ब-याच महिन्यांपूर्वी एक कविता वाचण्यात आली होती. वाचता वाचताच तिचा केलेला हा भावानुवाद. मूळ कविता चार्ल्स बुकोवस्की या जर्मनीत जन्मलेल्या रशियन नावाच्या अमेरिकन कवीची.
ओबडधोबड आयुष्य जगलेला हा लेखककवी लहानपणापासून अनेक थपडा खात हेलकावत राहिला. आत्यंतिक छळ, बेदम मार आणि कुचेष्टा हा दिवस आणि रात्रीसारखा त्याच्या आयुष्याचाच एक भाग होता. त्यातच कुठेतरी लिहितं व्हायची इच्छा कशी कोण जाणे मनात दबा धरून राहिली होती.
मात्र प्रकाशकांच्या अगम्य अनुभवांचे धक्के न पचून त्याने लिहिण्याकडे पाठच फिरवली. तसंही त्याच्याभोवतालच्या जगात लेखन उपरं होतंच. ते परागंदा झालं, इतकंच. तिथून पुढे त्या निर्जीव इच्छेची बोच आणि व्यावहारिक जगातल्या तडजोडी तो दारूच्या घोटाबरोबर गिळत राहिला वयाच्या पस्तिशीपर्यंत.
तब्बल अकरा वर्षं एखाद्या दारुड्या कामगाराचं उपेक्षित, हिणकस आयुष्य जगल्यानंतर त्याच्या त्या दबलेल्या इच्छेला पुन्हा जाग आली. भिंतीवर शेवाळं उगवावं तसे त्याचे शब्द पुन्हा उगवले. कोणत्याही निगराणीविना. सुशोभित, देखणं दिसण्याचा अट्टहास न करता. मग मात्र त्याच्या उरलेल्या आयुष्यावर त्याच्या कथा-कविता-कादंब-या बेगुमान वाढत गेल्या. साचलेलं, साठलेलं उमटत सुटलं. अर्थात चार्ल्सचा परिचय हा या धाग्याचा हेतू नसल्याने तो तपशील इथे देत नाही. पण तोवरची उपेक्षा एका दमात झुगारून चार्ल्स लिहिता झाला तो अखेरपर्यंत.
तशी ही कविताही म्हटलं तर त्याच्या आयुष्याचा सारांशच.
--------------------------------
तर लेखन करायचंय तुला.
पण जर ते तुला भेदून स्फ़ोटाप्रमणे बाहेर येत नसेल.
सर्व काही असूनही
तर नको.
परवानगीची पर्वा न करता आगंतुकासारखे ते तुझ्या हृदयातून, मनातून, तोंडातून आणि आतड्यातूनही बाहेर येत नसेल..
तर नको.
जर तुला तासन तास कळफ़लकाकडे पाहत बसावे लागत असेल
शब्द शोधत.. तर नकोच.
पैसा. प्रसिद्धी. शेजेला सोबत.
यासाठीही नको.
तिथं बसून अनेकवार पुनर्लेखन करण्यासाठी नको.
लिहिण्याचा विचार करणंही तुला कष्टाचं वाटत असेल तरी नको.
'त्यांच्यासारखं लिहावं' हा प्रयत्न करत असशील तर...
मग विसरूनच जा.
धुमसणारं, रोरावणारं ते काहीतरी तुझ्या आतून बाहेर पडावं म्हणून वाट बघावी लागत असेल, तर धीर धर.
नाहीच काही घडलं तर मग वेगळी वाट धर.
लिहिलेलं कोणालातरी वाचून दाखवावं लागत असलं..
तर तयार नाहीयेस तू अजून.
नको होऊस लेखक असणाऱ्या शेकडोंसारखा.
आणि स्वत:ला लेखक म्हणवणाऱ्या इतर हजारोसारखा.
नको होऊस कंटाळवाणा. अहंमन्य. स्वप्रेमात संपून गेलेला.
निव्वळ वाचकाच्या जांभईचा धनी.
जोवर अग्निबाणासारखं जळत ते तुझ्या आत्म्यातून झेपावत नाही.
