आमचे मधुभाई...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
25 Jul 2008 - 4:07 pm

काही वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या सर्वेश सभागृहात मधुभाईंची एक अत्यंत रंगलेली मैफल. तबल्याच्या साथीला तालयोगी पं सुरेश तळवलकर. श्रोतृवर्गात पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर, पं अरूण कशाळकर, पं उल्हास कशाळकर आणि यांसारखे अनेक उत्तम कलाकार. यमन रागाने मैफलीला सुरवात व पुढे संपूर्ण मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेलेली! यमन, सावनी, बसंतबहार असे एकापेक्षा एक सुरेख राग मघुभाईंनी लीलया पेश केले व श्रोत्यांना स्वरलयीच्या आनंदात अक्षरश: न्हाऊ घातले. मी त्या मैफलीचा साक्षिदार होतो. मधुभाईंच्या काही मोजक्याच मैफली ऐकण्याचं परमभाग्य मला लाभलं आहे!

"बाजुबंद खुली खुली जाए.."

मधुभाईं अगदी रंगात येऊन भैरवीच्या सुरांची लयलूट करत होते. 'बाजुबंद...' मधल्या एकसे एक खानदानी, थेट 'दिलसे' आलेल्या जीवघेण्या जागा! जागा कसल्या, बाजुबंद, पाटल्या-तोडेच त्या! श्रोते मंडळी अक्षरश: चुकचुकत होती, हळहळत होती, रडत होती आणि त्या शापित यक्षाला दाद देत होती!

मधुकर गजानन जोशी, ऊर्फ पं मधुकर जोशी, ऊर्फ आमचे मधुभाई! गाण्यातला एक शापित यक्ष!
मुक्काम पोस्ट - डोंबिवली.

विलक्षण सांगितिक प्रतिभा लाभलेला एक गुणी कलाकार. पण लौकिक अर्थाने फारसा पुढे न आलेला, फारसा कुणाला माहीत नसलेला!

मधुभाईंना घरातनंच संगीताचं बाळकडू मिळालेलं. आजोबा पं अंतुबुवा जोशी. थोरल्या पलुसकरांच्या शिष्यपरंपरेतले ग्वाल्हेर गायकीचे एक दिग्गज गवई! वडील पं गजाननबुवा जोशी. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकी पचवलेले एक अत्यंत प्रतिभावन गवई आणि तेवढेच थोर गुरू! पं उल्हास कळाळकर, पं अरूण कशाळकर, विकास कशाळकर, पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर यांसारख्या गायकांना ज्यांनी घडवलं असे गजाननबुवा! घरातच गाणं असल्यामुळे साहजिकच संगीताचे सूर मधुभाईंच्या कानावर जन्मापासूनच पडलेले.

कुशाग्र बुद्धीचा मधु भराभर गाणं उचलू लागला, टिपू लागला. भूप, यमन, मुलतानी, हमीर, छायानट, शंकरा, बिहाग, बसंत, सोहोनी आदी राग मधुभाईंच्या गळ्यावर चढू लागले आणि खास ग्वाल्हेर परंपरेचं अष्टांगप्रधान गाणं मधुभाई गाऊ लागले. गजाननबुवांना ग्वाल्हेरसोबतच आग्रा आणि जयपूरचीही अतिशय उत्तम तालीम मिळालेली, त्यामुळे मधुभाईंनाही साहजिकच या गायकींचं बाळकडू घरातच मिळालं! रायसा कानडा, ललिता गौरी, शुद्धनट, बसंतीकेदार यांसरखे एकापेक्षा एक सुरेख व दिग्गज राग मधुभाईही लीलया गाऊ लागले, मांडू लागले! सूरलयतालावर मधुभाईंची अफाट हुकुमत निर्माण झाली. बालपणीची काही वर्ष आजोबांकडूनही, म्हणजे अंतुबुवांकडूनही मधुभाईंना तालीम मिळाली. त्यानंतर वडिलांचं,म्हणजे गजाजनबुवांचं गाणं मधुभाईंनी अक्षरश: टिपलं, वेचलं! मुळात घरात गाणं, रक्तात गाणं, त्यात उत्तम तालीम आणि त्याला जोड म्हणून मधुभाईंची कुशाग्र बुद्धी! मधुभाईंमधला उत्तम गवई घडवायला या गोष्टी पुरेश्या होत्या!

