ऑक्टोबर २०१४ ची गोष्ट आहे, माझ्या कंपनीमधे ज्युनिअर इंजिनिअर (१ ते ३ वर्षं अनुभवी लोकांसाठी) लेव्हल साठी इंटर्व्यु होते. माझ्याही विभागासाठी ही भरती असल्यामुळे मी, माझे बॉस आणि एच.आर. असे इंटर्व्ह्यु घ्यायला बसलो होतो. ज्युनिअर लेव्हलची भरती असल्यानी पगाराची रेंज ठरलेली होती (१२,५०० ते १७,५०० रुपये). ६ उमेदवार आलेले होते. एकेकाची टेक्निकल मुलाखत वगैरे घेउन मग एच.आर. पगाराचा आकडा त्यांच्या आधीच्या सॅलरी स्लीप पाहुन आणि एकुण मुलाखतीवरुन "निगोशिएट" करत होती. ज्यांना जमत होतं त्यांना बाहेर बसायला सांगीतलेलं होतं.
३ र्या किंवा ४थ्या उमेदवाराच्या मुलाखतीचा हा एक लक्षात रहाणारा अनुभव.
उमेदवार टेक्निकल प्रश्णांना अगदी चांगल्या प्रकारे उत्तरं देत होता. २ वर्षं ८ महिन्यांचा एका मध्यम पातळी वर्कशॉपमधल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर इथे मुलाखत द्यायला आलेला होता. आणि त्यानी स्वतः हात काळे केलेले आहेत शॉप फ्लोअर वर हे अगदी स्पष्ट दिसुन येत होतं. शिवाय डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग दोन्हीकडे मार्क्सही चांगले होते. एकुण मला आणि माझ्या बॉसला हा उमेदवार अगदी पसंत होता.
आधीच्या वर्कशॉपमधे त्याला १४-१५ हजार पगार असेल. आमच्या एच.आर. नी काय करावं? ह्या लायक उमेदवाराला १२,५०० रुपयाची ऑफर दिली. त्या उमेदवारानी अगदी शांतपणे एच.आर. शी निगोशिएट करायला सुरुवात केली. त्याची अपेक्षा १८,००० रुपये होती. एच.आर. नी त्याला चक्क नाही म्हणुन उत्तर दिलं. आता ही गोष्ट आमच्या अधिकार क्षेत्रात येतं नसल्यानी आम्ही तेव्हा काहीही बोलु शकलो नाही.
त्या उमेदवारानी दोन मिनिट बोलायची परवानगी मागीतली. तो जे दोन मिनिटात बोल्लाय ना ते शब्द आजही माझ्या डोक्यात अगदी व्यवस्थित आहेत.
"सर आणि मॅडम, मी जवळजवळ तीन वर्षांच्या अनुभव असुनही फक्त १८,००० रुपये मागतोय. हे का? कारण मला ह्या नोकरीची आत्यंतिक गरज आहे. एवढ्या अनुभवावर मी योग्य संधीची वाट पाहिली तर मला कोणीही हसत हसत ३०,००० पगार देईल (खरी गोष्ट आहे). तुम्ही जो पगाराचा आकडा सांगताय ना, त्यापेक्षा १२ वी नंतर कॉल सेंटरला काम करणारी मुलं सुद्धा जास्त पैसे कमवतात. रिक्षा चालवली ना महिनाभर तरी जास्तं पैसे मिळतात. मुंबईमधे काही भिकारीसुद्धा भिक मागुन ह्यापेक्षा जास्त पैसे कमवतात. मी एक इंजिनिअर असुनही तुम्हाला मला द्यायला ५०० रुपये जड वाटतायतं.
मी ओपन क्लास्मधुन वर्षाला ९५,००० रुपये एवढी फी भरुन इंजिनिअर झालोय, ते पण शैक्षणिक कर्ज काढुन, त्याचे हफ्ते जाउन तुम्ही देताय त्या पगारात घरी काय देउ? ४ वर्षाची जवळ जवळ ४ लाख रुपये फीचं तुमच्या तुटपुंज्या पगारामधे कधी ब्रेक-इव्हन होईल? मला ह्या कंपनीमधे आता दिलीत तरी नोकरी नको" बस्स एवढं बोलुन सरळ बाहेर निघुन गेला.
