वाईन) हिच्यासारखीच, पण जरा श्रीमंत घरात दिलेली (गोरी आणि स्टायलिश असल्यामुळे असेल कदाचित). गॉसिपिंग करण्याची आवड असली तरी अंदाज एकदम हटके. घोळवून एखादा किस्सा सांगण्यापेक्षा हलकेच एखादी पुडी सोडून त्यावर सुरु झालेला वादविवाद आणि त्याबरोबर हातातल्या वाईनचा आस्वाद यांना प्रिय.

जिन आणि वोडका या दोन्ही श्वेतवर्णी बहिणींना छानछोकी आणि नवे नवे मेकअप फार प्रिय. या बहिणी क्वचितच कुठे एकट्या जात असाव्यात. कॉकटेल् पार्टीज, मौजमजा आणि गर्दी मध्ये या जास्त रमतात.

Gin and Vodka

"मार्टिनी !!! शेकन, नॉट स्टर्र्ड... " हा सुप्रसिद्ध डायलॉग आपल्या जेम्स बॉण्डचा. त्यामुळेच बॉण्डने ग्लॅमर मिळवून दिलेली (जिन)मार्टिनी पिणारे जरा जास्तच शो-ऑफ करणारे असतात असा समज होऊ शकतो (आणि ते खरेही आहे). प्रत्येक बॉन्डपटात "बॉण्ड गर्ल" बदलते, तेच कशाला खुद्द बॉण्डही काही वर्षात बदलतो. पण मार्टिनी... ती वर्षानुवर्षे आहे तशीच आहे. म्हणूनच ही कॅटेगरी गर्दीत असूनही आपल्याच गुर्मीत राहणारी अशी आहे.

jamos-bond-martini

"रममाण" होणे म्हणजे काय याचा खरा प्रत्यय मला हिमालयात "रम" पितानाच आला. दिवसभराचा हाडं खिळखिळी करणारा प्रवास आणि रात्री तीच खिळखिळी झालेली हाडं गोठवून टाकणारी थंडी, यावर हा एकच "रमबाण" उपाय आहे. कधी सोड्यात, तो नसेल तर थोडं पाणी घालून नाहीतर नुसतीच कोरी रम बेदम झालेल्या गात्रांवर हळुवार फुंकर घालते आणि हळूहळू थोपटत झोपवते. रमचा आस्वाद घ्यायला आजूबाजूला गर्दी लागत नाही. एखादा जिवाभावाचा मित्र असला तर उत्तमच पण नसेल तरीही खुद्द रमदेखील उत्तम सोबत करू शकते.
म्हणूनच कदाचित लष्कराचीही सगळ्यात आवडती, रांगडी अशी रमच. रम प्यावी मर्दांनीच.

narpoo-rum

व्हिस्की ही सगळ्या बहिणींमध्ये जरा अबोल आणि जास्त "म्यॅच्युअर्ड". हिला फार गर्दीही झेपत नाही आणि अगदी एकटेपणाही. अस्सल व्हिस्कीप्रेमी दोन पेग व्हिस्कीबरोबर दोन-तीन तास कुठल्याही विषयावर पण तर्कशुद्ध काथ्याकूट करत सहज घालवतील (मधून मधून डोळे मिटून किंवा "व्वा!!!" एवढंच म्हणून हातातल्या व्हिस्की बद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरणार नाहीत). पिताना अधाशीपणा आणि त्यानंतर येणारा वाचाळपणा हे दोन्ही दुर्गुण यांच्यामध्ये नसतात. यांचा अगदी सहज ओळखू येणारा दुर्गुण एकच. अस्सल व्हिस्कीप्रेमी आणि त्यांचा हा दुर्गुण हुडकून काढायचा असेल तर एखाद्याला तो पीत असताना व्हिस्कीबद्दलच एखादा बाळबोध प्रश्न विचारा. तुम्हाला उत्तराऐवजी नुसता एखादा तुच्छतेचा कटाक्ष मिळाला तर तो अस्सल समजावा.

whisky1

पण जशी गवयांची घराणी असतात तशी व्हिस्किचीही असतात बरं. हिची खरी मुख्य घराणी दोन. एक म्हणजे आद्य असं स्कॉचचं आणि दुसरं स्कॉचव्यतिरिक्त इतर सर्व.

