मी ,ओककाका,भानामती आणि मिपा

साती's picture
साती in जनातलं, मनातलं
12 Mar 2012 - 11:58 pm

पैसाताईंनी इथे दिलेला प्रतिसाद बघून आज मुद्दामून इथे आलेय.
पैसा, ओककाका काही चुकीचं म्हणत नाहीयेत गं! पण काय आहे ना त्यांना कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे (हे मी वेगळे सांगायची गरज नाही म्हणा :) ) तर या त्यांच्या भानामतीच्या करण्या दुसर्‍याही एका मसंवर प्रसिद्ध होतात. तिथे मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्‍या करते”. हे जरासं सार्कॆस्टिक होतं.पण दोन तीन ठिकाणी बघितलं तर ओककाका निष्पापपणे हे खरंच मानून लिहितायत की बघा या भानामतीचं अस्तित्व मान्य करतायत.
तर पूर्ण प्रतिसाद असा होता
–ओकसाहेब,मी स्वतः एम डी डॉक्टर आहे.
मी भल्या भल्या भानामती दररोज दूर करते. . काल रात्रीही दोन भानमत्यांना अ‍ॅडमीट करून ठेवलंय. एकीला बघता बघता डोळे लाल होतात आणि एकीने म्हणे मागच्या सात वर्षांत काह्हीच खाल्लेलं नाही.काही खाता क्षणीच उलटी करते म्हणे. आता २४ तास होत आले मी अ‍ॅडमीट करून, ना लाल डोळे,ना उलटी.
अशिक्षित आणि मुख्यत्वे स्त्रिया या मार्गाने आपले सायकीक डिसीजेस मॅनीफेस्ट करतात हे सुशिक्षितांना का कळू नये?आजच्या जगात कोणी भानामतीचे इतक्या हिरिरीने समर्थन कसे करू शकते?'

त्यातला मुद्दलातला शेवटचा भाग काढून बाकीचा प्रतिसाद काकांनी चिकटवलाय इथेही आणि तिथेही.
नंतर बरेच दिवस मी मसं (मराठी संकेतस्थळे) वर नव्हते. आल्यावर बघते तर बापरेबाप, ओककाकांनी मला फ़ेमसच करुन टाकलं. 
यावर काकांचं म्हणणं- आता जर आपणच म्हणताय की मी दररोज भानामतीच्या केसेस हाताळते, दूर करते... मग तर फार चांगले झाले. कारण इथे लोक भानामती नावाचे अनाकलनीय काही घडतच नाही असा पवित्रा घेतात. आपले हॉस्पिटल शहरी भागातील आहे किंवा ग्रामिण भागात हे स्पष्ट होत नसले तरी, निदान भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार.'
नशीब यावरून 'डॉ.साती भानामती असते हे मान्य करतायत; असे नाही म्हणाले हे ओककाका.

तर ९ तारखेला मी तिकडे एक प्रतिसाद दिला तो असा.

"अरे देवा,अजून भानामतीचा गोंधळ चालूच आहे का?
पहिल्या केसमध्ये ती मुलगी नवर्‍याला सोडून आपल्या आईबाबांकडे राहात होती. तिच्या मुलांनाही भावाच्या मुलांइतकंच प्रेम माहेरी मिळावं अशी तिची इच्छा होती. ही मुलगी पैसे कमवण्यासाठी एक कामचलाऊ ब्युटी पर्लर चालवते त्यामुळे तिच्याकडे बर्‍याच प्रकारची डोळे लाल करणारी किंवा डोळ्यातून पाणी काढू शकणारी रसायने आहेत.
घरात जरा कुरबूर झाली की ती ही रसायने कुणाच्या नकळत डोळ्यात घालते आणि डोळे भयाण लाल करून घेते.
हे तिनेच आम्हाला विश्वासात घेतल्यावर सांगितलं. तिचे आणि घरच्यांचे व्यवस्थित समुपदेशन केल्यानंतर हा प्रकार आता बंद आहे.
दुसर्‍या केसमध्ये 'हिने मागच्या सात वर्षांत काही खाल्ले नाही' हा तिच्या घरच्यांचा दावा आहे सत्य नव्हे. खरं तर ती तीन वेळेस व्यवस्थित खाते पण वरचे एक दोन घास स्वतःहून उलटी करून उलटून काढते. तिच्यात डिहायड्रेशन किंवा मालन्यूट्रिशनचे कोणतेही साईन्स नव्हते. दोन दिवस घरच्या ससेप्टिबल म्हणजेच या प्रकारांनी घाबरून मुलीच्या मनाप्रमाणे ऐकणार्‍या व्यक्तींपासून तिला दूर ठेवल्यावर हे प्रकार आपोआप बंद झाले. आता ती फक्त 'उलटी आल्यासारखी वाटते, छातीत दुखते, असे म्हणते. ३ दिवसांनी तिला डिस्चार्ज दिल्यावर घरी २ दिवस बरी होती मग पुन्हा उलट्या सुरू झाल्यात. ती हे पहिल्या केसमधील स्त्रीप्रमाणे स्वतःहून करत नसून अती डिप्रेशनमुळे तिचे मन तिच्या शरीरास हे करण्यास भाग पाडतेय. (सोमॅटायजेशन). तिच्यावर सध्या मानसोपचार तसेच तिच्या आजी-आई यांचे काउंसेलिंग चालू आहे.
ओकसाहेब तुमची मते ठाम आहेत यामुळे या वरच्या विवेचनातूनही तुम्ही स्व्तःच्या सोयिचं तिसरंच काही शोधुन काढाल याची खात्री आहे."

