नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे'

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
26 Oct 2014 - 10:12 am

काही काळापूर्वी अर्धवट सोडलेली ही युद्धकथा दिवाळीत पूर्ण केली आहे. मला कल्पना आहे बर्‍याच जणांनी ही कहाणी चित्रपटातून पाहिली असणार पण ज्यांना ही मराठीत वाचायची आहे त्यांच्या साठी.......

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

"व्युहरचनाकारांनी तयार केलेल्या नॉर्मंडीवरील आक्रमणाच्या डावपेचांना जनरल मार्शल, ब्रुक, रुझवेल्ट व स्वत: चर्चिल यांनी केलेल्या परखड परीक्षणला सामोरे जावे लागले. या चौघांमधे चर्चिल व ब्रुक यांच्या मनात या योजनेबद्दल पाल चुकचुकत होती हेही खरेच आहे ! चर्चिलच्या बोलण्यात तर अनेकवेळा या लढाईत ठार झालेल्या सैनिकांच्या प्रेतांच्या सड्यांचा उल्लेख येत होता तर ब्रुकने त्याच्या रोजनिशीत लिहिले, ‘मी या योजनेबाबतीत अत्यंत अस्वस्थ आहे. या ऑपरेशनमधे चांगल्यात चांगली गोष्ट घडू शकते म्हणजे अपेक्षाभंग व वाईटात वाईट गोष्ट घडू शकते ती म्हणजे सर्वनाश’ हे वाक्य ब्रुकने जेव्हा लिहिले त्याच रात्री ( ५ जून १९४४) चर्चिल त्याच्या पत्नीस म्हणाला, ‘उद्या तू उठायच्या अगोदर आपले २०००० सैनिक ठार झालेले असतील याची तुला कल्पना आहे का ?."

"काळ बदललेला आहे’ आयसेनहॉव्हरने त्याच्या ६ जूनच्या एका आदेशात म्हटले. ‘स्वतंत्र जगाच्या स्वतंत्र नागरिकांची विजयाकडे वाटचाल चालू झाली आहे. मला तुमच्या शौर्याबद्दल, धाडसाबद्दल, कर्तव्यनिष्ठेबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे. आता आपल्याला पूर्ण विजय हवा आहे बस्स ! मी तुम्हाला सुयश चिंतितो. या आपल्या लढाईत आपण आज परमेश्वराचे आशिर्वाद मागूयात.’ नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर सैन्य उतरवून दोस्तराष्ट्रांनी शत्रूला आश्चऱ्याचा धक्का दिला हे यामधे मिळालेल्या विजयाचे एक कारण होते तर दुसरे महत्वाचे कारण होते ते म्हणजे दोस्तराष्ट्रांनी या युद्धात ज्या प्रमाणावर सैन्य उतरवले ते प्रमाण. सिसिलीच्या हस्की ऑपरेशनपेक्षा हे सैन्य कैकपटीने जास्त होते. एवढेच नाहीतर आत्तापर्यंतच्या इतिहासात या प्रकारच्या आक्रमणासाठी वापरल्या गेलेल्या कुठल्याही सैन्यापेक्षा हे सैन्य मोठे होते. सैनिकांना किनाऱ्यावर उतरवण्यासाठी ६९३९ खास बोटी तयार होत्या. त्यातील १२०० तर युद्धनौकाच होत्या. लाकडाच्या दहा टनी ४००० बोटी होत्या ज्यांचा वेग तासाला ८ सागरी मैल इतका होता. ११५०० विमाने व वीस लाख सैनिक. हे आकडे पाहिल्यावर हे सैन्य किती मोठे होते हे कळते. यातील इतर युद्धसाहित्याचे आकडेही सामान्य माणसाच्या कल्पनेच्या बाहेर आहेत. पहिल्या दिवशी जे आरमार निघाले त्यात ५००० बोटी, ५ युद्धनौका, २३ क्रुझर, ७९ डिस्ट्रॉयर, ३८ फ्रिगेट व इतर ११८ युद्धनौका राखीव म्हणून होत्या. हे आरमार पोहोचेपर्यंत विमानांनी १३,००० फेऱ्या मारून १५४००० सैनिकांना फ्रान्सच्या भूमीवर उतरवले. यातील २४००० सैनिक छत्रीने किंवा ग्लायडरने उतरविण्यात आले होते............"

