चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
7 May 2018 - 6:37 am

चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
( एका थोर व्यंगचित्रकाराने म्हणजे बाळासाहेब ठाकरे ह्यांनी चार्लीचे काढलेले व्यंगचित्र )

नुकत्याच संपलेल्या साली म्हणजे २० डिसेंबर २०१७ रोजी पु लं च्या घरी चोरी झाल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि अगदी सहजच पु लं ज्याचे निस्सीम चाहते त्या चार्ली चॅप्लिनच्या घराच्या चोरीची कथा आठवली. ही चोरी त्याच्या घराची किंवा घरातल्या कोणत्याही मौल्यवान चीजवस्तूची नसून प्रत्यक्ष चॅप्लिनच्या मृतदेहाची होती.
पु लं च्या घरी काही मौल्यवान चीजवस्तू मिळेल ह्या आशेने चोरी करणारे ( हा असला दुसरा प्रयत्न आहे म्हणे) पु ल नीच म्हटल्याप्रमाणे एखाद्या बँकेवर धाडशी दरोडा घालून पट्टेवाल्याची फक्त टोपी चोरणाऱ्याच्या वंशाचे असणार .... पुलंचा मौल्यावान खजिना तर सगळ्याना खुला आहे, त्याची चोरी होऊ शकत नाही ... असो चार्लीच्या शवाच्या चोरीबद्दल मात्र पुढे सांगेन ...
नुकताच २५ डिसेंबर म्हणजे नाताळ झाला. येशू जन्म ,सांताक्लोज असल्या नेहमीच्याच लोकांपेक्षा ह्यादिवशीची थोडी वेगळी आठवण जर सांगायची म्हटले तर आजपासून बरोब्बर ४० वर्षापूर्वी सगळ्या जगाला हसवणारा आणि हसवत हसवता गहिवर आणणारा मूकपटांचा अनभिषिक्त बादशहा चार्ली चॅप्लिन हा काळाच्या पडद्या आड गेला.एकशे तीन वर्षांपूर्वी म्हणजे १९१४ साली त्याचा पहिला चित्रपट पडद्यावर आला होता "Making a Living नावाचा तर १९६७ साली म्हणजे ५० वर्षापूर्वी त्याचा शेवटचा चित्रपट आला होता A Countess from Hong Kong. त्याने एकूण ८२ चित्रपट बनवले ज्यातले बहुतेक म्हणजे ७७ मूकपट होते तर ५ बोलपट होते. बहुतेक असे म्हटले कारण त्याच्या अनेक मुकापटाना नंतर संगीत दिले गेले होते.तर शेवटचा A Countess from Hong Kong हा अपवाद सोडला तर हे सगळे चित्रपट कृष्ण धवल ३५ मिमी फिल्म वर शूट केलेले होते. त्याचे The Kid (1921), City Lights(1931), Modern Times(1936), The great Dictator(1940) Limelight (1952) हे चित्रपट मास्टरपीस मानले जातात. आजदेखील चार्लीचे चित्रपट कुठल्या न कुठल्या वाहिनीवर दाखवले जात असतातच.बघता बघता ४० वर्षे झाली त्याला जाऊन आणि ५० वर्षे शेवटचा चित्रपट बनवून, काळ किती भराभर पुढे जातो पण अर्धशतक होऊन गेले तरी ज्याची लोकमानसावरची मोहिनी यात्किंचीतही कमी झाली नाही अशा दुर्मिळ लोकांपैकी एक चार्ली चॅप्लिन
चार्ली कोणाला माहित नसेल?तो कुणाला माहिती नाही असे होणे शक्यच नाही आणि आवडत नाही असे तर अजिबातच शक्य नाही. माझ्या ७ वर्षाच्या मुलीला अन तिच्या कंपूला देखील तो आजही माहिती आहे, नव्हे तो त्यांचा आवडता आहे आणि त्याचे बरेच चित्रपट तिने मला विकत घ्यायला लावलेत. शिवाय हल्ली सुरु झालेली कार्टून वरची सिरीयल आहेच – ती मात्र रटाळ आहे. असो... नुकतीच एक बी बी सी ने बनवलेली चार्ली चॅप्लिन वरची चांगली दीड तासाची डॉक्युमेंटरी डाऊन लोड करून पहिली आणि थोडा धक्काच बसला. त्या डॉक्युमेंटरी प्रमाणे चार्ली हा हॉलीवूडचा पहिला अंतरार्ष्ट्रीय ख्याती पावलेला इसम.त्याच्या काळात चार्ली चॅप्लिन हा जगातला सर्वात लोकप्रिय इसम होता. इतका की लेनिनने असं एकदा म्हटले होते म्हणे की हा (चॅप्लिन) असा एकच माणूस आहे की मला त्याला जाऊन भेटायची इच्छा आहे. चॅप्लिनची उंची इतकी की चर्चिल आपल्या चार्त्वेल इथल्या राजघरात त्यांला राहायला बोलावत असे. बर्नार्ड शॉ, केन्स, एच जी वेल्स.. असे अनेक नामवंत लोक चार्लीचे चाहते होते. याचा चॅप्लिन यालाही अभिमान होता. अगदी गर्व वाटावा इतका होता. त्याचमुळे तो एकदा म्हणाला होता जगात ज्या प्रदेशात लोकांना येशू ख्रिस्तही माहीत नाही, त्या प्रदेशातल्या लोकांना ही मी ठाऊक आहे.(आणि ही वस्तुस्थिती होती.)
तर ही डॉक्युमेंटरी पाहून मला जाणवले कि कलाकार, त्याची कला, कर्तृत्व, दानत, त्याची जनमानसातली प्रतिमा त्याचे सामाजिक व्यक्तिमत्व आणि त्यामागचा माणूस, इत्यादींच आणि त्याचं व्यक्तिगत आयुष्य ह्यांचा आपण जर अन्योन्य संबंध शोधू गेलो तर दारुण अपेक्षाभंग होऊ शकतो. चार्लीसारख्या कलाकाराच्या बाबतीत तर या अपेक्षाभंगाच्या वेदना अधिक तीव्र असू शकतात.

मोठ मोठ्या साहित्यिकांचे जसे मानसपुत्र असतात किंवा असत आणि ते इतके प्रसिद्ध असत कि त्या साहित्यिकांचे नाव घेतले कि ते मानस्पुत्रच समोर येतात उदा भा रा भागवत आणि फास्टर फेणे , ना धो ताम्हणकर आणि गोट्या किंवा आर्थर कॉनन डायल आणि शेरलॉक, तसाच चारली आणि त्याचा जगप्रसिद्ध लिटल ट्रम्प. चारली म्हटले कि हा काहीसा भोळा वेन्धळा, गरीब, धडपड्या पण प्रामाणिक आणि सत्प्रवृत्त लिटल ट्रम्प डोळ्यासमोर येतो. मुळातला चार्ली कितीही वेगळा असला ( आणि होताच ) तरी त्याची ही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोरून जात नाही इतकी त्या प्रतिमेची पकड आज जवळपास १०० वर्षानन्तरही आपल्यावर कायम आहे.सिनेजगतात इतके प्रभावी आणि इतके दीर्घकाळ आपली मोहिनी टिकवून असणारे प्रतिमा सृजन ह्या आधी किंवा नंतर झालेले नाही. ह्या लिटल ट्रम्पची भुरळ भल्या भल्या चित्ररथीना, साहित्यिकांना, कलावंताना पडलेली आहे. आपल्याकडे राज कपूर पासून, शम्मी कपूर, अमिताभ बच्चन ते अगदी आपल्या पु ल देशपान्डेन्पर्यंत अनेकांनी आपापल्या परीने हा लिटल ट्रम्प साकारलाय.( आणि यश ही मिळवलय) पण चार्ली वैयक्तिक आयुष्यात इतका साधा भोळा गरीब ( स्वभावाने देखील) विनोदी वगैरे नव्हता. नव्हे त्याचे आयुष्य आणि व्यक्तिमत्व विरोधाभासांनी भरलेलं होतं. तो क्वचितच हसायचा. त्याच्या चेहऱ्यावर सहजासहजी स्मित आलंय असं कधी व्हायचं नाही. तो संशयी होता. रागीट होता एकलकोंडा होता, बाईलवेडा होता.पडद्यावर साधाभोळा सज्जन सहृदय वाटणारा चार्ली प्रत्यक्ष स्वत;च्या पोटाच्या मुलांशी क्रूर पणे वागायचा,तो धनाढ्य होता आणि विलासी आयुष्य जगात होता हा सगळा पैसा त्याने भांडवलशाही अमेरिकेत कमावला पण तो कम्युनिझमचा समर्थक आणि स्टालिनचा चाहता होता.त्याच्या ह्या कम्युनिस्ट प्रेमाने त्याने FBI च्या चौकशीचा ससेमिरा मागे लाऊन घेतला ज्याचे फलस्वरूप त्याला अमेरिका कायमची सोडावी लागली. त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध आले आणि त्यातल्या बहुतेक त्याच्यापेक्षा वयाने खूप म्हणजे खूपच लहान होत्या.त्याची चौथी आणि शेवटची पत्नी उना ओ नील ( ख्यातनाम अमेरिकन नाटककार युजीन ओ नील ची मुलगी ) ही त्याच्या पेक्षा ३६ वर्षानी लहान होती. त्यादोघांनी लग्न केले तेव्हा चार्ली ५४ वर्षांचा होता तर उना फक्त १८ वर्षांची. लग्नानंतर त्यांना एक नाही दोन नाहीतर चक्क ८ मुलं झाली. शेवटचे मुल झाले तेव्हा चार्ली ७३ वर्षांचा होता. पण त्याच वेळी तो एक जीनियस कलाकार होता. त्याने त्याकाळी जी प्रसिद्धी प्रेम आणि यश मिळवलं टिकवल आणि वाढवलं तसं मिळवणं आजही कुणाला जमलेलं नाही.