यावर मात्र ओककाकांचा एक चकार शब्दही नाही.
-----------------------------------------------------------------------------------
जाऊदे,यातून चांगल्यात वाईट असं की मी बर्‍याच दिवसांनी लाडक्या मिपावर लिहायला आले.
इथल्या नविन मेंबरांना मी कदाचित माहिती नसेन. पूर्वी आमच्या सगळ्यांचं एक जुनं आवडतं संस्थळ होतं. तिथून फ़ुटून बाहेर निघुन हे संस्थळ स्थापन करण्यापूर्वीची गुप्तं खलबतं वैगेरे आम्हि मेलामेलीने करत असू. आजकाल ते मित्र आणि मैत्रिणीही दिसत नाहित फारसे. मग माझ्या एम डीच्या परीक्षा वैगेरेत जरा इकडे यायचं कमी झालं.
आता माझे अपडेटस देते. एम डी झाल्यावर एका महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रॆक्टिस सुरू केली होती पण तिथलं सांस्कृतिक अणि भौगोलिक वातावरण मला सूट झालं नाही. मग परत मुंबईला यायचं की रत्नागिरीला जायचं या भानगडीत अचानक माझ्या नवर्‍याच्या मूळ गावाला जायचं हा नवाच मार्ग सुचला. पैल्यांदा नवरा तयार नव्हता. त्याच्या अ‍ॅकॅडमिक्समुळे त्याला महाराष्ट्रातच-मुंबईतच मस्त जॉब किंव अजून उच्च शिक्षणाच्या संधी होत्या. मग त्याची मनधरणी करून इकडे आले.इकडे यायचं मुख्य कारण अर्थार्जनाबरोबर थोडीबहुत समाजसेवा घडावी हे आहे.हे अत्यंत मागासलेलं गाव आहे आणि उच्चशिक्षित अ‍ॅलोपथिक डॉक्टरांची इथे कमतरता. कमालीचा जातीभेद, अंधश्रद्धा.सोयीसुविधांचा अभाव. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते हैद्राबादेत किंवा सोलापूरला आरोग्यसुविधांसाठी जातात किमान १५०-२०० किमी प्रवास करून. ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते इथल्या डॉक्टरांचे इलाज थकले की देवावर किंवा अंधश्रद्धांवर हवाला ठेवुन गप्प राहतात. अरे हो, गावाचं नांव सांगता येणार नाही (व्यवसायाची कुठे जाहिरात करू नये असा माझा आणि मिपाचाही नियम आहे ना  ) पण ओककाकांनी कर्नाटकातल्या ज्या दोन महान जिल्ह्यांत भानामती जास्त होते असं कुठल्याश्या अहवालात लिहिल्याचं लिहिलंय ना त्यापैकीच एका जिल्ह्यात राहाते मी. अगद आपले यवतमाळ,चंद्रपूर हो .हे जिल्हे म्हणजे महाराष्ट्र आणि आंध्र यांच्या सीमेवरचे,सतत सीमा प्रश्नात हैद्राबाद-कर्नाटक प्रश्नात सापडणारे.नवर्‍याला(त्याला जुने मिपाकर आणि मिपासंस्थापक राजाभावजी म्हणून ओळखतात) तोडकं मोडकं कन्नड येत होतं आणि मला कानडीचा गंधही नाही. पुस्तकं घेऊन शिकायचा प्रयत्न केला तर इथली भाषा आणि व्याकरण प्रमाण कानडीच्या दुसर्‍या टोकाला. उदा. 'बाहेर बसा' हे वाक्य प्रमाण कानडीत 'होरगडे कुत्तकोळी' असं होईल तर इथे 'व्हराग कुड री' आणि म्हणताना एकात एक मिसळून '“व्हराग्कुड्री'  माझं पहिलं वर्षं तर इथला भाषेचा लहेजा शिकण्यातच गेलं. तोपर्यंत खरंच माझे उपचार फक्त क्लिनीकल प्रॊब्लेम्सवर आधारीत,पेशंटच्या बाह्य ल़क्षणांवर आधारीत असेच होते. पेशंटच्या मनाचा, विशेषत: बायकांच्या प्रश्नांचा अंदाज येत असला तरी तितकंसं काऊंसेलिंग करायला जमत नसे. कारण भाषेच्या प्रॉब्लेममुळे ज्याला प्रमाण कन्नड किंवा हिंदी/मराठी येतं असा घरातला पुरूषच मला बायकांचे प्रश्नही सांगे. आत्ता मात्र मी इथल्या भाषेत मस्त बोलायला शिकलेय. सगळे मला 'सातीअम्मा' म्हणून ओळखतात. आणि मी पण 'यन्री अम्मा/ येन तम्मा' करत त्यांच्या मनातलं सगळं उलगडून घेऊ शकते. इथे बायका डॉक्टर म्हणजे डिलिवर्‍या करणार्याच फक्त असा समज आहे आणि माझ्य़ा स्पेशालिटीची प्रॅक्टिस करणारी मी एकटीच बाई १५० किमीच्या त्रिज्येत. एम डी फ़िजीशीअन बाई असू शकते हेच इथल्या लोकांना पचायला कठिण गेले अगदी मेडिकल रिप्रेझेंटेटिवांनापण. मग आम पब्लिकची बातच सोडा.खास स्त्रियांचे असे जे प्रश्न असतात त्याकरिता जर पेशंटला गायनॅकॉलॉजिस्टकडे पाठवलं तर लोक माझ्याकडे 'नी याक नोडल्ला री अम्मा' म्हणून आश्चर्याने बघत.
तर या अंधश्रद्धांतून आणि मागासलेपणातून येणारे आजार निस्तरणे हा माझ्या कामाचा एक भाग झाला. माझी मुख्य प्रॅक्टीस डायबेटिस,एंडोक्रिनॉलॉजी आणि हार्ट-न्यूरोनल डिसीजेसची आहे. इमर्जन्सी मेडिसीन आणि पॉईजनिंग तसेच साथीचे आजार याचे उपचार माझ्या इंटेंसिविस्ट आणि पल्मोनॉलॉजिस्ट असणार्‍या आणि त्याच्या विषयाचा ज्युनिअर प्रोफ़ेसर असणार्‍या नवर्‍यारोबर बघते. काय विरोधाभास आहे बघा, या दोन्ही जिल्ह्यांत मेडिकल कॉलेज असूनही आरोग्याची अशी अनावस्था आहे. इथुन बांधकाम,उसतोडणउद्योगधंद्यासाठी बाहेर विस्थापित होणाराही मोठा जन समूह असल्याने एडस आणि त्या अनुषंगाने टिबी हाही मोठा आजार (राज्यात पहिल्या एक-दोन नंबरात आहोत म्हटलं आम्ही :) )आहे.राजा टिबीचा या भागाचा नोडल ऒफ़िसर म्हणूनही काम पाहतो. सरकारी टिबी विरोधी यंत्रणेत अमूलाग्र बदल करण्याची एक मोठी कमगिरी याने हाती घेतलीय.
तर या व्यापांमुळे ओककाकांच्या लाडक्या भानामतीचा सातत्याने पाठपुरावा करणे मला मनात असूनही शक्य नाही. पण काही इंटरेस्टिंग सापडल्यास त्यांना फ़ोन करून नक्की इकडे बोलवेन.

