गोविंदघाटातून पदयात्रा सुरु करण्याचा दिवस उगवला. स्नेहाने सगळ्यांना उठवण्याची जबाबदारी पार पडली.
रात्री तिथे पोचल्यापासून आम्हाला पाण्याचा खळखळ आवाज ऐकू येत होता. तिथे नदी होती हे तर माहीतच होतं. पण ती नदी आमच्या अगदी समोर होती हा साक्षात्कार आम्हाला पहाटे जरा उजाडल्यावर झाला. कारण आम्ही आलो तेव्हा मिट्ट काळोख होता.
आमचं हॉटेल छोट्या घाटाच्या कडेला होतं. आणि त्याच्यामागे खाली नदी वाहत होती. त्यामुळे तिथल्या रूमची दारे नदीच्याच बाजूने केली होती. नदीचा सुंदर व्ह्यू होता.
आम्ही आवरून भरपेट नाष्टा केला. आमच्याच कंपनीतर्फे अजून दोन ग्रुप चालले होते ते आम्हाला भेटले. एक ग्रुप म्हणजे फक्त एक आजी आजोबांची जोडी. दोघं हि उत्साही आणि काटक. त्यांच्या वयात ते अशा प्रकारच्या ट्रीपला आलेले पाहून आम्हाला कौतुक वाटलं. दुसरा ग्रुप म्हणजे एक खूप मोठं कुटुंब होतं.
ते आजी आजोबा आणि या ग्रुपमधले आजी आजोबा दोघं मस्त मुडमध्ये होते. ब्रेकफास्ट टेबलवर आमच्या आणि त्यांच्या थोड्या गप्पासुद्धा झाल्या.
घांगरीया हे वॅली आणि हेमकुंड या दोन ठिकाणांच्या पायथ्याशी असलेले गाव. गोविंदघाट त्याहुन खाली. आम्हाला वॅली आणि हेमकुंड अशा दोन्ही ठिकाणी जाऊन यायचं होतं. त्यासाठी मुक्काम घांगरीयालाच करावा लागतो. त्यामुळे तिथल्या ३ दिवसासाठीचं (४ रात्री) सामान वेगळं काढा अशी व्यवस्थापकांची सूचना होती. ते सामान खेचरावर लादून वर नेता येईल, आणि अनावश्यक सामान गोविंदघाटमधेच राहील अशी व्यवस्था होती.
ते वेगळं करून सगळ्यांचं सामान एकत्र करण्यात, सगळ्यांनी आवरून खाली येण्यात, आणि नाश्ता करण्यात असा प्रत्येकात थोडा थोडा वेळ गेला. आणि आम्हाला ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर झाला. आमचे व्यवस्थापक म्हणाले "कल आप फर्स्ट थे आज आप लास्ट हो".
आमचं हॉटेल गोविंदघाटच्या एका टोकाला आणि घांगरीयाचा रस्ता दुसऱ्या टोकाला होता. जिथपर्यंत गाड्या जातात अशा २-३ किमी अंतरापर्यंत आमचं सर्व सामान आणि आम्हाला न्यायला त्यांनी गाड्या दिल्या. त्या ठिकाणापासूनच सामान लादण्यासाठी खेचर/घोडे घेऊन माणसं उभे असतात. आम्ही २ खेचर ठरवले. एका खेचराचे ८०० रु. होतात.
तिथे सगळ्यांसाठी काठ्या विकत घेतात. एरवी चालण्यासाठी फक्त वयोवृद्ध लोक काठ्या वापरतात. पण ट्रेकला जाताना मात्र बरेच लोक काठ्या वापरतात. कारण त्याचा खूप फायदा होतो. चढताना किंवा उतरताना आपला थोडा भार त्यावर टाकून, किंवा फक्त आधाराला म्हणून, आणि कधी फोटो काढताना पोज द्यायला म्हणून.
भारीतली घ्यायची म्हटली तर थोडी लोखंडी, वेगळी मुठ, खाली टोकदार अशासुद्धा स्टिक्स मिळतात. एरवी आपल्या जवळपासच्या किल्ल्यावाल्या ट्रेकला आम्ही जातो तेव्हा ज्याला काठी घेऊन फिरायला आवडतं ते तिथल्या तिथे एखादी वाळकी काठी उचलतो. ती मग वर जाऊन येईपर्यंत सगळ्यांच्या हातात फिरते, तिच्यावर बलप्रयोग होतात. ती खाली येईपर्यंत राहेल कि नाही सांगता येत नाही.
आता ४ दिवस वापरायला हव्या म्हणून आम्ही साध्या पण चांगल्या लाकडी काठ्या प्रत्येकी ३० रु. दराने आणल्या.
इथुन आमचा ट्रेक सुरु झाला. जाता जाता एका आजीकडून हिरवी सफरचंदे घेतली. त्या फ्लेवरचे मी याआधी फक्त एक पेय (सुज्ञांनी ओळखावे :-) ) प्यालो होतो. प्रत्यक्ष ते फळ मी पहिल्यांदाच खाल्ले आणि आवडले.
