नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १'
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३
मागीलपानावरुन...
............त्याच्या मागे दृष्टी पोहोचेपर्यंत किनाऱ्याला लागणाऱ्या बोटींच्या न संपणाऱ्या रांगा दिसत होत्या. त्यात होते असंख्य सैनिक, त्यांच्या गाड्या, हत्यारे, रणगाडे, तोफा व दारुगोळा. फार विलक्षण दृष्य होते ते. तो सगळा प्रकार इतका अवाढव्य होता की त्या रांगेचे शेवटचे टोक अजूनही प्लायमाऊथ बंदरात असणार याची हॉफमनला खात्री होती आणि हा एक ताफा होता असे अनेक ताफे इंग्लंडच्या बंदरातून निघणार होते. त्या रात्री ती सर्व जहाजे सीनच्या आखातात जमा होणार होती व ५ जूनच्या सकाळी हे २७०० बोटींचे आरमार नॉर्मडीवर हल्ला करण्याच्या तयारीत असणार होते.
तेवढ्यात कॉरीच्या ब्रिजवरील दूरध्वनी खणाणला. हॉफमनने तो घेतला..........
‘ब्रिज ! कॅप्टन !’
‘निश्चित तेच ऐकले आहेस ना तू ? सांकेतिक शब्द जुळवला आहेस का ?’ हॉफमनने दोन मिनिटे तो फोन कानाशी धरला आणि ठेवून दिला. त्याचा स्वत:वरच विश्वास बसेना. त्या सगळ्या ताफ्याला परत फिरण्याचा आदेश देण्यात आला होता. ‘काय झाले असेल ?’ तो मनात म्हणाला. पुढे तर ढकलला नसेल ना हल्ला ?’ हॉफमन आणि इतर कमांडर्सना आता तो अवाढव्य ताफा परत इंग्लंडला घेऊन जायची अत्यंत अवघड कामगिरी पार पाडायची होती. त्याचे जहाज सगळ्यात पुढे असल्यामुळे त्याच्याही पुढे असणार्या सुरुंग काढणाऱ्या बोटींना परत घेऊन जायची जबाबदारी त्याची होती. त्याला रेडिओही वापरता येईना कारण तो चालू करायलाच बंदी होती. त्याने आपल्या कॅप्टनला जहाजाचा वेग जास्तीत जास्त वाढविण्यास सांगितले व झेंड्याने खुणा करणाऱ्या नौसैनिकांना ब्रिजवर येण्याचा हुकूम केला. त्याला आता त्या बोटींना गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याची युद्धनौका वेगाने उसळी घेत असतानाच त्याने मागे बघितले. त्याच्या मागे असलेल्या युद्धनौकांवर मोठी गडबड उडाली होती. दिवे उघडझाप करत संदेश देत होते. त्यांनाही त्या युद्धनौका परत फिरविण्याचे प्रचंड काम पार पाडायचे होते.
हा सगळा प्रकार चालू असताना दोस्तांच्या नौदलाच्या मुख्यालयात म्हणजे साऊथविक हाऊसमधे एका भल्या मोठ्या खोलीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक चालली होती. ते आतुरतेने ते नौदल परत येण्याची वाट पहात होते. त्या खोलीत खूपच गडबड माजली होती. एक आख्खी भिंत चॅनेलच्या नकाशाने व्यापली होती. त्या नकाशाच्या जवळ उभ्या केलेल्या दोन शिड्यांवर वुमन्स रॉयल नॅव्हल सर्विसचे दोन स्त्री नौसैनिक त्या नकाशावर परत येणाऱ्या जहाजांचा मार्ग दर मिनिटाला रेखांकित करीत होत्या. दोस्तांच्या विविध दलांचे स्टाफ अधिकारी शांतपणे येणारे संदेश वाचत होते. वरवर शांत दिसणार्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील ताण लपत नव्हता. पाणसुरुंगांनी भरलेल्या त्या मार्गावरुन येणाऱ्या जहाजांची काळजी तर होतीच परंतु आता त्यांना येणाऱ्या समुद्री वादळाचीही भिती वाटत होती. चॅनेलवर आत्ताच तीस मैल वेगाचे वारे वाहू लागले होते. पुढे कोणते संकट वाढून ठेवले होते कोणास ठावूक ! पाच फूट उंचीच्या लाटांबरोबर हवामान खवळलेले राहील असा अहवालही आला होता.