जाऊदे.त्या निमित्ताने मिपावर लिहायला आले. नाहीतर मोबाईलवर मिपा वाचते पण लॉगइन होत नाही. सानिका,गणपा यांच्या पाककृती अधाशांप्रमाणे बघते आणि वाचते. गवि, पिडा,रामदास यांचं लेखन आवर्जून वाचते.गवि तर आमचे गाववाले दोस्त आहेत. पैसातईंवांगडा मायबोलीत थय गजाली करूक गावतंत . अभिप्राय देण्यासाठि नेट उघडायची कसरत करायला शक्यतो वेळ मिळत नाहि. दुसया एका संस्थळावर नेहमी असते कारण तिथे माझे जुने मित्र मैत्रिणी आहेत हे आहेच पण मला मोबाईलवरून इंग्रजी टायपून (ईमेल पत्ता) माझ्याच आयडीने लॉग इन होता येतं. आणि पब्लिक मी मोबाइलवर टायपत असल्याने इंग्रजीत लिहितेय हे पण समजून घेतं. इथे मिपावर श्रामो,बिका भेटले कधी रात्री तर खव,खव खेळायचो पण आता नविन आयसीयू सुरू केल्याने ते ही जमत नाही फारसं. इथे पण ईमेल आयडीने लॉग ईन व्हायची व्यवस्था करा ना हो व्यवस्थापक!
आज ओककाकांचे खरंच आभार मानले पाहिजेत त्यांच्यामुळे इथे मी इतकं लिहिलंय. वर स्वत:चं फारच तुणतुणं वाजवलंय पण आपल्या मिपाकरांना आपलं कौतूक सांगायचं नाही तर कोणाला?
आणि हो, आता माझ्या डायबेटिस, हार्ट डिसीजेसच्या डाटाबेससारखा (मी खास सॉफ्ट्वेअर विकत घेऊन तयार केलाय रेफरंससाठी) नविन वर्षापासून भानामतीचाही डाटाबेस ठेवेन; खास ओककाका आणि उत्सुक मिपाकरांकरिता.

राहती जागासमाजजीवनमानमौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

13 Mar 2012 - 12:11 am | प्राजु

वाह सातीताई..!
मस्त!
लेखा पूर्ण वाचला. तुझं काम नक्कीच कौतुकास्पद आहे.
तुला आणि राजाभावजींना खूप खूप शुभेच्छा!

अधुन मधुन लोगीन होऊन, तुझ्या तिथल्या अनुभवांवर लिहित जा.. अशी विनंती. :)

चेतनकुलकर्णी_85's picture

13 Mar 2012 - 12:12 am | चेतनकुलकर्णी_85

त्यांच्या मते मिग विमानांच्या दुर्घटनेला पण चायनीज भानामती कारणीभूत आहे म्हणे...

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2012 - 12:21 am | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! साती इज ब्याक! वेलकम हो! वाचायला लैच्च मज्जा आली! बाकी, महर्षी तुमचंही भलंच करतील यात शंका नाहीच! :) ;)

गणपा's picture

13 Mar 2012 - 12:23 am | गणपा

वेल्कम बॅक सातीतै. :)
आता ओककाकांचे पेश्शल आभार मानायला हवेत. ;)
त्या निमित्ताने परत तुझ लिखाण वाचायला मिळाल.
तुझ्या तिथल्या अनुभवांबद्दल अजुन जाणुन घ्यायला आवडेल.

वेळ मिळेल तशी भेट देत रहा.

सातीताई, तुंबा चनागी बरीती नीवू :) मत्तू येनु सुद्दी?
लेख अप्रतिम झालाय. तुमचे कार्य वाचून खूप अभिमान वाटला. तुम्हाला आणि राजाभावजींना बहुत बहुत शुभेच्छा!!

श्रावण मोडक's picture

13 Mar 2012 - 12:35 am | श्रावण मोडक

साती = भानामती - जुळतंय की. तरीही हिची तक्रार. छ्या...
आता नाडीपट्टी पाहावी लागेल हिची. मला नाही, महर्षींनाच. :)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2012 - 2:07 am | अत्रुप्त आत्मा

@ओकसाहेब तुमची मते ठाम आहेत यामुळे या वरच्या विवेचनातूनही तुम्ही स्व्तःच्या सोयिचं तिसरंच काही शोधुन काढाल याची खात्री आहे."

यावर मात्र ओककाकांचा एक चकार शब्दही नाही. >>> आणी ते काढणारही नाहित,,अश्या लोकांचा हे सगळं करण्यामागचा उद्देश स्वच्छ असतो,,,शत्रूच्या गोटात जाऊन कायम गोंधळ उडवणे.

