हवा के साथ साथ..

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
25 Oct 2015 - 10:00 pm

ह्या भारतवारीत अशाच निवांत गप्पा चाललेल्या असताना काकूने एअर फ्रायरचा विषय काढला. विषय मोठा टेम्टिंग होता. गरम हवेचे झोत वेगात फिरवून फ्रेंच फ्राइज पासून केकपर्यंत कोणतेही पदार्थ तयार केले जातात आणि तेलाचा वापर त्यात नगण्य असतो ही गोष्टच क्रांतिकारी होती. अर्धा चमचा तेलात कटलेट आणि एक चमचा तेलात समोसे बनतात अशा संभाषणातले समोसे, कटलेट, पेस्ट्री असं सारखं सारखं ऐकून जीभ चाळवली आणि कोपर्‍यावरच्या वडेवाल्याकडून वडे, भजी आणलेच आम्ही.. मग उगाचच आपण किती तेलकट खातो, किती क्यालरींना उदराश्रय देतो वगैरे गप्पांवर गाडी वळली आणि उगाच अपराधी वाटायला नको म्हणून मग आम्ही विषयच बदलला पण डोक्यात मात्र तो एकीकडे टिकटिकत राहिला. जर्मनीत परतल्यावर आमचा शोध सुरू झाला. जालावर एअर फ्रायरच्या रेसिपींचा आभासी आस्वाद घेणे चालू झाले. नुसतीच जीभ खवळून उठायला लागल्यावर रेसिप्या पाहणे बंद केले आणि एअर फ्रायरची माहिती वाचणे चालू केले. यात २०० अंश से पर्यंत तपमान नेता येते आणि वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळा वेळ आणि तपमान अ‍ॅडजस्ट करून तो, तो पदार्थ शिजवता येतो हे तर समजले. अनेक कंपन्यांची वेगवेगळी मॉडेले पाहून नुसत्या चित्रात किवा चित्रफितीत पाहण्यापेक्षा आपण प्रत्यक्षच पाहू असा विचार करून मग 'मिशन एअर फ्रायर' सुरू केले. सॅटन. टोम, मिडियामार्क्ट.. अशा सगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

शेवटी दसर्‍याला सीमोल्लंघन करायचे असे ठरवून एकदाचा फिलिप्स अ‍ॅवन्सचा एअरफ्रायर बुक केला. नवरात्रातच तो घरी आला. लगेच खोका उघडून त्यात दाखवल्याप्रमाणे जोडणी केली. एकदा घरात आल्यावर नुसता मखरात बसवून ठेवून दसर्‍यापर्यंत काही धीर निघेना, त्यात असलेल्या माहितीपुस्तकात एक रंगीत चित्रांचे आकर्षक रेसिपी बुकही येते. आता हे सगळे बिनतेलात किवा अगदी कमीत कमी तेलातुपात करता येणार आहे हे दिसू लागले. मग पहिला गड फ्रेंच फ्राइजचा सर करायचे ठरवले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फ्राइज केल्या. पहिल्या किंचित जास्त खरपूस झाल्या पण नंतर मस्त जमल्या. डिशभर फ्राइज आपण फक्त चमचाभर तेलात त्या फ्राय केल्या आणि त्या मस्त झाल्यात हे समजल्यावर पहिला गड सर झाल्याच्या आनंदात तर जरा जास्तच खाल्ल्या.

