आधी नाकाने, मग जीभेने

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
28 May 2017 - 12:24 pm

आधी नाकाने, मग जीभेने

खाद्यपदार्थांची चव घेताना जीभ ह्या इंद्रियांच्या सिंहाचा वाटा असला तरी डोळे आणि नाक ह्यांचे देखील बरेच महत्व आहे. पुलं नि 'अपूर्वाई' मध्ये फ्रेंच जेवणाचे त्याच्या उत्कृष्ट प्रेझेंटेशन मुळे; 'आधी डोळ्यांनी, मग जीभेने' असे वर्णन केले आहे.

भारतीय जेवणात देखील रंगसंगती आणि मांडणीचा विचार करून पान वाढण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. मला असं वाटतं कि आपले अनेक खाद्यपदार्थ 'सर्वात आधी नाकाने, मग डोळ्याने आणि नंतर जीभेने' अनुभवायचे असतात.

पुरणपोळीच्या खमंग वासापासून ते अगदी अंबाडीच्या भाजीवर लसणाच्या फोडणीपर्यंत शेकडो वास भूक चाळवतात. पण माझ्या विशेष आवडीचा वास म्हणाल तर बेकरी मध्ये येणारा गोडसर खमंग वास. हा वास मला भर्रकन भूतकाळात घेऊन जातो आणि ‘nose’talgic करतो….

माझं आजोळ म्हणजे पुण्यापासून ५५ किलोमीटर असलेलं भोर नावाचं गाव. बसस्टॅन्ड वरून आजोबांच्या घरी जाताना वाटेत 'श्रीराम' बेकरी लागायची. तिथे तयार होत असलेल्या बिस्किटांचा गोडसर वास; बेकरी यायच्या २-३ मिनिटे आधीपासूनच यायला लागायचा. तिथला सुवास साठवून घेत-घेत 'जीरा बटर' घेऊन यायचं. ते चहात टाकून 'कडे-कडेने' चहा प्यायचा. नंतर ते टम्म फुगलेलं बटर चमच्याने खायचं. मला सांगा सुखं म्हणजे अजून काय असतं?

मला चहाबरोबर बिस्किटांऐवजी खारी, टोस्ट, बटर हे त्रिकुट जास्त आवडतं. लहानपणी एक मुसलमान माणूस अल्युमिनियम ची पेटी डोक्यावर घेऊन हया गोष्टी घरोघरी विकायला यायचा. त्यात ह्या पदार्थांबरोबर नाजूक-पांढरी 'नानकटाई' देखील असायची. मिशी नाही आणि लांब दाढी वाढवलेला माझ्या माहितीतला हा पहिलाच माणूस.

पुण्यात घोले रोड वरची 'संतोष बेकरी' अशीच आपल्या आसुसलेल्या नाकाला भरपूर 'संतोष' देते. सकाळी ९:३० च्या सुमारास गेल्यावर पॅटिस, क्रीमरोल, केक, ब्रेड इत्यांदींचा मिश्रणाचा एक अदभुत वास आसमंतात दरवळत असतो. ह्या वासांमधून केक चा गोड वास, टोस्ट-बटर चा मध्यम गोड वास आणि पॅटिस आणि आतल्या सारणाचा तिखटसर वास हुडकायला थोडीफार प्रॅक्टिस लागते. जास्त तपश्चर्या केल्यास बेकरीजवळून नुसतं दुचाकीने गेलं तरी देखील केवळ वासावरून कुठला माल भट्टीतून काढत आहेत हे ओळखू शकतो.

ब्रेडला देखील स्वतःची खास चव असते हे अश्या ठिकाणचा ब्रेड खाल्ल्यावर समजतं. 'ब्रँडेड' ब्रेड् पेक्षा अश्या ठिकाणी मिळणारा ब्रेड स्लाइस (अमूल बटर लावून) चहासोबत खाऊन पहा. केवळ मऊ-लुसलुशीत म्हणजे उत्तम ब्रेड नव्हे. ह्या ब्रेड ची कड भले थोडी 'कड'क असेल, पण चहात बुडवून खाताना फारच अप्रतिम लागते. ताजा ब्रेड तिकडेच मशीन वर कापून कागदात बांधून देतात. तो घरी आणून चहा होईपर्यंत धीर निघत नाही. कुठल्याही नवसाशिवाय ही बेकरी मला 'पाव'ते.

