खिद्रापूरचे कोपेश्वर मंदीर
बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि अचूकतेचा एक मापदंड ठरावा असे आहे. पुण्याहून इस्लामपूर-सांगली-जयसिंगपूरला पोहोचलो. जयसिंगपूरला हॉटेल शांभवीत मुक्काम टाकला. गाडी चालवून दमल्यामुळे जेवायच्या अगोदर अपेयपानाचा कार्यक्रम उरकून ताणून दिली. सकाळी ६ वाजता निघायचे होते कारण सकाळच्या कोवळ्या उन्हात फोटो काढायची संधी सोडायची नव्हती.
सकाळी उजाडता उजाडता खिद्रापूरला पोहोचलो. अरेच्चा देऊळ कोठेच दिसेना. ना कळस ना मोकळी जागा. पण दोन घराच्या मधे एक दरवाजा दिसला आणि वर गजराजांच्या मूर्ती स्वागताला हजर होत्या.
गजराज :
आत नजर टाकली आणि डोळ्यावर विश्वास बसेना.
बाहेरून दिसले देवळाचे काही भाग...
चला, मनात म्हटले ट्रीप वाया निश्चितच जाणार नाही. खिद्रापूरचे देऊळ आहे शंकराचे आणि त्याच्या अनेक नावापैकी एक घेऊन तो या देवळात आहे. “कोपेश्वर” अर्थात नेहमीप्रमाणे याच्या मागे ही दंतकथा आहेच. शिवमंदीरात आपल्याला अगोदर दिसतो तो नंदी. काळयाकुळकुळीत पाषाणातील सुबक मूर्तीला नमस्कार करूनच आपण शिवाच्या दर्शनाला जातो. पण येथे बघतो तर नंदी गायब. त्याचेही उत्तर खालील दंतकथेत दडले आहे. प्रजापतीला १६ मुली होत्या. त्यातील सर्वात धाकटी होती सती. शंकराच्या नादी लागू नको हा सगळ्यांचा सल्ला धुडकावून तिने शंकराला वरले. प्रजापतीला हे बिलकुल पसंत नव्हते. त्याने वाजपेय यज्ञ करायचा ठरवले व जाणूनबुजून आपल्या जावयला आमंत्रण दिले नाही. कटकट नको म्हणून स्वत:च्या कन्येलाही बोलावले नाही. शंकराला बोलाविणे नसल्यामुळे त्याचा तेथे जायचा प्रश्नच उरला नाही पण सतीला माहेरची आठवण येऊन तिने त्या यज्ञाला जायचा हट्ट धरला. शंकराने त्या स्त्रीहट्टाला शरण जावून तिला परवानगी दिली पण जाताना बरोबर नंदीला दिले. म्हणून या शंकराच्या निवासस्थानी नंदी नाही. हे यज्ञाचे ठिकाण होते कृष्णा नदीच्या पलिकडे. माहेरी गेल्यावर सतीचा अपमान झाला व तिच्या पतीचीही येथेच्छ निंदा करण्यात आली. ती सहन न होऊन सतीने तेथेच त्या यज्ञात जीव दिला. हे वृत्त कळताच शंकराचा क्रोध अनावर झाला. त्याने विरभद्राला त्या यज्ञाचा विध्वंस करायचे आवाहन केले. त्या वेळेस त्याने आपल्या जटा रागाने जमिनीवर आदळल्या ज्याने पृथ्वी कंप पावली इ..इ.. म्हणून हा “कोपेश्वर”.
संकेश्वरचा शंखनाथ, रायबागचा बकनाथ व कोपेश्वराचे दर्शन एका दिवसात केले असता स्वर्गप्रवेश आरक्षित आहे.
खालचे चित्र आपण माझ्या एका संगीतविषयक लेखात बघितले आहे.
गाभारा आणि त्याच्या पुढे सभामंडप किंवा रंगमंडप अशी रचना भारतातील बहुतेक देवळाची आहे.
गाभारा व सभामंडप.
काहीच देवळात अजून एका मंडपाची रचन केलेली आढळते ती म्हणजे “स्वर्गमंडप”. उदा. गोंदेश्वरलाही (सिन्नर) स्वर्गमंडप आहे. पण कोपेश्वरचा स्वर्गमंडप हा भारतातील सगळ्या स्वर्गमंडपात उजवा मानला जातो.
स्वर्गमंडप एका बाजूने...
हा स्वर्गमंडप खाली चित्रात दाखवलेल्या अशा ४८ खांबांवर उभा आहे.
चारही दिशांना चार दरवाजे आहेत. स्वर्गमंडपात अनेक आश्चर्ये बघायला मिळतात. पहिले नजरेत भरते ते म्हणजे वर छताला असलेले १३ फूट व्यासाची एक खिडकी.
छतातील गवाक्ष :
त्याच्याच बरोबर खाली एक गोल बरोबर १३ फूट व्यासाची गोल शिळा आहे. या दोन्हीचा मध्य बरोबर जुळलेला आहे. ही जी खालची शिळा आहे त्याच्या बाजूने गोलाकार १२ खांब आहेत ज्यावर हे वरचे खिडकी असलेले छत पेलेलेले आहे. या बारा खांबांच्या मागे अजून १६ खांबांचे वर्तूळ आहे. या सगळ्या खांबांनी ते छत आणि त्या मंडपाचा काही भाग पेलला आहे.
याच्या मागे अजून ८ खांबांचे वर्तूळ आहे. यातील प्रत्येकी दोन खांब चार दरवाजांच्या तुळया पेलण्यासाठी उभे केले आहेत. थोडक्यात या ४८ खांबांवर हा स्वर्ग उभा आहे. आणि आपण जर या मधल्या शिळेवर झोपलो तर आपल्याला स्वर्गात असल्याचा भास होतो. ( अर्थात स्वर्ग मेल्याशिवाय दिसत नाही असे म्हणतात आणि आपल्याला कोण हो स्वर्गात घेणार ? पण स्वर्गात जे असते ते सुंदर, भव्य, दिव्य असते असे आपण मानतो त्यानुसार ......आणि रंभा, उर्चशीही या देवळात आहेतच.)
स्वर्गमंडपातील खांब :
कुठल्याही देवळाचे (प्राचीन) काही भाग पडतात ते खालील प्रमाणे –
सगळ्यात खालची शिळा ज्यावर मंदीर उभे असते ती खुरशिळा. (जसे जनावरांचे खूर तसे) त्यावर जे जोते असते त्यावर बहुतेक वेळा हत्तींची शिल्पे असतात. हे हत्ती या मंदिराचे वजन झेलतात अशी कल्पना. त्या जोत्याला म्हणतात गजपट्ट. त्यावर मग मंदिराच्या भिंती उभ्या केल्या जातात. यावर नर नारी, देव देवता, प्राणी पक्षी, कहाण्या, कोरल्या जातात किंवा मूर्ती स्वरूपात गुंतवल्या असतात. या पट्ट्याला म्हणतात नरपट्ट. म्हणजे माणसांची जागा. या नरपट्ट्य़ामधे तीन बाजूला गाभार्यात उघडणारी गवाक्षे असतात त्याला म्हणतात देवकोष्ट. म्हणजे समजा एका बाजूचा विचार केला तर अशी रचना असते.
कुंड – त्यावर गोमुख किंवा मकरमुख
त्याच्याच पातळीवर खुरशिळा.
मग वजन पेलणारे गजपट्ट.
गजपट्ट :
त्या नंतर नरपट्ट. याच नरपट्ट्यामधे तीन बाजूला देवकोष्ट. चौथ्या बाजूला आत शिरायचे द्वार असल्यामुळे तेथे हे नसते.
नरपट्ट्मधील नक्षीकाम :
गजपट्टाच्या पातळीवर गाभारा.
देवकोष्ट :
मग छत व शिखर (असल्यास).
कोपेश्वर मंदिराचा सभामंडपही विशाल असून त्यात ४२ खांब आहेत. वर म्हटल्याप्रमाणे यात नंदीची मूर्ती नाही. येथून अर्थातच आपण गाभार्यात प्रवेश करता. मला वाटते हा एकमेव गाभारा आहे जेथे शैव आणि वैष्णव या दोघांची श्रद्धास्थाने एकत्र आहेत. कोपेश्वर आणि विष्णूचे रुप धोपेश्वर. शिवाचे दर्शन घेण्या अगोदर विष्णूचे दर्शन घ्यावेच लागते.
गाभार्यातील पिंड व धोपेश्वर.
शिल्पकला :
शिल्पकले बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. पण मी काही शिल्पांची छायाचित्रे आपल्यासाठी टाकत आहे, त्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकेल.
प्रियकराला पत्र लिहिण्यात गुंग झालेली सुंदरी. अशी तीन शिल्पे आहेत. पत्राची सुरवात आणि शेवट असे दाखवले आहे. म्हटल चला या सुंदर स्त्रीच्या हस्ते आपले नाव लिहून घेऊयात :-)
एक शिल्प
शिल्पातील सगळ्यात सुंदर स्त्री....
आशा आहे आपल्याला हे आवडले असेल आणि आपण हा नितांत सुंदर शिल्पकलेचा ठेवा बघायला जाल.
अजूनही बरीच छायाचित्रे आहेत पण विस्तारभयाने येथे टाकली नाहीत. भारतीय मूर्तीशास्त्र आणि शिल्पकला याचीही बरीच माहिती या निमित्ताने गोळा केली आहे, (थोडाफार आभ्यासही केला आहे), ती परत केव्हातरी.......
पूर्व-पश्चिम लांबी : १५२ फूट
रूंदी : १०४ फूट.
याचा आराखडा ACAD वर काढायला दिला आहे. तो आल्यावर याच धाग्यात टाकेन !
पूर्ण देऊळ
अजून काही फोटो या धाग्यावर पहायला मिळतील.
शाहिर यांचा या देवळावरचा लेखही जरूर वाचावा
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
14 Jan 2012 - 7:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेखन आहे, आवडले. मंदिरांच्या मांडणीतील 'खुरशिळा. गजपट्ट. नरपट्ट. देवकोष्ट' नावे माहिती नव्हती. धन्यवाद. अजून काही नावे असतील तर जरुर टाका. भारतीय मूर्तीशास्त्र आणि शिल्पकला याबद्दल काही छायाचित्र आहेत तर तीही टाका. विस्तारभयाचा विचार करु नका. पुढील भागाची वाट पाहात आहोत.
छायाचित्रेही आवडली.
-दिलीप बिरुटे
14 Jan 2012 - 11:55 pm | गणपा
अगदी असेच म्हणतो.
14 Jan 2012 - 8:17 pm | पिंगू
काका वाटल्यास पुढील भाग टाकायला काहीच हरकत नाही आणि इथे अतिशय छान माहिती टंकत असताना विस्तारभयाचा विचारसुद्धा मनात आणू नका..
- पिंगू
14 Jan 2012 - 8:17 pm | JAGOMOHANPYARE
खिद्रापूर आमची सासुरवाडी. :)
सती त्या यज्ञाला नंदीवर बसून गेली होती. तो नंदी नदीच्या पलीकडे शिरगुप्पी की मांजरी अशा एका गावाजवळ पार्क करुन ती यज्ञाकडे गेली आणि तिथुन परत आलीच नाही.. त्यामुळे तो नंदी तिथेच राहिला.. म्हणून इथल्या शंकराला नंदी नाही.
14 Jan 2012 - 10:51 pm | जयंत कुलकर्णी
चायला, अगोदर नाही का सांगायचे ? मस्त जावयाचे मित्र म्हणून तुमच्या सासुरवाडीला पाहुणचार झोडून आलो असतो ना !
:-)
14 Jan 2012 - 9:15 pm | प्रशांत
सुंदर ठिकाणाचे फोटोंद्वारे सफर घडवुन दिल्याबद्द्ल धन्यवाद...!
14 Jan 2012 - 9:57 pm | प्रास
फोटो आणि सोबतची खिद्रापूरच्या कोपेश्वर महादेवविषयक माहिती दोन्हींचा झकास संगम होऊन एक छान लेख वाचायला मिळालाय. तेवढा धोपेश्वर कुठे नीट दिसला नाही बुवा, तो व्यवस्थित दाखवावा, अशी प्रार्थना!
तुम्ही या जागेकडे लोकांचं लक्ष वळवणार याची खात्री आहे.
या निमित्ताने तुम्ही जो भारतीय देवळांच्या स्थापत्यकलेचा आणि मूर्तीकलेचा अभ्यास केलेला आहे त्याविषयी लिखाण आणि संबंधीत 'फोटोज्'ची मेजवानी लवकरात लवकर द्याल अशी आशा आहे.
