पं यशवंतबुवा महाले, एक आभाळाइतका मोठा माणूस!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
10 Jun 2008 - 6:17 pm

"अरे तू येणार होतास ना? कधी येणार आहेस? अरे किती रे वाट पाहयची तुझी! एकदा घरी येऊन माझ्या तंबोर्‍यांच्या जवारीचं काम तेवढं कर की रे जरा!"

"हो महालेसाहेब. आता एकदा नक्की येतो, जमवतो!"

महालेसाहेबांच्यात आणि माझ्यात फोनवर असा संवाद अनेकदा झाला आहे. त्यांचा फोन आला की मलाच अपराधी वाटतं आणि कामांची सगळी गडबड बाजूला सारून महालेसाहेबांकडे आता अगदी नक्की जायचंच, असं मी ठरवतो!

पं यशवंतबुवा महाले. गाण्यातला एक मोठा माणूस! परंतु हे नांव अगदी सर्वांनाच माहिती नाही.

"आमच्यासारख्यांना गाण्यात थोडंफार नांव मिळालं, चार लोकं आम्हाला ओळखतात परंतु संगीतक्षेत्रात अशीही अनेक माणसं आहेत की जी फारशी प्रसिद्ध नाहीत परंतु त्यांच कामही खूप मोठं आहे!" असं भीमण्णा एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते तेव्हा मला आमच्या महालेसाहेबांचीच आठवण झाली होती!

संगीतक्षेत्रात सर्वात महत्वाचं असतं ते शिक्षण! गुरूसमोर बसून घेतलेली तालीम! महालेसाहेबांना आग्रा गायकीची अगदी भरपूर तालीम मिळाली आहे. जवळ जवळ ३० वर्षांपेक्षही जास्त! लेलेसाहेब, नातूबुवा, अण्णासाहेब रातंजनकर, आणि गिंडेबुवा या चार दिग्गजांनी महालेसाहेबांना अक्षरश: घडवलं आहे, संगीतातील अगदी अत्त्युत्तम विद्या देऊन विभूषित केलं आहे. त्या व्यतिरिक्त अनेक बुजुर्गांचं गाणं महालेसाहेबांनी एका शिष्याच्या भूमिकेतून ऐकलं आहे, त्यातले बारकावे अभ्यासले आहेत. संगीताच्या शिक्षणात गुरूसमोर बसून तालीम घेण्याला जेवढं महत्व, तेवढंच महत्व श्रवणभक्तिला आहे. आणि महालेसाहेबांनी केलेली श्रवणभक्ती ही केवळ एका रसिकाची नसून एका विद्यार्थ्याची आहे. पं एस सी आर भटसाहेब, पं दिनकरराव कायकिणी यांचाही गुरुसमान स्नेह महालेसाहेबांना लाभला. आज महालेसाहेब स्वत:च एका विद्वानाच्या, एका तपस्व्याच्या पदाला पोहोचले आहेत. पं विष्णू नारायण भातखंड्यांची वैभवशाली आग्रा परंपरा आज त्यांच्या पाठीशी उभी आहे, त्यांच्यावर प्रसन्न आहे!

महालेसाहेबांना इतकी उत्तम तालीम मिळाली होती की त्या आधारावर ते अगदी सहज पर्फॉर्मिंग आर्टिस्ट होऊ शकले असते. तशी संधीही त्यांच्या आयुष्यात अनेकदा आली. परंतु आपण पर्फॉर्मिंग आर्टिस्ट न होता संगीतशिक्षण, विद्यादान इत्यादी बाबतीतच काम करायचं असं त्यांनी ठरवलं व हा माणूस मैफलींच्या राज्यापासून तसा दूरच राहिला. हा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घेतला होता. प्रत्येक रागाचा सखोल अभ्यास करणे, त्यातील विविध बंदिशींचा अभ्यास करणे यातच त्यांचे मन रमले. गाण्याचं सातत्याने केलेलं चिंतन, मनन यातून महालेसाहेबांची विद्वत्ता आभाळाइतकी मोठी होत गेली!

आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातली आग्रा गायकी ही एकापेक्षा एक सुरेख आणि वैविध्यपूर्ण बंदिशींकरता प्रसिद्ध आहे. 'हम राग नही, बंदिश गाते है' असंच आग्रावाले गवई नेहमी अभिमानाने म्हणतात. एखादा राग ते बंदिशीच्या अंगानेच फुलवतात. बंदिशीच्या अंगाने, तिच्या शब्दाप्रमाणे, बोलाच्या अंगाने, तिच्या अर्थाप्रमाणे राग फुलवला जाणार्‍या आग्रा गायकीचा ढंग काही औरच! आणि त्याच आग्रा गायकीची अनेक वर्ष तालीम मिळाल्यामुळे महालेसाहेबांची नानाविविध बंदिशींवर हुकुमत नसती तरच नवल होतं! खरंच मंडळी, आमचे महालेसाहेब म्हणजे बंदिशींचा एक चालताबोलता खजिनाच आहेत! किती किती म्हणून बंदिशी त्यांना माहीत असाव्यात, मुखोद्गत असाव्यात त्याची काही गणनाच नाही. आणि यातली प्रत्येक बंदिश हा माणूस तिच्या ढंगाप्रमाणे, तिच्या बोलाप्रमाणे, अर्थाप्रमाणे गाऊ शकतो, मांडू शकतो, शिकवू शकतो! आजपर्यंत अक्षरश: अनेक लहानमोठ्या गायकांना महालेसाहेबांनी किती विविध बंदिशी सांगितल्या आहेत, शिकवल्या आहेत! अगदी आजही डॉ राम देशपांडे, वरदा गोडबोले यांच्यासारखे तरूण पिढीतले आघाडीचे कलाकार महालेसाहेबांकडे शिकत आहेत, तालीम घेत आहेत! स्वत: महालेसाहेबांनीही अतिशय सुरेख रचना करून काही बंदिशी बांधल्या आहेत!

आचार्य श्रीकृष्ण नारायण रातंजनकर तथा अण्णासाहेब रातंजनकर! संगीत क्षेत्रात हे नांव किती मोठं आहे हे मी समजावून सांगायची गरज नाही. हा एखाद्या ग्रंथराजाचा विषय आहे, पीएचडीचा विषय आहे. आज काही मंडळी अण्णासाहेबांच्या गायकीवर, त्यांच्या बंदिशींवर डॉक्टरेट करतही आहेत. अण्णासाहेबांसारखा गुरू महालेसाहेबांना लाभला हे त्यांचं भाग्य! आणि अण्णासाहेबांनाही अगदी कृतकृत्य वाटावं असा महालेसाहेबांसारखा शिष्य! आपल्याला खरंच सांगतो मंडळी, महालेसाहेबांची निरलस गुरुभक्ति पाहून अक्षरश: थक्क व्हायला होतं! गुरुवर एवढी अफाट श्रद्धा की त्या श्रद्धेपुढेच नतमस्तक व्हावं! आजपर्यंत मी महालेसाहेबांच्या घरी अनेकदा गेलो आहे. त्यांच्या बोलण्यात फार फार तर पाच मिनिटांच्याच अवधीने (पाच मिनिटं जरा जास्तच झाली!) अण्णासाहेबांचं नांव आलं नाही असं मला तरी आठवत नाही. तुकोबाच्या तोंडी जसं विठोबाचं नांव, तुकोबाची विठोबाबद्दलची जी भक्ति, अगदी तीच भक्ति महालेसाहेबांची अण्णासाहेबांकरता आहे. यात जराही अतिशोयोक्ति नाही!

महालेसाहेबांकडे पीएचडीची पदवी नाही इतकंच, परंतु अण्णासाहेबांची गायकी, त्यांच्या बंदिशी, त्यांची ग्रंथसंपदा, त्यात लिहिलेली ओळन् ओळ, त्यांचे सांगितिक विचार हे महालेसाहेबांना अक्षरश: मुखोद्गत आहेत! खूप मोठा कलावधी त्यांनी अण्णासाहेबांसोबत घालवला आहे, त्यांच्यासोबत प्रवास केला आहे. महालेसाहेब म्हणजे आचार्य अण्णासाहेब रातंजनकर यांच्यावरचा एक चालताबोलता संदर्भग्रंथच आहेत. आज अण्णासाहेबांवर अभ्यास करणारी मंडळी, त्यांच्यावर पीएचडी करणारी मंडळी महालेसाहेबांकडेच संदर्भासाठी येतात! अण्णासाहेबांविषयी कुणीही, कुठलीही माहिती कधीही विचारो, महालेसाहेब त्याचं क्षणात उत्तर देणार! आपल्या बोलण्याला आधार म्हणून लगेच दहा पुस्तकातले लिखित संदर्भ दाखवणार! अण्णासाहेबांच्या पश्चात अण्णांचेच ज्येष्ठ शिष्य पं के जी गिडे यांची महालेसाहेबांना अनेक वर्ष तालीम मिळाली. महालेसाहेबांची जी भक्ति अण्णासाहेबांच्या ठायी, तीच गिंडेबुवांच्या ठायी! पण अश्या गुरुभक्तिमुळेच महालेसाहेब अधिकाधिक मोठे होत गेले, संगीतविद्या त्यांच्यावर प्रसन्न झाली!