पुण्यात मेट्रो प्रकल्प होईल तेव्हा होईलच; पण त्या आधी संतोष बेकरी शेजारी एखादे 'अमृततुल्य' काढण्याची जास्त गरज आहे! ह्या बेकरी मुळे एखाद्याची बेकारी दूर होईल. बेकरी शेजारी चहाचे दुकान असल्यास ‘GST मधून ५ वर्षे सूट' सारखा काहीतरी कायदा लवकर आणायला हवा. मोदी स्वतः चहा विकायचे, त्यामुळे ते तरी ह्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील ही आशा आहे.

हिंदुस्थान बेकरी आणि न्यू पूना बेकरी चे देखील काही पदार्थ आवडतात. मात्र 'हिंदुस्थान बेकरी' पेक्षा 'पॅटिस संपले' हा बोर्ड जास्त ठळकपणे दिसतो. आणि पूना बेकरी चे पॅटिस बरे असले तरी मला तिकडे २ कारणांसाठी जायला आवडत नाही. एकतर पुणे ला पूना म्हणलेलं आवडत नाही. दुसरं म्हणजे ती अप्पा बळवंत चौकात आहे, तिकडे जाताना CA इन्स्टिटयूट दिसते आणि CA च्या वेळी केलेली जागरणं आणि अभ्यास आठवून पॅटिस घशाखाली उतरत नाही.

नवी हॉटेल्स 'माऊथ पब्लिसिटी' मुळे चालतात. मात्र अनेक बेकऱ्या 'नोज पब्लिसिटी' मुळे चालत असाव्यात. मी स्वतः अशी अनेक ठिकाणं 'वास लागल्यामुळे' शोधली आहेत. पेरूगेट वरून बाजीराव रोडकडे जाताना असाच एकदा बेकरीचा गोड वास आल्याने तिथेच थांबलो. रस्त्यावर कुठेच बेकरी दिसेना. नाकावर पूर्ण विश्वास असल्याने शोधमोहीम चालू केली. तेव्हा एका बिल्डिंग च्या अगदी आतल्या भागात लपलेल्या 'मनोहर बेकरी' चा शोध लागला. दुपारची वेळ असल्याने बरेचसे पदार्थ संपले होते. मग भट्टीतून नुकत्याच काढलेल्या बन-पावाची मान मुरगाळून 'बेकरी ईद' साजरी केली. आता कधीही त्या भागात जाणे झाले कि 'आहे मनोहर बेकरी'.

पुण्यातील बेकरी चा विषय 'कयानी बेकरी' चा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तिथल्यासारखी श्रुजबेरी बिस्किटे आणि प्लेन केक आख्ख्या जगात कुठेही मिळत नसावीत. तशी श्रुजबेरी बिस्किटे आणि केक अनेकांनी बनवून पाहिले. पण ओरीजिनल किशोर कुमार ची आणि कुमार सानू ने त्याची गायलेली गाणी इतका फरक दोन्हीत आहे. शोले च्या गब्बर स्टाईल मध्ये विचारावंस वाटतं कि ‘ये कयानी वाले अपने केक में कौनसे चक्की का पीसा मैदा डालते हैं रे’?

कॅम्प मध्ये जाऊनदेखील बुधानी वेफर्स आणि कयानी चा केक न घेणाऱ्या लोकांचे आधार कार्ड जप्त केले पाहिजे असे माझे (प्रांजळ!) मत आहे.

नाकाचा पुरेपूर वापर हि केवळ मुकेश आणि हिमेश ची मक्तेदारी नाहीये. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे जरी चांगलं नसलं तरी प्रत्येक खाद्यपदार्थाचा 'आधी नाकाने, मग डोळ्याने आणि नंतर जिभेने' आस्वाद घ्यायला हवा. असं केल्यास नाकाला घ्राणेंद्रिय ऐवजी खाणेंद्रिय म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.

