Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सर्वसाक्षी on Sun, 01/12/2014 - 15:45
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा
एखादा रविवार मोठा सुलक्षणी निपजतो. कधी नव्हे ती मुंबईत बर्‍यापैकी थंडी पडलेली असते. रजई घेता यावी म्हणुन ती पंखा लावुन थोडी वाढवलेली असते. सूर्य कसलही विघ्न न येता निवांत उगवतो. सकाळी सकाळी मोबाईल बोंबलत नाही. तात्पर्य म्हणजे गुलाबी थंडीत आठ वाजेपर्यंत लोळायची चैन होते. उठल्यावर मनसोक्त चहा होतो. पेपर चाळुन होतात. बायको हटकत नाही. पहिला चहा, दुसरा चहा, नाश्ता पुन्हा चहा असे करता करता अकरा वाजतात. अजुन अंघोळीचे फर्मान निघालेले नसते. सोसायटीची मिटिंग नसते. कुठे लग्न समारंभ नसतो. बघता बघता कोचावर रेलण्यात तिनेक तास जातात. मग जरा मी पाय मोकळे करायला हलतो. समोर टेबलावर लक्ष जाते ते चिरुन धुतलेल्या व निथळायला चाळणीवर ठेवलेल्या मोहक भाज्यांकडे. सध्या भाज्यांचा हंगाम आहे. अश्या ताज्या, रसरशीत भाज्या एरवी दुर्मिळच. पसरलेल्या भाज्या पाहताच आजचा बेत लक्षात येतो. भोगीला केल्या जाणार्‍या भाजीची ही नवी आवृत्ती. मी मनोमन खुष होतो. ही भाजी आहे म्हणजे गरमा गरम फुलके आणि मग खिचडी - कढी असणारच. ही भाजी काहीशी उंध्युच्या जातीतली पण तेलात चपचपलेली नाही. आता कधी एकदा जेवणार असे होते. नाईलाजाने अंघोळ करावी लागते. अंघोळ करुन बाहेर येताच मस्त खमंग वास दरवळत असतो. एकही हाक मारायला न लागता मी गपचुप पानावर बसतो आणि बायको गालातल्या गालात हसते. भरपेट जेवण झाल्यावर लगेच झोपणार कसा? मी संगणक प्रज्वलित करतो. भाजी व्हायच्या आधी त्या भाजांचे आणि नंतर तयार झालेल्या भाजीचे टिपलेले फोटु मी अपलोड करतो. मी बायकोकडुन भाजीची पाककृती घेतो आणि मिपावर टंकायला बसतो. स्वार्थाबरोबर परमार्थ. माझे जेवण जिरेल आणि कुणाला पाककृती आवडली तर भाज्या झकास आहेत तोपर्यंत करुन हाणता येईल. भाज्या - गाजर, रताळी, हिरवे वाटाणे, वालाचे सोललेलेल दाणे, पापडीच्या शेंगांचे दोरे कापलेले मोठे तुकडे, चौकोनी फोडी केलेली बारीक काटेरी वांगी, भुईमुगाच्या शेंगामधले कोवळे दाणे. हे सर्व साहित्य आपल्याला आवड्त असेल त्या प्रमाणात एकुण दोन वाट्या. मसाला - १ मोठा चमचा खवलेला नारळ, ३ तिखट हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, आल्याच्या दोन चकत्या. हे सर्व साहित्य चवीनुसार मीठ घालुन बारीक वाटुन घ्यावे. फोडणी साठी तेल, चिमूट्भर ओवा आणि चिमुटभर हिंग. कृती जाड बुडाचे भांडे गॅसवर ठेवुन त्यात ४ ते ५ चमचे तेल घ्यावे. तेल तापल्यावर ओवा व हिंग घालावा. चिरलेल्या भाज्या धुवुन व निथळुन फोडणीत घालाव्या. मिश्रण आसडुन/ किंवा ढवळुन घ्यावे. मग थोडे पाणी घालुन व झाकण ठेवुन भाजी मंदाग्नीवर शिजवुन घ्यावी. भाज्या शिजल्यावर त्यात वाटंण व चवीनुसार मीठ घालावे आणि २-३ मिनिटे ठेवावी. भाजी तयार झाल्यावर गरम गरम फुलके किंवा भाकरी बरोबर वाढावी. ही भाजी मातीच्या भांड्यात अधिक चविष्ट होते.
  • Log in or register to post comments
  • 9777 views