गाण्याच्या सोबतीनेच व्हायोलीनचाही छंद मधुभाईना जडला आणि मधुभाई व्हायोलीनदेखील अतिशय उत्तम वाजवू लागले. गजाननबुवा स्वत:ही अगदी उत्तम व्हायोलीन वाजवायचे. लेकाने वडिलांचा हाही गूण अगदी सहीसही उचलला. पुढे काही वर्ष व्हायोलीनवादक म्हणून स्टाफ आर्टिस्ट या पदावर मधुभाईंनी मुंबई आकाशवाणीवर नोकरीही केली! मधुभाई व्हायोलीनही फार सुरेख वाजवतात!

मला मधुभाईंची मुलुंड मध्ये झालेली एक गाण्याची मैफल आठवते. मधुभाईंनी तेव्हा भूप मांडला होता. इतका अप्रतीम भूप मी त्यानंतर आजतागायत ऐकलेला नाही! ग्वाल्हेर पद्धतीने सादर केला गेलेला अगदी ऑथेन्टिक भूप! भूपासारख्या अत्यंत अवघड रागाचं शिवधनुष्य मधुभाईंनी अगदी लीलया पेललं होत! त्याच मैफलीत मधुभाईंनी तेवढ्याच सुंदरतेने ललितागौरी मांडला. 'प्रितम सैया..' ही ललितागौरीतली पारंपारिक बंदिश! ओहोहो, क्या बात है! मधुभाईंच्या ललितागौरीतल्या त्या "प्रितम सैया, दरस दिखा..."च्या त्या विलक्षण सुरांनी त्या संध्याकाळी अक्षरश: अंगावर काटा आणला. सगळी मैफलच त्या ललितागौरीने मंत्रमुग्ध होऊन गेली! आधी ग्वाल्हेर परंपरेतला भूप, ग्वाल्हेर गायकीच्या सौंदर्याची उधळण करत गाणारा हा शापित यक्ष नंतर जेव्हा त्याच ताकदीने जयपूर गायकीही तेवढ्याच समर्थपणे मांडत ललितागौरीही गाऊ लागला तेव्हा श्रोतृवर्ग अक्षरश: थक्क झाला. आजही ती मैफल मला आठवते आणि मी बेचैन होतो!

मंडळी, माझं भाग्य हे की मला मधुभाईंचा अगदी भरपूर सहवास लाभला. त्यांच्याकडून मला गाण्यातलं खूप काही शिकायला मिळालं आहे, आजही मिळतं आहे! अगदी कधीही त्यांच्या घरी जा, मधुभाई अगदी हसतमुखाने स्वागत करणार! मंडळी तुम्हाला काय सांगू, आमचे मधुभाई स्वभावानेही अगदी साधे हो! वास्तविक इतका विद्वान गवई परंतु त्या विद्वत्तेचा कुठेही गर्व नाही की शिष्टपणा नाही!

"मधुभाई, जरा ती यमनमधली "नणंदीके बचनवा सहे ना जाय.." ही बंदिश दाखवा ना!" असं नुसतं म्हणायचा अवकाश की लगेच मधुभाईंनी केलीच सुरू ती बंदिश! आणि मग ती गातांना तिचं सौंदर्य कुठे आहे, कुठे आघात द्यावा, शब्दांचा कसा कुठे उच्चार करावा, एखाद्या रागाकडे कसं बघावं, रागात काय मांडावं, कसं मांडावं, तालालयीचे हिशेब कसे साभाळावेत, कुठल्या रागाचं किती पोटेन्शियल आहे ते ओळखून कसं गावं, इत्यादी अनेक गोष्टींवर मधुभाई अगदी भरभरून बोलतात, हातचं काहीही राखून न ठेवता शिकवतात!

"अरे ताला-लयीशी खेळा रे, पण तिच्याशी मारामार्‍या नका करू! सम कशी सहज आली पाहिजे, तिला मुद्दामून ओढून-ताणून आणू नये! हां, आणि समेवर येण्यात वैविध्य पाहिजे, एकाच एक पद्धतीने समेवर येऊ नये! तुम्ही एखाद्याशी बोलताय, संवाद साधताय असं गायलं पाहिजे!"