तसं पहायला गेलं तर त्या मुलाची काहीचं चुक नाहिये ह्यात. भरम्साठ फिया भरुन इंजिनिअर होऊन सुद्धा किरकोळ पगाराच्या नोकर्या आणि रोज १२-१२, १४-१४ तास राबवुन घेणं हेचं माझ्या क्षेत्राचं आर्थिक गणित झालयं. स्वस्त ते मस्त अशीचं बहुतेक कंपन्यांची कॉस्ट कटिंगच्या नावाखाली पॉलिसी झालीये. ह्या भोसडीच्यांना दर वर्षीच्या ऑडीटमधे आम्ही ह्यावर्षी अमुक अमुक एवढे लाख वाचवले हे बोंबलुन सांगायला फार आनंद होतो. स्वतः ७-७ आकडी पगार ज्यांच्या जीवावर मिळतात ना त्यांचचं शोषणं होतय हे तर. बर एवढी कॉस्ट कटींग करुन सुद्धा त्यांना मिळायचं तेवढचं इन्क्रीमेंट कंपनी देते. ह्यात लायक उमेदवार मात्र भरडले जातायत. मला सांगायला खरचं मनापासुन वाईट वाटतय की माझ्या उमेदवारीच्या दिवसांमधे मीही ह्याला तोंड दिलयं. त्यावेळी मी उपेक्षित होतो आणि कदाचित आता जाणते-अजाणतेपणी उपेक्षा करणारा.
*unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz:
आज असाचं एक अनुभव ऐकला आणि एकदम ही गोष्ट आठवली आणि इथे लिहाविशी वाटली. विस्कळीत आहे, पण घ्या चालवुन.
प्रतिक्रिया
12 Feb 2015 - 9:42 am | आदूबाळ
जबरी. कंपनी आणि पात्रांचा अंदाज आला...
12 Feb 2015 - 10:57 am | पेट थेरपी
माझे एच आर समोर दिव्याच्या झोतात बिचकलेल्या प्राण्यासारखे होते. फायरिन्गचा धागाही चांगला आहे.
12 Feb 2015 - 12:09 pm | विजुभाऊ
पुण्यातल्या एका कम्पनीने दिलेली ऑफर मी जोइनिंगच्या अगोदर दीड महिना असताना ईमेल पाठवून तुमच्या येथे जॉईन करु शकत नाही. अशी मेल पाठवली.
एच आर ने मला हे माझे अनप्रोफेस्शनल वर्तणूक आहे. तुमचे नाव आम्ही काळ्या यादीत टाकू. तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळेलच.( व्हॉट गोज आउट...कम्स इन) असल्या प्रकारचे उत्तर ईमेल वर दिले.
धन्य ती कम्पनी..............
12 Feb 2015 - 8:22 pm | सुबोध खरे
विटेकर साहेब
अशा एच आर च्या माणसाला त्याचीच ई मेल पूर्ण सभ्यपणे मी त्या कंपनीच्या अध्यक्षाकडे पाठवून (आणी त्या एच आर वाल्याला त्याची कॉपी पाठवून) अद्दल घडवून दिली असती. वर त्या वरिष्ठाला आपला एच आर चा माणूस काय करीत आहे त्याची संपूर्ण कल्पना दिली असती. ई मेल तुमच्याकडे असते तेंव्हा तुम्ही शेर असता. अशी कागदी लढाई मी बरीच खेळलो आहे.
14 Feb 2015 - 8:49 am | वामन देशमुख
या चर्चेवरून, एचआर मुलाखतीतला बराचसा फोलपणा दाखवणारा हा विडिओ आठवला.
https://www.youtube.com/watch?v=b56eAUCTLok
14 Feb 2015 - 9:29 am | श्रीरंग_जोशी
आजच्या काळात एका अभियंत्याला एका महागड्या शहरात एवढासा पगार देणे म्हणजे केवळ शोषण.
पुण्यासारख्या महागड्या शहरात पहिल्या नोकरीच्या वेळी जुजबी पगारात बस्तान बसवताना आर्थिक अग्निदिव्यातून गेलो असल्याने या लेखात मांडलेल्या भावनांना चांगलंच समजू शकतो.
कुठलेही क्षेत्र घ्या भारतामध्ये अशी उदाहरणे न दिसणे म्हणजे अपवादच.
माझ्या निरीक्षणानुसार याच्या पूर्णपणे विरुद्ध चित्र अमेरिकेत दिसते. मा तं क्षेत्रात नव्या अभियंत्याला जेवढा पगार मिळतो बरेचदा त्याच्या पाच सहा पट पगार त्याच्यापेक्षा दहा बारा वर्षांनी ज्येष्ठ असणार्या त्याच्या मॅनेजरला मिळतो . याउलट अमेरिकेत हेच प्रमाण केवळ दीडपट असते. म्हणजे अनुभवी लोकांना कमी पगार नसून नव्या लोकांना संतुलितपणे जगता येण्यासारखा पगार असे आहे.
हा विषय येथे मांडल्यामुळे अनेक प्रतिसादकांनी विषयावर मोलाचे विचार व्यक्त केले आहेत. धागाकर्त्याला व प्रतिसादकांना अनेक धन्यवाद.
