टकल्या बापटाचा संताप, मी आणि अण्णा...! :) -- २ (अंतिम भाग)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
1 May 2013 - 1:29 pm

येथेल ब-याच मंडळींच्या आग्रहाला मान देऊन टकल्या बापटाचा दुसरा आणि अंतिम भाग येथे देत आहे.. भीमसेनजी, बाबूजी, मधुबाला इत्यादी..ही माझी श्रद्धास्थानं आहेत. त्यांच्याविषयी लिहायला मल आवडतं. ज्यांना या विषयांचा तिटकारा आहे त्यांनी खालील लेख नाही वाचला तरी चालेल. त्यांच्या व्यक्तिगत आवडीनिवडींचा मी आदर करतो..धन्यवाद..

तसेच या लेखनाचे कुणी छानसे विडंबन केल्यास त्याचे स्वागतच आहे.. - ; )

या पूर्वी-
टकल्या बापटाचा संताप, मी आणि अण्णा...! :) -- १

>>......आता पुढची पायरी होती ती रंगमंचावर ब्यॅकष्टेज प्रवेश मिळवण्याची. आणि गाठ टकल्या बापटाशी होती..!...

मनात म्हणत होतो.. 'थांब लेका बापटा.. एकदा अण्णांशी संपर्क होऊ देत.. नाय तुला 'A रांगेत' बसून दाखवलं तर नावाचा तात्या नाय..!'

"छ्या....! अण्णांनी तुम्हाला बोलावलं..? अहो असं सांगून घुसणारे अनेक असतात.. आणि म्हणे अण्णांनी बोलावलं..! कोण तुम्ही..?? "

आता मात्र मी उखडलो..च्यामारी मी मघापासून या बापटाशी नम्रपणे बोलतोय आणि हा मात्र लेकाचा मुंबै विद्यापिठाचा तो परिसर आणि अण्णांच्या गाण्याचे जागतिक हक्क विकत घेतल्यासारखा तुसडेपणाने माझ्याशी का बोलत होता..?

"का हो? तुम्हाला तुमच्या आईबापसाने नीट बोलायला शिकवलं नाही का..? मी मघापासून तुमच्याशी नीट बोलतो आहे आणि तुम्ही मात्र, मी तुमच्या तीर्थरूपांचा नोकर असल्यासारखे माझ्यावर खेकसताय..? मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही मला वाटेल तसं बोलावं..तुम्हाला काही बोलायची पद्धत वगैरे आहे की नाही..?"

च्यामारी मीदेखील आता तार षड्ज लावला..

"हॅलो.. सिक्युरिटी.................! या माणसाला पहिले बाहेर हाकला..!! " -- बापटानेही आता तार तार षड्ज लावला..

लगेच तिथे एकदोघं सिक्युरिटीवाले आले.. लांबून एक कुणीसे पीएसाअय (पोलिस फौजदार) देखील येताना दिसले..

"ओ.. बाहेर काय हाकला..? या विद्यापीठाचं आवार काय तुमच्या बापाचं आहे काय..?" -- मी.

आपण तर बोलूनचालून दारूच्या धंद्यातच नौकरीला होतो.. अंगात रग होती..मारामाऱ्या, भांडणं करायचीदेखील जबर हौस..! आज भले या बापटाने अण्णांच्या गाण्याला बसू दिलं नाही तरी चालेल, पण जाता जाता अत्यंत मुजोरपणे माझ्याशी बोलल्याबद्दल याच्या किमान एक खणखणीत कानाखाली तरी खेचायचीच असंही मी मनोमन ठरवलं..भले मग मागाहून पोलिसांनी पकडलं तरी बेहत्तर..!

दोघं सिक्युरिटीवाले येऊन माझ्या दंडाला धरू लागले.. तेवढ्यात ते फौजदार तिथे पोहोचले.. त्यांच्या वर्दीवर पाताडे आडनावाची पाटी होती..

"काय रे, काय झालं? काय गडबड आहे..? " आता फौजदारांनी संभाषणात एंट्री घेतली..

"अहो बघा ना..हे भीमसेन जोशींचं नाव सांगून फुकट घुसू पहात आहेत.. " - माझ्याकडे पहात बापट फौजदारसाहेबांना म्हणाला..

"नमस्कार पाताडे साहेब..!"

'दूर से उठाना और नजदिक से नीचे लाना.. ' हा सॅल्युटचा नियम पाळत मी फौजदारसाहेबांना पहिला एक फुकटचा कडक सॅल्यूट ठोकला..त्या बरोब्बर फौजदारसाहेबांची जरा माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली...

मग मी फौजदारसाहेबांना थोडक्यात सगळी हकिगत सांगितली..

