आज गुगल प्रमुख सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सिलिकॉन व्हॅलीच्या भेटी निमित्ताने स्वागत संदेशगुगल इंडीयाच्या युट्यूब चॅनलवर ठेवला आहे. एकीकडे बॉबी जिंदाल सारखा अमेरीकन रिपब्लीकन राजकारणी जो स्वतःची भारतीय मुळे लपवायचा प्रयत्न करत आहे तिकडेच सुंदर पिचाईंसारखा तरूण सिइओ, लोकं काय म्हणतील वगैरेचा विचार न करता, गुगल इंडीयाचॅनलवर मोदींचे स्वागत करतो, हे नक्कीच स्वागतार्ह आहे.
भारतीय असणे हे न लपवणे, मोदींचे स्वागत हे माझ्या दृष्टीने किरकोळ मुद्दे आहेत... एखाद्या होतकरू उद्योजकास जर स्वतःच्या उद्योगाकरता, मदत करून घेण्यासाठी म्हणून वगैरे जर मोठ्या व्यक्तीस (जसे की गुंतवणूकदार, एखाद्या मोठ्या कंपनीचा सिईओ वगैरे) यांना पटकन आपण काय देऊ शकतो हे सांगून लक्ष वेधून घेयचे असेल तर ते अगदी थोडक्यात सांगून उत्सुकता निर्माण करावी लागते. लिफ्ट/इलेव्हेटर मधून खालच्या मजल्यावरून एकदम वरच्या मजल्यावर पोहचे पर्यंत हा आपल्या ताब्यात आहे असे गृहीत धरून तेवढ्या वेळेत ते सांगावे लागते. त्याला "इलेव्हेटर पिच" असे म्हणतात हे इथे अनेकांना माहीत असले तरी संदर्भ म्हणून सांगतो...
जी गोष्ट होतकरू उद्योजकाची असते तीच गोष्ट मोठ्या उद्योगांना मोठी बाजारपेठ मिळवण्यासाठीची असते. म्हणूनच, केवळ २ मिनिटे १९ सेकंदाच्या या संदेशात आपल्याला हवे ते प्रभावीपणे कसे दाखवता/सांगता येऊ शकते ह्याचा हा संदेश एक उत्तम नमुना आहे, अर्थात इंग्रजीत सांगायचे झाले तर एक छोटीशी केसस्ट्डी आहे. त्यात बरेच काही शिकण्यासारखे वाटल्याने एक विश्लेषणः
०-०:१९ स्वागत आणि आमंत्रण - मोदींचे स्वागत, गुगलर्स (म्हणजे स्वतःच्या कंपनीची तात्काळ जाहीरात) आणि भारतीय कसे उत्साही झाले आहेत हे सांगत त्यांचे मोठे भाषण आणि गुगल हेडक्वार्टरला भेट हे सांगितले आहे.
०:१९-०:४२ भारत/भारतीय प्रेम/अभिमान - भारत आणि भारतीयांनी (त्यात आय आय टी चा आणि तसेच नाव न घेता इतर संस्थांचा उल्लेख) सिलिकॉन व्हॅलीत कसे योगदान केले आहे. आणि आता भारत कसा या माहिती-तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीतून जात आहे यावर उल्लेख...
०:४२-१:१६ मोदी दूरदृष्टी कौतूक आणि त्याचा होणारा परीणाम आणि - या क्रांती-उत्क्रांतीमुळे भारताचा कसा विकास होणार आहे. किती खेडी जोडली जाणार आहेत, मुली शिकणार आहेत, किती उद्योगांना यातून चालना मिळणार आहेत आणि हे सगळे मोदींनी दिलेल्या डिजिटल इंडीयाच्या दृष्टीकोनाशी कसे जोडलेले आहे याबद्दल...
१:१७ - १:३८ आयटी उद्योगांचा मदतीचा हात - १.२ बिलियन जनतेला मदत करायला गुगल आणि सिलिकॉन व्हॅली कशी सज्ज आहे...