मधून मधून खायला ज्यातून उर्जा मिळेल, असा सुका मेवा, बिस्किटे, डीहायड्रेशन झाल्यास म्हणून ग्लुकोन डी आणि तत्सम पावडर, चोकलेट अशा गोष्टी सोबत राहू द्या असे आम्हाला सांगितलेले होतेच. ते आम्ही प्रत्येकाने एवढे गांभीर्याने घेतले कि प्रत्येकाच्या सामानात रोज अशा गोष्टी असायच्या. पण त्याचा तितका उपयोग झाला नाही.
वेगळ्या वातावरणात भूक लागत असेल कदाचित, पण आम्ही बहुतांश ढगाळ वातावरणात फिरत होतो. त्यामुळे आम्हाला विशेष भूक लागत नव्हती. रोज आमचे हे पदार्थ बळजबरी खाउनसुद्धा उरत होते. हिमालयात असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहते पाणी मिळते आणि पाण्याचा तुटवडा होत नाही.
आमचा शांतपणे, रमतगमत टीपी करत प्रवास चालु होता. हा पूर्ण प्रवास पुष्पावती नदीच्या काठाने आहे. आधी नदीच्या अलीकडच्या बाजूने आणि मग ती नदी पार करून पलीकडच्या बाजूने. बऱ्याच ठिकाणी झाडी असल्यामुळे सावली आहे. रस्त्यात एका ठिकाणी एक २५० मि. उंच आणि मोठा धबधबा लागतो.
सुरुवातीचे २-३ किमी वगळले तर साधारण ११ किमीचा उरलेला प्रवास पायी किंवा हेलीकॉप्टरनेच करावा लागतो. गाडी जात नाही. वर सर्व सामान खेचराकरविच वाहून नेतात. काही जनावरांचे इतके हाल होतात, कि दोनतीनदा आम्हाला थोडी जखम झालेले, रक्त पडत चाललेले जनावर दिसले. पण नाईलाज. त्या लोकांची रोजीरोटी त्यावरच आहे. असेहि वाटते आणि वाईटसुद्धा वाटते.
आम्ही एका ठिकाणी नदीकिनारी बराच टाईमपास केला. मला त्या पाण्यात उतरायची आणि बसायची खूप इच्छा होती. मला एरवीच खूप घाम येतो. तेच थोडा वेळ तीव्र उन लागल्यामुळे भरपूर आलेला होता, त्यामुळे थंडगार पाण्यात उतरून फ्रेश वाटेल असं वाटत होतं.
पण तो प्रवाह इतका जोरदार होता कि भीती पण वाटत होती. मग एक मोठा दगड शोधला ज्यावर पाय पसरून बसता येईल, एका मित्राला बोलवून मला पायाजवळ पकडायला सांगितलं आणि मी आडवा होऊन डोकं आणि होईल तेवढं अंग पाण्यात बुडवलं. मजा आली पण त्या थंडगार पाण्यानी हुडहुडी भरली. :D आमचा गाईड "कहा कहा से आ जाते है" अशा प्रकारचे लुक्स देत होता.
पण मी एकदम ताजातवाना झालो. आणि जोमात पुढे चालायला लागलो. आम्ही १० जण असल्यामुळे प्रत्येकाची स्पीड वेगळी. सहनशक्ती वेगळी. तर आम्ही जवळ जवळ असलो तरी अगदी सोबत फिरत नव्हतो. एक-दोन, दोन-तीन सोबत असे फिरत होतो.
मी आणि निखिल आमच्या ग्रुपमध्ये थोडे मागे मागे राहायचो. बाकीचे पुढे जाऊन थांबायचे आणि आम्ही पोचलो कि पुढे निघायचे. त्यात उन आणि गर्मी हे माझे शत्रू. उन आलं कि प्रचंड घाम येतो आणि शरीरातली शक्ती एकदम गळुन जातो. तर मी पुढे कि मागे हे त्या दिवशीच्या उन्हावर अवलंबुन असायचं.
फोटो काढायला म्हणुन कॅमेरा-लेन्स वगैरे सगळं सोबत घेऊन हिंडत होतो, पण उन आलं कि फोटोग्राफी करायला इच्छा असूनसुद्धा त्राण राहायचं नाही. मग प्राधान्य फक्त अंतर कापत जाण्याला.
तर इथे नदीत डुंबेपर्यंत मी थोडा मागे मागे होतो. पण त्यानंतर मग उत्साहात आणि सुदैवाने थोडी सावली पण लागल्यामुळे बरंच अंतर एकटाच पुढे गेलो. बराच वेळ तर मी माझा ग्रुप सोडून एक पंजाबी ग्रुप जो हेमकुंडच्या तीर्थयात्रेला चालला होता, त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्यासोबत चाललो होतो.
