नाईट शिफ्ट

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
24 Jan 2012 - 10:58 pm

आयटीमधली नोकरी म्हणजे डोक्याला ताप असतो. आयटीशिवाय असलेल्या व्यक्तिंना तर ही नोकरी म्हणजे स्वर्ग वाटतो. त्यांना असे वाटते की नुसते बसून तर काम असते. अन सोई सुविधा, तगडा पगार आदींबाबत तर फारच मोठे गैरसमज पसरले आहेत. मान्य आहे की इतर इंडस्ट्रीजपेक्षा येथे जास्त पगारपाणी असतो, पण तो काही सर्व आयटी प्रोफेशनल्सला असू शकत नाही, किंवा सर्व प्रोफेशनल्सची कंपनीदेखील जास्त पगार देणारी नसते. अन हा जास्त पगार म्हणजे फुकट असत नाही. त्या बदल्यात कंपन्या कामेदेखील करवून घेतात. सर्व ठिकाणी कामाची परिस्थिती आनंददायक असतेच असे नाही. असो.

असो अशासाठी की माझी गोष्ट भलतीकडेच वाहवत चालली होती. उगाचच आयटी, नॉनआयटी, जास्त पगार, कमी पगार आदींवर चर्चा होवून ती वादात रूपांतरीत व्हायची. म्हणून असो.

तर मंडळी मी तुम्हाला माझी खाजगी गोष्ट सांगत होतो. अहो ही आमची नाईट शिफ्ट हो. फार वैताग असतो नाईट शिफ्ट म्हणजे. तुम्हाला सांगून समजणार नाही. नाईट शिफ्टचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागेल तुम्हाला. अन आयटीमधली नाईट शिफ्ट मेकॅनिकल इंडस्ट्रीजमधल्या नाईट शिफ्टपेक्षा सर्व अर्थाने निराळी असते. कामाची वेळ एकतर दुसर्‍या देशांच्या हिशोबाने तयार केलेली असते. म्हणजे युके शिफ्ट, युएस शिफ्ट असल्या शिफ्ट असतात. म्हणजे इतर लोकं ढाराढूर झोपतात तेव्हा आमच्यातले काही जण भुतासारखे कंपनीच्या गाडीची वाट पाहत चौकात उभे असतात तर आमच्यातले काही लोकं कंपनीच्या गाडीतून गल्लोगल्ली सांडत असतात. काही जण झोपायची तयारी करतात तर काही जण जागण्याची, काही जण जेवणाची (दुपार की रात्र??) तयारी करतात. बरं हे (दुष्ट)चक्र पुन्हा काही दिवसांनी बदलणार असतं हो. म्हणजे एखाद्याची युके शिफ्ट बदलून युएस शिफ्ट होणार असते किंवा एखाद्याची सेकंड शिफ्ट बदलून मॉर्नींग किंवा नाईट शिफ्ट होणार असते. याशिफ्ट बदलाच्या सत्रामुळे घरच्यांकडे (किंवा बाहेरच्यांकडेही!) वेळ देता येत नाही. सगळीकडे वेळेची अ‍ॅडजेस्टमेंट करावी लागते. पुन्हा असो. कारण हा ही विषय माझ्या गोष्टीचा नव्हता.