घड्याळाचे काटे जसे पुढे सरकत होते तसे त्या नकाशावर बोटींचा आखीव मार्ग दिसू लागला. बंदरावर नांगरण्यास त्यांना एक दिवस लागणार होता पण अंधार पडण्याआधी ते होईल असा विश्वास त्या आधिकाऱ्यांना वाटत होता. त्या नकाशावर त्या समुद्रातील सर्व बोटींची स्थाने एका दृष्टीक्षेपात समजत होती परंतु दोन पाणबुड्यामात्र त्या नकाशावरुन नाहीशा झालेल्या दिसत होत्या. त्याच वेळी दुसऱ्या कार्यालयात एका चुणचुणीत स्त्री नौसैनिकाला आपला नवरा साधारणत: किती वाजता घरी पोहोचेल याचा घोर लागला होता. या बाईचे नाव होते नाओमी ऑनर. तिला काळजी वाटत होती पण तशी ती निश्चिंत होती. ले. जॉर्ज ऑनर व त्याचे सैनिक सत्त्तावन फुटी X-२३ पाणबुडीवर होते आणि ऑपरेशनच्या नकाशांवर त्या पाणबुडीचा काहीच पत्ता नव्हता.
X-२३ फ्रान्सच्या किनाऱ्यापासून एक मैलावर पोहोचली आणि तिने तिचा पेरिस्कोप वरती काढला. खाली ऑनरने त्याची टोपी मागे ढकलली व पेरिस्कोपला डोळे लावले. ‘जरा बघूया तरी’ तो म्हणाला. काचेवरील पाण्याच्या लाटा ओसरल्यावर त्याच्या पेरिस्कोपमधे खळबळणाऱ्या पाण्याचे रुपांतर समोरच्या दृष्यात झाले. समोर औस्ट्रेहॅमचा किनारा दिसत होता. ते इतके जवळ होते की गावातील धुराड्यातून आकाशात जाणारा धूरही स्पष्ट दिसत होता. त्याच्यामागे एक विमानही उडताना दिसत होते. बहुदा त्याने कार्पिकेट विमानतळावरुन उड्डाण केले असावे. किनाऱ्यावर जर्मन सैनिक वाळूतील अडथळ्यांवर काम करताना दिसत होते. ऑनर ते सगळे बघून त्याच्याबरोबर असलेल्या ले. लिओनेलला म्हणाला,
‘बघ ! आपले लक्ष्य समोरच आहे.’
खरे म्हटले तर दोस्तांचे आक्रमण केव्हाच सुरु झाले होते असे म्हणावयास हरकत नाही. पहिल्या तुकड्या व त्यांच्या बोटींनी त्यांच्या नियोजित जागा घेतल्या होत्या. X-२३ वर खास निवड केलेले पाच सैनिक होते. त्यांनी फ्रान्सच्या मच्छिमारांचा वेष परिधान केला होता व त्यांच्याकडे असलेली बनावट ओळखपत्रे अत्यंत काळजीपूर्वक तयार केली गेली होती. बरोबर चार वर्षांपूर्वी डंकर्कच्या वेढ्यातून ३३८००० ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्यात आली होती व तेथून लढत लढत आज दोस्तांच्या आक्रमणाची वेळ येऊन ठेपली होती. त्या पाच सैनिकांसाठी हा निश्चितच अभिमानाचा क्षण होता कारण ते त्या ३३८००० सैनिकांमधे होते.
या पाणबुडीवर जी जबाबदारी सोपविली गेली होती ती कठीण व धोकादायक होती. प्रत्यक्ष आक्रमणाच्या वीस मिनिटे आधी या पाणबुडीला व अजून एका पाणबुडीला, X-२०ला (जी वीस मैल दूर होती) पाण्यावर येऊन बाकी जहाजांचा मार्ग अधोरेखित करायचा होता. या दोन पाणबुड्यांच्या मधून ब्रिटिश व कॅनडाच्या बोटी गेल्या की त्या त्यांच्या लक्ष्यासमोर (ठरलेल्या किनाऱ्यांसमोर) आल्या असत्या. ज्या किनाऱ्यांवर ब्रिटिश-कॅनडाचे सैनिक उतरणार होते त्यांनाही सांकेतिक नावे दिली गेली होती, ‘स्वोर्ड, जुनो आणि गोल्ड’. त्यांना दिलेल्या सूचना अत्यंत काटेकोर होत्या. पाण्यावर आल्याआल्या त्यांनी एक स्वयंचलित बिकन पाण्यात सोडायचा होता ज्यातून सतत बिनतारी संदेश पाठविण्यात येणार होते. त्याच वेळी सोनार यंत्रणा पाण्यातून संदेश प्रसारित करणार होती ते संदेश दोस्तांच्या इतर जहाजांना पाण्याखालीच पकडता येणार होते. या संदेशाच्या दिशेने मग ती जहाजे येणार अशी योजना होती. या दोनही पाणबुड्यांवर घडी घालता येणाऱ्या काठ्या होत्या ज्यावर छोटे पण अत्यंत प्रखर असे दिवे बसविले होते. या दिव्याचा प्रकाश पाच मैलांवरुनही दिसत असे. हिरवा दिवा लागला तर जहाजांनी असे समजायचे होते की त्या पाणबुड्या बरोबर मार्गावर आहेत. लाल लागला तर तसे नाही असे समजायचे असे ठरले होते. या दिव्यांना काही झाले तर काळजी म्हणून किनाऱ्याच्या दिशेला काही अंतरावर एका बोटीत काही माणसे तयार ठेवण्यात आली. ही माणसे तसलेच दिवे पण हाताने चालू बंद करणार होते. ह्या सर्व दिव्यांची जागा निश्चित करुन बोटी ज्या ठिकाणी सैनिक उतरावयाचे होते त्या किनाऱ्यांवर पोहोचणार होत्या.
