भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७
मागच्या पोस्टमध्ये मी बद्रीनाथ आणि जवळचे भारतीय सीमेवरचे अंतिम गाव माना येथे जाऊन आल्याचे वर्णन केले आहे. पण बद्रीनाथला थोडा संतापजनक अनुभव आला, त्याबद्दल सविस्तर सांगायचं होतं. मागची पोस्ट हि प्रामुख्याने महाभारताच्या खुणांवर होती.
बद्रीनाथला आम्ही गेलो आणि अनपेक्षित रित्या अगदी सहज पटकन दर्शन झाले. प्रवेशद्वारावर मोठी घंटा आहे ती वाजवून आम्ही आत गेलो. गर्दी नसल्यासारखीच होती. एक साधूबाबा आम्ही न बोलावताच समोर आले. "इधर से जाओ, यहा से अंदर जाना है" अशा सूचना द्यायला लागले.
आत गेलो, आतमध्ये अगदी बारीक चार पाच मुर्त्या होत्या. त्यांच्याभोवती दागिने, फुले, हार यांची इतकी रेलचेल होती कि त्यातली कोणती मूर्ती कोणाची हेच कळत नव्हते. त्यामुळेच एक गुरुजी माइक घेऊन बसले होते. त्यांची कमेंटरी चालू होती. "आपके दाये बाजू ये है, बीच मे ये है. वगैरे."
मला मंदिरात दान दिलेले आवडत नाही. (त्याबद्दल सविस्तर येथे वाचा.) त्यामुळे बद्रीनाथाला काहीही न चढवता मी बाहेर आलो.
बाहेर ते मघाशीचे बाबा पुन्हा भेटले. मंदिरात चारी बाजूला आणखी लहानसहान मंदिरे आहेत. आम्ही प्रदक्षिणा मारत तिथे फिरतच होतो. हे आमच्या मागेमागे, "अब यहा, अब वहा" करत फिरत होते.
समोर आमचे काही मित्र एक दुसरे बाबा आसनावर बसले होते त्यांच्याभवती उभे होते. ते काहीतरी लक्ष देऊन ऐकत आहेत असं वाटलं. मला वाटलं चेहरा पाहून भविष्य वगैरे सांगत असतील म्हणून मला जरा कुतूहल वाटलं. मी तिथे गेलो. ते फक्त तोंडाला येईल तो आशीर्वाद देत होते, आणि टिळा लावत होते. आणि हि सेवा अर्थातच मोफत नव्हती. आम्ही पामर तो साधूचा आशीर्वाद समजून पुढे निघालो तेव्हा त्यांनी थाळी वाजवून दक्षिणा वसूल केली.
मंदिरात फिरून झाले आणि बाहेर निघालो कि हे मागे फिरणारे बाबा दक्षिणा मागायला लागले. जे कोणीही सांगायची आवश्यकता नाही, असली माहिती स्वतःहून भाविकांच्या मागे फिरून देऊन त्याची दक्षिणा त्यांना अपेक्षित होती. त्या आशीर्वादवाल्या बाबांकडे तरी मी स्वतःहून गेलो होतो, ह्या अनाहूत माणसाला काही देणे शक्यच नव्हते. मी त्यांना नकार दिला.
तेव्हा त्यांनी हात उंचावून शिव्याशाप द्यायला सुरु केले. "वाह रे भक्त. वापस मत आना यहा." मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर गेलो.
देवकांत यांनी मानाहून येताना नीलकंठ शिखर दाखवले होते. आणि ते म्हणाले कि हे दिसायला पुण्य लागते. ते शिखर खूप कमी वेळा दिसते. बऱ्याचदा ढगांमध्ये गुडूप होते. ते आता पुन्हा दिसत होते. आम्ही त्याचे फोटो काढत होतो.
तोच अजून एक बाबा माझ्याजवळ आले. म्हणाले, "बेटा यात्रापर निकला हु, एक छाता या ऐसी कोई काम कि चीज दिलवा दो." येउन त्यांनी सरळ ऑर्डरच दिली. ५-१० रुपयात खुश होणारे भिक्षुक नव्हते ते.
मी त्यांना नकार दिला आणि किंचित दूर गेलो. बाकी जणांना पुन्हा मलाच असा बाबा येउन भेटला म्हणून जरा हसु आलं. तोपर्यंत या बाबांनीसुद्धा रागारागात बडबडायला सुरु केलं.
"कलयुग है बेटा, कलयुग!!! नारायण कि सेवा नाही करोगे, तो यहा आनेका क्या फायदा? दरिद्र नारायण जानते हो? यु हि तो बाड आती है. तुम जैसे लोग ले डूबोगे दुनिया को."
त्यांच्याकडेसुद्धा दुर्लक्ष करून आम्ही गावात, बाजारात थोडा फेरफटका मारला. फिरत फिरत गाडी लावली होती तिकडे गेलो.
