बॉलिवूड मधले हिरो - भाग

सुचेल तसं's picture
सुचेल तसं in जनातलं, मनातलं
13 Jun 2008 - 6:35 pm

चित्रपट हे गेल्या कित्येक वर्षांपासुन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता पाहिला हे काही एवढं आठवत नाही. पण जेवढया वेगाने अभ्यासातला रस संपत गेला तेवढयाच, किंबहुना जरा जास्तच, वेगाने चित्रपटातला रस वाढत गेला.

माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते.

राज कपूर बद्दल तर काही बोलायलाच नको. त्याचा संगम हा चार तासांचा चित्रपट मी प्रत्येक वेळी दोनच तास पाहू शकलो. राम तेरी गंगा.. हा चित्रपट पाहुन तर त्याच्याविषयीचा आदर एकदमच दुणावला.

दिलीप कुमारचा सौदागर हा एक चित्रपट पाहिल्याचं आठवतं. ती वेळ खरं तर त्याची वानप्रस्थाश्रमाकडे जायचीच होती. पण नंतर त्याचा मुकुल देव (हे नाव पण आठवत नसेल तुम्हाला)आणि ममता कुलकर्णी (हि वाटयाला आलेल्या कमीत कमी भुमिकेत जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करून मिळालेल्या संधीचं सोनं करायची) सोबत किला (म्हणजे मराठीतला किल्ला) नामक प्रचंड टुकार चित्रपट आला . आपल्या सुदैवाने नंतर त्याने लवकरच चित्रपट संन्यास घेतला.

धर्मेंद्र हा एक बर्‍याच काळापासून दर्शन देत आलेला आहे. तो आधी खरोखरच देखणा दिसायचा. पण आता तो एकदमच खप्पड दिसतो. धर्मेंद्र आणि "कुत्ते कमीने" संवादाचं एकदम पक्कं समीकरण बनल आहे. मला वाटतं गांधीजी मरताना जसे "हे राम" म्हणाले होते तसे धर्मेंद्र मरतानाही "कुत्ते कमीने" म्हणूनच शेवटचा श्वास घेईल. त्याचा एक चित्रपट आठवतो ज्यात त्याने दोरखंडाच्या सहाय्याने एक विमान रोखून धरल होतं. अशा अनेक अतर्क्य गोष्टी त्याने चित्रपटात केल्या आहेत.

जितेंद्र हा त्याच्या पांढर्‍या बुटांमुळे लक्षात राहिला. त्याच्या विशिष्ट प्रकारच्या नाचण्यामुळे त्याला "जंपिंग जॅक" म्हणायचे. त्याने मात्र प्रेक्षकांना फार काळ त्रास दिला नाही. त्याचा उधार की जिंदगी हा शेवटचा चित्रपट होता (ज्यामधे काजोलने पदार्पण केल होतं). बहुदा नंतर त्याला कोणी कामच दिल नसावं. नंतर त्याने त्याच्या मुलाला तुषार कपूरला आणुन चांगलाच सूड उगवला.

मध्यंतरी मिथुन चक्रवर्तीचे प्रत्येक वर्षी नियमितपणे बी-ग्रेड चित्रपट यायचे. अगदी इथुन तिथुन मिथुनच दिसायचा. त्याला म्रुगया आणि अग्निपथ ह्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं ह्यावर विश्वासच बसत नाही. त्याचे काही संवाद एकदम भन्नाट असायचे. उदाहरणार्थ: "तेरे नाम का कुत्ता पालू", "तेरी जात का बैदा मारू","तेरी आपडी की टोपडी","दिखने मे बेवडा... भागने मे घोडा... और मारने मे हथोडा"

नाना पाटेकरचे तिरंगा, क्रांतीवीर हे चित्रपट मात्र एकदम आवडून गेले। "ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून" वाल लॉजिक एकदम पटुन गेलं. त्याचा तो आक्रस्ताळेपणा, आरडाओरडा आणि त्याला मिळालेली बेफिकीर व्रुत्तीची जोड ह्या सगळ्यानी मनाचा ताबाच घेतला. नंतर त्यानी स्वत: दिग्दर्शित केलेला प्रहार हा देखील त्याच्या वेगळेपणामुळे लक्षात राहिला.