१६ एप्रिल १८८९ रोजी चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन याचा जन्म दक्षिण लंडन मध्ये वाल्वर्थ इथे एका जिप्सींच्या कोचमध्ये (वाहनातले घर) झाला लंडनचा हा भाग १९व्या शतकाच्या शेवटी शेवटी विकटोरीयन कर्मठ इंग्लिश समाज जीवनावरचा उतारा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.अनिर्बंध जुगार, वेश्याव्यवसाय, दारू आणि इतर नशापाण्याचे अड्डे ह्याने हा भाग गजबजलेला असे. तिथे असलेल्या म्युझिक हॉल मध्ये अनेक अप्रसिद्ध, गरीब कलावंत आपली कला – गाणी नाटक एकपत्री प्रयोग सादर करत आणि उपजीविका चालवत. तिथेच अशी सटर फटर कामं करून उपजीविका चालवणारा चार्लीचा बाप चार्ल्स स्पेन्सर चाप्लीन सिनियर हा एका खाटकाचा मुलगा तर आइ हाना चाप्लीन ही एका चाम्भाराची मुलगी हे ही होते. हे दोघे नवरा बायको वाल्वर्थ इथल्या गजबजलेल्या म्युझिक हॉलमध्ये गाणी नाच नाटक नकला वगैरे करून लोकांचे मनोरंजन करीत व गुजराण करीत. आता ह्या माहितीला तसा पुरावा काही नाही. स्वत: चार्लीनेच ही माहिती सांगितली आहे.चार्लीचा मोठा भाऊ सिडने हा त्यांच्या लग्नाच्या आधीच तिला झालेला होता आणि त्याचे वडील कोण हे ठावूक नव्हते. तो म्हणजे सिडने १४ आठवड्यांचा असताना हाना आणि चार्ल्स ने लग्न केले आणि नंतर चार वर्षानी चार्ली चा जन्म झाला. काही लोकांच्या म्हणण्या प्रमाणे तो जे सांगतो तेच त्याचे वडील होते किंवा काय, या संदर्भातही प्रश्न आहेत. जो कोणी गृहस्थ वडील म्हणून सांगितला जातो तो व्यसनी, दारूडा बाईलवेडा होता. अन ३८व्या वर्षीच तो दारू पिऊन मेला. चार्लीच्या आईसंदर्भातही काही गंभीर शंका आहेत. काही काळ तिला लिली हार्ली ह्या नावाखाली बर्यापैकी प्रसिद्धी आणि कामं मिळाली खरी पण अतिरिक्त मद्यपानाने तिचा आवाज खराब झाला, मस्तकशूळाचा विकार जडला आणि मग तिला काम मिळेनासे झाले. नंतर चार्लीच्या आईनं जगण्यासाठी नर्सची काम, कपडे शिवायची काम अशी पडेल ती कामं केली. प्रसंगी चरितार्थासाठी देहविक्रयही केला. तीही व्यसनी होती आणि बेकारी,अपयश, गरिबीमुळे लवकरच नैराश्यग्रस्त झाली आणि पुढे तर मनोरुग्णच झाली. त्यामुळे वेगवेगळय़ा पुनर्वसन केंद्रांवर तिला वारंवार दाखल करावं लागलं होतं. चार्लीचा बराचसा शालेय काळ अनाथ मुलांच्या केंद्रांत वा सरकारी वसतिगृहांतच गेला.साधारण एकुणात तो २ वर्षे शाळेत गेला. बास पुढे नाही
१९०१ साली दारू पिऊन बाप मेल्यानंतर आणि आई आधीच मनोरुग्ण म्हणून वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाल्यामुळे हे दोघे भाऊ आता खरेच रस्त्यावर आले. अत्यंत गरीबी आणि उपासमारीमुळे नाईलाजाने तो आणि त्याचा भाऊ सिडने अक्षरश: रस्त्यावर येऊन लोकांचे हरतर्हेने मनोरंजन करून चार दिडक्या मिळवत आणि पोटाची खळगी भरत. या सगळय़ा प्रतिकूल परिस्थितीनच चार्ली चॅप्लिनला घडवलं. असल्या निराशाजनक वातावरणात राहून स्वत: न बिघडता, न वाया जाता त्याने पुढे जे कर्तृत्व गाजवलं, जी प्रसिद्धे आणि यश मिळवलं ते पाहून त्याचं कौतुक वाटल्याशिवाय राहवत नाही.मोठा भाऊ सिडने हा बर्यापैकी प्रसिद्ध झाला आणि त्याला फ्रेड कार्णो थियेटर्स ह्या तेव्हाच्या बर्यापैकी प्रसिद्ध नाटक कम्पनीत काम मिळाले. त्याने लगेच आपल्या भावाला चार्लीला त्या कंपनीत ज्युनियर कलाकार म्हणून लाऊन घेतले. तिथे तो नाटकातल्यादोन प्रवेशांच्या मधल्या काळात नकला वगैरे करून लोकांचे मनोरंजन करीत असे आणि वेळ पडेल तशी इतर कुठलीही कामे करीत असे.
१९१० साली तो कंपनी तर्फे कार्यक्रमाच्या दौऱ्याच्या निमित्तानं संधी मिळून इंग्लंडमधून अमेरिकेत गेला. तिकडे तो छोटे छोटे सिनेमे बनवायला लागला.त्याच्या दारू पिऊन तर्र झालेल्या माणसाच्या विनोदी करामती भलत्याच लोकप्रिय झाल्या. त्यात त्याचा साथीदार होता नंतर लॉरेल हार्डी ह्या अतिशय गाजलेल्या दुक्कलीतला स्टेनली लॉरेल (मराठीत हीच जोडगळ जाड्या-रड्या म्हणून प्रसिद्ध आहे).ज्याचा बाप दारू पिऊन मेला आणि आई मनोरुग्ण झाली त्या चार्लीने दारुड्याच्या भमिका करण्यात निपुणता मिळवली पण तो तिथेच थांबला नाही. अशा अनेक भूमिका करता करता त्याला त्याच्या आयुष्यातले प्रभावी पात्र सापडले, तेच ते.. वेंधळय़ा चार्लीचे.. ज्यात तो पडतो, धडपडतो.. त्याच्यावर काही ना काही आदळतं.. किंवा तो कोणावर तरी आदळतो. असा सगळा मसाला असलेले. हसवणारेपण आतून सहृदय परोपकारी.विचित्र वाटणारे कपडे घातलेलं. छोटी बोलर टोपी आणि मोठे बूट,काठी आणि फेंगडी चाल. ढगळ विजार आणि तंग कोट, फाटका विटलेला शर्ट आणि बेंगरूळ वाटणारा टाय आणि आखूड मिशा.हे विचीत्रतेने भरलेले रसायन लोकाना फारच भावले. आश्चर्य म्हणजे ह्या अशाच मिशा दुसरा अत्यंत प्रसिद्ध- कुप्रसिद्ध माणूस म्हणजे हिटलरने ठेवल्या होत्या. - अथात तेव्हा हिटलर आजून जागतिक पटलावर प्रसिद्धीला यायचा होता. पण तरीही चार्लीला नंतर सुद्धा त्या मिशा आपल्या पात्रातून कमी करायची गरज पडली नाही.
हा लिटल त्रंप लोकाना इतका भावाला आणि प्रसिद्ध झाला कि त्याने जवळपास १७ महिन्यात ४५ छोट्या छोट्या फिल्म्स बनवल्या.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

