संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत असणे आणि अर्थ सुद्धा समजत असणे हे फारच विशेष आहे. कांही जणांना ती पूर्ण पाठ असते. तसेच माझ्या आईला पण संपूर्ण गीता पाठ आहे. तेही साठ वर्षांपासून! मला संस्कृत येत नाही याचे नेहमी वाईट वाटते. पुढे कधी तरी नक्की करायच्या गोष्टीत संस्कृत शिकणे सर्वांत पहिले आहे. आमच्या गावातल्या शाळेत संस्कृत हा विषय माझ्या ब्याच पासून बंद झाला, कारण म्हणे संस्कृत शिक्षकांचा तुटवडा. हे खरे नसावे असे वाटते कारण आमच्या शाळेतल्या तांबोळी नावाच्या मुस्लिम बाई संस्कृत मध्ये एम ए होत्या आणि त्याना हिंदी शिकवावे लागे म्हणून त्याना वाईट वाटे! नंतरच्या पंचवीस वर्षात शाळेत संस्कृत विषय कधीच सुरु झाला नाही.
तर ते असो.
संस्कृत न शिकल्यामुळे मी असंस्कृत नाही तरीपण अल्पसंस्कृत झालोच. आईला वाटे याने थोडे तरी संस्कृत शिकावे. मग घरी तिने इतर स्तोत्रांबरोबर गीतेचे सोपे वाटणारे अध्याय अर्थासह शिकवले. चौदावा अध्याय छोटा आहे म्हणून सुरुवातीला तो शिकवला. दहाव्या वर्षी जेवढा अर्थ कळेल तितकाच कळला. अर्थ कळत नसला तरी उच्चार शुद्ध असण्याचा आग्रह होता. त्यामुळे वाणी सुधारते, हे नक्की.
याच काळात परवचा म्हणताना आईने अठरा श्लोकी गीता शिकवली होती. ही रोज म्हणणे अनिवार्य असे. तिन्हीसांजेला भावंडानी एकत्र बसून म्हणताना एक मस्त वातावरण तयार होई. अजूनही म्हणताना फार आनंद मिळतो.
एकोणीसशे सत्तेचाळीस च्या दरम्यान आई सहासात वर्षांची असताना कऱ्हांडच्या कृष्णाबाई मंदिरात गीता शिकायला जाई. सुरुवातीला त्याना ही अठरा श्लोकी मराठी गीता पाठ करायला देत असत. एक-दोन दिवसात पुनःपुनः वाचून पाठ करून आले तर मुख्य गीतापठण वर्गाला प्रवेश मिळत असे. एकदा सारांश लक्षात आला की मूळ भगवदगीता शिकणे सोपे जाईल यासाठी गुरुजींनी ही रचना केली होती.
तर ही मराठी अठरा श्लोकी गीता जशी आठवली तशी इथे देतो आहे. मुलांसाठी उपयुक्त होईल असे वाटते. इथल्या काहीजणांनी लहानपणी हि नक्कीच म्हटली असणार. काही दुरुस्ती पाहिजे असे वाटत असल्यास जरूर सांगावे.
माझ्या माहिती प्रमाणे कऱ्हाडला कुणी तोफखाने म्हणून गुरुजी होते त्यांनी ही रचना केली आहे. ही १९३५ मधली पुस्तिका आता उपलब्ध नाही. कुणाकडे असल्यास कृपया कळवावे!
अर्थ सहज कळत असल्याने वेगळा लिहायची गरज नसावी. मात्र जाणकारांकडून अधिक विस्तृत माहिती ऐकायला निश्चितच आवडेल. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला हा संवाद असल्याने कोणता श्लोक कोणी कोणास म्हटला तेही सहज कळतेय.
वृत्ता मधला बदल *** असा दाखवला आहे.
अठरा श्लोकी गीता:
गेले कौरव आणि पांडव रणी, वर्णी कथा संजय
ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने वाटे तयां विस्मय
पाहे पार्थ रणी कुलक्षय घडे चित्ती विषादा धरी
युद्धा पासुनी होऊनी विमुख तै टाकी धनुष्या तरी
झाला अर्जुन शोकमग्न बघुनि वेदांत सांगे हरी
आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे ओळखी अंतरी
घेई बाण धनु करी समर तू कर्तव्य ते आचरी
वागे निस्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी जनांच्या परी
***
अगा कर्माहुनी अधिक बरवे ज्ञान कथिसी
तरी का तू येथे मजकडुनि हिंसा करविसी?