नानाचा भाऊ शोभेल असा दुसरा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याच्या घायल, घातक आणि दामिनी सारख्या चित्रपटांनी वेड लावल होतं. त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळे त्यानी केलेली तुफान मारामारी, जोशपूर्ण संवाद एकदम खरे वाटुन जायचे. ये ढाई किलो का हाथ, मुझे जिंदा छोडोगे तो पछताओगे इन्स्पेक्टर, तारीख पे तारीख, ऊतार के फेंक दो ये वर्दी और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले मे सारखे संवाद अंगात एकदम वीरश्री आणायचे. (लगेच घरातल्या तक्क्याला बलवंत राय मानून त्याला लाथा-बुक्क्या घालायचो आणि अंगातली वीरश्री शांत करायचो.)

नंतर नंतर सनी देओलचा फनी देओल होत गेला. गदर मधे तर तो अक्षरश: जमिनीतून बोअरिंग उचकटून १०-५ लोकांना त्याने मारताना दाखवला आहे. त्याच्या हाणामारी आणि संवादांमधे तोचतोचपणा येऊ लागला. ह्याच एक प्रमुख कारण म्हणजे त्याची आणि घायल,घातक,दामिनी फेम राजकुमार संतोषींची जोडी फुटली.

मौजमजाचित्रपटविचारसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

14 Jun 2008 - 8:17 am | अनिल हटेला

सही जा रेला है मामू !!!

येउ देत पूढील भाग लवकर येउ देत!!!!!

भडकमकर मास्तर's picture

14 Jun 2008 - 4:31 pm | भडकमकर मास्तर

देव आनंद चे आधीचे चित्रपट आणि त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले आताचे चित्रपट हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे....
..............
" माणूस इतका बदलतो?" असं अत्यंत फिल्मी वाक्य त्याच्या बाबतीत फार लागू पडतं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

देवदत्त's picture

14 Jun 2008 - 4:57 pm | देवदत्त

चांगलं चाललंय... येऊ द्या अजून..
माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत.
चालायचंच, त्या पिढीला आधीचे व नंतरचे विशेष वाटत नसतील. ती एकेकाची पसंती. आता मला ही त्यांतील राज कपूर चे सिनेमे एवढे खास नाही वाटत. दिलिप कुमार, देव आनंद तसे चांगले.
देवआनंदचे ही 'अव्वल नंबर' नंतरचे नवीन सिनेमे मी बहुधा पाहिले नसतील.
'किला' तर मी ही नाही पाहिला अजून. पण त्यातील 'वाह भई वाह' हे गाणे अजूनही लक्षात आहे :)

उधार की जिंदगी बद्दल थोडेसे. हा सिनेमा तसा चांगला वाटला मला. त्यात दादाजीचे काम बरेच होते. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तो जितेंद्रचा शेवटचा सिनेमा नव्हता, जितेंद्र्ने त्यानंतरही खूप सिनेमांत काम केले आहे आणि काजोलचा ही हा पहिला सिनेमा नव्हता, तो होता 'बेखुदी'.

नाना पाटेकरचे अंकुश, क्रांतिवीर, तिरंगा, हम दोनो, राजू बन गया सर्व सिनेमांतील काम छान वाटले.
हो, सनी देओल चा फनी देओल तर नाही झाला पण त्याच्या त्याच त्याच प्रकारच्या अभिनयाने त्यातील 'जोर' गेला. उरली फक्त आरडाओरड :(

ह्याच एक प्रमुख कारण म्हणजे त्याची आणि घायल,घातक,दामिनी फेम राजकुमार संतोषींची जोडी फुटली.
हे नाही कळले बुवा. :?

मिथुनचे सिनेमेही त्या काळी बघताना एवढे वाईट वाटत नव्हते पण आता वाटतात. मिथुनचे काही स्टंट तर रजनीकांतच्या तोडीचे. 'वतन के रखवाले' बहुधा.. ह्यात मिथुनला एक उंच भींत चढून पार करताना दाखवले आहे. अगदी पालीप्रमाणे. :D

असो, तुम्ही चालू द्यात...

