स्त्रीप्रधान संस्कृती

सुचेल तसं's picture
सुचेल तसं in जनातलं, मनातलं
16 Jun 2008 - 3:17 pm

स्त्रीप्रधान अथवा मातृसत्ताक पद्धती:

आपल्याकडे बर्‍याच काळापासुन पितृसत्ताक पद्धती आणि त्याच्या अनुषंगाने पुरुषप्रधान संस्कृती चालत आलेली आहे. गेल्या काही वर्षांपासुन मात्र स्त्रिया विविध क्षेत्रांमधे पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. भविष्यकाळात कदाचित त्या पुरुषांच्या दोन पावले पुढे जाऊन प्रगती करतील. असे जर झाले तर मातृसत्ताक पद्धती (आणि त्या अनुषंगाने महिला/स्त्रीप्रधान संस्कृती) यायला वेळ लागणार नाही. त्यावेळची परिस्थिती कशी असेल ह्याचे कल्पनाचित्र रेखाटण्याचा प्रयत्न करत आहे.

मुल वडिलांच्या नावाएवजी आईचे नाव लावेल. वडिलांनी अर्थातच त्यांच्या लग्नापासुन बायकोचे अडनाव लावायला सुरुवात केली असेल. संजय लीला भन्सालीची द्रष्टा पुरुष म्हणून गणना केली जाईल.

लग्न ठरविताना मुलाच्या आई-वडिलांना मुलींच्या घरचे उंबरठे झिजवावे लागतील. मुलाला दाखवून (म्हणजेच "कांदा-पोहे" कार्यक्रम करून) मुलीकडच्यांची पसंती मिळवावी लागेल. मुलगा विविध कलांमधे कसा पारंगत आहे हे त्याचे वडिल ठासुन सांगतील. विविध कला म्हणजे उदाहरणार्थ- अ) रोजच्या रोज ताजी आणि स्वस्त भाजी आणणं ब) झणझणीत आणि चवदार असा स्वयंपाक करता येणं. (दोन-पाच पाहुणे इकडे-तिकडे झाले तरी चव अजिबात न बिघडणं !!!) , इत्यादि.

मुलगा कामाहुन घरी परतल्यावर जर निवांत बसुन टीव्ही पहात बसला तर त्याचे वडिल त्याला दटावतील "घरी आल्यावर निवांत पाय पसरुन बसायचं सुवर्णयुग गेलं आता. लग्न झाल्यावर सासरी असं चालेल का? ऊठ पटकन आणि मला स्वयंपाकात मदत कर."

लग्नाचा खर्च अर्थातच मुलाकडचे करतील. सद्यस्थितीत वरमाईला जसे महत्व आहे तसेच महत्व वधुच्या आईला येईल. वधुला नटुन थटुन मांडवात यायला कितीही वेळ लागला तरी भटजी आणि वराकडच्या मंडळींना शांत बसावं लागेल. वराकडची पुरुष मंडळी वधुचे पाय धुतील.

वरपक्ष रुखवतात मुलाने पाककलेत मिळवलेले प्रशस्तिपत्रक, शाळा-महाविद्यालयात मिळवलेली बक्षिसे मांडुन ठेवेल. शेवटी अर्थातच मुलाला मुलीच्या घरी (म्हणजे सासरी) रहायला जावं लागेल.

मुलाचं अडनाव (आणि मुलीला वाटलं तर नावही) बदलेल. घर आणि कार्यालय अशा दोन्ही आघाड्या कदाचित त्याला सांभाळाव्या लागतील. माहेरी दीर्घ कालावधीसाठी जाण्यासाठी मात्र त्याला प्रबळ कारण मिळणार नाही.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतदेखील स्त्रियांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल. पतीला तुरुंगात जावं लागल्यामुळे पत्नीला मुख्यमंत्रीपद मिळण्याचे दिवस जातील. स्त्रिया स्वत: निवडणुका लढवून विविध पद भुषवतील. स्त्रियांवरचे अत्याचार, हुंडाबळी बंद होईल. मुलींना शिक्षण मिळण्यात अडचण येणार नाही.

चित्रपटांमधे नायिकांना नगण्य भुमिका देणं बंद होईल. पुरुषांच्या वाट्याला हिरॉईनला तिच्या ध्येयात मदत करणारा मित्र, आघाडीच्या उद्योजिकेचा वाहनचालक, घरगडी, ऑफिस-बॉय अशा फुटकळ भुमिका येतील.

अर्थातच, पुरुष फार काळ अशा समाजव्यवस्थेला सहन करु शकणार नाहीत आणि परत पुरुषप्रधान संस्कृती उदयास येईल.

विनोदसमाजमौजमजाविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 Jun 2008 - 5:22 pm | विसोबा खेचर

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतदेखील स्त्रियांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल. पतीला तुरुंगात जावं लागल्यामुळे पत्नीला मुख्यमंत्रीपद मिळण्याचे दिवस जातील. स्त्रिया स्वत: निवडणुका लढवून विविध पद भुषवतील. स्त्रियांवरचे अत्याचार, हुंडाबळी बंद होईल. मुलींना शिक्षण मिळण्यात अडचण येणार नाही.