ही मंडळी स्वतः सश्रद्ध,अश्रद्ध,अंधःश्रद्ध वगैरे काहिही नसतात... यांना सर्व काही कळत असतं...वळत तर अतिशय चांगलं असतं...भोळ्या जनतेचा फायदा घ्यायचा आणी हुशार सश्रद्धांना आपलसं करायचं (पुढे राखिव सैन्य म्हणुन वापर करायला)

त्यामुळे असल्या दांभिक उन्मादाला कायद्याच्या आधारानी जेरबंद करायची सोय हवी,हेच खरं

अवांतर-@वर स्वत:चं फारच तुणतुणं वाजवलंय पण आपल्या मिपाकरांना आपलं कौतूक सांगायचं नाही तर कोणाला?>>> असं काही नाही हो.... हे असं सांगितल्या शिवाय आंम्हा नव्या लोकांना (म्हंजे होत आलय अता १वर्ष ;-) ) ओळख कशी घडणार पूर्वीच्या/जुन्या लोकांची ...या चर्चेत नाव ऐकुन होतो...आज त्या निमित्तानी कळले...बरे वाटले.

धनंजय's picture

13 Mar 2012 - 1:21 am | धनंजय

वेलकमच वेलकम.

तुम्हा दोघांचे ग्रामीण भागात जाऊन काम करणे अतिशय स्तुत्य आहे.

अरे वा! तुमचं अभिनंदन!
लेख छान जमलाय.
बाकी इकडे पैसाताई आणि बिरूटेसर मोबाईलवरून काय करत असतात.
भानामती, नाडी याबद्दल काही माहीत नसल्याने त्याबद्दल काय बोलणार?;)

साती's picture

13 Mar 2012 - 1:34 am | साती

ते वड्डे वड्डे लोक्,त्यांचे वड्डे भारी मोबाईल. म्या गरीबेचा साधा एक्सप्रेस म्युजिक गं बाई.

Nile's picture

13 Mar 2012 - 2:29 am | Nile

मोबाईल ब्राउझर मध्ये लॉगिन डिटेल्स सेव्ह होत नाहीत का? अशाने दरवेळी युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागत नाही.

साती's picture

13 Mar 2012 - 2:37 am | साती

1234 होतो. साती लिहिताच येत नाही तर सेव कसं होणार? कॉपी पेस्ट पण होत नाही.
आता इथे पण 1234 व्हावं लागेल पण आयडेंटिटी क्रायसिस होईल ना!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 1:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-)

वाचून आनंद झाला एवढंच आत्ता लिहू शकते.

स्वाती दिनेश's picture

13 Mar 2012 - 12:51 pm | स्वाती दिनेश

वाचून आनंद झाला
अदितीसारखेच म्हणते,
स्वाती

नंदन's picture

13 Mar 2012 - 2:05 am | नंदन

वेलकम बॅक, सातीतै!

आणि मला कानडीचा गंधही नाही.

यम्मी हा शब्द सोडल्यास :)

Nile's picture

13 Mar 2012 - 2:24 am | Nile

तर इथे 'व्हराग कुड री'

इंटरेस्टिंग! हे रा री तेलगुचा परिणाम असावं काय? मद्रासमध्ये (आणि बरेचदा बंगळूरात) 'कूड' ची वेगवेगळी रुपे 'दे' या अर्थाने ऐकली आहेत. बंगळूरात 'कूड पा' वगैरे म्हणून "डोसा वाढ की लेका" असं काही तरी मी म्हणत असे. (डोसा मिळायचा म्हणजे फारसं चुकत नसावं. ;-) ) तमिळमध्ये तेच 'कूडं' म्हणून भागायचं. पण ते असो.

आता डागदरीणबाईंनी इतकं लिहलं कारणं त्यांना भानामतीच झाली होती असं जर ओककाका म्हणाले तर तुमच्याकडे काही उत्तर आहे का? तेव्हढं सांगा. ;-)

(एक उत्तर सांगून ठेवतो गरज लागली तर: "नाडी"!) ;-)

भेटूच.. :)

पिवळा डांबिस's picture

13 Mar 2012 - 2:59 am | पिवळा डांबिस

हलो साती,
बर्‍याच दिवसांनी मिपावर तुझं लिखाण बघून बरं वाटलं. मिपावरचे जुने लोक आता इथेतिथे विखुरले गेले आहेत. कट्टा तोच आहे पण उपस्थिती बदलली आहे. चालायचंच!
पूर्वी अंधश्रद्धा आणि ज्योतिष या विषयांवर अनेक वादविवाद मीही करीत असे. पण मग असं लक्षात आलं की समोरचे आयडी बदलतात आणि नव्या दमाने वाद सुरूच ठेवतात. शेवटी मीच थकून गेलो आणि या विषयांवर मतप्रदर्शन थांबवलं!!
:)
सानिका,गणपा यांच्या पाककृती अधाशांप्रमाणे बघते आणि वाचते. गवि, पिडा,रामदास यांचं लेखन आवर्जून वाचते.
मी देखील सानिका, गणपा, गवि आणि रामदास यांचं लेखन आवर्जून वाचतो....
पिडां तर आपण कधीकाळी लेखन करत होतो हेच आता विसरले आहेत. ;)

साती's picture

13 Mar 2012 - 3:08 am | साती

पिडां तर आपण कधीकाळी लेखन करत होतो हेच आता विसरले आहेत.
आम्ही अलिशीया सारख्या सुंदर गोष्टी कधीच विसरणार नाही पण.

श्रावण मोडक's picture

13 Mar 2012 - 9:58 am | श्रावण मोडक

अगदी सहमत. डागतरीनबाई, या बाबावर काही भानामती करता येते का त्यानं पुन्हा लिहितं व्हावं यासाठी?

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2012 - 12:48 pm | बिपिन कार्यकर्ते

या बाबावर काही भानामती करता येते का त्यानं पुन्हा लिहितं व्हावं यासाठी?