मधुभाई सांगत असतात, शिकवत असतात, आम्ही शिकत असतो!

एका शिष्येला गाण्याची तालीम देताना मधुभाई -

आमच्या मधुभाईंचा स्वभावही अत्यंत बोलका आहे. सतत गाण्यातल्या कुठल्या ना कुठल्या विषयावर गप्पा मारतील, गजाननबुवांच्या, अंतुबुवांच्या, अन्य जुन्याजाणत्या बुजुर्गंच्या आठवणी सांगतील. मधुभाईंनी गाण्यातला खूप मोठा जमाना बघितला आहे, अनेक दिग्गज गवई अगदी भरभरून ऐकले आहेत. जगन्नाथबुवा, अण्णासाहेब रातंजनकर, मिराशीबुवा, कितीतरी गवयांची गाणी मधुभाईंनी अगदी भरभरून ऐकली आहेत! आणि घरात काय, साक्षात अंतुबुवा आणि गजाननबुवा! या सग़ळ्या मंडळींकडून मधुभाई खूप काही शिकत गेले, शिकले!

"अरे गजाननबुवांना मी फार घाबरायचो बरं का! खूप मार खाल्ला आहे मी बुवांच्या हातचा!" मधुभाई मोठ्या मिश्किलपणाने आपल्या वडिलांबद्दल बोलत असतात! :)

"काय सांगू तुला लेका, आमच्या नानांच्या (गजाननबुवांच्या) वार्‍यालाही मी फारसा उभा रहात नसे. शिक म्हटलं की चुपचाप शिकत असे. उल्हासला, पद्माला किंवा त्यांच्या इतर शिश्यांना तालीम द्यायचे तेव्हा मीदेखील तिथे हळूच जाऊन बसत असे आणि काय गातात,कसं गातात या सगळ्या गोष्टी टिपत असे! पण मी भाग्यवान रे, मला शेवटची काही वर्ष वडिलांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं! म्हातारपणी त्यांच्या हातापायांना मालिश करावं लागत असे तेव्हा त्यांना मीच लागायचो. दुसरी कुणी भावंडं गेली की म्हणायचे, तुम्ही नको, मधुला बोलवा!" तीच सेवा आज थोडीफार उपयोगी पडते आहे आणि चार स्वर गाता येत आहेत!"

खरंच मंडळी, गाण्याची अन् गाणार्‍यांची ही विलक्षणच दुनिया आहे. भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर या दुनियेतली कुळं निराळी, इथले कुळाचार निराळे! मधुभाईंसारख्या जिनियस गवयाचा उल्लेख मी काही वेळा 'शापित यक्ष' असा का केला आहे याची कारणमिमांसा मी इथे करणार नाही! पण कारणमिमांसा जरी करणार नसलो तरी तो एक शापित यक्ष आहे हे नाकारता येणार नाही व म्हणून फक्त तसा उल्लेख मात्र मला करणं भाग आहे, नव्हे तो मी मुद्दामून केला आहे! परंतु बस इतकंच! लौकिक अर्थाच्या दुनियेत या शापित यक्षाचं स्थान काय आहे, काय नाही याच्याशी मला काही एक देणंघेणं नाही! माझा मतलब आहे तो त्यांची गायकी, त्यांचे सूर आणि त्यांची लयकारी, सरगमवरची त्यांची विलक्षण हुकुमत, याच्याशी! मधुभाईंसारखे गवई कुठच्या एका अज्ञात परंतु विलक्षण अश्या तिडिकेतून गातात, कुठली एक कसक त्यांच्यात संचारते आणि ते स्वरलयींची अप्रतीम अशी शिल्प घडवतात त्या तिडिकेबद्दल, त्या अज्ञात शक्तिबद्दल मी पुन्हा केव्हातरी बोलेन! अगदी भरभरून आणि मनमोकळेपणाने! हातचं काही राखून ठेवता! एक गोष्ट मात्र खरी की मधुभाईंसारखे काही गवई, काही कलाकार, हे लौकिक अर्थांच्या चौकटीत नाही बसत आणि त्यांना तसं बसवूही नये! कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काही आपल्याला माहीत नसतात! करायचंच असेल तर आपण फक्त त्याच्या कलेला वंदन करावं! असो...!

