शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव

एस's picture
एस in जनातलं, मनातलं
21 Sep 2014 - 7:26 pm

शिकार आणि पर्यावरणावरील प्रभाव

शिकार करणे किंवा शिकार होणे हा प्राणिमात्रांच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. अगदी प्रागैतिहासिक काळी जेव्हा उत्पादनाची शेतीसारखी साधने मानवाला ज्ञात नव्हती तेव्हा मानवाचा अस्तित्त्वसंघर्ष हा प्रामुख्याने दोन कौशल्यांवर आधारीत होता - हंटिंग आणि गॅदरिंग. म्हणजेच शिकार आणि (कंदमुळे वगैरे) गोळा करणे. निसर्गातील इतर प्राण्यांच्या शिकार करण्याच्या हेतूत आणि मानवाच्या हेतूत एक मोठा फरक हा होता की प्राण्यांसाठी शिकार हे अन्न मिळवण्याचे साधन होते, तर मानवासाठी शिकार अन्नप्राप्तीबरोबरच मनोरंजनासाठी केला जाणारा खेळही होता. मनोरंजनाच्या ह्याच हव्यासापायी मानवाने अगणित प्राण्यांना, पक्ष्यांना नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर ढकलले. खाली एक यादी केवळ उदाहरणासाठी देत आहे.

इसपू ९९५० - Cuvieronius नामक आजच्या हत्तींसारख्या दिसणारे प्राणी नामशेष झाले.

इसपू ९६८० - श्रब ऑक्स (Euceratherium) ह्या गव्यासारख्या एका प्रजातीचा अंत झाला.

इसपू ९१३५ - Pleistocene South American Jaguar ह्या मार्जारकुलातील प्राण्याचा शेवटचा दिवस ठरला.

इसपू ९०८० - Pygmy mammoth अतिशिकारीमुळे नामशेष झाला.

इसपू ८७६० - Columbian mammoth ह्या अजून एका सस्तन प्राण्याचा अंत झाला.

इसपू ७२९० - Cyprus dwarf hippopotamus ही पाणघोड्याची जमात मानवाकडून संपवली गेली.

इसपू ६९१० - Steppe bison ह्या गव्याच्या प्रजातीची शेवटची घटका ठरली.

इसपू ५३७० - Megatherium americanum ह्या हत्तीच्या आकाराच्या प्राण्याचे अस्तित्त्व पृथ्वीवरून शिकार्‍यांनी पुसून टाकले.

इसपू ५०२० - Sardinian giant deer हा रेनडिअरसदृश्य प्राणी नामशेष झाला.

इसपू ४८६६ - Irish elk ह्या हरीणवर्गीय महाकाय प्राण्याची शेवटची शिकार केली गेली.

इसपू २५५० - Bennu heron ह्या पक्ष्याचे अस्तित्त्व पुसले गेले.

इसपू १७८० - Woolly mammoth ह्या मॅमथ कुलातील शेवटच्या प्रजातीचा अंत झाला.

इसपू १०० - Syrian elephant ही हत्तींची एक जात हस्तिदंताच्या हव्यासापायी संपवली गेली.

इस ४५० - Meiolania ह्या कासववर्गीय प्राण्याचे अस्तित्त्व मानवी संपर्कानंतर केवळ तीनशे वर्षांतच कायमचे संपुष्टात आले.

११ वे शतक - Moa-nalo ह्या उडू न शकणार्‍या बदकांच्या प्रजातीचा अतिशिकारीमुळे र्‍हास झाला.

१४ वे शतक - Koala lemur ह्या प्राण्याच्या प्रजातीने शेवटचा श्वास घेतला.

१५ वे व १६ वे शतक - Haast's eagle ह्या गरुडाच्या प्रजातीचा अंत त्याच्या नैसर्गिक भक्ष्य असलेल्या Moa ह्या पक्ष्याच्या अतिशिकारीमुळे झाला.

इस १६२७ - Indian Aurochs ही गवासदृश्य प्रजाती पृथ्वीतलावरून हद्दपार झाली.

इस १६६२ - Dodo ह्या उडू न शकणार्‍या पक्ष्याचे अस्तित्त्व मॉरीशस बेटावर रहायला आलेल्या रहिवाश्यांमुळे संपुष्टात आले.

इस १७६८ - Steller's sea cow नामक प्रजाती मांस व कातड्यासाठीच्या बेसुमार शिकारीमुळे नष्ट झाली.

इस १८०० - Bluebuck हा देखणा आफ्रिकन प्राणी युरोपियन शिकार्‍यांकडून कायमचा संपवला गेला.

इस १८२६ - Mauritius Blue Pigeon या पक्ष्याचे अस्तित्त्व शिकारीमुळे कायमचे संपले.

१८ वे शतक - Great Auk, Sea Mink, Falkland Islands wolf, Quagga, Hokkaido wolf, Atlas Bear, Eastern Elk... अजूनही कित्येक प्राणी-पक्षी संपले.

२० वे शतक - Pig-footed bandicoot, Honshū wolf, Newfoundland wolf, Passenger pigeon, Carolina parakeet, Ukrainian wild horse, Kenai Peninsula wolf, Desert Rat-kangaroo, Mogollon Mountain wolf, Thylacine, Bali tiger, Cascade Mountain wolf, British Columbia wolf, Texas wolf, Barbary lion, Caribbean Monk Seal, Mexican grizzly bear, Caspian Tiger, Javan tiger, Indian Cheetah...

२१ वे शतक - Pyrenean Ibex, Baiji Dolphin, Liverpool Pigeon, Eastern Cougar, Western Black Rhinoceros, Japanese River Otter, Formosan clouded leopard... मानवाची प्रगती चालूच आहे.

शिकारीस विरोध का?

मानवांकडून केली जाणारी शिकार हा मनोरंजनाचा एक घृणास्पद, हिंसात्मक आणि भित्रेपणाचा असा एक प्रकार आहे ज्यातून दर वर्षी हजारो-लाखो पशुपक्षी मारले जातात. त्यापैकी कित्येक हे जखमी होतात आणि वेदनेने तळमळून शेवटी आपला प्राण सोडतात कारण त्यांच्या शिकार्‍यांकडे एकतर अचूक नेम साधण्याचे कौशल्य नसते किंवा जखमी झालेल्या शिकारीचा माग काढत त्या दुर्दैवी प्राण्याची तडफड संपवण्याइतपत धाडस नसते. शिकार्‍यांना शिकारीतून कोणता आनंद मिळतो हे माहीत नाही. पण त्यांच्या सावजांच्या वाट्याला मात्र येतात त्या प्राणांतिक वेदना, अन्न न मिळवू शकल्याने भुकेने तडफडून मृत्यू, कुटुंबाची वाताहत, मातापित्यांवर अवलंबून असलेल्या पिलांच्या जगण्याचा आधार हिरावला जाणे. अगदी ज्यांच्यावर वन्यजीवनाचे संरक्षण करायची जबाबदारी आहे त्या शासकीय किंवा इतर संस्थादेखील पैशासाठी शिकारीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करताना दिसतात ही दुर्दैवाची बाब आहे.

शिकार ही किती क्रूर असू शकते हे खालील काही उदाहरणांवरून दिसून येईल.

