.......................................................................................................................................
खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात. अश्या सर्व प्रश्नकर्त्यांना हा विषय नीट माहिती व्हावा,एव्हढ्याच हेतूने हा सदर लेख येथे देत आहे.
@संथा देणे म्हणजे काय? >> संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी , समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण)पाडून ,वदवून आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला, संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.
१) चरणाची संथा(४वेळा) २) अर्धनीची संथा(४वेळा) ३) ऋचेची संथा(४वेळा) ४) गुंडिकेची संथा(४वेळा) = एकंदर १६ संथा.
१)चरणाची संथा:- चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी पोथित बघून तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात शुद्धअक्षर,जोडाक्षर,त्याचे गुरुत्व,अनुस्वारांचे उच्चार,स्वराघात,र्हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-अश्या काना ,मात्रा,वेलांट्या,उकार, विसर्ग आणि त्यांचे तसेच उच्चार ,हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट,नंतर पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं... ही झाली "चरणाची" पहिली संथा. अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते. (कारण तेच-मंत्रात अजिबात अशुद्धी राहू नये.)
२)अर्धनीची संथा:- अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः दोन चरण एकत्र घेऊन..किंवा मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. (काहि वेळा जगतिच्छंदा सारखा,मंत्राचा लांबलचक छंद असेल,तर एका ओळीत ४/४ किंवा अगदी ६/६ चरणंही पाडावे लागतात) आधी चरण डोक्यात-बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर नसले,तरी चालते. तर.. ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला... की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.
३)ऋचेची संथा:- ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण(धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण त्यात घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) ऋचे'तल्या या (पहिल्या)संथेवर,शिकविणार्या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः- अशुद्धी आली कींवा मधे कुठे तयार झालेली आहे काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.
४) गुंडीकेची संथा:-..हा शेवटचा, परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७/७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.. अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्या किंवा तिसर्या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी-नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.
आता आपण याचे-संकलित..,एका स्तोत्रपाठांतराच्या उदाहरणाद्वारे पाहुया. (हे आणखि डिटेलिंग,विशिष्ट हेतूनी आणि जाणिवपूर्वक करत आहे.)
चरणाची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं,(७वेळा) गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यं, (७वेळा)आयुःकामार्थसिद्धये॥(७वेळा)
प्रथमं वक्रतुण्डं च,(७वेळा) एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं,(७वेळा)गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
असेच प्रत्येक चरण म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे चरणाची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की चरणाची मुख्य संथा पूर्ण होते.
अर्धनिची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥(७वेळा) ॥
प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
अशीच प्रत्येक अर्धनि/अर्धी ओळ म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे अर्धनिची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की अर्धनिची मुख्य संथा पूर्ण होते.
ऋचेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥..प्रथमं वक्रतुण्डं च(७वेळा)
प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ लम्बोदरं पञ्चमं च(७वेळा).....
अशीच प्रत्येक ऋचा ,पुढल्या ऋचेचा पहिला चरण तिच्यात लावुन म्हणत स्तोत्र एकेक ऋचेनी म्हणत पूर्ण घोकायचे असते..मग येथे ऋचेची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की ऋचेची मुख्य संथा पूर्ण होते.
गुंडिकेची म्हणायची संथा:-
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ (सुरवात ते शेवट -७वेळा..)
.....असेच सुरवात ते शेवट -७वेळा.. म्हटले,की मग येथे गुंडिकेची एक संथा पूर्ण होते.अश्याच प्रकारे अजुन तिन संथा म्हटल्या,की गुंडिकेची मुख्य संथा पूर्ण होते.