आमच्या मधुभाईंना नॉनव्हेज जेवण फार प्रिय बरं का मंडळी! :) मी कधी डोबिवलीला त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो की मुद्दामून म्हणतो,

"बुवा, आज जेवायला बाहेर जाऊया बरं का! सत्कार हॉटेलात मालवणी जेवण फार झकास मिळतं तिथे जाऊया!"

हे ऐकल्यावर बुवांच्या चेहेर्‍यावर एक निरागस आनंद पसरतो परंतु मला म्हणतात,

"अरे कशाला तुला उगाच खर्च? बरं चल, म्हणतोस तर जाऊया! पण पैसे मी देईन हो!"

"ते आपण बघुया बुवा! तुम्ही चला तर खरे!"

"बरं चल!"

असा आमचा संवाद होतो आणि आम्ही बाहेर जेवायला जातो. रस्त्याने एका दिग्गज गवयासोबत चालल्याची ऐट असते माझ्या चेहेर्‍यावर! :)

तात्या आणि मधुभाई मालवणी मटणाचं जेवत आहेत! :)

"आज सुरमई घेऊ या का रे? ताजी दिसते आहे!"

थोड्याच वेळात सुरमईची कढी आणि तळलेली तुकडी असलेली ताटं आमच्या पुढ्यात येतात!

"आणि बरं का रे, मटणसुद्धा मागव रे! आज जरा मन लावून मटणही खाईन म्हणतो!" :)

एखाद्या लहान मुलाने ज्या निरागसतेने चॉकलेट मागावं ना, अगदी तीच निरागसता मटण मागवताना आमच्या बुवांच्या चेहेर्‍यावर असते! त्यांची मटणाची फर्माईश पुरी करायला मला अगदी मनापासून आवडतं! कारण मी त्यांना फक्त तेवढंच देऊ शकतो! त्यांनी मला आजतागायत किती भरभरून दिलं आहे त्याची काही गणतीच नाही!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयविचारअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

25 Jul 2008 - 6:53 pm | मुक्तसुनीत

तात्या ,
बेंगलोरच्या गदारोळात तुमचा हा सुंदर लेख लपला थोडासा. आता सर्व आलबेल अहे म्हण्टल्यावर लक्ष जाईल सर्वांचे.

लेख वाचला आणि आजपावेतो अपरिचित असणार्‍या एका गुणी कलावंताबद्दल वाचून आत खोल कुठेतरी काही हलले. तुम्ही त्यांना शापित का म्हण्टले ते लिहीले नाही ; पण इथे डीटेल्सची पर्वा कुणाला ! या सुरांच्या गंधर्वाचे दर्शन तुम्ही घडवलेत , त्यातल्या माणसाचेही दर्शन घडवलेत . बस्स. त्यातल्या फोटोमुळे खुमारी आली आहे ! आता मधुभाई आमचेही स्नेही झालेत. मिपाकरांतर्फे अनेकानेक शुभेच्छा कळवा !

विसोबा खेचर's picture

25 Jul 2008 - 7:03 pm | विसोबा खेचर

आता सर्व आलबेल अहे म्हण्टल्यावर लक्ष जाईल सर्वांचे.

अहो मुक्तराव, लक्ष नाही गेले तरी फिकीर नाही! नाहीतरी आमच्या अश्या लेखांना अलिकडे काही विद्वान 'दळणाचीच' उपमा देतात! :)

असो, हे लेखन फार कुणाला नाही आवडलं तर आणि इतरही काही विद्वतजनांना दळण वाटलं तर आम्ही लिहिणं थांबवू आणि इतरांचं उत्तमोतम लेखन वाचण्यात धन्यता मानू! :)

आमचे सांगितिक अनुभव आणि आम्ही पाहिलेली संगीताच्या दुनीयेतली माणसं राहू द्या आमच्यापाशीच! :)

आपला,
(संगीताच्या दुनीयेतला) तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jul 2008 - 8:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचे सांगितिक अनुभव आणि आम्ही पाहिलेली संगीताच्या दुनीयेतली माणसं राहू द्या आमच्यापाशीच!
मग आमच्यासारख्या औरंगजेबांचा खजिना रिकामाच राहील!