जसा स्कॉटलंड मध्ये जन्माला आलेली स्कॉच व्हिस्की आणि सर्वच बाबतीत अतिशय काटेकोर असलेले गोरे इंग्लिश साहेब यांचा परस्परसंबंध आपल्याला सहज दिसू शकतो तसाच अघळपघळ अमेरिकन्स आणि तिथे जन्माला आलेल्या बरबर्न, टेनेसी किंवा राई व्हिस्की यांच्यातही दिसतो. अमेरिकन व्हिस्की कोक किंवा कॉकटेल काहीही खपवून घेईल पण स्कॉच व्हिस्कीचं सोवळं फार कडक. साधा बर्फाचा खडा जाऊ देत, पाण्याचा थेंबही कधी कधी वर्ज्य असतो.

whisky

वयाने सगळ्यात मोठी पण तरीही सर्वात खेळकर, दिलखुलास आणि बबली अशी बिअर. चीन मधली “मीड” (मधापासून बनवलेली वाईन) ही बिअरपेक्षाही प्राचीन आहे असा दावा मला त्या मीड इतकाच बिनबुडाचा (किंवा बिन-बुडबड्याचा म्हणा हवं तर) वाटतो.

पाणी आणि चहा नंतर जगात सर्वाधिक प्रिय असे पेय म्हणजे बिअर. बिअरचा जसा हा मित्रपरिवार मोठा तसाच बिअर पिणाऱ्यांचाही.

बाटलीबंद बिअर गप्प असते पण एकदा बूच उघडले की बराच वेळ एका लयीत संथपणे पृष्ठभागावर बुडबुडे येत राहतात. बिअर पिणाऱ्यांचाही तसंच. बार काउंटरवर बिअरच्या नळापाशी बसलेला एखादा, बिअरचे दोन-चार घोट घशाखाली घातल्यावर शेजारच्या अनोळखी व्यक्तिबरोबरही तासभर मनमोकळ्या गप्पा मारू शकतो.

beer

बिअरचा हिशोब असतो लिटर मध्ये. झाकण, लहानसहान ग्लास किंवा मिलिलिटरअसली संकुचित मापं आणि तशीच मनोवृत्ति बिअरला आणि बिअर पिणाऱ्यांना अजिबात मानवत नाही.

"अन्न हे पूर्णब्रह्म" हे आपल्या सर्वांना लहानपणापासून ज्ञात आहे. पण सुमेरियन काळात कामगारांना रोजची मजुरी ही "बिअर हे पूर्ण अन्न" म्हणून पुरवली जाई याची किती जणांना कल्पना असेल ?

इतका पुरातन सांस्कृतिक वारसा असलेल्या बिअरला "अपेय" आणि तो जपणाऱ्यांना "दारुडा" म्हणणे म्हणजे शुद्ध कृतघ्नपणाच.

व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीला धरून प्रत्येक प्रकृतीला मानवेल अशी वारुणी नक्कीच आज जगात असेल. उदाहरणच घ्यायची झालीत तर धसमुसळ्या लोकांसाठी टकीला, जेवण झाल्यावर फक्त स्वीट डिश म्हणून पिणाऱ्यांसाठी मालिबू किंवा बडीशेपेऐवजी पास्तिस. नेहमीच्या आहारात लागणारी आणि म्हणूनच घरच्या घरी बनवली जाणारी हिमाचल मधली "लुगडी" किंवा नेपाळ मधली "छांग", तिबेटसारख्या अतिथंड प्रदेशात आधार देणारी आणि तिथल्या लोकांसारखीच उबदार अशी "तोंगबा", युरोपिअन स्टाईलला साजेशी अशी असंख्य लिक्योर्स. जपानी खाद्य-संस्कृतीशी जुळवून घेणारी अतिशय साधी अशी साके आणि अशा कितीतरी.