पेरिस्कोपमधून ले. लिनने पटकन तो कुठे आहे त्याचा अंदाज घेतला. (याला इंग्रजीमधे बेअरिंग घेणे असे म्हणतात). त्याला औस्टरहॅमचे दीपगृह ओळखू आले. गावातील चर्च व काही अंतरावर असलेली दोन उंच घरे जी बहुधा सेंट औबिनमधील असावीत. तो मनात म्हणाला, ‘ऑनर म्हणतो तसे आपण ठरलेल्या जागेवर पोहोचलोच म्हणायचे.’ ऑनरनेही वेळेवर त्याच्या नियोजित जागेवर आल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकला. पोर्टस्माऊथवरुन पाणसुरुंग पेरलेल्या समुद्रातून ते जवळजवळ ९० मैल आले होते. आता त्यांना समुद्राचा तळ गाठायचा होता. ‘चला ऑपरेशन गँबिटची सुरुवात तर चांगली झाली म्हणायची’ तो स्वत:शी पुटपुटला. त्याने पेरिस्कोपमधून किनाऱ्यावरील काम करणार्या सैनिकांकडे एक शेवटची नजर टाकली. त्याच्या मनात विचार आला, ‘काहीच तासात या शांत किनाऱ्यावर रक्तपात माजणार आहे....’ मोठ्या आवाजात त्याने आदेश दिला,
‘पेरिस्कोप खाली घ्या !’
पाण्याखाली गेल्यावर त्यांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला. आता त्यांना आक्रमण पुढे ढकलले गेले आहे हे कळण्यास काहीच मार्ग नव्हता. ५ जूनला दुपारी त्याची पाणबुडी दुपारी एक वाजता परत पाण्याच्या पृष्ठभागावर आली. पाण्यावर आल्या आल्या त्याने त्याच्या पाणबुडीची अँटेना वर खेचली. खाली रेडिओरुममधे ले. जेम्स हॉजने बटणे फिरवत १८५० कि. सायकल्सवर ती यंत्रणा केंद्रित केली व तो लक्षपूर्वक ऐकू लागला. त्याला बऱ्याच वेळ थांबायाला लागले पण एकदाची खरखर ऐकू आली व त्यातूनच त्याला शब्द ऐकू आले, ‘पॅडफूट.....पॅडफूट.....पॅडफूट....’ हे शब्द ऐकल्यावर त्याचा त्याच्या कानावर विश्वासच बसेना. त्याने परत एकदा लक्षपूर्वक ऐकले. शंकाच नाही. त्याने तेथे असलेल्या सर्वांना ते ऐकण्यास सांगितले. ते ऐकल्यावर सगळे एकमेकांकडे गंभीर नजरेने बघू लागले. क्षणातच तेथे शांतता पसरली. ‘ आता अजून एक दिवस पाण्याखाली रहावे लागणार !’ त्यांच्या मनात विचार आला. जसा जसा वेळ जाऊ लागला तसे चॅनेलवरची हवा बिघडू लागली. जगातील जमा केलेले सर्वात मोठे सैन्यदल आता उत्सुकतेने जनरल आयसेनहॉवरच्या पुढच्या आदेशाची वाट बघू लागले. काय करणार तो ? सहा तारीख सांगणार, का आक्रमण पुढे ढकलणार.......
इकडे उतरत्या उन्हात त्याच्या कॅराव्हॅनमधे सुप्रिम कमांडर बेचैन होत सारखा दरवाजापाशी जाऊन झाडांच्या टोकांवर नजर टाकत होता. त्यापलिकडचे ढगाळलेले आकाश त्याला बेचैन करत होते. त्या रात्री म्हणजे ४ जूनच्या रात्री साडेनऊ वाजता साऊथविक हाऊसच्या ग्रंथालयात आयसेनहॉवर, त्याचे कमांडर व स्टाफ अफिसर्स जमले होते. वातावरण गंभीर होते व दबलेल्या आवाजात संभाषणे चालली होती. एका कोपऱ्यात आयसेनहॉवरचा चिफ स्टाफ ऑफिसर, ले. जनरल वॉल्टर बेडेल स्मिथ, आयसेनहॉवरचा उपप्रमुख एअर चिफ मार्शल सर ऑर्थर टेडरशी बोलत होता. टेडरच्या हातातील पाईपच्या धुराची वर्तुळे अधिरपणे वर जात होती. एका बाजूला एका कोचावर कडक स्वभावाचा अॅयडमिरल सर रॅमसे बसला होता तर त्याच्या जवळच एअर कमांडर ट्रॅफोर्ड ले-मॅलोरी. हे सगळे नागरी पोषाखात आले होते. जनरल स्मिथच्या आठवणीनुसार फक्त एकच जनरल त्याच्या लष्करी पोषाखात आला होत आणि तो म्हणजे जनरल माँटगोमेरी. डी-डेच्या आक्रमणाचा अधिपती असणार्या या जनरलने नेहमीप्रमाणे त्याची क्वाड्रायची विजार व बंद गळ्याचा लष्करी स्वेटर घातला होता. ही सगळी माणसे आयसेनहॉवर व सैनिकांमधील दुवा होती. हे जनरल व त्यांचे स्टाफ ऑफिसर असे सगळे मिळून एकूण बारा अधिकारी तेथे जनरल आयसेनहॉवरची वाट पहात थांबले होते. बैठक साडेनऊला सुरु होणार होती व त्याचवेळी त्यांना हवामानाचा ताजा अंदाजही ऐकायला मिळणार होता.