कुणीही, कधीही, गाण्यातली एखादी अडचण, एखादी शंका घेऊन महालेसाहेबांकडे जावं, एखाद्या बंदिशीबदल, रागस्वरुपाबद्दल त्यांना विचारावं, महालेसाहेब हसतमुखाने त्याचं स्वागतच करणार! घरी आलेल्या व्यक्तिला, शिष्याला किती देऊ अन् किती नको असं त्यांना होतं आणि हातचं काहीही राखून न ठेवता अत्यंत प्रेमाने, हौशीने व तेवढ्याच उदार अंत:करणाने शिकवणार, दोन्ही हातांनी विद्या वाटणार! शिष्यांवर भरभरून पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणार!

हा माणूस जेवढा प्रकांडपंडित आहे, विद्वान आहे तेवढाच तो स्वभावानेही अगदी साधा, निगर्वी आहे! इतका निष्पाप, निरलस, सज्जन, देवभोळा, गुरुभक्तिने अंत:करण ओतप्रोत भरलेला प्रकांडपंडित विद्वान फार क्वचितच पाहायला मिळतो. मला महालेसाहेब लाभले, त्यांचा स्नेह लाभला हे मी माझं भाग्य समजतो. कधीही महाले साहेबाकडे जावं, चारसहा तास कसे जातात ते कळतच नाही. महालेसाहेब खूप भरभरून बोलत असतात, गाण्यातल्या, रागातल्या, बंदिशीतल्या कितीतरी खाचाखोचा, सौंदर्यस्थळं समजावत असतात, गाऊन दाखवत असतात! महालेसाहेब ही माझ्या आयुष्यातली एक फार फार मोठी श्रीमंती आहे!

संगीत साधनेसोबत महालेसाहेबांनी भारतीय आयुर्विमा महामंडळात आयुष्यभर नौकरी केली आणि अधिकारी पदवरून निवृत्त झाले. आज वयाच्या ७४ व्या वर्षीही महालेसाहेबांचा उत्साह हा तरुणांना लाजवणारा आहे. सतत काहितरी काम करणे, बंदिशींचा अभ्यास करणे, विद्यादान करणे, विविध ठिकाणी जाऊन लेकडेमोचे कार्यक्रम करणे, भरदुपारी बोरिवलीहून टळटळीत उन्हात घरी ताणून न देता रातंजनकर फौंडेशनचं काम करण्याकरता मुंबईला जाणे, स्वामी वल्लभदास यांनी स्थापन केलेल्या सायनच्या वल्लभ संगीत विद्यालयात काही कामाकरता जाणे, असं ते आजही करत असतात! खरंच, संगीताकरता त्यांचा उत्साह, त्यांची तळमळ पाहून नतमस्तक व्हायला होतं!

आणि महालेकाकू? अरे क्या बात है! आमच्या महालेकाकू म्हणजे काय विचारता महाराजा! त्यांनाही पं वसंतराव कुलकर्ण्यांची उत्तम तालीम मिळाली आहे. त्याही अगदी उत्तम गात असत. त्यांची गाण्यातली समज आणि जाणकारी ही थक्क करणारी आहे. ही बाई साक्षात अन्नपूर्णा आहे. घरी आल्यागेलेल्या प्रत्येकाला महालेकाकूंच्या उत्कृष्ट पाकशैलीचा अनुभव मिळाला नाही असं कधी झालं नाही. आमच्या महालेकाकूंच्या हातचा साधा आमटीभात अन् बटाट्याची भाजी खावी, जीव तृप्त होतो! आणि प्रत्येकवेळेला मला नेहमी म्हणणार, अरे आता पुन्हा ये रे. मस्तपैकी सुरमई तळेन आणि सुरमईची आमटीही करेन. मंडळी, मासळीचा स्वैपाक काय सुंदर करतात आमच्या महालेकाकू! मी त्यांच्या हातची मासळी अगदी स्वर्गीय आनंद घेत घेत खाल्ली आहे आणि तृप्त झालो आहे!

