शनिवारवाडा (भाग १) : इतिहास

सव्यसाची's picture
सव्यसाची in जनातलं, मनातलं
21 Feb 2013 - 8:37 am

काही वर्षांपूर्वी ग.ह.खरे लिखित 'शनिवारवाडा' हे पुस्तक वाचनात आले. शनिवारवाड्याची कादंबऱ्यांमधून केलेली वर्णने त्या लेखकांनी कुठून मिळवली हा एक प्रश्न मला सतावत होता. या प्रश्नाचे उत्तर पुस्तकातून मिळाले. ग.ह.खरे यांनी पेशवे दफ्तरातील सात रुमाल वाचून शनिवारवाड्यावरील हे पुस्तक तयार केले होते. त्यांच्यानुसार हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या पुस्तकात इतिहास आणि अवशेष वर्णन यांचा समावेश आहे. शनिवारवाड्याचा प्लानचे छायाचित्र जर मिळाले तर अवशेषवर्णन ही आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.
*********************************************************************************************
नगारखान्यामधून दिसणारा शनिवारवाडा
नगारखान्यामधून दिसणारा शनिवारवाडा

शनिवारवाडा : इतिहास

इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर आलेल्या मुअज्जमने मराठ्यांमधील अंतर्कलह वाढावा या उद्देशाने शाहूंची सुटका केली. शाहू महाराष्ट्रामध्ये परतल्यानंतर त्यांना बाळाजी विश्वनाथ भट यांनी मदत केली. इ.स.१७१३ मध्ये शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांस पेशवा केले. त्यावेळी बाळाजी मुख्यतः सुपे व सासवड येथेच राहत असत. क्वचित प्रसंगी पुणे किंवा सिंहगड येथे ते वास्तव्यास येत.

इ.स.१७२० मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाले आणि थोरले बाजीराव हे पेशवेपदी आरूढ झाले. सुरुवातीच्या काळात त्यांचे वास्तव्य सुप्यास होते पण सुपे हे साताऱ्यास आडमार्गी! म्हणून त्यांनी सुपे सोडण्याचे ठरवले. तेव्हा त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. सासवड आणि पुणे. परंतु त्या काळी सासवडमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असे. त्याच सुमारास (इ.स.१७२६) पुणे हे गाव बाजीरावांस वंशपरंपरागत इनाम म्हणून देण्यात आले. यामुळे त्यांनी पुण्यास राहणे मुक्रर केले.

तत्कालीन पुण्याचा अधिकारी बापूजी श्रीपत यास पाठवलेल्या पत्रात बाजीरावांनी घराचा आराखडा सांगितला आहे. तो असा : सदर, सोपा व तटामध्ये कारकुनांची घरे. तत्पूर्वी चिमाजी अप्पांच्या सूचनेवरून कसबा पेठेमध्ये एक घर आधीच तयार करण्यात आले होते. पुढे लोक त्यास 'चिमाजी अप्पाचा वाडा' असे म्हणू लागले.

मुठा नदीच्या काठाला पूर्वी एक गढी आणि कोट होता. १७२८ ला ही जागा पेशव्यांनी बाबुजी नाईक बारामतीकर आणि पुरंदरे यांस दिली. या गढीच्या दक्षिणेस आणि लाल महालाच्या पश्चिमेस मोकळ्या जागेवर शनिवारवाडा बांधायचे ठरले. जी जागा शनिवारवाड्यासाठी निवडली तीत विशेष असे काहीच नव्हते. हीच जागा निवडण्यासाठी ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात त्यातली एक अशी आहे : जेव्हा बाजीराव इथे फिरायला आले तेव्हा त्यांना एक ससा कुत्र्याचा पाठलाग करताना दिसला. हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि या जागेत काहीतरी विलक्षण आहे अशी खुणगाठ त्यांनी मनामध्ये बांधली आणि शनिवारवाड्यासाठी हीच जागा नक्की केली! अर्थात या कथांमध्ये फार काही तथ्य नाही. या वाड्याला शनिवारवाडा हेच नाव का दिले याचे कारण हा वाडा शनिवार पेठेमध्ये होता/आहे एवढे सरळ आहे.

