आज माजी पोलिस उपायुक्त श्री. अरविंद पटवर्धन यांच्या मृत्युची बातमी वाचली आणि ३०-३५ वर्षांपूर्वीच्या श्रीकांत सिनकर लिखित मुंबई सी आय डीच्या तपास-चातुर्यकथा डोळ्यापुढे साकारल्या.
सिनकरांच्या आवड्त्या अधिकार्यांपैकी एक अधिकारी श्री. अरविंद पटवर्धन. सी आय डी मध्ये अधिकारी असूनही एका खोलीत साधेपणाने राहणारा, निस्पृह व गणवेशाच्या आत माणूस जपणारा आणि गुन्हेगारातही माणूस शोधणारा व त्याला पुन्हा माणसात आणायचा प्रयत्न करणारा हा असामन्य मनुष्य. पोलिस कारकिर्दीत पटवर्धन साहेब गाजले ते आर्थिक गुन्ह्यांचा महाकठिण़ तपासांसाठी. त्यातही बँकेतल्या अफरातफरी आणि धनादेशाचे गुन्हे हे त्यांचे वैशिष्ठ्य.
चाळीस वर्षांपूर्वी रोख रकमे ऐवजी धनादेशाचा वापर रुजु लागला होता. आज धनादेशाकडुन हळुहळु आपण ई- व्यवहाराकडे वळु लागलो आहोत तसाच. अर्थातच धनादेश व्यवहाराचा अचूक गैरफायदा उठविणारे महाधूर्त गुन्हेगारही निर्माण झाले. त्यातलाच एक महाबिलंदर धनादेश गुन्हेगार म्हणजे. माणेकलाल. याची कार्यपद्धती अशी होती: प्रथम टपाल वितरकाला हाताशी धरुन त्याला पैशाचे प्रलोभन दाखवुन त्याच्याकडुन टपाल पेटीत पडलेले धनादेश असलेले लिफाफे मिळवायचे. ते कसे ओळखायचे? सोपे आहे. सहसा लोक धनादेशाबरोबर चिठ्ठी वा देयक टाचणीने जोडायचे, त्यामुळे लिफाफा चाचपून टाचणी लागणारे लिफाफे वेगळे काढायचे. हे लिफाफे अल्यावर माणेकलाल त्यातले धनादेश ह्स्तगत करायचा व त्यातले व्यापारी व अस्थापनांचे धनादेश कामासाठी घ्यायचा. कारण असे की व्यापारी वा आस्थापनांच्या खात्यात सहसा बर्यापैकी शिल्लक असणार. हाती आलेला चेक मग रसायने वापरुन बदलला जायचा. नाव आणि रक्कम दोन्ही बदलले जायचे. काल्पनिक नाव आणि जरा बरी रक्कम मूळ नाव व मूळ रकमेऐवजी लिहिली जायची. मग हे साहेब त्या नावाने खाते उघडायचे आणि लगोलग हा धनादेश त्यात भरायचे. तीन चार दिवसात धनादेश वटुन रक्कम खात्यात जमा झाली की पाच दहा रुपये वगळता सर्व रक्कम माणेकलाल काढुन घ्यायचा. मग पुन्हा त्या बँकेचे तोंड पाहायचे नाही. चेक गहाळ झाल्याचे लक्षात येणार, मग तक्रार मग तपास आणि तोपर्यंत खातेदाराला त्याच्या खात्यातुन भली मोठी रक्कम गेल्याचे समजायचे आणि धक्का बसायचा. म्हणजे एखाद्याने बी ई एस टी ला वीज बिलाचा सत्याण्णव रुपयांचा धनादेश दिलेला असायचा आणि बॅकेतुन नंतर समजायचे की कुण्या छगनलाल छेडाच्या नावे बाविसशे रुपयांचा धनादेश अदा करण्यात आला असून ती रक्कम अर्थातच शिलकीतुन कमी झाली आहे. तपास लागणे ही कठीण. जर बँकेच्या कर्मचार्याला धनादेश जमा करताना बदललेल्या धनादेशाचा संशय आला तरच काही घडण्याची शक्यता. आता असे झाले तर