आजोळच्या गोष्टी १ आणि २

Primary tabs

गुळाचा गणपती's picture
गुळाचा गणपती in जनातलं, मनातलं
3 Jan 2015 - 2:14 am

आईचं गाव औदुंबर.
चांगला तासभर धुरळा उडवला कि बस पोचवायची ते औदुंबर फाट्यावर. लाडका मामा गाडी घेऊन बराच वेळ उन्हात, पावसात वाट पाहत असायचा. मोजकीच घरे असल्याने गावातील हरेक गृहस्थ माझ्या घरच्यांना माहितीच असायचा. अगदीच न्यायला कोणी आले नसल्यास लिफ्ट मागणे आणि लिफ्ट मिळाल्यावरचा आनंद म्हणजे....! एखाद्या बैलगाडीतून जायला मिळणे म्हणजे पर्वणी असायची. उगाचच चक-चक आवाज काढत घरापर्यंत पोचायचे ते म्हणजे जणू मी गाडी हाकत आणली अशा आविर्भावात.

आम्ही येत असल्याची वार्ता मिळताच आजी खास रव्याचे लाडू वळायला घ्यायची. घरी येताच आजीला कडकडून मिठी मारायची आणि लाडू हातात घेत नदीकाठावरील दत्ताच्या मंदिरात ( देवाखाली) दर्शनाला पळायचे. छान तासभर झाला की नदीकाठाने घाटावर इकडे तिकडे भटकत, चिंचा पाडायचा कंटाळा येईपर्यंत धुपारतीची वेळ झालेली असायची. गावातील सर्व आबालवृद्ध महिला गट आपसूकच महादेव, मारुती, गुरु देव दत्त आणि मठ ह्यांच्या दर्शनास निघायचे. दत्ताची आरती, हळदी कुंकू वाहून झाले की आपला तीर्थ प्रसाद संपवून, आजीचा प्रसाद खात खात घाटावरून पायर्‍या मोजत मोजत घरी. मामा पूजा करत असायचा आणि मी गडबडीत शुभंकरोती म्हणून पुन्हा दंगा करायला तयार व्हायचो.

पुनरागमनायच ....!

मामाच्या गावी कोणीतरी मला पांडुरंग या नावाने प्रसिद्धी दिली होती. काय माहित कोणी. त्यामुळे गावात एन्ट्री झाली की पांड्या पांड्या नावाचा अगदी जयघोष व्हायचा. आण्णा, आजी, मामा, मामी यांच्याशी गप्पा झाल्या कि नानू दादाच्या घरी जायचे. त्यांच्या घरची आजी म्हणजे आम्ही पाहतोय तेव्हापासूनच धनुष्याकृती होत्या. म्हणजे पहा एखादी सोनपरी सिनियर सिटीझेन झाल्यावर जशी दिसेल न अगदी तश्शी. आजीसोबत कपभर दूध घेऊन निघायचे ते थेट कट्ट्यावर.

कट्ट्यावर दुसऱ्या आजोबांचे : पद्मश्री कवी सुधांशुंचे घर. त्यांच्या घरी अंदाजे १०-१५ पायऱ्या चढून जावे लागे. त्यामुळे त्यांच्या घराला समानार्थी शब्द म्हणजे "कट्ट्यावर" असा होता. त्यांच्या माजघराच्या कमानी शेजारून आत जातानाचा फुलांचा गंध अजून मनात तसाच आहे. सौ. सुधांशू यांना सगळे जण गौरी मावशी म्हणत. विशेष खोलात न जाता, मीही तशीच हाक मारू लागलो. "एकटाच आला आहेस की छाया पण आली आहे ? सांग तिला की वेळ काढून येउन जा घरी, सांज्याच्या पोळ्या केल्यात." इति गौरी मावशी. हॊऒ असा मोठा होकार देत, पोळीची वाट बघत एका स्टुलावर बसून मी त्यांच्या देवघरातील देव मोजण्यात, ओळखण्यात मग्न होई. काहीशा अंधारात असलेले त्यांचे देवघर म्हणजे एक गूढ वाटे.