तर मंडळी, कालपर्यंत गेल्या महिनाभरापासून मी नाईट शिफ्ट करत होतो. बरं आमचा एक प्रोजेक्ट गो लाईव्ह होणार असल्याने जबाबदारीचे काम होते. त्यामुळे खरोखरच्या कामात गुंतलो होतो. शिफ्टच्या वेळेपेक्षा दोन एक तास लवकरच घरातून निघावे लागत होते. कामावरून येण्याची वेळदेखील निश्चित नव्हती. म्हणजे रात्री दहाच्या सुमारास निघून सकाळी साडेसातला कंपनीतून निघावे लागे. कधी कधी कंपनीतून निघण्याचे सकाळचे साडेआठही होत. घरची मंडळी (म्हणजे आमची सौ. हो!) फारच वैतागली होती. एकतर नविनच लग्न झालेले त्यात बंगलूरू सारखे अनोळखी भाषा असलेले शहर. घरातली तशी कामे काही नव्हती पण मुख्य कारण म्हणजे माझी सोबत तिला मिळत नव्हती. आता नविनच लग्न झालेल्या जोडप्याला विरह अन त्यातही रात्रीचा एकटेपणा म्हणजे काय असेल याचा ज्याने त्याने आपआपल्या अनुभवावरून विचार करावा. तिची मानसिक स्थिती मला समजत होती पण मी तरी काय करू शकत होतो. काहीतरी टाईमपास व्हावा आणि तिच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून दोन एक ठिकाणी सांगितलेही होते. पण आता लगेचच काही तिच्या नोकरीचे काम होणार नव्हते. नाही म्हणायला ती कलाकुसरीची कामे घरातच करत होती. शिवणकामात तर एखाद्या फॅशन डिझायनरच्या तोंडात मारावी अशी कला तिच्या हातात होती. तिचे पंजाबी ड्रेसेस, ब्लाऊजेस, बाजूच्या लहान मुलांचे कपडे ती हौसेखातर घरी दिवसभर शिवत बसे. पण कदाचित रात्री एकटी ती वैतागत असावी.

कारण गेल्या पंधरा एक दिवसापासून तिची घरातली धुसफुस वाढली होती. माझ्या नाईट शिफ्टच्या वेळेचे अन ती कधी बदलेल याची काही शक्यता नव्हती. बरे, नाईट करून मी शारिरीक अन मानसिक थकलेलो असल्याने दुसर्‍या दिवशी दिवसभर काहीच 'कामाचा' रहायचो नाही. एकदोन वेळा तिने शिलाई मशीन चालवली पण आवाज होतो म्हणून मी तिला ती मशीन बंद करायला लावली. मला डिस्टर्बन्स नको म्हणून टिव्ही देखील ती म्युट करून पहायची. मलाही पुर्ण दिवस झोपून काढावा लागायचा इतका शारिरीक थकवा आलेला असायचा. काही काम नाही की कोठे फिरणे नाही. बहूदा त्यामुळेच ती वैतागली असावी असा मी समज झाला.

आता कालचीच गोष्ट. मी सकाळी घरी साडेआठला पोहोचलो. रात्री आमचा प्रोजेक्ट संपल्याने मला मोकळीक मिळाली होती आणि पुढच्या पंधरवड्यात माझी शिफ्ट बदलून फार क्वचित मिळणारी जनरल शिफ्ट झाली होती. कामाचा ताण कमी करण्यासाठी मी शनिवार रविवार जोडून तीन दिवस रजादेखील मंजूर करून घेतली होती. आज जरा खुशीतच सकाळी घरी आलो. आल्याआल्या बायकोला चहा करण्यासा सांगितले. जनरली नाईट करून आल्यानंतर झोप उडू नये म्हणून मी चहा कधीच घेत नसे. आज मात्र मी चक्क चहा टाकण्यास सांगितले. आता दिवसा झोप घेण्याची गरज नव्हती. मस्तपैकी नविन लग्न झालेल्या जोडप्याचे फुलपांखरी दिवस (अन रात्रीही!) अनुभवता येईल असा माझ्या मनात विश्वास आला होता. मन आनंदाने उचंबळत होते.

"अग, एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला", चहा घेतल्यानंतर मी तिला बोललो.

"काय?" तिने थोड्या नाराजीनेच पण चेहेर्‍यावर तसा भाव न दाखवता विचारले.

"अगं, माझी नाईट शिफ्ट आज संपली. आता चारएक दिवस चांगली विश्रांती घेवून मग दिवसाच्या शिफ्टमध्ये कामावर जाणार आहे", मी मनातले मांडे मनात खात मोठ्या आनंदाने चित्कारलो.

"काय!" ती पण आनंदाने मोठ्या आवाजात उद्गारली.