आताच्या मुलांच्या आरोग्यविषयक कल्पना ऐकल्या कि एकूणच बेकरी व्यवसाय केवळ बर्थ-डे pastries बनवण्याइतपतच राहील कि काय अशी धास्ती वाटते. ताजे पोहे- उपमा सोडून preservatives घातलेले (आणि अनेक महिन्यापूर्वी बनवलेले) कॉर्न फ्लेक्स आणि ओट्स अनेक जण खातात. खारी-टोस्ट ऐवजी high-fibre ची Digestive बिस्किटे खाताना पाहिलं कि माझ्या चहातील बटर फुगेनासे होते.

प्रख्यात dietitian ऋजुता दिवेकर ह्यांनी 'खारी-टोस्ट-बटर' प्रकृतीस कसे चांगले आहे ते पटवून देऊन थोडा 'खारीचा वाटा' उचलावा अशी विनंती आहे. सरकारने देखील खारी-टोस्ट-बटर खपावेत म्हणून पुढच्या वेतन आयोगात 'बेकरी भत्ता' समाविष्ट करावा. पाश्च्यात्य देशांत जेवणापूर्वी वाईन चा ग्लास उंचावून 'टोस्ट' देण्याची पद्धत आहे. आपल्याकडे सुद्धा एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात 'टोस्ट' घेऊन 'चियर्स' ची प्रथा सुरु करायला हवी.

आवडत्या दुपारची माझी अशी कल्पना आहे - पावसाळी हवा असावी. अंबाडीची भाजी, भाकरी आणि भात असं आटोपशीर दुपारचं जेवण झालेलं असावं. आवडते पुस्तक वाचत आरामखुर्चीतच डोळा लागावा. पावसाच्या सरीने आणि चहाच्या वासाने ४ च्या सुमारास जाग यावी. चहाबरोबर (सकाळी आणलेली) पिळाची खारी असावी. खारी चहात बुडवून खावी.. आणि रेडिओ वर दिलीप कुमार वैजयंतीमाला च गाणं लागलेलं असावं "नैन लड़ जइ हैं तो मनवामा कसक होई "बेकरी".

वावरप्रकटनआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

28 May 2017 - 12:30 pm | संजय पाटिल

छान लिहीलय...

टिपिकल पुणेजाज्ज्वल्यपण आणि शाब्दिक कोट्यांचा मारा सोडला तर प्रचंड आवडलेले आहे बेकरीपुराण.
अर्थात काही कोट्या जमल्याही आहेत हे नम्रपणे नमूद करु इच्छितो.

जेम्स वांड's picture

28 May 2017 - 1:59 pm | जेम्स वांड

सहमत आहे......

खादाडी ती खादाडीच....

मस्त लेख. अगदी मनातला...

बेकरीत ठराविक वेळ साधून कोणी जस्ट बनलेला प्रचंड गरम "मिल्क ब्रेड" मिळवला आहे का? त्यात पांढरं घरगुती लोणी लावून गरमागरम खाल्लंय का?

जस्ट बनलेला प्रचंड गरम "मिल्क ब्रेड" नाही, पण आमच्या इथल्या ऐतिहासिक बेकरीत भट्टीतून निघालेला गरम, पेपरात बांधूनपण हाताला चटके देणारा 'पाव' (पाव अ‍ॅज इन वडापाव) मी नेहमी मिळवतो, आणि तो दुधात (विदौट साखर) लिअ हाब्रिद= द्द्फ्ज/ /ओप्फ्द द्स्लफ क्द्ज्फ

तुषार काळभोर's picture

28 May 2017 - 2:57 pm | तुषार काळभोर

जस्ट बनलेला प्रचंड गरम "मिल्क ब्रेड" नाही, पण आमच्या इथल्या ऐतिहासिक बेकरीत भट्टीतून निघालेला गरम, पेपरात बांधूनपण हाताला चटके देणारा 'पाव' (पाव अ‍ॅज इन वडापाव) मी नेहमी मिळवतो, आणि तो दुधात (विदौट साखर) लिअ हाब्रिद= द्द्फ्ज/ /ओप्फ्द द्स्लफ क्द्ज्फ लई भारी लागतो.

