पत्रिका

सूड's picture
सूड in जनातलं, मनातलं
6 Aug 2012 - 12:06 am

दर रविवारप्रमाणे हाही रविवार आला किंवा 'उजाडला' म्हणा. कारण रविवारी उन्हं वर आल्याशिवाय योगेशराव कधी उठल्याचं आठवत नाही असं त्यांच्या सौ. योगिनीबै वेळ मिळेल तेव्हा आणि येईल त्याला, तिला ऐकवत असत. तर, आजच्या रविवारी काहीतरी मस्त मेनू ठरवावा हा विचार करत योगेशराव हॉलमधल्या सोफ्यावर लोळत पडले होते. खरंतर मेनू काय ठरवावा यापेक्षा तो आपल्या अर्धांगिनीला कसा सांगावा याचा विचार अधिक चालला असावा. कारण रविवारचा असा काही प्लान ऐकला की योगिनीबैंचा ठरलेला ट्रॅक होता, तो वाजायला सुरु व्हायचा. म्हणजे,'मी माझा सैंपाक करुन घेते, मग आणा काय हाडं चघळायला आणायची असतील ती !! रविवार म्हणजे मेलं नुसतं वाढीव काम. त्यात दोन्ही कार्टी बापावर गेलीयेत. हाडं चघळायची म्हटलं की भारी चेव येतो' इत्यादि इत्यादि. आताशा ही वाक्य त्यांच्या शेजार्‍यांनापण पाठ झाली होती. योगेशराव आपला प्लान कसा सांगायचा या विचारात होते आणि फोन वाजायला सुरुवात झाली. योगेशराव ढिम्म पडून राह्यले. आतून त्यांचे चिरंजीव आले. "बाबा फोन वाजतोय"
"हो मी ऐकतोय", योगेशराव.
''बाबा फोन उचला, नाहीतर आई वैतागेल", असं बोलून चिरंजीव हॉलमधल्या दुसर्या सोफ्यावर आडवे झाले.
"अरे येवढी आईची भीती वाटत असेल तर तू उचल, सालं मेलं कोंबडं आगीला..." येवढं वाक्य पूर्ण करणार तोच योगिनीबै सैंपाकघरातून तणतणत आल्याचं पाह्यलं आणि पुढले शब्द योगेशरावांनी जीभेवरुन पडजीभेवर ढकलले.
"बाप-लेक दोघे आहेत इथे पण एकजात कुणी फोन उचलेल तर शपथ!!" असं म्हणत योगिनीबैंनी फोन उचलला आणि त्यांचा तारसप्तकात लागलेला आवाज मध्यसप्तकातल्या सा वर आणून 'हॅलो' म्हणाल्या.
"हॅलो, मी पोतदार बोलतोय, सम्याचा बाबा. ओळखलं का ?" पलिकडून आवाज आला.
"इश्श्य, असं कसं ओळखणार नाही सुमा काय म्हणत्येय. बरीये ना ?" योगिनीबै.
"हो, हो. ती बरीये. पण मी आज जरा तुमच्याकडे येईन म्हणत होतो......सम्याची पत्रिका घेऊन"
"या की, त्यात असं सांगायला का हवंय !! कधीपर्यंत येताय ?"
"दीड-दोन तासांनी येतो."
ठीकै म्हणून योगिनीबैंनी फोन ठेवला आणि आत निघाल्या त्या 'महेलों का राजा मिला के रानी बेटी राज करेंगी' असं गाणं गुणगुणत. योगिनीबैंची मोठी लेक शर्वरी लग्नाची होती आणि तिच्यासाठी हे स्थळ असेल तर नाव ठेवायला जागाच नव्हती. सम्या म्हणजे पोतदारांचा समीर, तो दहावी बारावीच्या मुलांचे क्लासेस घेत असे. दोन तीन ठिकाणी शाखा होत्या क्लासच्या. क्लासेस व्यवस्थित चालतही होते. झालंच तर पोतदारांची दागिन्यांची पेढी होती. सगळं कसं छान !! योगिनीबैंची मुलगीही दिसायला देखणी, शिकलेली. ती आणि तिची एक मैत्रीण असं दोघी मिळून एक ब्युटी पार्लर चालवत होत्या. शरीलाही सम्याने नकार देण्याचा प्रश्न नव्हता. आता पत्रिका घेऊन येत होते म्हणजे मुलगी आवडल्याशिवाय का !! असा विचार चालू असताना योगिनीबैंच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडावा तसं झालं. कारण ते पत्रिका घेऊन येतायेत म्हणजे यांच्या लेकीचीही पत्रिका मागणार की. 'शरीची पत्रिका कुठाय' असं स्वतःशी पुटपुटल्या आणि नंतर हेच वाक्य मोठ्यांदा म्हणाल्या. हे वाक्य ऐकून योगेशराव अंथरुणातून ताडकन उठून बसले. कारण आठवडाभरापूर्वी एक मुलगा सांगून आला होता, त्याची आणि शरीची पत्रिका जुळतेय का बघायला तेच दोन्ही पत्रिका घेऊन बर्व्यांकडे गेले होते. आल्यानंतर पत्रिका कुठे ठेवली हे त्यांना अजिबात आठवत नव्हतं आणि आपली बायको आता घर डोक्यावर घेणार हे त्यांनी ओळखलं नसतं तर नवल !!