माघ शु.३ शके १६५१ ( १० जानेवारी १७३०) या दिवशी पाया घातला गेला आणि वास्तुशांती रथसप्तमी, शके १६५३( २२ जानेवारी १७३२) या दिवशी झाली. इमारतीची आखणी शिवरामकृष्ण लिमये (खासगीवाले) यांनी केली. पुढे यामध्ये भर घालण्याचे काम जिवाजी गणेश, रघुनाथ शिवराम इ.नी केली. वास्तुशांतीपर्यंतचा शनिवारवाड्याचा खर्च हा १६१२० रु. इतका होता. पण शनिवारवाड्यावर इतकाच खर्च झाला असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. कारण १७३२ नंतर दुसऱ्या बाजीरावाच्या काळापर्यंत शनिवारवाड्यात इमारती उठवल्या जात होत्या. १७३३ मध्ये पेशव्याच्या निजण्याच्या खोल्या, कारंजे, दिवाणखाना, दरवाजे, नदीच्या जवळची भुडकी , ती आत आणण्यासाठीचा पाट, विहीर, गावकूस, वाड्याचे कुस इ. इमारती बांधण्याच्या राहिल्या होत्या. सुरुवातीच्या काळात वाड्याच्या कोटामध्ये खासे पेशवे आणि कारभारी महादजी पुरंदरे यांचेच घर होते. बाकी सर्व अधिकारी कोटाबाहेर राहत असत.

पहिल्या बाजीरावांनी पूर्ण पुणे शहराला व वाड्याला कोट बांधण्याचा निश्चय केला. पण शाहूंचा यास विरोध होता. त्यांच्या मतानुसार जर कोट असलेले हे शहर आणि वाडा जर मोगलांच्या ताब्यात गेला तर या सुरक्षित जागेचा फायदा घेऊन ते इतर ठिकाणेही जिंकू शकतील. कालांतराने शहराच्या कोटाचे बांधकाम बंद पडले पण वाड्याचा कोट मात्र शाहूंच्या मृत्युनंतर (१७४९) पूर्ण करण्यात आला. आज तटाचा खालचा भाग चिरेबंदी दिसतो तरी वरचा भाग पक्क्या विटांचा. पैकी पक्क्या विटांचा भाग हा शाहूंच्या मृत्युनंतरचा आहे. शनिवारवाड्यामधील वस्ती वाढू लागल्यानंतर शेजारच्या घरांचे आणि वाड्यांचे भूसंपादन सुरु झाले आणि हे काम १७५४ पर्यंत सुरु होते.

पाण्यासाठी असणाऱ्या विहिरी अपुऱ्या पडल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी कात्रजहून पाणी आणले. तसेच सांडपाणी पश्चिमेच्या ओढ्यामध्ये (सध्याच्या बाजीराव रोड) सोडण्याची व्यवस्था केली. नानासाहेब व त्यानंतरच्या काळात शनिवारवाड्यामध्ये जवळपास १००० माणसे वावरत असत. पानिपतच्या युद्धानंतर (१७६१) पुढील १५ वर्षे कोणतेच नवीन बांधकाम हाती घेण्यात आले नाही. त्यानंतर नाना फडणवीसांनी सवाई माधवराव यांच्यासाठी आरसेमहाल व मेघडंबरी बांधली तर दुसऱ्या बाजीरावाने अस्मानी महाल व आपला भाऊ अमृतराव यासाठी दिवाणखाना इ. इमारती उठवल्या. तसेच त्याने शुक्रवार, बुधवार आणि विश्रामबाग असे तीन वाडे बांधले. त्यामुळे शनिवारवाड्यावरचे त्याचे लक्ष कमी झाले आणि एक एक इमारत आगीच्या भक्षस्थानी पडू लागली.

आगींचे सत्र

७ जून १७९१ रोजी लागलेल्या आगीने कोठी व सातखणी बंगल्याचे वरचे पाच मजले जळाले. आग पसरू नये म्हणून काही इमारती पाडण्यात आल्या ज्यामध्ये माजघर, सवाई माधवरावांच्या बायकोचे राहण्याचे स्थळ, स्वयंपाक घर यांचा समावेश आहे.
१८०८ मध्ये जवाहीरखाण्यास आग लागली. पण ती लवकर लक्षात आल्याने जास्त नुकसान झाले नाही.
२५ व २६ फेब्रुवारी १८१२ रोजी लागलेल्या आगीमुळे अस्मानी महाल आणि सातखणी बंगल्याचे उरलेले २ मजले उद्ध्वस्त झाले.
१० सप्टेंबर १८१३ रोजी लागलेल्या आगीमध्ये दिवाणखाना जळाला.
२१ फेब्रुवारी १८२८ मध्ये लागलेल्या आगीमध्ये सर्व वाडा जळाला. विभक्तपणामुळे फक्त नगारखाना आणि आरसेमहाल शिल्लक राहिला. त्यातील आरसेमहालही काळाच्या ओघात नष्ट झाला.
नगारखाना
नगारखाना

