मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )
पुनर्प्रसारणाबद्दल :
सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.
प्रस्तावना :
स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.
परीक्षण :
बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.
मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.
त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.
आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.
त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)
अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!
महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.
सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.
कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:
भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.
मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.
अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat
प्रतिक्रिया
17 Nov 2013 - 5:42 pm | चित्रगुप्त
पांडुला पंडुरोग म्हणजे अॅनिमिया होताच.
मात्र नियोगाच्या वेळी (अंबिका, आंबालिका पैकी जी कुणी होती तिने) डोळे मिटले म्हणून धॄतराष्ट्र आंधळा, आणि भयाने पांढरी पडली, म्हणून पांडुला पंडुरोग, हे पटत नाही, कारण मग या न्यायाने आंधळा धॄतराष्ट्र आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली गांधारी यांची सर्व संतती अंध व्हायला हवी होती.
मागे एक पुस्तक वाचलेले आठवते (आता नाव विसरलो) त्यात असे म्हटले होते, की महाभारतात जिथे जिथे शाप-वर-चमत्कार इ. आहेत, ते सर्व कोणती न कोणती वस्तुस्थिती दडवण्यासाठी टाकलेली भर आहे. याबद्दल सर्व उदाहरणे त्या पुस्तकात आहेत. कुणाला ठाउक आहे का हे पुस्तक?
17 Nov 2013 - 5:54 pm | यसवायजी
'वस्तुस्थिती दडवण्यासाठी' म्हणजे? जास्त माहिती मिळेल का यावर? म्हणजे काही उदाहरणार्थ..
17 Nov 2013 - 6:13 pm | आनंदमयी
आपण एस एल भैरप्पा यांच्या पर्व ह्या कादंबरीबद्दल बोलत आहात काय??
18 Nov 2013 - 9:23 am | चित्रगुप्त
पर्व नाही, बरेच जुने मराठी लेखकाचे पुस्तक होते.
17 Nov 2013 - 10:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
हायला ! खर्या महाभारतापेक्षा जास्त घमासान या धाग्यावर चालू आहे !! आता असते तर कौरवपांडव लढायचं सोडून मिपा हे असलं काही वाचत पडीक पडले असते आणि त्यांना लढायला वेळच मिळाला असता !!!
17 Nov 2013 - 11:56 pm | पुष्कर जोशी
माझे बाबा मेघालयात गेले होते (भारत मेरा घर कार्यक्रम)... तेथे आजही अंगठ्या शिवाय घनुष्य बाण चालवतात ...
21 Nov 2013 - 3:59 pm | निमिष सोनार
आज सगळ्यांच्यात "प्रतियोगिता" होणार आहे. धृतराष्ट्र आणि शकुनी यांना "प्रदर्शन" नको आहे...
आज सगळे पांडव आणि कौरव बहुतेक मोठे झालेले चेहेर्यांसह दाखवणार असे वाटते....
खूप उत्सुकता आहे...
कालच्या भागात (जेव्हा अश्वत्थामा कौरव पांडवांचे नाव लाकडी चक्रावर कोरत असतो तेव्हा) द्रोण आणि अश्वत्थामा यांच्यात "मैत्री" बद्दल जो "सं(वाद)" झाला त्यातले विचार परत परत ऐकण्या जोगे. चिंतन मनन करण्याजोगे आहेत.एपिसोड चुकला असेल तर ऑनलाईन पहा बरे का!!
महाभारताची निर्माते, लेखक या सह कलाकार हे सगळे अक्षरश मन लावून काम करत आहेत आणि महाभारत "जगत" आहेत असे मला वाटते आणि ते दिसून ही येत आहे....
बरं, मी लिहिलेल्या एका निरिक्षणाबद्दल कुणाची अजून प्रतिक्रिया आलेली नाही:
मी लिहिले होते की:
महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.
21 Nov 2013 - 9:25 pm | चित्रगुप्त
आजचा एपिडोस (२१ नोहेंबर) बघितला. च्यामारी नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर तर रजनी अण्णांचेही बाप आहेत. बुरुजावरून उड्डाण करून आगमन (तेही नव्वद अंशातून 'सरळ उलटे' लटकत) काय, अण्णा स्टाईलने खड्गे हवेत फेकून झेलणे काय, लाथ मारल्यावर पनास-शंभर हात उडत जाऊन पडणे काय, लई स्टाईलबाज लोक्स. आणि हे दाढी-मिश्यावाले झाले तरी त्यांच्या आया अजून तितक्याच चिकन्या. कहर आहे.
विनोदी सिरियल म्हणून बघावे.
21 Nov 2013 - 9:59 pm | ह भ प
डोक्याला जे शॉट लागले.. काय सांगू.. तत्काळ पेप्रात डोके खुपसले..