या आक्रमणाची ही कहाणी...श्री रायन यांच्या व इतर काही पुस्तकावरुन.........

नॉर्मंडी – अर्थात ‘द लॉंगेस्ट डे..........
जून महिन्यातील दमट हवा.... पॅरिस व नॉर्मडीमधे वाहणाऱ्या सीन नदीच्या एका वळणावर, ला होशग्रियूं नावाचे ते निसर्गरम्य खेडं निसर्गशांततेत पहुडले होते. गेली दोन तीन शतके तरी त्यात काही बदल झाला असावा असे वाटत नाही. नॉर्मंडीहून पॅरिसला जाणारे प्रवासी किंवा पॅरिसहून नॉर्मंडीला जाणाऱ्या प्रवाशांना हे गाव वाटेत लागत असे यापेक्षा आधिक त्याबद्दल सांगण्यासारखे काही नाही. अर्थात त्या रस्त्यावरुन जाताना होशफुकूच्या ड्युकचा किल्ला डोळ्यात भरतो हे खरे, पण असे अनेक किल्ले त्या काळातच काय आजही फ्रान्समधे दृष्टीस पडतात त्यामुळे त्यातही काही विशेष आहे असे म्हणता येत नाही.

आता मात्र या खेड्याला महत्व प्राप्त झाले होते ते एका वेगळ्याच कारणाने. त्या हिरव्यागार कुरणांमागे ला होशग्रियूंचा एक तुरुंगच झाला होता. गावाची लोकसंख्या होती ५४३ पण आत्ता तेथे प्रत्येक माणसामागे तीन जर्मन सैनिक तैनात होते. या सैनिकांमधे एक होता फिल्ड मार्शल एरविन रोमेल, जर्मनीच्या आर्मी ग्रुप बी चा कमांडर-इन-चिफ. पूर्वेतील आर्मी ग्रुप बी ही जर्मनीची एक अत्यंत ताकदवान सेना म्हणून ओळखली जात असे. वर उल्लेख केलेल्या किल्ल्यात रोमेलने आपले मुख्यालय थाटले होते आणि तो दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या वर्षी त्याच्या शेवटच्या लढाईची तयारी करत होता. ही लढाई त्याला दोस्तांचे आक्रमण थोपविण्यासाठी करायची होती. दिवस होता ४ जून १९४४. त्याची तयारी जोरदार होती पण येणाऱ्या ४८ तासातच या घनघोर लढाईला तोंड फुटणार आहे याची त्याला य:कश्चितही कल्पना नव्हती.

हॉलंडच्या किनाऱ्यांपासून ब्रिटनीच्या द्विपकल्पापर्यंत पसरलेल्या अवाढव्य ८०० कि.मी. लांबीच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण करायची जबाबदारी त्याच्या पाच लाख सैनिकांवर होती. त्याच्या या फौजेतील सगळ्यात अनुभवी व ताकदवान सेना, पंधरावी आर्मी ही पा द् कॅले येथे एकवटली होती. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी चॅनेलमधे फ्रान्स आणि इंग्लंडमधे सगळ्यात कमी अंतर आहे.

गेल्या अनेक रात्री दोस्तांची विमाने पा द् कॅलेला अखंडित भाजून काढत होती. १५व्या आर्मीमधे तर विनोदाने असेही म्हटले जाऊ लागले होते की झोपण्यासाठी सातव्या आर्मीत भरती व्हावे म्हणजे नॉर्मंडीला जाऊन झोपता येईल! गेले कित्येक महिने किनाऱ्यावर उभ्या केलेल्या अडथळ्यामागे जर्मन सेना बेचैनपणे दोस्तांच्या हल्ल्याची वाट बघत होती पण नेहमीप्रमाणे आजही समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर शांतपणे आपटत होत्या.
तळमजल्यावरील त्याच्या एका खोलीत रोमेलने त्याचे कार्यालय थाटले होते. रोमेल आता त्याच्या वयाच्या मानाने वयस्कर दिसू लागला होता पण त्याच्या कामाचा झपाटा पूर्वीप्रमाणेच विलक्षण होता. आजही तो रोजच्याप्रमाणे पहाटे चार वाजता उठून आपल्या काऱ्यालयात कामाला आला व सहा वाजण्याची वाट बघत होता. सहा वाजता आपल्या सहकाऱ्यांबरोबर न्याहारी करुन त्याला आज जर्मनीला जायचे होते. गेल्या कित्येक महिन्यातील त्याची ही पहिलीच रजा. त्याच्या कुटुंबियांना भेटण्यास तो आतूर झाला होता.

