चावडीवरच्या गप्पा - प्रमोशन आणि आरक्षण

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
6 Sep 2012 - 8:47 pm

“चिंतोपंत खरे नशिबवान आहात तुम्ही”, नारुतात्या चावडीवर हजेरी लावत.

“काय झाले?”, चिंतोपंत बुचकाळ्यात पडत.

“अहो काय झाले काय? रिटायर झालात तुम्ही! आमची अजुन आठ वर्षे जायची आहेत. आता काही नशिबात सिनीयर डिव्हीजनल ऑफीसरची पोस्ट नाही. प्रमोशन घेऊन रिटायर होणे हे आता स्वप्नच रहाणार असे दिसतेय”, नारुतात्या हताश स्वरात.

“कशाला जीव जाळताय एवढा, व्ही.आर.एस. घेऊन टाका”, शामराव बारामतीकर

“त्याने काय होणार आहे शामराव, नोकरीरुपी म्हातारी मरेल पण काळ सोकावतोय त्याचे काय?”, नारुतात्या.

“अरे पण झाले काय ते सांगाल का?”, घारुअण्णा काहीच न कळल्यामुळे बुचकळ्यात पडून.

“घ्या! म्हणजे तुम्हाला अजुन समजलेलं दिसत नाहीये. अहो, आता म्हणे सरकारी नोकरीतल्या बढतीमध्ये आरक्षण आणतय सरकार”, शामराव बारामतीकर.

“शिरा पडली त्या सरकारच्या.... अरे हे काय चालवलेय काय? हे म्हणजे आता ह्या सरकारी ब्राह्मणांना सरकारी यज्ञोपवित घालण्यासारखेच आहे. हे विश्वेश्वरा बघतो आहेस का रे? काय चाललेय हे”, घारुअण्णा रागाने तांबडे होत.

“घारुअण्णा, जरा जपून, चिडला आहात, ठीक आहे, पण हे असे तोल जाऊन बरळणे चांगले नाही”, इति भुजबळकाका.

“अहो बहुजनहृदयसम्राट, ज्याचे जळते ना त्यालाच कळते”, घारूअण्णा आवेगात.

“देवळात लांबच्या लांब रांग लावून कधी उभे राहिले आहात का, दहा-दहा तास्स? त्यावेळी एखादा सरकारी व्हिआयपी येऊन मध्येच आरामात दर्शन घेऊन जातो किंवा एखादा पुजार्‍याला अभिषेकासाठी पैसे देऊन विनासायास दर्शन मिळवतो त्यावेळी तुमची चिडचीड कधी झाली नाहीयेय का? त्यावेळी तुमची जी चरफड होते, तस्सेच आहे हे अगदी”, चिंतोपंत.

“फरक आहे!” भुजबळकाका प्रत्येक शब्दावर जोर देऊन.

“चिंतोपंत, तुम्ही महत्वाचा मुद्दा विसरताय ह्या दोन्ही केसमध्ये! खरा फायदा हा त्या पुजार्‍याचा झालेला असतो. आणि विषेश म्हणजे त्या फायद्यासाठी त्यांनीच ते आरक्षण घडवून आणलेले असते. त्यामुळे त्यावेळी जी चरफड होते ना ती ह्या जाणीवेमुळे होते. आता मला सांगा, ह्या मुद्याने तुमची चिडचीड कधी झालीयेय का? माझी खात्री आहे झालेली नसणारच”, अंगठा आणि तर्जनी उडवून पैशाची खूण करत, पुजारी आणि आरक्षण शब्दांवर जोर देत भुजबळकाका.

“भुजबळकाका तुमचा मुद्दा मान्य, पण ह्या असल्या प्रकाराने गुणवत्तेचे काय? ती डावलली नाही का जाणार?”, नारुतात्या.

“म्हणजे बहुजनांमध्ये गुणवत्ता नसते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?”, भुजबळकाकाही जरा आवेगात.

“एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचेय, आहे ना गुणवत्ता! मग कशाला हव्यात ह्या असल्या कुबड्या?”, नारुतात्या.

“अरे, अजुनही ही उच नीचता एवढी आहे की नोकरीमध्ये योग्यता असूनही बढतीच्या संधी मिळत नाहीत जातीच्या राजकारणामुळे. चक्क एका आय.ए.एस. अधिकार्‍याला मिळणार्‍या उच्चवर्णिय कनिष्ठ श्रेणी कामगाराकडून मिळणार्‍या वागणुकीचा किस्सा सत्यमेव जयतेमुळे कळला नं तुम्हाला. हे आहे हे असे आहे! दोन्हीकडच्या बाजूंचा विचार व्हायला हवा.”, भुजबळकाका.