तुमचा फ्यान,
14 Jan 2012 - 10:07 pm | तुषार काळभोर
>>याचा आराखडा ACAD वर काढायला दिला आहे.
वाह!!
14 Jan 2012 - 11:08 pm | पैसा
तुम्ही "नाही म्हणणार्या बायकोला" चक्क गाडीत टाकून घेऊन गेलात? ग्रेट आहात!
मी हल्लीच खिद्रापूरला जाऊन आले. तिथे याच शैलीतलं पण जरा लहान जैन देऊळ आहे असं मला नंतर कळलं. तिथली शिल्पं बर्यापैकी सुस्थितीत आहेत असं एक फोटो आंतरजालावर पाहून वाटलं. आणि चुटपुट लागली. पुढच्या वेळेला तेही देऊळ बघून येईन!
14 Jan 2012 - 11:11 pm | जयंत कुलकर्णी
हो ! तसे देऊळ आहे ना. ते देऊळ म्हणजे या देवळाचाच भाग असावा. चुटपुट लागण्यासारखे काही नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो. तेथील शिल्पे मलाही एवढी आवडली नाहीत.
14 Jan 2012 - 11:42 pm | रेवती
फोटू चांगले आहेत.
अश्याप्रकारचे मंदीर आधी कधी पाहिले नाही म्हणून आवडले.
नाही म्हणणार्या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले
डोळ्यासमोर आले. हा हा हा.
15 Jan 2012 - 12:01 am | JAGOMOHANPYARE
http://www.misalpav.com/node/18392
15 Jan 2012 - 6:26 am | जयंत कुलकर्णी
हा धागा नजरेतून निसटला. मस्त फोटो आहेत.
धन्यवाद !
15 Jan 2012 - 12:57 pm | JAGOMOHANPYARE
कुठल्या तरी परधर्मीय सरदाराच्या बायकोला की मुलीला हे देऊळ आवडले आणि ती तिथून बाहेर यायला तयार नव्हती.. मणून त्या सरदाराने देऊळ मोडले अशी काहीतरी कथा आहे.
15 Jan 2012 - 1:28 am | अत्रुप्त आत्मा
छान माहिती,,,तितकेच छान फोटो :-)
15 Jan 2012 - 2:29 am | प्रभाकर पेठकर
खिद्रापुरचे कोपेश्वराचे देऊळ, पुराणकालीन स्थापत्य आणि अप्रतिम कलात्मकता केवळ मती गुंग करणार्या गोष्टी आहेत. आपल्या ओघवत्या शैलीतील लेखन आणि सिद्धहस्त छायाचित्रण ह्याने एकूण लेखन आस्वाद म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. अभिनंदन.
15 Jan 2012 - 7:04 am | निवेदिता-ताई
छान आलेत सगळे फोटो...
अशा प्रकारचे एक मंदिर आमचे गावात आहे....शिवकालीन.
15 Jan 2012 - 8:09 am | नरेंद्र गोळे
वा! जयंतराव अगदी नेऊनच आणलेत की हो स्वर्गमंडपात!!
तुम्हाला वैशिष्ट्ये कशी समोर आणावित ह्याची उत्तम जाण आहे. जोडीला सुंदर प्रचि आणि चित्रदर्शी लेखनशैलीमुळे सर्वच आविष्कार सुंदर सजला आहे. आवडला.
आकाशदर्शी गवाक्षाची, त्याच्या बरोब्बर खालीच, त्याच आकाराचा मंचकी पत्थर योजण्याची आणि स्वर्गमंडप सुरेख साकारण्याची आपल्या पूर्वजांची दृष्टी आणि अभियांत्रिकी दोन्हीही कौतुकास पात्र आहेत. आपण त्याच परंपरेचा वारसा मिरवतो ह्याचा त्यामुळेच सार्थ अभिमानही वाटतो आहे. आपल्या समृद्ध संस्कृतीचे हे उन्नत प्रतीक त्याच्या सर्व वैशिष्ट्यांसह इथे उत्तम सादर केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.
अर्थात त्यातील शिल्पकलेचा आणि त्यातील सुंदरतेचा आस्वाद घ्यायला प्रत्यक्ष भेटीचीच आवश्यकता असल्याचेही आपण लक्षात आणून दिलेलेच आहेत. तेही साधो हीच प्रार्थना!
