एखादा रविवार मोठा सुलक्षणी निपजतो. कधी नव्हे ती मुंबईत बर्यापैकी थंडी पडलेली असते. रजई घेता यावी म्हणुन ती पंखा लावुन थोडी वाढवलेली असते. सूर्य कसलही विघ्न न येता निवांत उगवतो. सकाळी सकाळी मोबाईल बोंबलत नाही. तात्पर्य म्हणजे गुलाबी थंडीत आठ वाजेपर्यंत लोळायची चैन होते. उठल्यावर मनसोक्त चहा होतो. पेपर चाळुन होतात. बायको हटकत नाही. पहिला चहा, दुसरा चहा, नाश्ता पुन्हा चहा असे करता करता अकरा वाजतात. अजुन अंघोळीचे फर्मान निघालेले नसते. सोसायटीची मिटिंग नसते. कुठे लग्न समारंभ नसतो. बघता बघता कोचावर रेलण्यात तिनेक तास जातात. मग जरा मी पाय मोकळे करायला हलतो.
समोर टेबलावर लक्ष जाते ते चिरुन धुतलेल्या व निथळायला चाळणीवर ठेवलेल्या मोहक भाज्यांकडे. सध्या भाज्यांचा हंगाम आहे. अश्या ताज्या, रसरशीत भाज्या एरवी दुर्मिळच.
पसरलेल्या भाज्या पाहताच आजचा बेत लक्षात येतो. भोगीला केल्या जाणार्या भाजीची ही नवी आवृत्ती. मी मनोमन खुष होतो. ही भाजी आहे म्हणजे गरमा गरम फुलके आणि मग खिचडी - कढी असणारच. ही भाजी काहीशी उंध्युच्या जातीतली पण तेलात चपचपलेली नाही. आता कधी एकदा जेवणार असे होते. नाईलाजाने अंघोळ करावी लागते. अंघोळ करुन बाहेर येताच मस्त खमंग वास दरवळत असतो. एकही हाक मारायला न लागता मी गपचुप पानावर बसतो आणि बायको गालातल्या गालात हसते. भरपेट जेवण झाल्यावर लगेच झोपणार कसा?
मी संगणक प्रज्वलित करतो. भाजी व्हायच्या आधी त्या भाजांचे आणि नंतर तयार झालेल्या भाजीचे टिपलेले फोटु मी अपलोड करतो. मी बायकोकडुन भाजीची पाककृती घेतो आणि मिपावर टंकायला बसतो. स्वार्थाबरोबर परमार्थ. माझे जेवण जिरेल आणि कुणाला पाककृती आवडली तर भाज्या झकास आहेत तोपर्यंत करुन हाणता येईल.
भाज्या - गाजर, रताळी, हिरवे वाटाणे, वालाचे सोललेलेल दाणे, पापडीच्या शेंगांचे दोरे कापलेले मोठे तुकडे, चौकोनी फोडी केलेली बारीक काटेरी वांगी, भुईमुगाच्या शेंगामधले कोवळे दाणे. हे सर्व साहित्य आपल्याला आवड्त असेल त्या प्रमाणात एकुण दोन वाट्या.
मसाला - १ मोठा चमचा खवलेला नारळ, ३ तिखट हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, आल्याच्या दोन चकत्या. हे सर्व साहित्य चवीनुसार मीठ घालुन बारीक वाटुन घ्यावे.
फोडणी साठी तेल, चिमूट्भर ओवा आणि चिमुटभर हिंग.
कृती
जाड बुडाचे भांडे गॅसवर ठेवुन त्यात ४ ते ५ चमचे तेल घ्यावे. तेल तापल्यावर ओवा व हिंग घालावा. चिरलेल्या भाज्या धुवुन व निथळुन फोडणीत घालाव्या. मिश्रण आसडुन/ किंवा ढवळुन घ्यावे. मग थोडे पाणी घालुन व झाकण ठेवुन भाजी मंदाग्नीवर शिजवुन घ्यावी. भाज्या शिजल्यावर त्यात वाटंण व चवीनुसार मीठ घालावे आणि २-३ मिनिटे ठेवावी. भाजी तयार झाल्यावर गरम गरम फुलके किंवा भाकरी बरोबर वाढावी.
ही भाजी मातीच्या भांड्यात अधिक चविष्ट होते.
प्रतिक्रिया
12 Jan 2014 - 4:00 pm | रमेश आठवले
सोबत तीळ लावलेली ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि या सीझन मध्ये ओली लसूण मिळते-तीचा ठेचा.
अप्रतिम आणि जठराग्नी प्रदीप्त करणारे फोटो.
12 Jan 2014 - 4:01 pm | प्यारे१
अप्रतिम!
सौंदर्य दृष्टीनं साध्याशा भाजीचं आनंदनिधान केलंत. वा!!!