माणेकलाल नकली धनादेश भरण्यासाठी पकडला जायची शक्यता होती. मग माणेकलालने नवी क्लुप्ती योजलली. ती अशी की माणेकशेट असा धनादेश नव्या नकली नावाच्या खात्यात जमा केल्यावर त्या खात्याची धनादेश पुस्तिका खिशात ठेवुन खरेदीला निघायचे. मग साहेब घड्याळ, दूरवाणीसंच अशी दोन तिनशी रुपयांची खरेदी करुन दुकानदाराला 'धनादेश' द्यायचे आणि रुबाबात सांगायचे की आधी धनादेश वटवा, पैसे मिळाले की मग माझ्या वस्तू बांधुन ठेवा, दरम्यान मी कामे करुन येतो. अर्थातच इथे सुद्धा जर धनादेश नकली असल्याचे लक्षात येउन पोलिसात तक्रार गेली असेल तर सापळ्यात दुकानदार वा त्याचा माणुस सापडायचा. जर दुकानदाराला पैसे मिळाले तर तो संकेत समजुन उरलेले पैसे माणेक काढायचा. पटवर्धन साहेबांनी यावर उपाय शोधला. समजा अशी खाडाखोड केलेला धनादेश आल्याची तक्रार बँकेने पोलिसात केली, तर पटवर्धन साहेब बँकेला विश्वासात घेउन सापळा लावायचे. तो असा, की दहा रुपये भरुन उघडलेल्या खात्यात खाडाखोडीचा मोठा धनादेश जमा झाल्यावर जेव्हा चाचपणीसाठी असा शे दोनशे रुपयांचा धनादेश घेउन कुणी तरुण वा दुकानदार आला तर जोखिम पत्करुन ते पैसे त्याला द्यायचे. खात्यात पैसे नसतानाही. कारण तो धनादेश वटताच पाठोपाठ माणेकलाल उरलेली रक्कम काढायला येणार. मग तो येताच त्याला उचलायचे. या सापळ्यात माणेक अलगद सापडला. त्यावर त्याने नवी युक्ति शोधली.
'हिशेबनीस पाहिजे' अशी जाहिरात देउन मुलाखतीला उमेदवार बोलावायचे आणि त्यांना बँकेच्या कामाची कितपत माहिती आहे हे पाहण्याच्या निमित्ताने बँकेत आधी भरलेला खोटा धनादेश वटला आहे का ते पाहायला पाठवायचे. समजा खाते उघडताना दहा रुपये जमा केले होते. मग बदललेला बाराशे रुपयांचा धनादेश खात्यात टाकला गेला. जार धनादेश वटला असेल तर शिल्लक बाराशे दहा असेल. मग या उमेदवाराला शंभर रुपये काढायला बँकेत पाठविले जायचे. माणेक दुरुन नजर ठेवायचा. जर उमेदवार पैसे घेउन आला तर धनादेश जमा झाला आहे अशी खात्री व्हायची. मग उमेदवाराला 'पुढच्या आठव्ड्यात या कामावर' असे सांगुन बोळवले जायचे, मात्र तो हजर होताच त्याला समजायचे की कचेरी नकली होती आणि जागा भाड्याची होती. इकडे माणेक खात्री होताच बॅंकेत जायचा आणि शिलकीतुन बहुतांश रक्कम काढुन व्हायचा. पुन्हा तिथे जाणे नाही. आणि समजा बँकेला तो खोटा धनादेश खात्यात जमा करताना संशय आला आणि खात्यात रक्कम जमा न करता त्यांनी पोलिसात तक्रार केली असली तर रक्कम काढायला आलेला उमेदवार पोलिसांच्या सापळ्यात सापडायचा ज्याला खरोखरीच काही माहित नसायचे. आणि ही गडबड दुरुन पाहणारा माणेक सूं बाल्या करायचा.
अर्थात जामिनावर सुटुन तो गुन्हे करतच राहिला.
