मी बाई होते म्हणुनी - भाग १४

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
7 Mar 2017 - 4:35 pm

आमच्या वाड्यापासुन वनविहाराची नवीन जागा बरीच लांब होती, तिथे पोहोचेपर्यंत कुणीच काही बोललं नाही, असे ही त्या रथाच्या खडखडाटामध्ये काही ऐकु येणं शक्य ही नव्हतं. आम्ही वनाजवळ पोहोचलो आणि रथातुन उतरुन विश्रांतीस्थळाकडे चालत निघालो, दहा बारा योजने चाललो तेवढ्यातच राजा दशरथ आणि राजकुमार आल्याची सुचना घेउन एक सैनिक आला, आम्ही त्यांच्या स्वागतासाठी होतो तिथेच थांबलो. राजा दशरथ स्वत्ः सगळ्यांत पुढे होते, त्यांच्या डाव्या बाजुला राम आणि भरत तर उजव्या बाजुला लक्ष्मण आणि शत्रुघ्न होते. काका एकटेच त्यांच्या स्वागतासाठी पुढे गेले.

दोन मोठया राजांच्या प्रत्येक हालचालीत अन शब्दांतुन प्रत्यक्ष राजव्यवस्थेचे अन् वागण्याचे धडे मिळत होते. एकमेकांच्या शक्तीचा अन मानाचा पुर्ण आदर ठेवत असतानाच आपल्या स्वताचा अभिमान अन स्वतंत्रता अबाधित ठेवत कसं वागायचं याचं उत्क्रुष्ट प्रात्याक्षिक आम्हाला पाहायला मिळत होते. आज पुन्हा एकदा चारही राजकुमारांची काकांबरोबर ओळख करुन दिली. प्रत्येक राजकुमारानं नम्रपणे काकांना नमस्कार केला. हे सगळं होत असताना ताई मात्र रामाकडेच पाहात होती. तिच्या पाहण्यात एक अधिकार होता. आम्ही तिघी मात्र थोडयाश्या बाजुलाच उभ्या होतो.

वातावरणात एक प्रकारचा ताण होता, तो कशाचा होता हे काही केल्या कळेना, श्रुतकिर्ती आणि मांडवी, ब-याच शांत वाटत होत्या, मी मात्र उगाच वक्रखड्गाच्या मुठीवर हात ठेवुन उभी होते, काकांनी आमच्या कडे पाहिलं अन् आम्हाला पुढे बोलावलं, ठरल्याप्रमाणे आधी ताई पुढे झाली, तिनं राजा दशरथांना नमस्कार केला, नंतर आम्ही तिघी. सुरुवातीचे हे आचार संपल्यानंतर आम्ही जवळच उभारलेल्या एका पर्णकुटीकडे गेलो, तीस पुरुष लांब व तितकीच रुंद अशी ती पर्णकुटी एखाद्या सभेसारखी सजवलेली होती, आतमध्ये सोळा आसनं वर्तुळाकार मांडलेली होती, प्रथम राजा दशरथ आणि काका बसले मग आम्ही सगळे. दशरथांनी राजकुमारांची आम्हाला ओळख करुन दिली, ‘ हा कौसल्यापुत्र राम, हे दोघे लक्ष्मण आणि शत्रुघ्न सुमित्रेचे पुत्र आणि हा भरत कैकेयीचा.’ काकांनी आमची नावं सांगितली, आणि त्यानंतर ती दोघेच उठुन एका बाजुला निघुन गेली, काही बोल्यण्यासाठी. इथं येताना बरोबर शस्त्र आणणारी मी एकटीच नाही हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं, पण भरत आणि शत्रुघ्नाकडे एकहि शस्त्र नसावं हे मला काही पटलं नाही. किंवा माझं शस्त्र आणण्याचं कारण काय होतं, हे देखील आता मला निटसं आठवेना.