जोवर निष्क्रीय, नि:शब्द राहणं तुला मरणप्राय वाटत नाही.
जोवर तुझ्यातली अंतस्थ धग तुझ्या धमन्या जाळत नाही.
तोवर नको लिहूस.
जर ती वेळ आलीच असेल आणि..
जर तुझी निवड झालीच असेल
तर ते स्वत:च उमटत जाईल तुझ्यातून. तुझ्या आतून.
उमटतच राहील.
तुझं अस्तित्त्व संपेतो.
किंवा मग तुझ्यातलं त्याचं अस्तित्त्व संपेतो.
दुसरा कोणताही मार्ग नाही.
कधी नव्हताच.
प्रतिक्रिया
13 Sep 2016 - 4:49 am | शिवोऽहम्
"धुमसणारं, रोरावणारं ते काहीतरी तुझ्या आतून बाहेर पडावं म्हणून वाट बघावी लागत असेल, तर धीर धर.."
सुंदर भावानुवाद!
13 Sep 2016 - 5:41 am | रुपी
छान .. आवडलं!
13 Sep 2016 - 6:18 am | चित्रगुप्त
छान. फडके, यांची पुस्तके टनावरी का आणि जीए, नेमाडे यांची बोटावर मोजण्याएवढीच का याचा उलगडा या काव्यातून होतोय ??
13 Sep 2016 - 6:18 am | चित्रगुप्त
फडके, काकोडकर असे म्हणायचे होते.
13 Sep 2016 - 8:08 am | बहुगुणी
ही कविता इंग्लीशमध्ये द्याल का? धन्यवाद!
13 Sep 2016 - 8:42 am | अजया
फार छान जमलाय भावानुवाद.
किती दिवसांनी इनि लिहिती झाली! वेलकम बॅक आणि लिहितच रहा आता!
24 Sep 2016 - 3:56 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
+१
13 Sep 2016 - 9:52 am | किसन शिंदे
भावानूवाद आवडला. :)
हे जामच पटलं.
13 Sep 2016 - 11:12 am | सानझरी
अनुवाद छान जमलाय!..
चार्ल्स बुकोवस्कीची 'There's a bluebird in my heart' कविता फार मनस्वी आहे.
there's a bluebird in my heart that
wants to get out
but I'm too tough for him,
I say, stay in there, I'm not going
to let anybody see
you.
there's a bluebird in my heart that
wants to get out
but I pour whiskey on him and inhale
cigarette smoke
and the whores and the bartenders
and the grocery clerks
never know that
he's
in there.
there's a bluebird in my heart that
wants to get out
but I'm too tough for him,
I say,
stay down, do you want to mess
me up?
you want to screw up the
works?
you want to blow my book sales in
Europe?
there's a bluebird in my heart that
wants to get out
but I'm too clever, I only let him out
at night sometimes
when everybody's asleep.
I say, I know that you're there,
so don't be
sad.
then I put him back,
but he's singing a little
in there, I haven't quite let him
die
and we sleep together like
that
with our
secret pact
and it's nice enough to
make a man
weep, but I don't
weep, do
you?
Charles Bukowski
13 Sep 2016 - 11:39 am | इनिगोय
हे लेखनही त्याच्या आयुष्याला साजेसंच.
त्याच्या थडग्यावर 'Don't Try' असे दोनच शब्द लिहून ठेवलेले आहेत. प्रयत्नपूर्वक, आटापिटा करून जिंकण्याचा लेखन हा प्रांत नाही, तो निळा रंग मुळातच असावा लागतो हे त्याने अखेरीसही बजावून सांगितलं आहे.
13 Sep 2016 - 12:10 pm | आदूबाळ
याची आठवण झाली. कदाचित बुकोवस्कीची दुसरी बाजू?
काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
प्रकाशाचे
पंख सान;
निळी चोच
निळी मान;
निळे डोळे
निळे गान;
निळी चाल
निळा ढंग;
त्याने चढे
आकाशाला
निळा रंग.
असली ही
जात न्यारी
बसे माझ्या
निंबावरी;
पृथ्वीमध्ये
पाळे खोल;
तरीसुद्धा
जाई तोल;
...अनंताचा
खड्डा खोल.