आता आपल्याला आवश्यमेव असा एक प्रश्न पडेल,की "(बुद्धिचा..)इतका बारीक किस पाडून, ही पाठांतर पद्धती तयार होण्या/करण्यामागचे प्रयोजन काय बरे असावे???" :)
उत्तरः- ज्या काळात ही पद्धती आली/विकसीत झाली.तो काळ लेखनकलेची सुरवातहि न झालेला असा काळ होता. अश्या वेळी आपल्या जिवापाड जपाव्याश्या वाटणार्या गोष्टींपैकी, ही मंत्र /काव्य/स्तोत्र जतनाची एक गोष्ट होती. आणि याशिवायंही ,पुढे लेखनकला विकसीत झाल्यावर..जो विषय वारंवार म्हणावा,वापरावा लागणार आहे..त्यासाठी भल्यामोठ्ठ्या पोथ्यांची बाडे बरोबर घेऊन हिंडणे.हे ऋषीमुनिंपासून ते सामन्यजनांपर्यंत सर्वांनाच त्याकाळी सोपे नव्हते. त्याशिवाय पोथ्या पाण्यानि/आगिमुळे,वाळवी/कसर लागण्यापुळे खराब होणे अशिही कारणे होतिच. आणखि म्हणजे, परस्पर विरोधीमतांच्या गटांनी एकमेकाचे लिखित स्वरुपातिल वांङगमय नष्ट करणे,हे ही एक प्रबळ कारण त्याकाळी होतेच...या अश्या सर्व कारणांसाठी हे ज्ञान मुखोद्गत-पाठ ठेवावे लागले असेल.(आमच्याकडला अचुक शब्द म्हणजे-जिवंत ठेवावे लागले असेल.) आणि विशेषतः जर ते जसे च्या तसे पाठ ठेवावे लागले असेल,तर त्याला अशीच तंतोतंत शब्दपाठांतराची पद्धती असायला हवी होती. आणि म्हणुन तसे जर का एकदा पाठ झाले,आणि त्याच्या वारंवार आवृत्या* म्हणुन पाठ ठेवलेही गेले, तर वरिल कारणांनी येणारे नष्टतेचे भय बाळगावे लागत नाही, हे तर निश्चित आहे. (आज आपण हे आपल्याला हव्या त्या सर्व विषयांसाठि, हजारो प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या साधनांनि करतच असतो. :) )
आता जसेच्या तसे...म्हणजे काय हो नक्की? तर खाली दिलेले हे गणपतिस्तोत्र पहात पहात ह्या लिंकवर http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 जाऊन हे क्लिपिंग ऐका. जेणेकरुन ह्या पद्धतिनी पाठ केले असता,जसेच्या तसे मेंदुत उमटते..म्हणजे काय होते? ते कळणे सहज होइल :)
(गायकबियक कुणी नाही.. मीच आमच्या(उच्चार)पद्धतिनी म्हटलेलं आहे हां! ;) )
http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥
.........................................................................................................................
आवृत्ति*:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय/अध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत-ठेवावा लागतो. नाहितर आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. म्हणजे अक्षरशः पुन्हा संथा-घेऊन शिकण्याच्या पातळीवर येतो. आणि असंही हे सोपं काम नसतच. नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन वर्षानी समांतर होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष(फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत, अध्ययन करावे लागते..एका वेदाच्या दशग्रंथांच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास.. इथून सुरवात होऊन..शेवटच्या वर्षाला हा शिक्षण कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी किमान १२ वर्षे आहे.
पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय? तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते? तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे, हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात सुमारे आडिचशे संचार आहेत. बरं.., हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय? आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच ओळिवर विशिष्ट शब्दावर (आता) मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा. एके ठिकाणी "शुंभमान ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे , "शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्या प्रकाराला म्हणतात, संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्चुतः.. हा शब्दाचा संचार झाला.हा ही सहज लक्षात रहातो. पण अनुस्वारांचे संचार म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा - पवतामांतरिक्षा आणि पवंतामांतरिक्षा - या शब्दातल्या दुसर्या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे. मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना, रोज २ अथवा ३ संचार-जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि काही नाही! )
आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातला हा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..?ते पहा...
(रुद्रामधे, आकरा नमका'चे आणि आकरा चमका'चे असे एकंदर २२अनुवाक आहेत.)
यातल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनुरघोरा पापकाशिनी। आणि पुढची (वेगळी)ओळः- तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥
आता इथून सरळ नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु:शिवाविश्वा हभेषजी। आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥
आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥
.., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही तो येणार.म्हणजे - संचार जाणार!
आणि कित्तीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस असला , तरी संपूर्ण एका वेदातले असे हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम.. मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडवं आलं, तरी त्याला नीट उभं करता येतं. (याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! ) अर्थात, ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता, त्या अतीप्राचीन (लेखनकलेची सुरवातही न झालेल्या) कालखंडात अश्या तर्हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं, हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगतच म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि यापुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो.
आज या निमित्तानी हा (पाठांतराचा) छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान दोन कारणानी आहे.
१) वेदज्ञान.., हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/अनुपयोगी .. उपकारक/अनुपकारक..असं कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. :) ) याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना.. किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल...
२)कुणितरी मनापासून शंका विचारल्या शिवाय, हे असल्या पद्धतीचं लेखन माझ्या हातून(कधिही) होत नाही..ते आज झालं.
