काळू बाळू

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
26 Apr 2014 - 8:33 pm

Kaloo Baloo

कधीकाळी लहान असताना दूरदर्शनवर काळूबाळूचा तमाशा - वगनाट्य पाहील्याचे आठवते. कदाचीत मुलाखती देखील ऐकल्या असतील. पण विसरून गेलो होतो. आत्ता म.टा. मधे तमाशा कलावंत 'बाळू' कालवश बातमी वाचली. काळू चे २०११ ला निधन झाले आणि ८२ वर्षीय बाळूचे काल निधन झाले... त्यातली माहीती वाचताना लक्षात आले की असे रुढार्थाने माध्यमात प्रसिध्दीत नसलेले कलाकार पण न बोलता समाजासाठी कसे काम करत असतात.

म.टा. मधील बातमीतील काही महत्वाचा भाग खाली चिकटवत आहे...

दरवर्षी ठिकठिकाणच्या यात्रांतून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे. अर्ध शतकाहून अधिक काळ रसिकांवर अधिराज्य गाजविलेल्या या जोडीने तमाशातून अस्पृश्यता, अंधश्रध्दा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातही वगनाट्याद्वारे सतत संदेश देण्याचा प्रयत्न केला.

अनेक मंदिरे, शाळांना त्यांनी आपल्यापरीने मदतही केली. रयत शिक्षणसंस्थेच्या कवलापूर शाखेलाही भरीव आर्थिक मदत केली, इतकेच नव्हे तर मोफत कार्यक्रम देऊन निधी गोळा करण्यास हातभार लावला.

वयाच्या सोळाव्या वर्षापासून 'काळू-बाळूंनी' वगनाट्य पेश करायला सुरुवात केली. हजरजबाबीपणा त्यांच्या अंगाअंगात मुरला होता. त्यामुळेच जमलेल्या तमाशा शौकिनांवर ते लागलीच पकड घ्यायचे. विशेष म्हणजे १९६१ साली त्यांचा दिल्लीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर वगनाट्याचा कार्यक्रम झाला होता आणि इंदिराजींनी तो पाहून या दोघांचे कौतुक केले. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांनीही त्यांच्या पाठीवर सतत कौतुकाची थाप मारली.

१९९८ मध्ये त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तर २००० मध्ये संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळाला. पुणे महापालिकेतर्फे २००५ मध्ये लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार लाभला. लहान-मोठ्या अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे त्यांना पुरस्कार मिळाले.

एकदा तर काळूच्या मुलीचे भाजल्याने निधन झाले. बातमी कळली. पण दोघांनीही आपले दु:ख बाजूला ठेवून आधी ठरल्याप्रमाणे आपले तमाशा प्रयोग सादर केले. अशा कितीतरी महत्वपूर्ण घटना त्यांच्या जीवनात घडल्या.

या कलाकार बंधुंच्या जोडीस श्रध्दांजली.

कलासमाजमाध्यमवेधबातमी

प्रतिक्रिया

विकासजी, या धाग्याबद्दल धन्यवाद.

लहू संभाजी खाडे उर्फ काळू आणि अंकुश संभाजी खाडे उर्फ बाळू या विनोदवीर कलाकार बंधुंच्या जोडीस श्रध्दांजली.

एकदा तरी यांचा Live तमाशा पहायची इच्छा होती.
आंतरजालावर यांची कोठली विडीओ क्लीप सापडली नाही. होप, सीडी च्या दुकानात मिळेल.

किसन शिंदे's picture

26 Apr 2014 - 11:09 pm | किसन शिंदे

टिव्हीवर म्हणा किंवा कसाही, मला स्वत:ला यांचा कार्यक्रम कधी पाहायला मिळाला नाही, पण बाबांच्या तोंडून या दोन्ही कलावंतांचे नाव नेहमी ऐकायचो.

अंकुश संभाजी खाडे उर्फ बाळू यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2014 - 11:47 pm | तुमचा अभिषेक

काळू यांचे निधन २०११ साली झाले तेव्हा आईच्या तोंडून नाव ऐकले होते. स्वता मलाही बाकी काही माहीत नाही, फक्त कानावर काळू-बाळू जोडी असे नाव ऐकून होतो इतकेच.