बरोबर साडेनऊच्या ठोक्याला दरवाजा उघडला व जनरल आयसेहॉवर त्याच्या हिरव्या युद्धपोषाखात त्या जागी दाखल झाला. ओळखीचे चेहरे बघितल्यावर जनरल आयसेनहॉवरच्या चेहऱ्यावर एक स्मितरेषा चमकून गेली पण लगेचच त्याचा चेहरा गंभीर झाला. लगेचच बैठकीला प्रारंभ झाला कारण प्रस्तावनेची गरजच नव्हती. प्रत्येकाला या बैठकीत ज्या बाबीवर निर्णय होणार होता ती चर्चा किती महत्वाची होती याची पूर्ण जाणीव होती. आयसेनहॉवरच्या मागोमाग हवाईदलाचे तीन हवामानशास्त्रज्ञ व त्यांचा प्रमुख ग्रुप कॅप्टन स्टॅग आत आले. स्टॅगने बोलणे चालू केल्याबरोबर तेथे शांतता पसरली. त्याने मागील तीन दिवसांचे हवामान कसे होते हे थोडक्यात सांगितले व तो म्हणाला,
‘गृहस्थहो या सगळ्या हवामानात अत्यंत वेगाने बदल होतोय......’ हे ऐकल्यावर सगळे कानात प्राण आणून ऐकू लागले. सगळ्यांच्या नजरा ग्रुप कॅप्टन स्टॅगवर रोखल्या गेल्या. सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या....
स्टॅगने सांगितले,
‘या हवामानाचा पट्टा वर सरकतो आहे व पुढच्या काही तासात जेथे आक्रमण होणार आहे तेथे हवामान स्वच्छ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे स्वच्छ हवामान पुढचा दिवस व सहा जूनच्या सकाळपर्यंत राहील असा अंदाज आहे. त्यानंतर मात्र हवामान परत खराब होऊ लागेल. या काळात आकाश स्वच्छ राहील व हवाईदलाच्या बाँबर व इतर विमानंना पाच तारखेच्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत उडता येणे शक्य आहे.’
त्याने असेही सांगितले की सहाला दुपारपासून आकाश परत ढगांनी व्यापले जाईल. थोडक्यात आयसेनहॉवरला कमीतकमी जी परिस्थिती पाहिजे होती ती फक्त चोवीस ते तीस तास उपलब्ध असणार होती.
सैनिकांशी गप्पा मरताना सुप्रीम कमांडर...
पुढची तीस मिनिटे जनरल आयसेनहॉवर व त्याच्या आधिकाऱ्यांनी निर्णयावर चर्चा केली. तो लवकर घेणे कसे अत्यावश्यक आहे हे अॅपडमिरल रॅमसेने सांगण्याचा प्रयत्न केला. लवकर म्हणजे किती लवकर? तर रेअर अॅेडमिरल कर्कच्या फौजांना जर ठरलेल्या कालावधीत (मंगळवारी) ओमाह उताहवर उतरायचे असेल तर त्यांना पुढच्या तीस मिनिटात निर्णय हवा होता.
जनरल आयसेनहॉवरने त्यानंतर सगळ्या आधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. जनरल स्मिथच्या मते सहा तारखेला आक्रमण करायचा निर्णय म्हणजे एक मोठा जुगार आहे पण त्याच्या मते तो डाव खेळणे अत्यंत आवश्यकच होते. टेडर आणि ले-मॅलरीच्या मते स्वच्छ आकाशाचा अंदाज जरातरी चुकला तर विमानांच्या दृष्टीने ते फार घातक ठरले असते. त्याचाच दुसरा अर्थ असा होत होता की या आक्रमणात विमानांचा आधार मिळाला नसता. या सगळ्या प्रकारात ‘जर तर’ फार होते असेही त्यांचे म्हणणे पडले. जनरल मॉटगोमेरीने ठरलेला आक्रमणाचा निर्णय अगोदरच घेतला असल्यामुळे त्याचे मत सगळ्यांनाच माहीत होते.
‘माझ्या मते हीच योग्य वेळ आहे’ तो म्हणाला.