(या बद्दल आपले मिपाकर आदूबाळ यांचे मनःपूर्वक आभार. :) )
===================================================
प्रतिक्रिया
15 Mar 2015 - 7:21 pm | माहितगार
+१ :)
30 Mar 2015 - 11:35 am | बॅटमॅन
=))
16 Mar 2015 - 4:12 pm | कपिलमुनी
फारिनहून बालिष्टर आणून नाय तुझी धिंड काढली तर नावाचा आत्मू बुवा नाही !
:)
15 Mar 2015 - 8:58 pm | सुबोध खरे
गुरुजी
एक लिखाण चोरले. पण तुमची प्रतिभा/ ज्ञान तर नाही ना चोरता येणार.
उगाच वार्याशी भांडून फार काही फायदा होणार नाही असे वाटते. एक मुद्दा सिद्ध होईल. पण परांजप्याच्या मागे लागण्यात तुमची मनः शांती मात्र हरवून बसाल
तेंव्हा गच्छ सूकर भद्रं ते भवतु म्हणून सोडून द्या.
15 Mar 2015 - 9:07 pm | माहितगार
आज सकाळी अत्रुप्त यांनी मिपावर प्रताधिकार उल्लंघना बद्दल चिंता व्यक्त केली आणि दुसरी कडे सर्व मिपा सदस्यांच्या विनंतीस मान ठेऊन मराठी विकिपीडियावर सदर लेख माहिती वाढवून चिटकवला यात प्रताधिकारा संबंधीच्या त्यांच्या भूमीकेत स्पष्टता येण्यास त्यांना कालावधी मिळावा तसेच तसेही लेख सध्या ज्ञानकोशीय शैलीत नसल्या मुळे आधी मजकुर झाकला नंतर लेख पान मराठी विकिपीडियावरून तात्पुरते वगळले. (त्यामुळे ते सध्या मराठी विकिपीडियावर पाहण्यास लगेच उपलब्ध नाही.)
इन एनी केस समजा अत्रुप्त मराठी विकिपीडियास लेख जसाच्या तसा घ्या म्हणाले तरी तो सध्याच्या स्थितीत ज्ञानकोशीय लेखन शैलीत बसण्यास अडचणी येतात. अर्थात लेखन शैलीवरून नवागत लेखकांना मराठी विकिपीडियावर सहसा लगेच जाच केला जात नाही. नवागत सदस्य काळाच्या ओघात रुळेल, अथवा इतर अनुभवी सदस्य काळाच्या ओघात बदल करतील अशी अपेक्षा ठेवली जाते.
समजा अत्रुप्त यांनी लेख प्रताधिकारीत आहे मी देणार नाही म्हणाले तरीही मराठी विकिपीडिया समोर खूप मोठी अडचण वस्तुतः नसते. कारण कॉपीराईट लेखन शैलीवर वगैरे लागतो मुख्य म्हणजे त्यातील फॅक्ट्स वर लागत नाही. ती माहिती मी माझ्या शब्दात लिहिले कि पुरेसे असते. ज्ञानकोशास अनुकुल नसलेली शब्द योजना वजा केली की ज्ञानकोशीय लेखकाचे बरेचसे काम सोपे होऊ शकते. (अर्थात स्वतःच्या शब्दात लिहिण्यास तेवढेच पुरेसे नाही, पण मुख्य म्हणजे मूळ लेखकाचा संदर्भ तरीही -स्वतःच्या- शब्दात लिहूनही देणे अभिप्रेत असतेच)
ज्ञानकोशास अनुकुल नसलेली शब्द योजना आणि शैली शोधण्यासाठी मी मराठी विकिपीडियावर काही संपादन गाळण्या लावल्या आहेत. त्या संपादकांना कोणताही व्यत्यय न आणता ज्ञानकोशास अनुकूल नसलेली लेखन शैली टिपत राहतात. तसे या संपादन गाळण्यांनी अत्रुप्त यांच्या आज सकाळच्या मराठी विकिपीडियावरील लेख संपादना बाबत काम चोखपणे केले.
बर्याच जणांच्या लेखनात वृत्तपत्रीय वार्तांकन शैली, किंवा प्रत्येक गोष्ट अख्ख्या विश्वात एकमेवाद्वितीय आहे असे आग्रही प्रतिपादन असते अशा जवळपास अर्धाडझन प्रकारच्या उणीवांपासून अत्रुप्त यांचे लेखन दूर आहे तरीही इतर काही संपादन गाळण्यांनी त्यांचे लेखन वर म्हटल्या प्रमाणे चोखपणे टिपले.