या सुट्टीवर जाणे ही रोमेलसाठी तशी फारशी आनंदाची गोष्ट नव्हती कारण त्याच्यावर असलेल्या प्रचंड जबाबदाऱ्या ! त्यांच्या ओझ्याखाली तो दबून गेला होता. त्या ताणामुळे तो मनापासून त्या सुट्टीचा उपभोग घेऊच शकत नव्हता. तिसऱ्या राईशवर गेल्या काही महिन्यात संकटावर संकटे कोसळत होती. रशियन सैन्य पोलंडमधे पोहोचले होते, दोस्तांची विमाने जर्मनीवर पाहिजे तेव्हा बाँबवर्षाव करत होती. त्यांना अडथळा करण्यासाठी तेथे कोणीही नव्हते. दोस्तांच्या सेना रोमचे दरवाजे खटखटवत होते तर दोस्तांचे फ्रान्सच्या किनाऱ्यावरील आक्रमण ही काळ्या दगडावरची रेष होती. जर्मनीचा पराभव अटळ होता असे त्याक्षणी तरी म्हणता येत नव्हते पण दोस्तांचे आक्रमण फ्रान्सच्या किनाऱ्यावर थोपवले नाही तर काय होऊ शकते याची कल्पना रोमेलला होती. हे सगळे असूनही तो जर्मनीला चालला होता याचे खरे कारण त्याने कितीही नाकारले तरीही त्याला विश्रांतीची नितांत गरज होती हेच होते. शिवाय त्याला हिटलरचीही भेट घेण्याची गरज वाटत होती.
या जगात अशी एकच व्यक्ती होती जिला रोमेलच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना होती. ती म्हणजे त्याची पत्नी लुसी-मारिया. त्या काळात त्याने त्याच्या पत्नीस चाळीस पत्रे लिहिली आणि प्रत्येक पत्रात त्याने दोस्तांच्या संभाव्य आक्रमणाची काळजी व्यक्त केलेली दिसते.

६ एप्रिलला तो लिहितो. ‘ येथे तणाव वाढत आहे. काहीच आठवड्यात काहीतरी भयंकर घडणार आहे हे निश्चित.....

६ मे ला तो लिहितो, ‘ आम्ही मोठ्या उत्सुकतेने आमच्या शत्रुची वाट बघत आहोत. दिवसेंदिवस आमची ताकद वाढतच आहे. आम्ही युद्धाला तयार आहोत. ११ मे ला ते सुरु होईल असे वाटते आहे किंवा या महिन्याच्या अखेरीस होईल.

१५ मे ला त्याने लिहिले,‘मी आता तिकडे येऊ शकत नाही कारण केव्हाही आक्रमण होण्याची शक्यता आहे, त्यमुळे मी फार मोठा प्रवास करु शकत नाही.’

१९ मे : मी जूनमधे थोडा वेळ काढू शकेन असे आत्ता वाटते आहे. बघुया जमते आहे का....