14 Feb 2015 - 9:31 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
धन्यवाद :)...
हेचं मांडायला आलो होतो. तुम्ही जास्तं चांगल्या शब्दात मांडलतं.
25 Feb 2015 - 8:40 pm | आनन्दा
भारत आणि आम्रविकेत थोडा फरक पण आहे. आपल्या इथे जेव्हा फ्रेशर जॉईन होतो, तेव्हा त्याला अगदी हाताला धरून सगळे शिकवावे लागते. सो ८+ १०+ म्हणजे अनुभव आणि स्किल् दोन्हीमध्ये मोठा फरक असतो.
तिथे स्किलमध्ये तेव्हढा फरक नसतो, अनुभव मात्र असतो.
26 Feb 2015 - 1:13 am | श्रीरंग_जोशी
माझा अनुभव (पहिली साडेतीन वर्षे भारतात, मग अमेरिकेत) मा. तं. क्षेत्रातील सर्विस कंपन्यांचा आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुरू असतानाच जरा तपशीलवार शिकवले गेले. तेवढे सोडल्यास केवळ नवे आहेत म्हणून काही कमी अपेक्षा वगैरे काही नव्हते. हेच चित्र मी इतरांबरोबरही पाहिले. बिलिंग रेट वगैरे तेवढाच होता जेवढा अनुभवी लोकांचा होता.
अमेरिकेत फ्रेशर्सबरोबर काम करण्याचा फारसा अनुभव नाही. इथे एम एस केलेल्या अनेक भारतीय (अनुभवी) लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत माझ्या कंपनीसाठी. इथे एम एस केले आहे म्हणून काही खूप फरक पडला आहे असे काही दिसले नाही.
या क्षेत्राची व्याप्ती खूपच मोठी असल्याने प्रत्येकाची निरीक्षणे वेगळी किंचित प्रसंगी परस्परविरोधी असू शकतात.
26 Feb 2015 - 11:35 am | टवाळ कार्टा
आता एम एस सुध्धा भारतातल्या ईंजिनीअरींगच्या स्टाईलने करतात म्हणे...सगळ्याच ठिकाणी नाही पण बर्यापैकी ठिकाणी
26 Feb 2015 - 12:42 am | सांगलीचा भडंग
सुंदर विषय आणि प्रतिसाद पण . एखादा एचआर स्वत मुलाखत देताना कसा देत असेल आणि पगाराची घासाघीस कशी करत असेल काय माहित .इथे एचआर मधले कोणीच दिसत नाही बहुतेक
10 Oct 2015 - 10:44 pm | बोका-ए-आझम
टेलिव्हिजन आणि शिक्षणक्षेत्रातले अनुभव आठवले. दोन्हीकडे एच आर असा कुणीच नव्हता. आत्ता ज्या कंपनीत आहे, तिथे आहे पण Teaching Staff recruitment करताना ते त्या विभागाच्या प्रमुखाचं मत विचारतात आणि शक्यतो सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करतात. टेलिव्हिजनमध्ये आता कंपन्या यायला लागल्या - प्राॅडक्शनमध्ये सुद्धा - त्यामुळे HR वगैरे प्रकार आले आहेत. पूर्वी Channels मध्येच HR असायचे पण तेही Creative Department च्या लोकांचं मत विचारायचे. प्रत्येक कार्यक्षेत्र वेगळं आहे त्यामुळे IT मधले HR आणि Television किंवा Media क्षेत्रातली HR ची भूमिका यात फरक हा असणारच!
11 Oct 2015 - 12:00 am | हेमंत लाटकर
एच आर म्हणजे घासाघीस करणारा कंपनीचा कोल्हा!
11 Oct 2015 - 10:08 am | हेमंत लाटकर
campus interview मध्ये लाखो रूपयाचे पॅकेज देतात हे कसे.
18 Oct 2015 - 10:28 am | पाटीलअमित
ते वर्षाला असते ,त्यात variable पण असते
11 Oct 2015 - 2:05 pm | dadadarekar
खाजगी हॉस्पिटलातही आजकाल एम बी बी एस , बी ए एम एस व होमिओपथी डॉक्टराना खूप कमी पगार देतात. पुढचा रिलिवर आल्याशिवाय याना घरी जाता येत नाही. पगारात एक भाग इन्सेन्टिव म्हणुन असतो. तॉ कधीच पूर्ण मिळत नाही.
17 Oct 2015 - 11:04 pm | नमकिन
17 Oct 2015 - 11:08 pm | नमकिन
17 Oct 2015 - 11:13 pm | नमकिन
18 Oct 2015 - 7:20 am | नमकिन
19 Oct 2015 - 9:15 am | नमकिन