दिवाळीच्या सुटीत मुर्तीजापुरला (माझं सासर) गेलो होतो. एक दिवस एकटाच गावाबाहेरच्या पुंडलिक बाबांच्या मठाकडे चालत निघालो. गावाबाहेर पडलो तोच मागनं एक अनोळखी आवाज आला, "काका, मी सोबत येऊ का ?"
बघितलं तर ८-९ वर्षांचा, मळके कपडे घातलेला, स्वत्तःहि धुळीने माखलेला एक मुलगा होता. त्यालाही त्या मठात जायचं होतं आणि त्या १० मिनिटांच्या वाटेतही त्याला सोबत हवी होती; मग ती माझ्यासारख्या अनोळखी, पस्तिशीतल्या माणसाची का असेना !
वाटेत त्याची सारखी बडबड सुरु होती. नाव देवा. आई मजुरी करते. वडील नाही. भाऊ नाही. शाळेत जातो. त्याने मला वाटेत कितीतरी गोष्टी मी न विचारताच सांगितल्या. कितीतरी प्रश्न विचारले.
मग चालता चालता अचानक रस्त्यात पडलेलं एक फुलपाखरू त्याला दिसलं. तो थांबला. ते फुलपाखरू त्याने हळुवारपणे चिमटीत उचललं आणि रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी ठेवून दिलं. आणि म्हणाला - गाडीखाली आलं असतं ना !
मला वाटलं - हा हळवा, गरीब, बोलका मुलगा, ज्याला वडील नाहीत, ज्याची आई मजुरी करते, हा सुद्धा त्या फुलपाखराच सारखाच सुंदर,निष्पाप, पण दुबळा आहे. पण याला मात्र परिस्थितीच्या निर्दयी चाकांखाली येण्यापासून कोणी वाचवील याची शक्यता मात्र फार फार कमी आहे ...
प्रतिक्रिया
17 May 2016 - 2:08 pm | कपिलमुनी
त्याला तुम्ही वाचवायचा ना !
17 May 2016 - 3:06 pm | पथिक
आमच्या भागातील वातावरण, त्या मुलाची आर्थिक सामाजिक परिस्थिती, हे सगळं पाहता तो एक सुशिक्षित, सुसंस्कृत जीवन जगू शकेल असं वाटत नाही असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. तुम्हाला काही वेगळं सांगायचं आहे का?