साबुदाणे वडे, उपासाचे कबाब, कॉर्न कटलेट्स, पट्टी समोसे.. वॉशिंग्टनची कुर्‍हाड मग जोरात सुरू झाली. चुकत, प्रयोग करत शिकणं सुरू झालं. खुसखुशीत साबु वडे हाताला तेल न लागता खाण्याची खुमारी वेगळीच होती. कटलेट पलटताना जाळीला चिकटल्यावर थोडा हिरमोड झाला पण नंतर ते जेव्हा तयार झाले तेव्हा ते अजिबात मोडले नाहीत. पट्टी समोसे आणि स्प्रिंग रोल भारी तेल पितात म्हणून करणे टाळते पण आता ह्या एअरफ्रायरमध्ये एक चमचा तेलात मात्र ते फारच सुरेख झाले. मग आमचा मोर्चा कोथिंबिर वडी, वांग्याचे काप आणि कांदाभज्यांवर वळला. फक्त ग्रिझिंग केलेली कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबिर वडी, कांदा भजी आणि काप गिल्टफ्री मनसोक्त खाल्ले. (सगळं एकाच वेळी नाही केलं, वेगवेगळ्या दिवशीचे प्रयोग!) भरड्याचे वडे, थालिपिठं साफ फसले. तर भाजणीचे वडे, पुर्‍या अशा बर्‍याच मंडळींवर प्रयोग करणं बाकी आहे. एकेक पदार्थ एक्सप्लोअर करणं चालू आहे.

.

दसर्‍याला एअर फ्रायर मध्ये गुलाबजाम करायचे ठरवले. मी भारतातून येताना चितळेंचे पाकिट आणले होते. अर्धेच पाकिट वापरून पाहू. प्रयोग फसला तर आपले नेहमीसारखे तळू असा विचार केला. गु जा मंद तळावे लागतात म्हणून जरा जालावर आधी शोध घेतला. संजय थुम्माही मंदाग्नीवरच तळायला सांगत होता.एअर फ्रायरही १४० अंश से वर ठेवा असंही सांगत होता. पण त्याने मोठा लंबगोल करून अर्धा कापायला सांगितला. तसले काही न करता मी आपले नेहमीसारखे करायचे ठरवले. ठेवले १४० अंशावर. १०/१२ मिनिटांनी बाहेर काढून पलटले पण ब्राउनिंग यायचे लक्षण नाही. परत १० मि. ठेवले तरी आपले ते पांढरे ते पांढरेच .. अर्ध्या तासानंतर त्याला ब्राउनिंग आलं. बाहेर काढले तर नुसते कडक.. एकमेकांना फेकून मारावेत असे.. एक गु जा घेतला आणि सुरीने अ‍ॅपल कापावे तसा कापला. तर आतमध्ये छान सॉफ्ट! मग ते उरलेले कडक गुलाबजाम तसेच पाकात घातले. नव्हे नव्हे गरम पाकात अगदी बुडवलेच. दुसर्‍या दिवशी पाहिले तर ते अगदी छान सॉफ्ट झाले होते! शुभारंभाचा प्रयोग तर छान झाला. हुरुप आला आणि मग उरलेले पाकिटही एअरफ्राय केले.

ह्यात बेकिंग करता येते हे माहित होते. माझा जिव्हाळ्याचा कोपरा हा! त्यामुळे केक प्रयोग तर करायला हवाच होता. माझ्या बेकर्स बास्केटमध्ये मग एअरफ्रायरचा रिकोटा लेमन केकही आला.

.

सध्या मी खूष आहे. 'हवा के साथ साथ..' नवे नवे प्रयोग करते आहे. कधीकधी प्रयोग फसतो आहे तर कधी फारच छान होतो आहे. 'एअरफ्रायर नको.. पण पदार्थ करणं आवर' अशी वेळ यायला नको हे मात्र स्वत:ला बजावलं आहे. :) अजून काही नवे यशस्वी प्रयोग घेऊन परत एक अध्याय लिहिन.

जीवनमानराहणीलेखअनुभव

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

25 Oct 2015 - 10:05 pm | श्रीगुरुजी

एअर फ्रायरचा फोटो टाकता येईल का? नक्की कोणते मॉडेल तुम्ही वापरले? भारतात एअर फ्रायर मिळतात का? अंदाजे काय किंमत आहे?