प्राण्यांवर शिकारीचा काय परिणाम होतो? शिकारीच्या दरम्यान जीवाच्या आकांताने केलेली धडपड ही कदाचित त्यांना कधीकधी निसटून जायला मदतही करते. पण त्या अनुभवाचा कल्पना करता येणार नाही इतका ताण त्यांच्यावर पडतो. शिकार्‍यांचा आरडाओरडा, एकाचवेळी अनेक माणसांनी घेरून प्राण्याला एकटे पाडणे, बंदुकीच्या आवाजासारखे अनोळखी आवाज, कळपापासून तुटून एकाकी पडल्याची भावना, माद्यांमध्ये आपल्या पिल्लांनाही वाचवण्याची असलेली आस, ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की वन्यजीव हे अतिताणामुळे एकतर तेथील प्रदेश सोडून सुरक्षित प्रदेशात आसरा घेण्याचा प्रयत्न करतात - जे दिवसेंदिवस संकुचित होत चाललेल्या त्यांच्या अधिवासाच्या आकारामुळे अशक्यप्रायः होते, किंवा अपत्यांच्या सुरक्षिततेची खात्री नसल्यामुळे प्रजनन लांबणीवर टाकतात. आपसूकच अस्तित्त्वाच्या लढ्यात मानवी हस्तक्षेपाच्या क्रौर्यापुढे हतबल असलेले हे दुर्दैवी जीव हरणार हे स्पष्ट होते.

पर्यावरण संतुलनावरील विपरीत परिणाम

पर्यावरणात प्रत्येक प्रजातीची एक भूमिका ठरलेली आहे. भक्ष्य-भक्षक ह्या जीवसाखळीच्या पिरॅमिडसारख्या रचनेत सूक्ष्मजीव आणि वनस्पती, त्यांच्यावर अवलंबून असणारे तृणभक्षी प्राणी, त्यावर गुजराण करणारे मांसभक्षक प्राणी ह्यांचे एक विशिष्ट स्थान असते आणि त्यांच्या संख्येचा त्यात खूप महत्त्वाचा वाटा असतो. यातील एका प्रजातीने दुसर्‍या प्रजातीचा भक्ष्य म्हणून वापर करणे हे प्रथमदर्शनी क्रूर जरी वाटले तरी त्यातून प्रत्येक प्रजातीच्या संख्येवर योग्य तेवढे नियंत्रण राहत असते. उदा. तृणभक्षी प्राण्यांची संख्या अपरिमित वाढली तर त्याचे कारण वरच्या पातळीतील मांसभक्षी प्राण्यांचा झालेला विनाश हे असू शकते. आपापसातील निसर्गनियंत्रित संघर्ष हे उत्क्रांतीचे सर्वात महत्त्वाचे कारण आणि साधन आहे.

Ecological Pyramid

(प्रतिमा गूगल डॉक्सवरून साभार)

कुठल्याही कारणाने जर यातील एका घटकाच्या संख्येच्या पिरॅमिडशी असलेल्या प्रमाणाचे संतुलन ढळले तर त्या अधिवासातील जैवविविधता धोक्यात येते आणि पर्यायाने एकूणच संतुलन ढासळून त्या अधिवासाचा, पर्यावरणाचा विनाश होतो.

केवळ लोभापायी मानवाने केलेल्या बेसुमार शिकारीमुळे कित्येकदा केवळ विशिष्ट प्रजातीच्या प्राण्यांची संख्या घटते आणि त्यावर अवलंबून असणारे इतर घटक उपासमारीने मृत्युपंथाला लागतात.

पर्यावरण असंतुलनाचा मानवावर होणारा परिणाम

सर्वात महत्त्वाची आणि प्रत्येकाने कधीही विसरता कामा नये अशी गोष्ट म्हणजे मानव हाही ह्याच पर्यावरणाचा एक अविभाज्य आणि जबाबदार घटक आहे. मानवाचे अस्तित्त्वही इतर कुठल्याही प्रजातीप्रमाणेच निसर्गाच्या संतुलनावर तितकेच अवलंबून आहे आणि पर्यावरणाची झालेली कुठल्याही प्रकारची हानी ही मानवी जीवनावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम घडवत असते. शिकारीमुळे हा परिणाम कसा होतो, तर उदाहरण वाघाचे घेऊयात. केवळ शंभर वर्षांपूर्वीपर्यंत भारतात सुमारे एक लाखापेक्षा जास्त वाघ अस्तित्त्वात होते. आज अधिकृत नोंदीनुसार फक्त १३०० च्या आसपास शिल्लक राहिले आहेत आणि काहीच वर्षांमध्ये उरलेसुरलेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातीला वाघांच्या बेसुमार शिकारीमागील कारणे ही निव्वळ मनोरंजनात्मक होती. पण अतिपूर्वेकडील देशांमध्ये असणार्‍या वाघाच्या अवयवांच्या मागणीमुळे आता वाघांची शिकार करण्याचा हेतू आणि पद्धत दोन्ही बदलले आहेत. ह्यामुळे अजून एक चिंताजनक गोष्ट अशी निर्माण झाली आहे की वाघांच्या शिकारीचे तंत्र बदलले आहे. पूर्वीसारखे जंगल उठवत किंवा बंदुकीच्या गोळीने नव्हे तर लोखंडी वा तारेच्या फासात अडकवून वाघ मारले जातात. ह्या पद्धतीत कितीतरी अधिक क्रौर्य आहे कारण वाघ अडकल्यानंतर सुटण्याची जी जीवापाड धडपड करतो त्यात त्याच्या अडकलेल्या पंजाचे चामडे अक्षरशः सोलून निघते आणि तरीही तो निसटू शकत नाही. निसटलाच तरी अशा पद्धतीने अपंग झालेला असतो की काहीच दिवसांत भुकेने व्याकुळ होऊन मरतो. हे लिहायलाही मला फार भयंकर वाटतेय पण ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे.

वाघांचा वावर संपल्याने जंगलात जाण्याचे भय लोकांना वाटेनासे होते. पर्यायाने जंगलसंपत्तीची, झाडांची बेसुमार तोड होऊ लागते तसेच इतर प्राण्यांच्याही शिकारीला ऊत येतो. थोड्याच काळात तो प्रदेश निर्जीव असल्यासारखा होतो. पावसाचे पाणी साठवण्याची जंगलांची क्षमता संपते, नद्यांना पूर येऊ लागतात, काठावरची गावे-वस्त्या उध्वस्त होतात, वने नष्ट झाल्यामुळे त्यावर अवलंबून असणार्‍या आदीम मानवी लोकसंख्येचा जगण्याचा आधारच हिरावला जातो. वनांचा पर्यावरणीय दर्जा अधिकृतरित्या घटल्यामुळे पैशाची मस्ती असलेल्या धनदांडग्यांच्या घशात अशा जमिनी पडायला वेळ लागत नाही किंवा सरकारही त्यावर काही करत नाही. आजच्या आर्थिक व्यवस्थेचा एक दोष असा आहे की नफा ही गोष्ट जितकी व्यक्तिगत ठेवता येईल तितकी ठेवायची आणि तो मिळवण्यासाठी होणारे जे काही नुकसान असेल, जी काही जबाबदारी असेल ती मात्र शक्य तितकी समाजावर, सरकारवर ढकलायची. वन्यजीवनावर, जंगलावर अतिक्रमण करणे हा मानवी हक्क आहे असा आरडाओरडा करून जमिनी बळकावायच्या पण जंगलांचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी मात्र घ्यायची नाही.