त्यांना हिंदी नीट येत नव्हती. येत असेल पण ते सारखे हिंदीतून पंजाबीमधेच घसरत होते. त्यातले दोघे तिघे भरभर चालत पुढे गेले. आणि एकजण मागे राहिला जो त्यांच्या ग्रुपमधला माझ्यासारखा होता. :D
तो मला आणि माझ्या मार्गे स्वतःला धीर देत होता. "कोई नई यार, वाहेगुरू दा नाम लेके चलते रहो बस. कभी न कभी पोहोच जाएंगे. क्या जलदी है?" हे तो पुन्हा पुन्हा म्हणायला लागला. आणि त्यानंतर थोडं तत्वज्ञान पण झाडायला लागला. थोडा वेळ ऐकलं आणि मी थांबलो. त्याला म्हटलं ग्रुपसाठी थांबलो आणि पुढे पाठवून दिलं. आणि मी एकटा सापडलो तर परत चिटकेल म्हणून खरंच कोणीतरी येईपर्यंत थांबलो.
मग अमित भेटला तोपण असाच एकटा पुढे आला होता. आम्ही दोघं काही अंतर जाऊन पुन्हा थांबलो. त्याने बेंचवर एक डुलकी मारून घेतली. आम्ही बरेच पुढे आलो असु किंवा मागचे थांबत थांबत, फोटो ब्रेक्स घेत येत होते. बराच वेळ लागला.
असं म्हणतात कि अशा वेळेस चालत राहणे उत्तम. खूप थांबले कि वेळसुद्धा जातो आणि लय तुटते. तेव्हा काहीसं तसंच झालं. तिथे थांबून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा पुन्हा उन आलं आणि माझी पण गती मंदावली. आणि पुढचा प्रवास खूप रेंगाळला.
बाकीजण पुढे गेले. मी,निखिल, अरूप, अनुजा आणि अंशुल थोडे मागे मागे चाललो. जाताना फोटो काढणे, निरीक्षण करणे चालूच होते. एका झाडावर असा फुलांचा गुच्छ दुसला जो दुरून पक्ष्यांचा थवा दिसतो, पण मुळात फुल आहे.
अशाच गोष्टी पाहत पाहत आम्ही ३ च्या दरम्यान पोचलो. आता सगळे थकले होते आणि भूकसुद्धा लागली होती. इथे आमची व्यवस्था येत्या ४ रात्रींसाठी हॉटेल प्रिया मध्ये केलेली होती. त्या दिवशीच्या डिनरपासून ते घांगरीयामधून निघेपर्यंत खाण्याची व्यवस्थासुद्धा कंपनीकडेच होती. आम्ही अशा विचित्र वेळेस जेवण मागवताना पाहून व्यवस्थापक काळजीत पडले. ते म्हणाले आत्ता काही तरी हलकं फुलकं खा, संध्याकाळी जेवण जाणार नाही. आपके पैसे भी जाएंगे मेरे पैसे भी जाएंगे. कोणी त्यांचं ऐकलं नाही आणि दोन्ही वेळेस दाबून खाल्लं.
थोडा वेळ आराम करून आम्ही वॅलीच्या रस्त्यावर एक ग्लेशिअर आहे ते पाहायला गेलो. मोठ्ठा धबधबा, वाहतं पाणी आणि भरपूर बर्फ. बराच वेळ बर्फात खेळण्यात गेला.
तिथे आजूबाजूला असलेली सुंदर फुल झाडे सुद्धा पाहिली.
घांगरीया गावात पोचताना घामेघूम अवस्था, मग थंडी, मग स्वेटर घालून बाहेर पडून चालत गेलो कि पुन्हा गर्मी, आणि बर्फाजवळ गेलो कि पुन्हा थंडी असे वातावरणात अचानक विरुद्ध बदल होत गेल्यामुळे मला स्वतःला थोडा त्रास झाला. बाकी अंगदुखी, डोकेदुखी अशा किरकोळ तक्रारी जवळपास सगळ्यांना होत्या.
रूममध्ये परत आलो आणि गप्पा गोष्टी करून झोपलो. ज्यासाठी इतक्या दूर आलो त्या वॅलीचं दर्शन दुसऱ्या दिवशी होणार होतं.
प्रतिक्रिया
25 Nov 2015 - 4:28 pm | अजया
छान झालाय हा भाग.पुभाप्र.
25 Nov 2015 - 4:58 pm | जगप्रवासी
आयला खरच पक्षांचा थवा वाटतोय दुरून, बाकी छान सफरमाला
25 Nov 2015 - 5:15 pm | जातवेद
पुभाप्र
25 Nov 2015 - 5:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त चाललीय सहल ! तो फुलांचा ताटवा दुरून अगदी पक्षांसारखा दिसतोय !
25 Nov 2015 - 6:37 pm | पियुशा
अप्रतिम !
25 Nov 2015 - 10:28 pm | पद्मावति
खूप छान चाललीय सफर.
तुमची लेखनशैलिही आवडली. पु.भा.प्र.