तर्काच्या या
गोफणीने
फेकितसे
काही जड;
आणि पाने
आघाताने
करतात
तडफड;
टिकाळीला
निळा पक्षी
जसा धड
तसा धड;
...उंच जागा
अवघड.
याचे गान
याचे गान
अमृताची
जणू सुई;
पांघरूण
घेतो जाड,
तरी टोचे;
झोप नाही
जागविते
मेलेल्याला;
जागृतांना
करी घाई.
याचे गान
याचे गान
स्वरालाच
नुरे भान.
नाही तार
नाही मंद्र;
...चोचीमध्ये
धरी चंद्र.
काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
- विंदा करंदीकर
13 Sep 2016 - 7:26 pm | सानझरी
वाह!!! सुंदर कविता..
13 Sep 2016 - 7:57 pm | पिलीयन रायडर
फारच सुंदर!
ह्या धाग्यावरची चर्चा वाचत आहे. इतकं अवघड सहसा कळत नाही. पण वाचुन बोध झालाच तर ज्ञानात बरीच भर पडते, म्हणून प्रयत्न करत रहायचा!
इनिगोय, भावानुवादही आवडला. इंग्रजी कविता समजत नाहीत, तेव्हा भावानुवाद फार कामाला येतात. तुम्झ्यामुळे एक चांगली कविता समजली!
14 Sep 2016 - 2:46 am | रुपी
सुंदर!
14 Sep 2016 - 12:01 pm | सस्नेह
सुंदर कविता आणि सखोल आशय !
14 Sep 2016 - 6:01 pm | पथिक
क्या बात है!!!
"अमृताची सुई"...
अप्रतिमच.
16 Sep 2016 - 3:12 am | अस्वस्थामा
काही वर्षांपूर्वी खूपशा उदासीन अशा काळात ही आमची (इतरत्र) स्वाक्षरी होती खूप दिवस.
भुर्या-करड्या डिसेंबरच्या वातावरणात अशा कविता वाचणं, त्यातले तुकडे आठवणं हे आता nostalgic व्हावं याचीपण गंमत आहे. ;)
[त्यांच्या कवितांची ऑफिशियल जागा इथे. आणि ही अजून एक कवितांसाठीची साईट, तिथे पण आहेत बर्याचशा ]
16 Sep 2016 - 6:58 pm | सानझरी
http://bukowski.net/poems/ या साईट साठी धन्यू.. poemhunter कवितांसाठी लई बेस्ट साईट आहे.
भुर्या-करड्या डिसेंबरच्या वातावरणात अशा कविता वाचणं...
+१११११११
13 Sep 2016 - 11:31 am | सतिश गावडे
छान कविता आहे. भावानुवाद आवडला.
अगदी अशीच जाणिव झाल्याने मी कविता आणि लेख पाडणे बंद केले. आता जेव्हा कधी लिहीतो ते लिहायचं म्हणून ठरवून लिहिलेलं नसतं. जे अगदी आतून येतं त्यालाच मी शब्दरुप देतो.
13 Sep 2016 - 11:49 am | चाणक्य
छान आहे अनुवाद.
13 Sep 2016 - 11:54 am | पद्मावति
खुप छान.
13 Sep 2016 - 12:07 pm | आदूबाळ
कविता एक नंबर आहे. पूर्ण पटली असं म्हणवत नाही. परत येईन या धाग्यावर.
13 Sep 2016 - 12:39 pm | शिव कन्या
सहमत.
13 Sep 2016 - 12:22 pm | नंदन
भावानुवाद, अतिशय आवडला.
13 Sep 2016 - 12:28 pm | अभ्या..
चांगला जमलाय भावानुवाद.
बाकी शब्द कसे येतात ते नाही कळत. एकामागोमाग त्याची रेल्वे कशी बनते, कशी धडधडत पार होते हेही नाही कळले.
असे सलग शब्द उतरताना होणारा गडबडगुंडा झाला की अरुण साधूंच्या मुखवटातील ती कविता करणारी मुलगी (बहुतेक सुलू) आठवते.
