३-६ फेब्रुवारी या काळात ट्विटरवरील @marathiword या हँडलने ट्विटर्संमेलन हा उपक्रम आयोजित केला होता. हे या उपक्रमाचं दुसरं वर्ष होतं. मराठी साहित्य संमेलनाच्या जोडीने आयोजित होणार्या या उपक्रमाला पहिल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सोशल मिडियावरील मराठीचं अस्तित्व भक्कमपणे समोर येणं, मराठी मंडळींना सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठीची एक विशेष संधी, अवसर मिळणं ही या उपक्रमाची निवडक उद्दिष्ट.
उपक्रमाच्या आयोजकांतर्फे या वर्षी मला यातील 'ट्वीटव्याख्यान' सदरात सहभागी होण्याचं निमंत्रण आलं. मराठी भाषेसंदर्भातला एक विषय घेऊन त्यावर दिलेल्या वेळात ट्वीट करायचं होतं, आणि ट्विटरकरांशी संवाद साधायचा होता. त्यांची विनंती स्वीकारून मी 'मराठी भाषेत संवाद साधताना सामान्यतः होणार्या चुका' या विषयावर ट्वीट केलं. हा अनुभव छान होता, आणि तो मिपाकरांसोबत वाटण्यासाठी हा धागाप्रपंच.
आजचं युग हे सोशल मिडिया चं युग मानलं जातं, आणि ते तसं आहेच. माणसाला जिथे भेटीगाठींसाठी आणि व्यक्त होण्यासाठी वेळ कमी उरलेला आहे तिथे इंटरनेट, मोबाईल या साधनांमुळे तो या गोष्टी तितक्याच सहजतेने करू शकतोय. सोशल मिडिया म्हटलं की फेसबुक आणि ट्विटर या दोन प्रमुख नावांशिवाय पुढे जाता येत नाही. त्यापैकी फेसबुक हे काहीसं मनोरंजनात्मक व्यासपीठ असलं तर ट्विटर हे त्या तुलनेत अधिक मुद्देसूद आणि विषयवार चर्चा करायचं ठिकाण आहे असं म्हणायला हरकत नाही. या ट्विटरवर जरी जगभरातले लोक व्यक्त होत असले तरी गेल्या काही वर्षात ट्विटरवर मराठीचा वापर बराच वाढला आहे आणि त्याला चालना देण्यासाठी काही ट्विटर हॅन्डल्स उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
हे माझं भाग्य होतं कि @marathiword ने मला ही संधी दिली. मी निवडलेला विषय तसा बराच व्यापक होता आणि वादप्रवण होता.
शिवाय मी व्याकरणाबद्दल अधिकारवाणीने बोलू शकेन इतकी माझी पात्रताही नाही. असं असलं तरी त्याबद्दल वाटणार्या तळमळीपोटी मी हा विषय निवडला आणि माझ्या परीने त्याचं गमक लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला.
मराठी व्याकरण म्हटलं तर सोपं, आणि म्हटलं तर क्लिष्ट वाटू शकतं. पण सद्य काळात मराठी शाळांची कमी होणारी संख्या, लोकांचा इंग्रजी माध्यमाकडे असणारा ओढा, मराठीचा वृथा न्यूनगंड, या सगळयामुळे शिकल्या, बोलल्या, आणि लिहिल्या जाणाऱ्या मराठीचा दर्जा प्रचंड घसरलेला आहे. त्यात त्याला सोयिस्करपणे जातीयवादाचं, किंवा बोली विरुद्ध प्रमाण अशा वादाचं वळण दिलं जातं. त्यामुळे त्याचं पर्यवसान मराठीच्या एकूणच दुरावस्थेत होत जातं.
ट्विटरसंमेलनाद्वारे मला प्रत्येक मराठी माणसाला हेच सांगावंसं वाटलं, की आज आपण एकत्रितपणे मराठी म्हणून ओळखले जातो. आपल्यातला दुवा, आपली ओळख आहे ती म्हणजे आपली भाषा. ती नुसती राखून उपयोग नाही तर शुद्धही राखली पाहिजे. तिच्या बोलीभाषांनाही जपलं पाहिजे. भाषेच्या नावावर जर आपल्यात भिन्नता आली तर ती आपल्या सगळ्यांसाठी आणि मराठी भाषेसाठी घातक असेल. तेंव्हा सगळे मिळून व्याकरणाचा आग्रह धरायला हवा, सुधार करायला हवा. प्रमाणभाषा शुद्ध आणि बोलीभाषा समृद्ध करणं हे मराठी म्हणून मला आपल्या सगळ्यांचं कर्तव्य वाटतं.
मला माझं हे कर्तव्य करायला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल @marathiword च मनापासून कौतुक करावंसं वाटतं. अधिक विश्लेषण न करता 'ट्वीटव्याख्यान' साठी केलेली काही निवडक ट्वीट्स इथे देत आहे.
या उपक्रमाची एक ई-पुस्तिका निघणार आहे. ती प्रकाशित झाल्यावर मिपावर त्याचा दुवा देईन.
प्रतिक्रिया
29 Mar 2017 - 12:44 pm | संजय क्षीरसागर
टेक्स्टफॉर्ममधे इथे देता येईल का ? आवडीचा विषय आहे.
त्यात त्याला सोयिस्करपणे जातीयवादाचं, किंवा बोली विरुद्ध प्रमाण अशा वादाचं वळण दिलं जातं. त्यामुळे त्याचं पर्यवसान मराठीच्या एकूणच दुरावस्थेत होत जातं.