पण शेवटी आत्ता त्याला ही संधी मिळाली असे म्हणायला हरकत नाही. तो आता जाऊ शकतो असे त्याला वाटत होते त्याला अजून एक कारण होते ते म्हणजे त्याचा स्वत:चा दोस्तांच्या आक्रमणाचा अंदाज. त्याच्या टेबलावर आर्मी बी ग्रुपचा आठवड्याचा अहवाल होता. वाचून झाल्यावर तो त्याला फिल्डमार्शल रुनस्टेडला पाठवायचा होता व जो पुढे हिटलरला जाणार होता. त्या अहवालात रोमेलने लिहिले होते, ‘शत्रूची तयारी बघता हल्ला केव्हाही होऊ शकतो असे वाटण्याची शक्यता आहे. शत्रूचा फ्रेंच भुमिगत बंडखोरांशी संपर्कही वाढलेला आहे पण पूर्वानुभावरुन आक्रमण आत्ता होईल असे वाटत नाही.’
पण या वेळी त्याचा अंदाज परत एकदा चुकणार होता. मे महिना संपत आला. हिटलर व अनेकांप्रमाणे रोमेलचेही असेच म्हणणे होते की दोस्तांचे आक्रमण हे रशियाचे आक्रमण सुरु झाले की सुरु होईल व रशियाचे आक्रमण पोलंडमधील बर्फ वितळायला लागला की होणार होते कारण त्यांच्या फौजेच्या हालचाली त्याच्या अगोदर अशक्य होत्या. सगळा हिशेब केला
तर जूनच्या शेवटी शेवटी फ्रान्सच्या किनाऱ्यावर आक्रमण होईल असा एकंदरीत अंदाज होता.

पश्चिमेकडे हवामान अत्यंत खराब होते व अजून काही दिवस ते तसेच राहील असा अंदाज होता. जर्मनीच्या वायुदलाचा हवामानतज्ञ कर्नल प्रोफेसर वॉल्टर स्टॉबच्या अंदाजानुसार वारे जोरदार वेगाने वाहणार होते व त्यांच्या बरोबर पाऊसही पडणार होता. आत्ताही चॅनेलवर २० ते ३० किमी वेगाने वारे वहात होते. या अशा हवामानात दोस्तांच्या सेना फ्रान्सच्या किनाऱ्यावर उतरण्याचा प्रयत्न करतील असे रोमेलला वाटत नव्हते. त्याने आपल्या कार्यालयाचे दार उघडले व तो खालच्या मजल्यावर सकाळच्या न्याहारीला गेला. ला् होशग्रियूंच्या चर्चच्या घंटेचा आवाज त्या जोरदार वाऱ्यांवर आपटत अस्पष्ट होत होता......पण पहाटे पहाटे त्या घंटेचा तो आवाजा कानाला मोठा गोड लागत होता.

रोमेल नोव्हेंबरपासून फ्रान्समधे होता. ६० वर्षाचा खानदानी सेनानी जनरल रुनस्टेड त्यावेळी पश्चिमेचा कमांडर-इन-चिफ होता. एवढा अनुभवी जनरल तैनात असूनही हिटलरने रोमेलला तेथे पाठवून खरे तर त्याचा अपमानच केला होता. रोमेलवर त्यावेळी हिटलरच्या प्रसिद्ध अटलांटिक वॉलच्या तपासणीची जबाबदारी टाकण्यात आली होती. ही पश्चिम किनाऱ्यांचे संभाव्य आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी उभी केलेली एक लष्करी तटबंदी होती. ही संरक्षण व्यवस्था खरोखरीच मजबूत आहे का याचा अभ्यास करुन रोमेलला त्याचा अहवाल हिटलरला सादर करायचा होता.

हिटलरच्या अनेक स्वप्नवत वाटणाऱ्या कल्पनेप्रमाणे अटलांटिक वॉल हीही एक त्याच्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना. इतके दिवस विजयाच्या घोडदौडीपुढे किनाऱ्यांच्या संरक्षणाची काही जरुरी पडेल असे हिटलरला व त्याच्या गर्विष्ठ सेनानींना वाटले नव्हते. हिटलरला तर फ्रान्सच्या पाडावानंतर ब्रिटन तहासाठी हात पुढे करेल असा आत्मविश्वास होता. अर्थात ब्रिटिशांनी तसे काही केले नाही उलट त्यांनी शांतपणे त्या परिस्थितीतून बाहेर येण्याचे अतोनात प्रयत्न चालू ठेवले. हिटलरने १९४१च्या जूनमधे रशियावर आक्रमण केले ज्यामुळे फ्रान्सच्या किनाऱ्याच्या संरक्षणाची त्याला तशी आवश्यकता वाटली नाही. जेव्हा अमेरिका युद्धात उतरली त्यावेळेस हिटलर वल्गना करीत होता की नॉर्वे-फिनलंड सिमेपासून ते स्पेन-फ्रान्स सिमेपर्यंत एक अभेद्य संरक्षक फळी उभी करुन आम्ही कुठल्याही शत्रूचा त्या किनाऱ्यावर प्रवेश रोखू शकतो. अर्थात या वल्गनाच होत्या कारण हा किनारा एकंदरीत ३००० मैल लांबीचा होता व जगातील कुठल्याही सेनानीने असा दावा केला नसता.

