ओ माय गॉड अर्थात देवाशी भांडण
एवढ्यातच 'ओह माय गॉड' पाहीला.
मिसळीवरही खूप चर्चा झालेला हा चित्रपट आहे.
एकाने त्याची गोष्ट मांडली आहे तर दुसर्याने त्या चित्रपटाच्या विषयावर लिखाण केले आहे.
चर्चेला विषय मिळवून देणारा हा चित्रपट आहे हे नक्की.
वरकरणी हा चित्रपट काही वेगळ्या विषयाला हात घालणारा, भाष्य करणारा वाटत असला
तरी
हा विषय नवा नाही.
चावून चोथा झालेला हा विषय आहे त्यामुळे पिळून काढलेल्या चिपाडातून रस काढण्याचा हा प्रयत्न वाटतो.
टिळेमाळा, ढोंग, बकध्यान, बुवाबाजी हे शब्द भाषेत अस्तित्वात येऊन कित्येक वर्षे होऊन गेली आहेत.
विमलदांच्या 'परख' सारख्या चित्रपटातदेखील थोड्या प्रमाणात हा विषय येऊन गेलेला आहे.
सध्या भारतात
जे जे उत्तम उदात्त उन्नत त्या सगळ्याला यथेच्छ शिव्या देणे ही फॅशन झाली आहे.
आपले पूर्वज, आपला इतिहास, आपले आई बाप, आपला देश, आपली संस्कृती यांची निंदा नालस्ती केली की आपण
झालो पुढारलेले अशी अनेकांची समजूत झालेली दिसते.
बरं केवळ भारतीय संस्कृतीवर टीका केली असा आरोप होऊ नये म्हणून विदेशी संस्कृतीबद्दलही यात काही भाष्य केले आहे.
त्यालाच बहुधा सर्वधर्मसमभाव असे म्हणत असावेत.
धर्म याचा अर्थही इथे चुकीचा घेतला आहे.
आपल्याकडे 'धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे' असे म्हटले आहे.
यातल्या धर्माचा नेमका अर्थ ध्यानात घ्यावा.
__
धर्म मनुष्याच्या बाह्य रुपाला महत्व देत नाही.
आज या जगात अनेक पंथ आपले तत्वज्ञान आक्रमकपणे पसरवत आहेत. हे पंथ अनुयायांच्या बाह्यरुपाला फार महत्व देतात.
तुम्ही दिसता कसे, दाढी ठेवता की मिशी ठेवता ? कपडे कसे घालता ? याला महत्व फार.
बाहेरूनच मनुष्याचा पंथ ओळखता यावा अशी सोय पाहीली जाते.
कुठलाही पंथ असे बाह्य रुपाला महत्व देतो तेव्हा तो पंथ, एक समूह किंवा एक दबावगट म्हणून प्रगती करेल, वोटबँक म्हणून मजबूत होइल
पण
ईश्वरापासून लांबच राहील.
एखादा पंथ, पंथनिर्माता काही मते मांडतो आणि त्या मतांना ईश्वराशी जोडून देतो म्हणून तो धर्म नाही होऊ शकत.
कदाचित ही मते हा त्याचा विस्तारवाद असु शकतो.
हीच भाषा बोला, ती भाषा बोलु नका
हेच कपडे घाला, ते घालु नका
हे खा, ते खाऊ नका
असली योग्य अयोग्यची यादी, कर्मकांडाची यादी धर्म देत बसत नाही.
"माल देखील आपल्या पंथाच्या लोकांकडूनच घ्या" हा स्वार्थी विचारही धर्म सागत नाही.
मग धर्माची दुकानदारी म्हणजे नेमके काय हे चित्रपट दिग्दर्शकाने सांगावे.
आमच्या पंथाचे लोक तेवढे चांगले बाकी लोक दुष्ट, राक्षस, पापी.
एकदा पापी म्हटले की इतर पंथीयांना मारण्याचा परवानाही मिळतो
आणि
त्याची प्रॉपर्टी, राज्य जे जे मागे उरेल ते लुटण्याची उपभोगण्याची मुभा मिळते.
यामुळे कदाचित भौतिक विकास होत असेल, अध्यात्मिक नव्हे. त्यामुळे तो धर्म नव्हे.
चित्रपटात गीतेबरोबर कुराण बायबल यांचेही दाखले दिले आहेत. जेणेकरून एकावरच हल्ला केला असा आक्षेप घेतला जाऊ नये.
गीता कुराण बायबल सारे एकच शिकवण देतात असा निष्कर्श काढायचा का ?
याचं उत्तर ज्याचं त्यानं अभ्यास करूनच ठरवावं.
कर्मकांडाला धर्मात स्थान नाही. आपण गीता अभ्यासू शकता.