माझ्या मनात जे काही रंगीत संगीत विचार येत होते तसलेच विचार तिच्याही मनात असावेत हे समजून माझ्या मनाला अगदी बरे वाटले. माझ्य मन आनंदाने उचंबळून आले. एखादा जलप्रपात जलाने ओतप्रोत भरून जसा वाहवेल अन कड्यांवरून कोसळत नदीच्या मिलनाकडे धावेल तसे माझे मन त्याच विचारांच्या दिशेने धावू लागले. (प्रसिध्द लेखकांसारखे किंवा कविंसारखे असलेच हळूवार, तरल विचार माझ्या मनी उमटू लागले. पण मी काही लेखक किंवा कवी नाही.)

"खरंच तुलाही आनंद झालाय?" मी साध्या सरळ माणसासारखा अ-साहित्यीक प्रश्न तिला विचारला.

"खुप बरं वाटलं मला...."

ती पुढे काय बोलते ते ऐकण्यासाठी माझे प्राण कानाशी आले.

".... बरं झालं तुमची नाईट शिफ्ट संपली ते. फार वैतागले होते मी त्या नाईट शिफ्टला. दिवसभर तुमची झोप झोप. काम नाही की काही नाही. माझी घरातली कामे किती अडली होती. आता मी मनमोकळेपणे शिलाई मशीन चालवू शकेल. माझ्या चार नव्या साड्यांवरचे ब्लाउजेस शिवायचे बाकी आहेत. शेजारचे दोन तिन कपडेही शिवायचे आहेत. झालंच तर घरातली भांडी डबे पण धुवायचे आहेत. सगळी कामे आवराआवर करायची आहेत मला. बरं झालं ते तुमची नाईट शिफ्ट संपली ते."

तिचे ते बोलणे ऐकून माझ्या मनातला निर्झर पावसाळा संपल्यानंतर लगेचच हिवाळ्याच्या सुरूवातीलाच सुकावा तसा सुकला हे काय मी तुम्हाला सांगावं का?

डिस्क्लेमर: कथेतील व्यक्ती, घटना, प्रसंग, ठिकाण लेखकाचे असतीलच असे नाही. त्या घटना, प्रसंग, ठिकाणांत तुम्ही स्वत: त्यातील पात्र असल्याचीही कल्पना करू शकतात.

कथाविनोदनोकरीजीवनमानतंत्रआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

24 Jan 2012 - 11:13 pm | प्रचेतस

मस्त हो पाभे.
लै झकास लिवलंय.
बर्‍याच दिवसांनी तुमचा लेख पाहून मजा आली.
(लेख रात्री आलाय म्हणजे आता तर तुमची नाईट शिफ्ट नाही ना? काय आहे, आयटीतले लोक हापिसच्याच बँडविड्थ जाळत असतात ) ;)

व्यनितला जोक आठवला का ?

प्रचेतस's picture

26 Jan 2012 - 11:16 am | प्रचेतस

:)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2012 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा व्वा..! पा.भे. त्वाडा जव्वाब नही यार...!

पुन्हा एका जिवंत लेखनाची प्रचिती आली....!जश्या कविता मनाला सुप्रसन्न करणार्‍या,तसाच लेखही...!

चेतनकुलकर्णी_85's picture

25 Jan 2012 - 12:07 am | चेतनकुलकर्णी_85

आयटीशिवाय असलेल्या व्यक्तिंना तर ही नोकरी म्हणजे स्वर्ग वाटतो

कोणत्या आधारावर ???

मोदक's picture

25 Jan 2012 - 1:29 am | मोदक

तुझी सही वाचून एका जालीय दंगलीची आठवण झाली.. :-D

http://misalpav.com/node/13469

मोदक

शिल्पा ब's picture

25 Jan 2012 - 12:54 am | शिल्पा ब

आवडलं.

कौशी's picture

25 Jan 2012 - 2:12 am | कौशी

आवडला

प्रभाकर पेठकर's picture

25 Jan 2012 - 2:33 am | प्रभाकर पेठकर

अरसिकतेचा फटका कोणालाही, केव्हाही, कुठेही बसू शकतो.

८४ साली मधुचंद्रासाठी मुंबईहून थेट काश्मिरला विमानाने गेलो होतो.

श्रीनगर विमानतळावर उतरलो तर अगदी मे महिन्यातही भरपुर थंडी होती.
मी सौ.ला म्हणालो,' काय मस्त थंडी आहे'.
त्यावर सौ. उद्गारली,' आमच्या चिपळूणलाही अशीच थंडी असते.'