प्रतिक्रिया

Submitted by रमेश आठवले on Sun, 01/12/2014 - 16:00

Permalink

थोडा और जायका

सोबत तीळ लावलेली ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि या सीझन मध्ये ओली लसूण मिळते-तीचा ठेचा. अप्रतिम आणि जठराग्नी प्रदीप्त करणारे फोटो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 01/12/2014 - 16:01

Permalink

अप्रतिम!

अप्रतिम! सौंदर्य दृष्टीनं साध्याशा भाजीचं आनंदनिधान केलंत. वा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by वडापाव on Sun, 01/12/2014 - 16:04

Permalink

फोटो छान आहेत!!

फोटो छान आहेत!! :) पण लेखनविषय : चित्र'पट'??
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 01/12/2014 - 16:28

Permalink

अरे व्वा...

मस्तं पाककृती. नक्कीच करून पाहीन म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 01/12/2014 - 17:07

Permalink

जीभ आणि डॉळे दोन्ही सुखावणारा

जीभ आणि डॉळे दोन्ही सुखावणारा प्रकार!!!! लैच भारी.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sun, 01/12/2014 - 19:44

Permalink

वाह वा !

कसली स्वादिष्ट आणि पौष्टीक भाजी. मस्त झाला रवीवार.
  • Log in or register to post comments

Submitted by खान्देशी on Sun, 01/12/2014 - 20:35

Permalink

मस्तच!

उन्दियो ! ते क्ले पॉट लै भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 01/12/2014 - 20:42

Permalink

ओय होय!

कसली जबरदस्त भाजी आहे! तुम्ही काढलेले फोटो तर नेहमीच मस्त असतात! भाजीचं वर्णन आणि एकूण रसायन जमलंय. हा खतखत्याचा आणखी सौम्य भाऊ दिसतो आहे! आणि तो मातीचा कूकर तर मला फारच आवडला. कुठे मिळतो?
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sun, 01/12/2014 - 20:58

Permalink

वाहव्वा!

वाहव्वा! सर्व फोटो अतिशय देखणे आणि वर्णन भुक चाळवणारे. - (सुखी रविवार सार्थकी लागलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sun, 01/12/2014 - 21:04

In reply to वाहव्वा! by सोत्रि

Permalink

+++ १

+++ १
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Sun, 01/12/2014 - 21:43

In reply to +++ १ by सस्नेह

Permalink

+२

+२
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on Sun, 01/12/2014 - 21:43

Permalink

पाकृ आवडली.. आता मातीचे भांडे

पाकृ आवडली.. आता मातीचे भांडे शोधणे आले ....
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Sun, 01/12/2014 - 21:48

Permalink

व्वा! मस्त प्रकार!!!

व्वा! मस्त प्रकार!!! उत्तम पाकृ व timing!!! निसर्ग देवतेची कृपा व त्याचा ऋतू/काळ परत्वे कल्पकतेने केलेला अद्भुत वापर! त्यात आपल्यासारखे दर्दी खवय्ये. व्वा! क्या बात है!!! हे combination भारतीय संस्कृतीचाच भाग आहे. आपला मिपास्नेही: आयुर्हीत
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Sun, 01/12/2014 - 23:09

Permalink

धन्यवाद

विषय निवडताना अनवधानाने 'चित्रपट' असा निवडला गेला असावा, इथे प्रतिसादात वाचेपर्यंत कल्पना नव्हती. पेठकरसाहेब, भाजी करताना पातीची ओली लसूण मिळाली तर वाटणात तिही घालुन पाहा, जरा वेगळा स्वाद येतो. मातीचा कुकर गुजरातमधील वांकानेर येथुन आणला आहे. या कुकरमध्ये मुगडाळीची खिचडीही झकास होते. मातीचा तवाही मिळतो, त्यावर थालिपीठ मस्त होते, कमी तेलात होते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 01/13/2014 - 20:47

In reply to धन्यवाद by सर्वसाक्षी

Permalink

डझनाचा भाव काय?