(चांगल्या माणसांची आणि लेखांची चाहती) अदिती

कोलबेर's picture

25 Jul 2008 - 11:55 pm | कोलबेर

असो, हे लेखन फार कुणाला नाही आवडलं तर आणि इतरही काही विद्वतजनांना दळण वाटलं तर आम्ही लिहिणं थांबवू आणि इतरांचं उत्तमोतम लेखन वाचण्यात धन्यता मानू!

तात्या.

का बरं? ज्यांना तुमचे लेखन आवडत नाही ते नाही वाचणार, परंतु मला तुमच्या आठवणी वाचायला आवडतात. तेव्हा तुमचे लेखन तुम्ही मिपावरही अगदी अवश्य प्रसिद्ध करावे ही विनंती.

तात्या.

मुक्तसुनीत's picture

25 Jul 2008 - 11:57 pm | मुक्तसुनीत

काय कोल्बेर आहात का चित्रगुप्त आहात !! =))

विसोबा खेचर's picture

25 Jul 2008 - 2:10 pm | विसोबा खेचर

वरूणदेवा,

माझ्या लेखनाचा इतक्या बारकाईने अभ्यास करतोस याचा आनंद वाटतो! तो तसाच सुरू ठेव, खूप काही शिकशील! :)

बाकी, असो...! :)

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Jul 2008 - 9:42 pm | डॉ.प्रसाद दाढे

तात्या, अतिशय सुरेख लेख आहे. मधुभाई॑ना अगदी डोळ्या॑पुढे उभे केले आहेत वाचका॑च्या.
मित्रहो, मी मधुभाई॑ना जवळून पाहिले आहे, त्या॑चे गाणेही ऐकले आहे. ते आमच्या डो॑बिवलीचे भूषण आहेत. तसे पाह्यला गेले तर मधुभाई॑चे व आमचे तीन पिढ्या॑चे स॑ब॑ध आहेत. त्या॑चे पिताजी प॑. गजाननबुवा जोशी हे माझ्या आजोबा॑चे औ॑ध स॑स्थानातले खास मित्र. स्वतः मधुभाई माझ्या काका॑च्या वर्गात तर त्या॑चे कनिष्ठ ब॑धू नारायणबुवा (अहमदजान तिरखवा॑चे शिष्य) माझ्या वडिला॑च्या वर्गात! भाग्याची गोष्ट अशी की माझ्या आईला व ज्येष्ठ भगिनीला प॑. गजाननबुवा व मधूभाई॑ची पुष्कळ वर्षे तालीम मिळाली व आज तात्या॑चा लेख मी माझ्या आईला वाचून दाखविल्यावर तिच्या डोळ्या॑त पाणी उभे राहिले. तिने मला तात्या॑चे आभार मानण्यास सा॑गितले आहेत.
तात्या म्हणतात तसे आमचे मधुभाई खरोखरच एक शापीत यक्ष आहेत, एक दुर्लक्षित पण स्वतःच्याच मस्तीत वावरणारा स॑गीतातला बादशहा! आजही स्वर त्या॑च्या हुकुमतीत आहेत, व मधुभाई॑ची ती धु॑दी अजून ओसरलेली नाही. ती त॑द्री, समाधी जवळून निरखण्याचे भाग्य तात्या॑ना लाभले. ही गुरू-शिष्याची जोडी अक्षय्य राहो!

विसोबा खेचर's picture

25 Jul 2008 - 11:44 pm | विसोबा खेचर

व आज तात्या॑चा लेख मी माझ्या आईला वाचून दाखविल्यावर तिच्या डोळ्या॑त पाणी उभे राहिले.

दाढेसाहेब, आपल्या मातोश्री मधुभाईंकडे गाणं शिकल्या आहेत, त्यांचा सहवास त्यांना मिळाला आहे. गुरुच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात अश्रू येणे साहजिकच आहे, त्यांच्या भावना मी समजू शकतो!

तिने मला तात्या॑चे आभार मानण्यास सा॑गितले आहेत.

आपल्या मातोश्रींना माझाही दंडवत कळवा. पुण्यात आलो की त्यांना भेटायला मला आवडेल..

तात्या.

मानस's picture

25 Jul 2008 - 7:15 pm | मानस

सुरेख लेख आणि मधुभाईंसारख्या कलावंताचे दर्शन धडवलेत, मनःपूर्वक धन्यवाद.