आपल्याकडे मात्र देवांचे पेय म्हणून समजली जाणारी ही सुरा, असुरासारखी पितात . फक्त "टाईट" होण्यासाठी पिण्याची आपली प्रकृती म्हणूनच पूर्वीपासून वाईट ठरत आली आहे. आपल्या खाद्य-संस्कृतीएवढीच मद्यसंस्कृतीही कधीतरी प्रगल्भ होईल अशी आशा करणे आणि वाट बघणे तेवढेच ते काय सध्या शक्य आहे.

सर्व चित्रे आंतरजालावरून साभार......

इतिहासविनोदसाहित्यिकप्रकटनलेख

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

8 Dec 2018 - 6:58 am | सोत्रि
  • झक्कास
  • कडक

ग्लासातल्या बर्फाच्या खड्यावरून ओघळत जाणाऱया स्काॅचसारखाच ओघवता लेख!

- (साकिया) सोकाजी

किल्लेदार's picture

8 Dec 2018 - 7:25 am | किल्लेदार

☺️

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2018 - 9:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखाला चार चांद लागले, बस संपलं.
लेखाचा आस्वाद घेण्यात येईल.

धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 11:36 am | किल्लेदार

धन्यवाद!!!

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 1:05 pm | किल्लेदार

या लेखाच्या प्रतिसादांमध्ये तुमची मद्यगुरु म्हणून ओळख झाली आणि तुमचे मागचे लेख वाचले. वाचताना वाटलं की आपल्या मेंदूचा कुठला तरी कम्पोनन्ट एकाच मेक चा असावा. कारण बऱ्याच ठिकाणी तेच शब्द आणि त्याच कल्पना. व्वा !!! शास्त्रोक्त माहिती असणारे आणि रसिकतेने पिणारे फारच कमी लोक मला भेटले आहेत.
पण तुमचा "दारू म्हणजे काय रे भाऊ" हा लेख वाचला आणि प्रतिसादांमध्ये उडालेल्या चकमकी पाहून पोटात गेलेली दोन पेग चांगली व्हिस्की उतरली. त्यामुळे माझा बिअरवरचा लेख लिहावा की नाही याबद्दल आता संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचवेळी तुम्ही बिअरला दारू म्हणणे म्हणजे ताकाला मठ्ठा म्हंणण्यासारखे आहे असे विधान केल्यामुळे तो लेख लिहिणे अनिवार्य आहे असेही एका बाजूने वाटते.

हा लेख वाचताना ह्याच भावना होत्या :)

https://www.misalpav.com/node/20712 गाथा बीयरची इथे आहे!

- (साकिया) सोकाजी

पैलवान's picture

8 Dec 2018 - 8:09 am | पैलवान

वाक्या वाक्याला सोकाजीरावांची आठवण आली. आणि पहिला प्रतिसाद तोही कौतुकाचा, स्वये सोकाजींचा!!
हाच तो दुग्धशर्करा (किंवा फॉर दॅट मॅटर, स्कॉच-बर्फ) योग!!

बाकी स्वतः पीत नसलो तरी मद्याचं आणि ते कौतुकाने आणि शालीनतेने पिणाऱ्यांचं मला लै कौतुक आहे.

-चखनेश्वर पैलवान

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 11:36 am | किल्लेदार

धन्यवाद!!!

