अगोचर (२)

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
19 Aug 2008 - 2:53 pm

http://www.misalpav.com/node/3022

रात्र कशी धावपळीत गेली हे न्युरोच्या टीम ला सकाळपर्यंत कळलं नाही.कॉल पाठवल्यावर गायनॅकची सिनीयर डोळे चोळत आली.पै आणि नाईक दोघही तिच्या मदतीला होते.ललीत बराच वेळ पेशंटच्या नातेवाईकाबरोबर बोलत होता. आता त्या उंच माणसाबरोबर एक -दोघं होते.खानोलकर साईड रूम मधल्या कॉटवर आडवा पडला होता.ललीत काही वेळानी परत गायनॅकच्या सिनीयर ला घेऊन नातेवाईकांबरोबर बोलत होता.
"नाही.या परीस्थीतीत मी काही रिस्क घेणार नाही. सकाळी डॉक्टर तुळपुळे येतील त्यापूर्वी तुम्ही अल्ट्रा साउंड करून ठेवा."
सगळ्या नातेवाईकांच्या चेहेर्‍यावर फारशी काळजी दिसत नव्हती.फक्त तो उंच माणूस चुळबळत होता.
"मुलगा काही झालं तरी वाचायला हवा."
त्या उंच माणसाच्या छातीवर बोटाने ठासून एक नविन माणूस सांगत होता.
"मुलगा?"
"तुम्हाला काय माहिती मुलगा की मुलगी?"
"आम्हाला माहीती आहे."त्या नवीन माणसानीच उत्तर दिलं.
सकाळी पावणेपाच वाजता ह्या गोंधळात कुठलाच डॉक्टर पडणार नाही. पण त्या नवीन माणसाच्या आवाजातली अरेरावी लक्षात येण्याइतकी होती.
"आपण कोण?"
"सावलीचे काका आहेत ते." उंच माणसाला पहिल्यांदा कंठ फुटला होता.
"आणि तुम्ही?'
"मी नवरा आहे तिचा."
फाईन. तुम्ही फक्त बोला.सिनीयरच्या आवाजतली सूचना ल़क्षात येण्यासारखी होती. नवीन माणसं दूर जाऊन उभी राहीली.
"हे बघा, सकाळी या युनीटचे सिनीअर येतील ते काय त्या सूचना देतील. तोपर्यंत थांबावंच लागेल .ब्लड वगैरेची व्यवस्था ठेवा.
हा फीमेल वॉर्ड आही आता जास्त थांबू नका."ललीतनी सम अप करत सांगीतलं.
"मला दहा मिनीटं द्या. "
"कशासाठी . प्रार्थनेसाठी."
"ओके.फक्त तुम्ही आत जा."
सरीता पेशंटच्या बेड जवळ उभी होती.आता ब्रीदींग जरा नॉर्मल होतं. कानातून आलेलं रक्त साकळून काळं पडलं होतं.
सिस्...त्या उंच माणसानी हाक मारली.
"आय वाँट टु प्रे."
त्याच्या हातात चांदीची छोटी घंटी होती.
"नो नो घंटी वगैरे वाजवू नका."
"सिस् या घंटीचा आवाज येत नाही."
सरीता बाजूला टेबलजवळ उभी राहिली.
हलक्या आवाजातली प्रार्थनेची गुणगुण यायला लागली. घंटीची किणकिण त्यात भर घालत होती.इतका नाजूक आवाज .कधी न ऐकल्यासारखा.
सरीताला झोप अचानक अनावर झाली. बाजूच्या चेअरवर जेमतेम बसेस्तो गाढ झोप लागली .ती जागी झाली ती पै नी चार हाका मारल्यावर.
"काय . स्टाफ काय आहे? वॉर्ड मध्ये सगळे झोपलेत. खानोलकर सर कुठे आहेत."
"साईड रुम मध्ये."
"आणि ललीत सर?"
"मला नाही माहिती."
"अजीब बात है." असं पुटपुटत त्यानी फाईलीवर नोट घ्यायला सुरुवात केली.
सरीतानी बाबाला हाक मारली .मावशांना हाक मारली.
सगळे गाढ झोपेत.
पावणे सहा वाजलेत.
माय गॉड..अजून राउंड घ्यायचा आहे.. टेंपरेचर. पल्स मॅपकरायच्या आहेत.
मावशी, रेखा मावशी..
हळूहळू पंधर मिनीटात सगळं रुटीन सुरु झालं .चहा आला.
पैचे डोळे लालभडक दिसत होते.
ओके. स्टाफ.. तो आणि खानोलकर निघाले.
साडेआठ वाजता बॉसचा राउंड आहे.
"सावलीची केस आधी घ्या.फॉर्म सगळे भरलेत."
"गायनॅकची सिनीअर...
मॉर्नींग स्टाफ बघेल काय ते.."जा आता.
पै आवाज न करता हसला..
"स्टाफ तुला आवडत का नाही ती? मला तर ती सुंदर..."
"मास्क लावला की सुंदर दिसते ती..".सरीताचा फणकारा उसळला..