शेवटी निर्णय जनरल आयसेनहॉवरला घ्यायचा होता. ती वेळ आता येऊन ठेपली होती. त्या सभागृहात टाचणी पडली तरी ऐकू येईल अशी शांतता पसरली. जनरल आयसेनहॉवर टेबलावर डोळे खिळवून, स्तब्ध बसून विचार करु लागला. त्यावेळी त्याच्याकडे पाहताना जनरल स्मिथला सुप्रीम कमांडर हा किती एकटा असतो याची जाणीव तीव्रतेने झाली. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. त्या शांततेने काळही थांबेल अशी भीती प्रत्येकाला वाटत होती. कोणी म्हणतात दोन मिनिटे झाली कोणी म्हणतात पाच, पण तो वेळ संपल्यावर जनरल आयसेनहॉवरने आपली हनुवटी वर उचलली. त्याचा चेहरा तणावग्रस्त व झोप न झालेल्या माणसासारखा दिसत होता. त्याने सावकाश पण ठामपणे आपला निर्णय जाहीर केला. ‘मला वाटते आता तो आदेश द्यावा लागेल. मला हे आवडत नाही पण दुसरा मार्गही मला दिसत नाही.......’
जनरल आयसेनहॉवर उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण हा निर्णय घेतल्यावर जरा हलका झाला.
या आक्रमणास सुरवात होण्याआधी गडबडीतून आयसेनहॉवरने वेळात वेळ काढून जर या युद्धात पराभवाला सामोरे जावे लागले असते तर लागणार्या राजीनाम्याचे पत्र तयार केले. ‘या प्रयत्नासाठी कोणाला दोषी ठरवायचे असेल तर मलाच दोषी ठरवावे लागेल....’ या सगळ्या तयारीचे व जबाबदारीचे त्याच्या मनावर इतके दडपण आले होते की त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘मी काय करतोय हे मला कळावे अशी मी देवाला प्रार्थना करतो......’
रात्रीचा अंधार पडू लागला तसे इंग्लंडमधे विखुरलेल्या सैन्यात अस्वस्थता वाढू लागली. अनेक महिन्याचे प्रशिक्षण घेऊन त्याचा उपयोग होतो का नाही या विचाराने सैनिक अस्वस्थ होणे साहजिकच होते. त्यांना तयार राहण्यास सांगून आता अठरा तास होऊन गेले होते व प्रत्येक तासाने ते अधिकच अस्वस्थ होत होते. बिचाऱ्यांना अजून त्या निर्णयाची माहिती नव्हती व ती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अजून वेळ लागणार होता. आता फक्त हताश होऊन वाट पाहणेच त्यांच्या हातात होते.
युद्धाची वाट पाहणाऱ्या सैनिकांमधे काय चालेल तेच येथेही चालले होते. त्या अनेक छावण्यातून सैनिक आपल्या प्रियजनांचा विचार करीत होते. कोणी त्यांच्या बायकांचे तर कोणी त्यांच्या प्रेयसींबद्दल. काही त्यांच्या वृद्ध आईवडिलांचा तर काही त्यांच्या मुलांबद्दल. पण शेवटी गप्पा होत होत्या त्या पुढे होणाऱ्या लढाईबद्दलच. उतरता येईल का, समोर काय असेल, विमाने आधार देतील का ? उतरणे जेवढे अवघड व रक्तरंजित वाटत होते त्यापेक्षा सहज होण्याची शक्य आहे का .....असे एक ना अनेक प्रश्न चर्चिले जात होते व प्रत्येकजण त्याच्या स्वभावानुसार त्या लढाईची तयारी करीत होता. काही माणसे शांत झोपली होती. या झोपलेल्या माणसांमधे होता कंपनी सार्जंट मेजर स्टॅनले हॉलिस. ब्रिटिशांची पन्नासावी डिव्हिजन जेथे बोटीत चढणार होती तेथे हे महाराज शांत झोपले होते. त्याला पुढे काय वाढून ठेवले आहे याची पूर्ण कल्पना होती. त्याने ड्ंकर्कच्या युद्धात भाग घेतला होता. एवढेच नव्हे तर त्याने उत्तर आफ्रिकेमधे युद्ध लढले होते व सिसिलीच्या किनाऱ्यावर उतरताना झालेल्या लढाईचाही अनुभव त्याच्या गाठीशी होता. खरे तर तो या आक्रमणाची उत्सुकतेने वाट बघत होता. आता फ्रान्सच्या किनाऱ्यावर त्याला अजून काही जर्मन सैनिक मारायचे होते. सार्जंट मेजर हॉलिसच्या या अलिप्तपणाला एका अनुभवाची किनार होती. डंकर्कला जेव्हा ब्रिटिश सैन्य गोळा होत होते तेव्हा तो डिस्पॅच रायडरचे काम करीत असे. एकदा एका गल्लीत तो रस्ता चुकला. त्या गल्लीतून बाहेर पडण्यासाठी दुसरा रस्ता नव्हता. त्या गल्लीत नुकतेच जर्मन सैनिक येऊन गेल्याचे स्पष्ट दिसत होते कारण त्या गल्लीत फ्रेंच स्त्रीपुरुषांच्या प्रेतांचा सडा पडला होता. त्या हत्याकांडातून लहान मुलेही सुटली नव्हती. ते दृष्य बघितल्यापासून सार्जंट मेजर हॉलिस एक निष्ठूर सैनिक झाला व जर्मनसैनिकांचा कर्दनकाळ. त्याने आत्तापर्यंत नव्वद जर्मन सैनिक ठार मारले होते व या युद्धात त्याला म्हणे त्याचे शतक पुरे करायचे होते.