"अहो पाताडेसाहेब, या बापटसाहेबांनादेखील मी हेच सांगितलं.. तरीही हे माझ्यावर मघापासून गुरकावत आहेत..मी काय म्हणतो फौजदारसाहेब, मला फक्त एकवार भीमसेनजींना भेटू द्या.. मला गाण्याला बसू द्या असाही माझा आग्रह नाही.. खरोखरच जर सगळ्या शिटा फुल्ल असतील तर मी खुशीने घरी परत जाईन.. भीमसेनजींना केवळ भेटल्याचं समाधानदेखील माझ्याकरता खूप मोठं आहे..! "

"अरे जा रे जरा यांना आत घेऊन.. भेटवून आणा.. "

फौजदारांनी तेथील एका प्रायव्हेट सिक्युरिटीवाल्याला हुकूम सोडला..

"हुश्श..!" असं मी मनाशीच म्हणत एकदाचा ग्रीनरूमपाशी दाखल झालो. दार थोडं किलकिलं होतं.. आत अण्णांचे निषादाचे तंबोरे सुसाट लागत होते, त्याचा आवाज येत होता.. मी हळूच दार थोडं लोटून खोलीत डोकावलो. ‌समोरच माझा देव बसला होता..झकासपणे पान जमवणं चाललं होतं.. बोरकर, नाना मुळे बसले होते.. की भरत कामत होता? ते आता आठवत नाही.. टाकळकर होते..तितक्यात अण्णांची नजर माझ्याकडे गेली..

मी पुढे होऊन पहिले त्यांच्या पायावर डोकं ठेवलं..

"या....काय म्हणता..?!"

नेहमीचंच मोजकं बोलणं. पण किती आश्वासन होतं, किती आपुलकी होती, किती साधेपणा होता त्यांच्या बोलण्यात..!

मग मीच जरा दबकत दबकत तोंड उघडलं.. "अण्णा.. मी त्या दिवशी तुम्हाला पुण्याला फोन केला होता.. तुम्ही बोलवलंत खरं.. पण मी चौकशी केली.. गाण्याला बसायला जागा नाहीये.." - मी हळूच सांगून टाकलं...

"जागा नाही.? असं कसं होईल.. त्यांना सांगा...! "

त्या ग्रीनरुममध्येच अजून दोन पाच मंडळी उभी होती त्यापैकी एकाकडे बोट दाखवत अण्णा म्हणाले..आता ते गाण्याच्या मुडात होते त्यामुळे मग मीही त्यांना फारसं डिस्टर्ब न करता तिथून उठलो आणि त्या व्यक्तिपाशी पोहोचलो..

तो जो कुणी बड्या सफारीसुटाबुटातला इसम उभा होता तो बापटाच्या अगदीच विरुद्ध होता..अगदी नम्र आणि डीसेंट..

"नमस्कार साहेब.. मी भीमसेनजींना पुण्याला फोन केला असताना त्यांनीच मला या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन दिलं होतं.. आहे का एखादी जागा शिल्लक..? "

"Yes yes.. please come this way..."

हा इसम तर साला एकदम हायफाय विंग्लिशमध्येच बोलायला लागला..परंतु एकदम नम्र.

आणि मग सर्व गोष्टी अगदी स्वप्नवत घडल्या.. आणि त्या भल्या इसमाने खरोखरच मला पहिल्या रांगेत एका खुर्चीवर मानाने बसवला..

"One Mr Bapat is outside there.. he was so arrogant with me.."

"Not to worry Sir... I will take care of him..!"

Sir?

च्यामारी इतका वेळ राजाभाई टावरच्या प्रांगणात कसनुसा उभा असलेलो मी एकदम Sir झालो..? गंमतच वाटली मला. - : )

जरा वेळाने पुन्हा तो सुटाबुटातला नम्र इसम आणि बापट दोघं सभागृहात आले..

"He is Mr Abhyankar.. he is an invitee by Bhimsenjii himself.. we will adjust the seats.. but let him sit here..!"

वाफेचं इंजीन जसं धुसफुसतं तसं धुसफुसत बापटाने काही न बोलता होकार भरला.. :))

मग माझं मलाच मनाशी हसू आलं... बापटाचा थयथयाट.. ते सिक्युरिटीवाले.. ते फौजदार पाताडे.. ती ताणाताणी आणि वादावादी..!

आज अनेक वर्ष झाली या गोष्टीला.. पण आता आठवायला लागलो की गंमत वाटते.. - : )

कोण कुठला तो उर्मट बापट..?

अहो अण्णांच्या अवघ्या 'या.. ' आणि "जागा नाही..? असं कसं होईल..?" -- इतक्याच शब्दांनी ते बाहेरचं वादळ क्षणात मिटलं होतं..