१:३९ - १:५५ मुद्याची गोष्ट. आम्हाला काय करायचे आहे ते - specific... - यामधे गुगलचा वाटा काय? तर गुगल इंटरनेट आणणार, स्वस्त दरातील क्रोमबुक्स जी शाळेतल्या मुलांना देता येतील ती वापरणार, आंतर्जालीय "बांधकामात" पैसे गुंतवणार आणि स्वस्त दरातील अँड्रॉईड फोन्स पण बाजारात आणणार! (थोडक्यात आम्ही "सर्वव्यापी" होणार! ;) )
१:५६ - २:०४ त्यामुळे होणारा विशिष्ठ आणि तात्काळ फायदा - त्यामुळे ५० मिलियन स्त्रीया आणि २० मिलियन उद्योग प्रथमच ऑनलाईन येणार...
२:०५ - २:१९ समारोप - परत एकदा स्वागत करताना आपण कसे पार्टनर आहोत हे ठासून सांगणे.
वर म्हणल्याप्रमाणे, या विश्लेषणाचा उद्देश गुगलवर अथवा पिचई यांच्यावर टीका करणे अथवा कसे चालू आहेत वगैरे म्हणणे हा नाही (तसे मला वाटत देखील नाही), मोदींचे स्वागत कसे केले ह्यावर ताशा बडवणे नाही... मात्र, तुटकपणा, त्रोटकपणा, फक्त काय हवे ह्याचा भडक देखावा न करता व्यवहारात आपले म्हणणे थोडक्यात कसे मांडावे ही कला या निमित्ताने दिसून आली, त्यावर लिहावेसे वाटले, इतकेच काय ते.
प्रतिक्रिया
24 Sep 2015 - 8:49 pm | विवेकपटाईत
अच्छे दिन येणार कि केवळ 'गाजर' काळच उत्तर देईल.
24 Sep 2015 - 8:52 pm | एस
फार छान आणि नेटके!
बरेच शिकण्यासारखे आहे.
25 Sep 2015 - 2:24 am | श्रीरंग_जोशी
आपला संदेश कुठलेही पाल्हाळ न लावता तसेच अभिनिवेशविरहित पद्धतीने सहजपणे मांडलेला आहे या चित्रफितीत.
हा माणूस उगाच नाही गुगलमध्ये कामाला लागल्यावर अकरा वर्षांत सिइओपदी पोचला.
24 Sep 2015 - 8:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
"अनावश्यक आक्रमकता न दाखवता स्वतःच्या कामाबाबत मला सर्व पक्के माहीत आहे" हे दर्शित करणारा व्यवस्थापक म्हणून सुंदर पिचईची ओळख आहे. या भाषणात ती पुर्एपूर व्यक्त झाली आहे.
24 Sep 2015 - 9:50 pm | पद्मावति
....
अगदी योग्य लिहिलंय. बॉबी जिंदल ची आपली भारतीय बॅकग्राउंड लपवण्याची धडपड अती केविलवाणी वाटते. भारतीय लोकं परदेशात स्वत:चं लॉबिंग करण्यात फार कमी पडतात. पाकिस्तान किंवा ज्युइश लोकांकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे.
24 Sep 2015 - 11:35 pm | सायकलस्वार
माफ करा, पण बॉबी जिंदालला उगीच टपली मारून जाण्याचा अट्टाहास कळला नाही. भारतीय मूळ लपवणे म्हणजे काय? त्याने आपण भारतीय वंशाचे असल्याचे कधी नाकारले आहे? सर्वप्रथम बॉबी जिंदाल 'भारतीय' आहे हा तुमचा गैरसमज तत्काळ विसरून जा. त्याचा जन्म अमेरिकेत झाला आहे आणि तो एक अमेरिकन, आणि फक्त अमेरिकन नागरिक आहे. ज्या देशात आपला जन्म झाला, सगळं आयुष्य गेलं, ज्या देशाने आपल्याला सर्वकाही दिलं त्या देशाप्रति निष्ठा न ठेवता केवळ आपल्या 'सांस्कृतिक मुळांपायी' हजारो मैलांवर असलेल्या दुसर्याच प्रदेशाशी ठेवायला आपण काय 'ते' लोक आहोत? उद्या राहुल गांधीने आपल्या अर्धा इटालियन असण्याचा अभिमान दाखवला तर हेच लोक त्याचा उद्धार करतील.