स्रुजा's picture

25 Oct 2015 - 10:12 pm | स्रुजा

अरे वा ! सध्या फार ऐकते आहे याच्या बद्दल. तू तर प्रयोगाचेच डीटेल्स दिलेस , त्यामुळे तुझे धन्यवाद. वर श्रीगुरुजींसारखेच प्रश्न मला पण पडलेत. आणि याच्या ईलेक्ट्रिसिटी कन्झम्प्शन चं काय? म्हणजे गुजा इतका वेळ घेऊन होत असतील तर खुप बिल येतं का?

ये एयर फ्रायर एयर फ्रायर क्या है ये एयर फ्रायर एयर फ्रायर?

स्वाती दिनेश's picture

25 Oct 2015 - 10:23 pm | स्वाती दिनेश

ही लिंक-airfryer
बजाज, केन्स्टर,डेलाँगी, टेफाल अशा अनेक कंपन्याचे एअरफ्रायर बाजारात उपलब्ध आहेत. सगळा अभ्यास केला असता उन्नीस बीसचा फरक जाणवला. त्यात आम्हाला फिलिप्स बरा वाटला.
ऑनलाइन मागवल्यास किमतीत फरक खूप पडतो, दुकानातून घेण्यापेक्षा बरेच स्वस्त पडते.
क्न्झम्शनचा प्रश्न मला फार पडला नाही कारण येथे कुकिंग रेंजही इलेक्ट्रिकच आहे. पण बेकिंग फास्ट झालेले लक्षात आले.
स्वाती

लिंक साठी धन्यवाद. अमेझॉन वर शोधते आता. पाडव्याची यादी करायला सुरुवात करायला हवी ;)

पद्मावति's picture

25 Oct 2015 - 10:33 pm | पद्मावति

अनेकानेक धन्यवाद स्वाती. खूप दिवसांपासून या उपकरणाविषयी ऐकून होते पण कसा असेल काय असेल याचा अंदाजच येत नव्हता. आता तुझ्यामुळे मस्तं आयती फर्स्ट हॅण्ड माहिती मिळाली. यावर्षी दिवाळीची माझी खरेदी पक्की झालीय. सगळ्याच पदार्थांचे फोटो अती टेंप्टिंग.

एयरफ्रायर नुसतेच आहे.त्यात रेडिमेड फ्रेंच फ्राइज सोडून काही करत नव्हते.मध्ये मृ आणि सानिकाने घेतले.त्या इतक्या धडाधड रेसिपी करायला लागल्या की न राहावून शंकरपाळे केले.आता वापरत असते.यात कुरकुरीत भेंडी कारली पण मस्त होतात.
गुजा करुन पाहीन आता.

सानिकास्वप्निल's picture

25 Oct 2015 - 11:53 pm | सानिकास्वप्निल

नवर्‍याने अलिकडेच वाढदिवसाला भेट म्हणून फिलिप्सचा एयरफ्रायर दिला :)

मग काय दर आठवड्याला यात प्रयोग सुरु झाले, मी क्रिस्पी भेंडी, कुरकुरीत कारली, मटार करंजी, खस्ता कचोरी, मठरी, तळणीचे मोदक, पाणी-पुर्‍याच्या रेडीमेड तळणीच्या पुर्‍या मिळतात त्या यात केल्या आहेत. मृने पण यात गुजा ट्राय केले, पण तेच पाक आतपर्यंत मुरतो का? असा प्रश्न मला अजून ही आहेच. अगदी १/२ ते १ चमचा तेल चोळून मस्तं खुसखुशीत होतात पदार्थ. या व्यतिरिक्त आपल्या वाळवणाचे पदार्थ म्हणजे पापड्या, बाजरीच्या चकल्या, साबुदाण्याच्या चकल्या, कुरडया हलके तेल ब्रश करुन फ्राय केले की छान फुलतात. मसाला पापडसाठी यात पापड फ्राय केलाय पण ते जरा नाजूक काम आहे, पापड हवेने उडून तुटू शकतो म्हणून योग्य तापमान सेट केले की होतो छान.