धर्मात ही यात्रा करा ती यात्रा करा असा आग्रह नसतो, त्यामुळे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी
म्हणत संत सावतामाळी पंढरीची वारी चुकवतात. ते कृत्य धार्मिकच ठरते.
अलिकडे धर्माचा फार संकुचित अर्थ घेतला जातो, चित्रपटातही तेच झाले आहे.
विवेकानंद ग्रेट, रामकॄष्ण ग्रेट, गीतारहस्य लिहीणारे लोकमान्य टिळकही ग्रेट असे एका बाजूला म्हणायचे पण
त्यांनी सांगितलेला धर्म मात्र समजून न घेता त्याच्या नावाने गळे काढायचे हा आजकालचा प्रकार दुटप्पी, ढोंगी, भंपकपणाचा वाटतो.
--
या चित्रपटातील मोहक गोष्टी-
सुदर्शन चक्र फिरवणारा कॄष्ण, कानजीभाईचे त्याने केलेले सारथ्य, सकाळी सकाळी वाजवलेली बासरी,
दिवे मालवताना सहजपणे झाकून टाकलेला चंद्र या गोष्टी अतिशय मोहक आहेत.
कृष्ण सुरुवातीला प्रकट होतो, एक एक लीला सहजतेने करु लागतो ते पाहणे थरारुन टाकणारे आहे.
--
असाच अनुभव मागे आम्ही सौभद्र पाहताना घेतला होता. थिएटरच्या अंधारात तेजस्वी भगवान श्रीकॄष्ण प्रकट होतात नि वावरतात हा अनुभव शब्दात माडण्यापलिकडचा आहे.
मागे एका मुलाखतीत भारतातल्या एका सुपरस्टारला विचारले होते, 'आपले ड्रीम प्रॉजेक्ट कोणते ?'
तो म्हणाला होता, 'महाभारत'
"मग तुम्ही त्यात कोणती भूमिका करणार'" असे विचारता
तो म्हणाला "भगवान श्रीकॄष्ण"
कॄष्णाच्या भूमिकेचा मोह भल्याभल्यांना का पडतो ते यातील कॄष्णावरून थोडेफार लक्षात येईल.
--
असले चित्रपट पाहून आपल्या संस्कॄतीबद्दल गैरसमज करून घेऊ नये.
'वसुधैव कुटुंबकम' म्हणणारी आपली संस्कॄती आहे
दगडातही देवत्व पाहणारी आपली संस्कॄती आहे आणि स्वत:ला विसरून त्या दगडातल्या देवापुढे नतमस्तक होणारी आपली संस्कॄती आहे.
या देशातली संस्कॄती, तिच्यावर टीका करण्याचे, टीका करणारे चित्रपट बनवण्याचे स्वातंत्र्य देते.
हेच भारतीय संस्कॄतीचे मोठेपण आहे, एवढे फक्त विसरू नये.
आपला
आशु जोग
ashujog @ gmail . com
प्रतिक्रिया
19 Nov 2012 - 12:15 am | आशु जोग
चित्रपट फार चांगल्या हेतूने काढला आहे असा समज असेल तर तो खरा नव्हे.
इथे गो गो गो गोविन्दा हे गाणे कशासाठी आहे ?
दिग्दर्शकाला विषयाचे गांभीर्य नाही हे यातल्या एका गाण्याने स्पष्ट व्हावे
गो गो गोविन्दा हे गाणे - त्यातला चेहेर्यावर शून्य भाव घेऊन वावरणारा प्रभुदेवा.
सोनाक्षी सिन्हाचा डान्स यातून काय साध्य झाले !
ग्याराह बारा तेरा, चढ गया पारा बॉडी का हमारा असं गात सोनाक्षीने केलेल्या अॅक्शन अगदीच खालच्या पातळीवरच्या आहेत.
विशेषतः दहीहंडीच्या उत्सवात असल्या शब्दांची काय होती गरज.
दिग्दर्शकाने आपण फार मोठ्या गंभीर विषयाला हात घातला आहे असा आव आणला आहे तो इथे खोटा पडतो.
चित्रपटामधे पैसा मिळवण्यासाठी फक्त प्रेक्षकच नव्हे तर तो सोडून आणखी एक मार्ग अवलंबला आहे, तो म्हणजे निरनिराळ्या उत्पादनांच्या जाहिराती यात केल्या आहेत.
उदा. दैनिक भास्कर, रीलायन्स, गोदरेज इ.
रीलायन्सची जाहीरात तर अगदी अनिल अंबानी यांचे नाव घेऊन केली आहे.
आपल्याकडे भगवंताची स्वयंभू मूर्ति सापडल्याचे उल्लेख आपण ऐकतो. त्या श्रद्धेची अकारण टिंगल यात आहे.