खरंतर अमेरिकेत राहून, अमेरिकेचं नागरिकत्व घेऊन, अमेरिकेत राहण्याचे सर्व फायदे घेऊन, अमेरिकन समाजाकडून by and large मिळणारी समान वागणूक घेऊनही सतत आपल्या भारतीय मुळांचा अनाठायी गर्व बाळगणारे, आपल्याला सर्वसाधारण अमेरिकनापेक्षा सांस्कृतिक दृष्ट्या उच्च समजणारे लोकच मला अति केविलवाणे वाटतात.
24 Sep 2015 - 11:49 pm | स्रुजा
अगदी हेच आणि असंच ! तो गव्हर्नर झाल्यावर पण आपल्या मेडियाने अचानक त्याच्या गळ्यात पडायचा प्रयत्न केला होता. अरे का? एवढ्यात प्रकाश झोतात आलेल्या इतर भारतीय मुळ असलेल्या व्यक्तींबद्दल पण तेच. आपण काय केलं त्यांच्या या यशासाठी? आपण समाज म्हणुन आपल्यातल्या भार्गव आणि जिंदाल ला काही मदत करतो का? उलट जरा म्हणुन वेगळं फिल्ड निवडलं की पैसे कसे मिळणार पासुन ते लग्न कसं होणार पासुन अनेक एम्क्झायटीज आपल्यातलेच काही लोकं त्यांच्यावर लादत राहतात. त्यांनी जे काही यश मिळवलं त्या मिळवण्यासाठी ज्या काही सुविधा लागतात त्या आपण पुरवु शकत नाही. जे लोकं त्यांचं महत्त्व जाणुन त्या पुरवतात त्यांच्याबददल अशा लोकांना निष्ठा असणं चुकीचं नाही. सुंदर पिचई ने इथे आय आय टी केलं, त्या बद्दल कृतज्ञता असणं स्पृहणीय आहे पण बाकी लोकं जे तिथेच जन्माला आले किंवा ज्यांना ग्रांट आणि सुविधा मिळवण्यासाठी तिकडे जावं लागलं त्यांच्या यशात इतर भारतीयांचा काहीही हिस्सा नाही.
24 Sep 2015 - 11:59 pm | स्रुजा
शिवाय उत्तर अमेरिकेत मुळचं असं कुणी नाहीचे. सगळेच जणं आफ्रिकन अमेरिकन, इटालियन अमेरिकन, फ्रेंच अमेरिकन, स्वीडिश अमेरिकन असेच असतात. सेलेब्रिटिज चं विकी पेज पाहिलं तरी त्यांच्या बद्दल अशीच माहिती दिली जाते, पण हे लोकं लग्न करताना कुठुन आले हा विचार करत नसल्याने आताशा इटालियन अमेरिकन म्हणजे १/८ इटालियन, १/४ स्विडिश, १/४ फ्रेंच असे त्यांचे हेरिटेज असते. भारतीय हा समाज अजुनही भारतीय लोकांशीच लग्न करतो म्हणुन दिसायला आई वडील भारतीय, मग मुल्गा आणि सुन भारतीय मग नातवंडं पण भारतीय नावांची असंच चित्र बहुतांश दिसतं, पण तेवढा एक भाग सोडला तर त्या नातवंडांपर्यंत येईपर्यंत "भारतीय" असं काही रहिलेलं नसतं. हे शहाणपणाने स्विकारण्यात च भलेपणा आहे. आणि एकदा हे स्विकारलं की मग उगाच त्यांना आपण डोक्यावर पण घेऊन नाचण्याचा बावळटपणा करणार नाही. इतर अनेक अमेरिकन गव्हर्नर सारखा एक बॉबी जिंदाल अशी एक अलिप्त भुमिका असायला काही हरकत नाही.
