घायल. १९९० मधे आलेला राजकुमार संतोषी यांचा पिक्चर. बॉक्स ऑफिसवर सेकंड हायएस्ट ग्रॉसर. नायक - सनी देवल
घायल वन्स अगेन. २०१६ मधे आलेला सनी देवल याचा पिक्चर. सनी देवल लिखित आणि सनी देवल दिग्दर्शित.
सनी देवल. मूळ नाव अजय सिंग देवल. १९ ऑक्टोबर १९५७ चा जन्म; म्ह्णजेच आजमितीस वय ५८ वर्ष. १९८३ पासून हिंदी चित्रपटक्षेत्रात सक्रीय. प्रामुख्याने साहसपट, अॅक्शनपट यात काम. नावाजलेले चित्रपट - बेताब, त्रिदेव, अर्जुन, घायल, डर, दामिनी, जीत, घातक, बॉर्डर, मा तुझे सलाम, ज़िद्दी, गदर इत्यादी.
हा माझा आवडता हीरो. आमचा; खरं तर. आमचा म्हणजे मी आणि माझा एक शाळेतला मित्र. आम्ही सनी देवल चे पंखे. हे पंखे आजकाल चोरबाजारातही मिळत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे अचंब्याने, आश्चर्याने, कीव आल्याप्रमाणे, थुच्च भावनेने वगैरे कुणी बघितलं तर आम्हाला त्याचं विशेष काही वाटत नाही.
त्या दिवशी मित्राचा फोन आला. माझ्याबाजूचं संभाषण असं होतं, 'हॅलो. हो जायचं ना म्हणजे काय!. अच्छा... मला वेळ काढणं कठीण आहे जरा.... नाही नाही जायचं पक्कच आहे आणि पहिलाच वीकेंड; नंतरचा भरोसा नाही. ओके. हां तो शो चालेल. राईट! सिंगल स्क्रीनच बेस्ट. आपलं नेहमीचं आहे. ठीक आहे. भेटू मग.'
माझ्या बाजूच्या व्यक्तीचा प्रश्न, 'कुठला पिक्चर?' मी, 'घायल वन्स अगेन'. 'कुठला????' 'घायल वन्स अगेन... सनी देवलचा' मग एक मोठा हशा. 'लिओनी म्हणाला असतास तरी विशेष काही वाटलं नसतं... पण सनी देवल??' मी, 'हो! मी फॅन आहे त्याचा...' एक मोठा पॉज. 'मला उडी मारावीशी वाटतेय इथून (हशा). मी पहिला असा माणूस बघितलाय जो सनी देवलचा फॅन आहे.' मी, 'हो आहेत असे तुरळक.' हा संवाद नमुनादाखल होता; असे अनेक प्रश्न करतात लोकं.
मी आणि माझा हा सनी देवल फॅन मित्र त्याचे पिक्चर आवर्जून बघतो. बघतोच. आणि तेही शक्यतो सिंगल स्क्रीनच्या चित्रपटगृहात; म्हणजे अॅक्शन सोबत रिअॅक्शनही अनुभवायला मिळतात आणि अर्ध्या पैशात दुप्पट मजा येते. तर असा
हा सनी देवलचा नवीनतम पिक्चर आम्ही बघायला गेलो. घायल वन्स अगेन.
