१२: मानवत- परभणी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ५: अंबड- औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना - सिंदखेडराजा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ९: सिंदखेडराजा- मेहकर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १०: मेहकर- मंठा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ११: मंठा- मानवत
योग- सायकल प्रवासाचा शेवटचा दिवस- २१ मेची पहाट. आज हा प्रवास संपेल. माझ्यासाठी हा सर्व प्रवास आणि सर्व टप्पे खूप विशेष आहेत. मला खूप काही शिकायला मिळालं. अनेकांना आणि अनेक साधकांना भेटलो. अगदी अविस्मरणीय असा हा प्रवास झाला. त्याविषयी पुढच्या लेखामध्ये सविस्तर बोलेन. आत्ता ह्या प्रवासातल्या सायकलिंगच्या शेवटच्या टप्प्याविषयी बोलतो. मानवत- परभणी अंतर थोडंच असल्यामुळे वाटेतल्या रूढी गावातल्या योग वर्गाला भेट देता आली. श्री. पद्मकुमार कहेकर माझ्यासोबत मानवतपासून इथपर्यंत आले. रूढी गावात स्वामी मनिषानंदांचा आश्रम आहे आणि इथे मिटकरी सर योग वर्ग घेतात. काल संध्याकाळी मिटकरी सर भेटले होतेच. सकाळी सहा वाजता ह्या वर्गावर पोहचलो. पंचवीस- तीस मुलं योग करत आहेत. त्यांच्याशी थोडं बोललो. आश्रमात स्वामीजींना भेटलो. त्यांचा आशीर्वाद मिळाला. हेही ह्या प्रवासामध्ये विशेष होतं. अनेक प्रकारचे एनर्जी फिल्डस आणि डॉ. प्रशांत पटेल अर्थात् स्वामी प्रशांतानंद अशा दिग्गज साधकांचा सत्संगही मिळाला.
मनामध्ये एक प्रकारे परभणीला पोहचण्याचं डेस्परेशन आहे. पण त्याबरोबरच हा प्रवास लवकर संपू नये, असंही वाटतंय. सायकल चालवताना ह्या प्रवासातले अनुभव, अनेक भेटलेले लोक व सगळे साधक ह्यांच्या आठवणी मनात आहेत. एका अर्थाने ह्या प्रवासाचं लेखनही मनात सुरू झालंच आहे. त्यासह माझ्या सायकलीबद्दल अतिशय कृतज्ञता वाटते आहे. काही रस्ते फार भयाण होते, तिथे भले सायकलीचं टायर आउट झालं असेल (रिममधून आउट निघालं म्हणतात ते), पण सायकल मात्र शेवटपर्यंत नॉट आउट राहिली. असो, अजून थोडे किलोमीटर आहेत. पण ह्या प्रवासाविषयी विचार करता करता अंतर सहज पार झालं. एका बाजूला अजून विश्वास बसत नाहीय की, मी हे सर्व टप्पे व हा प्रवास फक्त सायकलीवर केला आहे आणि योजनेनुसारच हा प्रवास पूर्ण झाला आहे!
परभणीमध्ये कदाचित निरामय टिम मला रिसीव्ह करायला येणार आहे. पण त्या जागी पोहचलो, तेव्हा कोणी दिसले नाहीत. म्हणून सरळ निरामयच्या कार्यालयाकडे निघालो. निरामय टीमचा एक योग वर्ग सुरू आहे, कदाचित सगळे तिकडे व्यस्त असतील. मला रिसीव्ह करायला आलेली माझी बहिण अदिती व वहिनी दिसल्या. त्यांच्यासोबतच मग निरामय कार्यालयात पोहचलो. पहिले सायकलीला वंदन केलं आणि सर्वांना प्रवास संपला हे कळवलं. आज ३८ किमी चालवले व एकूण सुमारे ५९५ किमी झाले. तेवढ्यात निरामयच्या श्री. पाथ्रीकर सरांचा फोन आला की ते लोक रस्त्यावर माझी वाट बघत आहेत. मी निरामयमध्ये पोहचलो, हे त्यांना सांगितलं, मग तेही इकडे आले. निरामय टीमनेही एकदा स्वागत केलं आणि योग- प्रवास पूर्ण झाला.
स्वागत
सायकल प्रवास पूर्ण झाला आहे, पण त्या संदर्भात काही कामं बाकी आहेत. परभणीच्या योग- साधकांसोबत चर्चा करायची आहे. त्याशिवाय माझे अनुभव आणि सर्व ठिकाणी झालेल्या चर्चांची माहिती निरामयच्या टीमला द्यायची आहे. मला ह्या प्रवासात खूप काही मिळालं तसं अनेक गोष्टी बघता आल्या. अनेक साधकांकडून मला प्रेरणा मिळाली. हे सगळं निरामय टीमसोबत शेअर करायचं आहे आणि त्याविषयी आता लिहायचं आहे. त्या दिवशी काही कारणामुळे परभणीतल्या योग- साधकांसोबत चर्चा झाली नाही.
प्रवास संपल्यावरही अनेक दिवस मला ह्या प्रवासाचं स्वप्नं पडत आहे. स्वप्नात दिसतं की, मी पहाटे उठून जाणार आहे, अनेक लोकांना भेटणार आहे! इतक्या दिवसांचा मनाहा जो पॅटर्न- मनाची जी धारणा बनली होती; ती पुढेही काही दिवस टिकली. हळु हळु मन ह्या प्रवासाच्या पॅटर्नमधून बाहेर आलं. पण जो प्रवास घडला, त्याबद्दल खूप आश्चर्य वाटतं! सायकलीला तर खरोखर सॅल्यूट! सायकलीने मला पूर्ण साथ दिली! अगदी योजनेनुसार सर्व प्रवास झाला. कुठेही सायकलिंगमध्ये फार अडचण आली नाही. नंतर लवकरच मी माझे अनुभव निरामय टीमसमोर मांडले. परभणीतले योग- साधक आणि निरामय टीमसोबत अनेक चर्चा झाल्या. त्याबद्दल व ह्या पूर्ण प्रवासातल्या मुख्य अनुभवांबद्दल पुढच्या व शेवटच्या लेखामध्ये बोलतो.
आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.
निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- ही आहे. त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!
पुढचा भाग: समारोप (अंतिम)
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
28 Jun 2018 - 4:46 pm | एस
वाचतोय. सांगता झाली सायकल प्रवासाची. तुमच्या सायकलीला सलाम. इतक्या खडतर प्रवासात पंक्चर झाली नाही म्हणजे विशेष आहे!
29 Jun 2018 - 1:03 am | निशाचर
जवळजवळ सहाशे किलोमीटरचा प्रवास काही उद्दिष्ट ठेऊन सायकलने करायचं योजून तो योजनेनुसार पूर्ण करणे, हे खरोखरच खूप विशेष आहे!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
29 Jun 2018 - 11:32 am | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत प्रेरणादायक लेखमाला.
तुमचे सर्वच प्रकल्प फार वेगळे आणि स्पृहणिय असतात. ते करण्यात दाखविलेल्या आत्मियतेचे आणी धडाडीचे नेहमीच कौतूक वाटत आले आहे.
यापुढेही असेच इथे लिहून तुमच्या नवीन कामांची माहिती देत रहावे.
30 Jun 2018 - 1:38 pm | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!
धन्यवाद @ डॉ सुहास म्हात्रे सर! आपण सर्वांची प्रेरणा असतेच! खरंच धन्यवाद.