पर्यावरणवाद्यांवर घेतले जाणारे काही आक्षेप

एक आक्षेप तर वर आलेलाच आहे. शाकाहार वि. मांसाहार, हिंदू वि. मुस्लिम, वगैरे नेहमीचेच. खाली एका प्रतिसादात जे आलेय ते बरोबर आहे. मांसासाठी ज्या जनावरांची वा प्राण्यांची हत्या केली जाते त्यांची पैदासही मुद्दाम केली जाते आणि पर्यावरणसाखळीवर त्याचा अतिताण येणार नाही याची काळजी घेतली जाते. वन्य प्राण्यांची शिकार जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्यांच्या संगोपनासाठी तुम्ही काही प्रयत्न केले आहेत का असा प्रश्न स्वतःला विचारत नाहीत. जंगलातली एक कोंबडी, एक रानडुक्कर मारल्याने काय बिघडते असा विचार करणार्‍यांनी त्यांच्यासारखाच विचार करणारे अजून कितीतरी जण आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. तुम्ही एक रानकोंबडं मारलं, तसंच अजून कित्येक जण रानकोंबड्यांची अशीच शिकार करत असतील. यातील एकहीजण त्या रानकोंबड्यांच्या संवर्धनासाठी किंवा अधिवासासाठी प्रयत्न करत नसतो. मग ह्यांना ह्या पशुपक्ष्यांना मारण्याचा नैतिक अधिकार येतोच कसा? माळढोक पक्ष्यांची एकेकाळी मांसासाठी खूप शिकार व्हायची, तोही असाच काहीसा विचार करून. मी एक माळढोक मारल्याने काय बिघडणार आहे? आज सोलापूर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्यात केवळ एक-दोन माळढोक दृष्टीस पडतात तेही नशीब असेल तरच. माळढोकांची ही अवस्था रानकोंबडे, ससे, भेकरे, रानडुक्करे, चितळ, काळवीट ह्या प्राण्यांचीही एक दिवस होणार हे दुर्दैवाने निश्चित आहे. केवळ चारदोनजण माथेफिरू हे पर्यावरणासाठी धडपडणार्‍या हजारो हातांच्या मेहनतीवर पाणी फिरवत असतात ते असे.

महाराष्ट्रात अरूण बाड्डा किंवा पिंक हेडेड डक हे सुंदर बदक केवळ त्याच्या गुलाबी पिसांच्या हव्यासापोटी कायमचे अस्तंगत झाले.

मासेमारी

ज्या प्रजातींच्या संवर्धनासाठी आपण कार्य करत नाही त्यांची अन्नासाठी वा मनोरंजनासाठी हत्त्या करणे हा गुन्हा आहे ह्या गृहीतकाला छेद देणारा एक प्रकार म्हणजे मासेमारी. कृत्रिम जलाशयांमध्ये केली जाणारी मत्स्यशेती वगळता इतर प्रकारची मासेमारी ही आजकाल इतकी बेसुमार वाढलेली आहे की माशांच्या अनेक प्रजाती एकतर विलुप्त पावल्या आहेत किंवा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. संशोधनाच्या नावाखाली जपान करत असलेली देवमाशांची कत्तल ही तितकीच निंदनीय आहे. दरवर्षी जगात दहा हजारांपेक्षा जास्त शार्क मासे हे फक्त त्यांच्या कल्ल्यांसाठी मारले जातात कारण त्यांच्या कल्ल्यांना सूप बनवण्यासाठी मागणी आहे. सामन जातीचे मासे बेसुमार मासेमारीमुळे इतके कमी झाले आहेत की त्यांच्यावर अवलंबून असणारे ग्रिझली अस्वलांसारखे अन्य प्राणीही नष्ट होतील की काय अशी भीती वाटू लागली आहे.

ह्या विषयावर खूप काही लिहिता येईल, पण तितका वेळ नसल्यामुळे इथेच थांबतो. जाताजाता, चैतन्य गौरान्गप्रभु ह्यांनी लिहिलेल्या मिपावरच्याच एका अप्रतीम लेखाचा दुवा खाली देत आहे. वाचा आणि विचार करा, तुम्ही काय करता आहात.

http://www.misalpav.com/node/21469

धन्यवाद.

- स्वॅप्स

समाजजीवनमानप्रकटनविचारमाहिती

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2014 - 7:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.

सरडे आणि पाली हे कीटकांची संख्या नियंत्रित ठेवण्याची नैसर्गिक तरतूद आहे. साप संपवले तर उंदरांची संख्या अमर्याद वाढून ते तुमचे (शेतातले आणि घरातले) अन्न संपवतील. ही केवळ तुम्ही उद्धृत केलेल्या प्राण्यांची उदाहरणे आहेत. करोडो वर्षांत तयार झालेली प्राणी-वनस्पतींची परस्परपूरक नैसर्गिक साखळी यापेक्षा अनेकानेक पटींनी प्रचंड आहे... एक कडी तोडाल तर कोठे ना कोठे, काही ना काही निखळेलच.

नैसर्गिक समतोल, नैसर्गिक समतोल, साहेब... मानव एक बेट नाही, मानव एक बेट म्हणून राहू शकत नाही.

खटपट्या's picture

27 Sep 2014 - 3:09 am | खटपट्या

साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.

साप हे शेतातल्या उंदरांना खाउन शेतीचे प्रचंड रक्षण करतात. एक पूर्ण वाढ झालेला उंदीर एका रात्रीत १२.७ ग्रॅम धान्य फस्त करतो. त्यामानाने साप माणसाच्या कोणत्याच खाद्यावर डल्ला मारीत नाही. साप आणि गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे.

पाल घरातील कीटक खाउन त्यांचे नियंत्रण करते. तसाही तो निरुपद्रवी प्राणी आहे

बाकी निसर्गातील अन्न साखळीवर बरेचसं लेखन झाले आहे.

साप , सरडे, पाली हे प्राणी मला आवडत नसल्या मुळे ते तर ह्या पृथ्वीवरुन लगेच नष्ट व्हावेत अशी माझी मनापासुन इच्छा आहे.

माझं मत डास/मच्छर. जाम त्रास देतात.

बॅटमॅन's picture

25 Sep 2014 - 3:48 pm | बॅटमॅन

ढेकूणपण!

सौंदाळा's picture

25 Sep 2014 - 3:59 pm | सौंदाळा

उवासुध्दा

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 4:07 pm | प्रसाद१९७१

इथे तर कुठल्या प्रजाती नष्ट व्हाव्यात ह्याचीच यादी बनायला लागली.

पर्यावरणाचा समतोल सांभाळला नाही तर मानवाला उपद्रवी असेच प्राणी शिल्लक राहतील.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:27 pm | प्रसाद१९७१

ह्या विधानाला काही सिद्धता?

तुम्ही काय खाता? म्हणजे शाकाहारी आहात ते समजलं, पण जरा एक सॅम्पल यादी द्या.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:40 pm | प्रसाद१९७१

पोळी, भाजी, भात, ईडली, डॉसा, आमटी, सांबार, वडा असे साधे च

एस's picture

25 Sep 2014 - 5:47 pm | एस

ह्या सगळ्यासाठी लागते ते अन्नधान्न्य कुठून येते?