पिक्चरची कथा मागच्या घायलचे दुवे धरून बांधलेली आहे. थोडं सविस्तर सांगतो कारण एकंदरित अनुभवावरून फार लोकांना हा पिक्चर बघायचा असेल असं नाही आणि जे माझ्यासारखे असतील त्यांना आधी गोष्टी कळल्या म्हणून फरक पडणार नाही. अजय सत्यकाम मेहरा (सनी देवल) हा 'तोच' घायल वाला अजय मेहरा आहे. दरम्यानच्या काळात तो जेलमधे जाऊन व त्यानंतर मानसिक आजाराच्या उंबरठ्यावर जाऊन परत आलेला आहे आणि त्याला परत आणणारी रिया (सोहा अली खान) आहे. हा अजय मेहरा आता एक रिपोर्टर आहे जो सत्यकाम नावाचं वृत्तपत्र चालवतो. त्याच्यासोबत 'जो डिसूझा' (ओम पुरी) जो आता पोलिसातून निवृत होऊन आरटीआय (माहिती अधिकार कायदा) अॅक्टिविस्ट म्हणून कार्य करतो. पिक्चरच्या सुरुवातीला एका महिला पत्रकाराची केस अजय घेऊन सॉल्व करतो. हिच्यावर बलात्कार झालेला असतो व हे प्रकरण हेराल्ड नामक वृत्तपत्राच्या सर्वेसर्वा राजगुरू याने केलेले असते. त्यात तिच्या निर्दोष मित्राला गोवण्यात आलेलं असतं. हे जेंव्हा अजय बघतो तेंव्हा तो 'आपल्या पद्धतीने' हे प्रकरण उघडकीस आणतो.
मग एक दिवस जो डिसूझांच्या गाडीला अपघात होऊन ते मेल्याची बातमी येते. ज़ोया नावाची एक ब्लॉगर तरुणी तिच्या चार मित्रमैत्रिणींसह कर्नाळ्याला कसल्याशा प्रोजेक्टसाठी पक्षांचं शूटिंग करायला गेलेली असताना तिने केलेल्या शूटिंगमधे जो डिसूझा यांचा गोळ्या झाडून करण्यात आलेला खून कॅप्चर होतो. हे जेंव्हा तिला दिसतं तेंव्हा ते चौघेजण हबकतात. ज़ोयाच्या आजोबांच्या सांगण्यावरून ते तो विडियो क्रिपलानी नावाच्या वकिलाला देतात जो तो विडियो नेऊन बन्सल नावाच्या बिज़नेसमनच्या ताब्यात देतात. हा बन्सल तोच, जो या क्लिपमधे असतो, त्याच्यासोबत राज्याचे गृहमंत्री व त्याचा 'स्पॉइल्ट ब्रॅट' मुलगा असतात. बन्सलच्या मुलानेच जो डिसूझावर गोळ्या झाडल्याचं या क्लिपमधे स्पष्ट कॅप्चर झालेलं असतं.
या क्रिपलानीचा मुलगाही 'त्या' चौघांमधे असतो. मग बापाने सत्याची बाजू का नाही घेतली इत्यादी विचार करून ते चौघेजण त्या क्लिपचा स्मार्टली घेऊन ठेवलेला बॅकप असलेली हार्डडिस्क अजय मेहराला द्यायला निघतात. इकडे बन्सलचा स्वतःचा सिक्युरिटी सेल हवी त्याची लोकेशन, फोन नंबर वगैरे टॅप करून हे सगळं बघत असल्याने बन्सलची माणसं त्या चौघांना अडवायला निघतात. अत्याधुनिक शस्त्र, मोटारसायकली वगैरे असलेली ही फॉरेनर्स ची टीम आणि ती चौघं मुलं यांच्यात पुढची २० मिनिटं पकडापकडी चालते. रस्त्यावर, मॉलमधे, कुठेकुठे जातात, अनेक गाड्या उडतात, काय काय होतं. मग त्या चौघांना अजय मेहरा वाचवतो पण ती हार्ड डिस्क??? ती मॉलमधल्या एका दुकानात असते. हे ती मुलं अजयला सांगतात. तो ती घ्यायला निघतो. बन्सलची माणसंही निघतात. मग बन्सलचा सिक्युरिटी हेड, ज्याचं नाव आहे ट्रॉय व सनी देवल यांच्यात पुढची १५ मिनिटं झटापट. लोकल ट्रेनमधे मारामारी, एका लोकलमधून चालत्या दुस-या लोकलमधे उडी वगैरे प्रकार करून अजय मेहरा ती हार्डडिस्क मिळवतो.