वेळ आणि तापमानाचे गणित पक्के बसले की पदार्थ मस्तं होतो, मी तर आतापर्यंत ट्राय केलेले पदार्थांचे तापमान आणि वेळ नोट करुन ठेवले आहे :)

काही पदार्थांचे फोटो देतेय.

.

वेळ आणि तापमानाचे गणित पक्के बसले की पदार्थ मस्तं होतो, मी तर आतापर्यंत ट्राय केलेले पदार्थांचे तापमान आणि वेळ नोट करुन ठेवले आहे :)

कृपया हे कोष्टक याच किंवा वेगळ्या धाग्यात देता येईल का? खुप बरे पडेल. हाय फंडु पदार्थ नको पण साध्या साध्या पदार्थांचे (भजी पापड, वांगे, बटाटा कापं, मासे, शंकरपाळे वगैरे) तरी द्याच.

एस's picture

26 Oct 2015 - 12:04 am | एस

इंटरेस्टिंग!

रेवती's picture

26 Oct 2015 - 4:38 am | रेवती

एयरफ्रायर हा प्रकार पहिल्यांदा सानिकेकडून ऐकला पण नक्की काय प्रकरण आहे हे स्वातीताईकडून समजले. त्यात बरेच पदार्थ करता येतात हे पाहिले, वाचले. तीन चार चित्रफितीही या लेखाच्या निमित्ताने पाहिल्या गेल्या. स्वातीताई व सानिकेने दिलेले फोटू पाहून शंका येण्यास वाव राहिला नाहीये. चित्रफिती पाहिल्याने त्यात चिकन हा प्रकार तयार होऊ शकतो म्हणून बरे वाटले. पहिल्यांदाच हे प्रकरण पाहिल्याने अजून तरी सगळे अजब वाटत आहे.

श्रीरंग_जोशी's picture

26 Oct 2015 - 5:05 am | श्रीरंग_जोशी

एअर फ्रायर या उपकरणाबद्दल तुमच्या या लेखामुळे प्रथमच कळले. ज्या लोकांना तळकट पदार्थ खाणे टाळायचे आहे पण काही वेळा नाइलाजाने खावे लागतात (जसे सण वगैरे) त्यांच्यासाठी तर हे उपकरण वरदानच आहे.

लेखातले पदार्थांचे वर्णन अन फोटोज आवडले.

हे उपकरण कसे काम करते याबाबत जालावर शोधले असता ही चित्रफीत मिळाली.

अवांतर - शीर्षक वाचून हेमा मालिनी व संजीव कपूर यांच्यावर चित्रित झालेल्या गीताचे रसग्रहण असावे असे वाटले होते. बरं झालं लेख उघडला :-) .

संजीव कपूर नाय ओ. संजीवकुमार असेल

श्रीरंग_जोशी's picture

26 Oct 2015 - 7:52 pm | श्रीरंग_जोशी

ड्वॉस्क्यात त्योच व्हता पर खान्यापिन्याबाबत इषय सुरु असल्यानं संजीव टायपल्यावर कुमारचं कपूर झालं... :-(

यक डाव माफी असावी...

बहुगुणी's picture

26 Oct 2015 - 5:55 am | बहुगुणी

गेले वर्ष भर बरेचदा या खरेदीचा विचार केला आणि दोनदा दुकानात जाऊन न घेता मोह टाळल्याच्या आनंदात घरी आलो होतो. मुख्य भीती 'आंतर्जालावरच्या शेफ्सना जमतंय ते आपल्याला जमेलच असं नाही' अशी होती. पण आता इथल्या पाकश्रेष्ठीनी सप्रमाण त्याची उपयुक्तता सिद्ध केलीय म्हंटल्यावर हे उपकरण घ्यायचा हुरूप वाढला आहे. सानिकाताई, स्वातीताई आणि इतर ज्यांनी फिलिप्सचं एअर फ्रायर वापरलं आहे, त्यांनी याच धाग्यात त्यांचे विविध पदार्थांसाठीचे तापमान आणि वेळेचे अनुभवी तक्ते इथे टाकले तर फार उपकार होतील. मागच्यास ठेच, पुढचा शहाणा! या लेखाबद्दल स्वातीताईं चे विशेष आभार!