त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. योगिनीबैंनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. मातापित्यांचा तो सुसंवाद चालू असताना चिंरंजीव गुपचूप उठून स्वतःच्या खोलीत गेले. पुढल्या गोष्टींचा त्यालाही अंदाज आला. आपल्या रविवाराचं मातेरं होऊ नये म्हणून त्याने पळ काढला. इकडे पत्रिका कुठे ठेवली याची शोधाशोध सुरु झाली. कपाट धुंडाळून झालं. फडताळं, धान्याचे डबे, सिलिंडर एंट्री बुकाची पिशवी, सुटकेस, ट्रंका सगळं शोधलं पत्रिका काही केल्या मिळेना. शेवटी योगेशरावांना बाहेर पिटाळलं. जन्मवेळ, जन्मस्थळ सगळं लक्षात होतंच. आता कंप्युटराईज्ड पत्रिका करवून आणा म्हणाल्या. काही झालं तरी हे स्थळ हातचं घालवायचं नव्हतं. पण जिच्यासाठी ही पळापळ चाललीये ती कुठे होती. ती सकाळीच उठून पार्लरला निघून गेली होती. रविवार म्हटल्यावर गर्दी असणार त्यामुळे रोजच्यापेक्षा लवकर निघाली होती घरातून.
एका क्लायंटच्या भिवया कोरत होती तोवर तिचा फोन वाजला. दातात दोर्‍याचं एक टोक आणि दोन हातात दोर्‍याची दोन टोकं असं करुन नीट काम चाललं होतं. आता मध्येच डिस्टर्बन्स नको म्हणून तिने दातात दोरा तसाच धरुन मैत्रिणीला म्हणाली, "उर्मे, बघ गं कोणाचा जीव चाल्लाय".
उर्मीने कॉल अटेंड केला " हं बोला काकू, अहो शरी आयब्रोज करतेय."
"तिला म्हणावं हातातलं काम टाकून घरी निघून ये." योगिनीबै म्हणाल्या.
"का, हो ? काही सिरीयस ? ...एक मिनीट." असं फोनवर बोलून उर्मी शरीकडे वळली. "शरे, अगं काकूंचा कॉल आहे. हातातलं काम टाकून ये म्हणतायेत."
"तिला म्हणावं, काय झालं? घराला आग लागल्यासारखं का करतेय." हे दातातला दोरा तसाच ठेवून म्हणाली असली तरी फोनवर ऐकायला जाईल एवढं स्पष्ट होतं. हे वाक्य ऐकून योगिनीबैंनी फोन खाडकन आपटला. शरी उर्मीकडे काम सोपवून निघाली. घरी आल्यावर सगळं समजलं.
या सगळ्या गोंधळात दोन तास सहज निघून गेले, दारात बाईकचा आवाज आला. योगेशराव पत्रिका बनवून घेऊन आले की काय बघायला योगिनीबै दारात गेल्या. बघतात तर काय, पोतदार आले होते. आता काय करावं हा मोठा प्रश्न त्यांना पडला. चहापाणी, पोहे असं एकेक हळूहळू आवरत तासभर कशीतरी वेळ मारुन नेली. पण योगेशरावांचा काही पत्ता नव्हता. तरी नशीब म्हणजे अजून सम्याच्या बाबांनी पत्रिकेचा विषय काढला नव्हता. आता ते कधीही तो विषय काढतील अशी लक्षणं दिसत होती, तेवढ्यात योगेशराव आले आणि योगिनीबैंचा जीव भांड्यात पडला. योगेशरावांना बघून सम्याच्या बाबांनी अगदी उभं राहून नमस्कार वैगरे केला. ते असं का वागतायेत हे कळण्याच्या आतच म्हणाले," बरं झालं तुमची भेट झाली योगेशराव. एकट्यानं आमंत्रणं देत फिरायचं म्हणजे त्रास होतो." योगेशरावांच्या चेहेर्‍यावर प्रश्नचिन्ह बघून ते म्हणाले." सम्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलोय. लग्नाला यायचं बरं का !!"
आता योगिनीबैंचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता.