* 'अगदी' या शब्दाचा लेखनातील उपयोग बर्याचदा लक्षवेधी/आलंकारीक लेखन अथवा सोबत इतर विशेषणांची शक्यता दर्शवतो. अत्रुप्त यांच्या या लेखातील उदाहरण पहा " .., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही संचार जाणार! "
* 'आणि मग' या शब्दांचा उपयोग अविश्वकोशीय कथा कथन अथवा कथा लेखनाची शक्यता सुचवतो. तर, "काय, मग आणि इथे" - हे शब्द योजना सहसा वाचकाशी थेट संवाद सुचवते. ज्ञानकोश म्हणून मराठी विकिपीडियातील लेखन सहसा प्रथम अथवा द्वितीय पुरुषी होणे अभिप्रेत नसते ते तृतीय पुरुषी असणे अभिप्रेत असते. सोबतच "आपल्या" शब्दाचा लेखनातील उपयोग प्रथम अथवा द्वितीय पुरुषी असतो सोबतच "आपल्या" या शब्दासोबत सोबतच्या मजकुरात बर्याचदा अविश्वकोशीय वर्णनात्मक शैली आढळते असा अनुभव आहे.
ललित लेखन शैली अथवा ललितेतर लेखन शैली या लिहिण्याच्या सवयीतून आणि माध्यमाच्या प्रभावाने तयार होतात. लेखन शैलीत अचानक बदल करणे शक्य नसते हे खरे, पण नेमक्या फरकांची कल्पना असेल तर ललित लेखन शैलीत आधी लेखन करून नंतर कात्री लावणे कदाचित सोपे असू शकेल की ज्यामुळे तुमच्या ललित लेखन शैलीची सवय सुटण्याचा प्रश्न राहणार नाही.
ज्ञानकोशात वर्णनात्मक लेखन केले गेल्यास ज्ञानकोशीय माहितीस बर्याच मर्यादा येतात. मुख्य म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती देण्या अथवा शोधण्यापेक्षा माहिती नसेल तर वर्णनात्मकतेने अथवा विशेषणांनी भरली जाते. दुसरेतर ज्याच्याकडे आतापर्यंत ज्ञानकोशीय लेखात नसलेली अशी माहिती आहे त्याला ती माहिती त्या लेखात कुठे आणि कशी जोडावी असा प्रश्न पडतो. विशेषतः विकिपीडियासारख्या एकाच लेखात अनेक जण लेखन करणार्या प्रकल्पात एका पेक्षा अधिक लोक त्यांच्या त्यांच्या ललित लेखन शैलीतून एकत्र लेखन करू शकतील हे कमी संभवते. म्हणून आलंकारीकता लक्षवेधी उद्देशाने लेखन इत्यादीला कात्री लावणे भाग पडते.
विकिपीडियात ललित लेखन/वर्णनात्मक शैलीस टिपणारी संपादन गाळणीतर केव्हाही लावता येते पण लेखनशैलीतील बदल आणि कात्री लावणे या गोष्टी मॅन्यूअलीच कराव्या लागतात. या प्रतिसादात दिलेल्या शब्द प्रयोगांसोबत येणार्या वाक्यरचनांना कात्री लावून अथवा बदलून ललितेतर किंवा ज्ञानकोशीय लेखन शैलीत बदल करून कुणी या निमीत्ताने प्रयोग करून पाहील्यास या फरकांची सर्वांनाच जाणीव होईल. या सर्व प्रयत्न सुरवातीस कृत्रिम वाटण्याचा संभव आहे परंतु ललित लेखनावर कॉपीराईट तसाच ठेऊन ललितेतर लेखन करणे आणि जमल्यास विकिपीडियासारख्या ज्ञानकोशात भरणे सोपे जाते.
उपरोक्त नमुद केलेले शब्द आणि त्यांसोबतच्या मजकुराचे ज्ञानकोशीय शैलीस अनुकूल नसणे हे अनुकूल नसलेल्या असंख्य संपादनांना तपासून मी शोधण्याचा प्रयत्न केला आहे तरीही माझ्या या प्रयत्नांना मर्यादा आहेत त्यामुळे या संदर्भाने कुणी काही सुचवल्यास स्वागत असेल.