लवकरच जगभरातून लोकांनी त्याच्या ह्या लिटल ट्रंपची नक्कल करणे सुरु केले. अगदी लॉरेल-हार्डी मधल्या लॉरेल ला देखील हा मोह आवरला नाही. वर उजवीकडचे चित्र त्याचेच आहे.
त्याचे सुरुवातीचे काही चित्रपट हे लघुपट असत-अर्ध्यातासाचे, “कि-स्टोन” कंपनी बरोबर केलेले पण लवकरच त्याला दुसर्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करणे रुचेना म्हणून त्याने कि स्टोन फिल्म कंपनी सोडून “एसाने” (तीच ती पक्षाच्या पिसांचा टोप घातलेल्या रेड इंडिअनचे चित्र-लोगो असलेली) फिल्म कंपनीशी करार केला इथे त्याला त्याचे चित्रपट स्वत: दिग्दर्शित करायला मिळणार होते. त्याने स्वत:ची टीम बनवली त्याला नवी फ्रेश नायिका मिळाली एडना प्रोवायन्स.त्यांनी एकूण ३५ लघुपट केले.ती स्वत: फार ग्रेट अभिनेत्री नव्हती पण तिची पडद्यावर चार्लीशी तार जुळली.
लवकरच त्यांची वाढती प्रसिद्धी आणि यश बघून त्याच्या कडे अनेक ऑफर्स चालून येऊ लागल्या. त्याने मग न्युयोर्कच्या म्युच्युअल फिल्म कोर्पोरेशनशी करार केला. आठवड्याला १० हजार डॉलर पगार आणि एकरकमी दीड लाख रुपये मानधन. लक्षात घ्या हे साल होत १९१६. ज्या काळी सुखवस्तू माणूस आठवड्याला १२ डॉलर कमावून व्यवस्थित राहत असे. म्युच्युअल फिल्म कोर्पोरेशनचे संचालक म्हटले सुद्धा कि युरोप मध्ये चालू असलेल्या युद्धानंतर सगळ्यात महाग चार्लीच आहे. हा करार घडवून आणण्यात त्याच्या भावाने-सिडनेने महत्वाची भूमिका बजावली. खरेतर तो आधी भरपूर प्रसिद्धी पावला होता. त्याचे काम लोकना आवडतही असे, पण चार्लीची लोकप्रियता अफाटच होती आणि तो सिडनेशिवाय इतर कुणावर विश्वास ठेवत नसे. त्यामुळे त्याचे इतर सर्व व्यवहार सिडनेच पाही आणि हे काम आता इतके वाढले कि स्वत:चा अभिनय बाजूला ठेवून तो पूर्ण वेळ चार्लीचे व्यवहार बघू लागला. हे अगदी दिलीपकुमार आणि त्याचा भाऊ नसीर खान सारखेच आहे. खरेतर मोठा भाऊ नासीर खान दिलीपकुमार आधी चित्रपट क्षेत्रात आला आणि बर्यापैकी प्रसिद्धी ही पावला पण लवकरच दिलीपकुमारच्या यशापुढे त्याचे यश झाकोळून गेले. पण दोनही ठिकाणी भावाभावात वितुष्ट आले नाही.
म्युच्युअल फिल्म कोर्पोरेशनने त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन, बजेट, टीम, कथा, वेळापत्रक सगळेकाही तो ठरवत असे . चार्ली चित्रपट कसा बनवायचा आहे, काय प्रक्रिया असणार आहे, एवढेच काय कथा, पटकथा, दृश्य, सेट आजच्या दिवसाचे काम काही काही कुणाला सांगत नसे त्याची टीम ही फक्त त्याच्या सुचनाचे तंतोतंत पालन करण्यासठी असे. एडनासारख्या अभिनय फारसा न जमणार्या लोकांनी त्याच्या कडे इतका काळ काढला कारण ते स्वत:चे डोके वापरत नसत चारली त्याना कुठे बसायचे कसे बसायचे हे बारीक सारीक तपशीलही सांगत असे. हा एक खंबी तंबू होता. आणि त्यात स्वतंत्र वृत्तीच्या माणसाना फारसा वाव नव्हता.इथे अभावित पाने दादा कोंडके ह्यांची आठवण होते. निळू फुले ह्यांनी एका मुलाखतीत दादांच्या ह्या अशाच स्वभावाचे वर्णन केलेले आहे त्यामुळेच ते फार काळ दादांच्या बरोबर राहिले नाहीत. चार्लीच्या मृत्युनंतर त्याच्या बायकोने त्याचा सगळा फिल्म रोलचा संग्रह त्याच्यावर माहितीपट बनवायला आलेल्या लोकाना दिला त्यातून त्याचे फिल्म बनवण्याचे अफलातून पण हुकुमशाही तंत्र उघड झाले. तो स्वत: देखील पटकथा लिहित नसे. कॅमेरातून दृश्य बघूनच त्याला चित्रीकरण बरोबर त्याला हवे तसे झाले आहे कि नाही काळात असे आणि पुढे कथा कशी घेऊन जायची हे समजत असे त्यामुळे ओ नेहमी प्रेक्षकाना कसे दिसतेय आणि आपण काय दाखवू इच्छितो हे पाहत असे आणि पुढे काय करायचे ठरवत असे. त्यामुळे कधी कधी एका साध्या साध्या दृश्याचे ५०-६० रिटेक होत असत. दिवसभराच्या शुटिंग नंतर तो स्वत:ला एका खोलीत कोंडून घेत असे आणि आपण दिवसभर शूट केलेल्या फिल्म्स वर काम करत असे. त्या खोलीत फक्त प्रोजेक्टर दिवा टेबल आणि खुर्ची एवढेच असायचे. तेथेच तो पुढे काय करायचे हे ठरवत असे . दिवस भराच्या कामाचा शिणवटा, भूक, झोप कशाचीही तमा तो बाळगत नसे. दिवसभर मेहनत केल्यावर संध्याकाळ आरामात, मजा करत खात पीत घालवणे त्याला आवडत नसे. तो तितका सोशलही नव्हता, असे कष्ट करणारा चार्ली त्याकाळात आठवड्याला साधारण दीड लाख डॉलर इतकी कमाई करत होता. पण त्याचा वैयक्तिक खर्च ५०० डॉलर ही नव्हता. त्या काळात पहिले महायुद्ध जोरावर होते पण चार्ली ह्या युद्धप्रयत्नांपासून दूरच होता. त्याबद्दल मायदेशातून इंग्लंडमधून त्याच्यावर टीकाही होत असे. पण त्याने इंग्लंड मधील गरीब मुलाना युद्धामुळे सर्वत्र अन्नाचे दुर्भिक्ष्य झालेले असताना उत्तम खायला मिळावे म्हणून सार्वजनिक शाळातून पैसा पुरवला होता अर्थात ही गोष्ट त्याने अप्रसिद्धत ठेवली. टीकेचा रोष वाढला तसा त्याने युद्ध प्रयत्नासाठी निधी उभाकाराण्यासाठी सरकारने काढलेल्या लिबर्टी बॉंडची जाहिरात करणारी शोर्ट फिल्म केली तसेच SHOULDER ARMS ही विनोदी शोर्ट फिल्म बनवली ज्यात लिटल ट्रम्प खंदकात लढाई करायला जातो आणि धमाल उडवून देतो.हा चित्रपट त्याने सर्व जगभरात फुकट दाखवला- म्हणजे त्याचे पैसे त्याने न घेता युद्ध प्रयत्नांना दान केले.
तेव्हा अमेरिकेत मोठ मोठ्या स्टुडीओन्चा बोलबाला असे आणि अनेक नट-नट्या त्यांच्याकडे पगारावर काम करत. प्रसिद्ध नटाना जास्त मोबदला देऊन पळवले जात असे ह्याचा फायदा त्या नट-नट्या ही घेत आणि सध्याच्या मालकाची अडवणूक करत म्हणून सर्व बड्या स्टुडीओनी आणि वितरकांनी एकत्र येऊन पगार, मानधन कामाच्याशर्ती ह्याबाबत आचारसंहिता लागू करायचे ठरवले अर्थात ह्यात नटांचा तोटा होणार होता. म्हणून मग डग्लस फेअर बँक्स, मेरी पिकफोर्ड, चार्ली, ग्रिफिथ अशा बड्या नटलोकांनी एकत्र येऊन आपली UNITED ARTISTS नावाची कंपनी स्थापन केली.ते स्वत:च निर्मिती दिग्दर्शन ते वितरण सगळे करणार होते. इतर कुणाचीही गरजच नाही. हा त्याकाळी एक क्रांतिकारक निर्णय होता आणि यशस्वीही. ह्याचवेळी चार्ली मिल्ग्रेड हरीस ह्या षोडशवर्षीय नटीच्या प्रेमात पडला आणि ती गर्भवती झाली. दोघांना घाई घाई ने लग्न करावे लागले (लहान वयाच्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून नाहीतर तो आत गेला असता.)७ जुलै १९१८ला त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव ठेवले नॉर्मन पण तो १० दिवसातच वारला.चारली त्यावेळी लहान मुलासारखा धाय मोकलून रडला अशी आठवण मिल्ग्रेड हरीसनेच नंतर सांगितली. ह्यानंतरच त्याने THE KID हा अत्यंत गाजलेला चित्रपट करायला घेतला.ही शोर्ट फिल्म नव्हती एक पूर्ण लांबीचा चित्रपट होता आणि त्याचे पूर्ण लाम्बीचे असणे हे एक आव्हान होते. विनोदी मूकपट अर्ध्यातासाचे असत, त्यात विनोदी घटनांची अव्याहत मालिका असे लोक पोट धरून हसत पण ही गोष्ट २-२.५ तास सतत चालत नाही.ते प्रकार कंटाळवाणे होऊ लागतात. तेथे मग कथा. करुणा, प्रेम, राग, संशय, समज-गैरसमज अशा इतर भावना, घटना ह्यांचे महत्व वाढू लागते. हे शिवाधनुष्यही चार्लीने सहज पेलले. हा चित्रपट आपल्या पैकी अनेकांनी पहिला असेल आणि नसला पहिला तरी ब्रह्मचारी( शम्मी कपूरचा ) ड्रीम गर्ल. कुंवारा बाप ( मेहमूद) तरी पहिले असतीलच.हे गाजलेले चित्रपट ह्या THE KID वरच बेतलेले होते. नव्हे त्यातले अनेक प्रसंगही THE KID मधील प्रसंगांवरून सही सही उचलले होते.रस्त्यावरच्या टाकून दिलेल्या अनाथ मुलाला भणंग ट्रंप वाढवतो दोघात बाप मुलाचे नाते तयार होते, पुढे अनाथाश्रामावले सत्य कळल्यावर त्यामुलाला जबरदस्तीने ट्रंप पासून काढून घेऊन जातात हे दृश्य फक्त हृदय द्रावक नाही तर त्याला स्वत: चार्ली लहान असताना आईला वेडाचे झटके येतात म्हणून त्याच्यापासून तोडून मनोरुग्णालयात दाखल केलले गेले होते त्याची खरी पार्श्व भूमी आहे.