रामानं मोठेपणा घेऊन आम्हां सर्वांना बसायला सांगितले. त्या वर्तुळाकार आसनांवर आम्ही सगळे जण बसलो, राम आणि लक्ष्मणाने आपले धनुष्य आणि बाणाचे भाते आसनांच्या बाजुला ठेवले. ताईनं मला खुणावलं आणि मी देखील माझे खड्ग काढुन आसनावर ठेवलं. काही काळ कुणीच काही बोलत नव्हतं. अशा प्रकारे राजकुमारांना भेटायची जशी आमची पहिलीच वेळ होती तशीच त्या चौघांची पण आहे हे आताशा लक्षात आले होतं आणि त्यानं माझा बराच ताण कमी झाला.

‘आपण दोघांनी बराच काल वनांमधल्या आश्रमांमध्ये घालवला आहे हे खरे आहे का ? ताईच्या या प्रश्नानं शांततेची कोंडी फुटली. ‘ होय, काही कालापासून आम्ही दोघं या आश्रमांत होणा-या यज्ञ आणि इतर धार्मिक अनुष्ठाने यांचे अधार्मिक प्रवृत्तीपासून रक्षण करण्याचे राजा दशरथांचे कार्य त्यांच्या आज्ञेनुसार पार पाडत आहोत. त्याच आश्रमात आम्हाला या स्वयंवराबद्दल समजले होते. रामाने उत्तर दिले,

‘आणि आम्हाला ते दिव्य धनुष्य पाहायचे होते, त्याबद्दल आम्ही बरीच वर्षे ऐकून होतो, आपल्या वडिलांना ते प्रत्यक्ष श्री परशुरामांनी दिले होते असे ऐकले आहे आम्ही.’ वातावरणात आलेला सहजपणा लक्ष्मणाच्या या शब्दांनी सुचित होत होता. आमच्या एकमेकांशी बोलण्याच्या अन पाहण्याच्या काही सहज प्रक्रिया दृढ होत होत्या, आता एकत्र संवादांबरोबर आम्ही अधून मधून परस्पर बोलत होतो. बोलण्याचे विषय हे आता राज्यकारणापासून ते धर्मकारणा पर्यंत विस्तारले होते.

काका आणि राजा दशराथ पुन्हा आत येताच आम्ही सगळे शांत झालो, ‘ आम्ही दोघांनी तुम्हां तिघीं करीता योग्य वर सुचवणारा एक प्रस्ताव तुमच्या समोर ठेवायचं ठरवले आहे, पण त्या आधी मी तुम्हाला बोलल्या प्रमाणे, आणि ज्याला राजा दशरथांनी देखील होकार दिला आहे म्हणून तुमच्या अपेक्षा, तुमची स्वप्नं आणि त्यानुसार तुम्ही निवडलेला तुमचा वर याबद्दल तुम्ही सांगावे अशी आमची अपेक्षा आहे.

आम्हां तिघींना असे काही होईल याची अपेक्षाच नव्हती, अर्थात एवढा वेळ आम्ही आमच्या मनाशी काही ठरवले नव्हते असे नाही, परंतु जेंव्हा प्रत्यक्ष निवडण्याची वेळ आली आणि निर्णय घ्यायचा होता, तेंव्हा मला आई इथं असती तर फार बरे झाले असते असे वाटायला लागले. सकाळपासून घेतलेले अवसान गळून पडते कि काय अशी अवस्था झाली, राजा दशरथ व राम कुटीत एका कोप-यात गेले व काही बोलू लागले. काका आमच्या आसनांजवळ आले आणि माझ्या कडे पाहात म्हणाले, उर्मिले काय घेतलास का तुझा निर्णय ?’ अपेक्षित पण तरीही अनपेक्षित प्रश्नाने मी घाबरले, तरी हि अवसान गोळा करून विचारले ‘ काका, कोणत्या गृहीतकावर आधारून मी निर्णय घ्यावा असे वाटते तुम्हाला, काल आणि आज दोन वेळा झालेल्या भेटीवर का आज इथं गेल्या काही वेळ झालेल्या बोलण्यावरून ? खरंतर माझी बुद्धीच काम करीत नाही आता या क्षणि. आणि आई देखील नाही इथं मला काही सांगायला. मला फार अवघड वाटते आहे. मनाचा आणि बुद्धीचा एकमेकांची बलपरिक्षा करण्याचा खेळ काही लवकर संपेल असे वाटत नाही.