सखाराम_गटणे™'s picture

14 Jun 2008 - 8:04 pm | सखाराम_गटणे™

मस्त लेख आहे.
मी आज काल जास्त हिन्दी चित्रपट बघत नाही. सगळ्यांबरोबर (घरच्यांसमवेत) सोबत चित्रपट बघणे म्हण़जे खुप अवघड असते. माहित नाही, कधी काय होइल ते.
बाकि धर्मेंद्र हा माझा पण आवडता नट आहे.
"कुत्ते कमीने" म्हणजे माझा आवडता संवाद. कचेरीत सुद्धा मी कधी कधी खुप मोठी अडचण आल्यावर स्वतः शीच हळु आवाजात कुत्ते कमीने म्हणतो.

अभिज्ञ's picture

14 Jun 2008 - 8:28 pm | अभिज्ञ

देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते.

अव्वल नंबर सारखा टुकार पिक्चर पाहून आपला देवानंद बद्दल आदर वाढतो? :SS :O
भडकमकरांनी ह्या पिक्चरचे "श्राध्द" इथे घातल्यास वाचायला आनंद होइल.
(मास्तर हा पिक्चर तुम्हि एकदा पहाच.)

अभिज्ञ. B)

सुचेल तसं's picture

15 Jun 2008 - 12:16 am | सुचेल तसं

आन्या,सखाराम गटणे
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!!!

देवदत्त,
धन्यवाद!!! जितेंद्र आणि काजोलबद्दल बरोबर सांगितले. पुढील लेखात मजकुर बिनचूक राहिल याची मी काळजी घेइन.
राजकुमार संतोषी हा हिंदीतील एक आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आणि सनीने घायल, घातक आणि दामिनी सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नंतर त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यांनी बरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला.

अभिज्ञ,
ते मी उपहासात्मक म्हणालो. अव्वल नंबर कोणाला आवडणं अशक्य आहे.

http://sucheltas.blogspot.com

केशवराव's picture

15 Jun 2008 - 10:44 pm | केशवराव

देव , राज , दिलीप बद्दल , त्यांचे गाजलेले चित्रपट न पहाता केलेली विधाने फारच उथळ वाटतात. लेख अभ्यासपूर्ण असावा अशी अपेक्षा नाही; पण अज्ञानातून लिहीलेला तरी नसावा. या तिघांनी चित्रपट सृष्टी गाजविली होती. 'अंदाज', 'मेला', 'मुगले आझम', 'कोहीनूर','यहूदी ',- - - - - ' बरसात', ' आवारा', 'आशीक', 'अंदाज', 'तिसरी कसम', 'छलीया' - - - - -' गाईड', तेरे मेरे सपने','बंबईका बाबू', ' नौ दो ग्यारह'- - - - - - ई. चित्रपट पहा; आणि मग मत प्रदर्शन करा.

सुचेल तसं's picture

16 Jun 2008 - 1:16 pm | सुचेल तसं

केशवराव,

मी ह्या लेखात माझ्या लहानपणापासुन (म्हणजे १९९० च्या पुढे) पहात आलेलो चित्रपट आणि त्याद्वारे मनावर ठसा उमटवत गेलेले अभिनेते ह्यांचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. मी लेखाच्या सुरुवातीलाच लिहिल्याप्रमाणे, देव-राज-दिलीप हे तिघं पुर्वी खुप लोकप्रिय होते. पण मला (आणि माझ्या पिढीतल्या बहुसंख्य लोकांना) त्यांचं फारसं काही अप्रूप वाटत नाही. देव आनंदचा अव्वल नंबर हा चित्रपट १९८९ मधे प्रदर्शित झाला. दिलीपकुमारचे सौदागर(१९९१) आणि किला(१९९८) हे दोनच चित्रपट ९० च्या दशकात प्रदर्शित झाले. त्यात अस काय होत की आम्ही प्रभावित होऊन त्यांचे जुने चित्रपट बघावेत? आज अमिताभचा सरकार अथवा खाकी बघुन
कोणताही प्रेक्षक निश्चितच प्रभावित होतो आणि त्यामुळेच त्याचे दिवार, शराबी, अग्निपथ सारखे चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात.

राज कपुरने तर १९८४ नंतर (शेवटचा चित्रपटः किम ) पडद्यावर दर्शन दिले नाही. त्याने स्वतः दिग्दर्शित केलेल्या बहुतेक चित्रपटांत नायिकांचे अंगप्रदर्शन आहे. देव आनंदचा गाईड हा खचितच चांगला चित्रपट होता. परंतु त्यात विजय आनंदच्या दिग्दर्शनाचा सिंहाचा वाटा होता. बहुसंख्य चित्रपटात देव आनंदची ती मान हलवण्याची, विशिष्ट पद्धतीने संवाद म्हणण्याची लकब, दिलीपकुमारची संथ संवादफेक मला तरी कंटा़ळवाणी आणि नाटकी वाटते.