बाकी "'एलेव्हेटर टॉक' बद्दल जे विश्लेषण केलं आहे ते खुप आवडलं. हे भाषण इथे आवर्जुन पोह्चवल्याबद्दल धन्यवाद.
26 Sep 2015 - 5:39 pm | निनाद मुक्काम प...
ओबामा ला राजकीय द्रष्ट्या त्रास देण्यासाठी रिपब्लिकन
पक्षाने त्यांच्या धर्म व अमेरिकन नागरिकत्व ह्यावर शिंतोडे उडवले.
आता हेच आपल्या नशिबी डेमोक्रेट पक्षाकडून आरोप होणार हे भविष्यातील अडचण ओळखून त्याने आपली प्रतिमा तशी बनवली आहे कट्टर ख्रिस्तधर्मीय निर्वासितांच्या कर्दनकाळ
फस्ट अमेरिकन ही घोषणा फस्ट इंडियन ची आठवण होते ,.
आजही प्रसार माध्यमांत इंडियन ओरिजिन अमेरिकन किवा एशियन अमेरिकन असा उल्लेख होतो , मात्र श्वेतवर्णीय
अमेरिकन युरोपियन ओरिजिन अमेरिकन असा उल्लेख होत नाही. तेव्हा आम्ही फक्त अमेरिकन असे त्याने म्हटले तर वावगे नाही बाकी यहुदी लॉबी पूर्ण अमेरिकन असून यहुदी देशासंबंधी अमेरिकन धोरणे अनकूल बनवतात , बॉबी पुढेमागे हेच करेल त्याच्याकडून आपल्या भारतीय लॉबीने तसे करून घेणे तसे हिलीरी सुद्धा भारतासाठी चांगली ठरू शकते.
24 Sep 2015 - 10:44 pm | अर्धवटराव
चेपु वाले साहेब मोदिंना प्रत्यक्ष भेटायला बघायचे तेंव्हाच गुगलोबाचे कान टवकारले होते. भारतात डिजीटल क्षेत्रात प्रचंड मोठी व्यवसाय संधी सिलीकॉन व्हॅलीचं लक्ष्य वेधुन आहे. मोदींसारखा निर्णयक्षम आणि कार्यक्षम नेता असताना तर हि संधी अजुनच उजळुन दिसते. युएस वेस्ट कोस्ट आणि दिल्लीमधे बरच काहि होणार भविष्यात.
उद्या फ्लीपकार्ट वगैरे इ-कॉमर्स कंपन्यांनी रेल्वे बोगी भाड्याने घेणे, रेल्वेच्या डब्यांवर जाहिराती दिसणे वगैरे सुरु झाल्यास आश्चर्य वाटायला नको... आणि तसं झालं तर उत्तमच आहे.
24 Sep 2015 - 10:50 pm | पिवळा डांबिस
श्री. पिचाईंचा संदेश प्रभावी आहे.
लेखात स्पष्ट केलेलं ते 'एलेव्हेटर टॉक' महत्वही उत्तम आहे. प्रत्येकाला आपल्या कार्याविषयी/ योजनांविषयी थोडक्यात पण मुद्देसूद प्रकटन करता आलं पाहिजे.
एकच गोष्ट खटकली ते म्हणजे जाता जाता उगाच त्या जिंदालला थप्पड मारून जाण्याचा मोह!
पिचाईंना भारतात बिझिनेस वाढवायचा आहे. ते त्यांचं एक मोटिव्हेशन आहे..
जिंदालचं कार्यक्षेत्रं (रिपब्लिकन पॉलिटिक्स) लक्षात घेता त्याला भारतातल्याच काय पण अमेरिकेत रहाण्यार्याही बहुतेक भारतीयांचा काडीचाही उपयोग नाही.
तेंव्हा जोपर्यंत तो भारताला किंवा भारतीयांना जनरलाईझ्ड दूषणं देत नाहिये तोवर त्याच्यावर टीका करायचं काही तसं कारण मला दिसत नाहिये.
आणि जिंदालकडे एक नजर टाकल्यावर तो मूळचा भारतीय आहे ते कळ्तं, तो काही आयरिश/स्वीडीश वगैरे वाटत नाही. तेंव्हा त्याने रोज उठून स्वतःच्या भारतीय मूळांचा गजर करायची काय जरूर?