15 Mar 2015 - 11:32 pm | माहितगार
दाते कर्वे यांच्या महाराष्ट्र शब्दकोशात संथा या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतातून सम् + स्था अशी दिली आहे. रोजचा अध्ययन करावयाचा थोडा थोडा भाग या सोबतच घोकंपट्टी पाठांतर हे अर्थ दिले आहेत. वक्ता सभास्थानी उभा टाकला की तो आपल्या संथेस आरंभ करतो असे वाक्यात उदाहरणही यात आहे (सौजन्य : ट्रांसलिटरल डॉट कॉम पूर्वाश्रमीचे खाप्रे डॉट ऑर्ग) मोल्सवर्थही तशाच प्रकारच्या अर्थाची संस्था S) Reading and conning in order to commit to memory. v घे, दे, हो, म्हण. 2 The portion to be read and conned, a lesson. अशी नोंद करते. संस्था या शब्दाचे हिंदीत बरेच सारे अर्थ दिसतात त्यात एक यज्ञ का मुख्य अंग असाही दिला आहे. पुस्तक डॉट ऑर्गवरील एंट्रीज बघीतल्या नंतर 'संस्तवन' ह्या शब्दाचे अपभ्रंश म्हणून संथा शब्द आला असेल का असा एक विचार येऊन गेला. तरी सुद्धा संथा शब्दातील दिक्षा घेणे हा अर्थ कसा येत असेल ? संस्कृतात संस्थ असा एक शब्द स्वतंत्र पणे बरेच अर्थ घेऊन दिसतो त्याचा काही संथा शब्दाशी संबंध असण्याची शक्यता आहे का ?
15 Mar 2015 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा
@ संस्कृतात संस्थ असा एक शब्द स्वतंत्र पणे बरेच अर्थ घेऊन दिसतो त्याचा काही संथा शब्दाशी संबंध असण्याची शक्यता आहे का ?>>> हे जरा आमच्या लोकांमधे विचारूनच सांगावे लागेल मला... पाहतो,आणि सांगतो.
15 Mar 2015 - 11:56 pm | माहितगार
हिंदी विकिपीडियाच्या हिंदी विक्शनरी या सहप्रकल्पात पंजाबी-हिंदी शब्दसूची दिली आहे त्यात संथा ह्या शब्दाचा अर्थ मराठी प्रमाणे पाठ असा दिला आहे असे वाटते.
16 Mar 2015 - 12:14 am | माहितगार
पंजाबीत शब्दाचा शोध घेतला तर एक्झॅक्टली मराठी प्रमाणे अर्थ दिसतो आहे He has forsaken all worldy dealings and committed his time and energy into writing translations of Banee(ਅਰਥ), and teaching proper pronounciation(ਸੰਥਾ) of Gurbani. संदर्भ संथा शब्दाची प्राचीन मराठीत उदाहरणे दिसत नसतील आणि जुन्या शीख/पंजाबी साहित्यात संथा हा शब्द येत असेल तर मराठीने संथा हा शब्द पंजाबीतून घेतला असे म्हणता येईल का ? संथा या शब्दाचा मराठी मधील जुन्यातील जुन्या वापराची उदाहरणे कुणास ठाऊक आहेत का ?
16 Mar 2015 - 9:00 pm | माहितगार
मी संथा = ਸੰਥਾ हे पंजाबी (गुरुमुखी) लेखन बरोबर आहे का आणि मराठी आणि पंजाबी संथा ਸੰਥਾ चे अर्थ कितपत मॅच करतात याची पंजाबी विकिपीडियावर चौकशी केली तर संथा चे ਸੰਥਾ हे गुरुमुखी लेखन बरोबर आहे आणि जवळपास सर्व एखाद्या अर्थछटेचा अपवाद सोडता इतर सर्व अर्थछटा मॅच होतात असे दिसते. त्यांनी ਸੰਥਾ (संथा) पेक्षा ਸੰਥਿਆ (संथिआ) असे लेखन पंजाबीत अधिक सुयोग्य मानले जाते अशी अधिकची माहिती दिली.
मराठीत 'संध्या' हा दैनंदिन वैदीक आचार आहे त्याची व्युत्पत्ती बहुधा संधीकाळच्या वेळी केलेला आचार अशी असावी असे वाटते. तरी पण ਸੰਥਿਆ (संथिआ) चे अपभ्रंश उच्चारण संधिआ आणि मग संध्या असे होऊ शकेल का असा एक विचार मनात आला. वस्तुतः न पटण्या जोग्या पुरुषसुक्तातील अतार्किक उल्लेखा शिवाय वेदाभ्यास करणार्या मंडळीना त्या प्रथेत कसे सामील करून घेतले गेले याचे पटण्या जोगे स्पष्टीकरण कुठे आढळत नाही. तेव्हा संथा आणि संध्या इत्यादी आचरणे हे या प्रथांमध्ये प्रत्यक्षात संबंधीत व्यक्ती समुहांना सामील करून घेण्याचे माध्यम राहीले असेल का असा एक विचार मनात येऊन गेला.
15 Mar 2015 - 11:41 pm | रमेश भिडे
धन्यवाद आतृप्त आत्माजी , अतिशय सुंदर व माहितीप्रद लेखन
ही परंपरा जतन करणार्या समस्त ब्राहमवृंद मंडळीस माझे शतश: प्रणाम
नमो नम:
16 Mar 2015 - 1:08 am | माहितगार
मराठी विक्शनरी शब्दकोशात संथा शब्दाबद्दल लेख लिहावयास घेतला आहे. सविस्तर लेखासाठी खालील माहिती हवी आहे.