THE KID चे चित्रीकरण चालू असताना मिल्ग्रेड हरीसने चार्लीवर घटस्फोटाची केस दाखल केली. तिने चार्लीवर क्रूरपणे वागल्याचा, टाकून दिल्याचा आरोप केला होता. तिच्या वकिलांनी चार्लीच्या सर्व संपत्ती मध्ये हक्क मागितला THE KID चे वितरण व फायद्याचे हाक्क ह्यात सुद्धा हिस्सा मागण्यात आला. अर्थातच घटस्फोट मंजूर झाला तिला संपत्तीत वाटा मिळालाच शिवाय १ लाख अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई / पोटगी ही द्यावी लागली.
THE KID १९२१ साली प्रदर्शित झाला आणि जगभरात त्याने धुमाकूळ घातला. हा चित्रपट त्याच्या महत्वाच्या चित्रपटात गणला जातो. आजही तो अधून मधून एखाद्या वाहिनीवर दाखवला जातो. बघितला जातो.ह्या चित्रपटात एक स्वप्न दृश्य आहे ज्यात पंख लावलेले ANGELS येऊन चार्ली आणि लहान मुलाशी खेळतात. त्यात बाल कलाकार असलेली लीटा ग्रे मुळे पुढे चार्लीच्या आयुष्यात मोठे वादळ येणार होते.
एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हा चित्रपट त्याने इतर सहकलाकारांबरोबर नुकत्याच स्थापन केलेल्या UNITED ARTISTS करता तयार केलेला नव्हता तर आधी ज्या कंपनीशी करार केला होता त्या NATIONAL FILMS कंपनी सठी केलेला होता.
अखेर NATIONAL FILMS बरोबरचा करार संपल्यावर १९२३ साली म्हणजे UNITED ARTISTS स्थापना होऊन ५ वर्षे झाल्यावर त्याने UNITED ARTISTSसाठी पहिला चित्रपट तयार केला. A Woman In Paris नावाचा. खरेतर हा एक उत्तम चित्रपटहोता पण हा त्याचा असा बहुधा पहिला चित्रपट होता कि जो त्याने लिहिला, बनवला आणि दिग्दर्शित केला होता पण त्यात कामकेले नव्हते. आतापर्यंत चार्ली हा इतका प्रसिद्ध झालेला होता कि लोक फक्त त्याला पहायला चित्रपट गृहात जात. त्यामुळे लोकांचा बहुधा अपेक्षाभंग झाला असावा आणि हा चित्रपट साफ पडला.
१९२४ मध्ये त्याने त्याचा आजवरच्या सर्वश्रेष्ठ काल्कृतीपैकी एक असलेल्या चित्रपटावर काम सुरु केले. मागच्या चित्रपटाच्या अपयशातून धडा घेऊन आता त्याने परत ट्रम्पला पडद्यावर आणायचे ठरवले. चित्रपट होता THE GOLD RUSH. चार्लीने स्वत: अनेक वेळा अशी इच्छ व्यक्त केली आहे कि त्याची आठवण म्हणून जर फक्त एकाच चित्रपटाचे नाव घ्यायचे असे ठरले तर तो हा चित्रपट असायाला हवा. सियेरा नेवाडा मध्ये बर्फाच्या वादळात अडकलेल्या लोकांच्या अनुभवावर लिहिलेले एक पुस्तक कि लेख वाचून त्याला ह्या चित्रपटाची कल्पना सुचली. ह्या चित्रपटात त्याला त्याच्या लाडक्या ट्रम्पचे सूत्र सापडले. विनोद आणि दु:ख हे एकमेकापासून फार लांब असत नाहीत तर आयुष्य हे त्या दोघांनी हातात हात गुंफून केलेलं नृत्य आहे. हा लेख चार्लीवर असल्याने ह्या किंवा त्याच्या इतर चित्रपटावर जास्त लिहित नाही पण एक दोन गोष्टी मात्र संगीतल्याच पाहिजेत
ह्याची नायिका आधी ठरली होती लीटा ग्रे , मगाशी वर उल्लेख केलेली THE KID मधली ANGEL झालेली बाल कलाकार.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
लीटा ग्रे The Kid मधली angel
पण नेहमी प्रमाणे चार्ली ह्या १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडला , तिला दिवस गेले, त्याना मेक्सिकोत जाऊन गुपचूप लग्न करावे लागले.तिच्या गर्भारपणामुळे तिला अर्थात चित्रपट सोडावा लागला.तिच्या ऐवजी ते काम मग केले १८ वर्षीय जॉर्जिया हेल हिने.
ह्या चित्रपटात बर्फाच्या वादळात अडकलेल्या व भुकेमुळे हैराण झालेल्या ट्रम्पने बूट उकळून खाणे, किंवा तो आणि त्याचा पार्टनर ह्यांची कड्याच्या टोकावर अडकलेल्या लाकडाच्या खोपटातली धडपड.( हा प्रसंग सुद्धा अनेक ठिकाणी कॉपी झालाय)पण सगळ्यात गाजलेला म्हणजे त्याने पावाचे की बटाट्याचे तुकडे काट्याला खोचून केलेला ओशियाना रोल डान्स. खाली लिंक दिलेली आहे जरूर बघा
https://www.youtube.com/watch?v=XZGHR7J1lUQ
ह्यानंतर त्याचा चित्रपट आला THE CIRCUS हा देखील प्रचंड गाजला. ह्याचित्रपटात ट्रम्पच्या हातून विनोद होतो पण खरेतर त्याचा काही विनोद/थट्टा करायचा हेतू नसतो, पण घटनांवर त्याचा ताबा नसतो.अशी काहीशी ह्याची कथा होती. ह्या काळात चार्लीच्या आयुष्यातही अशा घटना घडत होत्या ज्यावर त्याचा काहीच ताबा राहिला नव्हता. लीटा ग्रे बरोबर त्याचे संबंध नावापुरते राहिले होते. खरेतर तिला वयाच्या २० वर्ष पूर्ण व्हायच्या आत चार्लीच्या २ मुलांची आई व्हावे लागले होते आणि ह्या काळात कुठल्याही पत्नीला हवे असलेले नवर्याचे प्रेम, आधार सोबत तिला मिळत नव्हती. त्याचे नेहमीच्या सवयी प्रमाणे जॉर्जिया हेल ह्या त्याच्या सध्याच्या नायिके बरोबर प्रेमप्रकरण चालू होते. शिवाय मेरना केनेडी, (CIRCUSची नायिका),मेरियान डेविस(हॉलीवूडची तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्री ) अशी इतर अनेक प्रकरण होतीच. तो ह्या न त्या कारणाने लीटा ग्रे राहत असलेल्या घरापासून लांब राहत होत, मुलांपासून लांब राहत होता आणि तशीहीत्याला रहायला अनेक घर आणि उंबरे उपलब्धही होते. सप्टे१९२६ मध्ये चार्लीच्या स्टुडियोला भयंकर आग लागली आणि तो पार जाळून खाक झाला, एवढ्यात अमेरिकन आयकर विभाग त्याच्या मागे हात धुवून लागला. त्याने १३.५ लाखाचा कर चुकवाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते आणि अशात लीटाने त्याच्यावर घटस्फोटाचा दावा दाखल केला. त्यात त्याच्यावर, त्याच्या चारित्र्यावर गंभीर आरोप तर होतेच पण त्यात तथ्यही होते.शिवाय बायकोला आणि दोन लहान मुलाना टाकून दिल्याप्रमाणे वागणे, लक्ष न देणे , मानसिक छळ आणि पाणऊतारे करणे असेही आरोप होते. लीटाने ३ लाख़ डॉलरची नुकसान भरपाई मागितली होती. ह्या सगळ्या खमंग प्रकरणाला हॉलीवूड आणि अमेरिकेत प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पडद्यावर साधाभोळा गरीब दिसणारा ट्रंप प्रत्यक्षात फार वेगळा होता तर. हे प्रतिमाभंजन त्याच्या फार जिव्हारी लागले आणि त्याला नैराश्याचा मोठा झटका आला.अखेर त्याने ह्या सगळ्याच कटकटीना कंटाळून, आयकर विभागाला १० लाख डॉलर एकरकमी भरून ते प्रकरण मिटवले तसेच लीटाला सव्वासहा लाख अमेरिकन डॉलरची एकरकमी पोटगी दिली शिवाय मुलाना प्रत्येकी एक एक लाख डॉलर दिले आणि कोर्ट कचेरीतून स्वत:ची सुटका करून घेतली. तेव्हाच्या अमेरिकन वर्तमान पत्रात ह्या बातमीचे शीर्षक मोठे मार्मिक होते “ तो कदाचित चांगला नवरा नसेलही पण तो एक लग्न करायच्या लायकीचा पुरुष नक्कीच आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
(He may not proved tobe a great husband, but he certainly is man worth marrying! -The Washington Post)