श्री. मोडक, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती... हा बाबा काय चीज आहे हे तुम्हाला माहित नाही का? त्यांचं प्रोफाइल पेज वाचलं नाही का कधी? साक्षात भूतयोनीचा शहेन्शाह आहे हा बाबा! त्याच्यावर भानामती वगैरे काय चालणार? भानामती म्हणजे त्यांच्या फॅमिलितलीच असणार. आणि आता भूतयोनीतही स्त्री पुरूष वगैरे सगळं समान असतं. त्यामुळे भानामती त्यांची फॅमिली असली तरी असं त्यांना प्रेशराइझ नाही करू शकणार!

कैप्पण बोललात तुम्ही!

श्रावण मोडक's picture

13 Mar 2012 - 12:56 pm | श्रावण मोडक

माननीय बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब,
मी भानामती करायला सांगितली ती माणसावर. भुतावर नव्हे. भुतं सरळ असतात. ती लिहित वगैरे नाहीत... त्यामुळं त्यांच्याबाबत हा प्रश्न येत नाही. पिवळा डांबीस हा माणूस भूतयोनीचा शहेन्शाह आहे, कारण तो भूत नाही. भुतांना शहेन्शाह वगैरे होण्याची गरज नसते. त्यांचं फक्त ते अस्तित्त्वच पुरेसं असतं. हा माणूस सध्या लिहित नाही. साती यांचा "माणसे दुरुस्त करणे आणि मुलामुलींना ते काम (दुरुस्तीचं) शिकवणे" हा व्यवसाय असल्याने ते काम करण्याची विनंती त्यांना केली आहे.
कळावे, लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती. :)

मन१'s picture

13 Mar 2012 - 11:02 am | मन१

"डांबिस खानास"(http://www.misalpav.com/node/1582)पुन्हा एकदा लिहिते कराच...

मनीषा's picture

13 Mar 2012 - 5:34 am | मनीषा

डॉ. साती,
तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग निव्वळ पैसा मिळवण्यासाठी न करता काही विधायक कार्य करता आहात. तुम्ही खरोखर ग्रेट आहात.
तुमचे अनुभव आणि अनुभव कथन इतकं प्रामाणिक आहे, की त्यात कुठेही स्वतःचे कौतुक करत असल्याचे जाणवत नाही.

आता भानामती आणि श्री ओक यांच्याबद्दल,

" कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे "

तुमचं हे म्हणणं किती योग्य आहे याचे प्रत्यंतर येते आहे. ओकांचा अजून एक नविन धागा आलेला दिसतो आहे, पण या धाग्यावर त्यांचे उत्तर नाही.
असो, पण जोवर तुम्हांसारखी काही लोकं इथे आहेत, तोवर त्यांची भानामती (किंवा नाडी) निदान मिपावर तरी चालणार नाही याची खात्री वाटते.

आबा's picture

13 Mar 2012 - 6:02 am | आबा

वेलकम बॅक सातीताई
आता यावर ओककाका काय प्रतिक्रिया देताहेत ते बघायचं :)

सहज's picture

13 Mar 2012 - 7:12 am | सहज

भानामतीबद्दल पुरेसे स्पष्टीकरण देउनही ओक काही तुमची बाजु समजून घेणार नाहीत उलट आधीक जोमाने पुन्हा येतील. ही-मॅन कार्टून मधे तो स्केलेटॉर शेवटी आय वील बी बॅक म्हणत पुन्हा तेच गुर्‍हाळ चालू ठेवतो तसे ओक अजुन ह्याच धाग्याचा वापर करुन आपलीच री ओढण्यात कमी करणार नाही. ह्या दैवी नाड्या नेहमी जे दक्षीणा भागवू शकतील अश्याच लोकांच्या कश्या काय आधी बनवल्या जातात? जे शेतकरी आत्महत्या करणार आहेत, सातीताई काम करतात तश्या विकसनशील भागातल्या लोकांना युक्तीच्या चार गोष्टी सांगणार्‍या नाड्या कश्या लिहल्या जात नाहीत? त्यांना जाउन ह्या नाड्या विनामूल्य देउन ये असे दैवी आदेश कसे मिळत नाहीत? (हा हा हा लिहता लिहता ओकांना एक जबरदस्त कँपेन आयडीया दिली आहे) यावर महर्षींनी कोणताच खुलासा केला नसेल. शिवाय ओक म्हणतील की ते फक्त हुकमाचे ताबेदार, प्रॉब्लेम असेल तर महर्षींना भेटा, नाड्या त्यांनी लिहल्या मी नाही.

बाकी सातीताई व राजाभावजी दोघाच्यां कार्यांबद्दल आदर आहेच. सातीताईला वेळ मिळून ती अजुन वेगवेगळे लेख टाको ही इच्छा!

परिकथेतील राजकुमार's picture

13 Mar 2012 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

सातीतै भेलकम ब्याक. :)

आणि ह्या धाग्यामुळे चक्क चक्क सहजमामा देखील मिपावरती आलेले बघून खरच छान वाटले.

पैसा's picture

13 Mar 2012 - 7:14 am | पैसा

वाचून अतिशय आनंद झाला एवढंच आत्ता लिहिते! बाकीचं रात्री हापिसातून परत आल्यावर!

फारएन्ड's picture

13 Mar 2012 - 7:18 am | फारएन्ड

साती, तुझ्या पोस्ट्स माबोवरही अधूनमधून दिसतात पण ही बाकीची माहिती नव्हती. तू/तुम्ही दोघे करत आहात ते काम ग्रेट आहे. उसतोडणीचा उल्लेख वाचून अवचटांपासून ते तो "दुष्काळ आवडे सर्वांना" या अनुवादित पुस्तकाचा मूळ लेखक (पी साईनाथ?) यांच्या वाचलेल्या लेखांची आठवण झाली.

मला वाटते गावाचे नाव द्यावेस. त्या भागातील लोकांना या माहितीचा उपयोग होईल.

५० फक्त's picture

13 Mar 2012 - 7:35 am | ५० फक्त

साती, प्रथम तुमच्या कार्याबद्दल अतिशय धन्यवाद आणि शुभेच्छा, बाकी ओककाकांबद्दल काय बोलणार, कायम हिप्नोटाईझ झाल्याप्रमाणे लिहित असतात, असो. चालुदे.

वेलकम..!!
सातीताईंच्या धाग्यावरच सहजमामाही दिसावेत.. व्वॉव!!
मी तर सगळ्याच ज्येष्ठ सदस्यांचं पुन्हा एकदा इथे वाचायला उत्सुक आहे.
मे धीस ट्राईब इन्क्रीस असं कायसं म्हणतात ते म्हणतो.

नगरीनिरंजन's picture

13 Mar 2012 - 8:05 am | नगरीनिरंजन

इतका बहुमोल वेळ घालवून आणि कष्ट करून लिहीले हे पाहून कौतुक आणि वाईटही वाटले.
ओकांनी लिहीलेले मी वाचले होते आणि तुमचे प्रतिसादही वाचले होते. त्यावरून तुम्ही भानामतीवर विश्वास ठेवता हा निष्कर्ष काढण्यासाठी ढेकणाएवढा मेंदू असणे आवश्यक आहे.
असो.
जालावर आणि जगात मेंदूचा ढेकणाएवढाही भाग न वापरणारे लोक असतात त्यांच्यासाठी खुलासेवार लिहीणे आवश्यकच आहे. त्यानिमित्ताने लिहीत्या होऊन तुमचे आणखी अनुभव वाचायला मिळाले तर चांगलेच होईल.

अमितसांगली's picture

13 Mar 2012 - 8:22 am | अमितसांगली

अप्रतिम लेख....खूप छान वाटले हा लेख वाचून.............

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2012 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.साती वेलकम. ग्रामीण भागातल्या कामाबद्दल वाचतांना आनंद वाटला.
बाकी, भानामती वगैरेंवर काय बोलायचं. अजूनही आपलं मागासलेपण अशा वृत्तीतून दिसत असतं.

असो, अजून येऊ द्या असेच लेखन.

आणि हो, संपादिका पैसा प्रमाणे आम्हीही मोबाईलवरुनच मिपावर वावरत असतो तेव्हा लिहिण्याची हायगाई करायची नै. :)

-दिलीप बिरुटे

मन१'s picture

13 Mar 2012 - 10:27 am | मन१

त्या एका प्रतिसादासाठी इतकं लिहावं लागावं हे दुर्दैव.
तुम्ही लिहिते झालात हे चांगलच; पण एवढं सविस्तर सांगावं लागल्याबद्दल वाइट वाटतय.
मा. ओककाकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

हुप्प्या's picture

13 Mar 2012 - 10:42 am | हुप्प्या

इतक्या उच्च विद्याविभूषित असुन इतक्या आडनिड्या भागात आपण प्रॅक्टिस करत आहात आणि तिथेही वेळ काढून इंटरनेटवरुन आपले विचार मांडता, दुसर्‍यांचे वाचता हे अगदी कौतुका स्पद वाटले.
आपला लेख आवडला. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आपले शब्दांकन खूप काही शिकवून जाते.
आभार.

अगो गाववाले.. त्या "केळकर"ला टाक की इथे.. कधीपास्न मी मागे लागलोय त्यासाठी..

अमृत's picture

13 Mar 2012 - 10:52 am | अमृत

कृपया वरचे वर लिहीत चला. आपले लिखाण आणि अनुभव दोन्ही वाचायला आवडेल.

अमृत

विसोबा खेचर's picture

13 Mar 2012 - 11:19 am | विसोबा खेचर

प्रिय प्रिय सातीअम्मा, :)

तिथे मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्‍या करते”.

मस्त.. :)

अशिक्षित आणि मुख्यत्वे स्त्रिया या मार्गाने आपले सायकीक डिसीजेस मॅनीफेस्ट करतात हे सुशिक्षितांना का कळू नये?आजच्या जगात कोणी भानामतीचे इतक्या हिरिरीने समर्थन कसे करू शकते?'

खरं आहे तुझं..!

आपले हॉस्पिटल शहरी भागातील आहे किंवा ग्रामिण भागात हे स्पष्ट होत नसले तरी, निदान भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार.'

अगं हा आमचा शश्या ओक पक्का शाणा आहे. तो तुला शब्दात पकडायला बघतोय.. :)

असो.. बर्‍याच दिसांनी मिपावर आलीस याचं खूप बरं वाटलं.. तू सायनला वैद्यकीय शिक्षण घेत असताना मी एकदा तुम्हाला भेटलो होतो ते आठवलं. एकच सांगतो - मला तुझं खूप कौतुक वाटतं, अभिमान वाटतो..

राजाभावजींना प्रणाम..चिरंजिवांना आशीर्वाद.. :)

-- तात्यामामा! :)

रणजित चितळे's picture

13 Mar 2012 - 11:32 am | रणजित चितळे

डिप्रेशन चे मॅनिफेस्टेशन किती प्रकारे होते ते आपण रोज बघत असतो आपल्या जिवनात. आपण दिलेले प्रसंग व अनूभव बरेच काही शिकवून जातात.

सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या लेखा निमित्ताने आपली व आपल्या कार्याची ओळख झाली.

छान वाटले.

जयवी's picture

13 Mar 2012 - 12:09 pm | जयवी

अरे वा...... या निमित्ताने तू पुन्हा लिहिती झालीस.......खूप छान वाटलं :)
तू जे काय करते आहेस ते वाचून तुझं खरंच खूप खूप कौतुक वाटलं. हे असं सगळं करणं सोपं नसतं गं... !!
तुझे अनुभव वाचायला नक्कीच आवडेल.
थोडा वेळ काढ गं आपल्या मिपाकरांसाठी .... जरा जास्तच अपेक्षा करतेय ना... पण मस्त लिहितेस यार तू....... पुन्हा लिहिती हो.
खूप खूप शुभेच्छा !!!!!!!!

