✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हवा के साथ साथ..

स
स्वाती दिनेश यांनी
Sun, 10/25/2015 - 22:00  ·  लेख
लेख
ह्या भारतवारीत अशाच निवांत गप्पा चाललेल्या असताना काकूने एअर फ्रायरचा विषय काढला. विषय मोठा टेम्टिंग होता. गरम हवेचे झोत वेगात फिरवून फ्रेंच फ्राइज पासून केकपर्यंत कोणतेही पदार्थ तयार केले जातात आणि तेलाचा वापर त्यात नगण्य असतो ही गोष्टच क्रांतिकारी होती. अर्धा चमचा तेलात कटलेट आणि एक चमचा तेलात समोसे बनतात अशा संभाषणातले समोसे, कटलेट, पेस्ट्री असं सारखं सारखं ऐकून जीभ चाळवली आणि कोपर्‍यावरच्या वडेवाल्याकडून वडे, भजी आणलेच आम्ही.. मग उगाचच आपण किती तेलकट खातो, किती क्यालरींना उदराश्रय देतो वगैरे गप्पांवर गाडी वळली आणि उगाच अपराधी वाटायला नको म्हणून मग आम्ही विषयच बदलला पण डोक्यात मात्र तो एकीकडे टिकटिकत राहिला. जर्मनीत परतल्यावर आमचा शोध सुरू झाला. जालावर एअर फ्रायरच्या रेसिपींचा आभासी आस्वाद घेणे चालू झाले. नुसतीच जीभ खवळून उठायला लागल्यावर रेसिप्या पाहणे बंद केले आणि एअर फ्रायरची माहिती वाचणे चालू केले. यात २०० अंश से पर्यंत तपमान नेता येते आणि वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळा वेळ आणि तपमान अ‍ॅडजस्ट करून तो, तो पदार्थ शिजवता येतो हे तर समजले. अनेक कंपन्यांची वेगवेगळी मॉडेले पाहून नुसत्या चित्रात किवा चित्रफितीत पाहण्यापेक्षा आपण प्रत्यक्षच पाहू असा विचार करून मग 'मिशन एअर फ्रायर' सुरू केले. सॅटन. टोम, मिडियामार्क्ट.. अशा सगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. शेवटी दसर्‍याला सीमोल्लंघन करायचे असे ठरवून एकदाचा फिलिप्स अ‍ॅवन्सचा एअरफ्रायर बुक केला. नवरात्रातच तो घरी आला. लगेच खोका उघडून त्यात दाखवल्याप्रमाणे जोडणी केली. एकदा घरात आल्यावर नुसता मखरात बसवून ठेवून दसर्‍यापर्यंत काही धीर निघेना, त्यात असलेल्या माहितीपुस्तकात एक रंगीत चित्रांचे आकर्षक रेसिपी बुकही येते. आता हे सगळे बिनतेलात किवा अगदी कमीत कमी तेलातुपात करता येणार आहे हे दिसू लागले. मग पहिला गड फ्रेंच फ्राइजचा सर करायचे ठरवले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फ्राइज केल्या. पहिल्या किंचित जास्त खरपूस झाल्या पण नंतर मस्त जमल्या. डिशभर फ्राइज आपण फक्त चमचाभर तेलात त्या फ्राय केल्या आणि त्या मस्त झाल्यात हे समजल्यावर पहिला गड सर झाल्याच्या आनंदात तर जरा जास्तच खाल्ल्या. साबुदाणे वडे, उपासाचे कबाब, कॉर्न कटलेट्स, पट्टी समोसे.. वॉशिंग्टनची कुर्‍हाड मग जोरात सुरू झाली. चुकत, प्रयोग करत शिकणं सुरू झालं. खुसखुशीत साबु वडे हाताला तेल न लागता खाण्याची खुमारी वेगळीच होती. कटलेट पलटताना जाळीला चिकटल्यावर थोडा हिरमोड झाला पण नंतर ते जेव्हा तयार झाले तेव्हा ते अजिबात मोडले नाहीत. पट्टी समोसे आणि स्प्रिंग रोल भारी तेल पितात म्हणून करणे टाळते पण आता ह्या एअरफ्रायरमध्ये एक चमचा तेलात मात्र ते फारच सुरेख झाले. मग आमचा मोर्चा कोथिंबिर वडी, वांग्याचे काप आणि कांदाभज्यांवर वळला. फक्त ग्रिझिंग केलेली कुरकुरीत आणि खुसखुशीत कोथिंबिर वडी, कांदा भजी आणि काप गिल्टफ्री मनसोक्त खाल्ले. (सगळं एकाच वेळी नाही केलं, वेगवेगळ्या दिवशीचे प्रयोग!) भरड्याचे वडे, थालिपिठं साफ फसले. तर भाजणीचे वडे, पुर्‍या अशा बर्‍याच मंडळींवर प्रयोग करणं बाकी आहे. एकेक पदार्थ एक्सप्लोअर करणं चालू आहे. . दसर्‍याला एअर फ्रायर मध्ये गुलाबजाम करायचे ठरवले. मी भारतातून येताना चितळेंचे पाकिट आणले होते. अर्धेच पाकिट वापरून पाहू. प्रयोग फसला तर आपले नेहमीसारखे तळू असा विचार केला. गु जा मंद तळावे लागतात म्हणून जरा जालावर आधी शोध घेतला. संजय थुम्माही मंदाग्नीवरच तळायला सांगत होता.एअर फ्रायरही १४० अंश से वर ठेवा असंही सांगत होता. पण त्याने मोठा लंबगोल करून अर्धा कापायला सांगितला. तसले काही न करता मी आपले नेहमीसारखे करायचे ठरवले. ठेवले १४० अंशावर. १०/१२ मिनिटांनी बाहेर काढून पलटले पण ब्राउनिंग यायचे लक्षण नाही. परत १० मि. ठेवले तरी आपले ते पांढरे ते पांढरेच .. अर्ध्या तासानंतर त्याला ब्राउनिंग आलं. बाहेर काढले तर नुसते कडक.. एकमेकांना फेकून मारावेत असे.. एक गु जा घेतला आणि सुरीने अ‍ॅपल कापावे तसा कापला. तर आतमध्ये छान सॉफ्ट! मग ते उरलेले कडक गुलाबजाम तसेच पाकात घातले. नव्हे नव्हे गरम पाकात अगदी बुडवलेच. दुसर्‍या दिवशी पाहिले तर ते अगदी छान सॉफ्ट झाले होते! शुभारंभाचा प्रयोग तर छान झाला. हुरुप आला आणि मग उरलेले पाकिटही एअरफ्राय केले. ह्यात बेकिंग करता येते हे माहित होते. माझा जिव्हाळ्याचा कोपरा हा! त्यामुळे केक प्रयोग तर करायला हवाच होता. माझ्या बेकर्स बास्केटमध्ये मग एअरफ्रायरचा रिकोटा लेमन केकही आला. . सध्या मी खूष आहे. 'हवा के साथ साथ..' नवे नवे प्रयोग करते आहे. कधीकधी प्रयोग फसतो आहे तर कधी फारच छान होतो आहे. 'एअरफ्रायर नको.. पण पदार्थ करणं आवर' अशी वेळ यायला नको हे मात्र स्वत:ला बजावलं आहे. :) अजून काही नवे यशस्वी प्रयोग घेऊन परत एक अध्याय लिहिन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
34273 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