जेव्हा हिटलरने ही कल्पना मांडली तो दिवस जर्मन हाय कमांडचा प्रमुख जनरल हाल्डरला अजूनही आठवतो. हाल्डरने त्या बैठकीत ही तटबंदी किनाऱ्याच्या खूपच आत बांधण्याची सूचना केली. कारण फार साधे होते. त्याला ती युद्धनौकांच्या तोफांच्या माऱ्याच्या टप्प्याच्या बाहेर बांधायची होती. त्याचे म्हणणे होते की सेना जर त्या तोफांच्या माऱ्यात सापडली तर ती डोके बाहेर काढू शकणार नाही. ते ऐकून हिटरचा पारा चढला. त्या काळात त्याला त्याच्या विरुद्ध कोणी बोललेले खपत नसे. तो तरातरा ज्या टेबलावर नकाशा पसरला होता तेथे आला व त्यावर मुठ आपटून म्हणाला, ‘ येथे बाँब पडणार आहेत, येथे येथे, येथे, येथही पडणार आहेत, सगळीकडेच पडणार आहेत पण आपले सैनिक सुखरुप असतील आणि ते बाँबवर्षाव थांबल्यावर बाहेर येऊन लढतील....’ हाल्डर तेव्हा काही बोलला नाही परंतु त्या खोलीतील त्याच्यासकट सर्वांना माहिती होते की हिटलर सगळ्यात जास्त कशाला घाबरत असेल तर शत्रूच्या आक्रमणाला.

ही एवढी सगळी वादळी चर्चा होऊनसुद्धा त्या तटबंदीवर काम झालेच नाही. १९४२ साली जेव्हा युद्धाचे पारडे जर्मनीच्या विरुद्ध झुकले तेव्हा युरोपच्या भुमीवर दोस्तांच्या कमांडोजचे हल्ले होऊ लागले. जेप बंदरावर कॅनडाच्या ५००० सैनिकांनी हल्ला चढविला तेव्हा मोठा गहजब उडाला. या अचानक झालेल्या कमांडो हल्ल्याने हिटलरला धक्काच बसला. तो त्याच्या जनरल्सवर अक्षरश: बरसला व त्याने ती तटबंदी ताबडतोब पूर्ण करण्यास सांगितले.

हिटलरने आदेश दिला आणि लगेचच सर्व त्या कामाला जुंपले गेले. ज्या कामगारांना गुलाम केले गेले होते त्यांना रात्रंदिवस या कामावर जुंपण्यात आले. या कामात इतके काँक्रीट वापरले गेले की जर्मनीच्या ताब्यातील युरोपमधे इतर कामासाठी काँक्रीट मिळणे अवघड झाले. लोखंडी सामानाची प्रचंड खरेदी नोंदविण्यात आली पण त्याचे इतके दुर्भिक्ष होते की अभियंत्यांना त्याच्यावाचूनच काम करावे लागत होते. सामानाचा इतका तुटवडा भासत होता की जुन्या फ्रेंच मॅजिनो लाईनची तोडफोड करुन जमेल तितके सामान गोळा करण्यात आले. १९४३च्या शेवटास या कामावर पाच लाख कामगार काम करत होते तरीही त्याचे पूर्ण बांधकाम दृष्टिक्षेपात येत नव्हते.