शनिवारवाडा आणि इंग्रज

१७ नोवेंबर १८१७ रोजी इंग्रजांनी हा वाडा ताब्यात घेतला व कलेक्टर रॉबर्टसन तिथे राहायला लागला. ३-४ वर्षानंतर तिथे कैदी ठेऊ लागले. १८२१ च्या मध्यात पेशव्यांच्या सर्व वाड्यांची किंमत करण्यात आली. तत्कालीन कमिशनरच्या अहवालानुसार हा वाडा जेव्हा बांधला तेव्हा त्याची किंमत १५ लाख होती व आता ती ६ लाख आहे. या किंमतीच्या फरकावरून आगीच्या प्रलयाची कल्पना आपण करू शकतो.
बिशप हिबर या व्यक्तीने हा वाडा जून १८२५ मध्ये पहिला तेव्हा तळमजला कैदी ठेवण्यासाठी वापरीत, दुसऱ्या मजल्यावरील दिवाणखान्याचे पंगुगृह व तिथेच दवाखाना होता तर तिसऱ्या मजल्यावर वेड्यांचे इस्पितळ होते.
आरसेमहाल नष्ट झाल्यानंतर नगारखाना व बुरुजांवरची छपरे शिल्लक राहिली. ही छपरे सरकारी दफ्तरखाण्यासाठी वापरीत असत. पुढे शनिवारवाड्यातील निवसाथाने हलवली गेली व कोर्ट भरू लागले. १९१७ मध्ये शनिवारवाड्यातील अवशेष शोधण्याचे काम सुरु झाले. आज आपण जे काही अवशेष पाहतो ते त्याच उत्खननाचा परिपक आहेत. तसेच दिल्ली दरवाज्याच्या आतील भिंतीवर असणारी शेषशायी, गणेश यांची चित्रे सुद्धा १९२१ च्या आसपास दृष्टोत्पत्तीस आली.

भित्तीचित्रे
भित्तीचित्रे

क्रमशः

ता.क. : हा लेख लिहिताना बॅटमॅनराव गॉथमकर यांनी मदत केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद :)

इतिहासराहती जागालेखमाहिती

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 8:52 am | श्रीरंग_जोशी

या विषयावर प्रथमच वाचावयास मिळाले, धन्यवाद.

पु.भा.प्र.

प्रचेतस's picture

21 Feb 2013 - 8:53 am | प्रचेतस

मस्त सुरुवात.

किसन शिंदे's picture

21 Feb 2013 - 9:05 am | किसन शिंदे

शनिवारवाड्यावर पहिल्यांदाच वाचतो आहे. त्यातल्या दंतकथांवरही लिहावं अशी विनंती करतो, जसं की चोरदरवाजा, तळघर.

धन्यवाद!

सव्यसाची's picture

26 Feb 2013 - 7:04 am | सव्यसाची

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..!

काही दंतकथा आहेत ज्या अवशेष वर्णनाच्या ओघात येतील आणि काही मी कादंबऱ्यांमधून वाचल्या आहेत.. त्या सर्व इथे देण्याचा प्रयत्न करेन..

पैसा's picture

21 Feb 2013 - 9:28 am | पैसा

पुढचा भाग लवकर येऊ द्या!

विजय मुठेकर's picture

21 Feb 2013 - 9:45 am | विजय मुठेकर

कधितरी पर्वतीवर असलेल्या संग्रहालयात शनीवारवाड्याचा (कि आतील कोणत्या तरी इमारतीचा) सात (कि पाच) मजले असलेला फोटो पाहीला होता. कदाचित तो फोटो अजूनही आहे तेथे........ शनीवारवाड्याच्या बांधकामाची माहिती पण तेथेच वाचल्याचे आठवतेय.........

सव्यसाची's picture

26 Feb 2013 - 7:09 am | सव्यसाची

विजयजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..!
या संग्रहालयामध्ये मध्ये असणारे चित्र हे सातमजली इमारत कशी असावी असे कल्पना करून काढलेले आहे.. त्या इमारतीवरून आळंदी दिसत असे म्हणत..
तसेच तिथे इतरही चांगली चित्रे उपलब्ध आहेत जसे पर्वती वरून दिसणारी सारस बाग, जुने पुणे वगैरे..

बॅटमॅन's picture

21 Feb 2013 - 11:28 am | बॅटमॅन

सही हो अर्जुनभौ. आउर आंदो जल्दीच :)

टीपः आमचा ऋणनिर्देश केल्या गेला आहे खरा, पण सिंव्हाचा वाटा सव्यसाची यांचाच आहे.

नीलकांत's picture

21 Feb 2013 - 7:15 pm | नीलकांत

लेख छान झाला. पुढील भाग येऊ द्या.

bharti chandanshive१'s picture

22 Feb 2013 - 10:33 am | bharti chandanshive१

सुन्दर लेख

वेल्लाभट's picture

22 Feb 2013 - 10:39 am | वेल्लाभट

ग्रेट !