BJ

असं वाटतं पुन्हा एकदा मुंबईत कुठेशी छानशी अण्णांची मैफल असावी..गाण्याआधी ग्रीनरुममध्ये जाऊन त्यांना भेटावं.. त्यांच्या 'या..!' तली आपुलकी अनुभवावी..

'नानजीभाई.. पान जमवा..! ' - असं नाना मुळेंना सांगताना त्यांना ऐकावं...

असो... अण्णा आता नाहीत ही वस्तुस्थिती पचवणं खूप जड जातं आहे...!

टकल्या बापटही शिंचा आता रिटायर होऊन घरी बायका-मुलांवर वसावसा ओरडत बसला असेल.. - : )

चालायचंच..!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

1 May 2013 - 1:49 pm | संजय क्षीरसागर

मस्त जमवलंय पान!

चिगो's picture

1 May 2013 - 1:59 pm | चिगो

लिहीते रहा, ही विनंती..

मोदक's picture

1 May 2013 - 2:01 pm | मोदक

धन्यवाद!

आता रोशनी...

सुहास झेले's picture

1 May 2013 - 6:44 pm | सुहास झेले

यप्प !!

तिमा's picture

1 May 2013 - 2:12 pm | तिमा

तात्या, मला तुमचा हेवा वाटतो. साक्षात भीमसेन जोशी गाण्याचे आमंत्रण देतात आणि बापटाच्या टकलावर टिच्चून तुम्ही पहिल्या रांगेत बसता. म्हणजे डबल आनंद, टकल्याची जिरवली आणि दुसरे ते गाणे. अर्थात त्या स्वर्गीय गाण्यात डुंबताना तुम्ही त्या यःकश्चित माणसाला विसरुनही गेले असणार!
आता खास लोकाग्रहास्तव, 'रोशनी'.

किसन शिंदे's picture

1 May 2013 - 2:29 pm | किसन शिंदे

चला टकल्या बापट तर आला,आता रोशनी पुर्ण करा!

चाणक्य's picture

1 May 2013 - 3:33 pm | चाणक्य

पुरेल असा अनुभव...

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2013 - 4:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरोखरच्या थोर माणसाशी प्रत्यक्ष ओळख आणि पहिल्या रांगेत बसून गाणं म्हणजे फारच नशीबवान आहात !

कॉलेजच्या आर्ट सर्कलतर्फे झालेली शोभा गुर्टू याची मैफील अशीच पहिल्या रांगेत मांडी घालून बसून अनुभवली होती, ते सहज आठवलं. शास्त्रीय गाण्यातलं काहीपण कळत नसतानाही त्या मैफिलीनं एका वेगळ्याच तरंगणार्‍या मनस्थितीत नेलं होतं.

बॅटमॅन's picture

1 May 2013 - 4:40 pm | बॅटमॅन

खल्लास अनुभव! असल्या खडूसशिरोमणींच्या नाकावर टिच्चून असे काही करणे लैच खास!!

मनोज श्रीनिवास जोशी's picture

1 May 2013 - 5:05 pm | मनोज श्रीनिवास जोशी

जोरदार अनुभव आणि मस्त लेखन !

अमित's picture

1 May 2013 - 5:53 pm | अमित

अवांतर- गाणं कसं होतं?

प्रभाकर पेठकर's picture

2 May 2013 - 2:59 am | प्रभाकर पेठकर

'अवांतर' शब्दाचा चपखल उपयोग.