विसुनाना's picture

13 Mar 2012 - 12:25 pm | विसुनाना

श्री. ओक यांच्या भानामतीने (म्हणजे भानामतीवरील लिखाणामुळे) तुम्ही लिहायला उद्युक्त झालात आणि आपल्या बहुमोल कार्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली हेही नसे थोडके.
आपल्या कार्यात आपल्याला उत्तरोत्तर अधिकाधिक यश मिळत जावो ही सदिच्छा.

चौकटराजा's picture

13 Mar 2012 - 12:38 pm | चौकटराजा

ओक काका काय करतात् माहितै ? ते पुन्हा पुन्हा धागा काढतात. आणि स्वत: गप्प बसतात . तुम्हावर धाग्याची भानामति झालेली पहातात.
आपल्या हातातील बोक्यावर हात फिरवीत तुमची मजा त्यांच्या कन्सोल वरून पहातात.
काय ओक्काकाका असंच की नाही. ?

इरसाल's picture

13 Mar 2012 - 12:51 pm | इरसाल

जुने ते सोने

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Mar 2012 - 12:53 pm | निनाद मुक्काम प...

लेख आवडला.

आपल्या कार्याविषयी व अनुभवाविषयी अजून वाचायला आवडेल

मा. ओकसाहेबांनी एकाच वेळी साती आणि सहज या दोन गायबांना एका झटक्यात इथे प्रकट केले आहे. या 'स'कारात्मक कार्यासाठी मा. ओकसाहेबांना अनेकनेक धन्यवाद!

गवि's picture

13 Mar 2012 - 1:11 pm | गवि

दोन नव्हे, तीन "स"... :)

साति ताई धन्यवाद तुम्हि करत असलेल्या कामाबद्दल आणि लेख मस्त लिहिला आहेत.

खर तर भानामति हे माणसामध्ये असलेल्या वाईटपणाचा प्रकार आहे.
दुसर्‍याच भल होताना न बघु शकणारे लोक, घरात सासुरवास होणार्‍या स्त्रिया, अभ्यासात कंटाला असणारि मुल, सतत अवहेलना त्रास सोसावा लागणारि लोक हे असले भानामति प्रमाणे चुकिचे प्रकार करतात. खर तर भानामति म्हंजे एक प्रकारे फसवणुकच आहे. आणि हे समोरचे लोक कशाला घाबरतात ह्याचि माहिति घेउनच बरोबर त्याच प्रकारचि भानामति केलि जाते. भानामति काहिहि नसुन एक प्रकारचि हातचलाखिच असते. निव्वळ फसवणुक.

शशिकांत ओक's picture

13 Mar 2012 - 3:14 pm | शशिकांत ओक

मित्र हो,
खालील प्रातिनिधिक प्रतिक्रियांसाठी लेखन

आज ओककाकांचे खरंच आभार मानले पाहिजेत त्यांच्यामुळे इथे मी इतकं लिहिलंय...

ओककाकांच्या लाडक्या भानामतीचा सातत्याने पाठपुरावा करणे मला मनात असूनही शक्य नाही. पण काही इंटरेस्टिंग सापडल्यास...

ओककाका काही चुकीचं म्हणत नाहीयेत गं! पण काय आहे ना त्यांना कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे ...

.

मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्‍या करते”. हे जरासं सार्कॆस्टिक होतं.पण दोन तीन ठिकाणी बघितलं तर ओककाका निष्पापपणे हे खरंच मानून लिहितायत की बघा या भानामतीचं अस्तित्व मान्य करतायत...

ओककाकांचा एक चकार शब्दही नाही...साती

अगं हा आमचा शश्या ओक पक्का शाणा आहे. तो तुला शब्दात पकडायला बघतोय..
इति विखे...

ओक अजुन ह्याच धाग्याचा वापर करुन आपलीच री ओढण्यात कमी करणार नाही....सहज

ओककाकांचा एक चकार शब्दही नाही. >>> आणी ते काढणारही नाहित,,अश्या लोकांचा हे सगळं करण्यामागचा उद्देश स्वच्छ असतो,,,शत्रूच्या गोटात जाऊन कायम गोंधळ उडवणे.

ही मंडळी स्वतः सश्रद्ध,अश्रद्ध,अंधःश्रद्ध वगैरे काहिही नसतात... यांना सर्व काही कळत असतं...वळत तर अतिशय चांगलं असतं...भोळ्या जनतेचा फायदा घ्यायचा आणी हुशार सश्रद्धांना आपलसं करायचं (पुढे राखिव सैन्य म्हणुन वापर करायला) अ.आ.

ओककाकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.... मन1

...