21 Nov 2013 - 11:50 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
धन्य _/\_
21 Nov 2013 - 10:20 pm | पैसा
मग काय ठरलं शेवटी? मी या मालिकेचे १ ते दीड भाग पाहिले आणि मग मालिका आहे हे विसरून गेले. पूर्वीची महाभारत अशीच काहीकाळ पाहिली होती. मग रामायण आणि महाभारत या मालिका सुरू असताना बाजारात गेल्यास रस्ते आणि दुकाने रिकामी मिळतात हा बहुमूल्य शोध लागला त्यामुळे त्या मालिका प्रचंड आवडू लागल्या.
महाभारतावर अनेकांनी अनेक प्रकारे लिहिले आहे त्यात आणखी थोडी भर. काय फरक पडतो? जौ द्या. टीव्हीवर आलेल्या महाभारत मालिकांपैकी "भारत एक खोज" मालिकेच्या काही भागात जे महाभारत दाखवले होते ते मला बर्यापैकी आवडले होते.
22 Nov 2013 - 12:12 pm | चित्रगुप्त
अगदी असेच आमचेही झाले. त्यावेळी निवांतपणे फिरायला जायचो.
बाकी आतचे महाभारत विनोदी कार्टून सारखे बघावे, असा विचार आहे.
या सिरियलबद्दल एक मला न सुचलेला विचार काल कळला, तो म्हणजे कार्टून मालिका बघाणार्या अल्पपवयीन मुलांना हे असे उड्डाण करून येणारे पांडव वगैरे प्रचंड आवडतात. त्यामुळे ही बाळगोपाळ मंडळी महाभारत बघतील, आणि त्यांच्या आवडीच्या स्वरूपात त्यांच्यापर्यंत महाभारत पहुचेल, ही एक फार चांगली गोष्ट होईल, असे म्हणू शकतो. वयस्क, ज्यांनी महाभारतावरील अनेक पुस्तके वाचली आहे, त्यावर मनन केलेले आहे, त्यांनी ही मालिका बघण्यापेक्षा आजवर महाभारताची ओळख न झालेल्या लहान मुलांनी ती बघणे जास्त गरजेचे आहे, आणि हल्ली उपलब्ध असलेल्या कार्टूनांशी स्पर्धा असल्याने निर्मात्यांनी महाभारतात असा मालमसाला टाकला असावा, असे वाटते.
22 Nov 2013 - 12:27 am | शिद
कौरवांसारखे ह्या धाग्याचे बघताबघता १०० झाले... :)
22 Nov 2013 - 12:19 pm | सौंदाळा
अरे आनंद्-कार्लसन लढतीसारखे धावते समालोचन आहे कि काय?
झाला नविन भाग की टाक स्टोरी.
मराठी आंतर्जालावर हा एक नविन प्रकार सुरु झालाय असे समजावे का? ;)
22 Nov 2013 - 12:35 pm | चावटमेला
माबो ची परंपरा मिपावर सुरू झालेली दिसतीये
28 Jan 2014 - 1:12 pm | फिरंगी
फारएंड सायबाच्या कडून परीक्षण कस करावे ते शिकावे .............फारइंडांचे परीक्षण कमीतकमी पुढील १० वर्षे वाचावे .......आणि लिहिते व्हावे .....
28 Jan 2014 - 1:52 pm | संपत
युटूबवर पीटर ब्रूकचे महाभारत उपलब्ध आहे. जिज्ञासूनी जरूर पाहावे.
29 Jan 2014 - 6:19 pm | म्हैस
इकडचं तिकडचं काहीतरी वाचत बसण्यापेक्षा मूळ महाभारत वाचा. द्रोण वचनाला बांधील होते म्हणून त्यांनी असं केलं. तसच खाल्लेल्या मिठाला जागायला सुधा बांधील होते म्हणून इच्छा नसताना कौरवांच्या बाजूने लढावं लागलं
29 Jan 2014 - 6:43 pm | प्रचेतस
सहम्त आहे.
आता इकडचे तिकडचे वाचण्यापेक्षा मूळ महाभारत वाचावे म्हणतो. :)
29 Jan 2014 - 7:56 pm | यसवायजी
आणी मुळ म्हंजे कुठलं ते म्हैसतैंना पैलाच इचारुन घ्या. ;)
29 Jan 2014 - 9:08 pm | प्रचेतस
अगदी अगदी. =))
29 Jan 2014 - 6:22 pm | म्हैस
चित्रगुप्ताच्या मताशी सहमत . ह्यात 6०% उगीच आपला काहीतरी बाळबोध दाखवलंय पण ४०% मूळ महाभारताला धरून आहे ह्याच्याशी सुधा सहमत
28 Mar 2014 - 4:06 pm | निमिष सोनार
महाभारत नियमितपणे पहाताय की नाही मिसळपावकर मंडळी ?