विकाससारख्या जाणत्या माणसाकडून (कदाचित नकळत) हे झालं म्हणून मुद्दाम लॉग इन होऊन प्रतिसाद दिला. अन्यथा नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं असतं...
25 Sep 2015 - 12:32 am | विकास
धन्यवाद पिडां साहेब!
जिंदालच्या उल्लेखासंदर्भात, तुमचा प्रतिसाद पयला नंबरचा असल्याने ;) तुम्हाला आणि इतरांना इथेच उत्तर देत आहे.
जिंदालला आणायची गरज नव्हती हे खरेच. त्याने भारतीय आहे म्हणून सतत काय कधिही सांगावे असे वाटत नाही... तसे देखील मार खातोच आहे. मग स्वतःला भारतीय समजत नसतानाच मार खात असलेलाच बरा! मात्र त्यात न्यूनगंड आहे असे वाटले आणि ते खटकले. त्याउलट अहंगंड आणि न्यूनगंड न बाळगता, "फॅक्ट ऑफ दी मॅटर" म्हणून सहजतेने जे नाते सुंदर पिचाईने न बोलता सांगितले ते मला नक्कीच भावले. ते सांगण्याचा नक्कीच उद्देश होता.
बाकी (तुमच्या नाही पण) वर काही प्रतिसादांमधे अनेक मुद्दे आले आहेत त्याला काही उत्तरे..
जिंदाल भारतीय आहे म्हणजे भारतीय वंशाचा आहे. पासपोर्टधारक आहे असा अर्थ नाही. मी कुठेही अभिमान हा शब्द वापरला नव्हता. पण तो सरळ गृहीत धरला गेला. म्हणूनच अनाठायी गर्व वगैरे देखील अनाठायी मानले गेलेले दिसते आहे. असो.
जिंदाल जेंव्हा गव्हर्नर झाला तेंव्हा त्याने इंडीया अॅब्रॉड्चा पर्सन ऑफ दी इअर अॅवॉर्ड घेताना काचकूच केली नाही. मात्र त्याच जिंदाल ने प्रेसिडंन्सीसाठी उमेदवारी जाहीर करताना असे म्हणले... "We are not Indian-Americans, African-Americans, Irish-Americans, rich Americans, or poor Americans. We are all Americans," त्यात त्याचा किमान त्याला अभिप्रेत असलेल्या अमेरीकन संस्कृतीप्रमाणे विचार केल्यास न्यूनगंड दिसतो. कारण इथे स्वतःची मुळे कोणीच नाकारत नाहीत. नजिकच्या काळातले उदाहरण म्हणजे जोसेफ लिबरमन गोर च्या वेळचा व्हिपी उमेदवार आणि नंतर स्वतःच्या हिंमतीवर राष्ट्राध्यक्षाच्या पदासाठी लढलेला पहीला ज्यू... त्याने इस्त्रायलबद्दलची मते लपवली नाहीत. तेच केनडीबाबत - आयरीश मुळे लपवली नाहीत.
मुळचे कोण आहेत हे केवळ येथे जर्मन्स सांगायचे विसरून गेल्याचे कालच न्यूयॉर्क टाईम्समधे आले होते. कारण हिटलर... पण त्यांनी देखील आपली मुळे विसरू नये असेच त्यात देखील म्हणले होते..(Whatever Happened to German America?)
मूळ सांगणे याचा अर्थ देशाशी प्रतारणा करणे नाही आणि अथवा त्या मुळाला लपवणे याचा अर्थ देशाशी एकनिष्ठ आहे असा देखील नाही. किंबहूना हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो असाच याचा अर्थ होतो. किंबहूना जिंदाल जेंव्हा गव्हर्नर म्हणून निवडून आला तेंव्हा पहीला भारतीय वंशाचा/पहीला एशिअन अमेरीकन लुइजिआनाचा गवर्नर झाला असेच इथली वर्तमानपत्रे म्हणाली. त्याला कोणी अमेरीकन गव्हर्नर झाले म्हणले नाही!