तेल कमी लागतं पण हे तेल खूप

अनुप ढेरे
Wed, 12/02/2015 - 21:44 नवीन
तेल कमी लागतं पण हे तेल खूप उच्च तापमानाला तापवलं जातय बहुधा. त्याने काही दुष्परिणाम होतात का?
  • Log in or register to post comments

उच्च तपमान?

स्वाती दिनेश
Wed, 12/02/2015 - 22:11 नवीन
आपण जेव्हा वडे किवा भजी तळतो तेव्हाही तेल एवढे तापवतोच, इथे तर आपण फक्त ऑइल ब्रशिंग करत आहोत. एवढ्या सगळ्या भज्यांसाठी अर्धा चमचा तेल पुरले. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

खूप दिवस नवऱ्याचे पैसे

पूर्वाविवेक
Fri, 01/01/2016 - 19:09 नवीन
खूप दिवस नवऱ्याचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला पण आता घ्यायला भाग पडेल असं दिसतय. असो आता तेल तर वाचेल.....पोटात जाण्यापासून.
  • Log in or register to post comments

मस्तच

रॉजरमूर
गुरुवार, 06/30/2016 - 20:49 नवीन
अत्यंत उपयुक्त माहिती एअर फ्रायर विषयी ....... सगळ्या पाककृती तर एकापेक्षा एक वरचढ झाल्यात . ते सुद्धा जवळ जवळ तेलाशिवाय ..
  • Log in or register to post comments

छान माहितीपूर्ण धागा व

उल्का
Fri, 07/01/2016 - 19:07 नवीन
छान माहितीपूर्ण धागा व प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

आहाहा सानिका , स्वाती ..

सप्तरंगी
गुरुवार, 07/14/2016 - 16:30 नवीन
आहाहा सानिका , स्वाती ...मस्तच ... बटाटावडा , वडा सांबार .. पाणीपुरी च्या पुऱ्या पाहून मै मर जावा अशी परिस्थिती आहे, किती दिवसांपासून मोहावर विजय मिळवणारी म्हणून मिरवते आहे, पण तुम्ही लोक मला पैसे खर्च करायला लावणार असे दिसते , आता जर airfryer घ्यावाच असे वाटते आहे पण खरेच किती frequently वापरता आहेत तुम्ही, सांगाल का ?
  • Log in or register to post comments

मी

स्वाती दिनेश
गुरुवार, 07/14/2016 - 21:50 नवीन
भरपूर वापरते. सगळे तळणीचे पदार्थ ए फ्रा करते. अगदी उद्याच्या एकादशीला सा. वडेही ए फ्राच करणार आहे. :) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

सगळेच फोटो भारीच दिसत आहेत.

रुपी
Fri, 07/15/2016 - 01:59 नवीन
सगळेच फोटो भारीच दिसत आहेत. बटाटेवडा तर सहीच! याने विजेच्या बिलामध्ये फार फरक पडतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

केनस्टार आणि फिलिप्स

बहुगुणी
Fri, 07/15/2016 - 03:46 नवीन
जवळजवळ सर्वच धाग्यांतले पदार्थ फिलिप्स चा एअर फ्रायर वापरून केलेले दिसताहेत. केनस्टार (सुमारे ६ हजार रु.) आणि फिलिप्स (१०-१२ हजार रुपये) यांव्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांचे एअर फ्रायर्स उपलब्ध दिसतात जे बरेच स्वस्त आहेत. फिलिप्स सोडून इतर उत्पादनांचा कुणाला काही अनुभव आहे का? केनस्टार फ्रायर आधिक आकारमानाच्या भांड्याचा आणि आधिक लांब वायर असलेला असूनही किंमतीने फिलिप्स मॉडेलच्या जवळपास निम्मा आहे. कुणी वापरलाय का?
  • Log in or register to post comments

विजेचे बिल कितपत वाढलेय ते

तेजस आठवले
Sat, 04/22/2017 - 20:14 नवीन
विजेचे बिल कितपत वाढलेय ते सांगाल का ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा