स्फुट: रचना!

राघव's picture
राघव in जनातलं, मनातलं
19 Jan 2012 - 1:04 am

कोणतीही सुंदर रचना कशी घडत असेल? बर्‍याच दिवसांपासून उगाच हा प्रश्न मला पिडतोय. :)
तसं तर रचना = पदार्थ, शिल्प, रेखाचित्र, छायाचित्र, गद्य-पद्य लेखन, संगीत..
पण सोबतच एखादे सुंदर घर, एखादी आठवण, एखादं मैत्रीचं अतूट नातं, एखादी अप्रतीम - संपूच नये असं वाटणारी संध्याकाळ.. असंही बरंच काही म्हणता येईल.. नाही?

मग विचार केला, कोणतीही रचना सुंदर केव्हा नसते? सहज उत्तर येतं.. जेव्हा ती आवडत नाही! का आवडत नाही? हृदयाला भिडत नाही म्हणून. म्हणजे कोणतीही रचना सुंदर तेव्हा होते जेव्हा ती हृदयाला भिडते. आता हे म्हणजे भावनेचा खेळ सुरू झाला असे वाटेल, पण थोड्या वेगळ्या दृष्टीकोनानं असं दिसतं की मनापासून, अगदी आतून स्फुरलेली कोणतीही गोष्ट, शक्यतो, समोरच्या व्यक्तीला जशी आपल्याला अभिप्रेत तशी उमजते! याचाच दुसरा अर्थ असा की ज्याला ही अभिव्यक्ती कळते त्यालाच ती सुंदर अशी जाणवेल. बर्‍याचदा आपल्यालाच आपली रचना आवडत नाही याचं कारणही हेच असावं. मनांतलं हवं तसं माध्यमात उतरत नाही म्हणून.

तसातर शंकांना अंत कधीच नसतो पण आता रेखाचित्र-छायाचित्र आतून कसे स्फुरेल? :)
मला वाटतं, रेखाचित्र-छायाचित्र काढण्याची ईच्छा आतून स्फुरते. कुणीतरी जणू आतून धक्का देत सांगतं, "अरे बघ.. हेच ते ज्याचं तू चित्र काढलं पाहिजेस". किंबहुना वर उल्लेखलेल्या कोणत्याही रचनेबाबत कमी अधिक प्रमाणात असं म्हणता येईल. मनापासून अपील होणं म्हणजे हेच असावं! हे असं झालं ना की मगच त्याची गोडी उमजते. अर्थात्‌ केवळ समजण्यात मजा नाही..ते उमजलंच पाहिजे. दूध म्हणजे काय याचं कितीही वर्णन केलं तरी ते पिऊन बघीतल्याशिवाय उमजणार नाही. तस्सं!

पण यासाठी थोडंसं का होईना वेडू असावं लागतं! लोकं कधी कधी विक्षिप्तही म्हणतात!! पण असं घडतं हेही तेवढंच खरं.
जसं:
तुम्ही तुमच्या ग्रुपबरोबर रस्त्याच्या एका कडेला उभे आहात. संध्याकाळ होत आलेली वेळ आहे. रहदारी नाही असंतर मी गृहितही धरणार नाही पण थोडी वर्दळ कमी आहे. गप्पा चाललेल्या आहेत. तुम्हीही त्यात बर्‍यापैकी गुंग आहात. तेवढ्यात तुम्हाला उतरंडीला लागलेला सूर्य दिसतो. बराचसा पिवळा, थोडासा केशरी, अन्‌ आजुबाजुचं आकाश लालसर छटा दाखवतंय. तुमच्या बाजुला असलेल्या झाडाच्या एक-दोन डहाळ्या जराशा त्या बिंबावर झुकलेल्या आहेत. मोठं सुंदर दिसतंय दृष्य. तेवढ्यात त्या डहाळीवर असलेल्या काही कोवळ्या पानांकडे तुमचं लक्ष जातं. वर्णन करतांना शब्द सुचणार नाहीत असे फार सुंदर रंग दिसतात. तुम्ही आसपासच्या डहाळ्यासुद्धा बघता पण त्यावर तेवढी कोवळी पानं जाणवत नाहीत. आसपासच्या झाडांवर बघता तरी तसली कोवळी झाक तिथं दिसत नाही. एका झाडाखाली गळलेल्या पानांवर तुमचं लक्ष जातं.

तिथं एक पिंपळाचं जाळीदार पान तुम्हाला दिसतं. तुम्ही तिथं खेचल्यासारखे जाता, ते उचलता, बघता.. ती नक्षी अत्यंत सुबक दिसते. कशी एवढी सुंदर नक्षी पडत असेल असं वाटतं. एव्हाना सूर्य बराच खाली आलेला असतो. ते लालसर सूर्यबिंब, आसमंत भारणारी रंगांची उधळण हे सर्व एकटक बघत असतांनाच पाठीमागून आवाज येतो.. "येडा झालाय स्साला.."!! आपण तत्क्षणी जमिनीवर येतो. ग्रुपमधे परत फिरतो. एव्हाना सगळ्यांनी आपला वेगवेगळ्या पद्धतीनं उद्धार केलेला असतो. आपण हसून विषय बदलत त्यांच्यात मिसळून जातो. पण त्या काही मिनिटांत आलेला अनुभव मनाला ताजं करून जातो.

कविता लिहितांना मन ताजंतवानं होण्याचा असा अनुभव मी अनेकदा घेतलाय. [ टीपः मी फार चांगलं लिहितो असं काहीही मला अजिबात म्हणायचं नाहीये. :) ]
अगोदर मी एखादा विषय ठरवून त्यावर लिहू जायचो. पण ते तसं करणं हे फार जिकिरीचं होऊन बसायचं. कारण माझा कवितांचा, विषयांचा म्हणावा तसा अभ्यास नाही. त्यातही कवितांच्या व्याकरणाचा, छंद-अलंकार वगैरेंचा तर अजिबात नाही. स्तोत्र वगैरे म्हणायच्या सवयीमुळे चालीत म्हणणं तेवढं समजायचं. पण मात्रा-गण वगैरे शब्द कानांवर पडले की, आपण गणंग आहोत हे पुन्हा जाणवू लागायचं! त्यामुळे विषयानुसार लिहायचो तेव्हा फारसं काही खास लिहिल्या जायचं नाही. स्वत:ची एकही ओळ मला स्वत:लाच अपील व्हायची नाही. या गोष्टीचा केवळ एकच फायदा झाला तो म्हणजे लिहिण्याआधी विषयाचा सखोल विचार करायचा असतो हे उमजले! नंतर कधी-कसे कोण जाणे, मी विषय ठरवून लिहिणं सोडून दिलं. शब्द जोवर स्वत:हून सुचत नाहीत तोवर लिहायचं नाही हेच ठरवून टाकलं. बर्‍याचदा ५-६ महिनेसुद्धा कोणतीही रचना होत नाही. पण जेव्हा केव्हा लिहितो, तेव्हा बहुतेकवेळी सुरुवातीला एका विषयाशी निगडीत अशी कल्पना स्फुरलेली असतांना, लिहून होईतोवर भलत्याच कोणत्यातरी विषयावर जाऊन थांबतो. अनेकदा माझं काम फक्त शब्दांची फेरफार करणे, थोडे एकाच लयीत गुणगुणता येईल असे बनवणे इतपतच असतं. बाकी मूळ कल्पना वगैरे सर्व आपोआपच सुचलेल्या असतात. पण हे असं काही लिहिल्या जाण्याअगोदर कित्येक दिवस असं वाटत असतं की काहीतरी लिहायला हवं.. अन् ते स्फुरण्याची वाट पाहणं एवढंच हातात असतं.

खांडेकरांनी शांताबाई शेळके यांना कवितांसाठी एक सल्ला दिला होता. ते म्हणाले होतेत, "शब्द, ओळ जेव्हा सुचेल तेव्हा तशी लिहून ठेवत चला. एखादा शब्द नंतर आवडला नाही तर त्यावर फक्त एक आडवी रेष मारून ठेवा, जेणेकरून तो शब्द दिसायला हवा. अशी पुरेशी पानं भरलीत की त्यात तुमची रचना अन्‌ तिचा जन्मप्रवास दिसून येईल. यातून आपल्या लेखनात आपोआपच सुधारणा होऊ लागते."

आपल्याला असे कोणते अनुभव आहेत का हे प्रत्येकानं स्वत:च बघायला हवं, पण मला वाटतं हे असे अनुभव माणसाचं जगणं समृद्ध करतात. नाही? :)

शुभम्‌

कलावाङ्मयविचारआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

19 Jan 2012 - 2:41 am | अर्धवटराव

अभिव्यक्तीचा आनंद जन्मायला मोजून ९ महिने घेत नाहि हे खरच. कोणाला पालवी लवकर फुटते तर कोणि माळरानावर करडा-पिवळा होऊन उन्हाळा सरायची वाट बघत बसतो.

अर्धवटराव

लेखन आवडलं. सूर्यास्ताचं वर्णन वाचून ऑक्टोबर महिन्यातला प्रसंग आठवला.
रविवार संध्याकाळ होती. फॉल असल्याने झाडांचे खराटे आधीच झाले होते.
विकांत गुंडाळत असताना अचानक काहीतरी वस्तू दुकानातून आणायची राहिल्याचं आठवलं.
गडबडीत गाडी काढली आणि रस्त्यावर असलेल्या पहिल्याच लाल दिव्याला थांबले.
समोर मावळत्या सूर्याचा लाल गोळा रस्त्याच्या शेवटी टेकल्यासारखा दिसत होता.
पहिल्यांदाच इतकं सुंदर दृष्य पाहिलं.
पुढच्या अठवड्याच्या तयारीत, व्यवहारी जगात असलेलं मन एकदम गोठल्यासारखं झालं
समोरचा सिग्नल हिरवा होऊ नये आणि हा सूर्य असाच रहावा असे वाटण्याचे भानही नव्हते.
शेजारी असलेल्या सेलफोनच्या क्यामेर्‍याने चित्र टिपायलाही नको वाटलं.

दादा कोंडके's picture

19 Jan 2012 - 7:54 pm | दादा कोंडके

एकाच प्रतिसादात अनेक क्षीण प्रयत्न बघून ड्वाले पाणावले. :)

हरकत नाही. डोळे पुसा म्हणजे बरे वाटेल.
माझे प्रयत्न क्षीण वाटल्याने तुम्ही रडू नका.
मला यापेक्षा बरं लिहिता येणार नाही.

मराठमोळा's picture

19 Jan 2012 - 4:19 am | मराठमोळा

मस्तच रे राघवा..
बर्‍याच दिवसातून साहित्यविभागात काही लिहिलं आहेस.. तेही अगदी स्वांतसुखाय.. :)
एकदम आवडले प्रकटन.

>>पण यासाठी थोडंसं का होईना वेडू असावं लागतं! लोकं कधी कधी विक्षिप्तही म्हणतात
अगदी अगदी.. भावनांना आणि निसर्गाला मानवी कायदे थोडीच समजतात.

अन्या दातार's picture

19 Jan 2012 - 10:10 am | अन्या दातार

सुरेख.

स्फुट आवडले.

५० फक्त's picture

19 Jan 2012 - 10:16 am | ५० फक्त

मस्त जमलंय आणि उमजलंय हे जास्त महत्वाचं.

स्फुट आवडलं!

अगोदर मी एखादा विषय ठरवून त्यावर लिहू जायचो. पण ते तसं करणं हे फार जिकिरीचं होऊन बसायचं. कारण माझा कवितांचा, विषयांचा म्हणावा तसा अभ्यास नाही. त्यातही कवितांच्या व्याकरणाचा, छंद-अलंकार वगैरेंचा तर अजिबात नाही. स्तोत्र वगैरे म्हणायच्या सवयीमुळे चालीत म्हणणं तेवढं समजायचं. पण मात्रा-गण वगैरे शब्द कानांवर पडले की, आपण गणंग आहोत हे पुन्हा जाणवू लागायचं! त्यामुळे विषयानुसार लिहायचो तेव्हा फारसं काही खास लिहिल्या जायचं नाही. स्वत:ची एकही ओळ मला स्वत:लाच अपील व्हायची नाही. या गोष्टीचा केवळ एकच फायदा झाला तो म्हणजे लिहिण्याआधी विषयाचा सखोल विचार करायचा असतो हे उमजले! नंतर कधी-कसे कोण जाणे, मी विषय ठरवून लिहिणं सोडून दिलं. शब्द जोवर स्वत:हून सुचत नाहीत तोवर लिहायचं नाही हेच ठरवून टाकलं. बर्‍याचदा ५-६ महिनेसुद्धा कोणतीही रचना होत नाही. पण जेव्हा केव्हा लिहितो, तेव्हा बहुतेकवेळी सुरुवातीला एका विषयाशी निगडीत अशी कल्पना स्फुरलेली असतांना, लिहून होईतोवर भलत्याच कोणत्यातरी विषयावर जाऊन थांबतो. अनेकदा माझं काम फक्त शब्दांची फेरफार करणे, थोडे एकाच लयीत गुणगुणता येईल असे बनवणे इतपतच असतं. बाकी मूळ कल्पना वगैरे सर्व आपोआपच सुचलेल्या असतात. पण हे असं काही लिहिल्या जाण्याअगोदर कित्येक दिवस असं वाटत असतं की काहीतरी लिहायला हवं.. अन् ते स्फुरण्याची वाट पाहणं एवढंच हातात असतं.

माझ्यासाठी हे वाट पाहणं कित्येक वर्षांच असते. मग कधीकधी तो कवी मेलाय अस वाटते...पण 'आतून' वाटत नाही, तोपर्यंत लिहू नाही.

बहुतेक वेळा जे खूप आवडतं, त्याच्याशी कुठेतरी 'रिलेट' होता येतं म्हणून...

कौन रोता है किसी और की खातिर ए दोस्त!
सबको अपनी ही किसी बात पे रोना आया|

पैसा's picture

19 Jan 2012 - 11:05 am | पैसा

ही तुमची रचनाच अप्रतिम सुंदर झालीय!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Jan 2012 - 11:27 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अगदी माझ्या मनातले लिहीलेत तुम्ही!!

मूकवाचक's picture

19 Jan 2012 - 11:43 am | मूकवाचक

_/\_

यशोधरा's picture

19 Jan 2012 - 11:38 am | यशोधरा

स्फुट आवडलं.

चैतन्य दीक्षित's picture

19 Jan 2012 - 2:31 pm | चैतन्य दीक्षित

स्फुट आवडलं.
सूर्यास्ताचं वर्णन वाचून तसे अनेक प्रसंग डोळ्यापुढून गेले.
उदा:समुद्रकिनार्‍यावरून पौर्णिमेचा चंद्र उगवताना पाहिला होता ते वर्णनातीत आहे.

कविता ठरवून लिहिणं अवघडच आहे.
पण सहज सुचलेली असली तरीही बर्‍याचदा ती 'स्वान्त:सुखाय' नसते.
(म्हणजे, ही कविता वाचून अमुक व्यक्ती किंवा वाचक काय म्हणतील? त्यांना आवडेल ना? हे विचार जास्त असतात.)
त्यामुळे सुरुवात सहज सुचलेली असली तरीही बर्‍याचदा शेवट थोडासा 'टची' करण्याकडे किंवा शेवटात थोडा ट्विस्ट देण्याकडे कल असतो. (हे माझं निरीक्षण नाही अनुभव आहे)
पण हेही खरंच, की जेव्हा असा कुठलाही विचार नसतो आणि केवळ सुचतंय आणि ते लिहिण्याची अनिवार इच्छा होते आहे म्हणून जेव्हा लिहिली जाते, ती कविता लाजवाब असते. बाकीच्यांना आवडो न आवडो... मी स्वत: स्वतःवर जाम खुष असतो.
(अवांतर-हल्ली असं स्वतःवर खुष असणं कमी कमी होत चाललंय का जगात? )
(अति-अवांतर- काही खास लिहिल्या जायचं नाही. अशी रचना बर्‍याच ठिकाणी पाहिली आहे. 'लिहिलं जायचं नाही' हे योग्य वाटतं. 'लिहिल्या जातं, केल्या जात आहे वगैरे रचना कुठून आल्या कोण जाणे.)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2012 - 3:46 pm | बिपिन कार्यकर्ते

_/\_

कवितानागेश's picture

19 Jan 2012 - 4:01 pm | कवितानागेश

सुंदर लिहिलय

राघव's picture

19 Jan 2012 - 8:14 pm | राघव

सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद.

@ममो:
भावनांना आणि निसर्गाला मानवी कायदे थोडीच समजतात - चोक्कस!
बाकी स्वांतसुखाय रचना म्हणजे नक्की काय याबद्दल मलाच बरेच गोंधळ आहेत. त्यामुळे त्याबद्दल सध्या श्रवणं कृत्वा!

@रेवतीतै:
खरंय तुमचं म्हणणं. माझा एक मित्र जयपूरच्या अल्बर्ट हॉल वस्तुसंग्रहालयात जाऊन, सर्व बघून, १५-२० मिनिटांत बाहेर आला. माझ्यामते अगदी निरखून नाही पण सहज बघतांना सुद्धा साधारण ४५-५० मिनिटं लागायली हवीत.
मी त्याला विचारले, "तू हे कसे काय जमवलेस रे बाबा?"
त्यावर तो म्हणतो, "अरे बर्‍याच वस्तूंचे फोटो काढलेत ना. घरी गेलो की निवांत बघेन!"
त्याचे ते बोलणे पचवायला मी जरावेळ नुसतांच "आ" वासून उभा होतो. :)

@मनीष:
बरोबर आहे, रिलेट होण्यामुळे रचना लवकर अपील होण्यास जरूर मदत मिळते
. बाकी तुमच्या दोन्ही कविता वाचल्यात. खूप सरळ, साधेपणानं, सहज उतरल्या आहेत. and as someone has said, Simplicity is the most Complicated thing to achieve!

@चैतन्यः
तू म्हणालास तसे सहज स्फुरलेली रचना आनंददायक/दु:खदायक होतांना एक आंतरिक समाधान देऊन जाते हे स्वत: मी अनुभवलंय. मग ती रचना तेवढी उत्कृष्ट, परिपक्व असावीच अशी काही जरूर नाही. त्यावेळचे ते समाधान निराळेच. :)

राघव

चतुरंग's picture

19 Jan 2012 - 11:58 pm | चतुरंग

कविता ठरवून करता येतात का? याचं उत्तर गदिमांच्याच एका अनुभवात वाचलं होतं.
गीतरामायणाची गीते द्यायला अण्णांना नेहेमीच शेवटला क्षण उजाडे. बाबूजी रोज विचारणा करीत आणि यांना शेवटच्या क्षणापर्यंत गीत सुचत नसे. अण्णांच्या पत्नी विद्याताई माडगूळकरांनी असे लिहून ठेवले आहे की रोज सकाळी मला त्यांची खोली नीटनेटकी आवरुन स्वच्छ करुन ठेवावी लागे. डेस्कवरती कागद, पेन सगळे साहित्य योग्य प्रकारे ठेवून उदबत्ती वगैरे लावून मी वातावरण निर्मिती करुन ठेवीत असे. कित्येकदा याचा काही उपयोग होतही नसे. काही सुचले नाही की अण्णा दिवसभर अस्वस्थ असत. मग कधीकधी अचानक संध्याकाळी सुचे ते अंगणात बसून लिहून काढत किंवा काही गीते तर चक्क झोपेतून उठून मध्यरात्री लिहिली आहेत. 'राम जन्मला ग सखे' ह्या गाण्याच्यावेळी ते असेच अस्वस्थ होते. मी दिवसभर वाट बघून संध्याकाळी शेवटी विचारले की काही सुचले की नाही? अण्णा म्हणाले "अगं प्रसूतीच्या कळा येत आहेत पण अजून वेळ आहे!" शेवटी रात्रीही काही सुचत नव्हते. पुन्हा विचारल्यावर म्हणाले "अगं हा काही कोणा अण्णा माडगूळकराचा जन्म नव्हे, रामजन्म आहे, वेळ लागणारच !" शेवटी पहाटे ५ वाजता ते गीत स्फुरले तसे एकटाकी लिहून काढले.
सिद्धहस्त, सरस्वतीपुत्राची ही कथा आहे तर आपण पामरांना वाट बघायला लागावी यात नवल ते काय?

-रंगा