“म्हणजें नेमका कसां?”, घारुअण्णा.

“घारुअण्णा, मगाशी मी जे म्हणालो त्याचे उत्तर द्या ना आधि म्हणजे मग नेमका कसां ते सांगतो. देवळातले आरक्षण चालते का तुम्हाला?”, भुजबळकाका ठामपणे.

“हे म्हंजे कै च्या कै झाले हा तुमचे बहुनजसम्राट!”, घारुअण्णा घुश्शात.

“बरं! आम्ही देवळाच्या प्रश्नात घुसलो की लगेच तुम्हाला आलेला राग तो खरा, पण तुम्ही काहीही वक्तव्य केले आणि आम्हाला राग आला तर ते कै च्या कै. हा खासा न्याय आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“अहो पण मुद्दा गुणवत्तेचा आहे भुजबळकाका”, शामराव बारामतीकर.

“मीही तेच म्हणतोय, मुद्दा गुणवत्तेचाही आहेच! पण गुणवत्ता ही एका वर्गाची मक्तेदारी कशी काय?”, भुजबळकाका.

“अहो सोकाजीनाना, नुसतेच हसताहात काय? बोला ना काहीतरी?”, चिंतोपंत, मिष्कील हसत असलेल्या सोकाजीनानांना.

“आज आपण काय ठरवायला भेटणार होतो”, सोकाजीनाना, त्यांच्या चेहेर्‍यावरचे हास्य तसेच ठेवून.

“आपल्या वर्षाविहाराचा प्रोग्राम ठरवायला, त्याचे इथे काय?”, बुचकाळ्यात पडत चिंतोपंत.

“अहो, तीच तर गंमत आहे ना. आपापल्या घरी जायची वेळ झाली आणि आपण आपला प्रोग्राम ठरविण्याच्या मुद्याला स्पर्शही केलेला नाही”, सोकाजीनाना.

“पण त्याचे काय?”, नारुतात्या, आता बुचकळ्यात पडायची पाळी त्यांची होती.

“सरकारही नेमके हेच करते आहे. मुख्य आणि महत्वाच्या प्रश्नांपासून जनतेला दूर करायचे असले की असले काहीतरी पिल्लू द्यायचे सोडून. मग बसते जनता असली अफूची गोळी चघळत आणि त्याच तारेत. ह्यात मुख्य आणि महत्वाच्या प्रश्नांमुळे अडचणीत येण्याच्या शक्यतेवर धुरळा बसतो. झाले! सरकारला नेमके हेच हवे असते. गेली साठ - पासष्ठ वर्षे हेच चालले आहे आणि अजुनही आपण त्यातुन शहाणे व्ह्यायला तयार नाही. कोळसा प्रकरण अंगाशी येतेय असे दिसताच हे आरक्षणाचे पिल्लू दिले सोडून. बसा आता चघळत हा विषय. तर भुजबळकाका, आहे हे अस्से आहे अगदी”, मिष्कील हसत सोकाजीनाना.

“काय पटतय का? पटलं असेल तर चहा मागवा आणि वर्षाविहाराचा प्रोग्राम ठरवायला घ्या आणि त्या प्रवासातल्या बसमधे भुजबळकाकांची सीट आधि आरक्षित करा”, मोठ्ठ्याने हसत सोकाजीनाना.

नारुतात्यांनी हसणे आवरत चहाची ऑर्डर दिली.

हे ठिकाणसाहित्यिकजीवनमानराजकारणमाध्यमवेध

प्रतिक्रिया

शुचि's picture

6 Sep 2012 - 8:56 pm | शुचि

अनारशासारखे खुसखुशीत नेहमीप्रमाणेच.

सोकाजीनानांना उमजलेलं मिपाकरांना कधी उमजेल तो सुदिन. :)

मन१'s picture

6 Sep 2012 - 9:49 pm | मन१

बातमीगणिक धाग्यांचा कंटाळा येउ लागलेला.

ब्रिटीश नंदी
तंबी दुराई

आणि आता सोत्रि

बहुगुणी's picture

6 Sep 2012 - 9:31 pm | बहुगुणी

मस्त मांडणी! 'ज्वालाग्राही विषय आहे' असं वाटेपर्यंत 'आईस्क्रीम' तोंडात पडलं :-)

बाकी ही कोंबड्या झुंजवत ठेवणारी मंडळी पासष्ट वर्षं आपल्यासारख्या कोंबड्यांतूनच तयार होत रहाताहेत याचं वैषम्य वाटलं....