तिथे एक सगळी चाके काढलेला टेम्पो उभा होता. देवकांत यांनी आम्हाला त्याबद्दल एक गमतीशीर गोष्ट सांगितली. खरी कि खोटी माहित नाही. त्या गाडीच्या मालकाने खोटा विमा अर्ज दाखल केला होता. गाडी व्यवस्थित असूनसुद्धा ती पुरात वाहून गेली असा अर्ज केला. विमा कंपनीने तो दावा खोटा असल्याचे सिद्ध केले आणि तो मालक तुरुंगात गेला. तेव्हापासून टेम्पो तिथेच पडून होता. मालक दूर तुरुंगात असल्यामुळे बाकी भामट्यांनी बिनधास्त तिची चाके लंपास करून टाकली.
बद्रीनाथहून आम्ही परत गोविंदघाटला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी हरिद्वारला निघालो. आजचा दिवस फक्त या प्रवासासाठी होता. येताना आम्ही या भागात पोचलो तेव्हा अंधार झाला होता. त्यामुळे आम्हाला काहीच दिसले नव्हते. तेच सौंदर्य आता जाताना पाहत होतो. हिमालय सोडून तिथून निघण्याची इच्छा होत नव्हती.
गोविंदघाटवरून थोडं खाली जोशीमठच्या पुढेमागे आमचे मोबाईल पुन्हा सुरु झाले. आणि उत्तराखंड पोलिसकडून मेसेज यायला सुरुवात झाली. जाताना आम्हाला येताना लागली होती त्याहून मोठी दरड कोसळली होती. त्यामुळे भरपूर आधीपासून मार्ग वळवला होता. थोडाथोडा वेळ काही ठिकाणी वाहतूक खोळंबून राहत होती, पण तासंतास एका ठिकाणी थांबावं लागलं नाही.
गाडीत आमचा अंताक्षरीचा गेम रंगला होता. वाटेत थांबून लक्ष्मण झुला पाहिला.
संध्याकाळी हरिद्वारला पोचलो. तेव्हा रात्रीच्या ट्रेनला काही तासांचा वेळ शिल्लक होता. आम्ही फ्रेश होण्यासाठी आणि आराम करण्यासाठी दोन रूम घेतल्या. हॉटेलवाल्यांनी आमची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला, होईल तितकी घासाघीस करून आम्ही रूम ताब्यात घेतल्या.
आमच्यापैकी काही जणांना घाटावरची आरती पाहण्याची खूप इच्छा होती. पण बाथरूम दोनच असल्यामुळे आवरायला वेळ लागला. इथे पोचल्यावर सगळे थकले होते. कोण नक्की येणार, थांबणार काही समजत नव्हते. फक्त काही मिनिटे शिल्लक होती. आणि वेळ पुढे सरकत होता. अरूप आणि अमित जास्त थांबण्यात अर्थ नाही असा विचार करून मी तोंड धुवेपर्यंत पुढे पळाले.
मी तसाच ओल्या तोंडाने हॉटेलच्या बाहेर पळत आलो. घाटापर्यंत मी पळत तर पोचू शकणार नव्हतो. म्हणून मी तडक समोर आली ती सायकल रिक्षा केली. तोच निखिलसुद्धा मागे पळत आला, आणि माझ्या सोबत बसला. ह्या पळापळी मुळे काहीजण थोडे नाराज झाले. त्यांना पण यायचे होते. :D.
आमची सायकलरिक्षा सवारी मजेदार झाली. हिंदी पिक्चरमध्ये उत्तर भारतातली शहरे, गल्ल्या, बोळी, बाजार, गर्दीतून फिरणारा कॅमेरा असं चित्रण असतं तसंच अगदी वातावरण होतं. दोन्ही बाजूला दुकाने, त्यांच्यासमोर रस्त्यावर आलेले वेगवेगळ्या गोष्टींचे ठेले, अमर्याद गर्दी, ती सगळी मुख्य रस्त्यावर फुटपाथ असल्यासारखी फिरत होती. त्यांच्यामधून वाहने नो एन्ट्रीमध्ये घुसल्या सारखी अंग चोरून वाट काढत दोन्ही बाजूने चालली होती. आमचा सायकल रिक्षावाला फुल ताकद लावून आम्हाला पुढे ओढून घेऊन जात होता. कोणाशीही आपली टक्कर होईल अशी भीती वाटतच होती तोच एका दुचाकीच्या खेटून जाण्यामुळे सायकल रिक्षा कलंडला, आणि मी खाली सांडलो.
"गिरे तो भी सर उप्पर" असे म्हणतात तसे आमचे "गिरे तो भी कॅमेरा उप्पर" असे आहे. मला त्याचीच काळजी होती. बारीक से खरचटले, पण बाकी काही नाही. पुन्हा रिक्षात बसलो आणि पुढे निघालो. घाटावर पोचलो तेव्हा आरती जस्ट म्हणजे अगदी जस्ट संपली होती. हुकलीच शेवटी.
