वॅली ऑफ फ्लॉवर्स : २ : बंद घाटातुन गोविंदघाटापर्यंत

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
9 Nov 2015 - 2:44 pm

मागील लेखात सांगितल्याप्रमाणे माझी पुणे दिल्ली ट्रेन रद्द झाली आणि मला मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकीट काढणे भाग पडले. त्यामुळे माझ्या प्रवासाची सुरुवात पुणे ते मुंबई ट्रेनने झाली. बाहेर मस्त पावसाळी वातावरण होते. ट्रेन जेव्हा लोणावळ्या खंडाळ्याजवळुन जात होती, तेव्हा खूपच छान दृश्य दिसत होते.

हिरवेगार डोंगर, धबधबे, तळी असे सर्व पाहताना छान उत्साह येत होता. डोंगरदऱ्या, काही ओळखु येणारे किल्ले पाहुन वाटत होते आत्ता इथेच उतरून ट्रेकला जावे.

मुंबईला पोहचुन विमान पकडले, दिल्लीला गेलो. दिल्लीला सगळे भेटलो, मग हरिद्वारची ट्रेन पकडली. हरिद्वारपर्यंत संध्याकाळी पोहोचलो.

आधीच अंधार पडलेला होता. इथपर्यंतचा प्रवास आम्ही आमचा केला होता. इथून पुढे ट्रीपचे पॅकेज सुरु होणार होते. हरिद्वारपासून पुढे सगळी हॉटेल्सची बुकिंग, हरिद्वार ते गोविंद घाट आणि परत अशी खाजगी गाडी, हे सगळे त्यात होते.

हरिद्वार पुढे एटीएम सहजासहजी मिळणार नाही त्यामुळे लागेल तितकी रक्कम आधीच काढून घ्या अशी सूचना त्यांनी दिलेलीच होती. त्यामुळे स्टेशन बाहेर पडलो कि आवारातच आम्ही सगळ्यांनी रांगा लावुन पैसे काढले.

ऑपरेटरला आम्ही फक्त आगाऊ रक्कम दिलेली होती, बाकी सगळी आम्ही गोविंदघाटला पोचल्यावरच देणार होतो. ती रक्कम अधिक आम्हाला खर्चासाठी लागणारी अशी प्रत्येकाची वैयक्तिक रक्कम बरीच होती. त्यामुळे दहाजण दोन एटीएमवर तुटून पडले तेव्हा आमच्या मागे रांगेत असणारे पोचेपर्यंत तर जाऊच दे, आमच्यातच जे शेवटी होते त्यांचा नंबर लागेपर्यंत काही रक्कम शिल्लक राहते का अशी गमतीशीर भीती वाटत होती.

सगळ्यांचे पैसे काढून झाल्यावर दोन रिक्षा ठरवून आम्ही हॉटेलला गेलो. अंधार पडलेला होता, आधी सगळ्यांची हरिद्वारमध्ये फिरण्याची इच्छा होती, पण आता थकव्यामुळे, उशीर झाल्यामुळे, भूक लागल्यामुळे आम्ही ते रद्द केले. रिक्षातून जाताना दिसेल तशी गंगा, घाट, मंदिरे, दिवे सगळे पाहत जात होतो.

हॉटेलला पोचून जेवण केले, आणि काही वेळात झोपलो. उद्या सकाळी लवकर उठून जायचे होते.

हरिद्वार ते गोविंद घाट हा जवळपास ८-१० तासांचा (३०० किमी) प्रवास आहे. वाटेत ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग अशी ठिकाणे आहेत. तिथे थांबत थांबत जायचे, त्यात चहा, जेवण असे आवश्यक थांबे आलेच. आणि दरड कोसळली तर प्रवास आणखी लांबतो. हे सर्व पकडून जितके लवकर निघाल तितके चांगले.

पहिल्या दिवशीपासूनच रोज सकाळी सर्वांना उठवण्याची जबाबदारी स्नेहाने घेतली होती. ती स्वतः उठून सगळ्यांच्या रूमचे दरवाजे वाजवून जागे करायची. आणि असे करूनसुद्धा आवरायला तिलाच वेळ लागायचा. ती आणि हरप्रीत हे आमच्याकडचे तयार व्हायला सर्वात जास्त वेळ घेणारे सदस्य.