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:50 pm | प्रसाद१९७१

तुमची जी काय थिअरी आहे ती एकदम मांडा. माझी परीक्षा नको. जर कळली नाही तर प्रश्न विचारीनच

सिद्धता तुम्हीच विचारलीयं ना?

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 6:12 pm | प्रसाद१९७१

अहो द्या ना सिद्धता मग. ह्याला काय अर्थ आहे? बालिश प्रश्न कसले विचारताय?

सिद्धता लेखात, माझ्या प्रतिसादात, इस्पिकचा एक्का यांच्या प्रतिसादात वेळोवेळी मांडली आहे तरी आपण सिद्धता द्या असे म्हणत मलाच बालिश ठरवताय. माफ करा, पण अशी भाषा मलाही येते.

असो. तर मुद्दा हा होता की तुम्हांला जगायला लागणारे अन्नधान्य येते कुठून.

इएंचा प्रतिसाद उद्धृत करूनः

सरडे आणि पाली हे कीटकांची संख्या नियंत्रित ठेवण्याची नैसर्गिक तरतूद आहे. साप संपवले तर उंदरांची संख्या अमर्याद वाढून ते तुमचे (शेतातले आणि घरातले) अन्न संपवतील. ही केवळ तुम्ही उद्धृत केलेल्या प्राण्यांची उदाहरणे आहेत. करोडो वर्षांत तयार झालेली प्राणी-वनस्पतींची परस्परपूरक नैसर्गिक साखळी यापेक्षा अनेकानेक पटींनी प्रचंड आहे... एक कडी तोडाल तर कोठे ना कोठे, काही ना काही निखळेलच.

नैसर्गिक समतोल, नैसर्गिक समतोल, साहेब... मानव एक बेट नाही, मानव एक बेट म्हणून राहू शकत नाही.

यावर आपले काय म्हणणे आहे?

जरी ते अन्नधान्य कुठल्या शेतातून येते आहे ह्याच्याशी तुम्हांला मतलब नसला तरी किमान ते येते आहे हे तरी तुमच्या स्वतःच्या आत्मकेंद्रित जीवनासाठी महत्त्वाचे आहे की नाही? सापांसारखे प्राणी तुम्हांला भलेही ओंगळ वाटत असोत. तुमच्यासाठीच्या अन्नधान्याच्या साठ्याचे महाप्रचंड नुकसान करणार्‍या, तुमच्यात रोगराई पसरवणार्‍या उंदरासारख्या अतिओंगळ प्राण्यांना खाऊन त्यांची लोकसंख्या नियंत्रित ठेऊन हे साप, घुबड वगैरे प्राणी-पक्षी तुमच्यावर उपकारच करत असतात.

अन्नसाखळीची एक कडी तोडाल तर तुम्हीही त्याच अन्नसाखळीचा हिस्सा असल्याने तुमच्यावरही परिणाम होणारच. हे साधे तत्त्वही नाकारणार्‍यांना झोपेचे सोंग घेतलेल्यांप्रमाणेच जागे करणे निव्वळ अशक्य आहे.

असो.

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 9:24 am | प्रसाद१९७१

अन्नसाखळीची एक कडी तोडाल तर तुम्हीही त्याच अन्नसाखळीचा हिस्सा असल्याने तुमच्यावरही परिणाम होणारच

एक अन्न साखळी तोडाल तर ती दुसरे रुप घेइल. अन्नसाखळी राहीलच, त्यातले भाग घेणार्‍या जाती बदलतील.
मानवाला त्या नविन अन्न साखळी प्रमाणे स्वताला जुळवून घ्यावे लागेल. मानवा कडे बुद्धी आहे आणि आता साधन पण आहेत. त्यामुळे हे मानवाला सहज शक्य आहे.

तो माणसाचा दंभ आणि भ्रम आहे.

कवितानागेश's picture

26 Sep 2014 - 1:52 pm | कवितानागेश

त्यामुळे माणूस स्वतःच्याच नाशाकडे वेगानी धावत निघालाय...

पिंपातला उंदीर's picture

25 Sep 2014 - 5:41 pm | पिंपातला उंदीर

काथ्याकुटात एका पार्टी ने दुसऱ्या पार्टी चे विरुद्ध मत मेगा बायटि चर्चे नंतर सपशेल मान्य केले असा दाखला मिपा च्या इतिहासात आहे का यावर कोणि इतिहास संशोधक संशोधन करेल काय ?

पिंपातला उंदीर's picture

25 Sep 2014 - 5:15 pm | पिंपातला उंदीर

@स्वॅप्स छान लेख. आवडला

गवि's picture

26 Sep 2014 - 11:49 am | गवि

पूर्ण चर्चा वाचली. प्रसाद1971 यांचे प्रतिसाद वाचून त्यांचे मनापासून कौतुक.

प्रवाहाविरुद्ध नेटाने विचार मांडणे आवडले. हेच विचार मनात अनेकदा येतात. राजीव साने यांचा "सम्यक निसर्ग - एक शुद्ध भंकस.. " हा लेख या बाबतीत वाचनीय आहे.

या धाग्यात लिहिलेल्या विरोधी विचारांमधे काही तथ्ये आहेतच.. निसर्गाला काही फरक पडत नाही. या ना त्या प्रकारे पर्यावरण नामक गोष्ट राहीलच. हे सर्व योग्यच आहे.

पण भक्षक / शिकारी हे पिरॅमिडच्या (काल्पनिक पिरॅमिड अर्थात) वरती असलेले जीव.. त्यांचा विणीचा वेग खालच्या भक्ष्य प्राण्यांच्या विणीच्या वेगापेक्षा खूप कमी असतो. उंदीर, डास, हरणे वगैरे प्राणी तुलनेत झटपट पुनरुत्पादित होतात. वरच्या प्राण्यांना हा वेग वाढवणे जमलेले नाही,

प्रतिकूल परिस्थितीत वरचे प्राणी उलट वीण कमी करतात आणि खालचे वाढवतात.

अश्या वेळी वाघ नष्ट झाले तर काही फरक पडत नाही हे म्हणणे रास्त दिसले तरी इथे वाघ हे फक्त एक प्रतीक आहे. वाघ आधीच नष्ट झालेत. वाघ म्हणजेच घुबड.. वाघ म्हणजेच गरुड, वाघ म्हणजेच धामण असे समजून ही गरज पाहिल्यास असेच कळेल की माणसाला खालच्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याची स्वत:ची यंत्रणा उभारणे प्रचंड अवघड अन खर्चिक आहे.

दुर्दैवाने हे खालचे प्राणी वरच्या भक्षकांच्या अभावी बेसुमार वाढतात आणि हेच सर्व प्राणी वनस्पती अन्नधान्याचे भक्षक असतात.. पेस्ट या गटात मोडतात. उंदीर, डास, टोळ, अगदी हरणेसुद्धा पेस्ट ठरतात. आपले अन्नसाठे नष्ट करतात. अनेक पेस्ट्स रोगराई आणतात.

निसर्गाला ** फरक पडत नाही हे खरंच पण पर्यावरण रक्षण म्हणताना मनुष्य इथे भितो ते आपल्या स्वत:च्या मरणाला.. वाघाच्या नव्हे.

वर कुठेतरी प्रसाद यांनी मनुष्यजात आपली असल्याने ती टिकावी अश्या आशयाचा उल्लेख केल्याने हे लिहिले. मनुष्यजातही जाईना का? असे मत असेल तर मग सर्व मतांशी सहमत.