माझ्या व्याकरणातील कच्चे पणाला माफ करा.
* संथा हा शब्द मराठी व्याकरणा नुसार कोण-कोणत्या प्रकार आणि उपप्रकारात मोडतो ?
* या शब्दाची विभक्ती रुपे होतात का ?
* वाक्यात उपयोगाची उदाहरणे
* वाकप्रचार
* म्हणी
* संधी व समास असलेले शब्द उपलब्ध असल्यास
* काही संकीर्ण माहिती असल्यास
* मराठी साहित्यातील आढळ (शक्य झाल्यास जुन्यात जुना उपलब्ध उपयोग)
* पंजाबी साहित्यातील आढळ (शक्य झाल्यास जुन्यात जुना उपलब्ध उपयोग)
* संथा प्रमाणे तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
* इतर भारतीय भाषातील आणि जागतीक भाषातील अनुवाद जसजसे उपलब्ध होतील तसे.
* उर्दू : कन्नड : गुजराथी : तमिळ : तेलुगू: मल्याळम भाषा लिपीत संथा हा शब्द कसा लिहिला जाईल ?
16 Mar 2015 - 8:45 am | सुबोध खरे
१०० +
16 Mar 2015 - 4:44 pm | जेपी
शेंच्युरी निमीत्त लेखन चोर्य करणार्या व्यक्तीचा सत्कार बुवांनी त्यांच्या पद्धतीने हवा तसा करावा.
शुभेच्छुक - जेपी आणी तमाम बुवांचे चाहते.
16 Mar 2015 - 8:30 pm | माहितगार
विकिपीडियावर संदर्भ देताना शक्यतोवर प्रत्येक ओळीत देण्याची पद्धत असते. लेखात पहिल्यादा संदर्भ देताना तो खालील प्रमाणे पूर्ण सविस्तर दिला जातो.
{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.misalpav.com/node/30023
| शीर्षक = वेदाध्ययनातील- संथा देणे... म्हणजे काय?
| भाषा = मराठी
| लेखक = अत्रुप्त
| लेखकदुवा = http://www.misalpav.com/user/14767
| आडनाव = अत्रुप्त
| पहिलेनाव = अत्रुप्त
| सहलेखक =
| संपादक =
| वर्ष = २०१५
| महिना = जानेवारी
| दिनांक = Thu, 15/01/2015 - 04:02
| फॉरमॅट =
| आर्काइव्हदुवा =
| आर्काइव्हदिनांक =
| कृती = धागा लेख आणि (प्रतिसाद # भृशुंडी)
| पृष्ठे =
| प्रकाशक =
| अॅक्सेसवर्ष = २०१५
| अॅक्सेसमहिनादिनांक = रात्रौ ७ वाजता १६ मार्च
| अॅक्सेसदिनांकमहिना =
| ॲक्सेसदिनांक =
| अवतरण =
}}
या धागा लेखात अत्रुप्त यांचे जे लेखन आहे त्यांच्या लेखनाला मी असे नाव दिले. त्या लेखात त्यानंतरच्या ज्या ज्या ओळीत अत्रुप्त यांच्या लेखनाचा संदर्भ असेल त्या प्रत्येक ओळीच्या शेवटी संदर्भ सविस्तर पूर्ण सविस्तर न लिहिता . एवढेच लिहीन. त्या ओळींपुढे संदर्भ क्रमांक [१] असा दिसतो. आणि [१] वर कुणी टिचकी मारल्यास लेखाच्या खाली येणार्या संबंधीत संदर्भा पाशी पोहोचवले जाते. विकिपीडिया लेखाच्या खाली संदर्भ जेवढ्या वाक्यांना त्या लेखाचा/प्रतिसादाचा संदर्भ आहे त्याचे क्रमांकन १, १.१, १.२ असे करून पुढे संदर्भ
↑ १, १.१, १.२ [अत्रुप्त] (Thu, 15/01/2015 - 04:02). वेदाध्ययनातील- संथा देणे... म्हणजे काय?. धागा लेख आणि (प्रतिसाद # भृशुंडी). रात्रौ ७ वाजता १६ मार्च, २०१५ रोजी पाहिले. (मराठी मजकूर) असा दिसेल. मी मराठी विकिपीडियावर लेखन करताना आधी सहसा असे संदर्भ लेखाच्या चर्चा पानावर आधीच बनवून ठेवतो. जसे याच्या सोबतच केतकर ज्ञानकोशाचा आणि मराठी विश्वकोशाचा इत्यादी संदर्भ आधीच बनवून ठेवतो म्हणजे प्रत्येक ओळी नंतर संदर्भ कॉपी पेस्ट करणे सोपे जाते.