माझी चाहूल लागताच आजोबा सोप्यातून आत यायचे. दत्त गुरूंवर एकाहून एक सुश्राव्य भावगीते लिहिणारे श्रेष्ठ कवी पद्मश्री सुधांशू. पांढरा सुती सदरा , पैरणीचं धोतर, जाड भिंगाचा चष्मा आणि बहुदा पोलिश केलेली काठी असा साधा पेहेराव. मला त्यांच्या कविता फार फार आवडत. मी दरवेळी घरी गेलो की त्यांच्या आवाजात एक तरी कविता ऐकायला मिळावी ह्याचा हट्ट करायचो. आजोबाही तितक्याच हट्टाने आपले स्वत्व विसरून माझा हट्ट पूर्ण करायचे. दुकानात रोजमेळी साठी वापरतात तशी मोठ्ठी वही आजोबा जवळ बाळगत. तशाच अनेक वह्या निव्वळ कवितांनी भरल्या होत्या. आजोबांची एक कविता दुसरीच्या मराठी भाषा अभ्यासक्रमात होती ती म्हणजे " फुलपाखरा ये इकडे, छान गडे तू छान गडे". पुस्तकातील “क वि सु धां शु” हि अक्षरे मी खूप वेळा वाचायचो आणि शाळेतील सगळ्या मित्रांना सांगून झाले होते की "हे माझे आजोबा आहेत". “ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो , गुरु त्रैलोक्याची आई “ अशी अनेक गाणी त्यांच्या लेखणीतून लोकार्पण झाली
त्यांच्या वयोमानानुसार थरथरणार्या हातांनी लिहिलेल्या काव्यपंक्ती मी जुळवून वाचू लागे. पार्किन्सनमुळे आपल्या शेवटच्या दिवसात पु. ल. यांचे लेखन देखील काहीसा असंच व्हायचं. माझ्या स्वाक्षरी पुस्तकातील पु. ल. यांची सही याचे प्रमाण देते. माझी वाचनाची असफल धडपड पाहून शेवटी आजोबा स्वतःच एक कविता म्हणायला सुरुवात करत. एकदा कविता ऐकताना मी मधेच विचारलं की मला तुमच्या वहीमध्ये दाखवा . मी ही कविता लिहून घेणार आहे. आजोबा म्हणाले कि चला आपण दोघे पण लिहूया. मी तरी कुठे लिहिली आहे.
मला ते अतिशय विलक्षण वाटले. वाचेतून येणारा शब्द नी शब्द कविताच बनतोय अशी असामी. केवढी ही साहित्य सिद्धी! पुढे थोडा कळता झाल्यावर मी चिक्कार प्रश्न विचारून आजोबांना नकोसे करून टाके. जितका विचित्र प्रश्न तितकेच सुसंगत उत्तर. असे बराच वेळ चाले. कधी चीड चीड नाही कि "आता पुरे" असं नाही.

खूप मेहेनतीने जमवलेल्या स्वाक्षरी संग्रहात मी आजोबांची सही घेतली. आजोबांनी मला स्वाक्षरीसोबत ४ शब्दांचा संदेश दिला की " रे यत्नातून फुलते जीवन".

आज आजोबा सोबत नाहीत. मनातील त्यांच्या आठवणींच्या झालेल्या गर्दीमुळे पुढे लिहिणे होत नाहीये. त्यामुळे आज इथेच गुरुदेव दत्त.
पुनरागमनायच |

लेखकथाराहती जागा

प्रतिक्रिया

अमित खोजे's picture

3 Jan 2015 - 2:31 am | अमित खोजे

अहो भाग्य तुमचे तुम्हाला असे बालपण लाभले आणि असे आजोबा मिळाले. खूप छान वाटले तुमचा लेख वाचून.
हे वाचून पटते की तुम्हाला कोणी २ रुपये दिले तर त्यातील एका रुपयाचे अन्न घ्या आणि दुसर्याचे फूल.
कारण अन्न तुम्हाला 'कसे जगायचे' ते शिकवील आणि फूल तुम्हाला 'का जगायचे' ते.
मला वाटते पु. ल. यांचीच हि वाक्ये आहेत.