असो, पं यशवंतबुवा महाले हा विषय वाटतो तितका सोपा नाही. खूप मोठा माणूस! अगदी आभाळाइतका! बरेच दिवस त्यांच्याबद्दल चार शब्द लिहिण्याचे मनात होते, आज योग आला!

संगीतावर, मासळीवर आणि माणसांवर भरभरून प्रेम करणार्‍या भाईकाकांचा पुण्यस्मरण दिन हा परवाच येतो आहे. माझ्या गणगोतातल्या महालेसाहेब आणि महालेकाकू यांच्यावरच्या चार ओळी मी भाईकाकांना समर्पित करत आहे. महालेसाहेबांबद्दल वाचून भाईकाकांना निश्चितच आनंद होईल याची मला खात्री आहे!

-- तात्या अभ्यंकर.

हे आमचे महालेसाहेब!

हे महालेसाहेबांचं देवघर! डावीकडून अष्टविनायक, अण्णासाहेब रातंजनकर, सरस्वती, गिंडेबुवा, आणि स्वामी वल्लभदास!

महालेसाहेब आणि महालेकाकू. एक कृतार्थ जीवन!

तात्या आणि त्याचं गणगोत! महालेसाहेब आणि महालेकाकूंसारख्यांचं प्रेम लाभायला भाग्य लागतं!

असो..!

संगीतवाङ्मयसद्भावनाअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

लडदू's picture

10 Jun 2008 - 6:24 pm | लडदू

असो.
================================
खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!

नीलकांत's picture

10 Jun 2008 - 6:25 pm | नीलकांत

वाह तात्या,
अश्या कधी न ऐकलेल्या साधकांबद्दल वाचायला आवडतं बुवा.
संगीतातलं काहीही कळत नसलं तरी या लोकांच्या साधनेबद्दल नेहमीच कुतुहल वाटत आलेलं आहे.

नीलकांत

चित्रा's picture

10 Jun 2008 - 6:51 pm | चित्रा

असेच म्हणते..
वाचून एका नव्या व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली.
घरगुती प्रकाशचित्रे सुरेख. एकदम आवडली.

सहज's picture

10 Jun 2008 - 10:15 pm | सहज

एका भारतीय संगीतातील एका मोठ्या शिलेदाराची सचित्र ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

धनंजय's picture

11 Jun 2008 - 12:55 am | धनंजय

धन्यवाद

ईश्वरी's picture

10 Jun 2008 - 10:46 pm | ईश्वरी

>>वाचून एका नव्या व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली.
घरगुती प्रकाशचित्रे सुरेख. एकदम आवडली.

मीही हेच म्हणते. नव्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आवडली. धन्यवाद तात्या.
ईश्वरी

ध्रुव's picture

11 Jun 2008 - 12:17 pm | ध्रुव

सुरेख ओळख. अजूनही अश्या आमच्यासारख्यांना माहित नसलेल्या लोकांची ओळख करुन द्या!!

--
ध्रुव

प्राजु's picture

10 Jun 2008 - 6:41 pm | प्राजु

आता वर वर वाचला आहे.
थोडि गडबडीत आहे. नीट वाचून सविस्तर प्रतिक्रीया देईन..
फोटो मात्र खास आहेत...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रशांतकवळे's picture

10 Jun 2008 - 6:43 pm | प्रशांतकवळे

तात्या,

तुम्ही काय पुण्य केलंत हो.. असा थोर लोकांचा सहवास आपल्याला लाभतोय..

आपल्या पोतडीतून अजून येऊद्या!

प्रशांत.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2008 - 6:49 pm | बिपिन कार्यकर्ते

:)

लेख आवडला हे वे.सां.न.ल.

बिपिन.

प्रमोद देव's picture

10 Jun 2008 - 6:57 pm | प्रमोद देव

महालेबुवांची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
तात्या जमल्यास त्यांचे गायनही ऐकवाल काय?