ज्योति अळवणी's picture

8 Dec 2018 - 8:33 am | ज्योति अळवणी

अप्रतिम लेख. मजा आली वाचताना. धुंद होण्याचे वेगवेगळे प्रकारही त्यानिमित्ताने कळले

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 11:41 am | किल्लेदार

आवडते खाणे आणि पिणे या दोन्हीत धुंदी आहे. "नशा" ही बायप्रॉडक्ट आहे.

उगा काहितरीच's picture

8 Dec 2018 - 9:35 am | उगा काहितरीच

वा ! मस्त लिहीलंय !! वर पैलवान बोलले तसं सोकाजीची आठवण येत होती वाचताना थोडा लेख वाचल्यावर एकदा वर जाऊन बघितलं की लेखक सोकाजी आहे का ते ;-) . आपल्याकडे मद्य संस्कृती लवकर रुजावी व सभ्य पणे पिणा-याला सरसगटपणे बेवडा म्हणून हिणवण्यात येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

आमेन!

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 11:41 am | किल्लेदार

:)

मित्रहो's picture

8 Dec 2018 - 11:01 am | मित्रहो

असे काही लिखाण आले की वाचनाची रंगत वाढते. मागे वाचले होते अाचर्य अत्रेंनी एकच प्याला नावाचे नाटक लिहिले होते. त्यात गडकरींनी एकाच प्याल्यावरुन जे वादळ उठते असे लिहिले होते त्यावर टिका होती आणि एकच प्यालामुळे येवढ काही घडत नाही असे काही होते. लेख वाचल्यावर त्याची आठवण झाली. ह्रुषिकेश जोशीचे वाचन देखील आठवले की मद्य प्यायचे नाही हे सांगण्यापेक्षा ते प्रमाणात कसे प्यायचे हे शिकवायला हवे.
वेगवेगळ्यात तऱ्हा आवडल्या. घोळून घोळून वाइन पिणारे विदेशी खूप बघितले मला कधीच कळले नाही हे असे का घोळतात ते. त्या बाँडला जाउ द्या पण मार्टिनीची चव लय भारी. तिच गोष्ट मार्गारिटाची. माझा एक बॉस रमला ट्रक ड्रायव्हरचे ड्रिंक म्हणायचा तेही आठवले. एकच प्याला आणि अनंत आठवणी याचे फार जवळचे नाते आहे. पितानाही आठवणी येतात आणि तीच चर्चा मग एक छान आठवण म्हणून राहते.

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 11:37 am | किल्लेदार

धन्यवाद!!!

श्वेता२४'s picture

8 Dec 2018 - 11:14 am | श्वेता२४

या निमित्ताने वेगवेगळ्या "प्याल्यांची" ओळख झाली.

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 11:39 am | किल्लेदार

:) :) :)

बेसिक प्रश्न असा की भारतातच अतिमद्यपान हा अवगुण फारच जास्त आहे आणि युरोप अथवा अमेरिकेत अतिमद्यपी अतिशयच कमी प्रमाणात आहेत ही समजूत कितपत खरी आहे? तिथेही अल्कोहॉलिझम भरपूर आहे आणि युरोपात तर खूपच जास्त संख्येने लोकांना मद्याशी संबंधित प्रॉब्लेम्स आहेत असं कुठेतरी पूर्वी वाचलं आहे.

दुसरं म्हणजे "प्रमाणात कसं प्यायचं" हे असं सोबत बसून शिकवता येत असल्यास ते कितपत टिकाऊ ज्ञान असतं? जे वाचलं ऐकलं आहे त्यानुसार मद्यासक्ती हे बऱ्याच प्रमाणात जनुकीय आणि व्यक्तीच्या शारीरिक रचनेत दडलेलं कॉम्प्लिकेशन आहे. नुसतं शिकून समजून घेऊन वर्षानुवर्षे मर्यादित राहता येत असेल का सर्वांना?