ह्यानंतर चार्लीने सिटी लाईट्स ह्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले. एका फुल विकणाऱ्या अंध मुलीला गरीब ट्रम्प तिची दृष्टी परत मिळवून देतो अशी कथा होती. १९३१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि नेहमी प्रमाणे गाजला. चार्ली कसाही असो लोकांचे ट्रम्पवरचे प्रेम अजिबात कमी झाले नव्हते.
१९३२ साली तो २१ वर्षीय पॉलेट गोडार्ड ह्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला.चारली प्रमाणेच ती एक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनच वर आलेली अभिनेत्री होती. स्वतंत्र, हुशार, सुंदर आणि कर्तबगार. तिचे आणि चार्लीचे कसे जुळले कुणास ठावूक पण ते टिकणार तर नव्हतेच. ती दोघे ८ वर्षे एकत्र होती शेवटची ४ वर्षे ती त्याची पत्नी होती पण पुढे अर्थातच त्यांचे फाटले ...असो. तिने आग्रह केल्यावरून त्याने आपल्या लीटा ग्रे पासून झालेल्या दोन मुलाना, चार्लस स्पेन्सर ज्युनिअर आणि सिडने चाप्लीन ह्याना आपल्याकडे रहायला बोलावले.सिडनेनेच नंतर सांगितल्या प्रमाणे चारली एक कडक, तुसडा,रागीट, अती शिस्तप्रिय, कमालीचा संतापी, मारकुटा असा बाप होता. त्याच्या असल्या वागण्याने मोठा मुलगा चार्लस स्पेन्सर हा कुमार वयातच व्यसनांच्या आहारी गेला, आणि चार्लीच्या मनातून उतरला.
१९३६ साली अमेरिका आर्थिक महामन्दीच्या विळख्यातून बाहेर पडत असताना चार्लीचा The Modern Times हा चित्रपट आला. हा चित्रपट भांडवल शाही, प्रचंड आणि बिनडोक उत्पादन,गळेकापू स्पर्धा, माणसाच्या व्यक्तिगत गुणांचा होणारा ऱ्हास,बेकारी, बकाली, गुन्हेगारी अशा अनेक पैलूंवर मोलाचे भाष्य करतो अर्थात मूकपट बनूनच. हा वेळेपर्यंत बोलपट आलेले होते आणि चांगलेच रुलालेही होते पण चार्लीला चित्रपटातले संवाद आवडले नाहीत.त्याने चित्रपटात संवाद घ्यायचे नाकारले . मात्र त्याने पार्श्व संगीत मात्र ह्या चित्रपटात भरपूर वापरले.अर्थात बदलत्या काळासोबत त्याला जुळवून घ्यावे लागणार होते. बोलपट आल्यावर मूकपट झपाट्याने मागे पडत चालले होते आणि त्याबरोबरच स्वत:ला न बदलू शकणारे डग्लस फेअर बँक्स सारखे एके काळाचे मूकपटांचे शहेनशहाही ...
ऑक्टो १९४० साली त्याचा पहिला बोलपट “The Great Dictator” आला. हा अर्थातच एक विडंबनपट होता-जर्मनीच्या हुकुमशहा हिटलरवर बेतलेला. ( हा चित्रपट तेव्हा जर्मनीत प्रदर्शित होउ शकला नाही ...साहजिक आहे , हुकुमशहाना व्यंगात्मक टीका कशी सहन होणार – त्याना कसलीच टीका सहन होत नाही )ते १९४० साल होते आणि हिटलरच्या क्रौर्याची खरी कहाणी जगाला कळायला अजून ५-६ वर्षे वेळ होता अन्यथा चार्लीतारी असा विनोदी चित्रपट त्याच्यावर बनवू शकला असता कि नाही कुणास ठावूक! पण आज ६७ वर्षानी देखील हा चित्रपट काल बाह्य वाटत नाही हे विशेष.
हिटलर आणि चार्लीच्या व्यक्तिमत्वात काही समानता नि विरोधाभास दोन्ही होते. हिटलर आणि चार्ली दोघे एप्रिल १८८९ साली जन्मले चार्ली १६ तारखेला तर हिटलर २० तारखेला. दोघेही व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत संशयी हेकेखोर आणि हुकुमशाही वृत्तीचे होते, दोघेही प्रतिकूल परिस्थितून स्वत:च्या कर्तृत्वावर मोठे झालेले. चार्लीचा ट्रम्प आणि हिटलर दोघांच्या छोट्या आखूड मिशा जगात प्रसिद्ध. तशा मिशा म्हटल्या कि फक्त हे दोघेच समोर उभे राहतात पण एक आबालवृद्धांचा अत्यंत आवडता तर दुसरा कमालीचा तिरस्कृत. पण दारू आणि स्त्रिया ह्या बाबत मात्र दोघांचेही स्वभाव पूर्णपणे भिन्न....असो.पूर्वीपासूनच चार्ली काहीसा कम्युनिस्ट विचारधारेकडे आकर्षित झालेला होता आणि दुसर्या महायुद्धाच्या काळात रशिया दोस्तांच्या बाजूने (नाईलाजाने का होईना)युद्धात उतरला होता त्यामुळे ह्या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी चार्ली गेला असताना त्याने रशियन क्रांतीचे, समाजवादी विचारधारेचे खूप कौतुकही केले होते. हे सगळे त्याच्या नंतर अंगलट येणार होते.आणि कारण ठरणार होती जोन बेरी नावाची एक दुय्यम दर्जाची अभिनेत्री.
ही बाई सुंदर होती आणि एका अशाच टाईमपास म्हणून खेळल्या गेलेल्या टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने ती चार्लीला भेटली. तिने लवकरच आपल्या सौंदर्यपाशात चार्लीला ओढले. त्याने तिला पुढील चित्रपटासाठी करारबद्ध ही केले. पण झाले काय!कि बेरी बाई जरा जास्तच उतावीळ होत्या तर चार्ली आधीच्या दोन अनुभवांनी सावध त्यामुळे तो आपण कुठे अडकणार नाही ह्याचे काळजी घेत होता आणि बेरी बाइंचा संयम संपत चालला, तिने नैराश्यातून किंवा अधीर होऊन रात्री बेरात्री चार्लीच्या घरात घुसायचा प्रयत्न केला आणि चौकीदारानी अटकाव करताच रस्त्यावर गोंधळ घातला. झाल्या प्रकाराने चार्ली लगेच सावध झाला आणि त्याने तिला करारातून मोकळे करून तिची सगळी रक्कम देऊन टाकली आणि बाय बाय केले
जोन बेरीला काढल्यावर आता परत नव्या नायिकेचा शोध सुरु झाला आणि समोर आली १८ वर्षांची उना ओ नील.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
उना ओ नील- जन्मभराची साथ
ही अमेरीकेचा प्रसिद्ध नाटककार युजीन ओ नील ची मुलगी. पण तिचे वडिलांशी फारसे पटत नव्हते. असो तर उनाला पाहून पुन्हा एकदा चार्ली प्रेमात पडला. तिलाही चार्ली आवडला लवकरच दोघांनी लग्नही केले तेव्हा ती १८ वर्षांची होती तर चार्ली होता ५४ वर्षांचा.ज्या चित्रपटासाठी जोन बेरीला काढले आणि उना ला घेतले तो चित्रपट शेवटी त्याने बनवलाच नाही. त्यांच्या ह्या लग्नाला उनाच्या वडलांनी अजिबात संमती दिली नव्हती आणि त्याने नंतर मुलीशी उरले सुरले संबंध ही तोडले. इतके कि तो चार्लीला आणि उनालाच काय त्यांच्या नातवंडानाही कधीही भेटला नाही. नातवंड काही १-२ नव्हती तर चांगली ८ होती ८ .