आम्ही तयार झालो, तरी ड्रायवरने येउन शांतपणे सामान लावत, गाडी साफसुफ करत निघायला बराच वेळ घेतला. १० जण असल्यामुळे आम्हाला टेम्पो मिळाली होती. ड्रायवरचं नाव मनोज. अगदी लहानसर चणीचा. एवढा छोटा दिसणारा माणुस एवढी मोठी गाडी चालवताना पाहुन आश्चर्य वाटेल. पण तो इतकी वेगाने आणि भन्नाट गाडी चालवत होता कि बस.

तिकडचे रस्ते आपल्यापेक्षा बरेच वेगळे आहेत. उंच डोंगरातले घाट, निमुळते रस्ते, तीव्र उतार आणि चढण, तितकेच तीव्र वळण. जिथे आपण एक गाडी चालवायला पुढे मागे पाहू, तिथे हे लोक बिनधास्त दोन्ही बाजूने गाड्या पळवतात. शैलीदार कट मारतात. ते कशी गाडी चालवत आहेत ह्याकडे लक्ष दिले कि आपलेच ठोके वाढतात. मधून मधून "भैय्या आरामसे" म्हणत आपल्यालाच आरामसे घेत दुर्लक्ष करावे लागते.

हरिद्वारहून निघालो आणि ऋषिकेश जवळ कुठेतरी एका कार्यालयासमोर गाडी थांबली आणि ड्रायवर उतरून काही वेळ गायब झाला. मग आम्ही उतरून बघत होतो कि का थांबवली.

एकमेकांना विचारत होतो कि "क्यू रोका है यार?"

एक म्हातारे दाढी वाढवलेले साधु लुक असलेले बुवा आले, आणि कार्यालयाकडे बोट दाखवून म्हणाले "वहा आपका 'पंजीकरण(?)' किया जाता है".

आम्ही बघायला गेलो कसलं पंजीकरण. उत्तराखंड पोलिस आणि सरकार, तिथे तीर्थयात्रेसाठी येणाऱ्या सर्व प्रवाशांची माहिती गोळा करते. नाव, पत्ते, फोन नंबर, घरचे नंबर आणि कुठल्या ठिकाणी प्रवासाला जाणार अशी सगळी महत्वाची माहिती. उत्तराखंडमध्ये दरड कोसळणे, हवामान खराब होणे, पूर येणे असे प्रकार होत राहतात. त्यामुळे कुठल्या ठिकाणी साधारण किती प्रवासी आहेत याचा अंदाज येतो.

प्रत्येक प्रवाशाला एक कार्ड मिळतं. काही अनुचित प्रकार घडला, तर ओळख पटवायला याचा उपयोग होऊ शकतो.

i1

तिथेच बाहेर एका फलकावर तिथल्या प्रमुख तीर्थस्थळांच्या वातावरणाची माहिती लावली होती.

आम्हाला याचं कौतुक वाटलं. आणि आणखी कौतुकास्पद गोष्ट म्हणजे आम्ही तिकडे असेपर्यंत आम्हाला उत्तराखंड पोलिसकडून कुठल्या रस्त्यांवर दरड कोसळली आहे, कुठे काम चालू आहे, कुठे रस्ता बंद आहे याचे मेसेज येत होते. परत येताना त्याचा फायदा झाला.

ते करून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. एका ठिकाणी थांबून नाश्ता झाला. तिथे निखिलने (आमच्या बहुभाषिक बहुप्रांतीय मंडळातला तेलगु प्रतिनिधी) मेन्युकार्ड न बघता वडा सांबर घेणार म्हणुन सांगितलं. आम्ही इथे कसे मिळेल म्हणुन हसत होतो. तो एकदम विश्वासाने म्हणाला कि आता सगळीकडे मिळतं. पण मेन्युकार्ड आल्यावर त्याचा पोपट झाला. या गोष्टीवरून त्याची पूर्ण ट्रीपमध्ये आम्ही उडवली. "अरे इसको वडा सांबर दो", जो त्याला परतीच्या मार्गावर लागेपर्यंत कुठेही मिळाला नाही.

जाताना देवप्रयागचा संगम लागला. पाहायला अगदी छान. दोन नद्यांचा वेगळ्या रंगाचा प्रवाह एक होताना दिसतो. तिथे काही वेळ थांबून फोटो काढले आणि निघालो.

i2

तिथून निघालो आणि मग पुढे घाटात आम्ही अडकलो. बरंच पुढे कुठे तरी दरड कोसळली होती, ती काढण्याचं काम चालु होतं आणि गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली होती. आम्हाला पुढे फक्त गाड्या दिसत होत्या. काम काही दिसत नव्हतं आणि किती दूर आहे, किती वेळ लागेल काही अंदाज येत नव्हता.

