ग्रीस आणि ययातीचे वंशज

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
22 Dec 2015 - 1:03 pm

"अर्धवट" यांनी ग्रीस प्रश्नावर लिहिलेला काळ्या विनोदाचा (black humor) लेख वाचला आणि मी त्याच विषयावर आधी लिहून ठेवलेल्या "ययातीचे वंशज" या लेखाची आठवण झाली. हा विषय आता मागे पडल्याने कदाचित वाचकांना संदर्भ लागणार नाहीत पण मिसळपाव वरील वाचक सुजाण आहेत या विश्वासाने इथे पोस्ट करतोय.
_________________________________________________________

घराजवळ जिमखान्याच मोठ्ठ मैदान आहे तिकडे सर्व वयोगटातले लोक चालायला येतात. थोडी उच्चभ्रू स्तरातली लोकांची वर्दळ असते तिथे. रंगीबेरंगी कपड्यातले, हसरे, स्वप्नाळू तरुण किंवा स्वप्नपूर्तीचा आनंद घेणारे वृध्द लोक बघून छान वाटते तिकडे चालायला जायला. आज सकाळी बायकोला उशीर होत होता म्हणून मोठ्या लेकाला क्लासला घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर आली. मुलाचा क्लास विरुद्ध दिशेला आहे म्हणून त्याला क्लासला सोडून परतीच्या रस्त्यावर नाना नानी पार्क आहे, तिकडे गेलो चालायला.

इकडे चित्र वेगळे. माझ्या वयाचे कोणी नाहीच. सगळी वयोवृद्ध माणसे. हळू हळू चालणारी, बाकांवर बसून वर्तमानपत्र वाचणारी, हास्य क्लब चालवणारी, सकाळी उठलेच असेल तर नातवंडाला घेऊन आलेली. मुलगा सुनेला सकाळच्या घाईत त्रास नको म्हणून लवकर बाहेर पडून चहा नाश्ता बाहेर करून घेणारी, आपल्या पुढच्या पिढीत लुडबुड न करणारी, आणि एकदम वाटले कि यातले कोणीच ययातीचे वंशज नाहीत. एका आजोबांच्या हातातील वर्तमानपत्राची हेडलाईन ग्रीस बद्दलची होती आणि मग मनातल्या मनात नकळत ग्रीसच्या कर्जाचा पेच प्रसंग आणि ययातीच्या गोष्टीची सरमिसळ झाली.

पटकन, ग्रीसचे धनको म्हणजे स्वतःच्या व्याजाच्या खात्रीसाठी ग्रीसच्या नवीन पिढीला अल्प उत्पन्नात ढकलून अवेळी वार्धक्य स्वीकारायला लावणारा ययाती वाटू लागला तर सार्वमतात "नाही" असे जोरदार उत्तर मिळूनसुद्धा पुन्हा धनकोंच्या अटी मान्य करणारा ग्रीसचा पंतप्रधान सिप्रासमध्ये पुरू दिसू लागला . पण थोडा विचार करताना जाणवले कि हि साधी सोपी मांडणी फारच तकलादू आहे. आणि मग ययाती आणि पुरूच्या भूमिकेतील लोक देशाच्या सीमा तोडून एक एक प्रवृत्ती म्हणून समोर दिसू लागले.

ग्रीसला युरोझोन मध्ये सामील करून घेण्यासाठी आकड्यांची चलाखी करणारे Goldman Sachs आणि ग्रीसचे भ्रष्ट अधिकारी, आपल्या देशाचा पैसा बाहेरच्या देशात गुंतवणारे ग्रीसचे धनिक, दिवसातून दोन तासाहून अधिक जेवणाची सुट्टी घेणारे सरकारी कर्मचारी, लवकर निवृत्त व्हायला मिळतंय तर अंगी शक्ती आणि कार्यक्षमता असून निवृत्तीवेतन आणि सरकारी सुविधांवर आयुष्य निवांत घालवण्यास तयार असलेले ग्रीक नागरिक, जागतिक दर्जाचे कुठलेही उत्पादन न करणाऱ्या आणि पर्यटनाशिवाय दुसरा कुठलाही सबळ उत्पन्नाचा मार्ग नसणाऱ्या आपल्या देशातील निवृत्तीवेतन शेजारच्या देशातील लोकांपेक्षा विनाकारण जास्त आहे याचा विचार न करणारे आपमतलबी नागरिक, कर्ज घेऊन अनुत्पादक गोष्टींसाठी वापरणारे ग्रीसचे नागरिक आणि त्यांची निवडून दिलेली सरकारे, कर्ज पुनर्रचित करून मिळतंय म्हणून स्वतःच्या नागरिकांवर अल्प उत्पन्नात राहण्याची सक्ती करणारे सरकार, पर्यटनावर अवलंबून असलेली आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत कशी होईल याचा विचार न करू शकणारे राज्यकर्ते आणि शेवटी धनकोच्या दबावाखाली बेकारी वाढत असताना सरकारी खर्च कमी करण्याचे मान्य करून कंपन्यांवर कमी कर पण वैयक्तिक कर मात्र जास्त असल्या जाचक अटी मान्य मान्य करणारे सरकार हे सर्व विवेकशून्य, भोगलोलुप ययातीचे वंशज वाटू लागले.