पण हे सगळे चालू असताना.जोन बेरी स्वस्थ बसलेली नव्हती . तिने चार्लीवर फसवून, चित्रपटात काम देतो असे सांगून,आमिष दाखवून तिचा उपभोग घेतल्याचा व आता तिच्या पोटात असलेले मूल त्याचेच असल्याचा दावा दाखल केला. हा काळ दुसऱ्या महायुद्धानन्तरचा - शीत युद्धाचे ढग क्षितिजावर जमू लागले होते आणि अमेरिकन FBI त्याना संशय येईल अशा कुणाच्याही मागे हात धुऊन लागत असे. ह्यातून ओपेनहायमर सारखे विख्यात अणु शास्त्रज्ञ सुटले नाहीत तसेच चार्ली चाप्लीन ही नाही. दुसर्या महायुद्ध्च्या काळात त्याने रशियासाम्बंधी काढलेले गौरवोद्गार FBI ला त्याच्या बद्दल संशय यायला पुरेसे होते. खरेतर वैद्यकीय चाचणीत ते मूल चार्लीचे नाही हे सिद्ध झाले होते आणि ज्युरीने त्याला निर्दोष सोडलेही होते पण मग त्याच्यावर जोन बेरीला बेकायदेशीर रीत्या अमेरिकन सीमेबाहेर घेऊन गेल्याचा, त्याकरता रशियन हेरांची मदत घेतल्याचा, स्वत: चार्लीही रशियनांसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप केला गेला.जजने परत केस चालवायची परवानगी दिली आणि पुरावे चार्लीच्या बाजूने असताना ही त्याला जोन बेरीच्या मुलीला ती सज्ञान होईपर्यंत आर्थिक मदत देण्याचा आदेश दिला. ह्या सगळ्यामुळे चार्ली अंतर्बाह्य बदलला. ह्यानंतर त्याने परत कधीही ट्रम्पला पडद्यावर आणले नाही. ट्रम्पचा एका प्रकारे ह्या केस ने बळी घेतला म्हणाना.
त्याचा हा सगळा कडवट पणा त्याच्या पुढच्या चित्रपटात Monsieur Verdoux(१९४७) मध्ये आला.ही कथा कुप्रसिद्ध फ्रेंच गुन्हेगार लान्द्रू ह्याच्या जीवनावर बेतलेली होती जो श्रीमंत स्त्रियाना फसवून त्याच्या पैशाकरता त्यांच्याशी लग्न करतो आणि त्यांचा खून करतो.(आपल्याकडील गाजलेल्या आचार्य अत्र्यांच्या तो मी नव्हेच सारखा) चार्लीने हे असले पात्र लोकांना करणे लोकाना झेपणे शक्यच नव्हते, चित्रपट साफ कोसळला.