मित्रांनो वरील प्रतिसाद आत्ता वाचले. म्हणून काही प्रातिनिधिक प्रतिसादांवर आत्ताच लगेच विचार व्यक्त करावे असे वाटले.
सातींना मिपावर परत यायला मी कारणीभूत झालो त्याचे धन्यवाद मिळाले.
आपण सरकास्टिकली -उपहासाने – भानामतीच्या केसेस हाताळते असे म्हणत आहात. हे मला जाणवले म्हणून. मी म्हटले होते..
भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार.
म्हणजे ज्या केसेस -उपहासाने म्हणत नसाल तर - भानामतीच्या म्हणून एडमिट होतात त्यांच्या पीडित मानसिक अवस्थांचा तो भाग असतो व त्यावर त्यांना उपचार करून, तो दुरुस्त केला की त्या ठीक होतात. विखेच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याचा वापर केला होता.
आपले म्हणणे सांगायला ओक कशी री ओढतात – भानमतीवर प्राचार्य अद्वयानंद गळतगेंचे अभ्यापुर्णलेखन आहे. खरे तर मला प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ब्लॉगवरील कथन – आता तर त्यांचा विज्ञान आणि बुद्धिवाद पुस्तकाचा नवा ब्लॉग उपलब्ध आहे- काय हे मांडायचे आहे. माझे नाही.
....भानामती याबाबत चिरोटा यांनी डेक्कन हेराल्डची लिंक देऊन त्यावर विचार व्यक्त करावेत म्हटल्यामुळे मी इथे लेखन केले. त्याच्या शेवटच्या भागात टाईम्समधील व आपल्या (सातींच्या) ही केसेसवर खालील भाष्य केले होते
ते असे-
माझा या लेखनातून फक्त शोध कार्य करणारे किती थातुर मातुर शब्दात शास्त्रीय विश्लेषणाची विल्हेवाट लावतात. जरा खोलवर विचार केला तर त्यातील त्रुटी लक्षात याव्यात असा आहे. डॉ. साती म्हणतात तसा कोणी कांगावा करून आपल्याकडे सहानुभूती निर्माण करायला लोक आले असतील. हे मान्य पण सरसकट असे माप लावू नका. शोध घ्या व मग ठरवा.
ते वाचकांना पुरेसे असावे असे वाटून थांबलो होतो. असो....
इथे दोन प्रकारचे लोक आहेत. काहींना अनुभव न येताच थोतांड असे मत ठरवलेले. तर काही सदस्यांवर किंवा त्यांच्या अगदी ओळखीच्यांचे असे विचित्र अनुभव आलेले. ते आपला तो अनुभव ज्यांचा यावर विश्वास नाही अशा लोकांचा वैचारिक रोष पत्करून सांगायला पुढे येतात. जेंव्हा त्या अनुभवांना भानामती-करणी या सारखी संबोधने लावली जातात. ती अमान्य होतात. त्यालाच मेंटल डिसऑर्डर, स्प्लिट पर्सनॅलिटी, अशी इंग्रजीतील शास्त्रीय नावे दिली की त्याच घटनांना मानसिक आजार असे मानून पीडित लोकांचा इलाज करायला हवे असे मानले जाते. साती यांनी खोट्या भानामतीच्या केसेस हाताळल्या आहेत व त्यांचे बिंग बाहेर पाडले त्याबद्दल कौतुक पण म्हणून भानामतीच्या घटना घडतच नाहीत असे सरसकट मानणे कितपत योग्य आहे. यावर विचार व्हावा. असो...
...मला कोणी शत्रूपक्ष नाही. त्यामुळे राखीव सैन्य वगैरे बाळगण्याची फिकीर मला नाही...
आता मला किंवा माझ्याविचारांना इतर लोक शत्रू मानत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे.
सध्या इतकेच.

महेश हतोळकर's picture

13 Mar 2012 - 3:41 pm | महेश हतोळकर

साती यांनी खोट्या भानामतीच्या केसेस हाताळल्या आहेत व त्यांचे बिंग बाहेर पाडले त्याबद्दल कौतुक पण म्हणून भानामतीच्या घटना घडतच नाहीत असे सरसकट मानणे कितपत योग्य आहे. यावर विचार व्हावा. असो...

खरयं
डॉ साती यांनी २-३ दगडांना फटके मारले. ते दगड रडले ओरडले नाही. न रडणारे दगड शोधल्याबद्दल साती यांचे अभिनंदन.
डॉ दाभोळकर यांनी कित्येक दगडांना फटके मारले तेही दगड रडले ओरडले नाही. न रडणारे दगड शोधल्याबद्दल दाभोळकरांचेही अभिनंदन.
पण म्हणून दगड रडतच नाहीत असे सरसकट मानणे कितपत योग्य आहे. यावर विचार व्हावा. असो...

विसोबा खेचर's picture

13 Mar 2012 - 3:48 pm | विसोबा खेचर

डोन्चू वरी शश्या..

आय अ‍ॅम आलवेज विथ यू.. :)

(सातीचा जुना दोस्त असलो तरी तुझाही फ्यॅन) तात्या. :)

तिमा's picture

13 Mar 2012 - 7:43 pm | तिमा

आपण परत इथे येऊन लिहिलंत त्याबद्दल धन्यवाद, त्या भानामतीच्या विषयापेक्षा तुम्ही जे स्तुत्य काम करत आहात त्याचे फार कौतुक आहे.

पैसा's picture

13 Mar 2012 - 7:56 pm | पैसा

मिपावर आल्यासारखं एक तरी सत्कृत्य माझ्या हातून घडलं आणि सातीला परत लिहायला भाग पाडणारा निमित्तमात्र माझा एक प्रतिसाद झाला याचा मनस्वी आनंद आहे! तुझ्या कामाबद्दल थोडीफार कल्पना होतीच पण आता बरेच डिटेल्स सगळ्या मिपाकरांसमोर आले हे फार छान झालं. असे न बोलता कामं करणारे लोक जगातला चांगुलपणा टिकवून ठेवत असतात.तुझ्या कामासाठी शुभेच्छा! तुझं काम वाढेल तसा तिथल्या लोकांना जास्त फायदा होईल हे नक्कीच!

आय सी यु सुरू केलंस हेही छान. राजा भावजीना सरकारी नोकरशाहीतून मार्ग काढायचा म्हणजे कष्टापेक्षाही मनस्ताप जास्त असणार. डॉक्टरला कोणी सांगतं की नाही माहिती नाही, पण दोघांच्याही प्रकृतीची काळजी घे! पुन्हा एकदा शुभेच्छा आणि कधीतरी वेळ मिळाला तर तुझे अनुभव आम्हाला सांगत जा!

तुझी जी सूचना आहे इमेल आयडी वापरून लॉगिन करण्याबद्दल, तिच्याबद्दल नीलकांतकडे आम्ही बोलूच! पाहूया कसं जमतंय ते!

रामदास's picture

13 Mar 2012 - 11:41 pm | रामदास

वाडीतली मुलगी लग्नानंतर बर्‍याच वर्षानी माहेरपणाला आलेली बघीतली की एक अनामिक आनंद होतो तसे आज वाटले .
आज बर्‍याच जुन्या आणि जाणत्यांची उपस्थिती बघून आनंद वाढीस लागला.