‘ अगदी योग्य बोललात राजकन्या उर्मिला,’ हा आवाज राजा दशराथांचा होता, ते आता त्यांच्या आसनावर बसत होते, राम अजून हि कोपऱ्यात उभा होता. ‘ आम्ही दोघे आता बाहेर उभे राहून तुम्हां सर्वांवर लक्ष ठेवूनच होतो. तुमची वागण्याची शैली आणि देहबोली यावर आमचे लक्ष होतेच. निवड करण्यासाठी काही गृहितकं हवीत हे अगदी खरे, परंतु कधी अशा फसव्या गोष्टी माणसाला त्याच्या समोर असलेल्या चांगल्या आणि योग्य गोष्टी निवडू देत नाहीत.

माझ्या, राजा जनकांच्या आणि तुम्हां सर्वांच्या वयात खूप मोठा फरक आहे, या बाबतीत तुम्ही आमच्या बरोबर सगळं स्पष्ट बोलाल अशी अपेक्षा देखील थोडी चूकच आहे. माझा एक प्रस्ताव आहे, अर्थात तुम्हां सर्वांना योग्य वाटत असेल तर ‘, शेवटचे वाक्य बोलताना राजा दशरथ फक्त आम्हां तिघीं कडेच नाही तर तिन्ही राजाकुमाराकडे देखील पाहात होते.

मी ताई कडे पाहेन अशी अपेक्षा असणा-या मांडवी आणी श्रुत्कीर्ती कडे मी पाहिले आणि मग ताईकडे, मला तिच्या डोळ्यात शांतता दिसत होती, ती तशी नेहमीच शांत असे तशी.
...

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964
मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०६ http://misalpav.com/node/36166
मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०७ http://misalpav.com/node/36252
मी बाई होते म्हणुनी . . भाग - ०८ http://misalpav.com/node/36339
मी बाई होते म्हणुनी . . भाग - ०९ http://misalpav.com/node/36429
मी बाई होते म्हणुनी . . भाग - १० http://misalpav.com/node/36490
मी बाई होते म्हणुनी . . भाग - ११ http://www.misalpav.com/node/36541
मी बाई होते म्हणुनी . . भाग - १२ http://www.misalpav.com/node/37010
मी बाई होते म्हणुनी . . भाग - १३ - http://www.misalpav.com/node/39032

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

सूड's picture

7 Mar 2017 - 5:46 pm | सूड

ह्म्म!! पुभाप्र

प्रचेतस's picture

7 Mar 2017 - 5:52 pm | प्रचेतस

उत्तम.

तुम्ही एक दोन भाग प्रकाशित करून पुढचे भाग साताठ महिन्यांनी टाकता ब्वा. तितका वेळ न घेता पटापट पुढचे भाग येऊ द्यात.

किसन शिंदे's picture

7 Mar 2017 - 6:02 pm | किसन शिंदे

शमत. दर आठवड्याला भाग टाकत चला बघू.

एस's picture

7 Mar 2017 - 6:55 pm | एस

पुभाप्र.

इशा१२३'s picture

7 Mar 2017 - 8:09 pm | इशा१२३

मस्त!पु भा प्र

जुइ's picture

7 Mar 2017 - 11:59 pm | जुइ

पुढील भाग लवकर टाका!

रेवती's picture

8 Mar 2017 - 1:44 am | रेवती

वाचतेय.