अशा अनेक अफरातफरी पटवर्धन साहेबांनी शोधुन काढल्या आणि आर्थिक गुन्हेगारीला पायबंद घालायचा प्रयत्न केला. तामिळनाडुच्या रामजीनगर भागातले सुशिक्षित गुन्हेगार ही एक मोठी समस्या होती. त्यांनी नव्या पद्धतीचा गुन्हा करायला सुरुवात केली आणि हादरा दिला. तो असा, की मोठ्या रकमेचा धनादेश वटवताना मोठ्या हुशारीने आजुबाजुला कुणी इतर कर्मचारी नाही, रोखपाल एकटाच आहे हे हेरुन त्याला काहीतरी मार्गाने विचलित करायचे आणि ज्या धनादेशाद्वारे रक्कम काढली तो त्याच्या पिंजर्यातुन उचलायचा. दिवसाअखेर जेव्हा जमा असलेले धनादेश आणि वाटलेली रक्कम यात मोठी तफावत यायची तेव्हा रोखपाल चक्रावुन जायचा. मुळात हे कसे काय झाले हे त्याला समजतच नसे. समजा लक्षात आले तरी 'मी अमूक माणसाला त्याच्या धनादेशानुसार वीस हजार रुपते दिले पण आता धनादेश सापडत नाही' हे त्याने कितीही सांगितले तरी बँक व्यवस्थापनाचा विश्वास बसायचा नाही. मग दोन पर्याय असायचे. एक तर किटाळ अंगावर घ्यायचे आणि पैसे खिशातुन भरायचे किंवा तेवढ्यावर न निभावल्यास पोलिसांच्या ताब्यात व नोकरी गमावणे. अनेक मधय्मवर्गिय बँक कर्मचारी या गुन्ह्याचे बळी ठरले आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मात्र पटवर्धन साहेबांनी चिकाटीने अभ्यास करुन ही टोळी पकडली आणि अनेकजण उशीरा का असेना पण दोषमुक्त झाले.
बॅकेवर दरोड्यांमुळे जितकी रक्कम जात नाही त्याहुन अधिक अफरातफरीतुन जाते असा सिद्धांत पटवर्धन साहेबांनी मांडला. विनामोबदला त्यांनी अनेक बॅकांमध्ये माहिती शिबीरे घेतली. याहुन मोठे म्हणजे साहेबांनी नाइलाजाने व परिस्थिने गुहेगारीच्या मार्गाला लागलेल्या तरुणांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले व अनेकांचे पुनर्वसन यशस्वी केले.
पटवर्धन साहेबांनी अर्थिक गुन्ह्यांच्या तपासाचे आधुनिक तंत्र आत्मसात करण्यासाठी स्वखर्चाने लंडनला जाण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती आणि ती सरकारी धोरणामुळी नाकारली गेली होती. घरचं खाऊन समाजासाठी काही करणारा पोलिस अधिकारी केवळ असामान्यच.
कै. श्री. अरविंद पटवर्धन यांना विनम्र श्रद्धंजली.
प्रतिक्रिया
8 Jul 2012 - 11:27 am | श्रीरंग_जोशी
श्री. अरविंद पटवर्धन यांना श्रद्धांजली.
या लेखाबद्दल सर्वसाक्षी यांचे आभार.
सदर गुन्हेगाराच्या कार्यपधतीवरचा एक भाग एक शुन्य शुन्य मालिकेत पाहिल्याचे स्मरते.
8 Jul 2012 - 1:04 pm | मन१
तपास आणी चिकाटी मानावी लागेल अरविंदरावांची.
8 Jul 2012 - 1:37 pm | शिल्पा ब
अशा लोकांच्या कामाबद्दल समाजाला का सांगितलं जात नाही ! :(
तुमचे धन्यवाद अन पटवर्धन यांना विनम्र श्रद्धांजली.
9 Jul 2012 - 8:16 pm | निशदे
काहीतरी चिंधी लोकांच्या कर्तृत्वाचे गुणगान ऐकावे लागते आणि असे लोक कोणाला फार माहित नसतात हेच दुर्दैव...... :(
8 Jul 2012 - 1:46 pm | अत्रुप्त आत्मा
8 Jul 2012 - 2:43 pm | स्मिता.
अरविंद पटवर्धनांबद्दल आधी काहीच माहिती नव्हती. आपण त्यांच्या मृत्युपश्चात ती येथे देवून त्यांना श्रद्धांजलीच दिली आहे.
8 Jul 2012 - 2:47 pm | मराठमोळा
.