अरूप आणि अमितसोबत अनुजासुद्धा पळत गेली होती हे तिथे गेल्यावरच समजले. ते तिघे खूप पळाले होते आणि घामाघूम झाले होते. त्यांनासुद्धा अगदी शेवटचे काही क्षण बघायला मिळाले होते, पण अगदी परिपूर्ण दृश्य दिसले नव्हते. गंगा नदीच्या घाटावर हजारो लोक आरती करताना खूप छान दृश्य असते, हे फक्त टीव्हीवर पाहिले होते, पण प्रत्यक्षात संधी हुकली होती.
मग थोडावेळ घाटावर फिरलो. हजारो लोक नदीत अंघोळी करत होते. पाण्यापेक्षा सोडलेले दिवे, साबणाचे फेस, निर्माल्य, माणसे यांचाच भरणा नदीत जास्त दिसत होता. काही लोक आरतीचे ताट घेऊन फिरत होते आणि दक्षिणा गोळा करत होते. ते मंदिराचे पुजारी आहेत का, त्यांनी कोणती पूजा केली, आरती खरोखर केली का, कि फक्त कापूर जाळून दक्षिणा गोळा करत होते काय माहित. एक ताट, दिवा, तेल आणि कापूर एवढ्या भांडवलावर आपणसुद्धा हेच करू शकतो.
झाडेझुडपे उगवल्यासारखी गंगा, भगीरथ, शंकर यांची मंदिरेसुद्धा भरपूर होती. एकेक मंदिराच्या चहुबाजूला ओटे करून आणखी मिनी मंदिरे बनवली होती. म्हणजे प्रदक्षिणा घालताना सुद्धा अजून ४ देव दिसणार, आणि त्यात लोकांना दक्षिणा घालावी वाटणार.
आणि जवळपास सर्व मंदिरांवर "असली और प्राचीन" असा बोर्ड लावला होता. प्राचीन ठीक आहे एक वेळ, पण असली मंदिर म्हणजे? देवांची पण पायरसी होते कि काय इथे? कुठल्या दुकानावर शोभतील असले बोर्ड होते ते. बरोबरच आहे म्हणा. इतक्या हजारो लाखो भोळ्याभाबड्या लोकांच्या श्रद्धेला सेवा पुरवणारी मोठी व्यावसायिक चेनच ती, त्याच्या सगळ्या शाखा. त्यात स्पर्धा, म्हणून आम्हीच असली आणि प्राचीन अशी जाहिरात.
नदीतले पाणी पाहता त्यात जायची इच्छा होत नव्हती. तरी आपली पण सुप्त श्रद्धा, आणि "हरिद्वार आए और गंगा नही नहाए" असं नको व्हायला म्हणुन दूर एका गर्दी नसलेल्या कोपऱ्यात थोडा पाण्याला स्पर्श करून आलो.
थोडी भूक लागली होती, येताना चाटची मोठी दुकाने पाहिली होती. चाट, पूजा साहित्य, कपडे, प्रवाशांना लागणाऱ्या गोष्टी या सगळ्याची बरीच दुकाने होती. आणि त्यातल्या काही दुकानांवरसुद्धा "प्राचीन और प्रसिद्ध" असे बोर्ड होते.
एका दुकानात खूप गर्दी होती म्हणून तिथली कचोरी खाल्ली. नाव मोठं लक्षण खोटं. बस एवढंच वर्णन पुरे. ती गर्दी लौकिकामुळे नसावीच, फक्त आलेले लोकच इतके होते कि प्रत्येक ठिकाणी गर्दीच होती.
अजून काही खाण्याची इच्छा राहिली नाही. तसेच परत गेलो. जेवायला एका हॉटेलवर गेलो. जेवण होता होता जोरदार पाउस सुरु झाला. आमची थोडी फजिती झाली. अगदी समोर पलीकडे असलेल्या स्टेशनवर आम्हाला सामान सुखरूप पोचवायला रिक्षा कराव्या लागल्या.
आम्ही स्टेशनवर पोचल्यावर अगदी थोडाच वेळ तो पाउस टिकला. फक्त आमची फजिती उडवायलाच आला होता.
रात्री उशिराची संथ गतीने जाणारी ट्रेन होती. माझी जागा जरा दुसरीकडे होती. जागेवर पोचून थोड्यावेळात मी झोपून गेलो. सकाळी दिल्लीला पोचलो.
स्टेशनबाहेर आम्ही एक सोबत ट्रीपमधला शेवटचा सेल्फी/ग्रूपी काढला आणि आम्ही पांगलो. प्रत्येकाचे वेगळ्या वेळी वेगळ्या ठिकाणी विमान होते.
मध्ये वेळ असल्यामुळे आम्ही ४ जण ममताच्या घरी जाऊन आलो. काकूंनी अगदी चविष्ट पुरी भाजी करून आम्हाला तृप्त केलं. विमानतळावर जाऊन परतीचं विमान पकडलं आणि एक जबरदस्त सहल संपली.
क्रमशः (पुढील पोस्टमध्ये फक्त माहिती)
प्रतिक्रिया
25 Feb 2016 - 9:59 pm | प्रचेतस
हा भागही आवडला.
26 Feb 2016 - 1:55 pm | आकाश खोत
धन्यवाद :)