“या आजोबा बसा, काय हवय आपल्याला?”
“थकलोय हो, खूप भूक लागलीय. काही खायला असेल तर द्या ना.”
“कसली भूक?”
“कसली म्हणजे? भूक काय वेगवेगळी असते?”
“हो आजोबा या हॉटेलात येणाऱ्या प्रत्येक माणसाची भूक वेगळी असते. कुणाला ज्ञानाची भूक, कुणाला मनोरंजनाची भूक तर कुणाला फक्त मैत्रीची भूक.”
“बापरे कठीण आहे एकंदरीत सारा प्रकार. इथे निदान पाणी तरी मिळेल का?”
“मिळेल ना. कुठले पाणी हवेय आपल्याला काव्याचे कि साहित्याचे?”
“अहो मला खरच भूक लागलीय हो. त्या कट्ट्यावरची माणसे म्हणत होती इथ मिनिटा मिनिटाला जिलब्या पडतात. ते ऐकूणच मी माझी भूक भागवायला इथवर आलोय.”
“त्या जिलब्या वेगळ्या आजोबा, ती भूकही वेगळी. खरच इथे खायला काही नाही.”
“अहो काही काय सांगता? इथे वर पाककृती म्हणून लिहीता आणि खायला काही नाही म्हणून सांगता.”
“त्या अशा खायच्या पाककृती नाही त्या फक्त वाचायच्या, जमलेच तर कधी करुन खायच्या.”
“जिथे खायला काहीच मिळत नाही अशा हॉटेलचे नाव मिसळपाव असे ठेवताच कशाला?”
“आजोबा हि साहित्याची मिसळ, संस्कृतीचा पाव. इथे कुणी काव्याचे घडे भरतो कुणी चर्चेचा पिटारा खुला करतो. कुणी अनुभवाची भटकंती करुन आणतो तर कुणी खुमासदार पाककृतीचे फक्त फोटोच दाखवतो. ते फोटो बघूनच मग आम्ही सारे तृप्तीची ढेकर देतो.”
“हं. हे असे आहे तर. तरीच त्या कट्ट्यावरच्या माणसांना तिथल्या खादाडीत जास्त रस होता नेहमी याच हॉटेलात येत असले पाहीजे. आता माझ्यासारख्यांचे इथे काही काम नाही तर. या नवख्याला तुम्ही टेम्पोत बसवून परत पाठविणार.”
“असे कसे म्हणता आजोबा? आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागतच आहे. अहो आजोबा हे हॉटेलच न्यार आहे. तुम्ही थकलेले दिसता. आपण समोर जाउन काही खाउन येऊ मग बोलू निवांत. या हॉटेलविषयी आणि हॉटेलातल्या माणसांविषयी बोलायला दिवस पुरनार नाही.”
....
“चला आजोबा. अहो आजोबा थांबा कुठे जाताय एकटे. मी येतो तुमच्या सोबतीला.”
“नको रे माझे पोट भरले. तृप्तीची आणि समाधानाची ढेकर दिलीय मी. जातो आता”
“अहो आजोबा माझा हात धरा मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो.”
“असू दे. माझे छान पोट भरलेय त्यामुळे मला अगदी तारुण्यात आल्यासारखे वाटतेय. गेली कित्येक वर्षे मी पंचपक्वानाच्या भरपेट जेवणासाठी त्रासलोय पण तसे जेवण मिळतच नाहीय. कुणी सकस आहाराच्या नावाखाली फक्त कंदमुळच खाऊ घालून उपाशी ठेवले तर कुणी अळणी पाणचट जेवणालाच गोड म्हणून घ्यायला सांगितले तर कुणी तिखटाच्या माऱ्याने पार घायाळ करुन टाकले. थकलोय आता. रस्त्यात येताना कडेला काही पोर दिसली. आमराइतून चोरुन आणलेले आंबे लपून खात होते. असो आपली आपली भूक. हे पंचपक्वानांनी भरलेले पूर्ण ताट ती पूर्ण थाळी मला इथेच लाभली. त्यात तो झणझणीत असा झोंबनारा रस्सा होता, ती अवीट गोडीची जिलेबी होती ती कितीही सरळ केले तरीही वक्रीच असनारी चविष्ट अशी चकली होती. परत जो तो त्याच्या आवडीचा पदार्थ आणनार आणि खाऊ घालनार ज्याला जे आवडते ते तो खानार. ते तुमच काय हं आठवल ‘पॉटलक’ इथे रोजचेच आहे. फार दिवसांनंतर मी असा जेवलो आणि यापलीकडेही इथेच जेवण घेणार. नाही कधी कधी भात कच्चा असेलही, वरणात एखादा खडा येइलही, घाईघाईत पोळी करपेलही परंतु माझी खात्री आहे परिपूर्ण जेवण इथेच मिळते आणि इथेच मिळनार. खरेच मी आज तृप्त झालो. बऱ्याच वर्षानी पोटभर जेवलो मी.”
“खरय आजोबा तुमचे. माफ करा आजोबा पण आपले नाव काय?”
“काही ऐकू आले नाही. काय म्हणाला आजोबा, मागे बघू, मागे काय आहे आजोबा.”
“अरे आजोबा कुठे गेलात तुम्ही. अरे आताच तर इथे होते. कुठे गेले? जाउ द्या. मागे काय आहे असे या फोटोशिवाय.”
(एक मुक्त संवादिका)
मिपाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दीक शुभेच्छा!
मित्रहो
https://mitraho.wordpress.com/
प्रतिक्रिया
17 Sep 2015 - 1:26 pm | जव्हेरगंज
:)
17 Sep 2015 - 1:33 pm | द-बाहुबली
17 Sep 2015 - 1:34 pm | एस
अरे वा! समयोचित. :-)
17 Sep 2015 - 3:11 pm | पैसा
आवडलं!
17 Sep 2015 - 6:04 pm | अजया
आवडलं!
17 Sep 2015 - 7:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर ! अनोगत सांगायची पद्धत आणि शैली आवडली !
18 Sep 2015 - 8:49 pm | यशोधरा
आवडलं.
20 Sep 2015 - 12:19 pm | मित्रहो
प्रतिसादाबद्दल साऱ्यांचे धन्यवाद आणि मनपूर्वक आभार
20 Sep 2015 - 12:31 pm | एक एकटा एकटाच
छान लिहिलय
20 Sep 2015 - 1:02 pm | पद्मावति
छानच. आवडलं.
20 Sep 2015 - 3:12 pm | बोका-ए-आझम
मस्त.
1 Oct 2015 - 10:49 am | नाखु
मस्तरे मित्रा