१९५२ साली आलेला The Limelight हा त्याचा हॉलीवूड मध्ये बनलेला शेवटचा चित्रपट. एक काळ गाजवलेला पण आता म्हातारपणामुळे, एकटेपणामुळे आणि फारसे काम नसल्याने दारुडा झालेल्याह्या निराश विदुषकाच्या आयुष्यात एक तरुण मुलगी येते. ही एक काम शोधायला आलेली नृत्यांगना असते आणि काम न मिळाल्याने निराश होऊन आत्महत्या करायचा प्रयत्न करते जेव्हा हा म्हातारा विदुषक तिला वाचवतो. तिला हळू हळू नैराश्यातून बाहेर आणताना ती तरुण पोरगी ह्या म्हातार्याच्या प्रेमात पडते. तिला स्टेज वर काम मिळवून देण्यात त्याला आता आयुष्याचे ध्येय सापडते त्याला त्याचा जुने साथीदार भेटतात, तो ही पुन्हा उभारी धरून, व्यसनातून बाहेर येऊन काम करायचे ठरवतो पण ऐन कार्यक्रम चालू असताना त्या हृदय विकाराचा झटका येऊन तो स्टेजवरच प्राण सोडतो पण जाताना आपण एका गुणी कलाकाराला त्याचा आत्मविश्वास परत मिळवून दिला ह्याचे त्याला सामाधान असते अशी काहीशी कथा ह्या चित्रपटाची आहे.
आता शीत युद्ध अमेरिकेत अगदी भरात होते आणि अमेरिकाविरोधी, भांडवलशाही विरोधी विशेषत: साम्यवाद, समाजवाद ह्याबद्दल जराही सहानुभूती बाळगणार्या माणसाच्या मागे FBI आणि त्याचा सर्वेसर्वा अध्यक्ष जे एडगर हूवर अगदी हात धुवून लागत असे.त्यांचा हर तर्हेने मानसिक छळ करून भंडावून सोडले जात असे . खोटे नाटे आरोप करून तांचे चारित्र्य हनन केले जात असे. चार्लीसारखा माणूस आता त्यांच्या रडार वर आला. सप्टे.१९५२ मध्ये चार्ली इंग्लंड मध्ये The Limelightच्या प्रीमियर साठी गेला असताना FBIने अमेरिकेच्या अटर्नी जनरलकडे चार्लीची बर्याच वर्षापसून तयार केलेली फाईल सोपवली. सगळे काही ठरल्याप्रमाणे दोनच दिवसात चार्लीवर अमेरिकेत परत यायला बंदी घातली गेली. बरोबरच होते, चार्लीची जगभरातली लोकप्रियता पाहता आणि कोणतेही सबळ पुरावे नसताना ते चार्लीचे फार काही नुकसान करूच शकत नव्हते म्हणून ही पळवाट , ना केस न खटला अन आरोपपत्र ना सवाल जवाब. अमेरिकन व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रचंड विजय! ह्यानंतर पुढची २० वर्षे तो अमेरिकेत परतला नाही. आणि आला तेव्हाच जेव्हा चार्लीला त्यांनी आपण होऊन बोलावले आणि पायघड्या घालून त्याचे स्वागत केले.
१९५२ साली The Limelight अमेरिका सोडून जगभरात प्रदर्शित झाला आणि तुफान चालला.अमेरिकेत परत यायला बंदी घातल्यावर चार्लीने स्वित्झर्लंड मध्ये लेक जिनिव्हा इथे ३७ एकराची इस्टेट विकत घेतली व आपल्या सर्व कुटुंबासमवेत तो तिथेच राहिला. तिथे त्याला आणि उनाला अजून ४ मुले झाली, १९६२ साली शेवटचा ख्रिस्तोफर जन्माला आला तेव्हा चारली ७२ वर्षांचा होता.
अमेरिकेतून अपमानास्पदरीत्या हाकलला गेल्यावर आलेला त्याचा चित्रपट A King in New York(साल १९५७) हा पूर्णपणे इंग्लंड मध्ये चित्रित झाला होता.हा त्याचा नायक किंवा प्रमुख भूमिका असलेला शेवटचा चित्रपट. नुकत्याच झालेल्या अपमानाचे दाट सावट ह्या चित्रपटावर होती, चित्रपटाचे युरोपात चांगले स्वागत झाले. पण अर्थातच तो १९५७ मध्ये अमेरिकेत प्रदर्शित नाही होऊ शकला.उना आणि चार्लीला चौथ्या लग्नानंतर झालेला पहिला मुलगा मायकेल हा ह्या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत होता. या आधी त्याला त्याच्या इतर दोन भावंडांबरोबर The Limelight मध्ये अगदी छोटेशी भूमिका होती. हा चित्रपट देशात बंडाळी मजल्यामुळे परागंदा होऊन अमेरिकेत आलेल्या एका राजाची कथा आहे.
१९६४ साली त्याने स्वत:चे आत्मचरित्र लिहिले, माझे आत्मचरित्र ह्याच नावाने (My Autobiography) त्याच्या इतर चित्रपटाप्रमाणे हेही तुफान गाजले. जगभरातून लोकांच्या त्याच्यावर उड्या पडल्या. एका महिन्यात तिसरी आवृत्ती छापण्याचा विक्रम ह्या पुस्तकाने केला. त्याची अनेक भाषांत भाषांतरेही झाली. पण आयुष्याच्या संधाकाळी, एक भव्य कारकीर्द घडवून झाल्यावर सुद्धा एक प्रच्छन्नपणा, प्रामाणिकपणा किंवा मोकळेपणा ह्या आत्मचरित्रात दिसत नाही. चार्ली ह्या आत्मचरित्रात त्याची कला, त्याचे चित्रपट बनवण्याचे तंत्र त्याला दिसणाऱ्या जाणवणाऱ्या गोष्टी, त्यांचा त्याच्या चित्रपट निर्मितीवर पडलेला प्रभाव ह्याबद्दल कमीच लिहितो, तर त्याच्या आयुष्यात आलेले मोठ मोठे लोक, त्याची दोस्ती किंवा ओळख , , त्यांच्या विचारांचा, व्यक्तिमत्वाचा त्याच्यावर पडलेला प्रभाव, मान सन्मान ह्याबद्दल अगदी भरभरून लिहितो. पण त्याचा सावत्र भाऊ व्हीलर ड्रायदन, अनेक वर्ष त्याचा कॅमेरामन म्हणून काम केलेला रोली टाथ्रो,त्याचा सहायक दिग्दर्शक रॉबर्ट फ्लोरे आणि दुसरी बायको लीटा ग्रे ह्यांचा तर आत्मचरित्रात उल्लेखही नाही.
१९६५ साली त्याचा जन्मापासूनचा सुखदु:खातला साथीदार असलेला भाऊ सिडने वारला.तर १९६८ साली त्याचा थोरला मुलगा चार्ल्स ज्युनियर अतिरिक्त मद्यपानाने आजारी पडून मेला. चार्ली आता एकटा पडत चालला होता.नशीब इतकी लफडी करूनही त्याची शेवटची बायको उना त्याच्या बरोबर शेवटपर्यंत होती. तिच्या रूपाने त्याला आयुष्यात खरे प्रेम, शांती आणि स्थैर्य मिळाले असे आपण म्हणू शकतो. तो खरेच त्या गोष्टीच्या शोधात होता कि नाही ह्या बाबत मात्र खात्रीने काही सांगता येणे मुश्कील आहे.
१९६६ साली म्हणजे वयाच्या ७७व्या वर्षी त्याने त्याच्या ८२व्या आणि शेवटच्या चित्रपटाचे काम सुरु केले. चित्रपट होता A Countess from Hong Kong हा चित्रपट त्याने दिग्दर्शीतही केला आणि त्यात भूमिकाही केली. ह्यात मार्लन ब्रान्डो- GodFather वाला, आपल्या पैकी बऱ्याच जणाना त्याचा हाच चित्रपट माहिती असतो पण त्याचे Young Lions, A Street Car name desire, On the Water Front (आपल्याकडचा आमीर खान- राणी मुखर्जीचा गुलाम ह्यावरून घेतलेला होता.), असे अनेक उत्तम आणि गाजलेले चित्रपट आहेत, सोफिया लोरेन ( Two Women ह्या जगभरात अत्यंत नावाजलेल्या चित्रपटाची नायिका आणि जिला अगदी मादक सौन्दर्यचा atom bomb म्हणता येईल अशी इटालियन सुंदर अभिनेत्री)असे बडे बडे स्टार्स त्यात होते. हा त्याचा पहिला वाहिला ७०मिमि रंगीत बोलपट होता. हा चित्रपट जपान होन्ग्कोंग, कॅनडा इथे तुफान चालला मात्र युरोपात चालला नाही. अमेरिकेत तर त्याचे The Lime Light पासूनचे चित्रपट प्रदर्शितच झालेच नव्हते. पण अमेरिकन जनता त्याला विसरली नव्हती कि तिचे प्रेम कमी झाले नव्हते.चित्रपट नाही दाखवले तरी त्याचे आत्मचरित्र मात्र धडाक्यात खपत होते, अमेरिकन सरकारही आता जरा मवाळ झाले होते, बराच काळ लोटला असेल म्हणून असेल पण १९७१ साली चार्लीने अमेरिकन व्यावसायिक मोझेस रोथमन बरोबर करार करून त्याचे चित्रपट अमेरिकेत पुन:प्रदर्शित करायचे ठरवले.त्याला १९७२ साली अमेरिकेतून ऑस्कर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मानाचे बोलावणे आले आणि तो ही मागचे शल्य, अपमान विसरून गेला. १९५२ साली अमेरिकेतून अपमानास्पदरीत्या बाहेर काढला गेलेला चार्ली २० वर्षानी पुन्हा परतला लोकानी पुन्हा त्याचे प्रेमानेच स्वागत केले.
४४व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात त्याला जीवनगौरव पुरस्कार दिला गेला.

त्यावेळी चाहत्यांनी त्याला ऑस्करच्या इतिहासातले सगळ्यात मोठे Standing ovation दिले. सतत २० मिनिट लोक

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
उभे राहून, टाळ्या वाजवून त्याचा गौरव करीत होते.त्याला पुरस्कार दिला जात असताना, त्याने पुरस्कार स्वीकारल्यावर आभार व्यक्त करतानाही ते सतत उभेच होते.गैरसमजाचे, कटुतेचे, द्वेषाचे, सगळे बांध फुटले, सगळी अंतरे खलास झाली, सगळे किंतु, किल्मिष चाहत्यांच्या प्रेमात वाहून गेली.