सुंदर आणि सुखी जीवनाचे स्वप्न दाखवणारी इतर प्रगत देशांची अर्थव्यवस्था देवयानीचे रूप घेऊन सामोर उभी राहिली. त्यांना मर्यादेपेक्षा जास्त कर्ज अधिक व्याजाने देणाऱ्या व्यापारी बँका आणि कर्ज पुनर्रचनेच्या निमित्ताने व्यापारी बँकांची कर्जे परस्पर भरून ग्रीसवर नवीन वाढीव व्याजाची कर्जे चढविणारे युरोपिअन त्रिकूट (troika) हे सगळे मला मला मुलीच्या प्रेमाने आंधळ्या झालेल्या आणि आपल्या वरदानाचे काय घातक परिणाम होऊ शकतात ते न समजणाऱ्या शुक्राचार्यासारखे दिसू लागले.

शुक्राचार्य म्हणाले, " हे राजा माझा शाप परत घेता येणार नाही पण माझ्या मुलीच्या प्रेमाखातर मी तुला उश्शाप देतो कि स्वतःच्या तारुण्याच्या बदल्यात तुझे वार्धक्क्य घेण्याची तयारी असलेल्या कुणालाही तू तुझे वार्धक्क्य देऊ शकतोस.

ज्या ४० टक्के लोकांनी सार्वमतात काटकसरित राहण्याचे मान्य केले होते त्यातील तरूण लोक ध्येयवादी पुरुचे वंशज वाटू लागले. नाही म्हणणारे ६० टक्के मतदार यदु, यवन, द्रुह्यु आणि अनुचे वंशज तर ग्रीसच्या दशेसाठी केवळ भांडवलशाही किंवा धनकोंची स्वार्थपरायण वृत्ती जबाबदार आहे असे समजून हळहळ व्यक्त करणारे जगभरचे विविध देशांचे सहृदय नागरिक शर्मिष्ठेचे वंशज वाटू लागले. आणि शेवटी सार्वमतात काटकसरित राहण्याचे मान्य करणारे वृद्ध लोक पश्चातापदग्ध ययातीच्या वंशजासमान वाटू लागले.

प्रत्येक पिढी आपल्या पुढल्या पिढीसाठी काहीतरी संचित ठेवून जाते. कधी मालमत्तेच्या आणि बौद्धिक संपदेच्या स्वरूपात तर कधी कर्जाच्या स्वरूपात. मालमत्ता आणि बौद्धिक संपदारूपी संचित पुढील पिढ्यांचे आयुष्य सोपे आणि उज्ज्वल करते, पुढील पिढ्या अश्या संचिताला शिरोधार्य संस्कृती मानून तिचे रक्षण करतात, तिचे पाईक व्हायचा प्रयत्न करतात आणि आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीमध्ये यथाशक्ती भर घालण्याचा प्रयत्न करतात. याउलट हे संचित पुढील पिढ्यांचे तारुण्य शोषून घेणारे कर्ज असेल तर मात्र पुढील पिढीला आपण ध्येयनिष्ठ पुरू होऊन पूर्वजांच्या आंधळ्या भोगलालसेची किंमत चुकवून अकाली वार्धक्य घ्यावे कि पूर्वजांच्या अविवेकी ऋणाला झुगारून देऊन अपात्र का होईना पण पूर्वज द्रोहाची भळभळती जखम घेऊन सर्व जगाच्या निंदेला सामोरे जावे अशी सर्व बाजूंनी केवळ हरण्याची हमी देणारे प्राक्तन निवडावे लागते.