त्याच्या सेनानींप्रमाणे हिटलरलाही कधीतरी आक्रमण होणार आहे याची खात्री होती. या आक्रमणाला तोंड देण्यासाठी सैन्य कुठून आणायचे हा प्रश्न आता त्याला भेडसावत होता. रशियाच्या आघाडीवर त्याचे बरेच डिव्हिजन सैन्य गारद झाले होते तर सिसिलीमधे दोस्तांच्या सैन्याविरुद्ध त्याचे बरेच सैन्य अडकून पडले होते. सैनिकांच्या या तुटवड्यावर सैन्यात तरुण मुलांची व म्हाताऱ्यांची भरती करुन मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे आकडेवारी जरी कागदावर भरभक्कम दिसत असली तरीही प्रत्यक्ष युद्धात या सेना तग धरतील की नाही याची शंकाच होती. अर्थात या सैन्यात काही कडव्या पँझर डिव्हिजन्सही होत्या पण त्यांची संख्या एवढी काही लक्षणीय नव्हती. या परिस्थितीत हिटलरला त्याच्या अटलांटिक वॉलचा भयंकर आधार वाटे. त्याला आत्मविश्वास होता की ही तटबंदी सगळ्या कमतरता भरुन काढू शकते.

रोमेलने नोव्हेंबर १९४३ मधे जेव्हा या तटबंदीची पहाणी केली तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने पाहिले की काहीच ठिकाणी ही तटबंदी पूर्ण झाली होती तर काही ठिकाणी अजून कामही चालू झाले नव्हते. अर्थात त्याचे आत्ताचे स्वरुपही अभेद्य असेच होते. ज्या ठिकाणी ती पूर्ण झाली होती तेथे बऱ्यापैकी संख्येने मोठ्या तोफा तैनात करण्यात आल्या होत्या. पण रोमेलला पाहिजे होत्या तेवढ्या तोफा तेथे नव्हत्या हेही खरे आहे. रोमेलने नुकतेच उत्तर आफ्रिकेत जनरल माँटगोमेरीच्या फौजेचा अनुभव घेतला होता. एवढेच नाही तर त्याला तेथून पळही काढावा लागला होता. त्याला दोस्तांचे आक्रमण म्हणजे काय असेल याची पुरेपूर कल्पना होती. हे जे काही उभे होते ते अत्यंत कमी होते याबद्दल त्याला मुळीच शंका नव्हती. त्याच्या दृष्टीने हिटलरची ही अटलांटिक वॉल म्हणजे एक मोठा विनोदच होता....

रोमेलने त्याचे हे मत जनरल रुनस्टेडकडे नोंदविल्यावर रुनस्टेडनेही त्याच्या मतावर सहमती दर्शविली. हा पहिलाच प्रसंग होता ज्यात रुनस्टेडने रोमेलची टिका मान्य केली होती. साठ वर्षीय अनुभवी रुनस्टेडचा असल्या तटबंदीवर कधिच विश्वास नव्हता. कसा असणार ? त्यानेच वेगवान हालचालींचे ब्लिझक्रिझ डावपेच जन्माला घातले होत व १९४० साली मॅजिनो तटबंदीला वळसा घालून त्याच्या या आधुनिक युद्धशास्त्राची चुणुक दाखविली होती. त्याच्या मते ही अटलांटिक तटबंदी म्हणजे एक शुद्ध मुर्खपणा होता. त्याच्या मते जर्मन जनतेची ही घोर फसवणुक होती. या तटबंदीमुळे शत्रुसेनेपुढे काही काळ अडथळा होईल पण त्याने आक्रमण थांबेल असे मानणे म्हणजे मोठी घोडचुक होती. त्याचे असेही मत होते की दोस्तांच्या सेनेला फ्रान्सच्या किनाऱ्यावर उतरण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्याने असे सुचविले की किनाऱ्याच्या बऱ्याच आत जर सेना एकवटली तर दोस्तांच्या सेना उतरल्यावर त्यांचा नाश करणे सोपे जाईल.

रुनस्टेडच्या या योजनेला रोमेलचा कडाडून विरोध होता. त्याच्या मते दोस्तांच्या फौजांना किनाऱ्यावर उतरु न देणे हाच एकमेव मार्ग होता. त्याच्या मते दोस्तांच्या बाँबहल्ल्यापुढे जर्मन सेना टिकाव धरु शकणार नाही. या उलट जर जर्मन सेना शत्रुच्या जवळ असेल तर दोस्तांच्या वायुदलावर बरीच बंधने येतील. त्याने सुचविले की त्यामुळे सर्व जर्मन सेना ही किनाऱ्याजवळ आणून ठेवावी.