(मघाशी लिहिता लिहिता त्या अनुभवाच्या आठवणी जागृत झाल्या आणि कीबोर्डावरची बोटं नियंत्रणाबाहेर गेली ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2017 - 3:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

लिअ हाब्रिद= द्द्फ्ज/ /ओप्फ्द द्स्लफ क्द्ज्फ

बरं झालं, तुम्ही लगेच स्पष्टीकरण दिलेत ते ! नाहीतर लोक "या (बहुतेक) इराणी पदार्थाची पाकृ टाका" म्हणून मागे लागले असते ;) =))

पद्मावति's picture

28 May 2017 - 1:55 pm | पद्मावति

छान लिहिलंय. लेख आवडला.

पैसा's picture

28 May 2017 - 2:02 pm | पैसा

म्हापश्याला घरी जाताना line लावून घेतलेले ताजे उंडे पाव आणि ब्रेड आठवले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2017 - 2:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर खुसखुशीत लेख.

खाद्यपदार्थांचा आस्वाद केवळ डोळे (पक्षी : पाहणे) आणि जीभ (पक्षी : चव) यांच्यापुरता मर्यादीत नसतो. तर त्याला खालीलप्रमाणे सर्व पंचेंद्रियांच्या जाणीवांचे आणि मेंदूतील भूतकालीन स्मरणाचे पदर असतात...

१. डोळे : पदार्थाचे मूळ स्वरूप आणि प्रस्तुतीकरण.
२. नाक : गंध.
३. जीभ : चव.
४. जीभ व सर्व तोंडाची श्लेश्मल त्वचा (म्युकोजा) : स्पर्श (टेक्चर).
उदा. आकर्षक रुपाचा, वासाचा आणि चवीचा पदार्थ तोंडात गिळगिळीत लागल्यास बर्‍याच जणांना उलटी होऊ शकते. तसेच त्या पदार्थाचे अपेक्षित असणारे कडक/मऊ, गुळगुळीत/खरबरीत, तोंडात विरघळणे/चावायची गरज असणे, खुसखुशीपणा, इत्यादी गुणधर्म तो पदार्थ उत्तम प्रतिचा आहे की नाही हे ठरवतात.
५. कान : पदार्थ खाताना होणारा आवाज. उदा. कुरकुरीतपणा.
६. मेंदू : मेंदूत त्या पदार्थाची साठवलेली सुखद, दु:खद, शिसारी आणणारी, इत्यादी आठवण. अश्या आठवणीमुळे, एखाद्या पदार्थाला पाहून किंवा केवळ त्याच्या कल्पनेनेही, कोणाची भूक खवळू शकते तर इतर कोणाची मरून जाऊ शकते.

खाण्याचे मानवी जीवनातले अनन्यसाधारण महत्व केवळ "जगण्यासाठी उदरभरण" या कारणासाठी नसून "जीवनाचा अनुभव घेण्याचा एक अविभाज्य भाग" या त्याच्या स्वरूपासाठी प्राप्त झाले आहे. म्हणुनच, रोजचे जेवण घेतानाही जर कोणी बरोबर नसले तर तो प्रसंग नीरस वाटतो आणि मानवी जीवनातले सगळेच आनंदाचे प्रसंग खाणेपिणे झाल्याशिवाय योग्य पद्धतीने साजरे झाले असे मानले जात नाही. इतकेच काय बरेचसे दु:खद प्रसंगही खाणे (बाराव्या-तेराव्याचे जेवण, इ) आणि पिणे (पाश्चिमात्य वेक (wake) प्रथा) याशिवाय पूर्णत्वाला जात नाहीत.