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jun 2008 - 9:03 pm | llपुण्याचे पेशवेll

भारतीय संगीत खरोखर जगवले आहे ते अशा तपस्व्यांनीच. महालेबुवांना साष्टांग दंडवत.
पुण्याचे पेशवे

यशोधरा's picture

10 Jun 2008 - 10:41 pm | यशोधरा

आवडला लेख. खरच तात्या, नशिबवान आहात तुम्ही, एवढया जाणत्या लोकांचा सहवास तुम्हांला मिळतोय!

मुक्तसुनीत's picture

10 Jun 2008 - 10:46 pm | मुक्तसुनीत

तात्यांनी सर्व अर्थाने ज्याना मोठे म्हणावे अशा लोकांना खूप जवळून पाहिले आहे आणि त्यांच्यातील मोठेपणाचे सुंदर दर्शन आम्हाला घडविले आहे.

चतुरंग's picture

10 Jun 2008 - 11:05 pm | चतुरंग

वर्तमानपत्रात कधी कधी वाचलेले उल्लेख आठवले पण त्यापलीकडे काहीच माहिती नव्हती.

तात्या, आपले सांगीतिक गणगोत थोर आहे त्यातल्या एकेक हिर्‍याची ओळख करुन द्या. भारतीय संगीतातले हे हिरे निदान अशा मार्गाने तरी आम्हाला माहीत होतील.
बुवांच्या संगीताचा एखादा दुवा ऐकवता आला तर बहार येईल!

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2008 - 11:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिजात भारतीय संगीत जगणा-या माणसांची ओळख आपण आम्हाला करुन दिली त्याबद्दल आपले आभार !!!

"आमच्यासारख्यांना गाण्यात थोडंफार नांव मिळालं, चार लोकं आम्हाला ओळखतात परंतु संगीतक्षेत्रात अशीही अनेक माणसं आहेत की जी फारशी प्रसिद्ध नाहीत परंतु त्यांच कामही खूप मोठं आहे!"

खरच आहे, संगीत क्षेत्रात अनेक मोठी माणसं असतील ज्यांची आम्हालाच काय अनेकांनाही माहिती नसेल, पण या कलेचे उपासकांशी आपला असलेला स्नेह लेखनात भरभरुन वाचायला कोणालाही आवडणारा असाच आहे, आज आपण अशाच एका संगीत क्षेत्रातल्या मनानेही मोठ्या असणा-या माणसाचा, महालेसाहेबांचा परिचय करुन दिला. आम्ही आपले आभारी आहोत !!!

फोटोही झकास आहेत, शेवटचा तर एकदम सही !!!

-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
( तात्याच्या लेखनाचा फॅन )

प्रियाली's picture

11 Jun 2008 - 1:11 am | प्रियाली

तुम्हाला भेटणारी माणसं खरंच एवढी चांगली असतात की तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका स्वच्छ असतो ते मला कळलेले नाही. मात्र हा ही लेख सुरेख झाला आहे.

असो, आमच्यावर कृपादृष्टी राहो. ;)

विसोबा खेचर's picture

11 Jun 2008 - 6:39 am | विसोबा खेचर

तुम्हाला भेटणारी माणसं खरंच एवढी चांगली असतात की तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन इतका स्वच्छ असतो ते मला कळलेले नाही.

नाही, समोरच्या माणसाप्रमाणे मी माझा दृष्टीकोन ठेवतो. तो चांगला तर मी त्याच्याकरता लाख चांगला, तो वाईट तर मग माझ्यासारखाही दुसरा वाईट कुणी नाही..! :)

परंतु महालेसाहेबांसारखी काही काही माणसं खरंच खूप चांगली असतात.

असो, आमच्यावर कृपादृष्टी राहो.

आरे बास काय! तुझ्यावर तर साला आपली कृपादृष्टी आहेच. उलट तुझीच किर्पा माझ्यावर र्‍हाऊ दे असं मी म्हणेन!