15 Jan 2012 - 9:39 am | प्रचेतस
उत्तम फोटो, उत्तम लिखाण्,
मंदिराची माहिती, शिल्पकलेची माहिती फारच ओघवत्या शब्दांत करून दिली आहेत तुम्ही.
पुढच्या भागात याविषयी अधिक वाचायला आणि अधिक फोटो पाहायला नक्कीच आवडतील.
15 Jan 2012 - 10:49 am | तिमा
साधारणतः आम्हीही अशा बर्याच स्थळांना भेटी देत असतो. पण त्याची इतकी माहिती करुन घेण्याचे आजवर आम्हाला सुचलेच नव्हते. तुमच्या या लेखाने आता खिद्रापूरला जाईन म्हणतो. खरं तर अशा स्थानांना तुमच्यासारख्या माहितगार व अभ्यासू व्यक्तिंबरोबरच गेले पाहिजे. आणखी फोटो द्यावे (टाकावे हा शब्द पटत नाही) अशी विनंती.
15 Jan 2012 - 11:18 am | नीलकांत
उत्तम माहितीसोबत सुंदर फोटोंमुळे लेख अप्रतिम जमला आहे.
एक विनंती कराविशी वाटते की शिल्पकलेची खुप उत्तम ओळख करून दिली आहे त्या विषयी अधिक सविस्तर माहिती दिल्यास उत्तम होईल. काय होतं ना की अनेक ठिकाणी भेट देत असतो,अश्यावेळी अशी काही माहिती असल्यास अधिक जास्त समजून घेता येईल.
- नीलकांत
15 Jan 2012 - 12:09 pm | ५० फक्त
उत्तम माहिती, जायचे कसे त्याचा नकाशा दिल्यास अजुन उत्तम होईल.
15 Jan 2012 - 1:01 pm | JAGOMOHANPYARE
नकाशा कशाला हवा? सरळ मार्ग आहे.... आधी सांगली किंवा मिरज किंवा कोल्हापूर गाठा.( जे जवळ असेल ते)
मग तिथून कुरुंदवाडला या. ( हे आमचं गाव)
तिथून खिद्रापूर १५ किलोमिटर आहे.
15 Jan 2012 - 1:21 pm | अन्या दातार
कोल्हापुरला आलात तर एक कट्टा होउ शकेल बरं का ५०फक्त. ;)
जयंत सर, अप्रतिम माहिती. कितीतरी वेळा जाऊ जाऊ असं करत राहून गेलेले हे ठिकाण. आता जायलाच हवे असं वाटायला लावणारा धागा.
15 Jan 2012 - 5:38 pm | सूड
कोल्हापुरला आलात तर एक कट्टा होउ शकेल बरं का ५०फक्त
अन्याभौशी लै वेळा सहमत !! होऊन जौद्या एक कट्टा कोल्हापूरात .
सर, माहिती व फोटू आवडले.
16 Jan 2012 - 12:32 pm | मन१
एक जागा booked...
16 Jan 2012 - 12:56 pm | मालोजीराव
कोल्हापुरात कट्टा व्हायलाच हवा ...!
या हिवाळी अधिवेशनात आवाजी मतदानाने मंजूर करून घ्या ;)
- (कोल्हापूरचा) मालोजीराव
15 Jan 2012 - 3:54 pm | मन१
लेख फक्त सुबक नाही तर सुंदर आहे. आता हे मंदिर कधी बांधलं गेलं असावं? ही शिल्पं पाहून ह्याची जवळिक थेट चालुक्य्-राष्ट्रकूट काळातल्या मंदिरांशी वाटते. हा भूभाग तसाही तिथून जवळच* असणार्या बदामीच्या चालुक्यांच्या राज्याच्या ऐन प्रभावक्षेत्रात येत होता. तिथे सतत आधी चालुक्य आणि नंतर राष्तृअकूट सत्ता असली पाहिजे.
म्हणजे हे मंदिर त्यांच्या काळात, सातव्या-आठव्या शतकात बांधले गेले असले पाहिजे. तसेही तेव्हा बांधकाम कमी व कोरिव काम जास्त होत असे धार्मिक स्थळात.