सगळ्या ड्रायवर लोकांनी गाड्या बाजूला लावल्या. बहुतेक सगळे एकमेकांना ओळखत होतेच आणि अशा ठिकाणी नव्या ओळखीपण होतात. त्यांनी आपला गप्पांचा अड्डा जमवला. आम्ही एका हॉटेलच्या अंगणात फतकल मारली, आणि आमचा अड्डा जमवला.

काही तास तरी लागतील असा नूर दिसत होता. तिथेच दुपारचं जेवण करावं का असा विचार केला. पण नुकताच नाश्ता झाला असल्यामुळे कोणालाही भूक नव्हती. तसाच टाईमपास चालु होता. वेळ लागायला लागला तसा आम्ही गमतीने या हॉटेलमधेच रूम घ्यावी कि काय असाही विचार करायला लागलो.

आमच्याच कंपनीकडे बुकिंग केलेल्या आणखी दोन तीन गाड्या म्हणजेच आणखी ग्रुप होते. त्यातले एक मराठीच होते. त्यांनी खरोखर रूम घेऊन टाकली आणि आत जाऊन बसले. आम्ही नुसता विचारच करत होतो.

हरप्रीत आणि अंगद तिथे बसण्याचा कंटाळा आला म्हणून "बघू तरी पुढे काय झालंय नेमकं" म्हणत चालत पुढे निघाले. आणि चालत चालत ते जवळपास ६-७ किमी पुढे गेले होते. असं ते म्हणत होते. आम्हाला खरं वाटत नव्हतं. कारण हरप्रीत आदल्या दिवशी पोटदुखीमुळे एकदम परेशान होता. पण शक्यता नाकारतासुद्धा येत नव्हती. दोघं पंजाबी, अति उत्साही.

त्यांचा काही वेळात फोन आला, कि इथलं काम झालंय, गाड्या निघतायत. ड्रायवरला सांगून पटकन निघा. आम्ही ताबडतोब उठून ड्रायवरला शोधलं, माहिती सांगितली, आणि निघायला सांगितलं. पण तो तयार होत नव्हता. तो म्हणाला दोन्हीकडून गाड्या येऊ जाऊ देत. अशी रांगेबाहेर गाडी काढणं बरोबर नाही. पोलिस पकडतात, आणि ड्रायवरच फसतो.

i3

हळूहळू गाड्या सरकायला लागल्या. तिकडून हरप्रीत अंगदचे फोन वर फोन येत होते, आणि इकडे हा निघायला तयार नव्हता. तो म्हणाला कि लाईन सोडायला नाही पाहिजे, अजून प्रॉब्लेम होतो. "ये पहाडी इलाका है साबजी. यहा का तरीका अलग होता है."

काही वेळाने आमच्या समोरच्या गाड्या हलल्या तेव्हा कुठे आम्ही निघालो. रांग अगदी काही फुट पुढेपुढे सरकत होती. काही छोट्या गाड्या, जीप वगैरे रांगेबाहेर जाउन पुढे जात होते. काही वेळाने आम्ही थोडं पुढे पोचलो, तेव्हा अशा गाड्यांमुळे खरच अडथळे झाले होते, मग त्या गाड्या पुन्हा मागे येउन रांगेत घुसत होत्या.

सगळे लोक त्यांच्यावर चिडले होते, तुमच्यामुळे अर्धा एक घंटा अजून वाढला म्हणून लाखोली वाहत होते. आम्हीसुद्धा त्यांच्या नावाने शंख करत होतो. ड्रायवर म्हणाला ते खरंच होतं. सगळे शांतपणे रांगेत राहिले तर परिस्थिती लवकर हाताळता येते. उतावळेपणामुळे समस्या वाढते. ड्रायवरने आम्हाला सुनावलंच मग, "देखा साबजी, आपकी सुनके गाडी आगे ले लेता तो यु हि बीच मी फस कर सबकी गाली खा रहा होता."

i4

आम्ही खाली उतरून फोटोबिटो काढले, असाच टाईमपास केला. एक एक करत बाकी लोकांनापण गाडीत बसून राहायचा कंटाळा आला आणि पायीपायी पुढे निघाले.