हे निरीक्षण भारीये !
29 Mar 2017 - 1:02 pm | वेल्लाभट
टेक्स्टमधे ट्विटरवर आहेच. तुम्ही डायरेक्ट बघू शकता. तसं शक्य नसेल तर देता येईल इथे टेक्स्ट त्यात काही अडचण नाही फक्त जरा वेळ लागेल चोप्यपस्ते करत जायला.
29 Mar 2017 - 1:17 pm | संजय क्षीरसागर
कारण ट्वीटर वापरत नसल्यानं, मला काही सापडलं नाही .
29 Mar 2017 - 7:38 pm | यशोधरा
मराठीसंबंधी उपक्रमाबाबत बोलायचे आहे, मराठीचे महत्व सांगायचे आहे, तर मग मराठी शब्दांचा जमेल तितका वापर करुयात.
डायरेक्ट = थेट
टेक्स्ट = मजकूर
उपक्रम चांगलाच आहे.
29 Mar 2017 - 8:03 pm | वेल्लाभट
नोंद घेतो.
टेक्स्ट हा शब्द संक्षींनीच वापरलेला होता त्यामुळे मीही तोच वापरला. तरीही तुमच्या निरीक्षणाचं कौतुक वाटतं.
29 Mar 2017 - 8:05 pm | यशोधरा
कोणी का वापरा, मराठी वापरा :)
29 Mar 2017 - 12:50 pm | कंजूस
ट्विटरवर हे माध्यम काही उपयोगाचे नाही.
29 Mar 2017 - 1:03 pm | वेल्लाभट
कसं काय बुवा?
29 Mar 2017 - 1:04 pm | संजय क्षीरसागर
पण ट्वीटरचा वापर लोक्स सर्रास करतांना दिसतात. भल्याभल्यात ट्वीटसंग्राम चालू असतो. हे कसं ?
29 Mar 2017 - 2:01 pm | कंजूस
प्रसिद्ध व्यक्ती त्यांचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवू शकतात एका झटक्यात, पेपरवाल्यांने पाय धरावे लागत नाहीत छापाछापा . उलट पेपरवाल्यांनी फौज ठेवलिये हे लोक काय बोलतात ते वाचायला. सिलेब्रिटिंचे पावरफुल मिडिअम.
शिवाय एर होस्टेसना उपयोगी घरी बातम्या द्यायला पटकन.
एक मजेदार किस्सा माहित असेलच:-
फुटबॅालचे कोच डगाउटमध्ये काय बोलतात ते ऐकू येत नाही पण टिव्हीवर त्यांच्या थोबाडाच्या हालचालींवरून एक बया घरी बसल्या ट्विटरवरून टकायची फास्ट. शेवटी कोचलोकांना तंबि आली तोंड हलवू नका.
29 Mar 2017 - 8:08 pm | वेल्लाभट
हायला! हे नवीन कळतंय. भारी आहे. वाचायला हवं याबद्दल.
29 Mar 2017 - 7:04 pm | पिलीयन रायडर
व्याकरण हा महत्वाचा विषय आहे. तो निवडल्याबद्दल अभिनंदन!
तू ह्याबद्दल सांगितल्यावर ट्विटरवर जाऊन तुझे सर्व ट्विट्स वाचले होते. माझ्याही फार चूका होतात लिहीताना. पण आता लक्ष देणे चालु केले आहे. तरी कैकदा खातरी नसते की लिहीतोय ते योग्य आहे की नाही.
आजकाल आली-गेली-पिली-रडली असेही मुली बोलताना दिसतात. माझ्या मुलालाही हिंदी कार्टुन पाहुन "घरला चला" असं म्हणायची सवय लागली होती. आपण शुद्ध बोलत राहिलो तरच पुढची पिढी व्यवस्थित मराठी बोलेल. नाही तर तू म्हणतोस तसं आज मी ब्रश केलं सारखं मराठी सर्रास वापरल्या जातच आहे. किमान कोणत्या तरी एकाच भाषेत संपुर्ण वाक्य बोलावे इतके तरी पाळायला हवे.
#बोलतोमराठी आणि नुसतंच नाही तर #बोलतोशुद्धमराठी !!
29 Mar 2017 - 8:07 pm | वेल्लाभट
धन्यवाद पिरा.
चुका होतात; सगळ्यांच्याच होतात. हरकत नाही, सुधारत राहिलं की झालं.
29 Mar 2017 - 7:18 pm | एस
शुद्धलेखनाच्या काही चुका टाळायला हव्या होत्या असे वाटले, उदा. 'सोयीस्कर', 'पर्यावसन', 'दुरवस्थेत' इत्यादी.
29 Mar 2017 - 8:05 pm | वेल्लाभट
सोयीस्कर - मान्य.
पर्यावसन नाही पर्यवसानच आहे. शब्दकोषात तपासले.
दुरवस्थेत ही टंकनचूक आहे.
धन्यवाद.
29 Mar 2017 - 7:28 pm | पैसा
हे सगळे नेटाने चालू ठेव.
29 Mar 2017 - 8:05 pm | वेल्लाभट
हो नक्कीच पैतै.
31 Mar 2017 - 5:03 pm | वेल्लाभट
या संमेलनाची स्मरणिका गूगल प्ले वर उपलब्ध झालेली आहे.
https://play.google.com/store/books/details?id=md6EDgAAQBAJ
1 Apr 2017 - 1:46 am | शलभ
मस्त उपक्रम
1 Apr 2017 - 6:34 am | कंजूस
संपादन असले तर चुकलेले शब्द इथेही सुधारले असते.