म्हणजे असं की खरंच आयुष्यभर मर्यादेत प्रमाण असलेले लोक पुष्कळ असू शकतात, पण त्यात नुसती शिकवण, संयम, सेल्फकंट्रोल, समजूतदारपणा हा कितपत सहभागी फॅक्टर असतो आणि सुदैवाने आसक्तीची , थांबू न शकण्याची जनुकीय, जैवरासायनिक, आनुवंशिक टेंडन्सी "नसणे" आणि त्यामुळे मर्यादा राहणं शक्य होणे हा भाग कितपत कारणीभूत असतो हे ठरवणं कठीण आहे.

जगात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ज्याच्या त्याला ठरवाव्या लागतात. आपली सद्सदविकेकबुद्धी जागृत ठेवली म्हणजे झालं!

सुबोध खरे's picture

11 Dec 2018 - 12:03 pm | सुबोध खरे

१) https://www.who.int/gho/substance_abuse/burden/alcohol_prevalence/en/
http://gamapserver.who.int/gho/interactive_charts/substance_abuse/bod_al...
जगभरात मद्यपान संबंधित प्रश्नाचा जागतिक आरोग्य संघटनेचा आलेख दाखवला आहे.
त्यात अर्थात युरोपात मद्यपानामुळे निर्माण होणारी समस्या अर्थात जास्त प्रमाणात आहे असे दिसते आहे.त्यातही पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधील देशात हे प्रमाण बरेच जास्त आहे.

२) अतिमद्यपान किंवा मद्याच्या आहारी जाणे (हा आजार आहे) आणि दारू पिऊन तमाशा करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत.
सुसंस्कृत देशात मद्यप्राशनाला कोणी नावे ठेवत नाही उलट पाहुण्यांना आनंदापुरते "माफक" मद्य देणे हा संस्कृतीचा भाग आहे
पण दारू पिऊन तमाशा केल्यास त्या देशात अतिशय बदनामी होते आणि दारू पिऊन तमाशा करणे याचे उदात्तीकरण अजिबात केले जात नाही.
याउलट भारतात दारू पिऊन तमाशा करणारे लोक त्याबद्दल शरम वाटण्याऐवजी त्याचा बोलबाला करताना आढळतात. शिवाय मद्य पिणार्यांना "मर्द" म्हणणे आणि ते ना पिणार्यांना "हिणवणे" असले भंपक प्रकार भारतातच आढळतात.
मद्य पिणे किंवा न पिणे हा त्या माणसाच्या निवडीचा/ पसंतीचा हक्क (choice) आहे हेच आपल्याकडे मान्य केले जात नाही.

यामुळे मद्यपानातील शालीनता आणि रुची जाऊन त्याचे बाजारीकरण झाल्याचे आढळते.

प्रत्येक वेळेस शुक्रवार/शनिवार आला कि कुठे बसायचे असाच विचार ज्याच्या मनात येत असेल असा माणूस मद्याच्या आहारी जाण्याची शक्यता बरीच जास्त असते.
एखाद्यास मद्य प्यायचे नसेल तर त्याला हिणवले जाते आणि त्याला प्रतिकार म्हणून माणूस "दारुडा" आहे म्हणून त्याची बदनामी करणे हे दोन्ही टोकाचे प्रकार आढळतात.

३) जेंव्हा मद्यप्राशनाचे उदात्तीकरण आणि बाजारीकरण हे दोन्ही थांबवले तर त्याकडे एक निखळ आनंद देणारा उपचार म्हणून पाहता येईल.

४) लष्करात पार्टी मध्ये दारू पिऊन एखादा अधिकारी झिंगला तर दुसऱ्या दिवशी त्याला सौम्यआणि प्रकार परत झाला तर कडक शब्दात समज दिली जाते. यानंतर त्याच्या मद्यावर नियंत्रण आणले जाते आणि तरीही तो सुधारला नाही तर पार्टीत त्याला मद्य दिले जात नाही.
अशा चाली रितीमुळे लष्करातील माणसे नागरी जीवनापेक्षा जास्त वेळेस/ प्रमाणात मद्य घेत असली तरी सहसा मद्य पिऊन झिंगून पडलेली आढळत नाहीत.