8 Jul 2012 - 2:47 pm | मराठमोळा
अरविंद पटवर्धन यांना श्रद्धांजली.
त्यांच्या कामाची थोडक्यात ओळख करुन दिलीत त्याबद्दल आभार.. लेख वाचताना लिओनार्डोच्या 'कॅच मी ईफ यु कॅन' सिमेमाचीच आठवण येत होती.
9 Jul 2012 - 7:40 pm | मराठे
+१
9 Jul 2012 - 11:51 am | ५० फक्त
खरंच काही माहिती नव्हती यांच्याबद्दल, धन्यवाद माहितीबद्दल.
9 Jul 2012 - 3:26 pm | मी-सौरभ
सहमत
9 Jul 2012 - 4:41 pm | मदनबाण
हेच म्हणतो...
9 Jul 2012 - 5:00 pm | प्रकाश घाटपांडे
पटवर्धन साहेबांचा यथोचित परिचय करुन दिल्याबद्दल अनेक आभार. पटवर्धन साहेबांना श्रद्धांजली.
9 Jul 2012 - 5:50 pm | गोंधळी
:(
9 Jul 2012 - 6:21 pm | वपाडाव
-
9 Jul 2012 - 7:24 pm | चतुरंग
नाव मी प्रथम माझ्या वडिलांच्या तोंडून ऐकले होते. पूर्वी 'दक्षता' मासिकात त्यांच्या कथा वाचल्या असाव्यात असे वाटते आहे.
टाईम्समधली दोन ओळींची औपचारिक बातमी सोडली तर मला एकाही मराठी वृत्तपत्रात त्यांच्या निधनाच्या बातमीचाही दुवा आढळला नाही. आपले दुर्दैव. कुणाला आढळल्यास जरुर इथे डकवावा.
अरविंद पटवर्धन यांना श्रद्धांजली.
-रंगा
9 Jul 2012 - 10:26 pm | खेडूत
सरकारला नडणारे किंवा अडचणीचे ठरलेले प्रामाणिक अधिकारी नेहमीच उपेक्षित रहातात.
कुणाच्या दावणीला न बांधले गेलेली वर्तमानपत्रे आहेत कुठे ?
10 Jul 2012 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार
अरविंद पटवर्धन यांना श्रद्धांजली.
ते बहूदा दक्षताचे संपादक देखील होते.
9 Jul 2012 - 10:14 pm | खेडूत
छान परिचय.
लहानपणी 'दक्षता' मासिकात त्यांचे लेखन वाचल्याचे आठवतंय..
9 Jul 2012 - 10:36 pm | पैसा
पटवर्धन साहेबांना श्रद्धांजली. त्यांचं लिखाण वाचलेलं आहे.
ही त्यांची मोठी कामगिरी म्हणावी लागेल.
10 Jul 2012 - 3:15 am | अर्धवटराव
याच माळेतले आणखी एक नाव म्हणजे अरवींद इनामदार.
अर्धवटराव
10 Jul 2012 - 4:14 am | टुकुल
एका असामान्य व्यक्तिमत्वाला श्रध्दांजली आणी त्यांची ओळख करुन दिल्याबद्दल आभार.
--टुकुल
10 Jul 2012 - 10:41 am | माझीही शॅम्पेन
पटवर्धन यांना विनम्र श्रद्धांजली !!!
लहानपणापासून त्यांच्या वर बराच काही वाचल आहे ! मोठा झाल्या नंतर ते कथेतील पात्र नसून खरोखर्च आहेत हे ऐकून आश्चर्य वाटल होत
10 Jul 2012 - 4:21 pm | कलंत्री
सर्वसाक्षींच्या लेखणीने ही श्रद्धांजली सुद्धा वाचणीय आणि प्रेरक झाली आहे. अनेकदा संस्थामधून माणसांचा / व्यक्तिंचा विकास होत असताना आपण पाहत असतो, मात्र कधी एखादी व्यक्तिसुद्धा एखाद्या संस्थेला / मोठ्या कार्याला कसे जन्म देते याचा हा पुरावाच असावा.
दक्षतामध्ये होम्सच्या अनेक कथा वाचल्याचे आठवते.