सरीता कमाला लागली.ओव्हर देउन बाहेर पडता पडता साडेसात वाजलेच.वॉर्डच्या बाहेर तो उंच माणूस आणि दोघं नातेवाईक
कुठल्यातरी वादात गुंतले होते..
दोयुग्माचा प्रिंस . .. कालीटकेरी ...असे काही न समजणारे शब्द तिच्या कानावर पडले.
---------------------------------------------------------------------------------------------
खाली उतरून स्टॉपवर आली तेव्हा एक २०१नंबर समोरून जात होती. आता आणखी विस मिनीटाचा खोळंबा असं मनात येईस्तो पाठून हाक आली .
सिस् ... एस्टॅब्लीशमेंटचा खांबेटे बोलवत होता.त्याला बघून सरीता हसली.
काय हो खांबेटे?
तुमचं नाव बदलून आलंय हं.येत्या पगारापासून तुम्ही सरीता गोपाळ कुळकर्णी.
थँक्यू.
पण ते अजून आणखी एकदा बदलायला हवयं असं म्हणून खांबेटे हसत हसत गेला.बस आली.
दादांना जाउन तीन वर्षं होउन गेली.त्यांच्या आठवणीनी ती गंभीर झाली.कुठल्या जन्माच्या या गाठी सुटता सुटत नाहीत. एक वळण चुकलं तर दुसर्‍या वळणावर हजर असतात.सता म्हारीण ते सरीता आठवले एक दहा अकरा वर्षाचा प्रवास.डोळे मिटून घेतले आणि ती हळूच इंचगिरीच्या मठात पोहचली.
आई आणि बाप म्हणजे काय असतात हे कळायच्या आधीच ते गेले होते. तिला आठवत होता तो फक्त आजीचा खरखरीत हात. जुन्या लुगड्याच्या पदराचा वास आणि वैशाखातलं उन.इंचगिरीच्या मठाची आठवण उन्हं चढली की होतेच होते. निंबाळच्या जवळचं एक छोटं गाव. खूप सारी चिंचेची झाडं.जुना मठ. दिवसातून पाच वेळा आरतीचा घंटानाद. दुपारी आणि रात्रीची जेवायची सोय.अना म्हारीणीची नात एव्हढीच तिची ओळख.अना म्हारीण ही मात्र फार मोठी ओळख होती. वैशाखी पौर्णीमेला आख्खा गाव पाया पडायला धावायचा.एरवी दिवसभर मठाचं अंगण झाडणारी म्हारीण त्या दिवशीचं दैवत . फार फार वर्षापूर्वी अंबुराज महाराज कर्नाटकाच्या सिमेवरून भरकटत इंचगिरीला आले.योगाच्या कुठल्यातरी वाटेवर ओळख -खूण हरवली आणि आता जिथे मठ आहे तिथे भ्रांत विसरून बेहोश पडले.तापलेली धूळ आणि वैशाखाचं उन.म्हारीण दूरून पहात होती. महाराजांना पाहून तिला कळलं की हा ब्राह्मण आहे.शिवणार कसं.गाव चार कोसावर.बोंब उठवली तरी गाव जमा होईस्तो ब्राह्मण तडफडून मरेल.तोळामासा शरीर.म्हारीणीनी धैर्य एकवटलं. महाराजांच्या गळ्यातलं जानवं तोडून दूर फेकून दिलं .घोंगडीवर ढकलून ओढत ओढत बावडीजवळ नेलं.दगडाच्या आधारानी बसवून चार घागरी पाणी ओतलं.दोन घटकांनतर महाराज देहभानावर आले पण ओळख विसरले होते. परत शुद्ध हरपून पडले.संध्याकाळी शेरडं गोळा करून म्हारीण घरी निघाली. करावं काय. ब्राह्मण तर बेहोश.शेरडं मोकळी सोडावी तर लांडग्यांची धन.महाराजांना घोंगडीत गुंडाळून अना म्हारीण घराकडं गेली. रात्री महाराज स्वप्नात आले. म्हणाले आई पोराला रानात सोडून आलीस होय? भुकेची वेळ झाली माझी. अना शेरडाचं दूध आणि चार भाकरतुकडे घेऊन रानात धावली.बघते तो काय महाराज पद्मासन घालून ध्यानमग्न. पहाटे चंद्र मावळतीला आला तेव्हा महाराज जागे झाले म्हणाले आई, फार वाट बघायला लावलीस.म्हारणीनी आईच्या मायेनी महाराजांना दूध भाकरीचा कुस्करा भरवला.लोटीभर पाणी पिऊन महाराजांनी तृप्तीचा ढेकर दिला तेव्हा सकाळ झाली होती. लिंगायतांची चार माणसं वाटेवर बघून म्हारणीनी बोंब मारली म्हणाली सांभाळा आपल्या देवाला.
महाराज तिथेच राहीले. इंचगीरीच्या लिंगायत आणि ब्राह्मणांची भांडणं संपली ती महाराजांच्या मठात. अना म्हारीणीला पहिला गुरुपदेश दिला.