मदनबाण's picture

26 Oct 2015 - 6:54 am | मदनबाण

किती तो अत्याचार करावा !

{फ्रेंच फ्राइज प्रेमी} :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जान ओ बेबी... ;)

चतुरंग's picture

26 Oct 2015 - 7:15 am | चतुरंग

हे सगळे सुगरणींचे अत्याचार बघून ख्याक झाल्या गेले आहे!

(बिनतेलात फ्राय झालेला)रंगाफ्राय

मितान's picture

26 Oct 2015 - 7:31 am | मितान

मस्त वाटतंय हे प्रकरण !

महागडे उपकरण. जे रीव्ह्यु वाचले त्यात लिहिले होते की तळल्याचा फील न येता बेक केल्याचा फील येत होता. आपलं काय मत असेल?

श्रीरंग_जोशी's picture

18 Nov 2015 - 8:22 pm | श्रीरंग_जोशी

तळण्याऐवजी बेक केलेले काही पदार्थ चवीच्या बाबतीत तडजोड केल्यासारखे वाटतीलच असे नाही.

आमच्या शहरातल्या भारतीय वाणसामानाच्या एका दुकानात दर शुक्रवारी संध्याकाळी बेक्ड समोसे मिळतात. चवीच्या बाबतीत उत्कृष्ट म्हणता येतील असे असतात.

मधुरा देशपांडे's picture

26 Oct 2015 - 11:50 am | मधुरा देशपांडे

धाग्यात उल्लेखलेले उपासाचे कबाब, सामोसे, गुलाबजाम आणि केक हे पदार्थ परवाच स्वातीताईकडे खाल्लेत. जोवर तिने सांगितले नाही, तोवर हे पदार्थ एअर फ्रायर वापरुन केलेत हे कळले सुद्धा नाही, म्हणजेच चव नेहमीच्या पदार्थांसारखीच लागते पण वेळ, तेल आणि कष्ट खूपच कमी. आवडला हा प्रकार.

पदम's picture

26 Oct 2015 - 11:54 am | पदम

मिळाली. खुप उपयुक्त आहे हा एअर फ्रायर. लवकर विकत घेण्यात येइल.

स्नेहल महेश's picture

26 Oct 2015 - 1:03 pm | स्नेहल महेश

आवडला हा प्रकार

सुमीत भातखंडे's picture

26 Oct 2015 - 2:40 pm | सुमीत भातखंडे

मस्त!

द-बाहुबली's picture

26 Oct 2015 - 2:43 pm | द-बाहुबली

_/\_

स्वाती ताई, लेख आवडला.
मी एअर फ्रायर घेउन आता १ वर्ष झाले. माझा तर जवळ-जवळ रोज वापर होतो असे म्हटले तरी चालेल. मी आता पर्यंत केलेले पदार्थ म्हणजे, कचोरी, तळणीचे मोदक ( एअर फ्रायर मधे तळले ;) ), कुरकुरी भेंडी, चिकन लॉलीपॉप, चिकन ६५, फेंच फ्राईज, सामोसे हे स्व्तः बनवलेले पादार्थ. आपले जे वाळवणीचे पदार्थ असतात, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याच्या चकल्या, बटाट्याचे वेफर्स हे सगळेच खुप मस्त होतात. ह्यामुळे मला नवरात्रात उपासासाठी खुप फायदा झाला. पाणीपुरीच्या ज्या फक्त तळणीच्या रेडिमेड पुर्‍या मिळतात, त्यात तर खुप मस्त होतात ह्यात, अशा काही टम्म फुगतात. आता पाणीपुरी इच्छा झाली कि लगेच करता येते. पाणी आणि चटण्या तयार असतील तर पुर्‍या बनवायला फत ३-४ मिनिटे लागतात.
मी अक्षरशः प्रेमात आहे ह्या एअर फ्रायरच्या :)

बटाटेवडे, मेदूवडे, पनीर पकोडा करता येतो का याच्यात?
थोडक्यात ज्या पदार्थांना पिठात घोळवुन करावे लागते ते?