एकदा मुंबईत भेट. समर्थ भोजनालयात खादाडी करू. आजपर्यंतची तुझी आंतरजालीय वाटचाल पाहून/वाचून तसं तुझं बरचसं व्यक्तिचित्र मनात तयार आहेच, तरी पण एकदा प्रत्यक्ष भेट. तू अमेरिकेत परत गेल्या गेल्या तुझं एक झकास व्यक्तिचित्र तुला मिपावर वाचायला मिळेल! :)

आपल्या समर्थ ट्रीपचे मस्तपैकी फोटू वगैरे टाकीन. साला, जळू देत काही लोकांना! :)

(ह्या जळणार्‍या कंपूतली मंडळी कोण हे तू ओळखलं असशीलच! खी खी खी!
असो, ज्ञानेश्वर महाराज की जय! ;) )

आपला,
(प्रियालीचा मित्र) तात्या.

बेसनलाडू's picture

11 Jun 2008 - 1:40 am | बेसनलाडू

आणखी एका अवलियाची रंजक,जिवंत ओळख करून दिल्याबद्दल आभार आणि अभिनंदन!
(आभारी)बेसनलाडू

अरुण मनोहर's picture

11 Jun 2008 - 6:55 am | अरुण मनोहर

संगीतात विद्वान असणे म्हणजे साक्षात सरस्वतीचा वरदहस्त असणे. अशा दिग्गज व्यक्तीमत्वाची ओळख करून दिल्या साठी आभार.

रामदास's picture

11 Jun 2008 - 7:41 am | रामदास

आज उत्तम सुदीन , झाले दर्शन संतांचे.
पाप ताप दैन्य गेले संत पाउले पाहता.

भडकमकर मास्तर's picture

11 Jun 2008 - 8:47 am | भडकमकर मास्तर

एकदम मस्त लेख...
तात्या , असेच लेख येउद्यात...
...
अवांतर : लेकडेमो म्हणजे नक्की काय ?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

11 Jun 2008 - 12:21 pm | स्वाती दिनेश

ओळख आणि फोटो आवडले,लेख नेहमीप्रमाणेच आवडला हे वेसांनल,
स्वाती

विसुनाना's picture

11 Jun 2008 - 2:10 pm | विसुनाना

महालेबुवांसारख्या एका प्रसिद्धीपराङ्मुख संगीतसाधकाची आणि त्याच्यातल्या महान संगीततज्ञाची
ओळख करून दिल्याबद्दल आभार.
लेखातून निर्माण झालेली महालेबुवांची, त्यांच्या सौभाग्यवतींची प्रतिमा आणि प्रकाशचित्रातली प्रत्यक्ष प्रतिमा -
तंतोतंत जुळतात. दंपतीच्या चेहर्‍यावरील भाव अगदी 'कृतार्थ'शब्दाला साजेसे आहेत.

हा लेख 'प्रकाशचित्रांसह वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी' असा झाला आहे.

अवांतर - व्यक्तीचित्रे रंगवताना तुम्ही अगदी भाईकाकांच्या हातावर हात मारता हे मी पूर्वी म्हटल्याचे स्मरत असेलच!

विसोबा खेचर's picture

11 Jun 2008 - 5:00 pm | विसोबा खेचर

अवांतर - व्यक्तीचित्रे रंगवताना तुम्ही अगदी भाईकाकांच्या हातावर हात मारता हे मी पूर्वी म्हटल्याचे स्मरत असेलच!

धन्यवाद नानासाहेब! परंतु ज्या काही चार वेड्यावाकड्या ओळी लिहितो ते त्यांच्याच आशीर्वादामुळे लिहू शकतो असं मी मानतो!

आपला,
(भाईकाकांचा शिष्य) तात्या.

विवेक काजरेकर's picture

11 Jun 2008 - 4:58 pm | विवेक काजरेकर

येऊ द्यात अजून असेच लेख.

गुरुंच्या तसबिरींना देवघरात स्थान, यातच महालेबुवांची गुरुभक्ती दिसून येते.

महालेबुवांचं गाणं ऎकण्याचा योग आला नाही अजून. तुमच्याकडे असेलच त्यांचं ध्वनिमुद्रण. किंवा जालावर कुठे उपलब्ध आहे का ? त्यांच्या काही ध्वनिमुद्रिका किंवा तबकड्या आहेत का ?

विसोबा खेचर's picture

12 Jun 2008 - 7:24 am | विसोबा खेचर

महालेबुवांच्या गाण्याची झलक मप३ स्वरुपात माझ्याकडे नाहीये, कधी मिळाल्यास नक्कीच जालावर चढवेन..

असो, प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचे मनापासून आभार...

आपला,
(कृतज्ञ) तात्या.