वदे पार्था पै ते यदुपति करी कर्म नियते
फलेच्छा सांडोनी सहज मग नैष्कर्म्य घडते
हराया भूभारा अमित अवतारांसी धरितो
विनाशुनि दुष्टा सतत निजदासां सुखवितो
नियंता मी ऐसे समजुनी करी कर्म मजसी
समर्पि तू कर्मी मग तिळभरी विद्ध नससी
करी सारी कर्मे सतत निरहंकारी असुनी
त्यजी प्रेम द्वेषा धरुनी ममता जो निशिदिनी
तया चिंता नाही पुढील अथवा मागील मनी
खरा तो सन्यासी स्थिरमतीही संकल्प सुटुनी
***
चित्ताचा सखया निरोध करणे हां योग मानी खरा
हा-मी हा-पर भेद हा मुळी नसे चित्ती कधी ज्या नरा
जो सप्रेम सदा भजे मज सदा जो सर्व भूती सम
ठेवी मदगत चित्त त्याहुनि दुजा योगी नसे उत्तम
माझ्या केवळ जाहली प्रकृतीने ही सृष्टी सारी असे
पृथ्वी माझी सुगंध मीच रस मी तोयात पार्था वसे
सर्वांतर्गत मी परी न मज तीहि गोष्ट मायाबळे
जे चित्ती मज चिन्तिति सतत ते तापत्रया वेगळे
***
सदा ध्याती मा ते हृदय कमळी जे स्थिर मनी
तयां देहांती मी अमित सुख देतो हरी म्हणे
म्हणुनी पार्था तू निशिदिनी करी ध्यान भजन
मिळोनी मद्रूपी मग चुकविशी जन्म मरण
***
भक्तीने जल पत्र पुष्प फल कि काही दुजे अर्पिले
ते माते प्रिय तेविजे नर सदा मत्किर्तनि रंगले
पार्था ते नर धन्य ज्या मुखी वसे मन्नाम संकीर्तन
विष्णो कृष्ण मुकुंद माधव हरे गोविंद नारायण
***
कोठे देवासि चिंतू जरी म्हणसी असे ऐक माझ्या विभूति
संक्षेपे अर्जुना मी तुज गुज कथितो मी असे सर्व भूती
मी धाता विष्णू मी श्री शिव रवि निगमी साम मी विश्वरूप
माझी सर्वत्र सत्ता जागी असुनी असे दिव्य माझे स्वरूप
***
पार्थ विनवी माधवासी विश्व रूप भेटवा
म्हणूनिया हरी धरी विकट रूप तेधवा.
मांडिला अनर्थ थोर पंडुकुमर घाबरे
म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे
***
बरी सगुण भक्ति की भजन निर्गुणाचे बरे
पुसे विजय तै तदा हरी वदे तया आदरे
असोत बहु योग ते तरीही भक्तियोगाहुनी
नसेचि दुसरा असा सुलभ जो श्रमावाचुनी
***
क्षेत्र क्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे कृष्ण पार्थासी सांगे
ज्ञानी त्याते म्हणावा भजुनी मज कदा जो मदाने न वागे
तैसा जो भेद नेणे प्रकृती पुरुषीचा सर्व भूती समत्व
कर्माची त्यास बाधा तिळभर हि नसे पावला तो प्रभुत्व
***
पार्था मी जनिता तशीच जननी माया जगत संतति
जीवा सत्व रजस्तम त्रिगुण हे स्वाभाविकव्यापिती
जो सप्रेम सदा भजे मजतसा जो सर्व भूती सम
ठेवी मद्गत चित्त त्याहुनि दुजा योगी नसे उत्तम
***
सत्व रजस्तम तीन गुणापरी श्रद्धा तपमख दान असे
त्रिविध अङ्ग ही निज बीजापारी आवडी त्यावरी दृढ बैसे
उत्तम, मध्यम, अधम जाण ही क्रमे तयातुनी सत्व धरी
मग ओम तत सत वदुनि धनंजय ब्रम्ह समर्पण कर्म करी
त्यजू पाहसी युद्ध परी ते प्रकृती करविल तुजकडूनी
तरी वद पार्था परिसुन गीता रुचते ममता का अजुनी!
मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी
कृतार्थ झालो प्रसाद हा तव वाचन तुझे मज मान्य हरी!
।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।
प्रतिक्रिया
27 Jan 2014 - 3:12 am | आयुर्हित
व्वा गुरुजी, कुठे लपले होते इतके दिवस? मन कसे भरून आले हो.
धन्य झालो मी तुमची अठरा श्लोकी गीता(जशी आठवली तशी)वाचून.
कऱ्हाडला कुणी तोफखाने म्हणून गुरुजी होते त्यांनी ही रचना १९३५ मध्ये केली आहे,
पण आज आपल्यापर्यंत पोचली
ती केवळ खेडूत गुरुजींकडून !
मिपावर किती किती गुरु भेटत आहेत मला,आणि माझी मेजवानी सुरु आहे.
लक्ष लक्ष धन्यवाद.
27 Jan 2014 - 9:11 am | धन्या
खुपच सोप्या शब्दांत गीतेच्या अठरा अध्यायांचं सार मांडलं आहे.
16 Jun 2016 - 5:34 am | यशोधरा
सुरेख आहे हे. वाखू साठवली.
16 Jun 2016 - 5:34 am | यशोधरा
सुरेख आहे हे. वाखू साठवली.
16 Jun 2016 - 7:37 am | दीपा माने
सुंदर शब्द रचना वापरल्याने वाचताना अतिव आनंद झाला.
प्रस्तुत साहित्यकृती मिपावर प्रसिध्द केल्याबद्दल आपले आभार!
16 Jun 2016 - 1:30 pm | पद्मावति
सुरेख!
16 Jun 2016 - 2:59 pm | जगप्रवासी
खूप छान आहे, याची प्रिंट काढून ठेवली आहे, आजपासून संध्याकाळी वाचायला सुरु. इतके छान गोष्टी मिपावर सामील झाल्यामुळे वाचायला मिळाल्या. त्यामुळे मिसळपावचे आणि लेखकाचे आभार
16 Jun 2016 - 3:08 pm | पुंबा
काय सुंदर आहे ही अठरा श्लोकी गीता! बाकी कराड सारखं गाव नाही.. विद्वान, कलासक्त लोकांची ही भूमी... प्रितीसंगम आणि कृष्णाबाई मंदिर डोळ्यासमोर आलं..
16 Jun 2016 - 4:43 pm | इशा१२३
खुप दिवसांनी वाचली हि गीता.लहानपणी आजोबा म्हणायचे.त्यावेळेस ऐकून ऐकून पाठ झाली होती.आता वाचायला लागल्यावर त्या लयीतच वाचली गेली.धन्यवाद!
वाखू. साठवली.