५) माणसाचे विमान हवेत तरंगू लागल्यावर त्याने मद्य पिणे थांबवले पाहिजे कारण पोटात असलेले मद्य पुढे शोषले जाऊन रक्तातील पातळी वाढू लागते अशा वेळेस थांबले नाही तर हि पातळी मर्यादेच्या बाहेर जाऊन माणसाचा तोल जाऊ शकतो. शिवाय रिकाम्या पोटी मद्य घेतले तर ते पटकन रक्तात शोषले जाऊन डोक्यात चढते. यासाठी मद्य घेताना थोडे फार तरी खाल्ले पाहिजे अन्यथा फार लवकर "वकार युनूस" होण्याची शक्यता असते.

६) आपल्या यकृतात मद्याचे विघटन होत असते. हि प्रक्रिया ज्याची जास्त तीव्रतेने होते त्याला मद्य चढत नाही. आणि ज्याच्या यकृतात हि प्रक्रिया मंदगतीने होते त्याच्या रक्तात मद्याची पातळी पटकन वाढते. अशा माणसांनी सावकाश मद्य प्राशन करायला शिकले पाहिजे.
स्त्रियांच्या बाबतीत यकृतात हि प्रक्रिया मंदगतीने होते शिवाय त्यांचा मेंदू जास्त संवेदनशील असल्याने रक्तात मद्याची मात्रा कमी असताना सुद्धा नशा येते आणि स्वतःवरील नियंत्रण पटकन जाते. या दोन्ही कारणासाठी जगभरातील सर्व संस्कृती मध्ये स्त्रियांनी अनोळखी ठिकाणी मद्य घेऊ नये आणि परिचित सुरक्षित ठिकाणी कमी प्रमाणात आणि सावकाश मद्य प्राशन करावे असाच सल्ला दिला जातो.
७) हि प्रक्रिया तीव्र/ मंदगतीने होणे हि गोष्ट आनुवंशिक आणि जनुकीय आहे. त्यावर माणसाचे नियंत्रण नाही परंतु आपल्या हातातील प्याला कसा रिचवायचा/ रिकामा करायचा हे तर हातात असते. पार्टीत फुकट मिळते आहे किंवा दुसरा पैसे देतो आहे किंवा आज मी पैसे दिले उद्या तू देणार म्हणून उद्या मी दाबून पिईन अशा मनोवृत्तीच्या लोकांबद्दल काय बोलणार?

हा विषय गहन आहे यामुळे मूळ विषयाला बाधा येऊ नये यासाठी इथेच थांबतो.

मद्यप्राशन करणे/ न करणे हा आपला चॉईस असला पाहिजे. पार्टीत प्यायला लागते म्हणून पिणे( किंवा तसे समर्थन करणे) किंवा आतून वाटतंय पण "लोक काय म्हणतील" म्हणून न पिणे हे दोन्ही "माझ्या दृष्टीने" चूक आहे.

किल्लेदार's picture

12 Dec 2018 - 5:03 pm | किल्लेदार

"हॉबी"चुअल ड्रिंकर असावं पण हॅबीचुअल नसावं....

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2018 - 11:47 am | डॉ सुहास म्हात्रे

नशिले, तरल, ओघवते, जीवाभावाने लिहिलेले मद्यकाव्य आवडले ! चिअर्स !

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 11:35 am | किल्लेदार

तुम्हाला "काव्यात्मक" वाटले यातच भरून पावलो !!!

अप्रतिम जमलंय 'माझे मद्यजीवन'. पिण्यातील रसिकतेची वाचताना जागोजागी अनुभव आला.

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 11:39 am | किल्लेदार

धन्यवाद!!!

