मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आधी नाकाने, मग जीभेने

सरनौबत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आधी नाकाने, मग जीभेने खाद्यपदार्थांची चव घेताना जीभ ह्या इंद्रियांच्या सिंहाचा वाटा असला तरी डोळे आणि नाक ह्यांचे देखील बरेच महत्व आहे. पुलं नि 'अपूर्वाई' मध्ये फ्रेंच जेवणाचे त्याच्या उत्कृष्ट प्रेझेंटेशन मुळे; 'आधी डोळ्यांनी, मग जीभेने' असे वर्णन केले आहे. भारतीय जेवणात देखील रंगसंगती आणि मांडणीचा विचार करून पान वाढण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. मला असं वाटतं कि आपले अनेक खाद्यपदार्थ 'सर्वात आधी नाकाने, मग डोळ्याने आणि नंतर जीभेने' अनुभवायचे असतात. पुरणपोळीच्या खमंग वासापासून ते अगदी अंबाडीच्या भाजीवर लसणाच्या फोडणीपर्यंत शेकडो वास भूक चाळवतात. पण माझ्या विशेष आवडीचा वास म्हणाल तर बेकरी मध्ये येणारा गोडसर खमंग वास. हा वास मला भर्रकन भूतकाळात घेऊन जातो आणि ‘nose’talgic करतो…. माझं आजोळ म्हणजे पुण्यापासून ५५ किलोमीटर असलेलं भोर नावाचं गाव. बसस्टॅन्ड वरून आजोबांच्या घरी जाताना वाटेत 'श्रीराम' बेकरी लागायची. तिथे तयार होत असलेल्या बिस्किटांचा गोडसर वास; बेकरी यायच्या २-३ मिनिटे आधीपासूनच यायला लागायचा. तिथला सुवास साठवून घेत-घेत 'जीरा बटर' घेऊन यायचं. ते चहात टाकून 'कडे-कडेने' चहा प्यायचा. नंतर ते टम्म फुगलेलं बटर चमच्याने खायचं. मला सांगा सुखं म्हणजे अजून काय असतं? मला चहाबरोबर बिस्किटांऐवजी खारी, टोस्ट, बटर हे त्रिकुट जास्त आवडतं. लहानपणी एक मुसलमान माणूस अल्युमिनियम ची पेटी डोक्यावर घेऊन हया गोष्टी घरोघरी विकायला यायचा. त्यात ह्या पदार्थांबरोबर नाजूक-पांढरी 'नानकटाई' देखील असायची. मिशी नाही आणि लांब दाढी वाढवलेला माझ्या माहितीतला हा पहिलाच माणूस. पुण्यात घोले रोड वरची 'संतोष बेकरी' अशीच आपल्या आसुसलेल्या नाकाला भरपूर 'संतोष' देते. सकाळी ९:३० च्या सुमारास गेल्यावर पॅटिस, क्रीमरोल, केक, ब्रेड इत्यांदींचा मिश्रणाचा एक अदभुत वास आसमंतात दरवळत असतो. ह्या वासांमधून केक चा गोड वास, टोस्ट-बटर चा मध्यम गोड वास आणि पॅटिस आणि आतल्या सारणाचा तिखटसर वास हुडकायला थोडीफार प्रॅक्टिस लागते. जास्त तपश्चर्या केल्यास बेकरीजवळून नुसतं दुचाकीने गेलं तरी देखील केवळ वासावरून कुठला माल भट्टीतून काढत आहेत हे ओळखू शकतो. ब्रेडला देखील स्वतःची खास चव असते हे अश्या ठिकाणचा ब्रेड खाल्ल्यावर समजतं. 'ब्रँडेड' ब्रेड् पेक्षा अश्या ठिकाणी मिळणारा ब्रेड स्लाइस (अमूल बटर लावून) चहासोबत खाऊन पहा. केवळ मऊ-लुसलुशीत म्हणजे उत्तम ब्रेड नव्हे. ह्या ब्रेड ची कड भले थोडी 'कड'क असेल, पण चहात बुडवून खाताना फारच अप्रतिम लागते. ताजा ब्रेड तिकडेच मशीन वर कापून कागदात बांधून देतात. तो घरी आणून चहा होईपर्यंत धीर निघत नाही. कुठल्याही नवसाशिवाय ही बेकरी मला 'पाव'ते. पुण्यात मेट्रो प्रकल्प होईल तेव्हा होईलच; पण त्या आधी संतोष बेकरी शेजारी एखादे 'अमृततुल्य' काढण्याची जास्त गरज आहे! ह्या बेकरी मुळे एखाद्याची बेकारी दूर होईल. बेकरी शेजारी चहाचे दुकान असल्यास ‘GST मधून ५ वर्षे सूट' सारखा काहीतरी कायदा लवकर आणायला हवा. मोदी स्वतः चहा विकायचे, त्यामुळे ते तरी ह्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील ही आशा आहे. हिंदुस्थान बेकरी आणि न्यू पूना बेकरी चे देखील काही पदार्थ आवडतात. मात्र 'हिंदुस्थान बेकरी' पेक्षा 'पॅटिस संपले' हा बोर्ड जास्त ठळकपणे दिसतो. आणि