12 Jan 2014 - 4:04 pm | वडापाव
फोटो छान आहेत!! :)
पण लेखनविषय : चित्र'पट'??
12 Jan 2014 - 4:28 pm | प्रभाकर पेठकर
मस्तं पाककृती. नक्कीच करून पाहीन म्हणतो.
12 Jan 2014 - 5:07 pm | बॅटमॅन
जीभ आणि डॉळे दोन्ही सुखावणारा प्रकार!!!! लैच भारी.
12 Jan 2014 - 7:44 pm | अर्धवटराव
कसली स्वादिष्ट आणि पौष्टीक भाजी. मस्त झाला रवीवार.
12 Jan 2014 - 8:35 pm | खान्देशी
उन्दियो ! ते क्ले पॉट लै भारी!
12 Jan 2014 - 8:42 pm | पैसा
कसली जबरदस्त भाजी आहे! तुम्ही काढलेले फोटो तर नेहमीच मस्त असतात! भाजीचं वर्णन आणि एकूण रसायन जमलंय. हा खतखत्याचा आणखी सौम्य भाऊ दिसतो आहे! आणि तो मातीचा कूकर तर मला फारच आवडला. कुठे मिळतो?
12 Jan 2014 - 8:58 pm | सोत्रि
वाहव्वा!
सर्व फोटो अतिशय देखणे आणि वर्णन भुक चाळवणारे.
- (सुखी रविवार सार्थकी लागलेला) सोकाजी
12 Jan 2014 - 9:04 pm | सस्नेह
+++ १
12 Jan 2014 - 9:43 pm | आतिवास
+२
12 Jan 2014 - 9:43 pm | इन्दुसुता
पाकृ आवडली.. आता मातीचे भांडे शोधणे आले ....
12 Jan 2014 - 9:48 pm | आयुर्हित
व्वा! मस्त प्रकार!!! उत्तम पाकृ व timing!!!
निसर्ग देवतेची कृपा व त्याचा ऋतू/काळ परत्वे कल्पकतेने केलेला अद्भुत वापर!
त्यात आपल्यासारखे दर्दी खवय्ये. व्वा! क्या बात है!!!
हे combination भारतीय संस्कृतीचाच भाग आहे.
आपला मिपास्नेही: आयुर्हीत
12 Jan 2014 - 11:09 pm | सर्वसाक्षी
विषय निवडताना अनवधानाने 'चित्रपट' असा निवडला गेला असावा, इथे प्रतिसादात वाचेपर्यंत कल्पना नव्हती.
पेठकरसाहेब, भाजी करताना पातीची ओली लसूण मिळाली तर वाटणात तिही घालुन पाहा, जरा वेगळा स्वाद येतो.
मातीचा कुकर गुजरातमधील वांकानेर येथुन आणला आहे. या कुकरमध्ये मुगडाळीची खिचडीही झकास होते. मातीचा तवाही मिळतो, त्यावर थालिपीठ मस्त होते, कमी तेलात होते.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार
13 Jan 2014 - 8:47 pm | प्रभाकर पेठकर
इथे मिळते ओली लसूण. नक्की वापर करेन.
पण कुकर आणि मातीचा तवा म्हणजे आमच्या घरी अर्धा-अर्धा डझन तरी घ्यावे लागतील. सौं.चा हात भारी गळका आहे.
13 Jan 2014 - 10:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
पण कुकर आणि मातीचा तवा म्हणजे आमच्या घरी अर्धा-अर्धा डझन तरी घ्यावे लागतील. सौं.चा हात भारी गळका आहे.
वहिनींचा मिपावर वावर नसावा ;)
(हघ्याहेवेसान)
13 Jan 2014 - 4:19 am | रेवती
वाचायलाही मजा आली.
13 Jan 2014 - 7:25 am | मुक्त विहारि
झक्कास...
13 Jan 2014 - 11:32 am | सुहास..
भोगी आवडेश !!
13 Jan 2014 - 11:49 am | शिद
फोटो पाहुन भुक चाळवली...
ह्या प्रकाराला बहुतेक उकडहंडी देखील म्हणतात का? आम्ही यात कोनफळ, शेवगाच्या शेंगा व शेंगदाणे देखील घालतो.
13 Jan 2014 - 12:30 pm | बॅटमॅन
कोनफळ म्हंजे काय?
13 Jan 2014 - 1:49 pm | शिद
धागा
कोनफळ बद्दल अधिक माहीती.