खरेतर सविस्तर संदर्भ लिहिण्यासाठी मेहनत लागणार असेल तर संदर्भ नमुद केला जाण्याचे प्रमाण कमी राहण्याचे एक कारण असते म्हणून काही इंग्रजी संस्थळे स्वतःच लेखाचा संदर्भ एका क्लिक सरशी उपलब्ध करून देतात अशी सुविधा मराठी संस्थळांनी दिल्यास स्वतः लेखकांनाही उपयोग होऊ शकेल. म्हणजे जसे की फेसबुक व्हॉट्स अप इत्यादी ठिकाणी संदर्भा सहीत लेख पाठवला गेल्यास इतरांकडून प्रताधिकार उल्लंघनाची शक्यता कमी राहील, कुणी प्रताधिकार उल्लंघन केल्यास लवकर कळेल तसेच संदर्भाच्या दुव्यांवरून इतरत्रचे वाचक तुमचा पुर्ण लेख वाचण्यासाठी येऊन संस्थळाची माहिती होऊन संस्थळ मालकांना अशी सुविधा देण्यास अप्रत्यक्ष फायदाच असेल असे वाटते.
अर्थात ज्यांना स्वतःचा कॉपीराईट बद्दल जागरूक राहून काळजी घ्यावयाची आहे त्यांनी संस्थळावर केवळ टोपणनावाने लेखन केले असेल आणि स्वतःचे खरे नाव नाही लिहिले आणि गोपनीयच ठेवायचे आहे अगदी आपल्या प्रताधिकार प्रतिनिधी अथवा वकीलालाही सांगायचे नाही अशा लेखनही ६० वर्षे प्रताधिकारीत आहे असे गृहीत धरले जाते (६० वर्षांच्या आत अशा लेखकाने अधिकृत पणे आपले नाव जाहीर केले तर लेखकाचे आयुष्य + ६० वर्षे एवढा प्रताधिकार कालावधी वाढतो) पण प्रताधिकार उल्लंघनाचे दावे स्वतः प्रताधिकार मालक अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीने दाखल करावयाचे असल्यामुळे स्वतःचे नाव गोपनीय ठेवणार्या लेखनाचे प्रताधिकार उल्लंघना पासून रक्षण करणे जरासे कठीण जाऊ शकते .
प्रताधिकार उल्लंघन होऊ नये आणि आपल्या लेखनाचे क्रेडीट आपल्या पाशी राहावे असे वाटणारी बरीचशी लेखकुमंडळी टोपण नावे घेऊन खरे नाव न लिहिण्यात बर्याच मंडळींचा उद्देश गोपनीयता जपणे नसतो केवळ गंमत असा असतो. ज्यांचा उद्देश गंमत एवढाच आहे आणि प्रत्यक्षात आपले खरे नाव संदर्भांसोबत जोडून पाहिजे आहे अशा मंडळींनी तुमचे लेखन असलेल्या संबंधीत संस्थळाच्या पब्लिक प्रोफाईल मध्ये नाव टाकुन ठेवणे दावा करण्यास आणि इतरांनी दावा पडताळण्यास दोन्ही दृष्टीने सोईचे जाऊ शकेल असे वाटते.
जसे की अत्रुप्त यांनी मराठी विकिपीडियावर लेखन टाकले. ते ७००० बाईट पेक्षा जास्त असल्यामुळे संपादन गाळणीने प्रताधिकारा बाबत मजकुर तपासा अशी सुचना अलिकडील बदल मधून गस्त देणार्या सदस्यांना दिसेल अशी टाकली. अत्रुप्त यांनी मजकुर टाकताना स्वतःच्या खर्या नावाने टाकले पण केवळ टोपण नावच उपलब्ध असलेला लेखावर इतर विकिपीडिया सदस्यांना तेच खरे लेखक आहेत हे पडताळणे शक्य होत नाही. अत्रुप्तच्या केस मध्ये त्यांनी मला व्यनि करून मजकुर त्यांनीच टाकल्याचे सुचीत केले होते तेवढी चिंता नव्हती तरी पण मराठी विकिपीडियावर खरे नाव उघड केल्या नंतर नावाच्या गोपनीयतेचा उद्देश (काही असेल तर) तसाही संपुष्टात येतो. आणि इतर सदस्यांना तेच मजकुराचे मालक आहेत हे कळणे अवघड जाते. या पेक्षा जे लेखन तुम्हाला प्रताधिकार मुक्त स्वरूपात मराठी विकिपीडिया अथवा इतरत्र उपलब्ध करावयाचे आहे त्या लेखातच स्वतःच सुचना लावली आणि मराठी विकिपीडियावरही टोपण नाव वापरले तर प्रताधिकार स्थिती तपासण्यास इतरांनाही अडचण येणार नाही. आणि तुम्हाला तुमच्या नावाची गोपनीयताही (तशी हवी असेल तर ) राखता येऊ शकेल. माझा हा मुद्दा लक्षात येतो आहे का ? कुणी यास सोपे करून सांगू शकेल का ?