13 Sep 2016 - 12:54 pm | शिव कन्या
कागद पेन, स्क्रीन कळफलक ही सगळी लिहायची माध्यम आहेत.
भले माणूस प्रत्यक्ष लिहित नसेल, पण त्याच्याही कळत नकळत जे रवंथ चालू असते ते हळूहळू कागदावर उतरू लागते. त्यासाठी वेळ, अवकाश, व्यासपीठ, प्रयोग इत्यादी लागतात. ते आपसूक लिहिण्याच्या प्रवासात कधी भेटतात, कधी नाही.
कविता [एकूणच सर्जनशील लेखन] ही आकाशातील वीज आहे, ती धरू पाहणारयापैकी ९९ टक्के लोक जळून जातात, आणि १ टक्का टिकतो, या म्हणण्यातील तथ्य परत तपासून पहावेसे वाटते.
तसेच, अनुनय करणारे लेखन असू नयेच, हे मान्य. पण उत्तम, साक्षेपी वाचक हा लेखनाच [लेखकाचा नव्हे] अनेक तर्हांनी उलगडा करणारा तितकाच सर्जनशील घटक असतो.
लेखन, प्रकाशन, यश [हे परत व्यक्तिगत], मान्यता [कुणाकडून] हे सगळे परत परत स्वतंत्रपणे विचार करायला लावणारे घटक आहेत.
13 Sep 2016 - 3:49 pm | आदूबाळ
ललित लेखन करणं ही एक अत्यंत एकलकोंडी प्रक्रिया आहे. आपण आणि कागद/कळफलक एवढंच त्या जगात असतं, बाकी काहीही, कुणीही नसतं. म्हणूनच, लेखन करायच्या आधी लेखकाने "हे सगळं आपण कोणासाठी / कशासाठी करतो आहोत?" हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं असतं.
समजा, त्याचं उत्तर मिळालं "स्वान्तसुखाय. माझं लेखन, माझी खाज." - तर बिन्धास्त हवं ते लिहावं. दिल बेहलाने के लिये लेखनासारखा स्वस्त छंद नाही. एका चोपडीत / प्रायव्हेट ब्लॉगवर बेदम लिहावं आणि कुण्णा कुण्णाला दाखवू नये. कुणी मागितलं वाचायला तरी देऊ नये.
पण.
"आपलं लेखन इतरांनी वाचावं, त्यांना ते आवडावं" अशी तुमची लेखक म्हणून इच्छा असेल तर, बॉस, काही अंशी वाचकानुनय (आणि प्रकाशकानुनय) करणं हे आलंच. प्रत्येक कलानिर्मितीला कन्स्ट्रेन्ट्स असतात. वाचकांची आवड (टेस्ट) हा ललितलेखनातला कन्स्ट्रेन्ट आहे. त्या कन्स्ट्रेन्ट्स सांभाळूनच उत्तम कलानिर्मिती करण्यात मजा असते. (उदा० पारदर्शक वॉटरकलर वापरून अपारदर्शक वस्तूंचा आभास निर्माण करण्यात मजा असते.) "हे कस्न्ट्रेन्ट्स नसते तर जागतिक दर्जाची कादंबरी लिहून दाखवली असती!" असं बांगड्याफोडू वक्तव्य करण्यात अर्थ नाही. "माझी कादंबरी काळाच्या इतकी पुढे होती की कोणाला कळलीच नाही" हा शुद्ध पलायनवाद आहे. अरे, लोकांसाठी लिहीत असशील तर लोकांना कळेल अशा पद्धतीने लिहिणं ही तुझीच जबाबदारी नारे सोन्या?
बुकोवस्कीच्या या कवितेतून "आतून आपोआप आलेलं हेच खरं लेखन" हाही एक चुकीचा, न पटणारा संदेश जातो आहे. योग्य शब्दासाठी अडून बसणं, आपलं समाधान होईपर्यंत वारंवार पुनर्लेखन करणं, चार साक्षेपी लोकांना दाखवणं हे वाईट, कमीपणाचं वाटत असेल तर अवघड आहे. अशांनी फक्त स्वतःसाठी लिहावं, आणि आपल्यापश्चात ते लेखन आपल्यासोबत जाळून/पुरून टाकावं हे उत्तम.