बटाटावडा जमु शकतो. बेसनाचे पीठ नेहमीपेक्षा जरा घट्ट भिजवुन त्यात वडे घोळवुन तळायला ठेवायचे. पनीर पकोडाचे सुद्धा असेच. पण मेदुवडा नाहि होणार, कारण आतली जी बास्केट आहे ती जाळीची असते. त्यामुळे त्यातुन वड्याचे बॅटर खाली गळु शकते.

स्वाती दिनेश's picture

27 Oct 2015 - 3:46 pm | स्वाती दिनेश

बेकिंगपेपर किवा अ‍ॅलु फॉली जाळीवर ठेवून मेदुवडा करता येतो असे पाहिले आहे. स्वतः करून बघते व कळवते.
स्वाती

स्वाती दिनेश's picture

1 Nov 2015 - 12:40 pm | स्वाती दिनेश

काल एफ्रा मध्ये मेदुवडे केले.. थोडे डोके चालवून डोनटचे मोल्ड ए फ्रा त मेदुवड्याचे मिश्रण भरून ठेवले.१८० अंशावर १० मि. ठेवले.मग उघडून पाहिले आणि अजून ७-८ मि. ठेवले. १८ मि. मध्ये ६ वडे झाले. उत्साहाच्या भरात काढताना एखाद दुसरा जरा मोडला, पण मग घाई केली नाही. पुढचे वडे अजिबात मोडले नाहीत. अगदी खुसखुशीत झाले होते, अज्जिबात तेल नाही आणि आतूनही सॉफ्ट !
.

स्वाती दिनेश's picture

1 Dec 2015 - 12:25 am | स्वाती दिनेश

जाड पीठ करून बटाटे वडे जाळीवर ठेवले पण ते पीठ जाळीला चिकटून बसले, मग बेकिंगपेपर वापरायचे ठरवले. पीठात वडे घोळवून बेकिंग पेपरवर ठेवले.
१८० अंश से वर ५ मि. प्रिहिट केले. मग वडे ठेवून ६ मिनिटे एअरफ्राय केले. ऑइल ब्रशिंग करून पलटले व परत ६ मिनिटे ठेवले आणि बाहेर स्नो पडत असताना ऑइल- फ्री वड्यांचा आस्वाद घेतला.
.

चतुरंग's picture

1 Dec 2015 - 7:09 am | चतुरंग

1
आणायला पळालो आहे! ;)

-रंगावडा

जातवेद's picture

1 Dec 2015 - 11:18 am | जातवेद

जळफळाट!

गुलाबजाम आणि साबुदाणा वडा मस्तच .

आता मी पण माझ्याकडचा एअरफ्रायर परत वापरात आणीन .. बघु काय काय जमतय .. ? :)

सुचेता's picture

15 Nov 2015 - 9:48 pm | सुचेता

तोंडाला पाणी सुटले

हायला, हा धागा कसा वाचला नाही मी? त्या पाणीपुरीच्या पुर्‍या अगदी जीव ओवाळून टाकावा अशा झाल्यात!! ;)

पैसा's picture

18 Nov 2015 - 8:07 pm | पैसा

काय एकेक प्रकार केलेत तुम्ही!!

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 11:21 pm | टवाळ कार्टा

रोजच्या जेवणातल्या भाज्या बनवता येतात का यात???

भारतात कुठे मिळतो?