रोमेलचा सहाय्यक कॅप्टन लँग त्यावेळी ३६ वर्षाचा होता. त्याला रोमेलने या बाबतीत त्याची योजना सांगितली. ती संध्याकाळ लँगला अजून आठवत असणार. त्या निर्मनुष्य किनाऱ्यावर रोमेल आणि लँग उभे होते. रोमेलने ओव्हरकोट घातला होता आणि गळ्याभोवती त्याचा जुना मफलर गुंडाळला होता.आपल्या हातातील चांदीची टोके असलेला फिल्डमार्शलचा बॅटन त्या वाळूकडे रोखत तो म्हणाला, ‘या किनाऱ्यावर आपण युद्ध जिंकणार आहोत किंवा हरणार आहोत. शत्रूला थोपविण्याची आपल्याकडे फक्त एकच संधी आहे. तो पाण्यात असेपर्यंत. त्याचा नाश हा किनाऱ्यावर उतरतानाच होऊ शकतो. आपल्याला त्यांना प्रतिकार करायचा असेल तर येथेच करावा लागेल. लँग, आक्रमणाचे पहिले २४ तास या युद्धाचे भवितव्य ठरविणार आहेत. जर्मनीसाठी आणि शत्रूसाठी या वर्षातील हा सगळ्यात मोठा दिवस असेल.....

.......... द लॉंगेस्ट डे.....’

क्रमशः
जयंत कुलकर्णी

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

विनोद१८'s picture

26 Oct 2014 - 11:08 am | विनोद१८

नेहमीप्रमाणेच उत्कन्ठावर्धक युद्ध्कथा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Oct 2014 - 12:34 am | डॉ सुहास म्हात्रे

+१

पिंपातला उंदीर's picture

26 Oct 2014 - 11:13 am | पिंपातला उंदीर

दुसऱ्या महायुद्धातल एक महत्वाच प्रकरण . अतिशय आवडल . एक शंका . ब्लिझक्रिझ डावपेच जन्माला घालण्यामागे जनरल मान्स्टिन आणि गुडेरीन यांचा वाटा होता ना ?

अनुप ढेरे's picture

26 Oct 2014 - 11:27 am | अनुप ढेरे

मस्तं!

तुमचा अभिषेक's picture

26 Oct 2014 - 1:34 pm | तुमचा अभिषेक

मस्त ईंटरेस्टींग वाचतोय

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Oct 2014 - 2:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नॉर्मॅडीच्या लढाईवर एक 'सेव्हींग प्रायव्हेट रायान' नावाचा एक चांगला चित्रपट आहे. चित्रपटातलं दोस्ट राष्ट्रांचं नॉर्मॅडीच्या किनार्‍यावर सैन्य उतरवण आणि तिथलं युद्ध अक्षरशः अंगावर काटा आणतं. चित्रपटात एवढा संहार दाखवलाय की प्रत्यक्ष युद्धात काय झाले असेल ह्याचा विचारचं करवत नाही.

खालचा एक व्हीडीओ पाहिला तर खर्‍या युद्धाची भीषणता लक्षात येऊ शकेल. ज्यांना रक्तामांसाची आणि युद्धाची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी कृपया व्हीडीओ पाहु नका.

https://www.youtube.com/watch?v=_cytrCXTHno

कवितानागेश's picture

26 Oct 2014 - 2:58 pm | कवितानागेश

...वाचतेय

मुक्त विहारि's picture

26 Oct 2014 - 6:01 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

सावकाश, तब्येतीने वाचण्याचा विषय. तूर्तास फक्त वाखु लावून ठेवत आहे.

मुक्त विहारि's picture

27 Oct 2014 - 9:54 am | मुक्त विहारि

https://www.youtube.com/watch?v=OZJMtJtrsnE

आणि

"द लाँगेस्ट डे" (http://www.imdb.com/title/tt0056197) ह्याच नावाचा, ह्याच कथेवर अप्रतिम सिनेमा आहे. तो पण जरूर बघा.