प्रगती's picture

25 Jul 2008 - 7:40 pm | प्रगती

नेहमी प्रमाणेच तात्या हा लेख पण फारच छान आहे.
तात्या तुम्ही खरंच भाग्यवान आहात अशा अलौकीक व्यक्तीचा सहवास तुम्हाला लाभला आणी तुमच्यामुळे आम्हाला पण अशा
अज्ञात गुणी गायकाची ओळख झाली.
"आमचे सांगितिक अनुभव आणि आम्ही पाहिलेली संगीताच्या दुनीयेतली माणसं राहू द्या आमच्यापाशीच" असं करु नका निदान
आमच्यासाठी तरी तुमचे अमुल्य सांगीतिक अनुभव लिहा. :S

विकास's picture

25 Jul 2008 - 7:50 pm | विकास

सुरवातीला स्क्रीनवर छायाचित्रे दिसली नाहीत म्हणून सांगायचे म्हणणार इतक्यात खाली स्क्रोल केल्यावर दिसली.

अशा "यक्षांबद्दलची" माहीती जगाला करून देणे म्हणजे काही अंशी तरी त्यांच्या प्रतिभेला आणि तपश्चर्येला न्याय दिल्यासारखे वाटते.

वाटाड्या...'s picture

25 Jul 2008 - 7:56 pm | वाटाड्या...

तात्या...

नेहमीप्रमाणेच एका दिग्गज कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. कोणी काहीही म्हणो पण हा मिपावरचा संगीत यज्ञ बंद करू नका. बोलणारे बोलत असतात. आपण चालत रहाव. ह्या यज्ञातून आम्हा सारख्या नव विद्यार्थ्यांना काय ज्ञान मिळतं ते बाकी कोणाला काय कळणारं?

उलट मी तर म्हणतो ह्या पुढे अजुन एक पायरी म्हणजे एक राग मालिका चालू करा, ज्यात एका एका रागाची यथोचीत माहीती व विश्लेषण (संज्ञेसकट) जी शास्त्रिय संगीत ऐकणार्याला व आवडणार्‍या प्रत्येकाला ज्ञानाचा सागर देईल. कदाचीत अशी मालिका जालावरची एकमेव व पहीलीच राग मालिका असेल व होवु देत.

आपण फार नशिबवान आहात ज्याना अश्या मोठ्या लोकांचा सहवास (सांगितीक) लाभला. बाकी मुंबैच्या कलाकारांची माहीती आपण नेहमीच देता. पण माहीती म्हणुन पुण्याच्या आणि इतर ठिकाणच्या कलाकारांची माहीत पण टाकाना...

आपलाच,

मुकुल

भाग्यश्री's picture

25 Jul 2008 - 10:47 pm | भाग्यश्री

मुकुल, तात्यांनी रागाबद्द्ल आधीच लिहायला सुरवात केलीय, कितीतरी भाग प्रसिद्ध झालेत .. 'बसंतचे लग्न' नाही वाचलंत का? जरूर वाचा.. जालावरची पहीली राग मालिका आली आहे ऑलरेडी.. :)

तात्या लेख खूप आवडला.. संगीतामधले फारसे कुणी माहीत नसल्याने या लेखमालेचा मला नक्कीच फायदा होतो.. बरीच माहीती मिळते.. तुम्ही प्लीज हे बंद करू नका.. भाईकाकांचेच एक वाक्य विसरलात का? किर्तनकाराने किर्तन सांगत जावे, ऐकायला कुणी आहे की नाही याची चिंता करू नये.. आणि हो, इथे कुणीच तुमचं ऐकायला विसरणार नाही, तेव्हा येऊदे अजुन!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2008 - 7:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, पुन्हा एकदा मोठ्या माणसाचा परिचय करुन दिला.
संगीतक्षेत्रातील तुमचा परिवारच मोठा आहे, आज मधुभाईंच्या सहवासाचे क्षण, आणि ओळख वाचायला आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय's picture

25 Jul 2008 - 8:16 pm | धनंजय

या मोठ्या कलाकारांबरोबर तुमचा राबता आहे, आम्हाला आयतेच दर्शन आणि वाचनसुख.