स्वाती दिनेश's picture

19 Nov 2015 - 12:15 am | स्वाती दिनेश

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या साइट वर पहा.
स्वाती

बहुगुणी's picture

1 Dec 2015 - 8:52 am | बहुगुणी

एअर फ्रायर वापरणार्‍या सर्वांना विनंती: कृपया यांतून निवड करतांना काही खास गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत का ते सांगा.

पिवळा डांबिस's picture

19 Nov 2015 - 3:04 am | पिवळा डांबिस

पाणीपुरीच्या पुर्‍या काय मस्त फुगल्यात!
पाणीपुरी ही प्राणपुरी आहे.
त्यात बाकी सारे जिन्नस जरी चांगले असले तरी त्या तेलकट पुर्‍यांमुळे फारशी खाल्ली जात नाही.
अर्थात आता हा अय्यर-फ्रायर शोधणे आले!!!

प्राची अश्विनी's picture

23 Nov 2015 - 1:50 pm | प्राची अश्विनी

हा धागा वाचून एअर फ्रायर आणला. केलेले पदर्थ- हुलपावलेले बांगडे (केळीच्या पानात गुंडाळून २०० तापमानावर ८ मिनिटे ). अतिशय चविष्ठ होतात.
अनारसे - पहिल्यांदा डायरेक्ट जाळीवर ठेवले .उपद्व्याप झाला. नंतर टीन फॉईल वर ठेवले. फार फुगले नाहीत पण चव सुरेख होती.अगदी अरळ झाले होते. अनारसे तळताना खूप तूप ओढतात .इथे बिल्कुल तूप नाही पण विजेचे बील अजून यायचे आहे . :)

सर्वसाक्षी's picture

23 Nov 2015 - 2:23 pm | सर्वसाक्षी

स्वाती

तुझा लेख वाचुन मी एअर फ्रायर घ्यायचा ठरवला आणि तो बेत समजल्यावर बहिणीने मला तो भेट देऊन चकित केलं
पदार्थ मस्तच होतात. १८० तापमान व १२-१४ मिनिटे वेळ ठेवून इडली फ्राय मस्त कुरकुरीत झाला. एक लहान चमचा तेन सात मध्यम इडल्यांना पुरले. मजा आली.

सुबोध खरे's picture

2 Dec 2015 - 8:49 pm | सुबोध खरे

हे म्हणजे आता एअर फ्रायर आणायलाच पाहिजे. कारण फ्राईड इडली फारच तेल पिते. पण सात इडल्याना एक चमचा तेल म्हणजे फारच छान.वजन कंट्रोल( वाढण्याच्या अगोदरच) करण्यसाठी उत्तम.

बटाटे वडे छान दिसतायत. कमी तेलातले आहेत हे समजूनही येत नाहीये. स्वातीताई, मी टाळतिये पण अशाने तू मला ए. फ्रा. घ्यायला भाग पाडणार असं दिसतय.

महेश हतोळकर's picture

1 Dec 2015 - 11:16 am | महेश हतोळकर

आणलासुद्धा असेल कदाचित अत्तापर्यंत

रेवती's picture

2 Dec 2015 - 7:33 pm | रेवती

हो, मलाही क्षणभर वरील प्रतिसाद पाहून असेच वाटले.;)

पद्मावति's picture

1 Dec 2015 - 2:13 am | पद्मावति

खरंय इतक्या कमी तेलातले असूनही किती छान दिसताहेत. मस्तं...मी करून पाहणार वीकेंड्ला.

स्वाती दिनेश's picture

2 Dec 2015 - 6:21 pm | स्वाती दिनेश

काही जणांना एअर फ्रायर मधील पाकृंचे तपमान व वेळ हवी आहे. त्यासाठी हा प्रतिसाद-
व्हेज मांचुरियन ए फ्रा मध्ये केले त्याचा नुसती भजी व मांचुरियन दोन्हीचा फोटो देते आहे.
१८० अंश से ला ५ मिनिटे प्रि हिट केले. नंतर भजी ठेवून ६ मिनिटे ए फ्रा केले. मग ऑइल ब्रशिंग करून परत ६ मिनिटे ठेवले. अजून खमंग हवे असल्यास अजून एखादे मिनिट ठेवता येईल. मग ही भजी मांचुरियन ग्रेव्हीत घातली.
.