चार्लीला नाताळ कधीच आवडला नाही. नाताळ त्याला त्याच्या लहानपणीच्या गरीबीची आणि हलाखीच्या दिवसांची आठवण करून देतो असे चार्ली नेहमी म्हणत असे. तोच चारली वयाच्या ८८व्या वर्षी म्हणजे १९७७ साली नाताळच्याच दिवशी सकाळी झोपेत असताना वारला. त्याच्या रूपाने वर्तमानात तग धरून असलेला मूकपटयुगाचा अखेरचा दुवा खऱ्या अर्थाने इतिहासजमा झाला.
तर आता लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेली चार्लीच्या मृतदेहाच्या चोरीची हकीकत ...
तर झाले असे कि २५ डिसेंबर १९७७ रोजी चार्ली वारला. त्याला तो राहत असलेल्या स्वित्झर्लंड मधील घराजवळच्या एका दफनभूमीत पुरले गेले. त्यानंतर जवळपास २ महिन्यांनी म्हणजे २ मार्च १९७८ ला त्याचे थडगे उकरून त्याचा मृतदेह असलेली शवपेटीच चोरून नेल्याचे आढळून आले. आधी ही कोणातरी चार्लीच्या चाहत्याने त्याचे अवशेष आपल्या संग्रही असावेत म्हणून केलेली कृती असावे असेच वाटले पण उनाला जेव्हा ६ लाख डॉलर ची मागणी करणारा फोन आला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. उनाने अर्थातच ही मागणी फेटाळली. तेव्हा चोरांनी त्याची आधीची पत्नी पॉलेट गोडार्ड हिला फोन करून आपल्याकडे चार्लीचा मृतदेह असल्याचे सांगितले त्यावर तिने त्यांना “बर मग?” असा प्रश्न विचारला आणि फोन ठेवून दिला असे सांगतात. असो तर ११ आठवड्यांनी चोर ही सापडले आणि त्यांनी आता कुणीच पैसे देत नाही हे पाहून जवळ च्याच एक मक्याच्या शेतात पुरलेली चार्लीची शवपेटी आणित्यातले त्याचे शव, असे सर्वकाही सहीसलामत (?) अवस्थेत सापडले. ते दोन चोर होते. एक पोलंडचा रोमन वार्डास आणि दुसरा बल्गेरियाचा की गास्तो गानेव. दोघेही मेकॅनिक होते आणि थोडेफार पैसे कमावण्याच्या लालसेने त्यांनी हे कृत्य केले होते. चार्ली सारख्या इतक्या प्रसिद्ध माणसाच्या शवा करता ६ लाखाची क्षुल्लक रक्कम कुणीही देईल असा त्यांचा कयास असावा. त्यांनी चार्लीच्या घरच्या कुणाऐवजी जर त्याच्या धनिक चाहत्याला संपर्क केला असता तर कदाचित त्यांचा विचार खरा ठरलाही असता... असो तर चोरांना ४ वर्षे आणि १८ महिन्याची शिक्षा झाली. २०१४ मध्ये ह्या घटनेवर आधारलेला एक विनोदी चित्रपट आला त्याचे नाव होते "द प्राईस ऑफ फेम " दिग्दर्शक होता झेवियर बोवी. आश्चर्य म्हणजे ह्या चित्रपटामुळे चॅप्लिन कुटुंबीय किंवा चोरांचे कुटुंबीय देखील अशा कुणाच्याही भावनावगैरे दुखावल्या गेल्या नाहीत. उलट चॅप्लिन कुटुंबीयांनी दिग्दर्शकाला बारीक सारीक तपशील पुरवून मदतच केली.

कोणता चार्ली खरा? पडद्यावरचा? की पडद्यामागचा?
असल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचीच नसतात.
हे वर्षं चार्लीचं १२८व जयंती वर्ष...त्या निमित्तानं त्याची आठवण झाली..इतकंच.
--आदित्य
संदर्भ-
१.My Autobiography- By Charles Chaplin

२. हसरे दुःख चार्ली चॅप्लिन – चरित्र लेखक- भा द खेर

३. Charlie Chaplin - Full Length Biography (Documentary) यु ट्यूब डॉक्यूमेंटरी
लिंक (https://www.youtube.com/watch?v=6-T7y5A5e7Y)

४. Paul Merton's Silent Clowns - Episode 2 - Charlie Chaplin
लिंक https://www.youtube.com/watch?v=5Pf3MPqnpMY

इतिहासचित्रपटविचारलेखमाहिती

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

7 May 2018 - 6:53 am | विजुभाऊ

भरपूर माहिती दिलीत
छान

उगा काहितरीच's picture

7 May 2018 - 8:12 am | उगा काहितरीच

लेख प्रचंड आवडला. चार्लीच्या जीवनाचे एवढे कांगोरे माहीत नव्हते . सुरूवातीपासून शेवटपर्यंत लेख कुठेच बोर होत नाही.

आदित्य कोरडे's picture

8 May 2018 - 10:44 pm | आदित्य कोरडे

मन:पूर्वक धन्यवाद!

खिलजि's picture

7 May 2018 - 1:25 pm | खिलजि

मस्तच . छान लेख .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

कपिलमुनी's picture

7 May 2018 - 1:45 pm | कपिलमुनी

खुप छान लिहिलेले आहे .
पु ले शु

आदित्य कोरडे's picture

8 May 2018 - 10:44 pm | आदित्य कोरडे

मन:पूर्वक धन्यवाद!

कोरडेसाहेब, प्रचंड सुंदर लेख. नेहमीप्रमाणे रंजक आणि माहितीपूर्ण..

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2018 - 3:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर लेख !

माहितीने ओतप्रोत भरलेला आहे... आणि त्यातली बरीच आधी माहित नसलेली आहे ! चार्लिच्या जीवनचे बरेच कंगोरे माहीत झाले. भला मोठा लेख असला तरी शेवटपर्यंत उत्सुकतेने वाचला गेला.

आदित्य कोरडे's picture

8 May 2018 - 10:45 pm | आदित्य कोरडे

मन:पूर्वक धन्यवाद!

शाम भागवत's picture

7 May 2018 - 3:55 pm | शाम भागवत

mimarathi.com वर वाचल्यासारखा वाटतोय.

शाम भागवत's picture

7 May 2018 - 4:00 pm | शाम भागवत

मि marathi.com वर वाचल्यासारखा वाटतोय.
अस लिहावयाचे होते.

अनन्त्_यात्री's picture

7 May 2018 - 4:26 pm | अनन्त्_यात्री

ट्रंप ?

ट्रॅम्पचा अर्थ खालीलप्रमाणे

.

आदित्य कोरडे's picture

8 May 2018 - 10:46 pm | आदित्य कोरडे

हो मला ट्रॅम्पच म्हणायचे होते पण बराच प्रयत्न करून ट्रॅम्पवाताचा अर्धचंद्र काढताच येईना ..तुमचा कॉपी करून घेतलाय

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 11:00 pm | जेम्स वांड

अनुक्रमे गूगल मराठी इनपुट अन गूगलचाच इंडिक कीबोर्ड वापरावात ही नम्र सूचना करतो कोरडे सर, बहुतांशी मराठी व्होकॅबलरी कव्हर होईलच, जिथे अनुस्वाराने काम होत नाही तिथे म अर्धा वापरून कार्यभाग साधता येईल (मी केले आहे तसे)

जेम्स वांड's picture

7 May 2018 - 5:47 pm | जेम्स वांड

वाक्यात वाक्यात तुमची लेखनशिस्त अन नेटकेपणाचा आग्रह दिसून येतो, माहितीपूर्ण अन नीट अभ्यास करून लिहिलेला लेख आहे हा, खूप आवडला, तुमचे खूप खूप आभार

विशुमित's picture

7 May 2018 - 5:56 pm | विशुमित

आवडत्या व्यक्तिमत्वाचे बहुढंगी पैलू समजले.
पण असले अवलिया जगव्यवहारांच्या पलीकडचे असतात.

मित्रहो's picture

7 May 2018 - 8:49 pm | मित्रहो

मला Modern Time आणि gold Rush आवडतात.

स्पार्टाकस's picture

7 May 2018 - 9:02 pm | स्पार्टाकस

छान लेख.
चार्लीचं आत्मचरित्रं आणि खेरांचं पुस्तक दोन्ही माझ्या संग्रहात आहेत, पण तरीही त्यातून खरा चार्ली पुरेसा समोर येत नाही असं माझं मत.

अर्धवटराव's picture

8 May 2018 - 3:33 am | अर्धवटराव

दॅट्स व्हाय आय लव्ह मिपा :)
खुपच मस्त लेख हो कोरडे साहेब.

चौकटराजा's picture

8 May 2018 - 6:16 am | चौकटराजा

माझ्या अत्यंत आवडत्या कलाकाराचे विषयी आणखी काही समजले . चित्रपट कसलाही करा तो प्रामाणीकपणे करा याचे उत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चाप्लीन . जो माझ्या घरातील पुढच्या पिढीलाही आवडतोय !

मदनबाण's picture

8 May 2018 - 7:48 pm | मदनबाण

सुरेख लेखन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताये मोरी चुनरिया लिपटी जाये... :- Shikari

अभ्या..'s picture

8 May 2018 - 8:01 pm | अभ्या..

मस्त लिहिलात देशपांडे

आदित्य कोरडे's picture

8 May 2018 - 10:47 pm | आदित्य कोरडे

कौतुक आणि प्रोत्साहना बद्दल सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद !

सुरेख आणी सविस्तर व्यक्ती वर्णन

सुरेख आणी सविस्तर व्यक्ती वर्णन

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 May 2018 - 1:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

छान मस्त
आवडला लेख
पैजारबुवा,