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 11:52 am | प्रसाद१९७१

गवि साहेब धन्यवाद. कोणी दुसर्‍या बाजूने विचार करावा इतकीच अपेक्षा होती.

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 12:00 pm | प्रसाद१९७१

दुर्दैवाने हे खालचे प्राणी वरच्या भक्षकांच्या अभावी बेसुमार वाढतात

हे जरी खरे असले तरी मानवा ने आता सुपर भक्षक हा रोल घेतला आहे. मधले भक्षक नाहीसे झाले तरी मानव चालवून घेइल. खालच्या काही भक्षका वर मानवाने मात केलीच आहे. आणि वेळ पडली तर करू शकतो इतकी साधने आहेत.

वर कुठेतरी प्रसाद यांनी मनुष्यजात आपली असल्याने ती टिकावी अश्या आशयाचा उल्लेख केल्याने हे लिहिले.

आता ज्या लेव्हल ला मनुष्य जात आली आहे, ते बघुन ती छोट्या मोठ्या कारणानी नष्ट होणार नाही. लोकसंख्या कमी होउ शकते पण नष्ट होणार नाही हे नक्की. खरे तर लोकसंख्या कमी होणे हा बॅलंसिंग अ‍ॅक्टच असेल.

मानव जात नष्ट करायची तर धुमकेतू किंवा तत्सम काही येउन पृथ्वी वर आदळणे, सुर्यात काहीतरी बदल होणे, प्रचंड आण्विक युद्ध होणे असले काहीतरी कारण लागेल.

शेवटच्या विधानाशी असहमती.

उंदीर वर्षभर वितात आणि चक्रवाढीने भयप्रद फास्ट वाढतात (संख्येने).

डास , उंदीर, झुरळे आणि तत्सम प्राण्यांचा चिवटपणा मानवापेक्षा अनेकपट जास्त आहे. त्यांच्या बिळाबिळात आणि हरेक वसतीस्थानात शिरुन त्यांना नष्ट करणे आणि तेही स्वत:वर साईड इफेक्ट्स होऊ न देता, इतके सुप्परकिलर आपण अजून झालेलो नाही.

गेल्या कित्येक वर्षांत नवीन प्रकारचे ॲंटिबायोटिक आलेले नाही. ड्रग रेझिस्टंट सूक्ष्मजीवसुद्धा आपलं अस्तित्व पुसू शकतात.

आपण इतर जीवांना अंडरएस्टिमेट करतो.

आपली लोकसंख्या कितीही जास्त असली तरी थोड्या दीर्घकालीन स्कोपमधे आपण सर्वात एंडेंजर्ड स्पेसीज आहोत. आणि आपल्या कवचाबाहेर सर्वात अनफिटही.

चिगो's picture

22 Jun 2015 - 9:34 pm | चिगो

गविसाहेबांशी १००% सहमत..

डास , उंदीर, झुरळे आणि तत्सम प्राण्यांचा चिवटपणा मानवापेक्षा अनेकपट जास्त आहे. त्यांच्या बिळाबिळात आणि हरेक वसतीस्थानात शिरुन त्यांना नष्ट करणे आणि तेही स्वत:वर साईड इफेक्ट्स होऊ न देता, इतके सुप्परकिलर आपण अजून झालेलो नाही.

आपणच तेवढे 'अ‍ॅडॉप्टीव्ह'आणि बाकी सगळे प्राणी मात्र बदलांशी जुळवून घेऊ शकत नाही, हा दंभ खोटा आहे. उंदीर, घुशी, डास, ढेकूण तर सोडाच पण साधे विषाणू/जिवाणू जे डोळ्यांनी दिसत नाहीत तेपण 'रेसिस्टंट' होतातच की..मग काय, विषाचा डोस वाढवा. ते आणखी रेजिस्टंट होतात, आणि आपण आपल्याच ताटात वाढत्या प्रमाणात विष कालवत जातो.
एक प्राणी दुसर्‍या प्राण्याला खातो. त्याला मारण्यासाठी त्याच्यावर फवारे सोडत बसत नाही. आपले अन्न जमिनीतून येते. 'सुपरकीलर' मानवाच्या ढवळाढवळीमुळे नैसर्गिक अन्नसाखळी तुटल्याने जी अपरंपार वाढ किडे, साप, घुशी, उंदीर, पाली, डास ह्यांची होणार, त्यांना मारण्यासाठी आपण विषारी औषधे वापरुन वातावरणात विष कालवणार. हे प्राणी जर त्या विषाचा प्रतिकार न करता आल्यामुळे मेलेत (जे की शक्य वाटत नाही) तर त्यांच्या कु़जण्यामुळे जमिनीत विषाची मात्रा वाढणार.. आताही आमच्या पाण्यात आणि खाण्यात 'पेस्टीसाईड्स' आहेतच की.. ह्या सगळ्यापेक्षा पर्यावरणाची काळजी घेतलेलीच काय वाईट म्हणतो मी?

बाकी ज्याच्या त्याच्या आनंदाच्या परिभाषा वेगळ्या असतात. पण कुठल्याही सच्च्या पर्यावरणवाद्यासोबत जंगलात भटकणे हा अनुभव अत्यंत आनंददायक आणि ज्ञानवर्धक असतो हे स्वानुभावावरुन सांगतो.

एस's picture

26 Sep 2014 - 9:23 pm | एस

राजीव साने यांच्या ज्या लेखाचा तुम्ही उल्लेख केला आहे तोही तितकाच एकांगी आणि पर्यावरणवाद्यांची मूळ भूमिका काय आहे हे विचारात न घेता केवळ पर्यावरणवादाला येनकेनप्रकारेन खोडून काढण्याचा प्रयत्न आहे. त्या लेखाचा इथे प्रतिवाद करण्याचे कारण, उपयोजन आणि औचित्य अजिबात नसले तरी माझ्या मूळ शिकारीला विरोध या विषयाचा एकूण पर्यावरणवाद करून त्याला फाटे फोडण्याच्या प्रयत्नांना कुठेतरी थोपवावे म्हणून त्यातील मुद्यांचा थोडक्यात परामर्श येथे घेतो.

साने सुरूवातीलाच असे म्हणतात -
निसर्गसौंदर्य हासुद्धा मानवी संवेदनांनी आणि कल्पनांनी घातलेला 'घाट' असतो. क्रौर्य व विध्वंस नको वाटणे, सुसंवाद व सौंदर्य हवेसे वाटणे या निखळ मानवीच भावना आहेत. निसर्गनियमांत त्यांना तसूभरसुद्धा स्थान नाही.

- अर्धे बरोबर. विध्वंस शक्य होईल तेवढा टाळणे, सुसंवाद आणि सौंदर्य या भावना प्राण्यांमध्येही दिसतात.

मनुष्याचा मुख्य स्वभावधर्म, अंतर्बाहय़ कृत्रिमता निर्मिणे हाच आहे. कृत्रिमतेला हीनार्थ चिकटविणे, म्हणजे संस्कृती (आंतरिक) व समृद्धी (बाहय़) या दोन्हींना नाकारणे होय.

- याच कृत्रिमतेचा ते नंतर सोयीस्कर असा अर्थ लावतात आणि पर्यावरणवाद्यांना कसलीच कृत्रिमता नकोय असा खोटा आरोप करतात.