आशु जोग's picture

6 Sep 2012 - 9:52 pm | आशु जोग

खेडवळ कोंबडी पाहून बरे वाटले

पांढर्‍या गणवेषातल्या कोंबडीला पकलो होतो

दोनदा आल्याने प्रतिसाद काढून टाकला आहे

पैसा's picture

6 Sep 2012 - 9:44 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच खुसखुशीत आणि ज्वलनशील विषयावर थंड हवेच्या झुळकेसारखा लेख!

मन१'s picture

6 Sep 2012 - 9:52 pm | मन१

खुसखुशीत, मार्मिक आणि संयत.
आवडले.

सोत्रिंचा पंखा

चिंतामणी's picture

6 Sep 2012 - 10:32 pm | चिंतामणी

मस्त.

- चिंतोपंत.

प्रचेतस's picture

7 Sep 2012 - 8:00 am | प्रचेतस

मस्त हो सोत्रीअण्णा.

किसन शिंदे's picture

7 Sep 2012 - 9:02 am | किसन शिंदे

वाट पाहत होतो हो सोकाजीनाना तुमच्या चावडीवरच्या गप्पांची.

धन्यवाद टाकल्याबद्दल..

मी_आहे_ना's picture

7 Sep 2012 - 10:50 am | मी_आहे_ना

सोत्रिंचे फ्रायडेचे धागे म्हणजे एकदम मूड बनवणारे असतात...धमाल!

(माहितिये हा धागा गुरुवारी रात्री आलाय, पण वाचला फ्रायडेला)
:)

गोंधळी's picture

7 Sep 2012 - 11:13 am | गोंधळी

“सरकारही नेमके हेच करते आहे. मुख्य आणि महत्वाच्या प्रश्नांपासून जनतेला दूर करायचे असले की असले काहीतरी पिल्लू द्यायचे सोडून. मग बसते जनता असली अफूची गोळी चघळत आणि त्याच तारेत. ह्यात मुख्य आणि महत्वाच्या प्रश्नांमुळे अडचणीत येण्याच्या शक्यतेवर धुरळा बसतो. झाले! सरकारला नेमके हेच हवे असते. गेली साठ - पासष्ठ वर्षे हेच चालले आहे आणि अजुनही आपण त्यातुन शहाणे व्ह्यायला तयार नाही. कोळसा प्रकरण अंगाशी येतेय असे दिसताच हे आरक्षणाचे पिल्लू दिले सोडून. बसा आता चघळत हा विषय.

चिगो's picture

7 Sep 2012 - 11:47 am | चिगो

आयला, सोत्रिअण्णांच्या चावडीवरच्या गप्पा लोकसभेतल्या चर्चेपेक्षा जास्त उपयोगी असत्यात, असे दिसते.. ;-) आने दो, सोकाजीनाना..

मस्त रे सोत्रि दुराई... येईच सदर ऐसेईच लिखते रहो... :)

सोक्या... भारीच लिहितोस रे

ऋषिकेश's picture

7 Sep 2012 - 12:05 pm | ऋषिकेश

छ्या! मला वाटलं या महत्त्वपूर्ण विषयावर सोकाजीनाना काहितरी बाजु घेतील..
पण त्यांनी तर (सरकारसारखेच) चालु गरमागरम विषयाला टांग देऊन मंडळींना दुसर्‍या विषयात गुंतवलं ;)

सोत्रि साहेब, ये हुई ना बात मस्त लेख झाला आहे.

तिमा's picture

7 Sep 2012 - 5:55 pm | तिमा

त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागल! आता, आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेली घटना की काळ्या दगडावरची रेघ आहे. ती कशी बदलणार ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Sep 2012 - 12:11 am | निनाद मुक्काम प...

लेख सुरेख झाला आहे.
बसपा व समाजवादी ह्यांच्या खासदारांमध्ये संसदेत राडे झाले. सरकारच्या निर्णयाचे पडसाद फक्त युपी मध्ये पडले की उर्वरीत भारतात सुद्धा
ह्याबाबत जाणण्यात उत्सुक

बॅटमॅन's picture

8 Sep 2012 - 1:21 am | बॅटमॅन

समाजाची नाडी आपलं नस खरी सापडली हो तुम्हाला सोत्रि. जियो!

(एका नाडीवरून झालेल्या महाभारताचा साक्षीदार)बॅटमॅन.