इथे मिळते ओली लसूण. नक्की वापर करेन. पण कुकर आणि मातीचा तवा म्हणजे आमच्या घरी अर्धा-अर्धा डझन तरी घ्यावे लागतील. सौं.चा हात भारी गळका आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 01/13/2014 - 22:52

In reply to डझनाचा भाव काय? by प्रभाकर पेठकर

Permalink

पण कुकर आणि मातीचा तवा म्हणजे

पण कुकर आणि मातीचा तवा म्हणजे आमच्या घरी अर्धा-अर्धा डझन तरी घ्यावे लागतील. सौं.चा हात भारी गळका आहे. वहिनींचा मिपावर वावर नसावा ;) (हघ्याहेवेसान)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 01/13/2014 - 04:19

Permalink

वाचायलाही मजा आली.

वाचायलाही मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/13/2014 - 07:25

Permalink

मस्त..

झक्कास...
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 01/13/2014 - 11:32

Permalink

भोगी आवडेश !!

भोगी आवडेश !!
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Mon, 01/13/2014 - 11:49

Permalink

मस्तच.....

फोटो पाहुन भुक चाळवली... ह्या प्रकाराला बहुतेक उकडहंडी देखील म्हणतात का? आम्ही यात कोनफळ, शेवगाच्या शेंगा व शेंगदाणे देखील घालतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 01/13/2014 - 12:30

In reply to मस्तच..... by शिद

Permalink

ओ हॅलो

कोनफळ म्हंजे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Mon, 01/13/2014 - 13:49

In reply to ओ हॅलो by बॅटमॅन

Permalink

गणपा ह्यांच्या खालील धाग्यात याची सविस्तर चर्चा झाली आहे...

धागा कोनफळ बद्दल अधिक माहीती.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 01/13/2014 - 14:07

In reply to गणपा ह्यांच्या खालील धाग्यात याची सविस्तर चर्चा झाली आहे... by शिद

Permalink

वा! धन्यवाद शिद साहेब.

वा! धन्यवाद शिद साहेब. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 01/13/2014 - 12:54

Permalink

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह Image removed. आणी फोटूंसाठी तर.. __/\__/\__/\__ आंम्हाला ही भाजी पाहिली की कुरुंदवाडी-गावाला त्या देवीच्या देवळात मुक्कामी-कामाला जायचो ते दिवस अठवतात! दुपारी काम संपलं की चारच्या सुमारास,छा..तंबाखू झाल्यावर आजू बाजुच्या मळ्यातून अश्या सगळ्या भाज्या आणायच्या.मग हिरिवर-फ्रेस पाण्यात धुवायच्या. तोपर्यंत आमच्यातला तो महान बल्लव भट-घटोत्कच ;) आत चुलिवर भात लाऊन पुढच्या तयारीत बसलेला असायचा. आंम्ही भाज्या निवडून चिरून द्यायचो. आणी परत छा तंबाखू करत शेतातनं हिंडायला भायेर! मग आठ वाजेपर्यंत आल्यानंतर देवळात संध्याकाळची वेदसेवा वगैरे झाल्यावर त्या बल्लवमित्राच्या नावातला सु योग आमच्या पानात गरम-गरम भाकर्‍यांसह उतरायचा. मग कांदा-काळामसाल्याची परतून केलेली चटणी..आणी ही लेकुरवाळी भाजी, मी आल्या आल्या केलेली आमची फेवरीट शांपल श्टाइल करंट देणारी आमटी ,भात ह्यावर सगळी जणं यथेच्छ तुटून पडायचो. आणी नंतर बाहेर वावरात चिंचेच्या त्या महावृक्षाखाली तीनचार खाटांवर आधी पत्ता-तंबाखूचं गावठी पान लाऊन पंधरा मिनिटं आसमंत आणी आपल्यातलं अंतर कमी करत-पडायचं! Image removed. आणी मग नंतर काही ठराविक व्यावसाइक काथ्याकूट करत... पहाटे ५ला उठायचा खंबीर संकल्प करत घोरं...निद्राधीन व्हायच! खरच..तिथले गुरुजी-गेले! :( आणी ते दिवसंही! :(
  • Log in or register to post comments