गंगाजल म्हणून लोकांना थोडी थोडी दारु देणे, पूजेच्या ताटात ठेवलेले निरांजन फूंकून विझवणे
या गोष्टी दाखवून काय मिळवलं असा प्रश्न पडतो…
19 Nov 2012 - 4:28 am | मराठे
>> इथे गो गो गो गोविन्दा हे गाणे कशासाठी आहे ?
खर्या गोविंदा नाचांमधे ह्याच प्रकारची गाणी चालू असतात.
खरं तर हे गाणं आणि त्यावरचा 'ड्यँस' दाखवल्याने दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे ते आणखीनच प्रकर्षाने पुढे येते (असं आपलं मला वाटलं ब्वॉ!)
>> गंगाजल म्हणून लोकांना थोडी थोडी दारु देणे, पूजेच्या ताटात ठेवलेले निरांजन फूंकून विझवणे
>> या गोष्टी दाखवून काय मिळवलं असा प्रश्न पडतो…
हेच की गंगाजल / निरांजन या सगळ्या गोष्टी कर्मकांड आहेत. त्याच्याकडे पाणी आणि दिवा एवढ्याच नजरेने बघावे. शिवाय आपली गंगा किती स्वच्छ आहे ते सगळ्यांना माहितच आहे.
21 Nov 2012 - 8:12 pm | आशु जोग
>> हेच की गंगाजल / निरांजन या सगळ्या गोष्टी कर्मकांड आहेत.
त्याच्याकडे पाणी आणि दिवा एवढ्याच नजरेने बघावे. <<
तर मग आपण दगडाच्या मूर्तीतही देव पहात नसाल
22 Nov 2012 - 10:47 am | उदय के'सागर
अर्थात दगडाच्या मूर्तीत देव पाहुच नये ... तो पहावा माणसात, आजूबाजूच्या निसर्गात आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतः मधेच देवाला शोधावं... स्वतः प्रमाणिक असाल, सत्य वागत असाल, इतरांशी चांगले वागत असाल इ. तर देव तुमच्यातच आहे की ओ...
22 Nov 2012 - 10:49 pm | आशु जोग
> अर्थात दगडाच्या मूर्तीत देव पाहुच नये ... तो पहावा माणसात >
तर मग आपण देवळात जात नसणार असं समजायचं का !
19 Nov 2012 - 1:16 am | सुनाम
मी चित्रपट पूर्ण पहिला नाही. चित्रपट ज्या नाटकावर आधारित आहे ते परेश रावलचे 'किशन वर्सेस कन्हैय्या'नाटक पाहिले.ते जास्त आवडले.ह्यात मुख्य हिंदू धर्माचीच टिंगल आहे. तोंडी लावण्याकरता बाकीच्या धर्मांचे उल्लेख.(जसे सत्यमेव जयते ह्या आमीर खान च्या कार्यक्रमाच्या जातीभेदाबद्दल च्या एपिसोड मध्ये बाकीच्या धर्मांमधला जातीभेद २ सेकंदात गुंडाळला).पण ह्या नाटक/सिनेमा मधला हा मुद्दा खरा आहे की लोकांच्या श्रद्धास्थानाला नष्ट करायला जाऊ नका. लोक तुम्हाला 'हिरो' बनवतील आणि तुमच्या रुपाने नवीन श्रद्धास्थान तयार होईल. लोकांनाच हे हवे असते आणि त्याचा फायदा घेणारे इरसाल तयार होतातच.सर्वच धर्मात.पंढरपूर, गाणगापूर, शनिशिंगणापूर इ. च्या जोडीला वैलन्केंनी,अवर लेडी ऑफ लुर्दस,मदर मेरी,डिव्हाईन नगर, अजमेर का दर्गा,हाज,नांदेड चा गुरुद्वारा अशी असंख्य यात्रा, फीस्ट,उरूस भरवणारी ठिकाणे आणि तिथे भक्तीभावाने जाणारी माणसे आणि त्यांच्या भावनेची त्यांनाच किंमत मोजायला लावणारी लबाड असतातच.प्रत्येक धर्मीय त्याच्या यात्रेला जाऊन आल्यावर कसे छान वाटले पण प्रत्येक ठिकाणी कसे पैशाला लुबाडले गेले हे सांगतोच.लुबाडणाऱ्याएव्हढीच लुबाडले जाणाऱ्याची ह्यात चूक आहे.
पण प्रत्यक्ष देव हि हे थांबवू शकत नाही.एखाद्याने मी महान नाही म्हटले कि त्याला अजून वरच्या पातळीवर ठेवले जाते.चित्रपटात/नाटकात बरीच टिप्पणी आहे जी झोंबली तरी खरी आहे हे मान्य करावेच लागते.