म्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीचौकशीप्रश्नोत्तरेमदत

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

6 Aug 2012 - 12:42 am | संजय क्षीरसागर

पण शेवट म्हणजे निव्वळ सूड!

प्रभाकर पेठकर's picture

6 Aug 2012 - 1:21 am | प्रभाकर पेठकर

मस्तं. आवडली कथा. जन्मपत्रिका आणि लग्नपत्रिका. समजुतीचा घोटाळा. पण कथा मस्तं, विनोदी आणि प्रवाही झाली आहे.
अभिनंदन.

जेनी...'s picture

6 Aug 2012 - 1:30 am | जेनी...

:)

आवडेश .

जयनीत's picture

6 Aug 2012 - 2:53 am | जयनीत

एकदम मस्त पत्रिका जुळवलीय.

सुनील's picture

6 Aug 2012 - 5:30 am | सुनील

छान जमलय.

वीणा३'s picture

6 Aug 2012 - 6:24 am | वीणा३

एकदम मजेशीर :)

हं! बसवला टेंपोत म्हणतात ते याच प्रकाराला का?

भारी!

अत्रुप्त आत्मा's picture

6 Aug 2012 - 6:34 am | अत्रुप्त आत्मा

:-)

ओ बुवा, रेवतीआजै टेंपोत बसवला म्हणजे हेच का असं विचारत आहेत, मयत(रि) पेटित बसवल्याची स्माईली काय टाकताय तुम्ही.

असो, बाकी श्री. सुड, सौजन्य संवत्सर असले तरी एवढं सौजन्य अपेक्षित नव्हतं. असो. यो आणि यो, दोघंही आयटित आहेत का रे कामाला ?

बुवा म्हणजे आत्मा, ते पेटीत बसणार नाहीत तर काय ट्यांपोत बसणार काय?

बाकी कथा आवडली. एकदम खुसखुशित.

ओ ५० ,नीट वाचाकी राव ...
रेवा आज्जी नै ,अपर्णा ने टेंपोची पोश्ट टाकलीय .

अमित's picture

6 Aug 2012 - 7:08 am | अमित

आवडलं

स्पा's picture

6 Aug 2012 - 8:03 am | स्पा

चान चान

शिल्पा ब's picture

6 Aug 2012 - 8:11 am | शिल्पा ब

शेवट भारी ए एकदम!! खदखदुन हसले.

किसन शिंदे's picture

6 Aug 2012 - 8:15 am | किसन शिंदे

तुझी पत्रिका व्यवस्थित जपून ठेव नाहीतर ऎनवेळी गोंधळ उडायचा. ;)

चित्रगुप्त's picture

6 Aug 2012 - 9:36 am | चित्रगुप्त

एकदम मस्त रंगवली आहे कथा. अनपेक्षित शेवट, हे खासच.
पोतदार निघून गेल्यावर घरात झडलेले संवाद-सत्र पण थोडे टाकायला हवे, असे वाटले.
(मिपावरील नाडी-ज्योतिष इ. वरील धाग्यांमुळे 'पत्रिका' याचा एकच अर्थ डोक्यात बसलेला आहे, याचा छान वापर तुम्ही केलात).