13 Jan 2014 - 2:07 pm | बॅटमॅन
वा! धन्यवाद शिद साहेब. :)
13 Jan 2014 - 12:54 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
आणी फोटूंसाठी तर.. __/\__/\__/\__
आंम्हाला ही भाजी पाहिली की कुरुंदवाडी-गावाला त्या देवीच्या देवळात मुक्कामी-कामाला जायचो ते दिवस अठवतात! दुपारी काम संपलं की चारच्या सुमारास,छा..तंबाखू झाल्यावर आजू बाजुच्या मळ्यातून अश्या सगळ्या भाज्या आणायच्या.मग हिरिवर-फ्रेस पाण्यात धुवायच्या. तोपर्यंत आमच्यातला तो महान बल्लव भट-घटोत्कच ;) आत चुलिवर भात लाऊन पुढच्या तयारीत बसलेला असायचा. आंम्ही भाज्या निवडून चिरून द्यायचो. आणी परत छा तंबाखू करत शेतातनं हिंडायला भायेर! मग आठ वाजेपर्यंत आल्यानंतर देवळात संध्याकाळची वेदसेवा वगैरे झाल्यावर त्या बल्लवमित्राच्या नावातला सु योग आमच्या पानात गरम-गरम भाकर्यांसह उतरायचा. मग कांदा-काळामसाल्याची परतून केलेली चटणी..आणी ही लेकुरवाळी भाजी, मी आल्या आल्या केलेली आमची फेवरीट शांपल श्टाइल करंट देणारी आमटी ,भात ह्यावर सगळी जणं यथेच्छ तुटून पडायचो. आणी नंतर बाहेर वावरात चिंचेच्या त्या महावृक्षाखाली तीनचार खाटांवर आधी पत्ता-तंबाखूचं गावठी पान लाऊन पंधरा मिनिटं आसमंत आणी आपल्यातलं अंतर कमी करत-पडायचं!
आणी मग नंतर काही ठराविक व्यावसाइक काथ्याकूट करत... पहाटे ५ला उठायचा खंबीर संकल्प करत घोरं...निद्राधीन व्हायच!
खरच..तिथले गुरुजी-गेले! :( आणी ते दिवसंही! :(
13 Jan 2014 - 12:54 pm | Mrunalini
वा.. खुपच छान. पाकॄ आवडली. माझे आई हिच भाजी कांदा-खोबर्याचे वाटण आणि तिख्ट वैगरे घालुन करते. हि अशी आता एकदा करुन बघायला पाहिजे.
बाकी ते मातीचे भांडे आवडले. कुठे मिळते ते?
13 Jan 2014 - 1:05 pm | कपिलमुनी
मावळात याच भाजीला खेंगाट असे म्हणतात ..
इकडे जरा तिखट असते ..
तुमची पाकृ जबर्याच .. तोंडाला पाणी सुटले ..
13 Jan 2014 - 8:39 pm | मी-सौरभ
:)
13 Jan 2014 - 9:32 pm | शुचि
सुरेख!!! "क्षुधा-साधना" खूप आवडली
14 Jan 2014 - 9:31 am | यशोधरा
वा, छान! :)
14 Jan 2014 - 9:42 am | विटेकर
लेख मस्तच झाला आहे.
काल संध्याकाळी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी चेपली या लेखाची आठ्वण काढत काढत !
पण काल बायकोने ते मेथीचे गोळे घातले होते त्यामुळे ती भोगीची भाजी होती की उंधिया हे नीट्से कळले नाही . पण चव मात्र झकास होती .. तुमच्या पाक्रु सारखी !
14 Jan 2014 - 9:44 am | नाखु
मातीच्या भांड्याची कल्पना मस्तच. मातीचा कुकर फक्त गुजराथ मध्येच मिळतो का पुण्यात मिळेल?
14 Jan 2014 - 11:24 am | HEMALATA DHANAJ...
छान लेख आहे.फोटो पण सुंदरच .
14 Jan 2014 - 3:58 pm | स्वाती दिनेश
मस्त लेख.. भोगीची, संक्रांतीची आठवण ताजी करणारा..
(मातीचा कुकर फारच छान आहे..)
स्वाती
14 Jan 2014 - 4:21 pm | पिलीयन रायडर
ओ.. मी १५६७ व्यांदा आलेय हो या धाग्यावर, मला फोटो दिसतच नाहीयेत.. मलाही मातीचा कुकर पहायचाय..
ए पै तै.. कर ना काही तरी..
14 Jan 2014 - 11:22 pm | पैसा
मी कॉम्प्युटर, लॅपटॉप, गुगल क्रोम, फाफॉ असे दोन दोन प्रकार वापरले. मला दोन्ही वेळा व्यवस्थित दिसले फोटो. एक शक्यता आहे. काही जणांना फ्लिकर वरचे फोटो दिसत नाहीत. तसं काही झालं असेल तर सांगता येत नाही.
14 Jan 2014 - 10:57 pm | सानिकास्वप्निल
पाकृ आणी लेख दोन्ही +१
मातीचा कुकर फार म्हणजे फारचं आवडला.