पुढे ट्विस्ट. दरम्यान त्या पकडलेल्या मुलांना बन्सल किडनॅप करतो. सोहा अली खान म्हणजेच रिया त्यांना हॉस्पिटलमधे घेऊन गेलेली असताना त्यांना तो पळवतो. मग त्या मुलांचे पालक अजय मेहराला शिव्या घालायला येतात. तिथे असं उघडकीस येतं की त्या चौघातली एक मुलगी ही अजय मेहराचीच मुलगी आहे. हे बन्सललाही कळतं. मग बन्सल बाकी तिघांना सोडतो आणि तिला मात्र ठेवतो. अजयने काही वाकडं पाऊल उचललं तर तिला मारणार अशी धमकी अजयला देतो. आता पंचाईत. मग सोहा अली खान अजयला सांगते, 'गो गेट युअर डॉटर'
मग हा पंजाबी बैल फुसफुसत सुटतो. फुल्ल शहरात या एकट्यासाठी नाकाबंदी असताना हा तिथे कसा पोचणार? हा प्रश्न पडतानाच त्याचं उत्तर समोर दिसतं. बन्सलने अजयच्या मुलीला दुस-या ठिकाणी हलवण्यासाठी प्रायवेट हेलिकॉप्टर मागवलेलं असतं; ते अजय हायजॅक करतो. आणि तो स्वतःच ते चालवत; आय अॅम सॉरी उडवत घेऊन येतो आणि बन्सलच्या बिल्डिंगमधे घुसवतो. ९/११ टाईप. मग स्फोट, आग, हाहाकार, गडबड सगळं होतं. हेलिपॅडवर बन्सलचा माजलेला मुलगा अजयच्या मुलीला मारत असताना अजय तिथे येतो. आणि एका ड्रग अॅडिक्टला, बिना ड्रगची रग काय असते त्याची झलक देतो. या फाईटमधे त्याला दोन गोळ्याही लागतात, पण त्याने विशेष फरक पडत नाही. बन्सलचं कुटुंब तिथे अडकलेलं असतं. आई, बायको, लहान मुलगी. बन्सल मुलीला आगीतून वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असतानाच अजय मेहरा तिथे येतो, त्या तिघांना तोच वाचवतो आणि हेलिपॅडवर येतो. बन्सल कुटुंबीय मुलाला मारू नका म्हणून अजयच्या पाया पडतात. पुढचा सीन हॉस्पिटलचा. अजय आणि त्याची मुलगी रिकव्हर होतायत, आणि ती चार मुलं, त्यांचे पालकही. पिक्चर संपला.
जी अपेक्षा करून गेलो होतो ते सगळं पिक्चरमधे होतं. सनी देवल ५८ वर्षाचा वाटत नाही. अजूनही त्याची अॅक्शन कितीही अतिरेकी असली तरी कन्व्हिन्सिंग वाटते. तो दोघाजणांना एकेका हातात उचलत असेल तर ते तो खरंच करू शकेल असं वाटतं. जे इतर सल्लू फल्लूंच्या बाबतीत मुळीच वाटत नाही. बन्सलचं घर म्हणजे अँटीलिया (अंबानी निवास) दाखवलेलं आहे; जे इतर वेळी ढुंकूनही बघायला आपण जाणार नाही ते पिक्चरच्या माध्यमातून डोळे भरेस्तोवर बघता येतं. स्टोरीत विशेष दम नाही. हॉलिवूडपट 'टेकन' चा भास अधून मधून होतो. पण चित्रपटातली अॅक्शन आजकाल निघणा-या इतर अॅक्शनपटांसारखीच आहे. म्हणजे, तो बेंचमार्क असेल तर माझ्यामते कुठेही पिक्चर कमी पडत नाही. हां; अतर्क्य गोष्टी अनेक आहेत बघायला गेलं तर. पण मी मुद्दाम पिक्चरचा 'समाचार' घेण्याचं काम केलं नाही; ते करण्यासाठी फारएन्ड सारखी दिग्गज मंडळी समर्थ आहेत. मला सनी देवल आवडतो. मला हा पिक्चरही आवडला.
लक्षात रहाण्यासारखा डॉयलॉगः 'प्रॉब्लेम रेज से नही; करेज से सॉल्व्ह की जाती है'. हा डॉयलॉग बन्सलच्या तोंडी आवडला नाही. तो सनीला द्यायला हवा होता. म्हणजे मग ते 'हिंदुस्तान ज़िंदाबाद था; ज़िंदाबाद है...' त्या टोनमधे मस्त जमलं असतं. असो.