नंदन's picture

26 Jul 2008 - 7:27 am | नंदन

सरांशी सहमत आहे. लेख आवडला. मधुभाईंबद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल अजून वाचायला आवडेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्राजु's picture

25 Jul 2008 - 8:02 pm | प्राजु

एका अतिशय प्रतिभावान कलाकाराची ओळख करून दिलीत. सुंदर लेखन. वर्णन सुंदर. आणि फोटो पाहिल्यावर तर तुम्ही केललं वर्णन मधुभाईंच वर्णन किती अचूक आहे याची प्रचिती आली.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

25 Jul 2008 - 9:58 pm | चतुरंग

काय छान ओळख घडवलीत!
अशा एकेक दिग्गजाकडे जावे त्यांच्या पायाशी बसून शिकावे, गप्पा कराव्यात, त्यांना एका वेगळ्या बाजूने समजून घेण्याचा प्रयत्न करावा हे किती जण करतात हो? तुम्ही करता आणि त्या अनुभवांचा थोडा वाटा आमच्या बरोबर वाटून देता म्हणून चांगले वाटते. आमचीही मधूभाईंशी तोंडओळख झाल्याचा आनंद होतो. आता हे नाव पुन्हा ऐकलं की हा लेख डोळ्यांसमोर येणार हे नक्की!

चतुरंग

यशोधरा's picture

25 Jul 2008 - 10:01 pm | यशोधरा

तात्या, एकदम मस्त लिहिले आहेत :) असलं दळण दळायला पण नशीब लागतं! लिहा अजून.

कोलबेर's picture

25 Jul 2008 - 11:49 pm | कोलबेर

लेख आवडला. जेवतानाचा फोटो तर मस्तच. फोटोतील मधुभाईंच्या चेहर्‍यावरील भाव, डॉ.दाढेंच्या ह्या ओळींची प्रचिती देतात.

एक दुर्लक्षित पण स्वतःच्याच मस्तीत वावरणारा स॑गीतातला बादशहा! आजही स्वर त्या॑च्या हुकुमतीत आहेत, व मधुभाई॑ची ती धु॑दी अजून ओसरलेली नाही.

-कोलबेर

चित्रा's picture

26 Jul 2008 - 1:01 am | चित्रा

म्हणते. फोटो आणि ओळख छान!

नीलकांत's picture

26 Jul 2008 - 12:42 am | नीलकांत

वाह अश्या अनोळखी लोकांबद्दल वाचायला आवडतं

नीलकांत

केशवसुमार's picture

26 Jul 2008 - 1:41 pm | केशवसुमार

तात्याशेठ,
वाह अश्या अनोळखी लोकांबद्दल वाचायला आवडतं
लेख आय मीन दळण उत्तम..आवडले.. असेच वरचे वर लिहित रहा आय मीन दळत रहा..
(निवृत्त दळ्या)केशवसुमार

पिवळा डांबिस's picture

26 Jul 2008 - 7:25 am | पिवळा डांबिस

गजाननबुवांचे गायन लहानपणी एकदा कधीतरी गणेशोत्सवात ऐकल्याचे अंधुकसे स्मरते....
हो! त्यावेळी गणेशोत्सवात शास्त्रीय संगीतही गायले जात असे.....:)

मधुकररावांना ऐकायचा योग कधी लाभला नाही...
असो.

फोटो टाकल्याने व्यक्तिचित्र अजून छान झाले आहे तात्या!!

आपला,
पिवळा डांबिस

विसोबा खेचर's picture

26 Jul 2008 - 8:11 am | विसोबा खेचर

या लेखात उल्लेख केलेली यमन मधली नणंदीके बचनवा सहे ना जाए... ही बंदिश इथे ऐका..

शशांक मक्तेदारने ही बंदिश गायली आहे. शशांकला पं उल्हास कशाळकरांकडून खूप चांगली तालीम मिळालेली आहे/मिळते आहे! शशांकचं गाणंही मला आवडतं, खूप छान गातो.

आमचे मधुभाई तर इतकी सुरेख रंगवतात ही बंदिश की क्या केहेने...! अगदी नुसतं ऐकत रहावं, शिकत रहाव!

नणंदीके बचनवा सहे ना जाए,
सोच सोच कही ना जात हमसो
उमंग उमंग असूवन बरसत नीर...