मग राहूल गांधींनी अर्धे इटालीयन आहे हे मान्य करावे का? - अर्थातच. ते सत्य आहे. त्याला कोणी करू नको म्हणून सांगितले आहे?
थोडक्यात हे भारतीय वंशाचा असण्याच्या अभिमानाबाबत नव्हते पण जे आहे ते नाकारण्याच्या अथवा लपवण्याच्या न्यूनगंडाबाबत होते.
मूळ लेख हा पिचाइंच्या पिच बद्दलचा होता. पिच मधे जर कुठलाही गंड मिसळला तर त्याचा अपेक्षित परीणाम होत नाही. हाच अनुभव आज बॉबीला येत आहे, केवळ ४% रिपब्लीकन्सचा पाठींबा आहे - ना धड अमेरीकन त्याला सपोर्ट करत आहेत ना धड भारतीय. खर्या अर्थाने तो अमेरीकन बॉर्न कन्फ्यूज्ड देसी झाला आहे.
25 Sep 2015 - 12:46 am | रामपुरी
जिंदाल हा पक्का ABCD शोभतो
25 Sep 2015 - 9:58 am | पिवळा डांबिस
इथेच खरं तर तुमचा प्रतिसाद संपायला हवा.
कारण तुमचा मूळ धागा हा पिचाईंनी मोदींच्या स्वागतार्थ यूट्यूबवर केलेल्या स्वागतसंदेशावर आहे.
तेंव्हा बाकीचं जे काही तुम्ही पुढे तुमच्या प्रतिसादात लिहिलंय ते तुमच्याच धाग्याच्या विषयाशी अप्रस्तुत आहे.
तुम्हाला जिंदालबद्दल आणि त्याच्या कथित न्यूनगंडाबद्दल लिहायचं असेल तऱ कृपया वेगळा स्वतंत्र धागा काढावा.
जर माझा मूड लागला तर तिथे मी त्याविषयी प्रतिवाद करायला येईन!! :)
डिस्क्लेमरः बॉबी जिंदाल हा माझा भाचा, पुतण्या वगैरे कोणी नाही. येत्या निवडणुकीत मी त्याला मत देण्याची शक्यताही फारशी नाही. पण म्हणून जस्ट बिकॉज त्याचे विचार मला पटत नाहीत म्हणून त्याला न्यूनगंड वगैरे आहे हे प्रतिपादन मला मान्य नाही. तसेच प्रत्येक भारतीय वंशाच्या माणसाने (मग तो भारतात रहात असो वा भारताबाहेर!!) रोज उठल्या-बसल्या आपण भारतीय आहोत अशी निष्ठा इतरांच्या समाधानासाठी प्रकट करावी या अपेक्षेला माझा विरोध आहे.
24 Sep 2015 - 11:18 pm | रेवती
सुंदर पिचाईचे भाषण चांगले आहे पण ते व्यवसायवृद्धीसाठी असल्याने तसे असणेच अपेक्षित आहे. जिंदालचा उल्लेख मलाही खटकला. त्याचे मूळ भारतीय असणे आईवडीलांमुळे आहे पण तो ज्या देशाचा नागरिक आहे तेच तो म्हणणार (चांगले/ वाईट असे काही नाही). किंबहुना तसे म्हणणेच त्याच्या क्षेत्रात अपेक्षित आहे. उद्या त्याला फायदा दिसला तर व ईतरही कारणांनी माझे पूर्वज भारतीय आहेत असे कनेक्षन झेंडे मिरवून सांगेल. गुगलला मोदी कडून फायदा होताना नाही तर कोण येणार आहे का स्वागताचे भाषण करायला? तेवढ्या अडीच मिनिटात दुसरी कामे करेल तो!
25 Sep 2015 - 6:06 am | कापूसकोन्ड्या
सुंदर पिचाईचे भाषण उत्तम्च उत्तम च झाले आहे. विशेषतः अत्यंत थोड्या वेळात, मुद्देसुद, फोकस्ड लेखकाने म्हणल्याप्रमाणे हे एक केस स्टडी होउ शकते.बिझीनेस प्रेझेंटेशन चा उत्तम नमुना
25 Sep 2015 - 12:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
उत्तम भाषण.नेमके कसे बोलायचे हे ह्या तांमिळ मंडळींकडून शिकावे.