ज्या सैनिकांना समुद्रावरुन परत यावे लागले होते त्यांचे सगळ्यात जास्त हाल झाले. दिवसभर त्यांनी चॅनेलच्या खवळलेल्या समुद्रावर प्रवास केला होता. उदास होत त्यांनी जहाजाच्या डेकवर रांगा लावल्या होत्या. रात्री जवळजवळ अकरा वाजता शेवटच्या जहाजाने बंदरात नांगर टाकला आणि त्या कंटाळलेल्या सैनिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. इकडे प्लेमथ बंदरावर कॉरीवर कमांडर हॉफमन उभा होता. त्याच्या पुढे किनाऱ्यावर सैनिकांना उतरविण्याऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या बोटी एकारांगेत उभ्या होत्या. त्यांच्या सावल्या पाण्याबरोबर हालत होत्या. परत आल्यावर त्याला आक्रमण पुढे ढकलण्याचे कारण कळले होते व आता त्यांना परत एकदा तयार राहण्यास सांगितले गेले होते.
डेकखाली ही बातमी पसरण्यास वेळ लागला नाही. रेडिओमन बेनी ग्लिसन डेकवर टेहळणीच्या कामासाठी जातानाच त्याला ही बातमी ऐकू आली व तो घाईघाईने भोजनगृहात गेला. आज जेवायला टर्की होती व सर्व सैनिक चवीने जेवत होते. वातावरण गंभीर होते तेवढ्यात बेनी किंचाळला, ‘लोकहो, शेवटचे जेवून घ्या’त्याची बत्तीशी वठली असेच म्हणावे लागेल कारण कॉरी जेव्हा बुडाली तेव्हा तिच्यावर असलेले निम्मे सैनिक रसातळास गेले.
मध्यरात्री सर्व युद्धनौकांनी परत एकदा तो ताफा जुळविण्यास घेतला. यावेळी कुठल्याही परिस्थितीत मागे परतायचे नव्हते.
५ जूनच्या पहाटे नॉर्मंडीच्या किनाऱ्यांवर धुके पसरले होते. रात्रीपासून पडणाऱ्या भुरभुर पावसात सगळी जमीन, वाळू गच्च ओली झाली होती. गेली चार वर्षे नॉर्मंडीची जनता जर्मन सैनिकांना त्यांच्या भूमीवर सहन करत होती. ली-हार्वे, चेरबौर्ग व शॉन या शहरात जर्मनांचा जाच जरा जास्त होता पण त्याची आता त्यांना सवय झाली होती. या शहरांमधे एस् एस् व गेस्टापोंचे तळ होते व त्यांचे अत्याचार, धाडी आता नित्याच्याच झाल्या होत्या. दोस्तांच्या विमानांची बाँबफेकही नित्याचीच होती पण त्याने नागरीक आनंदीत होत. या शहरांच्या मागे शेतांच्या कडेला मातीचे ढीग व त्यावर गच्च झुडुपे अशी रचना रोमन साम्राज्यापासून आहे असे समजले जाते. या शेतवाड्यात अनेक छोटी छोटी गावे आहेत ज्याची लोकसंख्या फारच कमी आहे. या गावातील जनता शांतपणे नाझी अत्याचारांना तोंड देत चिवटपणे आपल्या सुटकेची वाट बघत होती.
त्यातच होता ३१ वर्षाचा वकील मायकेल हार्डले. त्या सकाळी वरव्हिले नावाच्या गावात त्याच्या आईच्या घरात तो खिडकीपाशी उभा होता. त्याचे घर जरा उंचावर होते व त्याला एक जर्मन सैनिक दुर्बिणीतून स्पष्ट दिसत होता. तो एका घोड्यावर बसून समुद्राच्या दिशेने चालला होता. त्याच्या खोगिराच्या एका बाजूला असंख्य पत्र्याचे डबे लटकत होते. दररोज सकाळी सव्वासहा वाजता हा सैनिक याच मार्गाने जात असे. त्याला एका मिनिटाचाही उशीर होत नसे कारण तो त्या गावात असलेल्या जर्मन सैनिकांसाठी कॉफी घेऊन येई. त्या गावाच्या किनाऱ्यावरील तैनात केलेल्या जर्मन तोफांवर काम करणाऱ्या सैनिकांचा दिवस उजाडला. त्या शांत दिसणाऱ्या किनाऱ्यावरील टेकाडांवर या सैनिकांनी आपले बंकर्स व पिलबॉक्स उभे केले होते. हा किनारा पुढे ओमाह बीच या नावाने प्रसिद्ध झाला.