...या संदर्भात जागरूक राहणे, एवढाच अर्थ जर पर्यावरणवादाला असेल, तर त्याविषयी तत्त्वत: कोणतीच तक्रार असण्याचे कारण नाही. अशा सुयोग्य पर्यावरणवादाला आपण 'मानवकेंद्री व प्रबुद्ध-आर्थिक पर्यावरणवाद' असे म्हणू.

- पर्यावरणवाद्यांची हीच आणि त्याही पलिकडे जाऊन त्याचप्रकारे पर्यावरणाच्या हक्कासाठीही तसेच जागरूक राहणे हीसुद्धा भूमिका आहे. मानव आणि पर्यावरणातील इतर घटक यांतील सुसंवाद किंवा योग्य ताळमेळ राखूनही विकास करता येतो हे वेळोवेळी सप्रमाण सिद्धही करून दाखवले आहे. केवळ मानवातील काही घटकांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी पर्यावरणाची हानी होऊ देणे आणि त्याचे जे काही विपरीत परिणाम असतील ते मात्र संपूर्ण समाजाला भोगायला लावणे हा दांभिकपणा आहे हेच पर्यावरणवाद्यांचेही म्हणणे आहे.

'खुद्द निसर्गाला एक सम्यक अवस्था असते व ती मानवामुळे ढळते,' ही चक्क एक अंधश्रद्धा आहे.

इथे जी काही सम्यक व्यवस्था वगैरे शब्द सान्यांनी वापरले आहेत त्याचा सोप्या इंग्रजीत अर्थ होतो इक्विलिब्रियम. ह्या इक्विलिब्रियमचे वैशिष्ट्य म्हणजे तो त्याची स्वतःची बदल घडण्याची एक प्रवृत्ती असते. सान्यांच्या शब्दांत 'सहजप्रवृत्ती'. अगदी बरोबर. पण मानवामुळे ती ढळते किंवा ढळू शकते हे मान्य न करणे हे साने कुठल्या झापडबंद प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात हे सांगते.

आजच्या मानवामुळे जीववैविध्य कमी होत असल्याची ओरड आहे. खरे तर मनुष्याची एन्ट्रीच झालेली नसताना, भयानक नसíगक आपत्ती, जसे की पृथ्वीतील लाव्हय़ाची उलथापालथ, हिमयुग, उल्कावर्षांव इत्यादींमुळे, जीववैविध्याचे प्रचंड विनाश होऊन गेलेले आहेत. अशा घटना यापुढे होणार नाहीत याचीही शाश्वती नाही. मोठय़ा पीछेहाटी झेलूनही उत्क्रांती, पुन:पुन्हा तिच्या मंद वेगाने चालू राहून, येथवर पोहोचली आहे.

हम्म. बरोबर. ह्याच नाण्याची दुसरी बाजू जिच्याकडे साने सोयीस्कर दुर्लक्ष करतात ती म्हणजे मानवाच्या हस्तक्षेपामुळे उत्क्रांतीच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त वेगाने जीवसृष्टीचा होणारा र्‍हास. ही बाब तुम्हीही तुमच्या दुसर्‍या प्रतिसादात उद्धृत केली आहे.

एकूण जग हे सुव्यवस्था (कॉसमॉस) आणि अनागोंदी (केऑस) या दोन्हींनी युक्त आहे, हे मान्य केले पाहिजे. मुळात, शुद्ध कॉसमॉसच असते, पण मानवी स्वार्थाद्वारेच 'कली' शिरावा तसा केऑस शिरतो, हे खरे नाही. उलट कॉसमॉस बांधण्याची ओढ ही मानवी 'ऋतेषणा' (रॅशनॅलिटी-हंगर) होय.

पुन्हा एकदा चुकीचे विधान. मानवी स्वार्थाद्वारे केऑसला त्याच्या नैसर्गिक (पुन्हा सान्यांनीच वापरलेल्या अर्थाने) प्रमाणापेक्षा कितीतरी पटींने जास्त विनाशकारी सामर्थ्य आणि परिणाम प्राप्त होतो.

पर्यावरणवाद्यांतील, 'माणूसघाणे निसर्गप्रेमी', वरील अर्थाची फिरवाफिरवी करून, असा 'सिद्धान्त' पसरवतात की, 'जे कृत्रिम (३) असते ते विकृत (४) असते आणि त्यामुळे स्वाभाविकतेचा (२) भंग होऊन भौतिक-संतुलन ढळून (१) विनाश अटळ आहे.'

हा अर्थ सान्यांनी कोणत्या विदाच्या आधारे काढला आणि पर्यावरणवाद्यांमधील त्यांच्या दृष्टीने असे माणूसघाणे निसर्गप्रेमी किती प्रमाणात आहेत याचे ते कोणतेही स्पष्टीकरण देत नाहीत. मुळात पर्यावरण चळवळींमध्ये अशा टोकाच्या विचारसरणीच्या लोकांची संख्या त्यामानाने तुरळक आहे आणि कुठलाही खरा पर्यावरणप्रेमी सान्यांनी वर जो अर्थ काढला आहे तसा पर्यावरणवादाचा इतका संकुचित अर्थ सांगत नाही.

सम्यक-निसर्ग नावाची, नसलेलीच गोष्ट राखण्याकरिता, माणसांना विकासापासून वंचित ठेवण्याचा, कोणालाही अधिकार नाही.

हे शेवटचे वाक्य फार महत्त्वाचे आहे कारण सान्यांची या प्रश्नावरची एकूण तात्त्विक बैठक कशी आली हे ते स्पष्ट करते आणि त्यांना नेमके काय म्हणायचे आहे हेही सांगते.
सम्यक-निसर्ग अशी कुठलीच गोष्ट नाही - त्याचा जो अर्थ सान्यांना अपेक्षित आहे तितकी संकुचित आणि गोठलेली नाही.
पर्यावरणवाद हा माणसांना विकासापासून वंचित ठेवतो - चूक. हा गोबेल्सवादी खोटेपणा झाला. तुम्ही धरणे बांधू नका, रस्ते बांधू नका, घरे बांधू नका, कारखाने उघडू नका वगैरे खुळचट टोकाची भूमिका पर्यावरणवाद घेतच नाही. हे सगळे करताना केवळ तुम्ही तुमच्यासारख्याच पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेल्या इतर घटकांना आणि पर्यायाने भविष्यातील मानवजातीलाच उद्ध्वस्त तर करत नाहीत ना याचा एकदा सम्यक विचार करा इतपतच आमचे म्हणणे आहे. आणि तसा विचार करूनही पर्यावरणपूरक विकास करणे हे शक्य आहे असा आमचा ठाम विश्वास आहे.

जाताजाता - ज्या विकासाचे टुमणे असे लोक लावतात त्या विकासाचे फायदे समाजातल्या सर्व घटकांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवणे याकडे मात्र ते लक्ष देत नाहीत. नाहीतर यांचा विकास म्हणजे मूठभर लोकांच्या तात्कालिक फायद्यासाठी केलेली पर्यावरणाची अनिर्बंध मोडतोड एवढाच असतो. अशा विध्वंसाचा तोटा पर्यावरणाव्यतिरिक्त जर कुणाला होत असेल तर तो होतो मानवातल्या दुर्बळ, गरीब घटकांना. अमेरिका ओझोन वायूचा थर उध्वस्त करत आहे आणि मालदीव, बांगलादेश, ओशियानिया सारखे भाग पाण्याखाली जात आहेत.