पूना बेकरी चे पॅटिस बरे असले तरी मला तिकडे २ कारणांसाठी जायला आवडत नाही. एकतर पुणे ला पूना म्हणलेलं आवडत नाही. दुसरं म्हणजे ती अप्पा बळवंत चौकात आहे, तिकडे जाताना CA इन्स्टिटयूट दिसते आणि CA च्या वेळी केलेली जागरणं आणि अभ्यास आठवून पॅटिस घशाखाली उतरत नाही. नवी हॉटेल्स 'माऊथ पब्लिसिटी' मुळे चालतात. मात्र अनेक बेकऱ्या 'नोज पब्लिसिटी' मुळे चालत असाव्यात. मी स्वतः अशी अनेक ठिकाणं 'वास लागल्यामुळे' शोधली आहेत. पेरूगेट वरून बाजीराव रोडकडे जाताना असाच एकदा बेकरीचा गोड वास आल्याने तिथेच थांबलो. रस्त्यावर कुठेच बेकरी दिसेना. नाकावर पूर्ण विश्वास असल्याने शोधमोहीम चालू केली. तेव्हा एका बिल्डिंग च्या अगदी आतल्या भागात लपलेल्या 'मनोहर बेकरी' चा शोध लागला. दुपारची वेळ असल्याने बरेचसे पदार्थ संपले होते. मग भट्टीतून नुकत्याच काढलेल्या बन-पावाची मान मुरगाळून 'बेकरी ईद' साजरी केली. आता कधीही त्या भागात जाणे झाले कि 'आहे मनोहर बेकरी'. पुण्यातील बेकरी चा विषय 'कयानी बेकरी' चा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तिथल्यासारखी श्रुजबेरी बिस्किटे आणि प्लेन केक आख्ख्या जगात कुठेही मिळत नसावीत. तशी श्रुजबेरी बिस्किटे आणि केक अनेकांनी बनवून पाहिले. पण ओरीजिनल किशोर कुमार ची आणि कुमार सानू ने त्याची गायलेली गाणी इतका फरक दोन्हीत आहे. शोले च्या गब्बर स्टाईल मध्ये विचारावंस वाटतं कि ‘ये कयानी वाले अपने केक में कौनसे चक्की का पीसा मैदा डालते हैं रे’? कॅम्प मध्ये जाऊनदेखील बुधानी वेफर्स आणि कयानी चा केक न घेणाऱ्या लोकांचे आधार कार्ड जप्त केले पाहिजे असे माझे (प्रांजळ!) मत आहे. नाकाचा पुरेपूर वापर हि केवळ मुकेश आणि हिमेश ची मक्तेदारी नाहीये. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे जरी चांगलं नसलं तरी प्रत्येक खाद्यपदार्थाचा 'आधी नाकाने, मग डोळ्याने आणि नंतर जिभेने' आस्वाद घ्यायला हवा. असं केल्यास नाकाला घ्राणेंद्रिय ऐवजी खाणेंद्रिय म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. आताच्या मुलांच्या आरोग्यविषयक कल्पना ऐकल्या कि एकूणच बेकरी व्यवसाय केवळ बर्थ-डे pastries बनवण्याइतपतच राहील कि काय अशी धास्ती वाटते. ताजे पोहे- उपमा सोडून preservatives घातलेले (आणि अनेक महिन्यापूर्वी बनवलेले) कॉर्न फ्लेक्स आणि ओट्स अनेक जण खातात. खारी-टोस्ट ऐवजी high-fibre ची Digestive बिस्किटे खाताना पाहिलं कि माझ्या चहातील बटर फुगेनासे होते. प्रख्यात dietitian ऋजुता दिवेकर ह्यांनी 'खारी-टोस्ट-बटर' प्रकृतीस कसे चांगले आहे ते पटवून देऊन थोडा 'खारीचा वाटा' उचलावा अशी विनंती आहे. सरकारने देखील खारी-टोस्ट-बटर खपावेत म्हणून पुढच्या वेतन आयोगात 'बेकरी भत्ता' समाविष्ट करावा. पाश्च्यात्य देशांत जेवणापूर्वी वाईन चा ग्लास उंचावून 'टोस्ट' देण्याची पद्धत आहे. आपल्याकडे सुद्धा एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात 'टोस्ट' घेऊन 'चियर्स' ची प्रथा सुरु करायला हवी. आवडत्या दुपारची माझी अशी कल्पना आहे - पावसाळी हवा असावी. अंबाडीची भाजी, भाकरी आणि भात असं आटोपशीर दुपारचं जेवण झालेलं असावं. आवडते पुस्तक वाचत आरामखुर्चीतच डोळा लागावा. पावसाच्या सरीने आणि चहाच्या वासाने ४ च्या सुमारास जाग यावी. चहाबरोबर (सकाळी आणलेली) पिळाची खारी असावी. खारी चहात बुडवून खावी.. आणि रेडिओ वर दिलीप कुमार वैजयंतीमाला च गाणं लागलेलं असावं "नैन लड़ जइ हैं तो मनवामा कसक होई "बेकरी".

वाचन 9361 प्रतिक्रिया 0