14 Sep 2016 - 12:21 pm | सस्नेह
मला वाटतं,
असं काही या कवितेतून दृग्गोचर होत नसावं. आतून उमलून आलेलं लेखन केव्हाही भिडल्याशिवाय राहत नाही. सूर्यप्रकाशाला जशी कसल्याही प्रमाणपत्राची गरज नसते तसे या अभिजात लेखनाला कसल्याही प्रशस्तीची गरज नसते. असे लेखन जमीन फोडून तरारून उमलणाऱ्या कोम्बासारखे निरलस निखळ असते., हे मान्य करायलाच हवे. तरीही, असा काही संदेश देण्याचा हेतू कवितेत आहे असे वाटत नाही. हे एक स्वगत आहे.
तुमचा मुद्दा आहे वाचकांची टेस्ट सांभाळून लेखन करणे. हेही लेखन उत्तम असू शकते. योग्य शब्द आणि अभिव्यक्तीसाठी पुनर्लेखन करणे चूक नाहीच. पण ते चूक आहे, असे काही कवितेतून प्रसृत होत नाही. तसेच फक्त स्वत:साठीच लिहावे असेही कुठे कवितेतून व्यक्त झालेले नाही.
स्वान्तसुखाय लेखन, जनसुखाय लेखन आणि स्फोटाप्रमाणे भेदून जाणारे अव्वल लेखन हे तिन्ही प्रकार खरेच आहेत आणि अस्सलही !
14 Sep 2016 - 1:56 pm | इनिगोय
अचूक.
तू आणि खाली पैसाताईने म्हटल्याप्रमाणे लेखनाचे उद्देशानुसार वेगवेगळे प्रकार आहेत, आणि त्यातून मिळणारा वाचनाचा आनंदही ''वेगवेगळा'' असणार, ''कमीअधिक'' नसणार.
वाचकांसाठी लिहिताना मुळात लेखनात किती जीव आहे आणि त्यावर प्रसिद्धीसाठीची कलाकुसर किती आहे, हे लक्षात घेतलं तर लेखन वेगवेगळं काढता येईल. अशांमधल्या निव्वळ 'लेखक' म्हणून ओळखलं जाण्यासाठी (बळेच) लिहिणा-यांना उद्देशून ही कविता लिहिली असावी.
14 Sep 2016 - 3:09 pm | आदूबाळ
हाएं? "तर लेखन करायचंय तुला" अशा प्रस्तावनेने सुरू होणारं काव्य हा "होतकरू लेखकाला दिलेला संदेश" नाही?
हा मुद्दा तर आहेच, पण हाच एकमेव मुद्दा नाही. लेखन ही जितकी 'कला' आहे तितकीच, किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणात 'कुसर' आहे. त्या "संदेश" वाल्या, शेवटच्या परिच्छेदात मला म्हणायचं आहे की केवळ "आतून आलं आहे" म्हणून पोस्ट-प्रोसेसिंग, एडिटिंग वगैरे कामांचं अवमूल्यन करू नये.
हे पोस्ट प्रोसेसिंग कमी मूल्याचं आहे हे बुकोवस्की थेट म्हणाला नाहीये हे मान्य, पण कशाला तरी सुपरलेटिव्ह म्हटलं की बाकीचं कमी मूल्याचं हे आपोआप ध्वनित होतं.
मान्य. हे मी म्हणतो आहे. की बाबा रे, तू मार्केटला फाट्यावर मारत असशील, तर मार्केटने तुला फाट्यावर मारल्याचं दु:ख मानून घेऊ नकोस. आणि असं दु:ख वाटणार असेल तर स्वतःसाठीच लिही.
14 Sep 2016 - 3:31 pm | सस्नेह
:)
मला वाटतं, "तर लेखन करायचंय तुला" हे स्वगत आहे...
13 Sep 2016 - 4:06 pm | अजया
प्रतिसाद आवडला.