प्रसाद गोडबोले's picture

23 Feb 2013 - 12:25 pm | प्रसाद गोडबोले

पण आपल्याला आज शनिवार वाड्यापेक्षा विश्रामबाग वाडा जास्त आवडतो

सव्यसाची's picture

26 Feb 2013 - 7:13 am | सव्यसाची

गिरीजाजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..!

शनिवारवाड्यामध्ये अवशेष जे शिल्लक आहेत ते म्हणजे फक्त तटबंदी आणि नगारखाना.. आतल्या इमारती नसल्यामुळे एक फेरफटका मारला कि संपले पाहून असे होते.. या लेखमालेची अपेक्षा हीच आहे कि आपण जेव्हा परत शनिवारवाड्याकडे जाल तेव्हा या नवीन माहितीच्या आधारे तो पाहण्याचा आनंद घेऊ शकाल.. :)

यशोधन वाळिंबे's picture

23 Feb 2013 - 4:23 pm | यशोधन वाळिंबे

शनिवार वाड्यावरील इतके ऑनलाईन मराठी लेखन पाहुन आनंद झाला. मराठी विकिपीडिया वरील शनिवार वाड्यासंबंधित पानावर देखील आपल्या अमुल्य ज्ञानाची भर घालावी हि नम्र विनंती..

सव्यसाची's picture

26 Feb 2013 - 7:18 am | सव्यसाची

यशोधनजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. :)
आपण दिलेल्या विकीच्या लिंक वरती या माहितीची भर घालण्याचा नक्की प्रयत्न करेन..

यशोधरा's picture

23 Feb 2013 - 4:31 pm | यशोधरा

वाचते आहे..

रमेश आठवले's picture

23 Feb 2013 - 6:13 pm | रमेश आठवले

कृपया अवशेषां बद्दल अधिक माहिती द्या.

सव्यसाची's picture

26 Feb 2013 - 7:23 am | सव्यसाची

नक्कीच..! पुढचा लेख हा सध्या दिसणारे अवशेष (तटबंदी, दरवाजे, नगारखाना) यावर असेल.. त्यापुढचे लेख हे शनिवारवाड्याच्या आतल्या इमारती कश्या असतील, कोण कुठे राहत असेल, दफ्तराचे काम कुठे चालत असेल वगैरे. या सर्वांचे पत्रांच्या आधारे ग.ह.खरे यांही अंदाज बांधले आहेत.. ते मी आपल्यासमोर देईन..

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..!

सानिकास्वप्निल's picture

23 Feb 2013 - 6:35 pm | सानिकास्वप्निल

वाचत आहे
पुभाप्र

nishant's picture

23 Feb 2013 - 7:46 pm | nishant

सुर्वात मस्त झाली आहे.... पुभाप्र..

मूकवाचक's picture

27 Feb 2013 - 8:49 am | मूकवाचक

+१

सव्यसाची's picture

26 Feb 2013 - 7:25 am | सव्यसाची

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार.. दुसरा भाग १-२ दिवसामध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन..

सुमीत भातखंडे's picture

26 Feb 2013 - 5:28 pm | सुमीत भातखंडे

पुभाप्र

ऋषिकेश's picture

26 Feb 2013 - 5:31 pm | ऋषिकेश

चांगली सुरवात. पुलेशु
शक्य असल्यास आराखडा देण्याचा प्रयत्न करावा. उपलब्ध नसल्यास स्वतः ढोबळ आराखडा काढता येईल. नकाशा बनवण्यासाठी तांत्रिक मदत हवी असल्यास व्यनी करावा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Feb 2013 - 9:23 am | ज्ञानोबाचे पैजार

शनिवार वाड्या बद्दल नविन माहिती समजली, धन्यवाद,

पर्वती वरुन एक भुयार निघते ते थेट शनिवार वाड्यात उघडते असे म्हणतात.हे खरे आहे का?

पर्वतीवरील शंकराच्या देवळाच्या आवारात भुयाराचे या तोंड आहे. भुयाराच्या तोंडाजवळ कुंपण घालुन रस्ता बंद केला आहे

पैजारबुवा,

विकास's picture

27 Feb 2013 - 8:32 pm | विकास

बरीचशी माहिती पहील्यांदा समजली. लेख चांगला झाला आहे, पुढचे भाग देखील लवकर येउंदेत.

सुधीर's picture

27 Feb 2013 - 10:46 pm | सुधीर

छान! चांगली माहिती. पुलेशु.

पर्ण's picture

9 Mar 2016 - 1:10 am | पर्ण

सुंदर माहिती.... धन्यवाद!!