वरुण मोहिते's picture

8 Dec 2018 - 3:34 pm | वरुण मोहिते
किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 11:42 am | किल्लेदार

धन्यवाद!!!

सोप्या सहज लेखाला फार गंभीर/कडक/कोरडे प्रतिसाद वाचून विचित्र वाटतय.
दारु पिणे मर्दाची लक्षणं हा विचार काहींनी फारच मनावर घेतलेला असतो.

इतर कोणाचे तसे नाहीयेत.

मी लेखातल्याच खालील मजकुरावरून ते म्हटलं / विचारलं.

आपल्याकडे मात्र देवांचे पेय म्हणून समजली जाणारी ही सुरा, असुरासारखी पितात . फक्त "टाईट" होण्यासाठी पिण्याची आपली प्रकृती म्हणूनच पूर्वीपासून वाईट ठरत आली आहे. आपल्या खाद्य-संस्कृतीएवढीच मद्यसंस्कृतीही कधीतरी प्रगल्भ होईल अशी आशा करणे आणि वाट बघणे तेवढेच ते काय सध्या शक्य आहे.

आणि प्रतिसादात एके ठिकाणी

की मद्य प्यायचे नाही हे सांगण्यापेक्षा ते प्रमाणात कसे प्यायचे हे शिकवायला हवे.

यावरुनही

असो.

माझा प्रतिसाद मागे घेतो॥ तुम्ही काही मजेदार लिहिणार या अपेक्षेत होतो, म्हणजे आहेच॥
बाकी आम्हा पामरांना यातले काय कळणार?

"मद्यसंस्कृतीही कधीतरी प्रगल्भ होईल अशी आशा करणे" या वाक्यात जबाबदारीने आणि आस्वाद घेत पिणे हेच अध्यारूत आहे.

पद्मावति's picture

8 Dec 2018 - 8:37 pm | पद्मावति

मस्तच. लेख आवडला.

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 11:43 am | किल्लेदार

धन्यवाद!!!

अभ्या..'s picture

8 Dec 2018 - 9:06 pm | अभ्या..

नुसतीच कोरी रम बेदम झालेल्या गात्रांवर हळुवार फुंकर घालते आणि हळूहळू थोपटत झोपवते. रमचा आस्वाद घ्यायला आजूबाजूला गर्दी लागत नाही. एखादा जिवाभावाचा मित्र असला तर उत्तमच पण नसेल तरीही खुद्द रमदेखील उत्तम सोबत करू शकते.
म्हणूनच कदाचित लष्कराचीही सगळ्यात आवडती, रांगडी अशी रमच. रम प्यावी मर्दांनीच.

अहाहाहा, जिओ किल्लेदार,
जुन्या आठवणी जागवल्या की तुम्ही.

रम म्हणजे रम म्हणजे रमच असते
तुमची आणि आमची सेमच असते....
आणि त्यातही बुढ्या बाबाची रम ही अमृतासमअसते

लेख वाचताना मद्यगुरु सोकाजीची आठवण आली होती, त्यांचा पहिला प्रतिसाद पाहुनही बरे वाटले

पैजारबुवा,

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 11:43 am | किल्लेदार

:) :) :)

हिमालयात पोचलात की रमच्या ग्लासात ? ;)

हिमालयात पोचलात की रमच्या ग्लासात ?

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2018 - 7:00 pm | टवाळ कार्टा

जुन्या आठवणी म्हणजे? आता मिळत नाही का?

पिंगू's picture

9 Dec 2018 - 3:06 pm | पिंगू

प्याला जबरदस्त आहे..

किल्लेदार's picture

11 Dec 2018 - 6:07 am | किल्लेदार

☺️

अनन्त्_यात्री's picture

9 Dec 2018 - 3:31 pm | अनन्त्_यात्री

केशवसुतांची कविता आठवली:

काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या !

अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हास मद्यपी, पर्वा कसली मग याची !
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने !
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी;
परिसुनी त्यांचे शब्द, रूढीचे दास झणी ते खवळू द्या!
काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हाला !
औचित्याच्या फोल विवेका! जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरि जाऊ,
उडुरत्ने ती गरिब धरेला तेथुनि फेकुनिया देऊ !
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी !
देवदानवा नरे निर्मीले, हे मत लोकां कळवू द्या !
काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

पद्यपंक्तीची तरफ आमुच्या करी विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरि जग उलथुन या देउ कसे !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करू पहा तुकडे तुकडे !
‘महादेव ! हरहर !’ समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी- “निजती ते ठारचि मरती!”
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा ‘उदयोsस्तु’ करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तिमित जगाला ढवळू द्या!
काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

—केशवसुत

किल्लेदार's picture

11 Dec 2018 - 6:06 am | किल्लेदार

केशवसुतांनी बिअर वर केली असावी कविता ☺️

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Dec 2018 - 8:52 pm | अनिरुद्ध.वैद्य

अनाहूतपणे विकांताच्या अंती रमरंगी असता इतका सुंदर लेख वाचण्यात आला...

मस्त लिहिलाय बुवा(Y)

चिअर्स!

किल्लेदार's picture

9 Dec 2018 - 9:37 pm | किल्लेदार

☺️

अनिंद्य's picture

10 Dec 2018 - 12:00 pm | अनिंद्य

@ किल्लेदार,

शानदार-जानदार लेख !

खुश्क बातों में कहां ऐ शेख कैफ-ए-जिन्दगी,
वो तो पीकर ही मिलेगा जो मजा पीने में है

चियर्स !

किल्लेदार's picture

11 Dec 2018 - 6:07 am | किल्लेदार

☺️

किसन शिंदे's picture

10 Dec 2018 - 2:57 pm | किसन शिंदे

व्वा! मदिरेचे वेगवेगळे रंग आणि ती घेण्यार्‍याच्या वेगवेगळ्या तर्‍हा यावर मस्त लेख झाला आहे.

किल्लेदार's picture

11 Dec 2018 - 6:08 am | किल्लेदार

☺️

रोमन रेन्स's picture

10 Dec 2018 - 4:54 pm | रोमन रेन्स

मस्त झाला आहे लेख ...

किल्लेदार's picture

11 Dec 2018 - 6:08 am | किल्लेदार

☺️

टर्मीनेटर's picture

10 Dec 2018 - 8:32 pm | टर्मीनेटर

झकास लेख...मजा आली वाचायला.

किल्लेदार's picture

11 Dec 2018 - 6:08 am | किल्लेदार

☺️

आशुतोष-म्हैसेकर's picture

11 Dec 2018 - 1:50 am | आशुतोष-म्हैसेकर

लेख एकदम झक्कास झाला आहे, मला तुमची खुशखुशीत विनोदी शैली आवडते, आजीबाईचा बटवा आणि आजोबांचं कपाट ही तुलना आवडली, एकदम फक्कड बेत जमवला आहे, आम्ही घेत नाही पण आज तुमच्या मुले हे सगळे गुण कळाले

किल्लेदार's picture

11 Dec 2018 - 6:11 am | किल्लेदार
किल्लेदार's picture

11 Dec 2018 - 6:13 am | किल्लेदार
किल्लेदार's picture

11 Dec 2018 - 7:59 am | किल्लेदार
किल्लेदार's picture

11 Dec 2018 - 9:27 am | किल्लेदार

न पिणाऱ्यांनाही सम"रस" होता यावे म्हणून छोटासा प्रयत्न ;)

निओ's picture

12 Dec 2018 - 12:49 pm | निओ

भारी व्यासंग तुमचा किल्लेदार साहेब :)
आवडता विषय नी खुमासदार लेखन शैली. झकास झालाय लेख.

किल्लेदार's picture

12 Dec 2018 - 5:05 pm | किल्लेदार

:)