इत्यलम.

राही's picture

22 Jun 2015 - 11:29 pm | राही

हा लेख उशीरा वाचनात आला.
प्रसाद यांचे प्रवाहाविरुद्ध पोहोण्याचे धैर्य वाखाणण्याजोगे आहे. मलाही कधी कधी पर्यावरणवाद हा माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला विचार वाटतो. माणूस व्यवस्थित राहिला पाहिजे, त्याला अन्नधान्यनिवारा व्यवस्थित मिळाला पाहिजे म्हणून पर्यावरण राहिले पाहिजे हा केवळ 'स्वान्तसुखाय' विचार नाही वाटत? अब्जावधी वर्षांमध्ये घडत आलेल्या, चालत आलेल्या निसर्गामध्ये माणूस हा कोण मोठा टिकोजीराव की त्याने त्याच्या भल्यासाठी असं घडावं, तसं घडावं हे ठरवावं? मानवप्राणि हा देखील या परिसृष्टीचाच एक भाग आहे हे एकदा मान्य केलं की त्याचे सगळे व्यापार-व्यवहार हे त्या परिसृष्टीचाच एक भाग बनून जातात. तसेही निसर्गातली कोणतीही हालचाल, आपले श्वास-उच्छ्वास, वार्‍याने होणारी पानांची सळसळ, वाहाणारे पाणी, कोसळणारे कडे, वाहती हवा हे सर्व परिसृष्टीमध्ये एक डिस-ऑर्डर निर्माण करते, जी इर्रिवर्सिबल असते. त्यामुळे प्रत्येक क्षणाला परिसृष्टी बदलते, पूर्वीची राहात नाही. किंबहुना प्रत्येक सृजन किंवा सर्जन हे ऊर्जेचे उत्सर्जन असते. ही एन्ट्रॉपी वाढतच असते. अब्जावधी वर्षे हे चालू आहे. क्रिस्टियनांच्या 'इंटेलिजन्ट डिज़ाइन'च्या तत्त्वानुसार या सृष्टीच्या केंद्रस्थानी मानव आहे आणि ती मानवाच्या कल्याणासाठीच आहे. त्याने तिचा उपभोग घ्यावा. हे आपल्याला अर्थात विपरीत वाटते, आणि तसे ते आहेही. अमर्याद उपभोग कुठेही अनुस्यूत नाही. पण मानवाच्या नैसर्गिक ऊर्मीपूर्तीसाठी होणार्‍या क्रिया ह्या नैसर्गिकच मानायला हव्यात, असे हे त्रांगडे आहे. नैसर्गिक काय आणि किती हे कोण ठरवणार? जर प्रत्येक क्रियेला परिसृष्टीचे नियम लागू होणारच असतील, तर नैसर्गिक-अनैसर्गिक हा भेद राहातच नाही. मानवाने स्वतःला फार ग्रेट समजू नये, सृष्टीच्या (म्हणजे पर्यायाने स्वतःच्याच) भल्यासाठी मी यंव करीन, त्यंव करीन असा आवही आणू नये. मानवासकट शेवटी सगळा निसर्गच आहे आणि तो त्याच्या प्रकृतीनुसारच अस्तित्वात राहाणार.
फार अधाशीपणा करू नये, इतकेच फारतर मानवाकडून अपेक्षिता येईल. (तेन त्यक्तेन भुञ्जीथा: वगैरे, पण 'भुञ्जीथा:' हे आहेच.)

तुमच्या प्रतिसाद देण्याच्या आंतरिक उर्मीबद्दल धन्यवाद. यातील सर्व विरोधाभास आणि आक्षेपांना या धाग्यात व प्रतिसादांत उत्तर दिले असल्याने स्वतंत्र काही टंकण्याजोगे नाही.

फक्त एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, इथे बर्‍याचजणांना या व्यक्तीचे तथाकथित 'प्रवाहा'विरुद्ध भूमिका घेण्याचे कौतुक वाटते आहे. हा 'प्रवाह' खरेतर एका अजस्र 'सुनामी' ला थोपविण्याची मूठभर लोकांची विवेकपूर्ण धडपड आहे. प्रत्येक सेकंदाला एक एकर एवढ्या जंगलाचा विनाश हे या सुनामीचे उदाहरणार्थ अक्राळविक्राळ विनाशकारी रूप आहे.

असो. इतरत्रप्रमाणेच इथेही पर्यावरणाच्या संवर्धनाची कळकळ असणारे अगदी मोजकेच लोक आहेत हे पाहून आता आश्चर्य वाटायचे बंद झाले आहे. हरकत नाही. 'एकला चलो रे!'

राही's picture

23 Jun 2015 - 12:07 pm | राही

आपण एकटे नाही आहात. उलट आपल्या विचारधारेचा एक शक्तिशाली प्रवाह बनला आहे. त्यात काही प्रवाहपतित असतील, पण बहुतेकजण आपापल्या विवेकाने त्यात पडले आहेत. 'अ‍ॅक्ला चालो रे' आहे ते आमच्यासारख्या मूठभर खुळ्या लोकांसाठी.
विश्वातली प्रचंड ऊर्जा केवळ नि केवळ फक्त आपल्यासाठी, आपल्याकडे वळवण्याच्या मानवाच्या स्वार्थी धडपडीला दुसरे काय म्हणणार? गाय टिकली पाहिजे कारण ती चांगली असते कारण ती आपल्याला दूध देते.(वास्तविक ते मुळात आपल्यासाठी नसतेच. आपण दुधाला अ‍ॅडाप्ट आणि अ‍ॅडिक्ट करून घेतलेले आहे.) सृष्टी टिकली पाहिजे, (म्हणजे काय?) कारण ती 'आपल्याला' जगवते. पर्यावरणचळवळीचा बहुतेक भाग हा मानवाच्या उपयुक्ततेशी निगडित आहे. सृष्टिरक्षणाशी नाही. मानव कोण बापडा सृष्टीचे रक्षण करणारा? तो स्वतःच सृष्ट आहे, निर्मित आहे. सर्वाय्वल ऑव्ह द फिटेस्ट हे मानले तर जीवनसंघर्षात टिकण्यासाठी जो जास्तीतजास्त समर्थ असेल तो टिकेलच. मग तो मानव असो वा इतर कोणी. मानव त्याच्या दृष्टीने सकारात्मक असलेल्या कृतींनीही निसर्गात प्रचंड लुडबूड करीत असतो. वाळवंटात नंदनवन फुलवणे ही अशीच एक मानवाला भुरळ पाडणारी कविकल्पना. पहाड तासून लेणी कोरणे, सात टेकड्यांवर रोम उभारणे, त्यात अ‍ॅक्वेडक्टद्वारे दूरचे पाणी रोम कडे वळवणे, सात बेटांची एक मुंबई बनवणे, इंदिरा गांधी कालव्याद्वारे थरच्या वाळवंटात किंवा सरदारसरोवराद्वारे कच्छ-सौराष्ट्रच्या पाश्चर्लँड्स मध्ये पाणी पोचवणे, तिथल्या मालधारी जनजातींची जीवनशैली बदलून त्यांना कृषिप्रधान बनवणे, पनवेलजवळच्या खाजणांमध्ये विमानतळ बांधणे ही सर्व मानवाने त्याच्या भल्यासाठी निसर्गात केलेली लुडबूड आहे. मानव त्याच्या समजुतीनुसार त्याच्या कल्याणासाठी हेच करीत आला आहे आणि सांप्रत यालाच आपण पर्यावरणविनाश हे नाव देतो.
शेवटी, आधीच्या प्रतिसादातले शेवटचे वाक्य पुन्हा एकदा, 'तेन त्यक्तेन भुञ्जीथा:' हे आपल्याला आपणच सांगून ठेवले आहे, तेच खरे आहे. ते म्हणजे हाव न धरता निसर्गाकडून हवे तितके घ्यावे आणि उत्क्रांत व्हावे. 'अनेन प्रसविष्यध्वम्,एष वोsस्त्विष्टकामधुक्' हे यज्ञाला उद्देशून असले तरी यज्ञ म्हणजे सॅक्रिफाइस हा अर्थ इथे अगदी लागू पडतो.