ऐका मंडळी, किती सुरेख बंदिश आहे ही! या बंदिशीच्या सौंदर्याविषयी पुन्हा केव्हातरी...

आपला,
(ग्वाल्हेरप्रेमी) तात्या.

सहज's picture

26 Jul 2008 - 9:32 am | सहज

लेख आवडला.
फक्त एकच खंत मधुभाईंची एखादी तरी ध्वनिफीत चढवायला पाहीजे होती.

प्रमोद देव's picture

26 Jul 2008 - 9:52 am | प्रमोद देव

लेख आवडला.
फक्त एकच खंत मधुभाईंची एखादी तरी ध्वनिफीत चढवायला पाहीजे होती.

अवांतर: शशांकचे गाणे ऐकून बापुसाहेब पलुस्करांची आठवण झाली.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धोंडोपंत's picture

26 Jul 2008 - 1:30 pm | धोंडोपंत

क्या बात है!!!

उत्तम कथन. तात्या लेख अप्रतिम झालाय हो. छायाचित्रामुळे अजून रंगत वाढलेय.

मधुभाईंना आमचा दंडवत सांगावा.

आपला,
(नतमस्तक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

अन्जलि's picture

26 Jul 2008 - 2:11 pm | अन्जलि

अहो आम्हाला तुमच्यामुळे कितितरि नविन माहिति मिळ ते. ज्याना त्याला दळ ण म्हणायचे असेल त्याना म्हणु देत पण आम्हि तर आनदाने वाचतो न. तुम्हि लिहित राहा. आमच्या नशिबि त्या थोर लोकान्चि प्रत्यक्श भेट नसेल पण तुम्च्यामुळे तो आनन्द तर मिळतो.

भडकमकर मास्तर's picture

27 Jul 2008 - 5:30 pm | भडकमकर मास्तर

आमच्या नशिबि त्या थोर लोकान्चि प्रत्यक्श भेट नसेल पण तुम्च्यामुळे तो आनन्द तर मिळतो
हेच म्हणतो....
फोटोंमुळे एक पर्सनल टच असतो तुमच्या लेखांना....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनस्वी's picture

28 Jul 2008 - 10:40 am | मनस्वी

>> अहो आम्हाला तुमच्यामुळे कितितरि नविन माहिति मिळ ते.
>> आमच्या नशिबि त्या थोर लोकान्चि प्रत्यक्श भेट नसेल पण तुम्च्यामुळे तो आनन्द तर मिळतो.

हेच म्हणते. या ओळखीमुळे आमच्या माहितीत भरच पडते तात्या.
असे अनेक उत्तमोत्तम अव्वल दर्जाचे कलाकार जगासमोर प्रसिद्ध न पावल्याने अनोळखीच रहातात.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

विसोबा खेचर's picture

27 Jul 2008 - 5:40 pm | विसोबा खेचर

कालच मधुभाईंची त्यांच्या शिष्यवर्गाने डोंबिवलीत गुरुपौर्णिमा साजरी केली. सगळा कार्यक्रम खूप छान झाला. पूजा आठवले, नुपूर काशिद, अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी इत्यादी मधुभाईंच्या शिष्यांनी चांगले गायन सादर केले. पूजाने यमन, नुपूरने भूप, अपूर्वाने मालकंस तर पल्लवीने गौडमल्हार सादर केला. तिघीही जणी खूप छान गायल्या. अपूर्वाने मालकंस तर फारच सुंदर मांडला!

त्यानंतर स्वत: मधुभाईंनी बसंतबहार आणि भैरवी सादर केली. केवळ अप्रतीम आणि शब्दातीत!

त्यानंतर एका जिवलग मित्रासोबत कुंद पावसळी वातावरणात दोन घोट स्कॉचचे मारून मधुभाईंच्या बसंतबहारच्या धुंदीत घरी परतत होतो तेवढ्यात अमेरिकेहून मिपाकर कट्टेकरींचा फोन आला व त्या सर्वांशी बोलण्याचा आनंद मिळाला! एकंदरीत कालच दिवस एकदम मस्तमजेत गेला. परंतु घरी आल्यावर अहमदाबादच्या स्फोटांबद्दल कळले आणि सर्व आनंदावर विरजण पडले!

असो..