प्रसाद१९७१'s picture

27 Oct 2014 - 7:50 pm | प्रसाद१९७१

@जयंत साहेब - मला हा प्रश्न न नेहमी पडलेला आहे, कदाचित तुम्हीच नीट उत्तर देऊ शकाल.

१९४४ च्या जुन मधे ब्रिटीश/अमेरिकन लोकांचे आफ्रिकेत पूर्ण वर्चस्व तयार झाले होते. नॉर्मेंडी वरुन सैन्य आत घुसवण्यासाठी प्रचंड मोठा खर्च आणी महत्वाचे म्हणजे प्रचंड प्राणहानी होणार होती. हे स्पष्ट होते. पहील्या दिवशी नॉर्मंडीवर उतरलेल्या आणि पॅरॅशुट नी उतरलेल्या बर्‍याच सैन्याला प्राण द्यावे लागतील हे माहीती होते.

हे करण्या पेक्षा आफ्रीकेतुन युरोप मधे सैन्य घुसवणे सहज शक्य होते आणि प्राणहानी पण कमीच झाली असती. तसेच खूप मोठे प्लॅनिंग आणी तयारीची पण गरज लागली नसती.

जिथुन युरोप सोडुन पळ काढावा लागला तिथुनच आत येण्या मागे इगो होता का अजुन दुसरे काही कारण?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Feb 2015 - 4:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या मते नॉर्मंडीच्या युद्धामधे सर्वात मोठी केलेली चुक म्हणजे "आर्मर सपोर्ट" शिवाय सैन्य उतरवणे. नॉर्मंडीमधे जर्मन्स च्या बाजुनी असणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे समुद्राला लागुन असणारे उंचवटे, अधिक त्यांनी तिथे बंकर्स उभे केलेले होते ज्यामधे मध्यम पल्ल्याच्या मशिन गन्स बसवण्यात आलेल्या होत्या. शिवाय किनार्यावरती सुरुंगही पेरलेले होते. अमेरिकन्स किंवा ब्रिटिशांनी लांब पल्ल्याच्या तोफा वापरुन आधी बंकर्स उध्वस्त केले असते तर शेकडो लोकं मरणापासुन किंवा अपंग होण्यापासुन वाचली असती.
"हॉनेट्स नेस्ट" नावाचं प्रकरणं इथे स्कॅन करुन अपलोड करीन जसं जमेल तसं. खुप जबरदस्त लिहिलं आहे. लेखकाचं नावं विसरलो, पण एका वर्तमानपत्रातलं कात्रणं आहे जपुन ठेवलेलं.

प्रसाद१९७१'s picture

27 Oct 2014 - 7:58 pm | प्रसाद१९७१

@जयंत साहेब - पहील्या महायुद्धा च्या गॅलिपोली च्या लढाई बद्दल पण लिहा. तेंव्हा चर्चिल आरमार मंत्री होता आणी त्याचा निर्णय चुकला होता, ब्रिटीश सैन्य गॅलिपोलीच्या किनार्‍यावर उतरले आणि प्रचंड सैनीक एका दिवसात मारले गेले होते टर्की कडुन.

त्याच चर्चिल वर ३० वर्षा नंतर तशाच प्रकारचा निर्णय घेण्याची वेळ आली. तरी तो त्याने खंबीर पणे घेतला हे महत्वाचे.

पुढचा भाग टाकला आहे का? असल्यास कृपया लिंक द्यावी आणि नसल्यास भराभर पुढचे भाग पूर्ण करावेत ही विनंती.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 4:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

आपल्या युद्धकथा उत्तम असतात! जमल्यास काही रियल लाइफ इंटेलिजेंस वर पण लिहा प्लीज

पैसा's picture

8 Jul 2015 - 9:05 am | पैसा

आता वाचायला सुरुवात केलीय!

महासंग्राम's picture

7 Jun 2019 - 1:51 pm | महासंग्राम

कालच या या लँडिंग ला ७५ वर्ष पूर्ण झाली