कुठल्याही काळात सुंदर सुखी आयुष्याचे स्वप्न बघणारी प्रत्येक पिढी हि देवयानीच्या प्रेमात पडलेल्या ययातीची वंशज असते. आणि ते सुंदर आयुष्य प्रत्यक्षात येऊ शकते असे सांगून त्यासाठी पतपुरवठा करणारे बँकर्स शुक्राचार्याचे. किती कर्ज घ्यायचे आणि ते कसे वापरायचे हे शेवटी ययातीलाच ठरवावे लागते. यदु, यवन, द्रुह्यु, अनु आणि पुरूचे वंशज त्याच्या योग्य निर्णयक्षमतेची चाचपणी न करता केवळ प्राक्तनाच्या गाठीने त्याच्या मागून निमूटपणे खेचले जात असतात.

इतिहासमुक्तकसमाजविचारलेख

प्रतिक्रिया

मोगा's picture

22 Dec 2015 - 1:33 pm | मोगा

मस्त

आपल्या देशाचा पैसा बाहेरच्या देशात गुंतवणारे
ग्रीसचे धनिक, दिवसातून दोन तासाहून अधिक
जेवणाची सुट्टी घेणारे सरकारी
कर्मचारी, लवकर निवृत्त व्हायला मिळतंय तर
अंगी शक्ती आणि कार्यक्षमता असून
निवृत्तीवेतन आणि सरकारी सुविधांवर
आयुष्य निवांत घालवण्यास तयार असलेले ग्रीक
नागरिक, जागतिक दर्जाचे कुठलेही उत्पादन न करणाऱ्या
आणि पर्यटनाशिवाय दुसरा कुठलाही सबळ उत्पन्नाचा
मार्ग नसणाऱ्या आपल्या देशातील
निवृत्तीवेतन शेजारच्या देशातील लोकांपेक्षा
विनाकारण जास्त आहे याचा विचार न करणारे
आपमतलबी नागरिक, कर्ज घेऊन अनुत्पादक
गोष्टींसाठी वापरणारे ग्रीसचे
नागरिक आणि त्यांची निवडून दिलेली सरकारे,
कर्ज पुनर्रचित करून मिळतंय म्हणून स्वतःच्या नागरिकांवर अल्प
उत्पन्नात राहण्याची सक्ती करणारे
सरकार, पर्यटनावर अवलंबून असलेली
आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत
कशी होईल याचा विचार न करू शकणारे राज्यकर्ते आणि
शेवटी धनकोच्या दबावाखाली
बेकारी वाढत असताना सरकारी खर्च
कमी करण्याचे मान्य करून कंपन्यांवर
कमी कर पण वैयक्तिक कर मात्र जास्त असल्या
जाचक अटी मान्य मान्य करणारे सरकार हे सर्व
विवेकशून्य, भोगलोलुप ययातीचे वंशज वाटू लागले.

पर्यटन सोडलं तर भारतालासुद्धा हे लागू होतं!

बोका-ए-आझम's picture

22 Dec 2015 - 4:23 pm | बोका-ए-आझम

भारताने आजवर एकदाही कर्जाचा किंवा व्याजाचा हप्ता चुकवलेला नाहीये. १९९१ मध्ये तशी वेळ आली होती पण तत्कालीन अर्थमंत्री डाॅ.मनमोहन सिंग यांच्या धोरणांमुळे देश त्यातून बाहेर आला. जर आपण त्यावेळी आर्थिक सुधारणा आणल्या नसत्या तर काय होऊ शकलं असतं हे ग्रीसकडे बघून समजतं.

वेळच्या वेळी भाकरी, पान, घोडा आणि धोरणं वळवली/ फिरवली तर अडचणी टाळता येतात. सुकाणू फक्त घट्ट धरून ठेवण्यासाठी नसतं तर ते जहाज वळवण्यासाठी पण असतं हे विसरून चालत नाही हाच आपल्या सिंघ साहेबांचा आणि नरसिंह रावांनी आचरणात आणून शिकवलेला धडा.

DEADPOOL's picture

22 Dec 2015 - 6:41 pm | DEADPOOL

आपल्या देशाचा पैसा बाहेरच्या देशात
गुंतवणारे
ग्रीसचे धनिक, दिवसातून दोन तासाहून
अधिक
जेवणाची सुट्टी घेणारे सरकारी
कर्मचारी, लवकर निवृत्त व्हायला मिळतंय
तर
अंगी शक्ती आणि कार्यक्षमता असून
निवृत्तीवेतन आणि सरकारी सुविधांवर
आयुष्य निवांत घालवण्यास तयार असलेले
ग्रीक
--------------
बोकाशेठ हेही लागू होत नाही?