ह्याच्यात प्रश्न वयाचा अजिबात नाहीये. का़ळासोबत जे बदलले त्यांना लोकांनी स्विकारलं. प्रारंभी नायकाच्या भुमिका वठवणार्‍या संजीवकुमारनी कारकीर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात चरित्र अभिनेत्याच्या भुमिका तितक्याच ताकदीने साकारल्या. अमरीश पुरी शेवटपर्यंत सशक्त आणि वैविध्यपूर्ण भूमिका करत राहिले म्हणूनच मिस्टर इंडियातला मोगबो असो, घातक मधला गांधीवादी पिता असो किंवा चाची ४२० मधला कमल हसनचा खडुस सासरा असो अशा त्यांच्या भूमिका आजही मनाला स्पर्शुन जातात.

http://sucheltas.blogspot.com

मनिष's picture

16 Jun 2008 - 1:39 pm | मनिष

राज-दिलीप-देव बद्द्ल सहमत. अगदी त्यांचे गाजलेले चित्रपट पाहुनही. सगळे ग्रेट म्हणतात म्हणून ग्रेट म्हणायलाच पाहिजे का? माझ्या पिढीला हे तिघे खरच नाही आवडत. देव आनंदचे जुने चित्रपट निदान टाइम-पास तरी होते (शम्मी कपूर सारखेच). राज कपूर ला 'क्लासिक' वगैरे म्हणणे तर डोक्यात जाते अगदी....त्यापेक्षा मग मोतीलाल, बलराज सहानी कितीतरी उजवे/सरस; ते अगदी जुने ब्लॅक-ऍन्ड-व्हाईत काळातील असले तरी.

सचीन जी's picture

16 Jun 2008 - 9:03 am | सचीन जी

गेला बाजार - शक्ती, विधाता, ज्वेल थीफ, मनपसंद, देस परदेस, सत्यकाम, चुपके चुपके, खुशबु, किनारा, परिचय, शौकिन, पसन्द अपनी अपनी.

बाकी राज कुमार संतोषीं आणि मेहुल कुमार फारच लाउड दिग्दर्शक वाटतात.
नाना परींदा मधे आवडला होता.

हर तरहा की फिल्मोंका शौकिन,
सचीन जी

सुचेल तसं's picture

16 Jun 2008 - 1:27 pm | सुचेल तसं

सचिनजी,

मी शक्ती, चुपके चुपके, शौकिन पाहिले आहेत.

राजकुमार संतोषींबद्दल थोडंसं...
--------------------------
अंदाज अपना अपना हा एव्हरग्रीन विनोदी चित्रपट संतोषींचाच. द लिजण्ड ऑफ भगतसिंग हा देखील त्यांचाच. त्याच काळात आलेल्या इतर भगतसिंग चित्रपटांपेक्षा कितीतरी पटीने उजवा होता.

http://sucheltas.blogspot.com

मराठी_माणूस's picture

16 Jun 2008 - 2:02 pm | मराठी_माणूस

जुने चित्रपट पहाताना तत्कालिन सामाजिक परिस्थिति लक्षात घ्यायला हवी.

नानाचा भाऊ शोभेल असा दुसरा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याच्या घायल, घातक आणि दामिनी सारख्या चित्रपटांनी वेड लावल होतं. त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळे त्यानी केलेली तुफान मारामारी, जोशपूर्ण संवाद एकदम खरे वाटुन जायचे. ये ढाई किलो का हाथ, मुझे जिंदा छोडोगे तो पछताओगे इन्स्पेक्टर, तारीख पे तारीख, ऊतार के फेंक दो ये वर्दी और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले मे सारखे संवाद अंगात एकदम वीरश्री आणायचे. (लगेच घरातल्या तक्क्याला बलवंत राय मानून त्याला लाथा-बुक्क्या घालायचो आणि अंगातली वीरश्री शांत करायचो.)

इतका भ्रषटाचार, गुन्हेगारी आणि हिंसा त्या काळात होती का ?