मी लोकलयात्री

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
8 Oct 2014 - 4:34 pm

मी लोकलयात्री

स्टेशनावरी उभा ठाकतो
ट्रेनागमना पुढे वाकतो
युद्धासाठी सज्ज जाहतो
मी लोकलयात्री

गर्दी बघता चमकून जातो
तरीही क्षणात मी सावरतो
मग अंगीचे बळ जागवतो
मी लोकलयात्री

बसण्या जागा मृगजळ जरी
उभे रहाण्याचे बळ जरी
ट्रेन रिकामी बघून हर्षतो
मी लोकलयात्री

एकच गलका उडे क्षणातच
कुणी कधीचे कुठे क्षणातच
मेंढरापरी गर्दीत घुसतो
मी लोकलयात्री

नवे चेहरे रोज पुढ्यात
नवे वास मम नाकपुड्यात
रोज नव्याशी जुळवून घेतो
मी लोकलयात्री

चहूदिशांनी दाब प्रचंड
अस्तित्वाचा लढा अखंड
अपुली आपण खिंड लढवतो
मी लोकलयात्री

स्टेशन येते स्टेशन जाते
गर्दी तरीही वाढत जाते
'सरणार कधी हे' म्हणत राहतो
मी लोकलयात्री

येता माझे स्टेशन जवळ
अंगी एकवटून पुन्हा बळ
प्रवाहात मज झोकून देतो
मी लोकलयात्री

एकच रेटा अखेर देतो
चुटकीसरशी खाली उतरतो
स्वतःस पळभर धन्य मानतो
मी लोकलयात्री

चाचपतो मग खिसे मी सगळे
तपासतो मम अवयव सगळे
धडधाकट असल्याचे बघतो
मी लोकलयात्री

रोज असं हे करायचंच
गर्दी असते; चालायचंच
विचार झटकून चालू पडतो
मी लोकलयात्री

- अपूर्व ओक

हास्यवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरसकवितासमाजजीवनमानतंत्र

प्रतिक्रिया

एस's picture

8 Oct 2014 - 4:52 pm | एस

अतिशय शांत शांत वाटलं वाचून. सलाम! :-)

आपला,
मिपायात्री!

विरार लोकलची आठवण पण नकोशी झाली आहे आता. :(

- वैतागलेला विरार-चर्चगेट लोकल प्रवासी.

सगळे अंधेरी-घाटकोपर-बदलापूर प्रवास आठवले.

वेल्लाभट's picture

8 Oct 2014 - 10:32 pm | वेल्लाभट

:) धन्यवाद्स