हा कॉफीचा कार्यक्रम हार्डले दररोज बघे. दररोज सकाळी तो सैनिक घोड्यावरुन दुडक्या चालीने दोन मैल रपेट करुन त्या सैनिकांना कॉफी नेऊन देत असे. जर्मन तंत्रज्ञानात एवढे पुढे असून कॉफी पोहोचविण्यासाठी ही जुनाट पद्धत वापरतात हे पाहून हार्डलेला भारी मौज वाटे. पण गेले काही महिने त्याने पाहिले होते की जर्मन सैनिकांनी त्या टेकाडांवर मोठ्या प्रमाणावर बोगदे खणले होते व किनाराही बऱ्यापैकी साफ केला होता. साफ केला होता म्हणजे त्या टेकड्या व पाणी यामधे असलेल्या जवळजवळ ऐंशी इमारती जमीनदोस्त केल्या. त्यामुळे त्यांना समुद्र स्पष्ट दिसे व त्या इमारतींचे लाकूडही त्यांनी त्यांच्या बंकर्सच्या बांधकामासाठी उपयोगात आणले होते. याचा अजून एक महत्वाचा फायदा झाला तो म्हणजे आता सर्व किनारा त्यांच्या मशिनगनच्या माऱ्याच्या टप्प्यात आला. जी घरे वाचली होती त्यातील एक हार्डलेचे होते. त्यालाही जर्मन सैन्याकडून ते घर पाडले जाणार आहे याची सूचना मिळाली होती. त्याच्या माहितीनुसार ते घर उद्या म्हणजे सहा जूनला पाडण्याचा निर्णय झाला होता. जर्मन सैन्याला त्या भल्या मोठ्या घराच्या विटा पाहिजे होत्या. काहीतरी होईल आणि ते घर वाचेल अशी भाबडी आशा त्याला वाटत होती खरी आणि ते शक्यही होते कारण जर्मन सैनिकांचा काही भरवसा देता येत नसे.
त्याच वेळी त्या किनाऱ्याच्या शेवटी, जेथून वाळूतून वर येण्याची जागा होती तेथे चाळीस वर्षाचा ब्रूक्स रोजच्याप्रमाणे त्याचा चष्मा सावरत गाईची धार काढत होता. गेले कित्येक दिवस तो समुद्राकाठी गेलाही नव्हता. जर्मन आल्यावर तर नाहीच नाही. गेली पाच वर्षे बेल्जियम वंशाचा ब्रूक्स नॉर्मंडीवर शेती कसत होता. पहिल्या महायुद्धात त्याने त्याचे घर उध्वस्त होताना पाहिले होते. ते दृष्य तो कधीच विसरु शकत नाही. त्याने शांतपणे आपला गाशा गुंडाळून नॉर्मंडीची वाट धरली. आज तरी त्याला येथे सुरक्षित वाटे. त्याच वेळी पंधरा मैलांवर बेयुमधे त्याची सुंदर मुलगी चर्चमधून शाळेत शिकवायला निघाली होती. ती अत्यंत आतुरतेने संध्याकाळची वाट बघत होती कारण संध्याकाळी शाळा सुटली की तिची सुट्टी सुरु होणार होती. उद्या सकाळी पंधरा मैलांची रपेट मारुन घरी जायचे या विचाराने बिचारी खुष झाली. तिला काय माहीत की उद्याचा दिवस हा वेगळा असणार आहे आणि त्यामुळे तिच्या घरासमोरच उतरलेल्या एका अमेरिकन सैनिकाच्या प्रेमात पडून ती त्याच्याशी लग्न करणार आहे....
नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर जनजीवन सुरळीत चालले होते.शेतकरी शेतावर काम करीत होते तर काहीजण त्यांच्या गाई चरायला घेऊन जात होते. सकाळीच नेहमीप्रमाणे गावागावातून दुकाने उघडली. दररोजप्रमाणे एक दिवस उजाडला असेच सर्वांना वाटले. अर्थातच तसे होणार नव्हते....ल्-मॅडलिन नावाच्या एका छोट्याशा वस्तीत पॉलने त्याचे दुकान/कॅफे नेहमीप्रमाणे उघडायची तयारी चालविली. जर्मन आल्यापासून त्याचा धंदा काहीच होत नव्हता पण इतरांप्रमाणे त्यानेही दुकान वेळेवर उघडले. एक काळ असा होता की तो या दुकानातून बऱ्यापैकी पैसा मिळवायचा. पण बऱ्याच कुटुंबांनी स्थलांतर केल्यामुळे गिऱ्हाईक असे उरलेच नव्हते. त्याचा चरितार्थ आता फक्त सात कुटुंबांच्या व्यक्तींवर चालला होता. अर्थात त्याला मनाविरुद्ध जर्मन सैनिकांनाही कॉफी द्यावी लागे ते वेगळे. त्याला लवकरात लवकर नॉर्मडी सोडायचे होते पण कसे व कुठे जावे ते त्याला उमजत नव्हते. त्यालाही हे माहीत नव्हते की येणाऱ्या चोवीस तासात त्याला मोठा प्रवास घडणार आहे. त्याला आणि तेथील इतर नागरिकांना इंग्लंडला चौकशीसाठी नेण्यात येणार होते...त्याला याची कल्पना असायची अर्थातच काही कारण नव्हते.