मला स्वतःला स्वान्तसुखाय कविता लिहायला अतिशय आवडतं.त्याच्यावर कुणाच्या आवडण्या वाटण्याची मोहोर नको असते.कदाचित इंप्रोव्हाइज करायची प्रोसेस असं करुन रोखली जात असेल.पण मला ते एक स्वतःशी जपलेलं स्वतःचं सीक्रेट वाटतं जे इतरांच्या कवितांची वाचक असताना मी जपलेलं असतं!कदाचित माझ्याबरोबर जाणारी माझी अत्यंत आवडती ,स्वतःची गोष्ट माझी कविता असेल!
13 Sep 2016 - 6:24 pm | मनिष
खरंच मस्त झालाय आहे हा भावानुवाद! शब्दशः अनुवाद नाही केला हे खूपच उत्तम - त्यामुळे कवितेचा आत्मा सुरेखपणे उतरलाय. बुकोवस्कीचा फटकळपणा कदाचित नसेल पण अटळपणा खूप नेमका उतरलाय इथे. जसे: 'दुसरा कोणताही मार्ग नाही. कधी नव्हताच.'
चार्ल्स बुकोवस्की माझाही अत्यंत आवडता - त्याची ही अनुवाद केलेली 'so you want to be a writer?' ही माझीही आवडती कविता आहे.
पोस्ट ऑफिसमधली नोकरी सोडून लिहिण्याला मदत करणार्या माणसाला, जॉनला लिहलेल्या पत्रात तो लिहितो -
वर कोट केलेला पत्राचा भाग माझ्या फार आवडता आहे.
त्याच्या 'Bluebird' कवितेवर आणि माझ्या निळ्या पक्ष्याविषयी मि मागे मिसळपाववर लिहिले होते. ते इथे वाचता येईल -
निळा पक्षी (बुकोवस्कीची क्षमा मागून)
13 Sep 2016 - 7:32 pm | इनिगोय
To not to have entirely wasted one’s life seems to be a worthy accomplishment, if only for myself.
...आवडलं हे वाक्य. बुकोव्स्कीचं लेखन खरंच फटकळ, कोरडे ओढल्यासारखं आहे. पण तरीही ते भावनेच्या पलीकडचं, अलिप्त वाटत राहतं. राग, निषेध अशा गोष्टींपेक्षाही अटळपणा पोचतो. हा मलाही थोडासाच परिचयाचा आहे, अजून गद्य साहित्य फार वाचायला मिळालं नाहीय. तुमच्या लेखात बरेच दुवे आहेत, त्यासाठी आभार.
13 Sep 2016 - 8:15 pm | आतिवास
कवितेचा भावानुवाद आणि त्यानिमित्ताने प्रतिसादांतून मांडले गेलेले मुद्दे आवडले.
14 Sep 2016 - 12:44 am | कवितानागेश
आज पोच!
सुंदर लिहिलंयस इनी.
14 Sep 2016 - 10:34 am | मारवा
दोन प्रतिभावंतांच्या विचारांत कधी कधी किती साम्य दिसुन येत. तुम्ही दिलेले बुकोवस्कीच हे
जोवर अग्निबाणासारखं जळत ते तुझ्या आत्म्यातून झेपावत नाही.
जोवर निष्क्रीय, नि:शब्द राहणं तुला मरणप्राय वाटत नाही.
जोवर तुझ्यातली अंतस्थ धग तुझ्या धमन्या जाळत नाही.
तोवर नको लिहूस.
आणि रिल्के ने आपल्या पत्रांतुन आपल्या कविमीत्राला दिलेला हा सल्ला. किती रोचक साम्य.
स्वत:मध्ये प्रवेश कर. आपल्याला लिहावंसं का वाटतय ? याचा शोध घे प्रथम. ह्या प्रश्नाची अंतर्गत तपासणी कसुन कर. स्वत:शी क्रुरपणे वागायला अशा वेळी कचरु नये: अन्यथा: खूप उशिरा कुठेतरी दारूण कपाळमोक्ष हा अटळ आहे. तुला जी कवितालेखनाची उर्मी आलेली आहे, तिचा मुलस्त्रोत शोध. तिची मुळे कुठे कुठे आणि किती खोलवर पोचलेली आहेत ते पाहा. एखादी मुळांगुली तरी थेट ह्रदयात रुतलेली आहे ना, ह्याची खात्री करुन घे. आणि विचार स्वत:ला
कलेच्या अविष्कारावर बंदी किंवा स्वत:चा मृत्यु ह्यांतलं अधिक सुसह्य काय आहे ?