घरी आल्यावर एक तासभर मला कुणीही 'कसा होता पिक्चर?' विचारलं नाही हो. मला असं वाटायला लागलं की इतकं क्षुल्लक; नगण्य असं काहीतरी मी बघून आलोय की कुणाला त्याबद्दल जाणून घ्यायची अजिबात इच्छा नाही. नंतर विचारलं म्हणा; पण ते काय..... जाऊद्या. पुढच्या वर्षी सनी देवल अजून एक पिक्चर काढतोय त्यात तो त्याच्या मुलाला लाँच करणार आहे. वाट बघतोय; पण देअर इज ओनली वन सनीपाजी. ओनली वन ढाई किलो का हात. व्हॉट अॅन एक्झांपल ही इज व्हेन इट कम्स टू फिटनेस. ख-या अर्थाने 'बीस्ट'.
ब्रावो सनी देवल!
प्रतिक्रिया
14 Feb 2016 - 7:25 am | एनिग्मा
मी सनि चा पंखा वगेरे नाय पण चित्रपट आवडला. खास करून इंटर्वल पूर्वीचा चेसिंग सीन आणि मग सनी भाऊ सगळ्यांची धुलाई करतो विशेष करून फिरंगी बोडी गार्डची.
14 Feb 2016 - 8:43 am | अर्धवटराव
पैसा वाया जात असेल तर नक्की बघावा असा.
अर्थात, यापेक्षा भयानक सिनेमे सहन केले आहेत यापुर्वी.
14 Feb 2016 - 7:22 pm | सांजसंध्या
बेताब चा हळवा सनी आणि त्यानंतर अर्जुन, डकैत, घायल, यतीम, दामिनी चा सनी पाहिलेला असल्याने सनीचा आताचा अवतार पहायला हिंमत होणार नाही. मध्यंतरी केसाचे विचित्र टोप लावले होते तेव्हांही वाईट वाटत होतं. त्याचं हसू होऊ नये ही इच्छाही त्याची डाय हार्ड फॅन असल्यानेच असेल.
गदर पासून सुपरह्युमन झालेला सनीचा अवतार लार्जर दॅन लाईफ होत गेला बहुतेक.
14 Feb 2016 - 11:36 pm | ए ए वाघमारे
सनी देओल हिंदी सिनेमाचा बहुधा लास्ट अॅक्शन हिरो किंवा अक्षय कुमारला शेवटचा धरला तर सनी लास्ट बटवन म्हणायला हवा.
कितीही खान-कपूर वगैरे आले तरी सनीने त्याचा फॅन बेस पक्का ठेवला आहे. घायल-2 ची माउथ पब्लिसिटी चांगली होतेय. काल तर पीवीआरने फितूरसाठी घायल चे शोज कमी केले म्हणून ट्विटरवर 'गिव्ह घायल मोअर शोज' म्हणून मोहिम ट्रेण्डींग होती. ही एक पीआर ट्रीक आहे असे मानले तरी सनीसारख्या हिरोसाठी त्याला कायम अंडरइस्टीमेट करणार्यांकरणार्याच्या दृष्टीने अशी मागणी होणे म्हणजे नवलच.या वीकेंडपर्यंत सिनेमा ५०कोटी पार करेल असा अंदाज आहे.
सनी अजूनही बहुतकरून (काही चड्डी-बनियनच्या जाहीराती सोडल्या तर, त्या काय सुपरस्टार शारूकसुद्धा करतो)सिनेमाच्या पडद्यावरच दिसतो ही खूप मोठी गोष्ट आहे.
वर कुणी म्हटलंय तसे सनीने आता आउट अॅण्ड आउट व्हीलन केला पाहिजे. हिंदी सिनेमात सध्या सगळ्यात टंचाई व्हीलन आणि जिनाईन कॉमेडीयन्सची आहे.
सनी आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे तो खराखुरा वाटतो.