तुम्ही काय करता... जगण्यासाठी खाता की खाण्यासाठी जगता ? ;) :)

सरनौबत's picture

28 May 2017 - 2:32 pm | सरनौबत

परीक्षणाबद्दल धन्यवाद! 'कोत्या' मनोवृत्तीपेक्षा 'कोट्या' करायची वृत्ती जास्त चांगली नाही का ;-)

सरनौबत's picture

28 May 2017 - 2:34 pm | सरनौबत

https://flic.kr/p/UYXNB7

अत्रे's picture

28 May 2017 - 2:38 pm | अत्रे

"Nosetalgic" शब्द आवडल्या गेला आहे :)

सतिश गावडे's picture

28 May 2017 - 2:39 pm | सतिश गावडे

भारी लिहीलं आहे. कोट्या तर अफलातून आहेत.

माम्लेदारचा पन्खा's picture

28 May 2017 - 2:42 pm | माम्लेदारचा पन्खा

वरचा क्लास . . एक लंबर . . . !

प्रमोद देर्देकर's picture

28 May 2017 - 2:50 pm | प्रमोद देर्देकर

बेकरी पूराण आवडले

आवडला.. पुण्याची जुनी बहुतेक ठिकाणे लेखात आलीत. सर्वांना'बेकरी ईद' च्या शुभेच्छा!

संतोषवाल्याचा तो जुना प्रॉब्लेम आहे. त्याने स्वतः चहा ठेवायला हरकत नाही- पण नाही.
गेल्या दशकात तिथे पार्किंग 'पी वन' करणे हा पिऊन केलेला अन्याय आहे. (असाच अन्याय दोराबजी जवळही होतोय.)
कयानी म्हणजे स्पेशल मामला आहे- तोच दर्जा टिकवून आहेत. मात्र ५०% ग्राहक पश्चिम पुण्यातून येत असताना (विदा नाही) तिकडे शाखा नसणे योग्य नाही. दहा रुपये जास्त देऊन आम बेकरीत ते केकबिक विकायला ठेवतातही, पण ते धाब्यावरच्या हॉटेलात चितळेची बाकरवडी घेण्यासारखे आहे.

हल्ली त्या इंदुरी टोस्टऐवजी ब्रिटानियाचे आवडू लागलेत. लोकल टोस्टचा अनुभव नाही.
मागे त्विस्टेड खारी आवडत असत, पण त्यात 'डालडा' (!) असल्याने अनेक वर्षांत आणली नाहीत.
हिंदुस्तान बेकरी म्हणले की पॅटिस आठवतात तसे पं. भीमसेनजी जोशी स्वतः पांढरी मारुती ८०० चालवत ब्रेड घ्यायला येत ते जास्त आठवते.

सरनौबत's picture

28 May 2017 - 3:21 pm | सरनौबत

एक समाधानाची बाब म्हणजे लोकल बेकरयांची संख्या काही वर्षात वाढू लागलीये. म्हात्रे पुलाच्या शेवटी 'हसन बेकरी' काही वर्षांपासून आहे. आता कोथरूड भागात तर 'Crown बेकरी' नावाने २-३ बेकऱ्या दिसल्या. तिकडे पण खारी चांगली मिळते. एकदा साताऱ्याला पालेकरांची नानकटाई खाण्याचा योग आला. कोल्हापूर बस स्टॅन्ड वर देखील 'हनुमान बेकरी' चे प्रॉडक्ट्स चांगले मिळतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 May 2017 - 5:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

म्हात्रे पुला कडून दत्तवाडीमधून सिंहगड रोड कडे जाताना रॉयल बेकरी लागते. त्याच्या कडे बर्‍याचवेळा गरम गरम बाँबे खारी मिळते.
याच्या कडचा ब्रेडही मस्त असतो.
पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 May 2017 - 3:04 pm | ज्ञानोबाचे पैजार

सॅलसबरी पार्क जवळच्या गोल्डन बेकरी मधे सुध्दा अफलातुन पिळाची खारी आणि मावा केक मिळतात. पावभाजीचे पाव तर इतके ताजे आणि लुसलुशीत असतात की मी एखादा पाव तिकडे बेकरीतच मटकावतो.

याही बेकरीच्या पाचकिलोमिटर परीसरामधे तो टिपिकल बेकरीचा गोड्सर वास दरवळत असतो.