रमेश आठवले's picture

2 May 2013 - 10:21 am | रमेश आठवले

मी आणि माझे काही मित्र यांना शाळेत आणि कॉलेज च्या पहिल्या एक दोन वर्षात शास्त्रीय गाण्याचा ( ऐकण्याचा) बराच छंद लागला होता.आम्ही कधी कधी फ्रेंड्स मुझिक या दुकानात जावून चार आणे देऊन त्याच्या संग्रहातील आपल्याला आवडणारी रेकॉर्ड दुकानदाराला वाजवायला सांगून त्याच्या सौंड प्रुफ केबिन मध्ये बसून ऐकायचो . भीमसेन यांचे भावे बतिया तोरा आणि कुमारांचे सीर पे धरी गंग हे इथेच पहिल्यांदा ऐकले.
तसे पुण्यात गणेशोत्सवात आणि इतर ठिकाणी बरेच चांगल्या गायकांचे कार्यक्रम त्या काळी फुकट ऐकायला मिळत. पण कधी कधी आम्हाला न परवडणारे तिकीट ही असे .
एकदा शिवाजी मंदिरात ओमकारनाथ ठाकूर यांचा कार्यक्रम होता. आमच्याजवळ तिकिटासाठी पैसे न्हवते आणि घरी मागण्याचे धारष्ट्य न्हवते. आम्ही कार्यक्रम सुरु झाल्यावर थोड्या वेळाने शिवाजी मंदिराच्या भिंतीवरून उड्या मारून आत शिरलो. ठाकुरांनी त्या दिवशी गायलेली नट रागातली चीज - भरी घगरी मोरी धुल्कायी रे - अजून लक्षात आहे.
त्याच सुमारास पुण्यात नु.म.वि. च्या प्रांगणात ३ दिवसाचा संगीत महोत्सव झाला होता. प्रवेश पत्रिका आम्हाला परवडणार नाही अश्याच होत्या. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात आमची काही ओळखीची मंडळी म्ध्यन्तरा नंतर परत आली. त्यांना बाहेर निघताना गेट पास देण्यात आले होते . ते त्या नंतर त्या दिवशी परत गेले नाही. दुसरे दिवशी बडे गुलामली यांचे गायन होते ते ऐकण्यासाठी आम्ही काहीजण आदले दिवशीचे त्यांचे गेट पास घेऊन गेलो.दारावरच्या एका व्यवस्थापकाने आम्हाला हसत हसत सांगितले कि मुलांनो आजच्या गेट पास चा रंग वेगळा आहे. पुणेरी भाषेत बोलायचे झाले तर आमचा चक्क आबा झाला होता. त्यानंतर त्या माणसाने आमचा उत्साह लक्षात घेऊन आम्हाला तरीही आत सोडले.

योगी९००'s picture

2 May 2013 - 10:47 am | योगी९००

"छ्या....! अण्णांनी तुम्हाला बोलावलं..? अहो असं सांगून घुसणारे अनेक असतात.. आणि म्हणे अण्णांनी बोलावलं..! कोण तुम्ही..??

का कोणास ठाऊक? थोडेफार बापटाचे सुद्धा बरोबर वाटत आहे. आहो कदाचित काहीजणांनी असे खोटे सांगून बापटांना छ्ळले सुद्धा असेल. बापटांनी तुमच्याशी नम्रपणे बोलले पाहिजे होते हे मान्य. पण त्यांना कोणी सांगीतले नसेल की तुम्हाला प्रत्यक्ष पं. अण्णांनी बोलवले आहे.

बाकी तुम्ही खुपच नशीबवान. प्रत्यक्ष पं अण्णांसारख्या खरोखरच्या थोर माणसाशी ओळख...!!!

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2013 - 11:11 am | परिकथेतील राजकुमार

तात्याबांचे लेखन म्हणजे आजकाल जणू गरम जिलबीचे ताटच असते. एखाद्या प्रख्यात लेखकाची डायरीच वाचतो आहे असे वाटून गेले.

मस्त मस्त मस्त !

मन१'s picture

2 May 2013 - 11:25 am | मन१

चांगली मांडणी.
अमित ह्यांच्या अवांतराबद्दल जाणून घेण्यास उत्सुक :)

विसोबा खेचर's picture

2 May 2013 - 11:44 am | विसोबा खेचर

गण्याबदल तर वादच नाही..गाणं नेहमीप्रमाणे उत्तमच झालं होतं..माझ्या आठवणीप्रमाणे पुरियाकल्याण गायले होते..

महेश हतोळकर's picture

3 May 2013 - 3:51 pm | महेश हतोळकर

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार नाना पाटेकर मिपावर लेख लिहीणार आहेत,
"जाड्या अभ्यंकर, मी आणि अण्णा"

ढालगज भवानी's picture

5 May 2013 - 7:56 pm | ढालगज भवानी

आवडला. त्या वसावस ओरडणार्‍या जीवजंतूची खाशी जिरवलीत.

अत्रन्गि पाउस's picture

5 May 2013 - 11:57 pm | अत्रन्गि पाउस

तात्या मेल्या किती दिवस रे ते हे पुरे करायला??? व पण छान आहे...??...ते पुरिया कल्याण चे काय म्हणत होतास?

आदिजोशी's picture

6 May 2013 - 1:34 pm | आदिजोशी

आता रोशनी येऊ द्या तात्या :)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 May 2013 - 1:36 pm | घाशीराम कोतवाल १.२

काय दिवस आलेत आज चक्क अ‍ॅडीशी सहमत व्हाव लागतय
जोक्स अपार्ट तात्या रोशनी पुर्ण करा

आनन्दिता's picture

6 May 2013 - 3:48 pm | आनन्दिता

रोशनी ची वाट पाहणेत येतेय!!!! लवकर येउद्या!!