आजोळच्या गोष्टी – ३

Primary tabs

गुळाचा गणपती's picture
गुळाचा गणपती in जनातलं, मनातलं
6 Jan 2015 - 12:50 pm

आजोळच्या गोष्टी – ३

औदुंबरला दत्त मंदिराशेजारूनच संथ वाहते कृष्णामाई. नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. काठाला नारळाची जांभळाची झाडे एका रांगेत होती. एकदा आईने माझ्या मामाला मला पोहायला शिकवायची जबाबदारी दिली आणि माझा पोहणे शिकण्याचा उपक्रम पुढे अनेक वर्षे चालला. माझा एक मामा अगदी पट्टीचा पोहणारा. पुरात उडी टाकून भोवरा हाताने फोडणे वगेरे धाडसी प्रकार सहज करी. मी त्याला घाबरून असायचो अगदी. मी २-३ वर्षाचा असताना माझे बुडता बुडता वाचण्याचे सोपस्कार झाले होते. मामाने अगदी मजेत सांगून टाकले आईला कि "छाया, काळजी नको. आता हे काम माझ्याकडे लागले". मामाकडे पोहणे शिकायला एका वेळी किमान ६-८ मुले असायची. त्यात माझी भर.

दुसरे दिवशी सकाळी अगदी मजेत मी मामासोबत निघालो. एक एक पाऊल टाकत घाटावर पोचलो आणि पोहायला सज्ज झालो. बहुदा Castrol कंपनीचा एक हिरवा कॅन पाठीला बांधून मी पाण्यात उतरलो. पहिल्या दुसर्‍या पायरीवरच्या माझ्या जलक्रीडा पाहून बहुतेक मामा वैतागला. म्हणाला चल पांडुरंग, आत एक फेरी मारून येऊ आणि इतका वेळ मजेत असलेला मी मामाचा जोश पाहून घाबरलो. एका हाताने मामाने मला खोल पाण्यात ओढले आणि स्वतः चित्र-विचित्र आवाज काढू लागला. मला असा वाटून गेलं की आपला मामा एकतर वाघ-सिंह किंवा कमीत कमी पाणगेंडा वगेरे तरी असेल मागच्या जन्मी. तेवढ्यात पुन्हा पाण्याचा तडाखा दिला मामाने. एक दोन मिनिटे जातात तोवर मला श्वास घ्यायला पण सुचेना. कृष्णेच्या मध्यभागी माझ्या गंगा यमुना सुरु. मी आई आई असा धोसरा कडून रडू लागलो. बहुतेक माझी दया येउन शेजारच्या एका देव-माणसाने मला काठावर आणले. बराच वेळ खोकलो असेन. तेवढ्यात कोणीतरी मला उचलते आहे असा मला भास झाला आणि तो मामा आहे हे कळायच्या आधी मी जवळपास १०-१५ फूट लांब पाण्यात जाऊन पडलो .

एव्हाना मला कंस मामा म्हणजे काय हे समजले होतेच. ह्यावेळी मात्र मामा माझ्यासोबत राहून कसा पोहायचा, कसे हात मारायचे ते सांगत होता. जर धीर आला आणि थोडे हात-पाय मारू लागलो मी. झाला पहिला दिवस. दुसऱ्या तिसर्‍या दिवशी पुन्हा तसेच. पण हळूहळू मला मजा येऊ लागली आणि मी स्वतःच पाण्यात उद्या वगेरे मारून सर्वांसारखे वागू लागलो. ताईचा मुलगा म्हणाल्यावर विशेष लक्ष सगळ्यांचे. नदीच्या काठावर "सुपर" नावाचा एक बुरुजवजा उंच जागा होती. मामाने तिथूनच भिरकावले मला.पाण्यात पडलो आणि सर सर असा आवाज आला. डावीकडे बघतो तर माझाच कॅन वाहून चालला होता. २-३ गटांगळ्या खाईपर्यंत मला अलगद बाहेर आणले गेले. घरी गेलो तर तिथे वेगळाच दंगा. कोणीतरी सांगून ठेवलेले की पांड्या बुडताना वाचला.