पैजारबुवा,

गोल्डन बेकरीचे खरी प्याटीस पण मस्त असतात, बाकी लेख अप्रतिम आणि खासकरून काही कोट्या विशेष आवडल्या आहे.
जाता जाता - सरनोबत साहेब एक खास बेकरी कट्टा होऊन जाऊद्या आता

चावटमेला's picture

28 May 2017 - 10:04 pm | चावटमेला

लेख आवडला आहे.. कयानी बेकरीच्या दर्जाचा आणि चवीचा केक बाकी कुठेच मिळत नाही ह्याच्याशी सहमत. सांगलीतल्या काही बेकर्‍यांमध्ये छान समोसे मिळायचे मी लहान असताना

सांगलीतल्या काही बेकर्‍यांमध्ये छान समोसे मिळायचे मी लहान असताना

हो. पण त्या सर्व ठिकाणच्या उत्कृष्ट सामोश्यांचा पुरवठादार एकच होता. करिता माहितीस्तव.

सांगलीचं नाव काढलंच आहे तर अत्यंत चपखल ब्रँडनेम असलेली "लोखंडे बिस्किटं" कोणाला आठवतात का?

शिवाय यळगूड डेअरीचं मारुतीचं चित्र आणि त्यांची लालचुटुक रंगाचा टॉप पार्ट असलेली चौरसाकृती छोटी नानकटाई?

वगैरे..

गामा पैलवान's picture

29 May 2017 - 1:33 am | गामा पैलवान

सरनौबत,

खुसखुशीत पदार्थांवरचा खुसखुशीत लेख आवडला.

आ.न.,
-गा.पै.

छान लिहिलंय.. बेकरीमधला आणखी एक आवडता प्रकार म्हणजे घरुन सामान द्यायचे आणि ते बिस्कीट बनवून देतात तो प्रकार. प्रत्येक बिस्कीटाचा आकार वेगळा, पण त्या बिस्कीटांची मजा वेगळीच.. माझ्या लेकांनाही ती चहामध्ये 'बुड' करुन खायला फार आवडतात :)

सरनौबत's picture

29 May 2017 - 12:06 pm | सरनौबत

अगदी खरंय. ब्रँडेड बिस्किटांसारखी सुबक नसली तरी चवीला मस्त लागतात 'भाजून आणलेली' बिस्किटे. पूर्वी तूप, मैदा, साखर सामान नेऊन द्यायचं आणि नंतर बिस्किटे घेऊन येण्यात मजा होती. आता ट्रॅफिक मुले २ वेळा जाणं जीवावर येतं म्हणून 'तयार भाजलेली बिस्किटे' आणतो.

उगा काहितरीच's picture

29 May 2017 - 6:53 am | उगा काहितरीच

बेकरीतील पदार्थ जास्त आवडत नसले तरी लेख आवडला.

चिक्कोडीमध्ये व आसपास गावात जी उडप्पी हॉटेल आहेत, त्यामध्ये कांदा उत्तप्पा जबरी मिळतो, रेलवे रूट मध्ये तेथून जवळच रायबाग स्टेशनवर देखील.

उपेक्षित's picture

29 May 2017 - 10:45 am | उपेक्षित

स्टेशन चुकलात काय राजे ? :) रेल्वेच्या धाग्यावरील प्रतिसाद इथे आलाय बहुतेक माग काढत :)

दशानन's picture

29 May 2017 - 10:58 am | दशानन

अरर हो की, स्वारी हो!

संपा प्लिज प्रतिसाद काढा हो येथून चांगल्या लेखाला गालबोट लागल्यासारखा दिसत आहे येथे। :(

अनुप ढेरे's picture

29 May 2017 - 11:42 am | अनुप ढेरे

मस्तं लेख! हिँदुस्तानचा स्लाइसब्रेड विशेष असतो. तुपावर भाजुन नुसता खायलापण छान लागतो.