माझे विमानप्रवासाच्या तिकिटाचे सर्व पैसे पाण्यात बुडालेले ह्याची देही, ह्याची डोळा मला दिसले. असो.

प्यारे१'s picture

25 Jan 2012 - 10:22 am | प्यारे१

पोपट, पोपट म्हणतात तो हाच का काका? ;)
ह. घ्या. :)
स्वगतः (आयला, स्वगत आहे तर ते स्वच- गत असणार ना ? ;) समजून घ्या. ;)

प्रभाकर पेठकर's picture

25 Jan 2012 - 12:47 pm | प्रभाकर पेठकर

हनिमुनच्या वाटेवरच पोपट व्हावा हा केवढा दैवदुर्विलास! आयुष्यात विसरणार नाही.

बायकोला खुश करण्यासाठी मुद्दाम विमानाचे तिकिट काढले, काश्मिरसारखे पर्यटनस्थळ निवडले, खर्चाकडे पाहिले नाही पण सौंच्या उद्गारांनंतर सगळ्यात पहिल्यांदा जाणवले मुंबई-चिपळूण एस्टी भाडे, माणशी रुपये १७ फक्त . चिपळूणला घर आपलेच. किती स्वस्तात झाला असता हनिमुन. असो.

तेवढ्या एका वाक्या नंतरचे १० दिवस मात्र अविस्मरणीय होते.

मराठमोळा's picture

25 Jan 2012 - 4:54 am | मराठमोळा

मस्तच हो पाभे.
जमलयं मस्त. :)

अजून येऊ द्या.

पहिले दोन परिच्छेद जवळपास सगळ्याच आयटीवाल्यांसाठी आयुष्याचा भाग आहेत.
वटवाघुळा सारखे रात्री कामावर यायचे आणि प्रचंड तणावात काम करत रहायचे... :(
जाउंदे यावर जास्त चर्वण करत नाही...शिफ्ट आणि प्रचंड तणाव हा आयटीवाल्यांचा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
बाकी लेख आवडला आहे,हे वेगळे सांगायला नको ! ;)

जाता-जाता:- हिंदुस्थानात आयटी युनीयन जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हा अनेकांचे हाल संपतील अशी आशा वाटते.
थोडक्यात... आयटीवाल्यांसाठी युनियन झालीच पाहिजे !

उदय के'सागर's picture

25 Jan 2012 - 9:51 am | उदय के'सागर

अगदी वास्तव! :)

छान लिहीलंय, नेहमीप्रमाणे...

सुहास..'s picture

25 Jan 2012 - 10:01 am | सुहास..

टिपीकल पाभे !!

मस्त लेख रे सचीन

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Jan 2012 - 11:24 am | मिसळलेला काव्यप्रेमी

एकदम रिफ्रेशींग लिखाण!!

मन१'s picture

25 Jan 2012 - 11:31 am | मन१

:)

स्वातीविशु's picture

25 Jan 2012 - 11:49 am | स्वातीविशु

लै झ्याक....

पोपट (सोरी....लेख) आवड्ला.

बज्जु's picture

25 Jan 2012 - 12:00 pm | बज्जु

पा.भें.शी १०१ ट्क्के सहमत. या कंटाळवाण्या नाईट शिफ्टचा अनुभव मी सुध्दा काही महीने घेतला आहे (ऑस्ट्रेलीयन शीफ्ट बी.पी.ओ.). रात्री २.३०-३.०० ला घरी यायचो, तेव्हा पा.भे. म्हणतात त्या प्रमाणे पहिल्या शिफ्ट्चे लोक्स खरोखरच भुतासारखे कोप-या-कोप-यात उभे असायचे. बाकी लेख नेहमीप्रमाणेच सुरेख.

गणेशा's picture

25 Jan 2012 - 12:23 pm | गणेशा

लेख जबरी

यकु's picture

25 Jan 2012 - 12:40 pm | यकु

मस्त!
मजा आली पाभे..