जर ह्या प्रश्नाच उत्तर अगदी नि:शंकपणे "मृत्यु" असं येत असेल तर मग समज की तुला तुझ्या आयुष्याचा मध्यबिंदु गवसला आहे. आयुष्याचा चिरेबंदी राजवाडा त्या मध्यबिंदुभोवती उभारण्यास सुरुवात कर. ते बांधकाम हेच तुझ जिवीतकार्य असेल. इतिहासातल्या कुठल्याही थोर कलावंताच्या जीवनपटावर नजर टाक: तुला एकाच बिंदुभोवती फ़िरणारया त्यांच्या पाउलखुणांचे मोर्चे आढळतील.
श्री अनिल कुसुरकर यांनी "रिल्केची दहा पत्रे" या अप्रतिम पुस्तकात रिल्केच्या आपल्या एका तरुण कविमित्राला पाठवलेल्या दहा पत्रांचा नितांतसुंदर असा अनुवाद केलेला आहे.
तो आपण अगोदर वाचला नसल्यास जरुर वाचावा.
14 Sep 2016 - 11:39 am | इनिगोय
अगदी नेमकं. हे कलेसंदर्भात असो की आणखी कशाबाबत, सारखंच लागू आहे. आणि मग का (करायचं) हे एकदा कळलं की कसं (करायचं) हेही समजतंच.
14 Sep 2016 - 11:59 am | सस्नेह
अतिशय उत्कट भावानुवाद !
जे लेखकाला सांगायचे आहे ते आतपर्यंत पोचवणारी कविता !
..इथे जी ए. आठवणे अपरिहार्य आहे.. !
14 Sep 2016 - 1:23 pm | पैसा
सुंदर भावानुवाद! यानिमित्ताने झालेली चर्चाही आवडली. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे अमूक एक प्रकाराने केलेले लिखाण श्रेष्ठ असे म्हणता येणार नाही. उत्स्फूर्त लिखाणाचे महत्त्व आपल्या जागी आहेच. त्याशिवाय समाजाला सुधारण्यासाठी म्हणून काही लोकांनी श्रम घेऊन लिहिलेले आहे, पाठ्यपुस्तके, बातम्या, दैनिके आहेत त्यांचेही महत्त्व आहेच. मी स्वतः आधी डोक्यात लिहिते, मग कागदावर/कीबोर्डावर. त्यामुळे लिहिलेल्यात बदल करायची वेळ क्वचित येते. पण जे लिखाण अधिक संस्कार करून तयार करत असतील त्यांचेही चूक म्हणवत नाही.
14 Sep 2016 - 1:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर कविता, सुंदर भावानुवाद, सुंदर चर्चा !
17 Sep 2016 - 5:11 pm | संदीप डांगे
असंच म्हणतो! उत्तम धागा,
14 Sep 2016 - 5:59 pm | पथिक
वा !!! खूप आवडलं !!
15 Sep 2016 - 10:55 pm | रातराणी
अतिशय आवडला भावानुवाद!
16 Sep 2016 - 6:52 pm | राघव
सुंदर!
17 Sep 2016 - 4:09 pm | michmadhura
खूप सुंदर लिहिलंयस इनी.
17 Sep 2016 - 4:41 pm | मनिमौ
खुप दिवसांनी लिहीती झालीस.सुंदर झालाय भावानुवाद
21 Sep 2016 - 4:35 pm | पिशी अबोली
भावानुवाद तर आवडलाच.. बुकोवस्कीचं लिखाण कधीच नाही वाचलंय. अजून येऊदेत.
14 Oct 2016 - 11:15 pm | प्रियाभि..
_/
15 Oct 2016 - 5:34 am | बाजीप्रभू
सुंदर भावानुवाद,
ऑर्डर प्रमाणे बुंदी पाडून देणाऱ्या लेखकांना चांगली चपराक आहे हि.