Submitted by Mrunalini on Mon, 01/13/2014 - 12:54

Permalink

वा.. खुपच छान. पाकॄ आवडली.

वा.. खुपच छान. पाकॄ आवडली. माझे आई हिच भाजी कांदा-खोबर्‍याचे वाटण आणि तिख्ट वैगरे घालुन करते. हि अशी आता एकदा करुन बघायला पाहिजे. बाकी ते मातीचे भांडे आवडले. कुठे मिळते ते?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 01/13/2014 - 13:05

Permalink

खेंगाट

मावळात याच भाजीला खेंगाट असे म्हणतात .. इकडे जरा तिखट असते .. तुमची पाकृ जबर्‍याच .. तोंडाला पाणी सुटले ..
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Mon, 01/13/2014 - 20:39

Permalink

आवडेश

:)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 01/13/2014 - 21:32

Permalink

सुरेख!!! "क्षुधा-साधना" खूप

सुरेख!!! "क्षुधा-साधना" खूप आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 01/14/2014 - 09:31

Permalink

व, छान!

वा, छान! :)
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Tue, 01/14/2014 - 09:42

Permalink

खलास !

लेख मस्तच झाला आहे. काल संध्याकाळी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी चेपली या लेखाची आठ्वण काढत काढत ! पण काल बायकोने ते मेथीचे गोळे घातले होते त्यामुळे ती भोगीची भाजी होती की उंधिया हे नीट्से कळले नाही . पण चव मात्र झकास होती .. तुमच्या पाक्रु सारखी !
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 01/14/2014 - 09:44

Permalink

झक्कास

मातीच्या भांड्याची कल्पना मस्तच. मातीचा कुकर फक्त गुजराथ मध्येच मिळतो का पुण्यात मिळेल?
  • Log in or register to post comments

Submitted by HEMALATA DHANA… on Tue, 01/14/2014 - 11:24

Permalink

छान लेख आहे.फोटो पण सुंदरच .

छान लेख आहे.फोटो पण सुंदरच .
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 01/14/2014 - 15:58

Permalink

वावा..

मस्त लेख.. भोगीची, संक्रांतीची आठवण ताजी करणारा.. (मातीचा कुकर फारच छान आहे..) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 01/14/2014 - 16:21

Permalink

ओ.. मी १५६७ व्यांदा आलेय हो

ओ.. मी १५६७ व्यांदा आलेय हो या धाग्यावर, मला फोटो दिसतच नाहीयेत.. मलाही मातीचा कुकर पहायचाय.. ए पै तै.. कर ना काही तरी..
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 01/14/2014 - 23:22

In reply to ओ.. मी १५६७ व्यांदा आलेय हो by पिलीयन रायडर

Permalink

दिसतायत ना!

मी कॉम्प्युटर, लॅपटॉप, गुगल क्रोम, फाफॉ असे दोन दोन प्रकार वापरले. मला दोन्ही वेळा व्यवस्थित दिसले फोटो. एक शक्यता आहे. काही जणांना फ्लिकर वरचे फोटो दिसत नाहीत. तसं काही झालं असेल तर सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Tue, 01/14/2014 - 22:57

Permalink

पाकृ आणी लेख

पाकृ आणी लेख दोन्ही +१ मातीचा कुकर फार म्हणजे फारचं आवडला.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com