त्या किनाऱ्यावरील गावातील लोकांप्रमाणे जर्मन सैनिकांचे दिवसही कंटाळवाणे, नीरस चालले होते. कुठे काहीच होत नव्हते. एवढेच नव्हे तसे काही होणार आहे अशी बातमीही नव्हती. हवा इतकी खराब होती की पॅरिसमधे लुफ्तवाफच्या मुख्यालयात कर्नल प्रोफेसर वॉल्टर स्टॉब त्याच्या वैमानिकांना सांगत होता,‘ आराम करा. त्याला दोस्तांची विमाने अशा हवेत आकाशात उडतील की नाही याचीच शंका होती. विमानविरोधी तोफांचे गोलंदाजही आराम करु लागले. स्टॉबने जनरल रुनस्टेडच्या कार्यालयात दूरध्वनी केला तेव्हा तो अजून आला नव्हता. साहजिकच होते. तो नेहमी रात्री उशीरापर्यंत काम करायचा. उठून त्याने त्याच्या स्टाफ ऑफिसरशी चर्चा केली व त्याच्या ‘दोस्तांच्या आक्रमणाची शक्यता‘ या अहवालाला हिरवा कंदील दाखविला. हा अहवाल हिटलरला जाणार होता. त्या अहवालात म्हटले होते की आक्रमणासाठी योग्य असा बॉबवर्षाव होत आहे हे खरे आहे पण हे आक्रमण हॉलंड ते नॉर्मंडीपर्यंत कुठेही होऊ शकते....पण कदाचित ब्रिटनीही यात येऊ शकेल...हे स्पष्ट होत नाही..ड्ंकर्क व जेप येथे चाललेला बाँबवर्षाव बघता कदाचित त्या किनाऱ्यावरही हल्ले होण्याची शक्यता आहे.......पण सर्वंकष आक्रमणाची शक्यता अंधूक आहे.....’इ.इ.
या अत्यंत चुकीच्या अंदाजात एकंदरीत ८०० मैल लांबीचा किनारा आक्रमणासाठी गृहीत धरला गेला. हा अहवाल रवाना झाल्यावर जनरल रुनस्टेड त्याच्या मुलाबरोबर (तो तेव्हा एक तरुण अधिकारी होता) त्याच्या आवडीच्या कॉक हार्डी नावाच्या उपहारगृहात पोहोचला. दुपारचा एक वाजला असेल.
हिशेबाने आक्रमण आता फक्त बारा तास दूर होते........
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
30 Jun 2015 - 2:03 am | श्रीरंग_जोशी
अगोदरचा अन हा हे दोन्ही भाग सलग वाचून काढले.
आधुनिक जगातील बहुधा सर्वात महत्वाच्या लढाईचे वर्णन एकदम ताकदीने केले आहे.
नॉर्मंडीचा उल्लेख असलेला हा प्रत्यक्ष घडलेला हा विनोदी प्रसंग एकदम रोचक आहे.
व्यक्तिशः नॉर्मंडी या नावाबरोबरचा माझा ऋणानुबंध म्हणजे सेंट लुईस, मिसुरी येथील नॉर्मंडी या उपनगरात माझे एक वर्षाहून अधिक काळ वास्तव्य होते. ते नाव फ्रेंच नावावरूनच ठेवण्यात आले आहे.
दुर्दैवाने गेल्या वर्षी नॉर्मंडीशेजारचे उपनगर फर्ग्युसन हे वांशिक हिंसाचाराच्या घटनांसाठी प्रसिद्ध झाले.
30 Jun 2015 - 7:59 am | एस
रोचक भाग!
30 Jun 2015 - 2:04 pm | आदूबाळ
जबरी. वाचतोय.
---------------
यातला ट्रॅफर्ड ले-मॅलरी म्हणजे एव्हरेस्टवीर जॉर्ज मॅलरीचा धाकटा भाऊ.
30 Jun 2015 - 1:37 pm | पद्मावति
अतिशय उत्कंठावर्धक लेखमालिका. हाही भाग अतिशय छान. पु. भा. प्र. आहेच.
30 Jun 2015 - 2:47 pm | मुक्त विहारि
पुढचा भाग लवकर टाकला तर फार उत्तम...
30 Jun 2015 - 6:59 pm | सौंदाळा
+१
पुभाप्र
1 Jul 2015 - 7:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
खुप छान! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
14 Jul 2015 - 3:44 pm | पैसा
अगदी गुंग करून टाकणारे लिखाण!