आता चालुक्य कोण, कुठले असा प्रश्न पडेल,. तर चालुक्य म्हणजे सातव्या आठव्या शतकात उत्तर कर्नाटकातील बदामी तालुक्यात असणारे साम्राज्य. इथून कोल्हापूर वगैरे फार दूर नाही. साम्राज्याच्या सीमेतच येते. बदामी हे केंद्र धरले तर त्याच्या आसपास असणार्या बर्याच ठिकाणे असे अवशेष, सुंदर मंदिरे, लेण्या व वास्तु-चमत्कार मिळतील. अधिक माहिती खाली दुव्यांवर मिळेलः-
http://mr.upakram.org/node/3546
http://mr.upakram.org/node/1800
http://mr.upakram.org/node/3245
http://mr.upakram.org/node/3213
आता नंदिबद्द्लः-
मी जी पौराणिक कथा ऐकली आहे, त्यानुसार नंदी मंदिरात का नाही? तर "महादेवपत्नी सती हिने यज्ञात स्वतःची आहुती दिली ही अशुभ बातमी महादेवास कशी सांगावी" ह्या चिंतेने तो शंकरासमोर गेला नाही. तो दूरच थांबला. दूर म्हणजे कुठे? तर आपण सांगितलेले ठिकाण कर्नाटक सीमेपासून जवळच महाराष्ट्रात आहे. नंदि स्थिरावलाय तो कृष्णा नदिपलिकडल्या कर्नाटकातील येदुरवाडी ह्या गावी(जिल्हा चिक्कोडी). तो आजही तिथे सापदाअवयास हवा.
15 Jan 2012 - 7:29 pm | यकु
दुव्यांबद्दल धन्यवाद रे मनोबा.
चंद्रशेखर यांचे लेख सुद्धा जकुंच्या लेखांसारखीच मेजवानी आहेत. :)
जयंतकाकानी आणखी असे लेखन आणखी करावे ही विनंती.
15 Jan 2012 - 4:38 pm | कपिलमुनी
पहिला फोटो हंपी येथील आहे ..
बाकी मंदीरासमोरच्या नदीकाठाचे फोटु नाही का काढले ? रमणीय आहे ..
नरसोबाच्या वाडीला गेला होतात का ? बासूंदी लै भारी असते ..
वाडीचा नदी घाट फार सुंदर आहे
15 Jan 2012 - 6:11 pm | स्वाती दिनेश
छान फोटो आणि माहिती..
स्वाती
15 Jan 2012 - 8:14 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम फोटो, उत्तम विवेचन. धन्यवाद!
16 Jan 2012 - 6:46 am | मराठमोळा
कलाकृती उत्तम आहे.. आणि लेखही. :)
16 Jan 2012 - 9:33 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना मनापासून धन्यवाद !
16 Jan 2012 - 11:27 am | यशोधरा
जरा डिटेलमध्ये कोणी सांगेल का की खिद्रापूरला कसे जायचे? बस वगैरे जाते का? कृपया माहिती द्यावी.
फोटो फार आवडले.
16 Jan 2012 - 3:34 pm | JAGOMOHANPYARE
आधी सांगली किंवा मिरज किंवा कोल्हापूरला या.
तिथुन बसने कुरुंदवाडला या.
कुरुंदवाडहून खिद्रापूरला बस आहेत, पण अगदी कमी आहेत.. सहा आसनी रिक्षा वडाप आहेत... स्पेशल रिक्षा किंवा सहा आसनीला सगळ्या सीटचे पैसे दिले की ते स्पेशन घेऊन जातात. येताना बसची वाट बघत टाइम पास करुन बसने आले की चालते. किंवा पुन्हा रिक्षाने या. कुरुंदवाडहून खिद्रापुरला एक तास लागतो.
16 Jan 2012 - 12:26 pm | चिगो
सुंदर वर्णन आणि प्रकाशचित्रे.. नक्कीच भेट द्यावी असे स्थान आहे हे. बाकी अशा मंदीरांना भेट दिल्यावर इतकी सुंदर शिल्पकला, स्थापत्यकला काळौघात समाजातून नष्ट झालीय / होतेय याचं अतीव दु:ख होतं..
जयंत्जी, ह्या लेखाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद..
16 Jan 2012 - 2:13 pm | प्यारे१
सुंदर छायाचित्रे आणि माहिती.
आणखी सविस्तर वाचण्याच्या प्रतिक्षेत प्यारे
17 Jan 2012 - 8:15 pm | स्वाती२
धन्यवाद!