गेले २० वर्षे विनोद खोसला,कंवल रेखी,तुमचा तो हॉटमेलवाला भाटिया 'सज्ज'राहून मदत करीत आहेतच.
25 Sep 2015 - 12:31 pm | हुप्प्या
अमेरिकेची संस्कृती ही नव्याने आलेल्या लोकांनी आत्मसात करावी आणि आपल्या मूळ देशाला विसरावे अशी अपेक्षा वर व्यक्त झाली आहे. ज्याला अमेरिकन संस्कृती म्हटले जाते ती श्वेतवर्णीय युरोपीय लोकांची संस्कृती आहे. ते जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा त्यांनी इथल्या मूळच्या संस्कृतीकडे कसे पाहिले? कत्तली, अत्याचार आणि विनाश. लाखांनी असणार्या मूळ अमेरिकन रहिवाशांची संख्या नगण्य करून टाकली. ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी आपापल्या परीने ह्या विध्वंसाला हातभार लावला आणि जबरदस्तीने आपली संस्कृती इथे स्थापली. हा गेल्या २००-३०० वर्षाचा इतिहास. असे करणार्या लोकांनी चिनी आणि भारतीय हे नवे आक्रमक लोक आपली मूळची संस्कृती विसरून येतील अशी अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? (आधुनिक काळातले आक्रमक हे तलवारी आणि बंदुका घेऊन येणार नाहीत तर लोकसंख्येचा बळावर मोठ्या झुंडीने येतील आणि आधुनिक काळच्या समानता, लोकशाही वगैरे हक्कांचा फायदा घेऊन आपले बस्तान बसवतील असे दिसते आहे.)
25 Sep 2015 - 12:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
(आधुनिक काळातले आक्रमक हे तलवारी आणि बंदुका घेऊन येणार नाहीत तर लोकसंख्येचा बळावर मोठ्या झुंडीने येतील आणि आधुनिक काळच्या समानता, लोकशाही वगैरे हक्कांचा फायदा घेऊन आपले बस्तान बसवतील असे दिसते आहे.)
+१
या नाटकाच्या पहिल्या अंकाचा शेवटचा प्रवेश सद्या युरोपात चालू आहे. दुसरा अंक किती आणि कसा रोचक असेल बरे ?!
25 Sep 2015 - 6:10 pm | रेवती
अगदी.
25 Sep 2015 - 12:33 pm | डँबिस००७
विकास धन्यवाद !!
25 Sep 2015 - 7:32 pm | द-बाहुबली
छ्या... ज्या लोकांनी गिता ज्ञानेश्वरी कधी वाचलीच नाही ते या स्पिचवर फिदा झाले यात आश्चर्य ते काय.. या पेक्षा प्रभावी ( बोल्लेत्तो इंप्रेसीव) भाषण मिपावर चार दिवस काढलेला कोणीही सदस्य करेल...
25 Sep 2015 - 9:31 pm | फेरफटका
सुंदर पिचाई एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे. हे भाषण वैय्यक्तिक नसून, कंपनीच्या पॉलिसी प्रमाणे, व्यावसायिक तज्ञांच्या मदतीने तयार केलेलं मार्केटींग टॅक्टीक आहे.
बॉबी जिंदाल मुळातच अमेरिकन आहे, आणी तो अमेरिकेतल्या लोकांसाठी राजकारण करतो. तो कशाला भारतीय मूळ असल्याचा दावा करत फिरेल? ते त्याच्या व्यवसायासाठी मारक नाही का? त्यातून हे असं सांगितल्यामुळे, त्याला अथवा तो ज्या लोकांसाठी काम करतो त्या लुईझानातल्या जनतेला काय फरक पडणार आहे? किंवा भारतातल्या जनतेला तरी काय फरक पडणार आहे?