16 Mar 2015 - 8:37 pm | माहितगार
वरील सविस्तर संदर्भ पाहिला तर मी अत्रुप्त यांचे खरे नाव समजुनही ते प्रोफाईल मध्ये नसल्यामुळे | आडनाव = अत्रुप्त आणि | पहिलेनाव = अत्रुप्त असेच लिहिले कारण मी त्यांचे नाव जाहीर करणे (गोपनीयता संकेतांना लक्षात घेता) प्रशस्त होत नाही. आणि खरी वस्तुस्थिती हिच आहे की त्यांना त्यांचे खरे नाव वापरूनही हवे आहे आणि खरे नाव वापरल्याने अधिक प्रताधिकार कालावधीचा अप्रत्यक्ष फायदाही आहे. (व्यक्तीशः मी आंजावर गोपनीयतेची पुरेशी काळजी घेतली जाण्याचा समर्थक आहे)
16 Mar 2015 - 9:00 pm | अत्रुप्त आत्मा
आपला सदर चर्चेसंदर्भातला व्य.नि. पहावा. तिथे मी इतरंही काहि लिहिले बोललेलो आहे. आपण करत असलेल्या मदतीसाठी पुन्हा एकवार धन्यवाद. :)
19 Jun 2015 - 10:50 am | अत्रुप्त आत्मा
हे प्रकटन...,सदर धागा विषयाशी सुसंगत असे एक प्रकटन आहे. व ज्यांना घनपाठ प्रत्यक्ष ऐकण्याची इच्छा आहे,अश्यांना याचा जरुर लाभ घेता येइल. सदर घनपारायण करणारे वे.मू. निळकंठ वासुदेव जोगळेकर(गोकर्ण) यांच्याबद्द्लची माहिती तसेच हे घनपारायण म्हणजे नेमके काय? का? व कशाचे ? याचिही माहिती खालील फोटोकॉपींमधे आहे. तेंव्हा ज्यांना या विषयाचा अभ्यास करणे,माहिती घेणे कींवा कुतुहल म्हणून सदर पारायण (मिरज येथे) जाऊन ऐकणे आहे,त्यांचे साठी ही एक सुवर्णसंधी आहे. (पारायण कालावधी सुद्धा सुमारे महिनाभराचा आहे.) शिवाय घनपारायण हा नेहमी जुळून येणारा योगायोग नाही..सबब, हा दुर्मिळ योगायोग आहे. तेंव्हा जरुर लाभ घ्यावा,ही विनंती.

22 Jun 2015 - 5:59 pm | बॅटमॅन
आयला, आमच्या मिरजेत होणारे काय! जातोच मग, बहुत धन्यवाद ओ बुवा. :)
जाता जाता: आमच्या तीर्थरूप व मातु:श्रींचे लग्नही याच कार्यालयात झाले होते. शिवाय लहानपणी अनेक लग्ने जेवलोय इथे. :)
22 Jun 2015 - 6:02 pm | अत्रुप्त आत्मा
ब्याटुकशास्त्री, जा... आणि रेकॉर्डिंग करुन घेऊन या.
22 Jun 2015 - 6:14 pm | बॅटमॅन
अवश्य!
19 Jun 2015 - 4:12 pm | पद्मावति
पुन्हा एकदा वाचून काढीन. इतकी माहिती आणि विवेचन एका वाचनात डोक्यात absorb करणे मला तरी शक्य नाही. पण एक आहे की तुमच्या सारख्या लोकांच्या ज्ञान आणि परिश्रमाने भारतात अजूनही आपल्या प्राचीन विद्या, भाषा या गोष्टी जरातरी जिवंत आहेत. नाहीतर संस्कृतिक दृष्ट्या भारताचा ग्रीस, इजिप्त कधीच झाला असता.
22 Jun 2015 - 3:46 pm | vijaykharde
जवळ जवळ सगळ्या वेद पुरणां ची माहिती म्हणुन लिन्क डकवत आहे. ह्यात विमान शास्त्राबद्दल छान माहिती दिली आहे.