अवांतर - कालच "Monuments Men" पिक्चर बघितला. त्यात जॉर्ज क्लूनीला त्याचा वरिष्ठ हा प्रश्न विचारतो, "मेजर, हिटलरच्या तावडीतून या कलाकुसरी वाचवण्यासाठी तुमची २ माणसे कामी आली त्याची खरंच जरूरत होती का?" मलाही हा प्रश्न पडला होता कि खरंच या पिकासो, मायकल अंजेलो आणि इतर अनेक कलावंतांच्या कलाकृती दुसर्या महायुद्धात हिटलरच्या आणि दोस्त राष्ट्रांच्याही तावडीतून वाचवण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालायची आणि प्रसंगी गमवायचीसुद्धा गरज होती का? पण त्याचे उत्तर तुमच्या आजोबांसारख्यांनी आणि इतर अनेक महान व्यक्तींनी अगोदरच देऊन ठेवले आहे.

स्पंदना's picture

3 Jan 2015 - 6:04 am | स्पंदना

लेख तर आवडलाच, पण प्रतिसाद सुद्धा आवडला.

छान लेख.वाचुन माझे एक आवडते लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या औदुंबर चे उल्लेख असणार्या लेखांची आठवण झाली.त्यांच्या सर्वच साहित्यात वारंवार औदुंबरचे उल्लेख,कवि सुधांशु यांचा प्रभाव याचे वर्णन आले आहे.तुमच्या लेखाच्या निमित्ताने डोह,सोन्याचा पिंपळ,कोरडी भिक्षा सगळी पुस्तकं परत घेते वाचायला.धन्यवाद!

गुळाचा गणपती's picture

3 Jan 2015 - 11:08 am | गुळाचा गणपती

अजया, अगदी बरोबर. सख्खे नाहीत, पण मामा आहेत ते माझे. घर शेजारी आहे आमचे.
गोष्टीतील सोनपरी सिनियर सिटीझेन आजी म्हणजे त्यांची आई.

पैसा's picture

3 Jan 2015 - 9:08 am | पैसा

खूप छान लिहिलंत!

एस's picture

3 Jan 2015 - 3:27 pm | एस

असेच म्हणतो!

मुक्त विहारि's picture

3 Jan 2015 - 10:50 am | मुक्त विहारि

आजोळच्या आठवणी मनांत सतत रुंजी घालत असतात...

खेडूत's picture

3 Jan 2015 - 11:00 am | खेडूत

सहज आणि सुंदर!
>> एखादी सोनपरी सिनियर सिटीझेन झाल्यावर जशी दिसेल न अगदी तश्शी- हे भारीच !

एक प्रश्न पडलाय - हा कोणता काळ असेल? १९७५-८० की त्याहून आधी?

गुळाचा गणपती's picture

3 Jan 2015 - 11:13 am | गुळाचा गणपती

धन्यवाद .

एक प्रश्न पडलाय - हा कोणता काळ असेल? १९७५-८० की त्याहून आधी?
--> २००० पासून पुढे

सिरुसेरि's picture

3 Jan 2015 - 2:19 pm | सिरुसेरि

औदुंबरला पूर्वी जाउन आलेलो आहे . तेथील एकुणच सर्व वातावरण खूप शांत आहे - नदी , देव स्थान व आजुबाजुचा परिसर. हा शांतपणा व साधेपणा असाच टिकून राहावा . शहरी प्रलोभनांपासून दूर राहावे . त्यामानाने न्रुसिंहवाडीचे जास्तच व्यापारीकरण झाले आहे .

राही's picture

3 Jan 2015 - 3:53 pm | राही

कवी सुधांशु आणि त्यांचे सहकारी त्यांच्या अकाली गेलेल्या बालपणीच्या साहित्यिक सुहृदाच्या स्मृतिप्रीत्यर्थ औदुंबरमध्ये दरसाल एक कविसंमेलन भरवीत असत. कवी सुधांशु यांच्या पश्चातही हा पायंडा कायम आहे. यंदाही जानवरीच्या मध्यावर (बहुतेक १४-१५ जन.) ते असणार आहे. अतिशय साधे, घरगुती असे हे संमेलन असते. एकदा तरी अवश्य जाऊन अनुभवण्याजोगे.
यंदाच्या 'ललित' दिवाळी अंकात श्री कुलकर्णी यांनी त्यांच्या साहित्यिक जडणघडणीविषयी लिहिलेल्या लेखात या सुहृदांच्या कुटुंबाचे अत्यंत हृद्य वर्णन आहे.