असं झालं तर फारच छान होईल. एकंदरीतच सर्वांचंच आयुष्य थोडं अधिक सुखावह, थोडं अधिक समृद्ध होईल असा मला विश्वास वाटतो!

घरगुती चित्राबद्दल माहीत नाही परंतु सामाजिक आणि राजकीय चित्र नक्की बदलेल व ते सध्याच्या चित्रापेक्षा खूपच चांगलं असेल अशी मला खात्री वाटते...!

आपला,
(स्त्रीच्या शक्तिवर अन् कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असलेला!) तात्या.

भडकमकर मास्तर's picture

16 Jun 2008 - 11:13 pm | भडकमकर मास्तर

अर्थातच, पुरुष फार काळ अशा समाजव्यवस्थेला सहन करु शकणार नाहीत आणि परत पुरुषप्रधान संस्कृती उदयास येईल.
हे बाकी खरे...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बेसनलाडू's picture

17 Jun 2008 - 4:03 am | बेसनलाडू

लेख अगदी लेखक/लेखिकेच्या नावाला साजेसाच लिहिला आहे.लेखातील कल्पनाचित्र वरकरणी दहावीच्या मराठीच्या पेपरात लिहावयाच्या निबंधासारखे झाले असले तरी बरेच लक्ष हे विवाहजुळणी,वैवाहिक उपचार आणि विवाहोत्तर कौटुंबिक जीवन यावरच केंद्रित असलेले वाटते.स्त्रियांची अपेक्षित प्रगती काय या एकाच क्षेत्रात क्रांतिकारी(?) बदल घडवेल? मनोरंजननिर्मिती या एकमेव हेतूने लिहिलेले असल्यास प्रश्नच नाही;पण एकदा वाचून हसून सोडून देण्यासारखाही विषय नाही. आणि निव्वळ मनोरंजन या एकमेव उद्देशाने लिहायचे म्हटले तरी विवाहेतर जीवनातील अनेक मुद्द्यांवर खुसखुशीत लिहिता आले असते,असे (मला) वाटते.
लेख अधिक व्यापक असता,तर बर्‍यावाईट अनेक मुद्द्यांवर ऊहापोह करता आला असता,असे वाटते.जसे लैंगिक जीवन व त्यावरील स्त्री-पुरुष वृत्तींचा प्रभाव,व्यावसायिक प्रगती व त्यातील संधींमधला बदल इ. सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रांमधले परिणाम यांवर पोळीभाजी नि वरणभाताच्या जोडीला लिंबाच्या लोणच्याची फोड तोंडी लावावी तसा दोन-चार वाक्यांत एक परिच्छेद लिहून गुंडाळणे (निदान मला तरी) पटले नाही. संजय लीला भन्साळीचे द्रष्टा पुरुष होण्याची कल्पना करणार्‍यांना कै. किशोर शांताबाई काळे(कोल्हाट्याचं पोर) यांचा विसर पडावा,हे मराठीचे दुर्दैव समजावे काय?
लेखावर सरसकट टीका करायचा हेतू नाही; पण लेखाच्या अपूर्णतेची चुटपुट/असमाधान लागून राहिल्याने प्रामाणिक मत नोंदवले,राग नसावा.
(असमाधानी)बेसनलाडू

सुचेल तसं's picture

17 Jun 2008 - 8:31 am | सुचेल तसं

तात्या आणि भडकमकर मास्तर,
आपण दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

बेसन लाडू,
आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेचे मी मनापासून स्वागत करतो. खरोखरच मी सुचेल तस लिहितो. मी खरेतर नुकतेच लेखन करायला सुरूवात केली आहे. मनात अनेक विचार येतात आणि ते कागदावर जसेच्या तसे पण विनोदी पद्बतीने लिहायचा माझा प्रयत्न असतो. सविस्तर अथवा दीर्घ लेखन करणे प्रारंभीच्या काळात खरोखरच अवघड वाटते (निदान मला तरी.) म्हणून लघुनिबंध अथवा ललित स्वरूपात लेखन करणे मला श्रेयस्कर वाटले.

कै. किशोर शांताबाई काळेंचा दाखला प्रस्तुत करणं मला खरोखर सुचले नाही. म्हणून नेहेमीच्या माहितीतले उदाहरण दिले. आपल्याला माझा लेख वाचून चुटपुट लागून राहिली ह्याची निश्चितच मला खंत वाटते. मी पुढचे लेखन करताना ते व्यापक असण्यावर जरून लक्ष देईन.

आपला (अजिबात न रागावलेलला),
सुचेल तसं

http://sucheltas.blogspot.com

झंप्या's picture

17 Jun 2008 - 9:14 am | झंप्या

वा! बेसनलाडू काहीही म्हणो..
पितृदिनाचे औचित्य साधून तुम्ही प्रकाशीत केलेला हा लेख आवडला. अभिनंदन