अण्णा एकदम काळजीत दिसत होते. मी घरात पाऊल टाकतोय न टाकतोय तोच अण्णा म्हणाले "जावयाचा पोर अन जीवाला घोर. जरा जपून रे. इथे कृष्णेला डोह आहे. भले भले गेलेत तळाला. शिकायचे सोडू नकोस पण काळजी घे."
मी म्हणला "हो. त्या मामाला पण सांगा हे सगळं."
हे सगळं सांगायला बाबांना ऑफिस मध्ये फोन केला तर बाबा म्हणाले " मामा खूपच प्रेमाने शिकवतोय तुला. मुकाट्याने शिक नाहीतर मी रजा घेऊन येईन खास पोहणे शिकवायला."
"नको बाबा. शिकतो मी. तुम्ही येऊ नका." मनात सोप्पा हिशोब केला होता पटकन की ह्या मामाला बाबांची साथ मिळाली तर माझे काय होईल.

त्यानंतरचे एक एक दिवस मी कुठे कुठे लपायचा प्रयत्न केला. कधी आमच्या घरच्या माळ्यावर, नारळांच्या पोत्यामागे, दुसऱ्यांच्या घरी, कोणाच्या शेतात, मारुतीच्या देवळामागे, पेढ्याच्या दुकानात, एकदा तर रिक्षात. पण राव मामा पण ACP प्रद्युमन निघाला. शोधूनच काढायचा असेल तिथून. अगदीच सापडलो नाही तर मी ज्यांच्याकडे लपलोय ते लोकच मला घाटावर नेउन मामाच्या ताब्यात देत. हरवलेली वस्तू मालकाला परत देतात तसं. आलीय भोगासी ... !

मी एकदा सांगितला की केसात पाणी तसेच राहिल्याने सर्दी झालीये मला. आज राहूदे पोहायचे. तर काय केले असेल माहितीये ? केसच कापून आणले आणि सांगितले, हम्म, आता मार उडी. बघू कशी होते सर्दी. तुम्हाला सांगतो, एकदा इतका घाबरलो होतो की इतका अंगावर लज्जारक्षणासाठी फक्त १ गोष्ट ( नशीब !) घेऊन पूर्ण औदुंबर पळत पळत पालथे घातले होते मी. त्यात पाठीला कॅन बांधलेला, पायात चप्पल नाही, मे महिन्यातील उन्हाळा आणि पाय भाजत असल्याने किंवा भीतीने म्हणा पण डोळ्यातून अखंड जलधारा. सगळं गाव हसतंय आणि येडं पळतंय. अरेरे, काय ती अवस्था. आजही गावात लोक गिरीशचा इस्लामपूरचा भाचा म्हणले कि "तोच काय तो ?" असं म्हणत असतील. असो.

पुढे मी ८ वी - ९ वी ला गेल्यावर अखेर पोहायला शिकलो. पोहत नदी पार करायची आणि पलीकडे पोटभर जांभळे खाउन जीभ रंगवून नितीन दादाच्या नावेला धरून परत औदुंबरला यायचे. पुढे मीपण लहान भावंडाना पोहायला शिकवले. पण पोहणे शिकायची मजा आणि भीती अजूनही मनात तशीच आहे.

पुनरागमनायच |

अनुभवविरंगुळाराहती जागा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Jan 2015 - 1:06 pm | मुक्त विहारि

मस्त

बोका-ए-आझम's picture

6 Jan 2015 - 1:49 pm | बोका-ए-आझम

व्वा!

वाहवा! काय मस्त लिहिलंय. थोडं अजून जास्त मोठे लेख टाका.

गुळाचा गणपती's picture

10 Jan 2015 - 2:38 am | गुळाचा गणपती

धन्यवाद धन्यवाद

मस्त.मजा येतेय वाचायला.

पैसा's picture

16 Jan 2015 - 7:11 pm | पैसा

मजा आली!

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jan 2015 - 4:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

सगळे डोळ्या पुढे जसे च्या तसे उभे राहिले! कारण माझे आजोळ पलुस चं!! :)