सरनौबत's picture

29 May 2017 - 12:06 pm | सरनौबत

अगदी खरंय. ब्रँडेड बिस्किटांसारखी सुबक नसली तरी चवीला मस्त लागतात 'भाजून आणलेली' बिस्किटे. पूर्वी तूप, मैदा, साखर सामान नेऊन द्यायचं आणि नंतर बिस्किटे घेऊन येण्यात मजा होती. आता ट्रॅफिक मुले २ वेळा जाणं जीवावर येतं म्हणून 'तयार भाजलेली बिस्किटे' आणतो.

लेख अतिशय आवडला. मिपावर अजिबात यायचे नाही प्रतिसाद द्यायलाही हा पण मोडावा लागला या लेखामुळे!
कयानी बुधानी द्वयीबद्दल वाचताना अगदी अगदी झाले .
अगदी परवाच या सर्व ठिकाणांना भेट देऊन आलेय.

ताज्या ब्रेडसारखा लुसलुशीत अन खुसखुशीत लेख !
बेकरी प्रॉडक्टस कितीही बदनाम होवोत, खारी, बटर, पाव, केक आहेत तोवर सकाळ संध्याकाळ चविष्ट आहेत !!

अनुप ढेरे's picture

31 May 2017 - 4:32 pm | अनुप ढेरे

कायप्पावर आला हा लेख आजच. तुमचं नाव नव्ह्तं लेखक म्हणुन :(

पावामध्ये अंडे घालतात म्हणे..!!

खरे आहे का हे ?

खरे असेल तर बहुतेक जणांचे शुद्ध शाकाहारित्व बाटला जाईल

मुक्त विहारि's picture

10 Jun 2017 - 11:37 am | मुक्त विहारि

पुर्वी एखाद्या गैर ख्रिचन व्यक्तीने पाव किंवा पाव टाकलेले पाणी जरी प्यायले, तरी त्या व्य्क्तीला ख्रिचन होणे भाग होते.

हा फंडा पौर्तुगीझांनी गोव्यात अवलंबला होता, असे वाचनात आलेले होते.

मुक्त विहारि's picture

10 Jun 2017 - 11:49 am | मुक्त विहारि

पण लेखनशैली आवडली.

बादवे,

तुम्ही जर खरेच बेकरीच्या पदार्थांचे शौकीन असाल तर, नागपूरच्या अजित बेकरीला भेट देवून या. पुण्यातील कुठल्याही बेकरी पेक्षा नक्कीच उत्त्म पदार्थ मिळतात आणि हो त्यांच्या नागपूरला बर्‍याच शाखा पण आहेत.धंदा कसा करावा? हे पुणेकरांना अजिबात समजत नाही, हेच खरे.

आणि मग नागपूर झाले की, सरळ रामदासांना घेवून फोर्टातल्या पारश्याकडे जायचे. (रामदासांना न घेता फोर्टात जाणे आणि बायकोला बरोबर न घेता मेहूण म्हणून जेवायला जाणे, हे एकच...जेवायला मिळते पण...... जावू दे....परत एकदा रामदासांबरोबर फोर्टात जाणे आले.किती साधी आकांक्षा पण तीही आज-काल पुर्ण होत नाही.)

तो पारशी प्रचंड तर्‍हेवाईक आहे, पुण्यातील दुकानदार पण त्याच्यापुढे एकदम मवाळ होतात, असे ऐकिवात आहे. शंकेखोरांनी एकदा त्या पारश्याला भेट द्यावी.त्याने काही तिरसटपणा तुमच्याबरोबर केला तर आम्ही जबाबदार नाही.

सरनौबत's picture

4 Jul 2017 - 7:08 pm | सरनौबत

नागपूर ला जाण्याचा योग आल्यास नक्की जाईन 'अजित' ला :-)

मुक्त विहारि's picture

5 Jul 2017 - 3:54 pm | मुक्त विहारि

"अजित" बेकरीचा मालक काही माझ्या परिचितांपैकी नाही किंवा नातेवाईकही नाही. त्यामुळे उगाच त्यांची जाहीरात करण्याचे मला प्रयोजन नाही.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2017 - 3:28 pm | श्रीगुरुजी

आजच संतोष बेकरीत जाऊन भरपूर खरेदी केली.