अनुप ढेरे's picture

2 Dec 2015 - 9:44 pm | अनुप ढेरे

तेल कमी लागतं पण हे तेल खूप उच्च तापमानाला तापवलं जातय बहुधा. त्याने काही दुष्परिणाम होतात का?

स्वाती दिनेश's picture

2 Dec 2015 - 10:11 pm | स्वाती दिनेश

आपण जेव्हा वडे किवा भजी तळतो तेव्हाही तेल एवढे तापवतोच,
इथे तर आपण फक्त ऑइल ब्रशिंग करत आहोत. एवढ्या सगळ्या भज्यांसाठी अर्धा चमचा तेल पुरले.
स्वाती

पूर्वाविवेक's picture

1 Jan 2016 - 7:09 pm | पूर्वाविवेक

खूप दिवस नवऱ्याचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला पण आता घ्यायला भाग पडेल असं दिसतय. असो आता तेल तर वाचेल.....पोटात जाण्यापासून.

रॉजरमूर's picture

30 Jun 2016 - 8:49 pm | रॉजरमूर

अत्यंत उपयुक्त माहिती एअर फ्रायर विषयी .......
सगळ्या पाककृती तर एकापेक्षा एक वरचढ झाल्यात .
ते सुद्धा जवळ जवळ तेलाशिवाय ..

उल्का's picture

1 Jul 2016 - 7:07 pm | उल्का

छान माहितीपूर्ण धागा व प्रतिसाद!

सप्तरंगी's picture

14 Jul 2016 - 4:30 pm | सप्तरंगी

आहाहा सानिका , स्वाती ...मस्तच ... बटाटावडा , वडा सांबार .. पाणीपुरी च्या पुऱ्या पाहून मै मर जावा अशी परिस्थिती आहे, किती दिवसांपासून मोहावर विजय मिळवणारी म्हणून मिरवते आहे, पण तुम्ही लोक मला पैसे खर्च करायला लावणार असे दिसते , आता जर airfryer घ्यावाच असे वाटते आहे पण खरेच किती frequently वापरता आहेत तुम्ही, सांगाल का ?

स्वाती दिनेश's picture

14 Jul 2016 - 9:50 pm | स्वाती दिनेश

भरपूर वापरते. सगळे तळणीचे पदार्थ ए फ्रा करते. अगदी उद्याच्या एकादशीला सा. वडेही ए फ्राच करणार आहे. :)
स्वाती

सगळेच फोटो भारीच दिसत आहेत. बटाटेवडा तर सहीच! याने विजेच्या बिलामध्ये फार फरक पडतो का?

बहुगुणी's picture

15 Jul 2016 - 3:46 am | बहुगुणी

जवळजवळ सर्वच धाग्यांतले पदार्थ फिलिप्स चा एअर फ्रायर वापरून केलेले दिसताहेत. केनस्टार (सुमारे ६ हजार रु.) आणि फिलिप्स (१०-१२ हजार रुपये) यांव्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांचे एअर फ्रायर्स उपलब्ध दिसतात जे बरेच स्वस्त आहेत. फिलिप्स सोडून इतर उत्पादनांचा कुणाला काही अनुभव आहे का? केनस्टार फ्रायर आधिक आकारमानाच्या भांड्याचा आणि आधिक लांब वायर असलेला असूनही किंमतीने फिलिप्स मॉडेलच्या जवळपास निम्मा आहे. कुणी वापरलाय का?

तेजस आठवले's picture

22 Apr 2017 - 8:14 pm | तेजस आठवले

विजेचे बिल कितपत वाढलेय ते सांगाल का ?