कोणाला काही विडिओ लिंक सापडल्यास इथे टाका.

खेडूत's picture

27 Apr 2014 - 12:41 am | खेडूत

तीस वर्षांपूर्वी त्यांचं गाव आमच्या पासून जवळच असल्याने हे लोकनाट्य आमच्यां गावी नेहमी होत असे. जुळे असल्याने त्यांच्यात साम्य होतं आणि नेहमीच्या बोलण्यात पण कुणी माणूस ''एकदम एखाद्यासारखा दिसायला आहे'' हे सांगायचं तर ''एकदम काळू-बाळू सारखं'' असं बोली भाषेत रुजलं होतं. तोपर्यंत जुळे पाहिलेले नसल्याने कसे असतात याची उत्सुकता होती , पण दहाच वर्षाचे असल्याने आम्हाला तमाशा पाहण्याची परवानगी नव्हती. पण स्पिकर्स इतके जोरात असत की घरात सहज ऐकू येत असे. ते ऐकत झोप कधी लागायची कळत नसे. शाळेत दुसऱ्या दिवशी सविस्तर चर्चा होई- कारण वर्गातले बरेच जण रात्री तमाशा पाहून आलेले असत!

दूरदर्शन मध्ये ''आमची माती आमची माणसं'' मध्ये त्यांची जराशी सभ्य आवृत्तीतली स्कीटस- (झी च्या 'फू बाई फू' स्टाईल) दाखवत असत. पण तो त्यांचा पडता काळ सुरु झाल्यावर. दादा कोंडके सुद्धा त्यांच्या तमाशाला मुंबईत असेल तर रोज जात. त्याबद्दल विचारलं तर '' मलाही त्यांच्याकडून शिकायला मिळतं'' असं म्हणत.

सांगलीत नाट्य संमेलन होऊनही त्याना निमंत्रण पण दिलं नव्हतं त्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती.

त्याना श्रद्धांजली.

पैसा's picture

27 Apr 2014 - 12:04 pm | पैसा

खर्‍या लोककलावंताला श्रद्धांजली. गावातल्या त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना आपल्याला येणार नाही. पण एका काळात ते सगळ्यात लोकप्रिय कलाकार असावेत.

शुचि's picture

27 Apr 2014 - 3:28 pm | शुचि

खर्‍या लोककलावंताला श्रद्धांजली.

स्पंदना's picture

27 Apr 2014 - 3:34 pm | स्पंदना

गावात लग्नामधुन यांच्या तमाशाच्या कॅसेटस लावत. रात्रभर दंगा असायचा यांच्या कॅसेटस्चा. पण तमाशा असा पाह्यला कधीच नाही. ऐकलं आहे लहाणपणी. विनोदी असायचे यांचे वग अस वाटतय.
तरीही कलाकार तो कलाकारच. अन कलाकाराचा मानाचा मुजरा त्यांना अर्पित करत मी श्रद्धांजली वाहते.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2014 - 5:30 pm | अत्रुप्त आत्मा

दूरदर्शनवरच यांचे कार्यक्रम पाहिलेले अठवतात. ते ही २/३.

__/\__

अभिरुप's picture

28 Apr 2014 - 3:07 pm | अभिरुप

लहानपणी काळू-बाळू यांचे कार्यक्रम दूरदर्शनवर पाहिलेले पुसटसे आठवतात.

सुप्रसिद्ध लोककलावंत तमाशासम्राट बाळू यांना भावपू्र्ण श्रद्धांजली अन् मानाचा मुजरा.

बबन ताम्बे's picture

28 Apr 2014 - 3:24 pm | बबन ताम्बे

मी काळू बाळू यांचा तमाशा ३० वर्षांपूर्वी गावच्या जत्रेत पाहीला आहे. त्यांची वगनाट्यातली भूमिका धमाल आणायची. दोघांचेही विनोदाचे टाइमींग जबर्दस्त असायचे. पब्लिकला दोघेही प्रचंड हसवायचे.

भाते's picture

28 Apr 2014 - 5:13 pm | भाते

आजच्या मटामध्ये त्यांच्याविषयी लेख आला आहे.