पण ग्रीसची लोकसंख्या आणि त्यामध्ये अशा लोकांचं प्रमाण आणि भारताची लोकसंख्या आणि त्यात अशा लोकांचं प्रमाण यात काही फरक आहे की नाही?
शिवाय ग्रीसकडे पर्यटन हा एकमेव परकीय चलनाचा स्त्रोत आहे आणि त्यातही प्रचंड स्पर्धा आहेच. भारत परकीय चलनासाठी फक्त पर्यटनावर अवलंबून नाही. शिवाय युरोपियन देशांनी १९२९ च्या जागतिक महामंदीनंतर अवलंबलेल्या सामाजिक सुरक्षितता (Social Security )धोरणाचा एक तोटा म्हणजे लोकांमध्ये बचत करण्याची प्रवृत्ती नसणं, जो मुद्दा भारताच्या बाबतीत गैरलागू आहे. तुमचे मुद्दे चुकीचे नाहीत पण ग्रीस आणि भारत यांच्यात जरी काही साम्य असलं तरी फरकही भरपूर आहेत.

m.thehindu.com/business/Industry/external-debt-up-13-pc-at-390-bn/article4856517.ece

मला वाटतं ही गोष्ट अनुत्पादक गोष्टींसाठी कर्ज घेऊन सुखलोलुप होणाऱ्या सर्वच समाजांना लागू होतं.

तुडतुडी's picture

22 Dec 2015 - 3:11 pm | तुडतुडी

मुलीच्या प्रेमाने आंधळ्या झालेल्या आणि आपल्या वरदानाचे काय घातक परिणाम होऊ शकतात ते न समजणाऱ्या शुक्राचार्यासारखे दिसू लागले.

मुलीशी व्यभिचार करणाऱ्या जावयाला शाप देण्यात अंधळा प्रेम कुठे आलं ? एखाद्या सुनेने व्यभिचार केला आणि तिला सासू सर्स्र्यांनी शिव्या घातल्या तर त्याला मुलावरच आंधळं प्रेम म्हणावं लागेल मग ?
कैच्या की देवयानी , ययाती , शिक्रचार्यांचा बादरायण संबंध जोडलाय

मी शाप - उ:श्शापाची गोष्ट बऱ्यापैकी सांगितली आहे … तरीही तुम्हाला खरच असं वाटत असेल की मी बादरायण संबंध जोडतोय तर मग मला वाटतं विषय संपला असावा. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

एस's picture

22 Dec 2015 - 3:12 pm | एस

लेख आवडला.

सतीश कुडतरकर's picture

22 Dec 2015 - 3:16 pm | सतीश कुडतरकर

मस्तच

बोका-ए-आझम's picture

22 Dec 2015 - 4:18 pm | बोका-ए-आझम

आणि हो, वरच्या एका प्रतिसादाला (कुणाचा ते कळलं असेलच ) उत्तर देणं म्हणजे चिखलात दगड मारण्यासारखं आहे. ते करु नका!;)

प्रतिसाद दिला आहे. आणि नंतर तुमचा सल्ला वाचला. आता आलीय भोगासी असावे सादर म्हणतो आहे. :-)

अजया's picture

22 Dec 2015 - 4:34 pm | अजया

:)
छान आहे लेख.अर्धवट यांच्या लेखाची लिंक दिली तर त्या लेखाचा संदर्भही कळेल.

अर्धवट च्या लेखाची ही लिंक : http://www.misalpav.com/node/31877

विवेकपटाईत's picture

22 Dec 2015 - 5:52 pm | विवेकपटाईत

ययाति मानवीय कुणालाही अजून तो पूर्ण कळला असेल मला वाटत नाही.

कुसुमिता१'s picture

22 Dec 2015 - 10:24 pm | कुसुमिता१

छान आहे लेख..

उगाचच पौरिणिक कथांशी तुलना केल्याने लेखाचा व्याप वाढला,कथा माहित नसलेल्यांना समजावणे वाढले.

तसे म्हटले तर माझे बरेचसे लेखन हे उगाचच आहे, त्यात अजून एक भर पडली इतकेच. आणि कथा माहित नसल्यांबद्दल बोलायचं म्हणजे इच्छुक वाचक माझा व्याप न वाढवता संदर्भ शोधतील याची खात्री आहे.

कंजूस's picture

23 Dec 2015 - 5:40 pm | कंजूस

लेखाला उगाचच नाही म्हणत,बरोब्बर लिहिलंय.मलाही ती ययाती -देवयानीची गोष्ट ढोबळ माहित आहे पूर्णशी नाही.काहीवेळा लोक क्रिकेट खेळातल्या काही वैशिष्टयांशी तुलना करतात ते डोक्ययावरून जातं.