मला आपला प्रतिसाद वाचून बुचकळ्यात पडल्यासारखे वाटले. आपण नक्की कोणती बाजू घेत आहात?

"पर्यावरणचळवळीचा बहुतेक भाग हा मानवाच्या उपयुक्ततेशी निगडित आहे. सृष्टिरक्षणाशी नाही." हे विधान म्हणजे एक अत्यंत चुकीचा निष्कर्ष आहे. संपूर्ण पर्यावरण चळवळ ही तुमच्याच प्रतिसादातील शेवटच्या भागात आलेल्या 'सस्टेनेबल को-एक्झिस्टन्स' या तत्त्वावर उभी आहे. या चळवळीचा लढा अशा लोकांविरुद्ध आणि तत्त्वप्रणालीविरुद्ध उभा आहे ज्यात वैयक्तिक नफा आणि सामुदायिक उत्तरदायित्व हा पाखंडीपणा आहे.

राही's picture

23 Jun 2015 - 1:07 pm | राही

मला असे वाटते की पर्यावरणविनाशाचा जरूरीपेक्षा जास्त बाऊ केला जात आहे.
'जगा आणि जगू द्या' ह्यातही अंतर्विरोध आहेच. जगा म्हणजे मानव/प्राण्यासाठी सुखेनैव जगा, विस्तारा. वंशविस्तार ही आदिम प्रेरणा आहेच. त्यासाठीचे आवश्यक रिसोअर्सेस वापरणे हेही आदिमच. आवश्यकतेचे मोजमाप त्या त्या काळासाठी वेगवेगळे असू शकेल. को-एक्ज़िस्टन्स नेहमीच शक्य असेल असे नाही. सुखकरत्वासाठी मानव/प्राणि नेहमीच धडपड करीत राहाणार. कृष्णाने नंदभूमी सोडून ब्रजभूमीकडे प्रस्थान केले तसेच मानव/प्राणीही ग्रीनर पाश्चर्सकडे करत राहाणार. नव्या संधी, नवी जागा, नव्या कृती अजमावीत राहाणार. हाच विकास आणि हाच पर्यावरणविनाश. ही रस्सीखेच चालूच राहाणार. अवकाशात उपग्रह सोडल्याने तिथले पर्यावरण दूषित होत नाही काय? पण त्याचे 'मानवाच्या बुद्धीची झेप' म्हणून आपण कौतुक करतो. ही मानवाच्या मेंदूची उत्क्रांती असे मानले तर पर्यावरण गौण ठरते. तेव्हा हे सर्व परस्परविरोधी आहे. विश्वाच्या प्रचंड उलाढालीत मानवाच्या हालचालींमुळे खरोखर किती फरक पडत असेल?
अधाशीपणाने ओरबाडू नये असे म्हटले तरी अधाशीपणाची व्याख्या कोण करणार? विमानाऐवजी रेल वे वापरणे, कार वापरणे, बैलगाडी वापरणे ह्यातले कोणी काय वापरावे हे कसे ठरवणार? हे एक अतिशयोक्त उदाहरण झाले. पण त्याने मूळ मुद्दा पर्यावरणविनाशाची फार हाकाटी करू नये हे सिद्ध होऊ शकेल.

पर्यावरणविध्वंसवादी शक्तींचे हे जुनेच अस्त्र आहे. त्यात नवीन काही नाही.

केवळ गेल्या शे-दिडशे वर्षांत जगभरातल्या जंगलांखाली असणार्‍या क्षेत्रात किती वेगाने घट झाली आहे ह्याची आकडेवारी शोधून पाहिल्यास पर्यावरणविनाश आणि त्याचे भयानक परिणाम यांच्या सत्यासत्यतेबाबत विवेकी लोकांची खात्री पटेल. (ज्यांचा विवेक हा स्वार्थाच्या झापडीत बंद आहे त्यांना हे नेहमीच खोटे वाटेल आणि अशांना जागे करत बसण्याची माझी मुळीच इच्छा नाही.)

अधाशीपणा कसा ठरवायचा हे जगभरातील न्यायाधिकरणांना आणि आदिम रहिवाशांना व्यवस्थित समजते. सुंदरबनातील जंगली मध गोळा करणार्‍या स्थानिक लोकांना एवढे नक्कीच समजते की पोळ्याचा अर्धाच भाग काढावा म्हणजे मधमाशांनाही त्यांचे स्वतःचे अस्तित्त्व राखता येईल आणि लोकांनाही त्यांच्या गरजेपुरता मध दरवर्षी मिळत राहील. यालाच 'न ओरबाडण्याची व्याख्या' असे म्हणता येईल.

मी पुनःपुन्हा तेच सांगतोय की पर्यावरणविध्वंस हा केवळ काही श्रीमंत घटकांच्या फायद्याचा आणि तोही केवळ तात्कालिक फायद्याचा आहे. त्यातून अखिल पृथ्वीचा पर्यावरण समतोल आणि मानवजातीचे इतर सजीवप्रजातींसोबतचे सहजीवन ही उद्दिष्ट्ये कधीही साध्य होणार नाहीत.

प्रचेतस's picture

24 Jun 2015 - 4:24 pm | प्रचेतस

राही आणि स्वॅप्स ह्या दोघांमधील चर्चा अतिशय आवडली.

राही's picture

25 Jun 2015 - 9:40 am | राही

धन्यवाद, प्रचेतस्.
(प्रचेतस् हे नाम अतिशय आवडले होते.)

पैसा's picture

25 Jun 2015 - 10:05 am | पैसा

माझ्या आयुष्याच्या काळात असा काय मोठा फरक पडणार आहे? असा विचार आपण माणसे करत असू. पण तो काळ पुरेसा जास्त झाल्यावर लक्षात येण्यासारखे परिणाम दिसतात. म्हणजे काही प्रजाती नष्ट होणे, चांगल्या सुपीक जमिनीच्या जागी वाळवंट तयार होणे वगैरे.

माणूस विषाणूंना नाहिसे करायचा प्रयत्न करतो तसे ते स्वतःमधे बदल घडवून आणतात आणि औषधांना दाद देत नाहीसे होतात. काय माहित, काही वर्षांनी अशी एखादी साथ येईल की ज्यात सगळी मानवजात नष्ट होऊन जाईल?