सिग्नलला बस थांबली आणि सरीता परत वर्तमानात आली.मग दादांची आठवण आली. दादा मठाचे ट्रस्टी. अना म्हारीण गेली तेव्हा सरीता तेरा वर्षाची. दादा प्रेमळ माणूस. त्यांच घराणं इंचगीरीच्या इनामदाराचं. मुंबईत ब्याडगी मिरचीचा पुरवठा करायचे.वरळीला म्युनसीपालटीच्या बराकीत एक छोटी रुम घेउन रहायचे. त्यांनी सरीताची जबाबदारी घेतली. विजापूरच्या वसतीगृहात सरीताची रवानगी झाली.घरी काकूंचं सोवळं ओवळं फार.मूलबाळ नाही. पोटात माया पण नाही.मॅट्रीक झाल्यावर पंचाईत. वसतीगृह सोडावं लागलं. सरीता परत मठात. चार पाच महिन्यानी ट्रस्टींनी दादांना तार केली.म्हारणीच्या पोरीची व्यवस्था करा. गावातून विरोध होतो आहे.आश्रमाच्या भक्तात दुफळी माजली.दादा घरी पण ठेवू शकत नव्हते. मग डॉ़क्टर बागलवाडींनी चिठ्ठी दिली. केईएमच्या शिकाऊ नर्समध्ये भरती झाली. दादा थकले .त्यातच काकू पण गेल्या. शेवटची सहा वर्षं दादांची सांभाळण्यात गेली.पुतणे गावाहून आले. त्यांच्या डोक्यात भिती.म्हारणीची पोर दादांच्या हिश्यावर हक्क मागते का काय.? दादांनी हिस्सा सोडला. जाण्यापूर्वी तीन वर्ष सरीताला दत्तक घेतलं.म्युनीसीपालटीची जागा नावावर केली. सता म्हारणीची सरीता गोपाळ कुळकर्णी झाली.
पोद्दार.. पोद्दार.. कंडक्टरचा आवाज आला. सरीता उतरली.
नाईटची झोप आणि पोटात भुकेचं थैमान.कधी घरी पोहचते असं झालं होतं. सिग्नलला रस्ता पार करताना बाजूच्या माणसाकडे लक्ष गेलं. रात्री ऍडमीट झालेल्या पेशंटचा आगाऊ बोलणारा नातेवाईक तिच्या बरोबरीनी चालत होता.

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

रामदास's picture

20 Aug 2008 - 9:00 pm | रामदास

ही गोष्ट थोडी संथ वाटण्याची शक्यता आहे. गोष्टीची माझ्या मनातली व्याप्ती नेहेमीपेक्षा मोठी आहे. वैज्ञानीक कल्पनेचा आधार घेऊन ललीत कथेचा बाज सांभाळणं तारेवरची कसरत होते आहे. संभाळून घ्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

20 Aug 2008 - 9:28 pm | डॉ.प्रसाद दाढे

हॉस्पिटलमधली वातावरणनिर्मिती नेहमीसारखीच लाजवाब! पुढच्या भागाची आतुरतेने प्रतिक्षा करतोय.. लवकर लिहा.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Aug 2008 - 11:35 pm | बिपिन कार्यकर्ते

+१...

प्राजु's picture

21 Aug 2008 - 1:11 am | प्राजु

लवकर लिहा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

21 Aug 2008 - 5:15 pm | मदनबाण

काका लिहा लवकर..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

आनंदयात्री's picture

21 Aug 2008 - 11:03 am | आनंदयात्री

वाचतांना गुंग झालो काका.
तुम्ही बाकी काही विचार करु नका लिहा फक्त.

>>रात्री ऍडमीट झालेल्या पेशंटचा आगाऊ बोलणारा नातेवाईक तिच्या बरोबरीनी चालत होता.

म्हणजे घंटी वाजवुन हिप्नोटाइझ करणारा का ?

नाही. दुसरा ज्याला सिनीअरनी गप्प केला तो.

आनंदयात्री's picture

21 Aug 2008 - 12:34 pm | आनंदयात्री

अच्छा .. अच्छा .. धन्यवाद.
अगोचर पार्ट वन - टू चे दुसर्‍यांदा वाचन केले, बारकावे अजुन जास्त समजले.

धन्यवाद.

(मंदबुद्धी) आनंदयात्री

विसोबा खेचर's picture

21 Aug 2008 - 5:08 pm | विसोबा खेचर

वाचतांना गुंग झालो काका.
तुम्ही बाकी काही विचार करु नका लिहा फक्त.

सहमत आहे....!

तात्या.

ऋचा's picture

21 Aug 2008 - 11:45 am | ऋचा

वाचताना गुंग झाले.
मस्त लिहिलय काका.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"