19 Nov 2012 - 3:04 am | इष्टुर फाकडा
मोठे व्हा आणि जे चूक आहे त्याला चूक म्हणायला शिका. कोणी आरसा दाखवला तर प्रतीबिम्बाकडे दुर्लक्ष करून आरसाच कसा वाकडा आणि आणि तो दाखवणार्याची नियतच कशी वाईट हे सांगत बसण्याने चुकीच्या गोष्टी बरोबर होत नाहीत.
19 Nov 2012 - 11:07 am | बाळ सप्रे
+१
20 Nov 2012 - 11:12 pm | आशु जोग
मूळात चित्रपटामधे देवावर टीका करण्याचे कारणच काय...
लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत.
हे थांबायला हवं.
20 Nov 2012 - 11:42 pm | अत्रुप्त आत्मा
@लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत.>>> त्या दुखावल्या गेल्याच पाहिजेत. ते त्यांच्या हिताचं आहे. पुवळलेली जखम माणूस बोंबल्ला,तरी कापसानी दाबुन स्वच्छ करावीच लागते... तिथे नस्ता भाबडट चालत नाही/चालू नयेही...या वरून अठवलेलं,हिंदू सुधारक सावरकरांचं एक वाक्य सांगतो-
21 Nov 2012 - 2:25 am | आबा
चित्रपटामध्ये नेमकी कोठे केलिय हो देवावर टिका ?!
(व्यक्तिशः मला तर डायरेक्टरच द्विधा मनस्थितीत असावा असा वाटल... किंवा कोणाच्या भावणा दुखू नयेत याची काळजी सुद्धा घेत असावा, खरं काय ते त्यालाच माहीत )
19 Nov 2012 - 3:11 am | आबा
जर दुसर्या धर्मांमधिल कर्मकांडांबद्दल काहीही भाष्य केले नसते, तर
"फक्त हिंदू धर्मावर टिका करण्याची आजकाल फॅशन आहे"
असे विधान केले असते का?
बाकी या चित्रपटामध्ये संस्कृती चा संबंध कर्मकांडांशी नाही असे सांगायचा प्रयत्न केला आहे असं माझं आपलं मत आहे. असो...
["मुझे इतराज है तो ईनके पैसा कमाने के जरिये से" आणि "आपकी श्रद्धा का यहाँ धंदा होता है" अशा शब्दात टिका करणारा कानजी स्वत: सुद्धा लोकांना खोट्यानाट्या गोष्टी सांगून मूर्ती विकत असतो... हे मात्र बरंच खटकलं]
19 Nov 2012 - 7:02 am | अर्धवटराव
चित्रपटाचा विषय चाउन चोथा झालेला असला तरि आजही त्याची परिणामकारकता अजस्त्र आहे, त्यातुन होणारं समाजाचं शोषण भयंकर आहे. तसं बघितलं तर हि समस्या फार पुरातन आहे आणि भविष्यात देखील वेगवेगळ्या रुपाने ति समाजापुढे ठाकेलच, आणि म्हणुन त्याविरुद्धचा संघर्ष देखील होत राहिल. संदेश, मनोरंजन, जनसामान्याभिमुखता आणि गल्ला भरणे या सर्व पातळ्यांवर एकच चित्रपट यशस्वी करुन दाखवणे सोपं नाहि. ऑह माय गॉड अगदीच फसला नाहि असं म्हणता येईल.
अर्धवटराव
19 Nov 2012 - 8:55 am | श्री गावसेना प्रमुख
आजकाल चित्रपटांचे आशय आणी विषय दोघही हरवलेय,अस्सल काय राहीलेय आता.
आजकालचे चित्रपट हे बघणार्याने डोके घरी ठेवुनच जावे ह्या श्रेणीचे असतात आणी लोकही तेच करतात,
22 Nov 2012 - 2:26 pm | यसवायजी
त्या दिवशी मजाच झाली.. रूम वर OMG पाहीला.. 'The End' होताच, एका मित्रानं हातातले सगळे दोरे (ज्याला तो गंडा म्हणायचा) काढुन टाकले. (विशाळगडावर कुण्या एकानं दोरा बांधून २० रुपये घेतले होते त्याच्याकडुन :-) )
विषय गांभिर्याने दाखवला असता तर कदाचित कुण्या दलाच्या किंवा सेनेच्या so called भावना दुखावल्या असत्या. त्यापेक्शा जे सत्य मजेशिर Angle ने दखवलय, त्याने थोडातरी फायदा झालाय.
सच हमेशा कडवा लगता है.. ज्या गोष्टी दाखवल्यात त्या खोटया नाहिच आहेत. मला तरी वाटतय, येउद्यात असले अजुन २-४..