विनायक प्रभू's picture

25 Jan 2012 - 12:45 pm | विनायक प्रभू

छान लेख.
असो.
पाभे,
बाहेरच्याना वेळ देउ नका.
म्हणजे घरी वेळ जास्त देता येइल.
नाही का?

मोहनराव's picture

25 Jan 2012 - 2:03 pm | मोहनराव

छान लेख. जियो.

विजुभाऊ's picture

25 Jan 2012 - 2:26 pm | विजुभाऊ

तरी खूप बरे आहे.
जगात वर्क फ्रॉम होम ऑप्शन इतकं वैट्ट काहीच नसते.
मला ती फॅसिलीटी उपलब्ध आहे. पहिला दिवस घरूनच काम करणार म्हणून कौतूक होते.
मी तीनदा चहा मागितला/तिची आवडती टीव्ही मालीका बंद करायला सांगितली. मधूनच अवेळी अचरबचर खाऊन झाले.
असे तीन चार दिवस झाल्या नंतर तिने घर आवरायला काढले. या खोलीतली कपाटी त्या खोलीत सरकवयाला घेतली.
सोफासेट हलवला. पुस्तकाचे कपाट साफ करून घेतले. अर्थात मी घरात तिच्या मदतीला होतोच
पाचव्या दिवशी या वर्क फॉर होम ला घाबरून मी हापिसात बस्तान हलवले.

सुहास झेले's picture

25 Jan 2012 - 2:30 pm | सुहास झेले

लई भारी.... मस्त लेख पाभे !!

अवांतर - गेले ४ वर्ष अविरत नाईट शिफ्ट करतोय..... :( :(

राजा रात्रपाळी आयटीमध्ये कुणाला चुकली आहे रे. मला सताड नाईट शिफ्ट नाही, पण भिरभिरत्या शिफ्ट आहेत. त्यात एक ना धड भाराभार चिंध्या अशी माझी गत झाली आहे.

- (शिफ्टने त्रासलेला) पिंगू

सुहास झेले's picture

25 Jan 2012 - 5:19 pm | सुहास झेले

हा हा हा .. खरंय. माझी पण तर शिफ्ट दर दोन आठवड्यांनी बदलते.

वैताग आहे वैताग :( :(

बाकी पाभे, लेख मात्र जबरा आहे..

- (आयटीवाला) पिंगू

मूकवाचक's picture

25 Jan 2012 - 2:57 pm | मूकवाचक

मस्त लेख पाभे !!

दिपक's picture

25 Jan 2012 - 3:07 pm | दिपक

हा हा हा क्लास लेख दफोराव. कथानायकाला नाईट शिफ्टच घ्यायला सांगा नाहितर रात्री शिलाई मशीन चालवावी लागेल :-)

भेद जातो ;-)

drac

मराठी_माणूस's picture

25 Jan 2012 - 10:26 pm | मराठी_माणूस

जेंव्हा संगणक क्षेत्राला आय टी न म्हणता डेटा प्रोसेसिंग म्हणायचे तेंव्हाही नाइट शिफ्ट असायची.

कलंत्री's picture

26 Jan 2012 - 12:23 am | कलंत्री

आमच्याही कंपनीत ४ /५ महिन्यात एकदा ड्युटी ऑफिसर म्हणून एकदा काम करावे लागते. रात्री १ ११/२ नंतर रात्र संपता संपत नाही. पहिल्या दिवशी सांय ७ ते दुसर्‍यादिवशी सकाळी सात पर्यंत थांबावे लागते. अधूनमधून कंपनीत चकरा ( रॉउंड ) मारावे लागतात.

दुसर्‍यादिवशी दिवसभर झोपल्याने शरीराची अगदी दैना होते.

पहिल्या दिवशी आणि दुसर्‍या दिवशी सुट्टी मिळते.

अरे हो, आज माझी रात्र पाळी आहे.

पैसा's picture

26 Jan 2012 - 10:07 am | पैसा

पेठकर काकांनी ही कथा नाही तर सत्यकथा आहे हे स्वानुभवाने सांगितलं आहेच!

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2012 - 1:27 pm | प्रभाकर पेठकर

ही कथाही नाही अन सत्यकथाही नाही. ही खोल मनातील व्यथा आहे.