वेळ चालला होता, आणि आम्ही आज गोविंदघाटला पोचतो कि नाही अशी शंका येत होती. कारण तिकडे रात्री रस्ते बंद करतात. आम्ही रस्ते बंद होण्याआधी त्या मार्गावर लागणे आवश्यक होतं.

जिथे काम चालू होते ती जागा आली आणि एकदाचे आम्ही त्या जाममधून बाहेर निघालो. तो भागच तसा होता. तिथे नेहमी अशा घटना होत राहतात. चालत निघालेले सगळे वेगवेगळ्या टप्प्यावर भेटले. सर्वात शेवटी हरप्रीत आणि अंगद. सगळ्यांना गाडीत घेऊन निघलो.

काही अंतरावरच एका हॉटेलमध्ये थांबलो. पण तिथे सगळ्या आत्ता जाममधून सुटलेल्या गाड्या थांबल्या होत्या. लवकर काही खायला मिळण्याची चिन्हे नव्हती. आम्ही तिथे जेवण्याचा विचार सोडला आणि पुढे काहीतरी खाऊ असा विचार केला.

बराच उशीर झालेला असल्यामुळे रुद्रप्रयागचा संगमसुद्धा न पाहता सोडला. एका ठिकाणी फक्त थोडी फळे वगैरे सामान गाडीतच खायला म्हणून घेतली. कुठे थांबून जेवायला वेळ नव्हता.

गोविंदघाटच्या थोडं अलीकडे असलेल्या जोशीमठला पोचलो तेव्हा अंधार पडून गेला होता. तिथे आमच्या टूर कंपनीचे ३ गाईड आमच्या गाडीत चढले. आता पुढे जाता येईल कि नाही यावर त्यांची चर्चा चालू होती. शेवटी प्रयत्न करायचे ठरले.

रस्त्यात पोलिसांनी अडवून दटावलेच, कि अंधार पडलाय, आता रस्ता बंद. पण थोडी विनंती केली, आमची गोविंदघाटमध्ये बुकिंग आहे, यावेळी जोशीमठला राहायची गैरसोय होईल, दरड कोसळली वगैरे सगळ्या गोष्टी सांगून जाऊ देण्याची विनंती केली. त्यांनी शेवटी आमचं ऐकलं.

इथून पुढे जाता जाता सगळ्यांचे मोबाईल कवरेज गेले. हेही अपेक्षित होते. तिकडे फक्त बीएसएनएल आणि आयडिया चालतात असे आम्हाला सांगितलेच होते. त्यामुळे दोघातिघांनी ते सीम आणले होते.

थोड्यावेळात गोविंदघाटला हॉटेलवर जाउन पोहोचलो. आमचे टूर मॅनेजर देवकांत संगवान यांनी आमच्या ड्रायवरची पाठ थोपटली. "लडके तू विनर है. फर्स्ट आया है आज. हरिद्वारसे निकले हुए सब अभी तक जोशीमठभी नही पहुचे. अब उनको तो वही रुकना पडेगा. बस तू यहा तक आ गया आज."

आम्हीपण आमच्याकडून थोडी बक्षिसी त्याला दिली. वर जाऊन फ्रेश झालो. देवकांतशी दुसऱ्या दिवशीच्या प्लानवर चर्चा केली. पैसे देऊन आमचे (मानसिक) ओझे हलके केले. आणि गरमागरम जेवणावर ताव मारून झोपलो. दुसऱ्या दिवशीपासून ट्रेक चालु.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ३ : ट्रेकची सुरुवात, घांगरीयापर्यंत

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

9 Nov 2015 - 3:08 pm | मांत्रिक

वाचनीय आहे. निवांत वेळेत वाचणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2015 - 3:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान झाली सफर इथपर्यंत. आता ट्रेक सुरू म्हणजे अजून रोचक होईल अशी अपेक्षा आहे. पुभाप्र.

शिव कन्या's picture

9 Nov 2015 - 5:17 pm | शिव कन्या

पुलेशु.

जगप्रवासी's picture

9 Nov 2015 - 5:55 pm | जगप्रवासी

पुढील प्रवासासाठी सीटबेल्ट लावून घेतलेत, लवकर येऊ द्या पुढचा भाग

वा! पुढील भागही असाच रंगतदार असेल याची खात्री. पुभालटा.

आकाश खोत's picture

25 Nov 2015 - 4:12 pm | आकाश खोत