अमोल केळकर's picture

6 Aug 2012 - 9:38 am | अमोल केळकर

मस्तच :)

अमोल केळकर

sneharani's picture

6 Aug 2012 - 10:26 am | sneharani

छान जमलीये!
:)

सोत्रि's picture

6 Aug 2012 - 10:38 am | सोत्रि

आवडेश!
पत्रिका एकदम जमून आली आहे. :-)

-(पत्रिका बाळगून असलेला) सोकाजी

रणजित चितळे's picture

6 Aug 2012 - 10:39 am | रणजित चितळे

पत्रिका पटली. आवडली कथा

चावटमेला's picture

6 Aug 2012 - 11:02 am | चावटमेला

मस्तच.

अमृत's picture

6 Aug 2012 - 11:04 am | अमृत

असं होय... :-) मजा आली वाचुन...

अमृत

सुहास..'s picture

6 Aug 2012 - 11:09 am | सुहास..

बशविला पत्रिकेत !!

सूड, मग मनावर घेतलेले दिसतय ;)

मी_आहे_ना's picture

6 Aug 2012 - 11:14 am | मी_आहे_ना

हाहाहाहा, मस्त शेवट.

प्यारे१'s picture

6 Aug 2012 - 11:20 am | प्यारे१

हा हा हा हा...!

खुसखुशीत रे!

जाई.'s picture

6 Aug 2012 - 11:40 am | जाई.

खुसखुशीत

बॅटमॅन's picture

6 Aug 2012 - 12:07 pm | बॅटमॅन

मस्त "सूड"!!!!!! एक लंबर :)

सुन्दर.. शेवट वाचुन खुप हसले

अभिज्ञ's picture

6 Aug 2012 - 2:20 pm | अभिज्ञ

मस्तच

अभिज्ञ.

स्मिता.'s picture

6 Aug 2012 - 2:25 pm | स्मिता.

मस्तच!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Aug 2012 - 2:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मस्त रे सूड .
पण कथा मागे कुठेतरी ऐकलेली वाटली ;-)

मन१'s picture

6 Aug 2012 - 2:51 pm | मन१

शेवटचा पंच भारीच...

मोठ्या आशेनं धागा उघडला तर हे मनोरंजक लेखन हाती पडलं. ;)

स्पा's picture

6 Aug 2012 - 6:54 pm | स्पा

=))

प्रभाकर पेठकर's picture

7 Aug 2012 - 7:14 pm | प्रभाकर पेठकर

मोठ्या आशेनं धागा उघडला तर हे मनोरंजक लेखन हाती पडलं.

तुमच्या पत्रिकेत आज मनोरंजनाचा योग होता म्हणायचा.

नाना चेंगट's picture

6 Aug 2012 - 6:39 pm | नाना चेंगट

हा हा हा

मस्त !!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Aug 2012 - 7:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्तच...

पैसा's picture

7 Aug 2012 - 7:19 pm | पैसा

मस्तच! एकदम खुसखुशीत कथा! सुडक्या सध्या सगळीकडे पत्रिकाच दिसतायत का रे? ;)

कथा मस्त...

पत्रिका पत्रिका पत्रिका ... विचार काही सोडत नसेल ना आता...

नगरीनिरंजन's picture

8 Aug 2012 - 11:19 am | नगरीनिरंजन

गमतीदार आणि निखळ विनोदी कथा. आवडली!

कवितानागेश's picture

8 Aug 2012 - 11:43 am | कवितानागेश

ही ही ही!! :D

नंदन's picture

8 Aug 2012 - 12:06 pm | नंदन

कथा आवडली :)

sagarpdy's picture

8 Aug 2012 - 1:17 pm | sagarpdy

मस्तच! :D

मेघवेडा's picture

8 Aug 2012 - 1:29 pm | मेघवेडा

हा हा हा.. मस्त. आवडली. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Aug 2012 - 2:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त मस्त मस्त